निर्मलग्राम किकवारी

एक गाव अतिशय वाईट होते. गावात दारूच्या भट्ट्या होत्या. गावात गटारे वाहत होती. गावाची जणू कचरापेटी झाली होती. डास, माश्‍या, ढेकूण इत्यादींचा गावात मोठा वावर होता. गावात शौचालये नव्हती. गावातील मोकळ्या जागेवर गावकरी शौचाला जात. गाव आपण स्वच्छ ठेवायचे असते हेच जणू ग्रामस्थ विसरून गेले होते. आता आश्‍चर्य वाटेल, पण तेच गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या गावाचे नाव आहे किकवारी. हे गाव आता निर्मल झाले आहे. आता हे गाव उत्तर महाराष्ट्रातील अभ्यास सहलींचे एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.

भारतातील 4437 गावे निर्मलग्राम पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहेत. त्यातील अंदाजे निम्मी म्हणजे 2000च्या आसपास गावे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. याला कारण आहे एका गावाने दुसऱ्या गावाकडून घेतलेली प्रेरणा. एक गाव स्वच्छ झाले, त्या गावाने आपल्या शेजारच्या गावालाही स्वच्छ होण्याची प्रेरणा दिली, असे करत करत आदर्श गावांच्या रांगेत हजारो गावे उभी राहिली. बागलाणमधील किकवारी त्यातीलच एक गाव .

राळेगणसिद्धी या गावातील काम पाहिले आणि आपले गाव उद्यानासारखे फुलवायचे, हा संकल्पच किकवारी गावातील लोकांनी सोडला.
त्यानुसार झटून काम केले. त्याचा परिणाम म्हणजे आज हे गाव पंचक्रोशीतच नाही तर राज्यात प्रसिद्ध झाले आहे. या गावाने इतका मोठा बदल कसा घडवला, याचे उत्तर या गावाच्या बदललेल्या मनोवृत्तीत आहे. आपले गाव वाईट आहे आणि ते चांगले गाव म्हणून ओळखले जावे, असे या गावातील प्रत्येकालाच वाटत होते. हे वाटणे प्रत्येकाने प्रत्यक्षात आणले.

कोणत्याही गावाच्या प्रगतीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. पाण्यावरून गावात अनेक समज-गैरसमज असतात. पाणी नसेल तर आपण शेती पिकवू शकत नाही, त्यामुळे पाण्याचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन करायचे असे ग्रामस्थांनी ठरवले. पाणी अडवा-पाणी जिरवा या मोहिमेच्या माध्यमातून पाणलोटाचे चांगले काम गावात उभे राहिले. राज्य शासनाने या गावाला जलस्वराज प्रकल्पासाठी 29 लाख रुपयांचा निधी दिला. त्या निधीतून गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. विहीर खोदण्यात आली. सर्वांना पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

या सर्वांचा सकारात्मक परिणाम गावावर झाला आहे. सन 2002पासून या गावातील ग्रामस्थांनी आपले गाव स्वच्छ करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करायला सुरवात केली. गावच्या सरपंच, उपसरपंचांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. गटारे साफ करण्यापासून ते पाण्याचे काम करण्यापर्यंतच्या कामाला हातभार लावायला सर्व गाव एकत्र आले. हे काम करत असताना गावातील लोक मनानेही एकत्र येऊ लागले. गाव झाडून स्वच्छ केले. आवश्‍यक त्या सोयी श्रमदानातून करण्यात आल्या. गाव गटारमुक्त झाले.

कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या गावाला ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर पारितोषिक मिळाले. या गावाचे सध्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव आता हागणदारीमुक्त झाले आहे. पूर्वी इतर गावांप्रमाणेच या गावामध्येही शौचालयांचा अभाव ही मोठी समस्या होती. ती समस्या दूर करण्यासाठी या गावाने केंद्र सरकारच्या निर्मलग्राम योजनेत भाग घेतला. गावातील प्रत्येक घराला शौचालय बांधून देण्यात आले.

शौचालयामधील मैल्याची व्यवस्थाही या गावाने अतिशय सर्जनशीलतेने केली आहे. हा मैला पाइपलाइनमधून गावाबाहेरच्या मोठ्या टाकीत सोडण्यात आला आहे आणि त्याचा वापर सीताफळाची बाग फुलवण्यासाठी केला आहे; तसेच इतर पिकेही या पाण्यावर घेतली जात आहेत. गावाच्या या वाटचालीत गावातील बचत गटाने मोठा हातभार लावला आहे. सक्षम महिलांमुळे गावात मोठे बदल होत आहेत. गावातील पंधरा एकर शेतजमिनीवर बचत गटातील महिलांनी गावात चक्क तुतीची लागवड केली आहे. रेशीम उद्योगाकडे होणारी ही वाटचाल गावाच्या प्रगतीचे लक्षण आहे.

या गावात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नशाबंदी करण्यात आली आहे. गावातील दारूच्या भट्ट्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. एकेकाळी दारूसाठी कुप्रसिद्ध असलेले हे गाव आता दारूमुक्त म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. एका अतिशय वाईट समजल्या जाणाऱ्या गावाचे आता नंदनवन झाले आहे. याचे श्रेय गावकऱ्यांना जाते. प्रत्येक गाव अशा प्रकारचा बदल आपल्यात घडवून आणू शकते, हवी फक्त मनाची तयारी.

Comments

सुरेखच!

गावातील दारूच्या भट्ट्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. एकेकाळी दारूसाठी कुप्रसिद्ध असलेले हे गाव आता दारूमुक्त म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

वा! सुरेखच!

आपला,
(दारुद्वेष्टा!) तात्या.

शौचालयात दारू?

त्यामुळे गावकरी आत बसून दारू पीत असतील का ?

दारू बाहेरून न्यावी लागत असेलच ना?

की शौचलायाला एक गुप्त दरवाजा आहे आणि तो शेजारच्या सुमलग्रामातल्या दारूच्या भट्टीजवळ उघडतो असे काही गृहीत धरलेत???

गावकर्‍यांच्या मनोवृत्तीत बदल झाला आहे हे महत्त्वाचे आहे. नाहीतर गुजरातमध्येही दारूबंदी आहेच की.

अभिजित

दारुबंदी.

आपल्या वर्ध्यातही शासकीय दारुबंदी आहे. फरक इतकाच की पुण्यात दारु वाईन शॉप मध्ये मिळते व वर्ध्यात ती पानाच्या टपरीवरही मिळते.

प्रायोजक

शिल्पाताईंच्या निम्म्या लेखांना "प्रायोजकः किंगफिशर" अशा जाहिराती येतील. विषयाशी संबंधित आहे ना, म्हणून ! :-)

नक्की येतील .गणशोत्स्वातील प्रायोजकत्व पाहिले तर गणपतीच्या गळ्यात माणिकचंद वा गोवा गुटक्यांच्या पाउचची माळ घालण्यास हे लोक कमी करणार नाहीत. गणेशोत्सवात अनेक समाजकंटकांची गणपतीवरील् भक्ती, श्रद्धा, धार्मिकता या गोष्टी उफाळून येतात. "गणपती नुसता नावाला| चैन पाहिजे आम्हाला" अशी स्थिती आहे. मिडियाने पण उचलून धरल आहे. या सर्वांचा बातमीत गणेशभक्त म्हणून उल्लेख येतो.उत्साहाचे रुपांतर उन्मादात (उतमात) कधी होते हे ठरवणे कठीण. पोलिस खात्यात गणेशोत्सव हा सर्वात मोठा बंदोबस्त म्हणून गणला जातो.
प्रकाश घाटपांडे

कौतुक

भारतातील 4437 गावे निर्मलग्राम पुरस्कारासाठी निवडण्यात आली आहेत. त्यातील अंदाजे निम्मी म्हणजे 2000च्या आसपास गावे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. याला कारण आहे एका गावाने दुसऱ्या गावाकडून घेतलेली प्रेरणा. एक गाव स्वच्छ झाले, त्या गावाने आपल्या शेजारच्या गावालाही स्वच्छ होण्याची प्रेरणा दिली, असे करत करत आदर्श गावांच्या रांगेत हजारो गावे उभी राहिली.

सुरेख! अश्या गावांतील गावकर्‍यांचे कौतुक वाटते. त्यांना प्रेरणा देणार्‍या लोकांचे कार्य खरेच श्रेष्ठ आहे. सरकार आणि सरकारी योजनांच्या नावाने फक्त शंख करण्याऐवजी त्यांचा सकारात्मक वापर करून सर्वांगीण प्रगती कशी करून घेता येते याचा आदर्श या गावांनी, गावकर्‍यांनी घालून दिला आहे.

आपला
(प्रभावित) वासुदेव

First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win. - मोहनदास गांधी

केवळ् स्त्रित्वाचा अपमान

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

माघार

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

अवो त्या ठिकानी पन ग्येलो तर तिथबी काय न्हाई.. कदर कशी करायची आता?

 
^ वर