अतर्क्य घटना - काही अनुभव?

अतर्क्य घटना - काही अनुभव?

काहीवेळा असे अनुभव येतात की त्यांची काही संगती लागत नाही. तार्किक दृष्ट्याही काही उत्तर मिळत नाही. अशा अनुभवांना अंधश्रद्धाही म्हणवत नाही. माझ्या आठवणी प्रमाणे विणा गवाणकर किंवा मीना प्रभू (बहुदा गवाणकरच) यांनी एक पुस्तकात थायलंडमध्ये प्रवास करताना एका बुद्धविहारात आलेला चमत्कारिक अनुभव दिला आहे. यात कधीही न पाहिलेली एक बौद्ध साध्वी लेखिकेला हाताला धरून घेऊन गेली अशा स्वरूपाचा. सहजतेने फारसा न पटण्यासारखा. चमत्कारिक!

असे अनेकदा अनुभव सांगोवांगी पण ऐकलेले असतात. असाच एक अनुभव माझ्या एका रिचर्ड नावाच्या मित्राने सांगितला. हा मित्र जिओलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेला आहे. आणि सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये सरकारच्या खनिज खात्याचा एक डायरेक्टर आहे.

खाणीच्या कामामुळे त्याला अनेकदा देशभर फिरावे लागते. कामाचा भाग म्हणून काहीवेळा स्थानिक आदिवासीबरोबर (ऍबोरिजिनल) चर्चा करावी लागते. कंपन्यांना जमिनींतून खनिजे काढू द्यावीत यासाठी त्यांना पटवावे लागते. यात 'पटवावे लागते' कारण हे आदिवासी जमिनीला आई/देव मानतात. आणि त्यांचा याला सक्त विरोध असतो. खाणकाम मुख्यत: पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये चालते. अशाच एक खाणकाम विषयक दौऱ्यावर असताना एक अगदी लहानशा आदिवासी खेड्यात, आदिवासी, कंपनीचे प्रतिनिधी आणि सरकार तर्फे रिचर्ड आणि त्याचे ऑफिसर्स अशी मीटिंग होती. येथे होऊ घातलेल्या खोदकामाला आणि मीटिंगलाही जुने म्हातारे आदिवासी विरोध करत होते. ही मीटिंग सुरू असताना, एक अगदी जख्खड अशी म्हातारी बाई ओरडा आरडा करत तेथे आले आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हणाली की, तुम्ही हे ठीक करत नाहीये. याची फळे तुम्हाला भोगावीच लागतील. मी माझ्या पूर्वजानं आवाहन करते आहे.

पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तिला बाहेर काढले. पण मग तिने त्या 'शापासाठी'(?) लागणारे सर्व विधी त्या दाराबाहेरच बसून मंत्रोच्चार करत केले.

रिचर्डच्या म्हणण्यानुसार त्याला त्यांनंतर लगेचच एक प्रकारचे दडपण मानेजवळ जाणवायला लागले. आणि ते काहीकेल्या जाईना.

त्याच्या म्हणण्यानुसार तो अशा ढिगाने मीटिंग्ज अटेंड करतो. आणि अनेकदा तर मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांसोबत असतो. आदिवासींची अनेक निदर्शनेही त्याने पाहिली आहेत, पचवली आहेत. त्यामुळे यात मीटिंग चा ताण हा भागच नव्हता. यावेळी हे एक वेगळीच 'असणे' त्याच्या सोबतच होते. त्याला ते कुणाला समजावूनही सांगता येत नव्हते. त्याच्या म्हणण्यानुसार एक काळे अस्तित्व त्याच्या समवेत सारखे होते. या नंतर त्याचे मीटिंग मधले बोलणेही अगदीच मामुली झाले.

जसजसा काळ जात होता तसतसे 'ते असणे' जड होत होते. गुरफटल्यासारखे!

असा एक महिना गेला. त्याची पत्नीपण काळजीत पडली. सायकॉलोजीस्ट च्या म्हणण्यानुसार त्याची मानसिकता अतिशय चांगली होती. (तो सायकॉलोजीस्ट कडे जाऊन आला होता.) शेवटी तिने उपाय म्हणून किनेसिएलॉजीवाल्या एका बाईची भेट घ्यायचे ठरवले.

त्या बाईने तिचे उपचार सुरू करण्या आधी खूप वेळ बसवून ठेवले आणि ध्यान लावले. आणि अचानक विचारले की तू आदिवासींच्या कोणत्या भानगडीत अडकला आहेस का? शिवाय त्या गावाचे नाव घेऊन तू त्या गावात गेला होतास का असेही विचारले. तो प्रथम चकीत झाला. पण त्याला वाटले की त्याच्या पत्नीने सांगितले असेल. पण तिने सांगितले नव्हते मग त्या बाईने जेथे त्याला जड काळे अस्तित्व जाणवत होते तेथे हात दाखवून विचारले की, या भागात तुला काय होते आहे?

शिवाय त्याची आताची सर्व मानसिकता कथन केली. रिचर्ड गारच झाला! पण नंतर त्या बाईने 'तिचे उपाय योजून' ते अस्तित्व पळवून लावले!!! आणि त्यालाही ते 'मोकळेपण' जाणवले. त्याच्या म्हणण्यानुसार 'अगदी कुठल्यातरी अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून सुटल्यासारखे वाटले' पण त्याची अवस्था चमत्कारिक झाली. त्याला हे सुटणेही कुणाला सांगताही येत नव्हते. कारण त्याच्या मते तो कशात अडकला हेच नीट समजावण्यासारखे नव्हते.

बोलत बोलता विषय निघून (की काढून?) 'माझा अंदाज घेत घेत' त्याने मला सांगितले आणि विचारले की असे काही असते का? त्याने भारतात असे शाप आणि मुक्तीचे किस्से घडल्याचे ऐकले होते.

पण मला काहीच उत्तर देता आले नाही. माझी तर्कशक्ती 'हे शक्य नाही' असे म्हणतेय तर त्याचा बोलण्यातला खरे पणाही जाणवतोय.

हे मला अतर्क्य वाटते आहे. पण जगातले आपल्याला 'सगळे माहिती आहे' असे नाही असेही मी मानतो. या धर्तीवर अजून कुणाचे असे काही अनुभव?

लेखनविषय: दुवे:

Comments

सकाळी उठल्यावर अंग दुखणे.

बर्‍याच वेळा सक्काळी सक्काळी उठल्यावर चेपून काढल्यासारखे प्रचंड अंग दुखते. हा अतर्क्य अनुभव आहे.

रात्री बरंच

इतकं अंग दुखेस्तोवर??
रात्री बेरात्री बरंच काम करत असणार आपण नक्कीच!

आपला
(शांततेत झोपणारा आणी आनंदीपणे उठणारा)
गुंडोपंत

अतर्क्य!

हे तर काहीच नाही!!!
उपक्रम नावाच्या स्थळावरच्या सगळ्या 'चर्चा आणी त्यावरचे शाप - उ:शापाचे प्रतिसाद' वाचले तर कळेलच की तुमच्या मित्राचा अतर्क्य अनुभव पण फिका पडेल हो!

आपला
गुंडोपंत

सुनीताबाई देशपांडे

यांनी जी.ए. कुलकर्णींना लिहिलेल्या पत्रात (आणि मला वाटते 'सोयरे सकळ या पुस्तकातही) 'अतर्क्य योगायोग' भासावा असा एक किस्सा दिला आहे. सुनीताबाईंसारख्या कठोर तर्कनिष्ट विदुषीकडून हा किस्सा कळावा हेही अतर्क्यच.
सन्जोप राव

तुम्हाला कसं कळलं?

सुनीताबाईंसारख्या कठोर तर्कनिष्ट

आणी त्या कायम तशाच राहिल्या?
जिथे गांधीजींनी हमालाला पैसे देवून जागा मिळवली तर सुनीताबाईंसारख्यांना काहीच सूट नाहे तुमच्या कडून?

शिवाय त्या कठोर तर्कनिष्ट
आहेत हे तुम्हाला कसं कळलं?

आपला
गुंडोपंत

निलू निरंजना गव्हाणकर

"माझ्या आठवणी प्रमाणे विणा गवाणकर किंवा मीना प्रभू (बहुदा गवाणकरच) यांनी एक पुस्तकात थायलंडमध्ये प्रवास करताना एका बुद्धविहारात आलेला चमत्कारिक अनुभव दिला आहे. ..."
निलू निरंजना गव्हाणकर. वीणा गवाणकर नाही आणि मीना प्रभूही नाही.

अतर्क्य

साद देती हिमशिखरे हे पॊल ब्रॆंटन चे जी के प्रधान यांनी अनुवादित केलेले आहे. यात असे अतर्क्य अनुभव आहेत.साधना मिडिया सेंटर शनिवार पेठ पोलिस चौकी समोर पुणे फोन नं ०२० २४४५९६३५ येथे व्यवस्थापक श्री माटे याम्चेकडे सर्व यादी आहे.

प्रकाश घाटपांडे

दुर्गा भागवत

दुर्गा भागवातांना पण काहीसा अतर्क्य अनुभव आल्याचे त्यांनी त्यांच्या "आठवले तसे" या पुस्तकात लिहीले आहे. पण तो प्रसंग नीटसा मला आठवत नाही! पण त्यांना पण जरा अश्चर्य वाटले होते.

पुनर्जन्म

अनेक थोरांचे असे लेखन वाचले आहे. विविकानंद आणि त्यांचे गुरू रामकृष्ण घ्या किंवा अरबिंदो किंवा फ्लाईंग डचमॅन पाहणारा इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज!

असो. काही वर्षांपूर्वी बहुधा साय-फाय चॅनेलवर एखादी केस घेऊन तिचा शहानिशा करण्याचा एक कार्यक्रम होता. त्यात अमेरिकन नागरीयुद्धात लढलेल्या जनरल गॉर्डन नावाच्या एका सैनाकाचा पुनर्जन्म झाल्याची शहानिशा करण्यात आली होती. मुलाखती, पुरावे तपासणी, हिप्नोटिजम आणि शेवटी लाय डिटेक्टर टेस्ट यावरून या प्रकारात निश्चितच तथ्य आहे असा निकाल देण्यात आला.

अधिक माहिती येथे वाचा.
http://www.johnadams.net/cases/samples/Keene-Gordon/index.html

पॉल ब्रँटन

भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात हे पॉल ब्रँटन यांचे अजून एक पुस्तक, अनुवाद गणेश नीलकंठ पुरंदरे ,
आठवी आवृत्ती २००४ प्रकाशक बोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लिमिटेड ३ राउंड बिल्डींग काळबादेवी मुंबई २
किंमत रुपये शंभर फक्त पृष्ठे ४२९

टीप्- हे मी फक्त चाळले आहे वाचले नाही. पण अनेक अतर्क्य अनुभव त्यात आहेत.

प्रकाश घाटपांडे

पॉल ब्रँटन

पॉल ब्रँटनचा
कुंडलीनी जागृत होण्याचा अनुभव हिमशिखरे मध्ये आहे.
त्यातला त्याने ध्यानासाठी दिलेला वेळ हा पण
लक्षात घेणे महत्वाचे आहे!
कोणी काहीही म्हणो पण त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे!
आपला
गुंडोपंत

द थर्ड आय - लोम्बसंग रांपा

द थर्ड आय
हे पण असेच अतर्क्य पुस्तक!
ब्रिटन मधल्या एका साध्या माणसाने त्याला मागच्या जन्मात आलेले तिबेटचे अनुभव सांगितले आहेत.

आपला
गुंडोपंत

अनुभव!

मला नेहमी येणारा अनुभव म्हणजे, काही घरांमध्ये प्रसन्न वाटते. काही घरांमध्ये नाही (नवी असली तरी!). असं काही जाणवतं का कुणाला? काही मंदिरे छान असतात पण सात्विकता जाणवत नाही... काही ठिकाणी जाणवते.

असा एक अनुभव -गोव्याहून कोकणात येत असतांना रात्रीच्यावेळी रस्ता चुकलो. आम्ही सगळे मिळून ९ जण होतो. त्यातला फक्त मी जागा - गाडी चालवत. काय झालं होतं कळतच नव्हतं. पण कुठून कुठे चाललो आहोत तेच कळेनासं झालं होतं. गाडी चालत होती पण रस्त्यात काहीच लागत नव्हतं रात्र नुस्तीच चालली होती... त्याच त्याच भागात परत परत् येतोय की काय असं वाटत होतं. चकवाच म्हणाना! इतरांना उठवण्याचा प्रयत्न केला पण कुणीच उठले नाही, अगदी गाढ झोप सगळ्यांना. (प्यायलेले नव्हते;) )
शेवटी मी गाडी बाजूला लावली. ईंजिन नि दिवे बंद झाल्यावर अंधारात हळूहळू दिसायला लागलं. घनदाट झाडी. बाजूला रस्त्याचा पांढरा दगड. पाण्याचा आवाज येत होता. नीट पाहिलं तर एक छोटा प्रवाह दिसला. बाजूला एक छोटंसं देऊळ. बराच काळ चाहूल घेत बसून राहिल्यावर मी खाली उतरलो. हळूहळू चालत देवळाकडे गेलो. तिथे एक चाफ्याचं झाड होतं. उंच झाडांच्या सावल्यात नि चांदण्यात काळ्या चौथर्‍यावर पडलेली चाफ्याची फुलं सुरेख दिसत होती. मी तिथे बसलो. नकळत एक प्रकारची उत्साहपूर्ण भावना आली. एक वेगळाच आनंद अनुभवाला येऊ लागला. शब्दात मांडता न येण्यासारखा. खरंतर भयपूर्ण वातवरण वाटण्यासारखी वेळ होती. आम्ही हरवलो आहोत ही भावना मनातून विरून गेली. किती वेळ गेला कळलेच नाही. कदाचित यालाच ध्यान म्हणत असावेत. मग कधीतरी त्याच धुंदीत उठून जीपमध्ये बसलो. परत रस्त्याला लागलो. रस्ता कसा गेला हे ही कळले नाही. तो वेगळाच आनंद हळू हळू कमी होत गेला. जसे काही एका जागेपणातून दुसर्‍या जागे पणात जाणे. काही वेळाने झोप अनावर व्हायला लागली. अजुनही कुणी उठले नाही. थोड्यावेळाने दिवे दिसले हलणारे... मग चक्क हायवे लागला. एक प्रकारचे सुटका झाल्यासारखेही वाटले. काही वेळ हायवे वर गेल्यावर मग मी परत गाडी बाजूला घेतली डोळ्यावर झोप यायला लागल्याने झोपून गेलो. सकाळी उठून टपरीवर चहा घेतांना सगळ्यांना विचारले आपण थांबलो होतो ती आठवते का? कुणालाच काही कळले नव्हते. मग त्यांना सगळा किस्सा सांगितला. ऊठवण्याचा प्रयत्न सांगितला.
सगळ्यांचे म्हणणे पडले की चला परत् जावून पाहुया. गाडी काढून परत् शोधत शोधत गेलो, पण तसा रस्ता काही सापडायला नाही. खुप दुपारी १२ वाजे पर्यंत फिरलो. चौकशी ही केली पण असं देऊळ कुणालाच माहित नव्हतं. शेवटी वैतागुन सगळ्याच्या शिव्या खात परत रस्त्याला लागलो. काही मित्र महाड मध्ये होते त्यांना पण विचारलं पण काही असं कळलं नाही.
खुप दिवस ती एक वेगळीच खुप छानशी भावना मात्र आठवत राहीली.

असा माझा अनुभव.

कोकणातले कुणी काही सांगु शकतील का हा काय प्रकार होता?

आपला
गुंडोपंत
(तेंव्हा गुंडोपंत कोणतेही मादक पदार्थ सेवन करत नसत!)

हे वाचा

तेंव्हा गुंडोपंत कोणतेही मादक पदार्थ सेवन करत नसत

नसावेत नसावेत. हा प्रतिसाद लिहितानाही करत नसावेत.

अशा प्रकारची एक गोष्ट मनोगतावर मी टाकली होती. चकवा म्हणजे चकवून जाणारे काहीतरी त्यावर एका मनोगतीने स्वानुभव टाकला होता. तो वाचा म्हणजे तुम्ही एकटेच नाही हे कळेल. फार पूर्वी दक्षता मासिकात एक पोलिसपार्टी रात्रभर चकव्यात अडकून पडल्याचे आणि रस्ता न सापडल्यामुळे एकाच ठीकाणी गोल गोल फिरत राहिल्याचे वाचले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळ झाल्यावर त्यांना तो रस्ता तेथेच मिळाला.

आठवतंय!

हा प्रतिसाद लिहितानाही करत नसावेत.

नाही हो नाही!

फार पूर्वी दक्षता मासिकात एक पोलिसपार्टी रात्रभर चकव्यात अडकून पडल्याचे आणि रस्ता न सापडल्यामुळे एकाच ठीकाणी गोल गोल फिरत राहिल्याचे वाचले होते.

हे मला पण आठवतंय!
नंतर हे मासिक वाचण सुटलं ते सुटलच!

चकव्यावर मागे एक (बहुदा स्पॅनिश - टायटल्स होते - आणी रात्री पाहत असल्याने आवाज नव्हता!) चित्रपट पाहिल्याचे आठवते.

आपला
गुंडोपंत

दोन गट?

अरे!!
आता वाचतांना लक्षात आले की 'लोकभ्रम' वर चर्चा करणारे इथे काही लिहित नाहीयेत! (अपवाद घाटपांडे साहेब. यांचा व्यासंग अफाट आहे! आणी खरंच त्यांनी म्हंटल्या प्रमाणे ते दोन्हीकडे पुला सारखेच आहेत!)

म्हणजे हे २ वेगळे गट आहेत का?
एकाने नास्तिकवादी काही टाकले की दुसर्‍याने आस्तिक?

की असे काही अनुभवच नाहीयेत नास्तिक कंपु मधे कुणाला?

असे असेल तर मग मात्र उपक्रमावर आलेला चमत्कारीक अनुभव म्हणावा लागेल ! ;)

आपला
भुतोपंत

नर्मदे हर हर

नर्मदा नदीच्या काठाने एक् परिक्रमा करायची असते. जशी आपली पंढरीची वारी. त्या परिक्रमेत् आलेले अनुभव 'नर्मदे हर हर'(किंवा नर्मदे हर नाव असंच काहीतरी आहे.) या पुस्तकात एका परिक्रमा करणार्‍या भक्ताने लिहीले आहेत.

बरेच् अतर्क्य अनुभव आलेत त्यात. जखम भरून येणे, वेदना न होणे, अचानक सोपा रस्ता सापडणे, चकवा, खुप भूक लागल्यावर हवे ते जेवण घेऊन कोणीतरी समोर येणे वगैरे बरेच.

ते स्वतः शिकलेले आहेत पण त्यांना हे अनुभव आलेले आहेत. तेव्हा खरंखोटं वाद घालत न बसता सरळ अनुभव घ्यावा आणि निष्कर्ष काढावेत असं त्यांच म्हणणं आहे.

नाव आठवत नाही...आठवलं तर लगेच सांगतो.

अतर्क्य अभिजित

गो नि दांडेकर्

गो नि दांडेकर् ?

शिवानी

नाही...गोनीदा नाहीत नक्कीच

जगन्नाथ कुंटे..

पुण्यात कर्वे रोडला राहतात बहुतेक.

(अतर्क्य )अभिजित

हे नाही माहीती

गोनिदांचे पुस्तक वाचह्ले होते म्हणून सान्गितले...
हे नाहे माहित् कोण आहेत् ते.

शिवानी

गोनिदां

अरेच्च्या गोनिदांनीही लिहीलंय काय यावर ..

माहीत नव्हतं. क्षमस्व.

अभिजित

मानणारे..न मानणारे...

असे म्हणतात की हिप्नोटिजमवर विश्वास नसणारे लोक संमोहित होत नाहीत.
अतर्क्य अनुभवांबद्दलही असेच असावे. असे काही असते हे मानणार्‍यांनाच हे अनुभव येतात.
श्रद्धा हा एक विलक्षण गुंतागुंतीचा विषय आहे.
माझे आजोबा एक प्रखर दत्तभक्त होते. त्यांना असे अनेक अनुभव आले होते.
ते खोटे बोलत असावेत हे शक्य नाही. पण गुंडोपंतांप्रमाणेच त्यांच्यासोबत असणार्‍या इतरांना त्याबाबत काहीच समजत नसे.
पण ते कधीकधी काही पूर्वसूचना देत त्या मात्र आश्चर्यकारकरित्या खर्‍या होत. हाच काय तो पुरावा!
मला वैयक्तिक असे कोणतेही अनुभव आले नाहीत. कदाचित घोर अश्रद्धा हेच त्याचे कारण असावे :)

काय सांगता?

काय सांगता विसुनाना?

हिप्नोटिजमवर विश्वास नसणारे लोक संमोहित होत नाहीत.

हे खरंय?
पटत नाहिये कुठेतरी!!!
असं प्रत्येक घरात कुणीतरी असतंच का.... काय घडणार ते सांगणारं, ते ही अचानक पणे बोलून जाणारं.
हे कसं काय होत असतं?
(आता असं म्हणू नका की बोलणारे खुप बोलतात जे खरे ठरते ते लक्षात राहते वगैरे! असं नसतं हे मी सांगायला नकोय.)
माझ्या एका मित्राची आई पाहुणे येण्या आधी बरोब्बर त्याच माणसाचे नाव सांगुन त्याचा काहीतरी किस्सा सांगायची. बाकिचे ओळखायचे की हा माणूस येणार आहे घरी. हे मी ३-४ वेळा घडलेले पाहिले आहे!

हे भलेही ज्योतिष नसेल, पण याला काही तर्कनिष्ट उत्तरही नाहीये ना...

आपला
गुंडोपंत

संमोहन

संमोहनतज्ञाच्या / सूचना देणार्‍याच्या सूचनाच आपण मानल्या नाहीत - त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले तर संमोहन कसे होईल?

(उदा. या लोलकावर नजर केंद्रित करा. मी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. पायर्‍या मोजा. एक... तुम्हाला हळूहळू झोप येत आहे. दोन... मी दहा म्हणताच तुम्ही डोळे मिटणार आहात. तीन... वगैरे) हे सारे माणसाचे मन काबूत आणण्यासाठी असते.)
मागे एकदा सेल्फ्-होप्नॉटिझमच्या नादाला लागलो होतो. पण मला मधेच हसू येत असे. त्यांमुळे मी कधीच यशस्वी झालो नाही.
तज्ञ अधिक सांगू शकतील.

मला वाटतं

काही लोकांवर हिप्नोटिजम होत नाही असे मी ही वाचले आहे. जरा खोलात शिरून लिहिते, नंतर धोपटून काढू नये.

प्लँचेट किंवा तत्सम प्रकार करणारे लोक हे एका विशिष्ट हेतूने प्रेरित झाल्याने त्यांना त्यांचे परिणाम दिसून येतात असे सांगितले जाते. बरेचदा असे प्रकार करताना, जर तुमचा विश्वास नसेल तर अशा भानगडींत पडू नका असे बरेचदा सांगितले जाते. खाली कोर्डे म्हणतात तसे ही बहुधा माणसाची स्वतःचीच शक्ती असावी.

यावर डिस्कवरी चॅनेलवर एक अप्रतिम सत्यकथा पाहिली होती, यांत ती बाई स्वतःच्या मनानेच आपले घर झपाटलेले आहे असा ग्रह करून घेते. तिला घरांत गोष्टी दिसू लागतात, दारे बंद होणे, नळ चालू होणे, पलंग हलणे इ. इ. कालांतराने घरात हे परिणाम इतरांनाही जाणवायला लागतात. तज्ज्ञांकडून तपासणी होते, घरात काही एक वावगे नाही असा निष्कर्ष काढला जातो. शेवटी, संशोधन करता करता अचानक पत्ता लागतो की त्या बाईची अंतःप्रेरणा बाहेर येऊन कामाला लागली आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना समजायची आपल्या समाजाची अद्याप तयारी नाही, म्हणजे ते विश्वास ठेवू शकत नाहीत, असे वाटते. (हा माझा गैरसमज असल्यास आनंद आहे.)

हिप्नोटिजम, सेल्फ हिप्नोटिजम फळाला येण्यासाठी माणसे त्याविषयावर स्वतःला किती केंद्रित करू शकतात हे एक कारण असावे. भावनाप्रधान व्यक्ती लवकर संमोहित होतात असेही सांगितले जाते. (सत्यासत्यता तपासलेली नाही.)

सेल्फ हिप्नॉटिझम

मागे एकदा सेल्फ्-होप्नॉटिझमच्या नादाला लागलो होतो. पण मला मधेच हसू येत असे.
हा हा हा... मी कधी हा प्रयोग केला नाही, पण केला तर मलाही हसू येईल असे वाटते!
सन्जोप राव

संभवनीयता

माझ्या एका मित्राची आई पाहुणे येण्या आधी बरोब्बर त्याच माणसाचे नाव सांगुन त्याचा काहीतरी किस्सा सांगायची. बाकिचे ओळखायचे की हा माणूस येणार आहे घरी. हे मी ३-४ वेळा घडलेले पाहिले आहे

!
एखाद्याची आठवण काढायला आणि नेमका तो यायला किवा त्याचा फोन यायला , एखाद गाण. गुणगुणायला आणि नेमके तेच रडीओवर लागायला, एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला आणि नेमकी ती घडायला एकच वेळ येते या प्रकारचे अनुभव हे प्रत्येकाला आलेले असतात, मात्र ही संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली तर ती भाकिताची प्रचिती ठरते. या बाबत आपण इथे प्रतिसाद वाचलाच असेल

प्रकाश घाटपांडे

म्हन्जे

घोर अश्रद्धा म्हन्जे पण् एकप्रकारे श्रद्धाच नाहे का?

दोनी कडची लोके ठीक पण् मधल्यांन्चे काय?

(हे टिन्ब कसे काय देता तुम्ही?)

शिवानी

टिंब

(हे टिन्ब कसे काय देता तुम्ही?)

कीबोर्ड वरील Shift की दाबून M की दाबली की अनुस्वाराचे टिंब येते.

घोर अश्रद्धा

असे काही असते असे मला वाटत नाही. माणूस अश्रद्ध नसतोच. कशान् कशावर त्याची श्रद्धा असतेच.

देव आहे यावर असते किंवा देव नाही यावर असते. किंवा काही माझ्यासारखे असतात. ज्यांची "पुरावे द्या, मगच मानू" या घोषवाक्यावर श्रद्धा असते. ;-)

चू. भू. दे. घे.

अनुभवांचे उगमस्थान

जगातले आपल्याला 'सगळे माहिती आहे' असे नाही असेही मी मानतो.

जगांतले सोडा आपल्याला स्वतःबद्दलही (विशेषतः स्वतःचे कार्य कसे चालते याबद्दल) फारच थोडी माहिती असते. सर्व अनुभवांचे उगमस्थान स्वतःत असते.

मान्य आहे

आपल्याला स्वतःबद्दलही (विशेषतः स्वतःचे कार्य कसे चालते याबद्दल) फारच थोडी माहिती असते.

मान्य आहे... मेंदु विषयी आपल्यला काहीच माहिती नाहीये. हे सत्य काही उलगडले नाहिये अजूनही... असेच अनेक भाग.
आयसीयु मधले 'जाणारे' सहज परत येतात, 'न जाणारे' अचानक जातात. मनोबलावर पॅरॅलिसीस झालेले पाउल टाकतात. हे का व कसे घडते याचीही काहीच उत्तरे मिळत नाहीत.

पुर्वी कुणीतरी 'आशीर्वाद दिला नि बरा झाला' - हा मोठाच असणारा प्लॅसिबो इफेक्ट आता गेलाच आहे नाही का? यात हा भंपकपणा होता वगैरे सोडा, पण तो 'मनोबल दुर्दम्य बनवणारा भाग' आता कुठुन आणायचा ते सांगा?

निनाद

डेजा वू

डेजा वू हा पण असाच एक अतर्क्य प्रकार आहे. या मधे आपण अनुभवत असलेला वर्तमानकाळ आधीपण अनुभवला असल्याचे जाणवते.

याच प्रकारावर विज्ञानकथेच्या घडणीने तयारकेलेला डेन्झेल वॉशिंग्ट्नचा आत्ता एक चित्रपट आला आहे. डेन्झेल वॉशिंग्ट्न म्हणून कौतुकाने पाहीला पण चित्रपट इतकासा भावला नाही.

दे जाऊ - जाऊ दे

'देजा वू' हा काही अतर्क्य अनुभव नव्हे. जगातील ७०% लोकांना असा अनुभव येतो. मेंदूतील स्मृतींचा गुंता झाल्याने असा अनुभव येतो. याचे शास्त्रीय स्पष्टीकरण येथे वाचावे.

श्री.गुंडोपंत यांचा अतर्क्य अनुभव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.गुंडोपंत यांचा अनुभव वाचला.वाचता वाचताच लक्षात येते की त्यांचा अनुभव त्यांनी प्रामाणिकपणे मांडला आहे.उगीच सनसनाटी निर्माण करण्यासाठी काही लिहिलेले नाही .तसेच काही लपविलेले नाही.
.......गुंडोपंतानी गाडी थांबविली.सगळे मित्र गाढ झोपेत. निर्झराचा आवाज.बाकी सर्व शांत शांत.बाहेर चांदणे. गुंडोपंत हे अधिकच संवेदन शील आहेत.ते परिसराशी तल्लीन होतात.पूर्वी काही पाहिलेले,वाचलेले,ऐकलेले ,मनाने कल्पिलेले जे त्यांच्या मेंदूतील स्मॄतिकेंद्रात नोंदलेले असते ते उद्दीपित होते.(ट्रिगर).त्यांना आठवत जाते.ते भाविक आहेत .मंदिर ,प्रसन्न सात्त्विक वातावरण,चाफ्याची फुले,काय काय आठवते.ते गुंग होतात.झोप अनावर होत असते.ते स्वप्नसृष्टीत प्रवेश करतात.तिथे त्यांना त्यांच्या कल्पनेतील मंदिर दिसते.चाफ्याची फुले दिसतात.....ते वर्णन वाचताना मला सुद्धा ती चांदण्यात दिसणारी फुले,त्यांच्या गाभ्यातील पिवळसर रंग, मंद सुवास याचा अनुभव आला.वाचता वाचता अनंत काणेकरांच्या 'चांदरात' कवितेच्या ओळी आठवत गेल्या:

चांदरात पसरिते पांढरी माया ध्ररणीवरी |
लागली ओढ कशी अंतरी |
हा तालतरू गंभीर शांतता धरी |
कुणी शुचिर्भूत मुनी तपा जणू आचरी |
....केश पिंजुनी उभी निश्चला कोणी वेडीपिशी | भासते काळी छाया तशी |
....जलवलयांचे तरल रुपेरी नुपुर पदी बांधुनी|
खळखळत गुंग झरा नर्तनी |
पांढरा पारवा हूं हूं कोठे करी|
क्षण मंद वायुने लता हले कापरी |
लपत छपत विधुकिरण खेळती हिरव्या पानांवरी |लागली ओढ कशी अंतरी |
....बेफाम पसरिते पंख हृदयपाखरू |
उडुनिया पाहते अनंत अंबर धरू |
या इवल्या देही तया कसे आवरू

|....
अशा कसल्यातरी आठवणीने,ओढीने गुंडोपंतांवर गारूड केले.त्यांचे मनपाख्ररू अनंत अंबरात विहरू लागले.ते देहाने गाडीतच स्वप्नदंग होते.त्यांना सर्व दिसले ते स्वप्नात.त्यांच्या दृष्टीने ते सत्यच होते.त्यानी लिहिलेले पुन्हा वाचले की ते स्वप्न आहे हे स्पष्टच दिसते. "बराच काळ चाहूल घेत बसून राहिल्यावर मी खाली उतरलो. हळूहळू चालत देवळाकडे गेलो. तिथे एक चाफ्याचं झाड होतं. उंच झाडांच्या सावल्यात नि चांदण्यात काळ्या चौथर्‍यावर पडलेली चाफ्याची फुलं सुरेख दिसत होती. मी तिथे बसलो. नकळत एक प्रकारची उत्साहपूर्ण भावना आली. एक वेगळाच आनंद अनुभवाला येऊ लागला...." शोधूनही पुन्हा मंदिर सापडले नाही.कारण त्याचे अस्तित्व आहे श्री गुंडोपंत यांच्या कल्पनारा़यात.
.............बाह्य भौतिक सृष्टीत काहीही अतर्क्य नसते.जे काय असते त्याचा अर्थ लावता येतो.सगळे अतर्क्य असते ते माणसाच्या मेंदूत.अशा अतर्क्य अनुभवांचेही विश्लेषण करणे शक्य असते.मात्र अनुभव कथन प्रामाणिक आणि पारदर्शी हवे....
श्री.गुंडोपंत यांच्या निवेदना सारखे.

.....यनावाला.

उत्तम तर्कसंगती लावली आहे

यनावाला,
आपण गुंडोपंतांच्य अनुभवाची उत्तम तर्कसंगती लावली आहे असे मला वाटते.

बाह्य भौतिक सृष्टीत काहीही अतर्क्य नसते.जे काय असते त्याचा अर्थ लावता येतो.

चिंतनीय आहे. पण पुर्ण पटले नाही!
अजून भौतिकातही अनेक गोष्टींची संगती लागत नाहीये. अवकाशातले डार्क मॅटर काय आहे ते सापडत नाहीये. ब्लॅकहोल चे विश्लेषणही वादग्रस्तच आहे. मेंदुचे कार्य कसे चालते हेही सापडत नाहीये. मानवीपातळीवर "इंट्युशन" म्हणजे नक्की काय 'काही लोकांनाच का असते काहींना का नाही?' चे निराकरण करता येत नाहिये. याशिवाय प्रियाली यांनी दिलेला पुनर्जन्माचा अनुभवही अगम्य असा आहे. त्याचे तार्कीक विश्लेषण काय करावे?

आता रिचर्डच्या अनुभवासाठी काय तर्क लावता याची वाट पाहतो.

पुढे चर्चा आवडेल.

-निनाद

एक तर्क

बाह्य भौतिक सृष्टीत काहीही अतर्क्य नसते.जे काय असते त्याचा अर्थ लावता येतो.

रस्त्यावर उभे एक झाड आहे त्याला द्रुश्यज्ञान आहे असे ग्रुहित धरु. त्याच्या अनुभव विश्वात काय काय गोश्टी घडतात पाहु....
ह्या गाड्या, माणसे, पक्शी , प्राणि कुठुन येतात ? कुठे जातात? आपण चालु शकत नसताना ते चालतात हिच त्याच्यासाठि अतर्क्य गोष्ट आहे.त्याला हे माहित नसत कि त्याचि मुळ खोल मातित रुजलेलि असल्याने झाड महाशय चलु शकत नाहित . माणसाचे पायहि गुरुत्त्वाकर्षणामुळे प्रुथ्वीशी रीलेटिव्हली जोडुन असतात त्यामुळे ते उडु शकत नाहित. एरोडायनामिक्स समजण्या आधि पक्शी उडतात हि माणसासाठि अतार्किक गोष्ट होति.
आपल्याला मुळं आहेत त्यामुळे आपण जगतोय पण त्याना मुळं नाहित तरि ती जिवंत आहेत हि झाडासाठी अतार्किक बाब आहे. पण जेव्हा त्याला कळेल कि माणसाला तोंड व पोट हा अवयव आहे व पक्शाला चोच आणि गाडिला पेट्रोल चि टाकि आहे तेव्हा त्याला कळेल कि जगण्यासाठि फक्त मुळांचि आवश्यकता नसते.
पण हां जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे तत्त्वतः (नेमके)खरे कारण समजत नाही तोपर्यंत लोक आपापल्या अनुभव व तर्काप्रमाणे त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करित असतात.
चालु द्या.

-(एक ना एक दिवस सगळ्याचा अर्थ लागेल अशी आशा असणारि) शाबि

वा!

प्रतिसाद आवडला पण बाहेरच्या जगात अर्तक्य नसते यावर थोडा अधिक उहापोह हवा. अद्याप तितकेसे पटले नाही.

सुरेख चिकित्सा!

यनाजी आपण अतिशय सुरेख शब्दात गुंडोपंताच्या अनुभवाची चिकित्सा(विश्लेषण) केलेली आहे!त्या सोबत दिलेली अनंत काणेकरांची कविताही मस्तच आहे.आपले विश्लेषण पटण्यासारखे आहे.
आपण तर्कशात्राबरोबरच मानसशास्त्राचाही अभ्यास केलेला असावा असे दिसतेय. आपल्या व्यासंगाला माझा सलाम!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

असं म्हणायचय ना तुम्हाला?

अहो, मी झोपलो असं म्हणायचय ना तुम्हाला?
मान्य करु क्षण भर! पण जीपच्या स्पीडोमिटर मधले जास्तीचे ७० किमी दिसत होते त्याचे काय?
आणी मी इतके सांगितल्यावर माझ्याबरोबर इतर छपरी ९ जण होते ते काय ऐकुन घेतील असे वाटते का?
त्यांनी उभा आडवा घेतला - मी झोपा काढतो, ते गोळी लावली, त्याला बस नी पाठवा परत मग बघु कसा हरवतो, काय तरी झोल करतो वगैरे सगळे झाल्यावर शेवटी स्पीडोमीटरच्या हिशोबापुढे सगळ्यांची मती गुंग झाली!
आणी सगळ्यांचे बटाटे वडे नि तिसर्‍या-चौथ्या कपानंतर आलेले त्या सगळ्याचे बील मलाच भरायला लावून मगच आम्ही शोधाला परत निघालो...

आपला
(अनुभवी)
गुंडोपंत

रिडिंग कधी घेतली ?

पण जीपच्या स्पीडोमिटर मधले जास्तीचे ७० किमी दिसत होते त्याचे काय?

गुंडोपंत, कदाचित तुम्ही खरोखर रस्ता सोडून आत शिरला असणार आणि बरंच फिरुन रस्ता सापडत नसल्याने थोडावेळ शांत बसण्यासाठी गाडी थांबवली असेल. तेव्हा अशी डुलकी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि फिरल्यामुळे अंतरदर्शकावर जास्तीचे ७० कि.मी दिसले. ७० म्हणजे जरा जास्त होतात पण इकडे तिकडे १०-१२ कमीजास्त झाले असतील.

मनोविकारांचा मागोवा

मनोविकारांचा मागोवा हे डॉ.श्रीकांत जोशी यांचे खूपच सुंदर पुस्तक आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यानी मनोविकारांचा परिचय करुन दिला आहे. इतर ही अनेक लेखकांची या विषयावर भरपूर पुस्तके उपलब्ध आहे. उदा. राजेंद्र बर्वे, आनंद नाडकर्णी. कि.मु.फडके इ...

अवांतर
( ही पुस्तके वाचल्यावर आपल्यालाही मनोविकार आहे कि काय असे वाटू शकते. )
प्रकाश घाटपांडे

अगदी!

( ही पुस्तके वाचल्यावर आपल्यालाही मनोविकार आहे कि काय असे वाटू शकते. )

हे अगदी खरं आहे.
पुस्तकातला जो भाग वाचत असु तो आपल्याला झाला आहे की काय असा अतर्क्यआनुभव येत राहतो. हे मी पण अनुभवले आहे, नि त्यातून बाहेरही आलो आहे.
असो,

नाडकर्णींचे 'स्वभाव विभाव' हे एक अप्रतीम पुस्तक आहे.(मॅजेस्टीक प्रकाशन)
रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हियरल थेरपी (आर इ बी टी) साठी उपयुक्त आहे.
पुस्तक वाचून सोडण्यापेक्षा एकदा वाचून अधुन मधुन परत् वाचले तर जास्त उपयोगी पडते! शिवाय काहींना पाठ्यपुस्तका सारखेही वापरता येते.

आपला
मनोविकारी
गुंडोपंत

सहमत

पुस्तक वाचून सोडण्यापेक्षा एकदा वाचून अधुन मधुन परत् वाचले तर जास्त उपयोगी पडते! शिवाय काहींना पाठ्यपुस्तका सारखेही वापरता येते

वा अगदी मनातल बोललात!
प्रकाश घाटपांडे

हसत खेळत मनाची ओळख

हे पुस्तक सुंदर आहे. अवश्य वाचा सर्वजण.

भूत

माझे आजोबा त्यांना अंधाराअत् भूत दिसल्याच्या गोश्टी सांगत.
आम्ही लहान होतो त्यमुळे आम्हाला ते पटायचे आणी आम्ही मुद्दम अंधारात काही दिसते का ते पहात असु. एकदा असे जिन्याखाली पहाताना एक उंदिर अचानक अंगावर आला आनी आम्ही घाबरुन जोरात ओरडलो. मग सगळ्यांना कळ्ले कळाजोबांच्या गोश्टीची अशी प्रतिक्रिया उमटते आहे.
आइअ बाबांनी ओरडाआरडा केला तरी आजोबा म्हणाले की - जे सत्य मला दिसले ते मी सांगणारच्. त्यांच्य पुढे कोण काय बोलणार. आणी आम्च्या गोश्टी सुरु राहिल्या. पण मग हळू हळू त्यातला आमचा रस कमी होत गेला.
पण त्या गोश्टींमधे एक चकव्याची गोष्ट पण होती ते आठवले.
(आता श /ष कळला असो! :) )

शिवानी

विट

विट्ठार
एका दुसर्‍या चर्चेत यनावालांनी गॅलिलिओ ने वरून विटा टाकल्याचा किस्सा दिला आहे, त्यावरून हे आठवले.

मी लहान होतो. शाळेत चाललो होतो. शाळेच्या रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम चालले होते. मी आपला इकडे वाळूच्या ढीगाकडे बघत बघत - आता परत आल्यावर 'यात कसा खोपा बनवता येईल' असा विचार करत चाललो होतो. अचानक पणे धाड् असा आवाज झाला नि माझ्या बरोब्बर मागे आणी पुढे एक एक विट पडली!! मला क्षण भर कळलेच नाही काय झाले ते. पण समोरचा दुकानदार धावत आला ' बच गया!! लडका बच गया!' असे ओरडत. सगळे मजूर जमा, मुकदम आला... मोठा गोंधळ. मग कळले की मजूर विटा वर नेत होते. पण नेतांना ते २ -२ विटा एकमेकांच्या कडे फेकतात आणे पुढाचा ती विट झेलतो नि पुढे फेकतो. अंतर नि वे़ळ वाचवत काम चालते. त्यातल्या एकाने अंदाज चुकुन विटा जोरात फेकल्या त्या तिसर्‍या मजल्यावरून थेट माझ्या पायाशी! मी कसा त्या क्षणी वाचलो कुणास ठावूक!!!
एक विट पुढे म्हणजे पायापासून एक इंचावर आणी तशीच एक मागे! माझा विट्ठार (विटेखाली ठार!) व्हायचा पण नशीब बरे असावे.... वाचलो (नि इथे तुमच्या राशीला आलो! ;) )

मग आई चार पाच दिवस शाळेत सोडायला येत होती... शाळेत पण कळले. काही मुलं तर 'वाचलेला मुलगा बघायला' पण वर्गात येवून गेली होती.

हळू हळू परत मी इकडे तिकडे बघत एकटा शाळेत जायला लागलो.

आपला
गॅलॉपंत विट्ठार

हाहाहा ! सही.

अनुभव वाचून तशी वीट पडली असेल हे खरे, पण वाचलेल्या मुलाला पाहाण्यासाठी गर्दी,आई चार पाच दिवस शाळेत सोडायला येत होती.
ह.ह.पु.वा. बाय द वे आपल्या लेखनाची उत्सूकता लागायला लागली.

आपला
'वाचलेला मुलाचे लेखन कौतूकानं वाचणारा'
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

वाचलेला मुलगा

आयुष्यरूपी इमारतीतील अडचणींच्या विटा चुकवत चुकवत मोठा झाला आणि त्यानंतर उपक्रमावर आला. थोर भाग्य आमचं. :)))))

किस्सा वाचून ह.ह. पु. वा.

वाचाल तर वाचाल..

असंच एकदा झाडाची फांदी अगदी समोर पडली तेव्हा वाचलो होतो..मोठी होती..कावळा बसला नव्हता. :-))
वाचा बंद झाली होती काही काळ..आजूबाजूच्या मित्रांचीही.

अभिजित

अनुमतीची प्रतीक्षा चालू आहे. पण ही अनुमती कोण आणि तिच्या प्रतिक्षेला चालू का म्हणताय?

 
^ वर