पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी

आपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे, त्यामुळे एकमेकांना मदत करत घरीच बियाणी बनवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदे व्हायचे. एक म्हणजे त्यांचा बी-बियाण्यांवरचा खर्च वाचायचा आणि दुसरे म्हणजे बियाण्यांमुळे त्यांची फसगत व्हायची नाही; पण हरितक्रांतीनंतर हे सर्वच बदलले. शेतकऱ्यांचा बियाण्यांवरचा खर्च वाढू लागला, त्यामध्ये फसगत होऊन पिके हातातून जायची वेळ आली. बियाणे तयार करण्याचे पारंपरिक ज्ञान लोप पावत चालले.

ही गोष्ट आंध्र प्रदेशातील डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेच्या लक्षात आली आणि त्यातून उभा राहिला एक अनोखा प्रयोग ः बियाण्यांचा उत्सव भरवण्याचा. डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेने आंध्र प्रदेशातील शेतकरी महिलांना हाताशी धरून हा उपक्रम राबवला आहे. आंध्र प्रदेशातील मेडक परिसरात त्याचे मूर्त रूप पाहायला मिळते. या संस्थेने या महिलांना बियाणे तयार करण्याचे पारंपरिक ज्ञान दिले आहे. या ज्ञानाचा उपयोग करून या महिला वर्षातून एकदा गावागावांत फिरून बियाण्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत असतात. कर्ज काढून बाजारात पैसा फेकला, की बियाणी विकत मिळतात, एवढेच हल्लीच्या पिढीला माहीत आहे; त्यामुळे शेतकऱ्यांच्या तरुण पिढीला या कलेचे महत्त्व पटवून देणे ही गोष्ट ही संस्था करते आहे.

जागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. बी-बियाण्यांमध्ये फसगत होऊ नये, शेतीचा दर्जा सुधारावा, तसेच शेतमालाला चांगला दर यावा; यासाठी या शेतकरी महिला अन्नधान्याचा, पारंपरिक बी-बियाण्यांचा एक मोठा उत्सव साजरा करतात. हा बियाण्यांचा महोत्सव वर्षातून 28 दिवस सलग म्हणजेच जवळजवळ महिनाभर चालतो. गेली आठ वर्षे हा महोत्सव संस्थेने यशस्वी करून दाखवला आहे. एक नवी संकल्पना या माध्यमातून शेतकऱ्यांत रुजवली आहे.

या महोत्सवात त्या परिसरातल्या पाच हजारांच्या आसपास शेतकरी महिला सहभागी होतात. यांपैकी बहुतांश महिलांच्या मालकीची एक ते दोन एकर एवढी अल्प शेती आहे. त्यांना या महोत्सवाचा चांगलाच फायदा होतो. सुमारे पन्नास हजार शेतकरी या महोत्सवाला भेट देतात. या महोत्सवाचे स्वरूपही मजेदार असते. बी-बियाणांच्या नव्या जातींची माहिती, तसेच त्यांच्या वापराची पद्धती त्यांना या महोत्सवामधून दिली जाते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे तोटेही त्याबरोबरीने समजावून दिले जातात.

या संस्थेशी जोडलेल्या महिलांनी आपल्या बियाण्यांची बॅंकही तयार केली आहे. ही बियाणी या महोत्सवात दिसतात. याबरोबरच खतं, पाणी आणि माती यांचं शेतीशी काय नातं आहे, याचंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण इथल्या महिलांना दिले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून या महिलांच्या बी-बियाण्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहेच, शिवाय त्यांच्या ज्वारी, गव्हासारख्या धान्याला थेट ग्राहकही मिळत आहेत. बाजारपेठेचा प्रश्‍न सुटला आहे. आपली पारंपरिक शेती जगावी यासाठी डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीने टाकलेले हे एक उत्तम पाऊल आहे.

Comments

पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी

जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे.

हा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिकीकरण, आणि विशेषतः ताळ सोडून त्याच्यामागे लागलेले भारतीय, ह्यांना लगाम बसलाच पाहिजे.

"मूग की मटार" असा कोणीतरी इथे लेख लिहिणार होते. जागतिकीकरण असेच अनिर्बंध चालत राहिले तर "मूग" म्हणजे काय हे ही लोकांना आठवणार नाही. कारण तोपर्यंत मुगामुळे कॅन्सर नाहीतर पोलियो होतो असे "संशोधन" प्रसिद्ध होऊन हजारो शेतक-यांना आयुष्यातून उठवले गेले असेल . . .

पण!

जागतिकीकरण, आणि विशेषतः ताळ सोडून त्याच्यामागे लागलेले भारतीय, ह्यांना लगाम बसलाच पाहिजे.

नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे कळले नाही बॉ?
अजिबात जागतिक होणे नको?
भारतीयांनी जगाचे काहीच घेवू नये?
भारतीयांनी जगाला काही देवू नये?

मी म्हणेन यातले काहीच शक्य नाही...
जागतिकी करण हे अनादी कालापासून चालत आले आहे. त्याचे स्वरूप बदलते राहिले आहे इतकेच.

याशिवाय जागतिकीकरण ही दुधारी सुरी आहे... आपण हेच शस्त्र दुसर्‍या बाजूवरही तेव्हढेच परिणामकारकरित्या चालवू शकतो.
तेंव्हा आपणही जगात खपतील अशा गोष्टी बनवून विकु शकतो. या तंत्रापासून जितके लांब आपण पळू तेव्हढा आजच्या घडीला आपला तोटा आहे.
मी म्हणेन की, वरील 'बियाणे जत्रा' हा उत्तम प्रकल्प आहे.
सदर संस्थेने त्याची

  • व्यवस्थापन पद्धती वेगळी करावी
  • ही पद्धती लिखित स्वरुपात आणून कॉपीराईट, (तंत्र असल्यास) पेटंट घ्यावे
  • परिक्षण करुन तृटी असल्यास दूर् कराव्यात
  • बियाणे जत्रा तंत्र का गरजेचे आहे हे पटवून देण्यासाठीचे शब्द निश्चित करावेत
  • अशी गरज असलेले देश हेरावेत
  • आम्ही असे आपल्या देशातही 'बियाणे व्यवस्थापन' करून देवू शकतो हे तंत्र विकावे...

काय वाटते आपल्याला अशा जागतिकीकरणा विषयी?

आपला
गुंडोपंत

म्हणजे काय?

कारण तोपर्यंत मुगामुळे कॅन्सर नाहीतर पोलियो होतो असे "संशोधन" प्रसिद्ध होऊन हजारो शेतक-यांना आयुष्यातून उठवले गेले असेल . . .

नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?

  • संशोधन खोटे असते? (हा अत्यंत वादा च मुद्दा... ;) )
  • संशोधन शेतकर्‍यांना आयुष्यातून कसे काय उठवते?
  • जर एखाद्या शेतकर्‍याने पिकवलेल्या गोष्टीचे परिणाम वाईट असतील तरी ती शेतकरी जगावेत, म्हणून लोकांनी खावी का?
  • जगात काय खपु शकते आणी काय नको आहे हे शेतकर्‍यांना सरकारने सांगायला नको का? उदा. कांदे. नुसती देशातली लागवडीची आकडेवारी आणी मागील वर्षाचा खपाचा ताळा लासलगावला आले तरी कांद्याच्या किमती स्थीर रहायला खुप मोठी मदत होईल.
  • आपल्या क्षेत्रात जगात काय चालले आहे हे समजून घेणे ही शेतकर्‍यांची पण जबाबदारी नाही का?

आपला
गुंडोपंत

पण मग सरकार का झोपले होते?

ह्या लाखेमुळे पोलियो होतो, ही अफवा पसरली

मग सरकार चे काम नव्हते का जनतेला योग्य ती माहिती पुरवण्याचे?
असेही 'माहितीचे स्रोत' यावर आपल्याकडे एक क्रांती व्हायला हवी आहे. आत्ताचे जे काही आहे त्याला 'क्रांती' नाही म्हणत ही 'माहिती ची दंगल' सुरु आहे!

यात सरकारी खाते म्हशी सारखे विसावले आहे... ते कधी उठलेच नाही...
आपला
गुंडोपंत

क्या बात है!

वा युयुत्सुराव! क्या बात है!
एकदा दंगल म्हटली की भेकडही शूरवीर भासतात

त्यामुळे कशालाच किंमत उरली नाहिये... नुसती दलदल माजलीय!

आपला
गुंडोपंत

अभिनंदन!

शिल्पाताई, लेख छान आहे हो!

कुठल्या गावात किती दारुचे गुत्ते बंद पाडले हे न सांगणारा लागोपाठ दुसरा लेख. अभिनंदन! :)

तात्या.

केवळ् स्त्रित्वाचा अपमान

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

 
^ वर