अखंड हरिनाम सप्ताहाने डांगरेघर व्यसनमुक्त

"डांगरेघर' हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. पारंपरिक शेती; त्यामुळे हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत या गावात दारू नावाची अवदसा घुसली. गावातील 80 टक्के लोक व्यसनाधीन झाले. व्यसन जडलेल्या लोकांना व्यसनमुक्त करणे ही खूप अवघड गोष्ट असते. पण या गावात मात्र अखंड हरिनाम सप्ताहाने जादू केली आणि गाव व्यसनमुक्त झाले.

या कामी अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच तेथील महिलांचा निग्रहही महत्त्वाचा होताच. डांगरेघरची लोकसंख्या अंदाजे 1800 इतकी आहे. तर या गावाचे एकूण क्षेत्र 209 हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी 197 हेक्‍टर क्षेत्र पावसाळी भात लागवडीसाठी आहे. काही वर्षांपूर्वी या गावाची अवस्था खूप वाईट होती. लोक भात लावण्याखेरीज दुसरा काही प्रयत्न करत नव्हते. भाताच्या जोडीला लोक मासेमारी करत. त्यावर लोकांची गुजराण व्हायची. त्यातच गावात दारूचे प्रमाण वाढले. गावातील जवळजवळ 80 टक्के लोक व्यसनाधीन झाले. इतके, की लोक भात विकून त्या पैशातून दारू पिऊ लागले.

व्यसनामुळे नियंत्रण सुटते आणि त्यातून ही माणसे गोंधळ घालतात. दारूमुळे गावातील स्वास्थ्य नाहीसे झाले. मारामाऱ्या तर रोजच्याच झाल्या. व्यसनाधीन लोकांच्या व्यसनावर कोणाचेच नियंत्रण नव्हते. कारण या गावाच्या आजूबाजूला मुबलक दारू उपलब्ध होती. लोकांचे व्यसन सुटल्याशिवाय काही प्रगती होणार नव्हती, पण व्यसनमुक्तीचा मार्गही सापडत नव्हता. कारण लोकांना आपण काही चुकीचे करतो आहोत असे वाटत नव्हते. अशा वेळी या गावाची निवड आदर्श गाव योजनेत झाली.

राळेगणसिद्धी हे गाव म्हणजे ग्रामविकासातला मैलाचा दगड. या गावात डांगरेघरच्या गावकऱ्यांची सहल काढली. त्या वेळी डांगरेघरच्या ग्रामस्थांनी राळेगणसिद्धीने स्वकष्टावर केलेली प्रगती पाहिली. तसेच तेथील दारूमुक्तीही पाहिली. या सहलीचा चांगला परिणाम लोकांच्या मनावर झाला आणि ग्रामस्थांनी डांगरेघरमध्ये आल्यावर दारूबंदी करण्याचा वसा घेतला. त्यासाठी गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. या सप्ताहात 70 लोकांनी गळ्यात तुळशीच्या माळा घालून दारू सोडली.

डांगरेघरच्या शिवेबाहेर 50 ते 60 दारूचे धंदे होते. ते लोक दारू डब्यातून डोंगरदऱ्यांमधल्या गावांमध्ये विक्रीसाठी न्यायचे. त्यासाठी ते डांगरेघरमधून जायचे. साहजिकच त्यामुळे या गावातल्या लोकांनाही व्यसन लागले होते. व्यसनमुक्तीसाठी डांगरेघरमधील महिलांनी कंबर कसली. दारूचा धंदा करणाऱ्यांचा रस्ता अडवला. त्यांचे दारूचे डबे फोडले. त्यामुळे डोंगरघरमधील दारूचे प्रमाण कमी झालेच, पण इतर गावांना होणारा दारूचा पुरवठा बंद झाला. डांगरेघरात दारू बंद झाली.

पण इतर गावांमधून या गावात पिऊन येणाऱ्यांचे प्रमाणही भरपूर होते. महिलांनी त्यांनाही सोडले नाही. दारूबंदीसाठी या गावातील स्त्रीशक्ती जागृत झाली. एखादा माणूस पिऊन आलेला दिसला, की या महिलांनी त्यांच्या अंगावर गुलाल टाकून त्याचा "सत्कार' करायला सुरवात केली. तसेच त्यांची मिरवणूक काढायला सुरवात केली. या महिलांचा हुरूप पाहून डांगरेघरची ग्रामपंचायतही मागे हटली नाही. दारू पिणाऱ्या लोकांना पकडून ग्रामपंचायतीत कोंडून 50 ते 100 रुपये दंड वसूल केला जाऊ लागला.

त्यामुळे दारू पिणाऱ्यांवर चांगलीच दहशत बसली. त्यामुळे हळूहळू गावातले दारू पिणे कमी झाले. व्यसनी लोकांपैकी गावातले 90 टक्के लोक व्यसनमुक्त झाले. याचे श्रेय हरिनाम सप्ताहालाही द्यावे लागेल. कारण देवाचे नाव मुखात असल्यावर दारू पिणे निषिद्ध आहे हे लोकांच्या मनावर चांगलेच बिंबवले गेले. हे गाव व्यसनमुक्त झाल्यावर लोक गावाच्या सुधारणांचा विचार करू लागले. गावात पाणलोटाचे काम उत्तम प्रकारे झाले. पंचसूत्री पाळली जाऊ लागली.

ग्रामस्वच्छता अभियानात गावाने दुसरा क्रमांक मिळवला. गावाच्या उत्पन्नात वाढ झाली. हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. गावाच्या पुढच्या विकासाची "व्यसनमुक्ती' ही पायाभरणी होती.

Comments

फार छान! पण विश्वास बसत नाही!

शिल्पाजी आपण दिलेली माहिती जर खरोखरच वस्तुस्थिती म्हणून असेल तर फार छान झाले असे म्हणता येईल. पण मी अशीही माळकरी माणसे बघितली आहेत की जी दारु पिण्याच्या प्रसंगी माळ बाजूला काढून ठेवतात. तसेच दारु पिऊन वर धिंड काढली गेली तरी लाज-लज्जा न वाटणारीही बरीच मंडळी बघितलेत.त्यामुळे ही परिस्थिती किती दिवस टिकेल ह्याबाबत मी साशंक आहे. अवांतर: अशाच एका प्रसंगावर सुप्रसिद्ध लेखक द.मा. मिरासदार ह्यांची ’धिंड’ ही गोष्ट वाचण्यासारखी आहे.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

अभिनंदन

हा लेख वाचून आनंद झाला. डांगरेघरच्या समस्त रहिवाशांचे अभिनंदन.

तसेच त्यांची मिरवणूक काढायला सुरवात केली.
मिरवणूक म्हणू नका - धिंड म्हणा- यावर शंकर पाटलांची 'धिंड' कथा आठवली

शंकर पाटील : हे पक्कं.

धिंड = शंकर पाटील : हे पक्कं.

माझीच चूक!

’धिंड’ ही शंकर पाटील ह्यांचीच कथा आहे.
ती ’दमां’ ची आहे असे मी चूकून म्हणालो.त्याबद्दल क्षमस्व!
विसूनानांनी चूक सुधारल्याबद्दल त्यांचे आभार!
===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

निवडक शंकर पाटील

धिंड -
निवडक शंकर पाटील.

राऊ खोत दारू पिऊन येतो आणी गावात दारु पिणार्‍याचे धिंड काढायची हे ठरल्या प्रमाणे त्याची धिंड काढायचे असे ठरते. राऊ खोत आधी नाही म्हणतो.
मी प्यायलीच नाही, 'गडद झोपलो होतो' असे म्हणतो. पण चावडीत वास दरवळत असतो. त्याचा संदर्भ दिल्यावर म्हणतो की 'तुमच्या नाकात बसलाय वास तुमच्याच जीवाला विचारा'. त्याचे काहीही ऐकुन न घेता त्याला उलटे गाढवावर बसवून त्याची धिंड निघते. गाढवावर बसवल्यावर तो हलगी लेझिम मुळे ताल धरतो "टांग, डिक्क,टांग, डिक्क" इतकेच नाही तर धिंड गावात सगळी कडे फिरवण्यासाठे वाद घालतो आणी लोकांना दमवतो. रात्री २ वाजता लोक कसेबसे झोपतात.

पण सकाळी सकाळी राऊ परत दारू पिऊन चावडीवर हजर होतो आणी झोपलेल्या सनद्यांना उठा म्हणतो. परत धिंड काढा म्हणतो!

अशी ती कथा आहे. वाचायला धमाल आहे.
शंकर पाटीलांनी सुरेख रंगवली आहे.

इतर सर्व कथांसोबत यातलीच 'नेमानेमी' ही पण एक सुरेख वेगळीच कथा...

आपला
(कथाप्रेमी)
गुंडोपंत
(माझ्या लेखनात माझी नक्कल करण्याचीसुद्धा लायकी नसतांना देखिल अनेकदा शंकर पाटील यांची नक्कल असते हे मी कबुल करतो!)

धिंड येथे ऐका!

सुरेख लेख..

नमस्कार शिल्पाजी,

मी दारुबंदी विषयक आपल्या एखाद्या नवीन लेखाची मी वाटच पाहात होतो, तेवढ्यात आपला लेख आलाच! मध्यंतरीचे आपले लागोपाठ दोन लेख दारुबंदीवरचे नव्हते त्यामुळे खूपच सुनंसुनं वाटत होतं!

हा लेख बाकी सुरेखच आहे हो. अहो वाचताना डोळ्यातले आनंदाश्रू काही केल्या थांबतच नव्हते! :)

दारुबंदीवरील पुढील लेखाला मनःपूर्वक शुभेच्छा..

तात्या.

संत तात्याबा सध्या हे वाचत आहेत! :)

फारच छान माहिती.

शिल्पाजी,
लेख आवडला.

"डांगरेघर' हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. हे वाचल्याबरोबर मनात आले या लेखाचा समारोप या गावाची दारु सुटल्याशिवाय होणारच नाही.सेव्हन वंडर्स पेक्षाही, तुम्हाला या गावोगावीच्या दारु सुटल्याच्या बातम्या मिळतात कुठुन याचेच आम्हाला वंडर वाटत असते.

एखादा माणूस पिऊन आलेला दिसला, की या महिलांनी त्यांच्या अंगावर गुलाल टाकून त्याचा "सत्कार' करायला सुरवात केली. तसेच त्यांची मिरवणूक काढायला सुरवात केली. या महिलांचा हुरूप पाहून डांगरेघरची ग्रामपंचायतही मागे हटली नाही. दारू पिणाऱ्या लोकांना पकडून ग्रामपंचायतीत कोंडून 50 ते 100 रुपये दंड वसूल केला जाऊ लागला.

अवांतर :-) आपण काही डांगरेघर या गावी जाणार नाही.दंडाच्या रकमेचे काही नाही हो,हा लेख वाचल्यापासून त्या गावात तात्या,गुंड्याभाऊ,आणि त्यांच्यामागोमाग मलाही मिरवत आहेत असेच स्वप्न पडते आहे ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा!

बिरुटेसाहेब!
चांगला आठवणीत ठेवलाय मला पण! आता एकदा 'बसावेच' लागते आपल्याला... दारूबंदी कशी कशी लागू केली पाहिजे याचा मसूदा तयार करायला! ;)
(त्या युयुत्सुरावांना विसरू नका नाहीतर ग्लेनफिडीच नाही मिळायची. ऐनवेळेला लोच्या...)
काय म्हणता?
आपला
गुंडोपंत

गुलाल मिरवणुकीतला सत्कारमूर्ती! :)

बिरुटेसाहेब,

अवांतर :-) आपण काही डांगरेघर या गावी जाणार नाही.दंडाच्या रकमेचे काही नाही हो,हा लेख वाचल्यापासून त्या गावात तात्या,गुंड्याभाऊ,आणि त्यांच्यामागोमाग मलाही मिरवत आहेत असेच स्वप्न पडते आहे ;)

हा हा हा! हे सही आहे बिरुटेसाहेब. मलाही काल रात्री हेच स्वप्न पडलं की आपल्या तिघांची डांगरेघर गावातून अंगाला गुलाल माखून गाढवावरून धिंड काढत आहेत आणि इतर गावकर्‍यांबरोबर शिल्पाजीही रस्त्याच्या कडेला उभं राहून आपल्याकडे बघत फिदिफिदि हसत आहेत! :)

पण बाकी शिल्पाजींचे मात्र खरंच कौतुक वाटते हो. दारुबंदीविषयक बातम्यां त्या अत्यंत तळमळीने मिळवतात आणि तेवढ्याच तळमळीने त्यावर लिहितातही!

अहो मला तर हल्ली बुधवार आणि शनिवार शिल्पाजींच्या लेखांच्या आठवणीने चळाचळा कापायला होते. दारुबंदीवाले आले आहेत आणि खसकन माझ्या हातातला 'जाम' ओढून घेत आहेत, अहो असाही अलिकडे भास होतो! :)

पण मला वाटतं हेच खरं तर शिल्पाजींच्या दारुबंदी विषयक लेखांच्या भडिमाराचे(!) यश आहे!..

शिल्पाजींना पुन्हा एकदा धन्यवाद. दारुबंदीविषयक त्यांच्यां पुढच्या एखाद्या जोरदार लेखाची वाट पाहात आहे!

आपला,
(गुलाल मिरवणुकीतला एक सत्कारमूर्ती!) :)
तात्या.

नामस्मरण आणि व्यसनमुक्ती

नामस्मरण सप्ताहाने आख्खे गावच्या गाव व्यसनमुक्त झाले हे वाचून अंगावर रोमांच उभे राहिले. (शेवटी खिडकी बंद केली तेंव्हा जरा बरे वाटले.) तरुण पिढीच्या व्यसनाधीनतेवर हा रामबाण (पहा, इथेही राम आहेच!) उपाय ठरेल असे मनात येऊन गेले. दारु पिऊन ऐश्वर्याच्या ( आता सौ. ऐश्वर्या म्हणायला पाहिजे नाही का?) घरासमोर धिंगाणा घालणार्‍या सलमान खानला गुरुचरित्राचा सप्ताह करायला सांगावा असे मनात आले. (दोन्ही खांद्यांवर पदर घेऊन समईत तेल घालायला आलेल्या कतरीना कैफचे चित्र डोळ्यासमोर येऊन डोळे पाणावले!) कोकेन प्रकरणात अडकलेला फरदीन खान सोवळे नेसून लघुरुद्र करतो आहे , संजय दत्त नरसोबाच्या वाडीला टेंबेस्वामींच्या उत्सवात पंगतीत पाणी वाढतो आहे, राहुल महाजन हातात एकतारी घेऊन 'साहावळे रूप इटोबाचे...' म्हणत दिंडीत सहभागी झाला आहे आणि मागून आख्खी अल्कोहोलिक ऍनानिमसची पलटण चालते आहे, अनिल अवचटांनी 'मुक्तांगण' बंद करुन तेथे दारुच्या कारखान्यात काम करणार्‍या महिलांच्या बाळांसाठी पाळणाघर काढले आहे...अशी चित्रे दिसू लागली. त्या धुंदीत शेजारुन चालणार्‍याला किंचित धक्का लागला आणि तो तरबत्तर होऊन 'अबे, पियेला है क्या..' असे काहीसे म्हणाला ते आमच्या लक्षातही आले नाही!
सन्जोप राव

हाहा...

जर देवदर्शन व नामस्मरणाने व्यसनमुक्ती होते तर मग शिर्डी, आळंदी येथे परवानाधारक खोल्या व मादक-कडवट शीत पेय मिळण्याच्या ठिकाणांच्या संख्येमध्ये वृद्धी होण्याचे कारण धर्मभ्रष्ट नास्तिक लोकच आहे की काय?

संजोपराव

जर देवदर्शन व नामस्मरणाने व्यसनमुक्ती होते तर मग शिर्डी, आळंदी येथे परवानाधारक खोल्या व मादक-कडवट शीत पेय मिळण्याच्या ठिकाणांच्या संख्येमध्ये वृद्धी होण्याचे कारण धर्मभ्रष्ट नास्तिक लोकच आहे की काय?

संजोपरावांचा शिर्डी वरचा लेख इथे वाचा
प्रकाश घाटपांडे

मस्त! ;)

(शेवटी खिडकी बंद केली तेंव्हा जरा बरे वाटले.)

सलमान खानला गुरुचरित्राचा सप्ताह करायला सांगावा असे मनात आले.

कोकेन प्रकरणात अडकलेला फरदीन खान सोवळे नेसून लघुरुद्र करतो आहे ,

त्या धुंदीत शेजारुन चालणार्‍याला किंचित धक्का लागला आणि तो तरबत्तर होऊन 'अबे, पियेला है क्या..' असे काहीसे म्हणाला ते आमच्या लक्षातही आले नाही!

हा हा हा! मस्त..

आपला,
(मदिराप्रेमी) तात्या.

व्यसनमुक्ती

शिल्पाताई,

डांगरेघर ग्रामस्थांचे विशेषतः तिथल्या महिलांचे हे अनुकरणीय कार्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद! खेड्यापाड्यातील लोक पापभीरू असतात, देवाधर्मावर त्यांची भोळीभाबडी का असेना पण श्रद्धा असते त्यामुळे हरिनामाच्या मार्गाने व्यसनमुक्ती हा खरेच योग्य उपाय आहे.

व्यसनांचे उदात्तीकरण करण्याची किंवा व्यसनमुक्तीवाल्यांची टवाळी करण्याची प्रवृत्ती बरेचदा दिसून येते. पण शहरात राहणार्‍या आणि एका मर्यादेत राहून व्यसनांच्या आहारी जाणार्‍या लोकांची तुलना अल्पशिक्षित ग्रामस्थांशी करता येणार नाही. खेड्यातील एखाद्या माणसाचे व्यसन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देशोधडीला लावू शकते याची जाणीव ठेऊन सर्वांनी व्यसनमुक्तीला पाठिंबा दिला पाहिजे.

आपला
(आवाहक) वासुदेव

First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win. - मोहनदास गांधी

असेच... + +

शिल्पाताई, -- डांगरेघर ग्रामस्थांचे विशेषतः तिथल्या महिलांचे हे अनुकरणीय कार्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद!
आभार.

खेड्यापाड्यातील लोक पापभीरू असतात, देवाधर्मावर त्यांची भोळीभाबडी का असेना पण श्रद्धा असते त्यामुळे हरिनामाच्या मार्गाने व्यसनमुक्ती हा खरेच योग्य उपाय आहे.
हा मार्ग उपयोगी पडू शकते हे दिसते खरे.

व्यसनांचे उदात्तीकरण करण्याची किंवा व्यसनमुक्तीवाल्यांची टवाळी करण्याची प्रवृत्ती बरेचदा दिसून येते.
फक्त टवाळखोरांचाच हा आवडीचा विषय असतो असे नाही. तर उच्चवर्गीयांमध्ये आणि तथाकथित सुधारकांमध्ये स्वतःची गणना करण्याचीही ही एक धडपड असते.

पण शहरात राहणार्‍या आणि एका मर्यादेत राहून व्यसनांच्या आहारी जाणार्‍या लोकांची तुलना अल्पशिक्षित ग्रामस्थांशी करता येणार नाही. खेड्यातील एखाद्या माणसाचे व्यसन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देशोधडीला लावू शकते याची जाणीव ठेऊन सर्वांनी व्यसनमुक्तीला पाठिंबा दिला पाहिजे.
मर्यादेत सगळेच ठीक आहे. पण शहरातही व्यसनाने धुळीस मिळालेली माणसे चौकाचौकात दिसतील.

++
लेख वाचल्यास असे लक्षात येते की हरिनाम हा निव्वळ आधार होता. महिलांचा तसेच गावकर्‍यांचा निर्धार आणि त्यांची "प्रत्यक्ष कृती" याचा परिपाक हे गाव आदर्श होण्यात झाला.

आपलाच
(वाहक) एकलव्य

वासुदेवा,

खेड्यापाड्यातील लोक पापभीरू असतात,

हे तुला कुणी सांगितले रे वासुदेवा? कधी आमच्या कोकणातल्या खेड्यात आला आहेस का?

देवाधर्मावर त्यांची भोळीभाबडी का असेना पण श्रद्धा असते

हो पण देवाधर्मावर असलेल्या त्यांच्या भोळ्याभाबड्या श्रद्धेपायी, किंबहुना अंधश्रद्धेपायी आजही खेडेगावातून किती भयानक अंधश्रद्धा पोसल्या जातात हे तुला माहित्ये का रे वासुदेवा?? अरे एकवे़ळ दारुचं व्यसन परवडलं, एवढी ही मरिआईची आणि भानामतीची व्यसनं भयंकर आहेत!

तात्या.

खरे आहे

मिसळपाव महोदय, तुमच्या प्रगल्भ प्रतिसादाबद्दल आभारी आहे. कोणत्याही कार्याचा सर्वंकष, सर्व बाजूंनी विचार होणे चांगले आहे.

हो पण देवाधर्मावर असलेल्या त्यांच्या भोळ्याभाबड्या श्रद्धेपायी, किंबहुना अंधश्रद्धेपायी आजही खेडेगावातून किती भयानक अंधश्रद्धा पोसल्या जातात

आपले म्हणणे अगदी खरे आहे, पण काही सुशिक्षित, समंजस लोकांनी जर या श्रद्धेला योग्य वळण लावले, चांगल्या कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले तर ते चांगलेच आहे. नाही का?

एकवे़ळ दारुचं व्यसन परवडलं, एवढी ही मरिआईची आणि भानामतीची व्यसनं भयंकर आहेत!

आपले हे म्हणणेही अगदी खरे आहे. पण दारूपेक्षा भयंकर व्यसने आहेत हे मानले तरी दारूमुळे होणार्‍या वाताहतीचे गांभीर्य त्याने कमी होत नाही.

आपला
(सर्वंकषविचारवादी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

वासुदेवशेठ,

पण काही सुशिक्षित, समंजस लोकांनी जर या श्रद्धेला योग्य वळण लावले, चांगल्या कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले तर ते चांगलेच आहे. नाही का?

पण दारूपेक्षा भयंकर व्यसने आहेत हे मानले तरी दारूमुळे होणार्‍या वाताहतीचे गांभीर्य त्याने कमी होत नाही.

आपकी बात भी सही है!

आपला,
मिसळपाव.

मग दारूच्या बाटलीवर शिक्काच का असु नये?

दारुमुळे व्यसन लागते असा मग दारूच्या बाटलीवर शिक्काच का असु नये?

आपला
गुंडोपंत

हरिनामाचा शिक्का! :)

दारुमुळे व्यसन लागते असा मग दारूच्या बाटलीवर शिक्काच का असु नये?

हा हा हा! 'हरिनामा'चा शिक्का असावा! :)

निदान तो शिक्का पाहून तरी मंडळी बाटलीचं उघडलेलं झाकण परत बंद करून उरलेला वेळ 'हरी हरी' करतील! :)

आपला,
हॅरी अभ्यंकर! :)

केवळ् स्त्रित्वाचा अपमान

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

आपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.

 
^ वर