प्रज्ञापराक्रमी डॉ. टी. व्ही. रामन

आयुष्यात अमुक एका गोष्टीच्या अभावाने प्रगती होऊ न शकल्याची तक्रार करणारी बरीच मंडळी पहायला मिळतात. परंतू, येणा-या अडचणींवर मात करून बहुमोल कामगिरी करणारे ‘पराक्रमी’ या पदवीने
सन्मानल्या जातात. थोर भौतिकी चंद्रशेखर वेंकट रामन यांच्याशी केवळ नामसाधर्म्याखेरीज कोणताही संबंध नसणा-या अशाच एका प्रज्ञापराक्रमींचा आपण आज परिचय करून घेणार आहोत. मुंबईच्या तंत्रज्ञान प्रौद्यागिकी संस्थेतून (आयआयटीतून) संगणन विज्ञानात १९८९ मध्ये त्यांनी स्नातकोत्तर पदवी मिळवली. त्यानंतर अमेरिकेतील इथाका, न्यूयॉर्क येथील कॉर्नेल विद्यापीठात १९९४ मध्ये उपयोजित गणितात आचार्यपद (डॉक्टरेट) प्राप्त केले. तीन पुस्तके आणि पंचवीस शोधपत्र (पेटंट) रूजू करणा-या डॉ. टी. व्ही. रामन यांची कहाणी नक्कीच उद्बोधक आहे.

पुणे विद्यापीठातून गणिताचे स्नातक झालेल्या डॉ. रामन यांच्याबद्दल वेगळे असे काय हा प्रश्न उद्भवणे सहाजिकच आहे. भारतातून अमेरिकेत जाऊन नेत्रदिपक कामगिरी करणारे अनेक लोक आहेत. या प्रश्नाचे
उत्तर देण्यासाठी त्यांच्या पारितोषिक विजयी प्रबंधाकडे नजर टाकायला हवी. ‘तांत्रिक विषयातील लेख वाचण्यास उपयुक्त अशी ध्वनी प्रणाली’ हा या प्रबंधाचा विषय होता. अंध शास्त्रज्ञांसाठी या प्रणालीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे समजण्यासाठी गणिताबद्दल किंचित माहिती आवश्यक आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची क्षितिजे विस्तारण्यात गणिताची महत्त्वाची भूमिका आहे. गेल्या पांच ते सहा शतकांमध्ये आधुनिक गणिताचा प्रचंड विकास झाला. या विकासात गणिताच्या सांकेतिक लिपीचा सिंहाचा वाटा आहे. या लिपीमुळेच एका गणितीचे विचार दुस-यापर्यंत पोहोंचवणे शक्य झाले. गणिताची सूत्रे यांच लिपीत लिहितात. एक पानभर वर्णन केवळ एका सूत्रात व्यक्त करणारी गणिती लिपी ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असा व्यापकत्वाचा आदर्श आहे. ही लिपी डोळ्यांशिवाय वाचता येईल काय? जरा, वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा कलनाची (इंटिग्रेशन) सूत्रे आठवा बरे!

अशा परिस्थितीत वैचारिक दृष्टी तीक्ष्ण असलेल्या, परंतू डोळे नसलेल्यांनी काय करावे? अंधांना गणितात करियर करण्यास काही वाव आहे का? या दोन्ही प्रश्नांची होकारार्थी आणि समाधानकारक उत्तरे डॉ. रामन यांच्या प्रबंधातून मिळतात. त्यांनी विकसित केलेल्या प्रणालीच्या सहाय्याने कोणत्याही अंध व्यक्तीला गणिताची सूत्रे असलेले लेख संगणकाच्या सहाय्याने “ऐकता” येतात. तसेच, लिहीताही येतात. अंधांसाठी ज्ञानाचे मोठेच दालन उघडणा-या डॉ. रामन यांची कथा त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी आलेल्या संपूर्ण अंधत्वापासून सुरू होते.

त्या वेळेस त्यांच्या वडिल बंधूंनी त्यांना गणिताचे पाठ वाचून दाखवले. लौकिकार्थाने डोळ्यांसमोरील अंधाराचे त्यांनी तीक्ष्ण प्रज्ञा व इच्छाशक्तीच्या जोरावर प्रकाशात रूपांतर केले आणि एक पराक्रमी घोडदौड सुरू झाली. सर्वप्रथम त्यांनी कोणत्याही वर्षातील कोणत्याही दिनांकास कोणता वार आहे याची पद्धत उस्फुर्तपणे शोधून काढली. पुढे त्यांच्या भावाने त्यांना रूबिक क्यूबची भेट दिली. डोळे नसलेल्या व्यक्तीस रंग कसे दिसणार, म्हणून त्यांनी छोट्या रामनला ब्रेलच्या पट्ट्या चिटकवलेला रूबिकचा क्यूब दिला. लहानग्या रामनने तो सोडवण्याची पद्धत विकसित करून त्यात इतकी प्रगती केली की पुढे तो केवळ तीस सेकंदात ते कोडे सोडवू लागला.

पुढील शिक्षणात ब्रेलमध्ये गणितविषयक पुस्तकांची अडचण आली. यावर मात करण्यासाठी रामनने ब्रेलमध्ये स्वतःची गणिती लिपी शोधून काढली. या लिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ती उजव्या हाताने लिहीता येते आणि लगेच डाव्या हाताने वाचताही येते. दोन्ही हातांचा दोन डोळ्यांसारखा उपयोग करत त्याने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि गणितात आचार्यपद (डॉक्टरेट) मिळवले. आज संगणन क्षेत्रातील एक्सएमएल आणि एक्सफॉर्म यांसारख्या विश्वजाळासाठी उपयोगी तंत्रज्ञानाला पुढे नेण्याचे काम डॉ. रामन करत आहेत.

आंधळा मनुष्य गणितात कसे काम करू शकेल हा अचंबित करणारा प्रश्न आहे. यावर एक विस्तृत लेख डॉ. रामन यांनी मागच्याच महिन्यात प्रकाशित केला. हा लेख गणितात रूची असणा-या प्रत्येकाने नक्कीच वाचावा इतका तो आदर्श आहे. अक्षमुक्त संगणन कसे शक्य होऊ शकते याची ती गाथाच आहे.

लेखाचा दुवा - http://emacspeak.sourceforge.net/raman/publications/thinking-of-math/

डोळ्यांच्या सहाय्याने आपल्याला सौंदर्याची अनुभूती होते. डोळे नसणे एखाद्याला काळ्याकुट्ट अंधारासारखे दुर्दैव वाटू शकते. पण, ते असण्या-नसण्याच्या पलिकडे जाण्याचे उदाहरण आपल्याला जेवढे चकीत करते तेवढेच विचार करण्यासही भाग पाडते. अशी व्यक्ती, केवळ स्वतःच्या असण्यानेच, एकही शब्द न बोलता, आपल्याला अंधत्वाची कीव करण्याऐवजी आदर करायला शिकवते. एका अंध व्यक्तीने तंत्रज्ञानातील कौशल्याने हा धडा मला अनेक वर्षांपूर्वी दिला होता. डॉ. रामन यांनी त्यावर कळस चढवला.

दत्तात्रेयाने चोविस गुरू केले होते असे म्हणतात. त्याचेच अनुकरण करतो आणि प्रज्ञाचक्षूंचा योग्य वापर केल्यावर काय साध्य होऊ शकते याचा वस्तूपाठ देणा-या प्रज्ञापराक्रमी डॉ. रामन यांना मी गुरूस्थानी मानतो. त्यांना दिर्घायुष्य आणि उदंड यश मिळो या शुभेच्छेसह मानाचा मुजरा!

जय भारत!

(शैलेश श. खांडेकर)

Comments

धन्यवाद

लेख प्रिंट करून घेतला.

रामन हा जबरदस्त माणूस आहे हे जगजाहीर आहे.

ब्रेल लिपीबद्दल बोलायचं तर आपण सर्वांनी ती शिकून घेतली पाहिजे असं मला हल्ली वाटतं. आपण डोळ्यांवर खूपच मदार ठेवतो. अगदी गाण्याचा प्रोग्राम सुद्धा टक्क उघड्या डोळ्यांनी लोक "बघतात" (मी बघितलंय!). ही पब्लिकला फार वाईट खोड लागलेली आहे. असो. पण स्वस्थ डोळे मिटून पडल्या पडल्या वाचता अालं तर किती मजा येईल. म्हणून मला असल्या लेखांत फार रस अाहे. त्याबद्दल धन्यवाद.

सुंदर माहिती!

शैलेश आपण इथे डॉ. रामन ह्यांची ओळख करून दिलीत ह्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
मुकं करोती वाचालम् । पंगुम् लंघयते गिरी॥ अशा तर्‍हेचे सुभाषित आपण ऐकलेले आहेच(चू.भु.द्या.घ्या.) . त्याचीच ही प्रचिती आहे. नेत्रहीनता असुनही डॉ. रामन ह्यांनी त्यावर मात करून समस्त नेत्रहीनांसाठी आणि आपल्यासारख्या नेत्र असून अंध असणार्‍यांसाठी एक वस्तुपाठच घालून दिलाय.
माझाही डॉ. रामन ह्यांना मानाचा मुजरा!

प्रज्ञापराक्रमी डॉ. रामन.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शैलेश यांचा लेख वाचला आणि मला माझ्या अज्ञानाची कीव आली.या महान व्यक्ती विषयी मी काहीच वाचले नव्हते.गणित हा माझा आवडता विषय आहे.तरीसुद्धा डॉ. रामन यांच्या विषयी मला काहीच माहीत नव्हते. "अंधांसाठी ज्ञानाचे मोठेच दालन उघडणा-या डॉ. रामन यांची कथा त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी आलेल्या संपूर्ण अंधत्वापासून सुरू होते" हे वाचले आणि मी हबकलो,सुन्नच झालो.खरोखर श्री.शैलेश यांच्या उत्कृष्ट लेखामुळे डॉ.रामन या महान व्यक्तिमत्वाचा मला परिचय होऊ शकला. शैलेश यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
श्री.शैलेश यांची लेखनशैली उत्कृष्टच आहे.त्यांची शब्दयोजना आणि वाक्यरचना प्रशंसनीय आहे.असे लेखन क्वचितच वाचायला मिळते.मी हा लेख तीनदा वाचला. श्री. शैलेश यांची पारिभाषिक शब्द घडवण्याची हातोटी उपजतच असावी.'शोधपत्र' (पेटंट), "आचार्यपद"( डॉक्टरेट) असे शब्द ते सहज लिहून जातात.

असेच

खरोखर श्री.शैलेश यांच्या उत्कृष्ट लेखामुळे डॉ.रामन या महान व्यक्तिमत्वाचा मला परिचय होऊ शकला. शैलेश यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
श्री.शैलेश यांची लेखनशैली उत्कृष्टच आहे.त्यांची शब्दयोजना आणि वाक्यरचना प्रशंसनीय आहे.असे लेखन क्वचितच वाचायला मिळते ..... श्री. शैलेश यांची पारिभाषिक शब्द घडवण्याची हातोटी उपजतच असावी.'शोधपत्र' (पेटंट), "आचार्यपद"( डॉक्टरेट) असे शब्द ते सहज लिहून जातात.

अगदी असेच वाटते. शैलेश, या लेखाबद्दल आणि रामन यांच्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद!

मनःपूर्वक आभार

सर्वांच्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार!

जगन्नाथ,
ब्रेल लिपीबद्दल बोलायचं तर आपण सर्वांनी ती शिकून घेतली पाहिजे असं मला हल्ली वाटतं.

अगदी मनातलं बोललात, मलाही असंच वाटतं :)

युयुत्सु,
डॉ. रामन सध्या गूगल मध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे.

गूगलचे या बाबतीत कौतुक करावेसे वाटते. अशी उदाहरणे कदाचित संगणन क्षेत्रातील इतर संस्थांमध्येही असतील. ती लोकांसमोर पुढे येणे आवश्यक आहे.

प्रमोदकाका,
नेत्रहीनता असुनही डॉ. रामन ह्यांनी त्यावर मात करून समस्त नेत्रहीनांसाठी आणि आपल्यासारख्या नेत्र असून अंध असणार्‍यांसाठी एक वस्तुपाठच घालून दिलाय.

खरं आहे. असे उदाहरण पाहीले की आपल्या समस्या किती क्षुल्लक आहे असे वाटायला लागते.

यनावाला,
गणित हा माझा आवडता विषय आहे.तरीसुद्धा डॉ. रामन यांच्या विषयी मला काहीच माहीत नव्हते....श्री.शैलेश यांची लेखनशैली उत्कृष्टच आहे.

माझीही स्थिती अशीच होती. जेव्हा त्यांच्याबद्दल कळले तेव्हा त्यांच्या पराक्रमाचे कौतुक वाटले आणि अभिमानही वाटला. अशी व्यक्तींची वर्णने करतांना लेखणीलाच इतका आनंद होतो की शब्द स्वतःच नटून-थटून कागदावर उतरतात, :) आपल्या कौतुकाच्या शब्दांनी माझा उत्साह अधिक वाढला आहे.

स्नेहांकित,
शैलेश

मुजरा/अवांतर..

सुंदर लेख. रामनसाहेबांना मानाचा मुजरा..

आम्हाला त्यांचा परिचय करून दिल्याबद्दल शैलेशशेठचे अनेक आभार..

अवांतर -

'डॉक्टरेट' आणि 'पेटंट' या शब्दांचे मराठीकरण करण्याचा अट्टाहास का? या शब्दांचे 'आचार्यपद' आणि 'शोधपत्र' हे प्रतिशब्द कुठल्या शब्दकोषात दिले आहेत? एखाद्या माणसाने एखाद्या विषयावर आपला शोधप्रबंध लिहिल्यावर त्याला डॉक्टरेट मिळते. मग त्यानंतर तो माणूस आपल्या नावामागे 'डॉ.' ही उपाधी लावू लागतो. मुळात एखाद्या विषयावर शोधप्रबंध लिहिणे ही गोष्ट काही फक्त मराठी माणसांनाच लागू होत नाही. जगभरची मंडळी कशात ना कशात तरी आपापले शोधप्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवतच असतात. त्या सगळ्यांकरता जागतिक मान्यता असलेला 'डॉक्टरेट' हा शब्द उपलब्ध असतांना त्याला 'आचार्यपद' हा शब्द योजण्याचा केवीलवाणा अट्टाहास का??

आणि एवढंच जर होतं, तर लेखाच्या शीर्षकासकट,

प्रज्ञापराक्रमी डॉ. टी. व्ही. रामन

पुणे विद्यापीठातून गणिताचे स्नातक झालेल्या डॉ. रामन यांच्याबद्दल वेगळे असे काय हा प्रश्न उद्भवणे ..

या दोन्ही प्रश्नांची होकारार्थी आणि समाधानकारक उत्तरे डॉ. रामन यांच्या प्रबंधातून मिळतात.

अंधांसाठी ज्ञानाचे मोठेच दालन उघडणा-या डॉ. रामन यांची कथा त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी आलेल्या संपूर्ण अंधत्वापासून सुरू होते.

आज संगणन क्षेत्रातील एक्सएमएल आणि एक्सफॉर्म यांसारख्या विश्वजाळासाठी उपयोगी तंत्रज्ञानाला पुढे नेण्याचे काम डॉ. रामन करत आहेत.

यावर एक विस्तृत लेख डॉ. रामन यांनी मागच्याच महिन्यात प्रकाशित केला.

डॉ. रामन यांनी त्यावर कळस चढवला.

याचा वस्तूपाठ देणा-या प्रज्ञापराक्रमी डॉ. रामन यांना मी गुरूस्थानी मानतो.

वरील वाक्यात 'डॉ.' ऐवजी 'आ.' हे अक्षर आपण का नाही वापरलंत शैलेशराव??

त्याचप्रमाणे पेटंट या शब्दाबद्दल. 'शोधपत्र' हा शब्द पेटंट या शब्दाला अत्यंत चुकीचा वाटतो.

एखाद्या गुन्ह्याचा शोध लावून पोलिस जेव्हा कोर्टात फिर्यादीपत्र दाखल करतात तेव्हा त्या फिर्यादीपत्रात पोलिसांनी लावलेल्या शोधाचा विस्तृत लेखाजोखा असतो. त्यामुळे त्या फिर्यादीपत्राला देखील एका अर्थी 'शोधपत्र' हा शब्द वापरता येईल. मग शैलेशराव, पोलिसांच्या या शोधपत्राला एखाद्या इंग्रजी भाषा प्रेमिकाने 'पेटंट' म्हणणे आपल्याला पटेल का?

प्रामाणिक उत्तराची अपेक्षा..

लेख बाकी अतिशय चांगला आहे, हे पुन्हा एकदा नमूद करावेसे वाटते.

तात्या.

--
मराठीकरणाच्या फाजील अट्टाहासाचे तात्या समर्थन करत नाही!

आभार

तात्या,

आपल्या प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार!

१. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांवर ज्ञानदान आणि संशोधन अशा दुहेरी जबाबदा-या असतात. आपल्याकडील 'स्वाध्याय प्रवचनाभ्याम् मा प्रमदः' असा आशिर्वाद गुरूने शिष्याला द्यायच्या परंपरेशी ही पद्धत जुळते. त्या अनुषंगाने डॉक्टरेट या शब्दाला आचार्यपद हा प्रतीशब्द चांगला वाटतो. त्यातून संशोधन आणि ज्ञानदानाचा भाव चांगला प्रतीत होतो असे वाटते. डॉक्टर हा मराठीत रूळलेला शब्द आहे. परंतू, त्यात आचार्यपदाची सरसता येत नाही. मात्र संक्षेपाच्या दृष्टीने 'डॉ.' ऐवजी 'आ.' वापरल्यास रसभंग होईल असे वाटले. त्यामुळे दोन्ही शब्द लेखात योजले आहेत. (आचार्यपद हा शब्द माझाच आहे असाही काही दावा नाही. अनुदिन्या, वृत्तपत्रे, पत्रापत्री यांतून मराठी शब्द जसे मिळतील तसे टिपून घेत असतो.)

२. पेटंट या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती पाहता त्याला योजलेल्या शोधपत्रातील पत्र हा शब्द योग्य आहे. एखाद्या संशोधकाने लावलेल्या शोधाबद्दल त्याला शासनाकडून काही कालमर्यादेसाठी त्या शोधाबद्दल (जवळजवळ) पूर्ण स्वामित्व देणारे पत्र ते 'शोधपत्र' असे आपण म्हणू शकतो.

३. या दोन्ही शब्दांना अजून चपखल प्रतीशब्द सुचवल्यास त्याचे स्वागतच आहे.

४. मराठीकरण हा अट्टहास आहे किंवा नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. कदाचित 'मराठीकरण' हा शब्दही चुकीचा असू शकतो. ज्या संज्ञा गणिती आणि शास्त्रज्ञांच्या तद्विषयक लेखात वापरल्या जातात त्या तांत्रिक संज्ञांना मराठीत प्रतीशब्द असणे, तसेच नसल्यास ते निर्माण करणे आवश्यक वाटते. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज उजव्या हाताने खेळू शकतो किंवा डावखुरा असू शकतो, परंतू त्याच्या त्या शैलीला आपण अट्टहास म्हणू शकत नाही त्याप्रमाणेच मराठी प्रतीशब्दांचा प्राधान्याने लेखात वापर केल्याने, तो मराठीकरणाचा अट्टहास होतोच असे नाही. लेखकाच्या दृष्टीने ते आर्जवही असू शकते. लेखाचा ओघ, रसपरिपोष आणि मराठी शब्द इत्यादींचा विचार करून लिहितांना अनुमानाने शब्द योजावे लागतात. हा व्यक्तीसापेक्ष भाग आहे.

५. इंग्रजी ही एक चांगली भाषा आहे. मराठीचे आर्जव म्हणजे इंग्रजीचा विरोध असे व्यक्तीशः मला वाटत नाही. प्रत्येक भाषा ही अभिव्यक्तीचे साधन असते. त्याचप्रमाणे विचार करण्याच्या प्रक्रियेवरही तीचा परिणाम होत असतो. इंग्रजीत विचार करतांना विचारांच्या शृंखलेतील प्रत्येक विचार सुटा येतो तर मराठीत विचार करतांना नदीचे पात्र बदलत जावे तशी विचारांची वळणे येतात. (हा भाग सिद्धांतरूपात मांडण्यासाठी अनेक दशके सहज लागतील). मात्र, विचार करण्याच्या प्रक्रियेसाठी दोन्ही आवश्यक आहेत आणि त्यांच्या मूळ साच्यांमध्ये त्या दोन्ही टिकणे हे इष्ट आहे. भाषा प्रवाही असली तरी तिचा मूळ साचा फारसा बदलत नाही. नवीन शब्दांच्या बाबतीत इंग्रजी अधिक प्रवाही आहे कारण त्यात बोलीतील शब्दांवर नजर ठेवणारी आणि वेळोवेळी ते शब्दकोषात नेणारी जागरूक मंडळी आहेत. मात्र तिचा मूळ साचा कायम आहे. जसे, इंग्रजीत कर्ता-क्रियापद-कर्म हा नियम आहे तर मराठीत कर्ता-कर्म-क्रियापद हा नियम आहे. परंतू, इंग्रजी शब्दांच्या प्राधान्याने होणा-या वापराने मराठीचा साचा बदलतो की काय असे वाटते. उदाहरणार्थ, पेटंट हा शब्द मराठीत वापरतांना अनेकवचन पेटंटस् म्हणायचे की पेटंटे की नुसतेच पेटंट ठेवायचे हा प्रश्न उपस्थित होतो. ती अडचण शोधपत्र या मराठी शब्दात नाही.

६. तांत्रिक संज्ञांच्या बाबतीत इंग्रजी ही मराठीपेक्षा किमान दोनशे वर्षे पुढे आहे. उदाहरणार्थ, गणितातील अनेक उपशाखांचा विचार केला तर हजारो संज्ञांना मराठीत शब्दच नाहीत. त्यामुळे गणितातील किंवा भौतिकीतील एखादा लेख मराठीत आणायचा तर वाक्यातील नव्वद टक्के शब्द इंग्रजी आणि केवळ मराठीतील विभक्ती असा प्रकार होईल. मराठीत वाक्यागणिक नव्वद टक्के इंग्रजी शब्द होत असतील तर ते वाक्य मराठीत बोलायची गरजच न उरल्यामुळे संवादाचे साधन म्हणून मराठीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह होऊ शकते. हे प्रश्नचिन्ह काल्पनिक नाही. त्याची उदाहरणे अनेकदा रोजच्या व्यवहारात दिसतात. अर्थातच दुसरा पर्याय म्हणजे त्याला समर्पक अशा संज्ञा मराठीत निर्माण करणे हा होय.

लेखाची नोंद घेतल्याबद्दल आणि विचारप्रवर्तक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद!

स्नेहांकित,
शैलेश

पटला नाही.

शैलेशराव,

आपला खुलासा पटला नाही. आज इंग्रजी ही जागतिक ज्ञानभाषा आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे ज्ञानभाषेच्या संदर्भात जितकं मराठी भाषेचं योगदान आहे तितकंच तिचं अस्तित्व राहील.

'पेटंट' हा शब्द आणि पेटंटचा कायदा हा मुळात इंग्रजी माणसामुळे तुम्हाआम्हाला कळला. असे अनेक शब्द आणि संज्ञा आहेत की ज्या मुळात मराठी माणसाला इतर भाषिकांमुळे कळल्या. त्याचं मराठीकरण करून ते जगाला कळणार आहे का? आणि इव्हन मराठी माणसाला तरी त्याचा काय उपयोग आहे? उद्या जेव्हा एखादा वकिली शिकणारा मराठी मुलगा जेव्हा पेटंट विषयक कायदा शिकेल तेव्हा तो मराठीत शिकेल की इंग्रजीत? सांगा पाहू! मग त्या मराठी मुलाने पेटंटला सरळ पेटंट न म्हणता शोधपत्र म्हणण्यात काय अर्थ आहे? मराठी ही मातृभाषा आहे आणि तिचा मलाही अभिमान आहे, परंतु इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे मग तिचा आदर का नको? ज्या भाषेने आपल्याला ज्ञान दिलं, विशिष्ठ संज्ञा शिकवल्या, त्या भाषेतले शब्द मराठीत आणण्यात काय हशील आहे? ते ठराविक शब्द त्याच भाषेत वापरले तरच त्या भाषेचा सन्मान होईल!

असो, माझ्यापुरता हा विषय संपला.

आपला,
(ज्ञानभाषेला मातृभाषेइतकंच महत्व देणारा) तात्या.

छान पण....

शैलेशराव,
डॉ. रामन ह्यांची ओळख करून दिलीत ह्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! पण आम्हाला ते 'शोधपत्र' (पेटंट), "आचार्यपद"( डॉक्टरेट) हे शब्द काही रुचले नाहीत.आणि
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांवर ज्ञानदान आणि संशोधन अशा दुहेरी जबाबदा-या असतात. असतीलही पण हे विधान आम्हाला जरा जीव्हारी लागले,आम्ही जी काही दोनचार विद्यापीठं पाहिली आहेत.त्यातील प्रत्येक विभागात प्रत्येक पाच प्राध्यापकापैकी चार ज्ञानदान करत असतील आणि तीन ज्ञानदान आणि संशोधन करतात असा आमचा विश्वास आहे.तिथे संशोधन करना-यांना अधिकचे अनुदान मिळत असते,इथे यु.जी.सी.अनुदान देते पण किती थकवून घेते माहित आहेत का ? (आम्ही एक प्रकल्प सादर करत आहोत म्हणून त्या वेदना आम्हाला माहित आहेत) त्यामुळे इथे अधिक संशोधनाला वाव नसतो,पण एक परंपराच पडलेली आहे.आपल्याकडील ते वाईट आणि तीकडचे ते उत्तम म्हणायची तेव्हा आपण त्याला अपवाद असण्याचे काहीएक कारण नाही.

डॉ.दिलीप बिरुटे

स्वागत

बिरूटे सर,

आपले स्वागत असो! आपण चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे जोडले आहेत. त्यावर ऊहापोह करण्याआधी मला सगळ्यात चुकीच्या वाटणा-या मुद्याचे आधी खंडन करतो, :)

पण एक परंपराच पडलेली आहे.आपल्याकडील ते वाईट आणि तीकडचे ते उत्तम म्हणायची तेव्हा आपण त्याला अपवाद असण्याचे काहीएक कारण नाही.
ह्या विधानाचा रोख व्यक्तीगत आहे असे वाटते. व्यक्तीशः मी जे चांगले आहे त्याचे नक्कीच कौतुक करतो आणि जिथे वैगुण्य दिसेल तिथेच टिका करतो. माझ्या अनुदिनीवरचे लेख आणि आजवरचे माझे अभिप्राय पाहिल्यास आपल्याला याबद्दल खात्री पटेल. त्यामुळे आपल्या विधानातील माझ्या संबंधी वाक्य सपशेल चुकीचे आहे असे माझे नम्र मत आहे. असो.

पण आम्हाला ते 'शोधपत्र' (पेटंट), "आचार्यपद"( डॉक्टरेट) हे शब्द काही रुचले नाहीत.
हरकत नाही. वर दिलेल्या प्रतिसादात, 'या दोन्ही शब्दांना अजून चपखल प्रतीशब्द सुचवल्यास त्याचे स्वागतच आहे' असे मी म्हटलेच आहे. त्याचा पुनरूच्चार करतो.

आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांवर ज्ञानदान आणि संशोधन अशा दुहेरी जबाबदा-या असतात. असतीलही पण हे विधान आम्हाला जरा जीव्हारी लागले
भारतातील विद्यापीठात सद्यस्थितीत प्राध्यापकांवर संशोधन हा भाग सक्तीचा नाही नसाव्यात असे दिसते आणि त्याबद्दल मी इथल्या प्राध्यापकांना कुठेही दोष दिलेला नाही. त्याला शासनाची धोरणात्मक घोडचूक कारणीभूत आहे असे मला वाटते. कृपया गैरसमज नसावा.

आम्ही जी काही दोनचार विद्यापीठं पाहिली आहेत.त्यातील प्रत्येक विभागात प्रत्येक पाच प्राध्यापकापैकी चार ज्ञानदान करत असतील आणि तीन ज्ञानदान आणि संशोधन करतात असा आमचा विश्वास आहे.तिथे संशोधन करना-यांना अधिकचे अनुदान मिळत असते,इथे यु.जी.सी.अनुदान देते पण किती थकवून घेते माहित आहेत का ? (आम्ही एक प्रकल्प सादर करत आहोत म्हणून त्या वेदना आम्हाला माहित आहेत) त्यामुळे इथे अधिक संशोधनाला वाव नसतो
याबाबत अंशतः सहमत आहे. काही भाग मात्र पटला नाही. संशोधनात दोन भाग असतात - एक म्हणजे ज्ञानाच्या शाखेत नवे क्षितिज पादाक्रांत करणे, दुसरे आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे पादाक्रांत केलेल्या क्षितिजाबद्दल इतरांना तद्वविषयक तांत्रिक लेख लिहून माहिती देणे. जेव्हा गणिती किंवा वैज्ञानिक लेख लिहितात तेव्हा त्यासाठी पूर्वसुरींच्या वापरलेल्या संबंधित लेखांचा संदर्भ सूचीत उल्लेख करतात. हा उल्लेख हे संशोधनातील प्रमुख चलन आहे. जेव्हा एखाद्या लेखाचा संदर्भ म्हणून हजारो तांत्रिक लेखात उल्लेख होतो तेव्हा त्या मूळ लेखाच्या शास्त्रज्ञास नोबेल सारखे पारितोषिक मिळते. याच विचाराने संदर्भ सूचींच्या दृष्टीने देशनिहाय लेखांच्या संख्यांसाठी साईटसीयर येथे शोध घेतला. त्याचे आकडे खालीलप्रमाणे आले.

भारत -- ४७६९ संदर्भ
सिंगापोर -- ४१३४ संदर्भ
चीन -- ६४१९ संदर्भ
अमेरिका -- १००००+ संदर्भ
जपान -- १००००+ संदर्भ
बेल्जियम -- ९२६२ संदर्भ

आकड्यांप्रमाणे सिंगापोरसारखा पिटुकला देशही आपल्या जवळ आहे. चीन पुढे आहे. अमेरिका आणि जपानची तर तुलनाही करायला नको. परंतू, बेल्जियम सारखा इटुकला देशही आपल्या कितीतरी पुढे आहे. ह्या विश्लेषणावरून कोणत्याही त्रयस्थाच्या मनात येथील संशोधनाबद्दल शंका उत्पन्न होणे साहजिकच आहे. आपल्या देशात अनेक प्रज्ञावंत मंडळी असतांना आपण या बाबतीत चिल्ल्यापिल्ल्या देशांच्याही मागे आहोत ही गोष्ट हृदयाला टोचणार नाही का? प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारे रामन महोदयांचे उदाहरण वरील लेखात आलेले आहेच. त्याशिवाय गणितात अजून एक उदाहरण देतो. ग्रीगोरी पेरेलमन या रशियातील गणितीने इसवी सन २००३ साली गणितातील सुप्रसिद्ध पॉईनकेयरची समस्या सोडवली. जगभरातील गणितींनी इसवी सन १९०४ पासून ही समस्या सोडवायचे प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांना गणितातील सर्वोच्च पारितोषिक देण्याचे जाहीर झाले. त्याचे दुवे -
१. http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/5274040.stm
२. http://www.sciencemag.org/cgi/content/full/314/5807/1848
त्या समस्येवर प्रकाशित केलेल्या गणिती एका लेखामध्ये पेरेलमन यांनी लिहिलेले इंग्रजी वाक्य जसेच्या तसे उद्धृत करतो - "I was partially supported by personal savings accumulated during my visits to the Courant Institute in the Fall of 1992, to the SUNY at Stony Brook in the Spring of 1993, and to the UC at Berkeley as a Miller Fellow in 1993-95" (संदर्भ - arXiv:math.DG/0211159 v1 11 Nov 2002). हे उदाहरण, गेल्या काही वर्षात महागाईने कंबर मोडलेल्या, रशियातून आलेले आहे.

आपल्या येथेही अशी उदाहरणे निश्चित असतील. ती सगळ्यांच्या पुढे येणे आवश्यक आहे. हेच लेखाचे मूळ प्रयोजन होते.

जय भारत!

स्नेहांकित,
शैलेश

वा शैलेशराव ! वा !

शैलेशराव,
आमच्या ,विधानाचा रोख व्यक्तीगत आहे,असे आपणास वाटत असेल. पण तसे ते नाही असे आम्हाला वाटते.ते एक सामान्य विधान होते. असो,आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाने आमच्या मनात कोणतेच प्रश्न शिल्लक ठेवले नाहीत.राहिले तरी ते विचारण्याचे धाडस आता आमच्यात राहिलेले नाही,तरिही ह्याचा अर्थ असा नाही की आपण जे सांगितले ते अंतिम आहे.आम्ही या बद्दल माहिती गोळा करत आहोत,काही भारतीय संशोधक इथे मिळणार्‍या अपूर्‍या सुविधांमुळे इतर देशात जातात. तिथे संशोधन पूर्ण करतात आणि मग तिकडे त्यांना नोबेल मिळते किंवा त्यांच्या शोधांना मान्यता मिळते.असे आम्ही वाचून आहोत.तसा दुवा मिळाल्यास आम्ही तो इथे नक्की देऊ.तो पर्यंत लोभ आहेच तो वाढवावा !

अवांतर :- अजुनही पाऊस पडतो आहे की काय पुण्यात,बाहेर पडता न आल्यामुळे माहिती देतांना कोणतीच कसर राहीली नाही म्हणून् विचारतोय ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म

या मनुष्याबद्दल माहिती वाचून बरे वाटले.

लेख आवडला

प्रज्ञाचक्षु डॉ. रामन् यांचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी अधिक तपशीलवार लिहावे, वाचण्याची उत्सुकता आहे.
- दिगम्भा

परिचय वेगळेपणाचा.

आजकाल होते काय की हे सुब्रमण्यम, चंद्रशेखर, मणी, भास्करन् इ.इ. नावाचे लोक तिकडे अमेरिकेत वगैरे जाऊन पारितोषिके मिळवतात आणि इकडे आपण फक्त त्यांच्या भारतीय मूलाची टिमकी वाजवत बसतो. त्यामुळे अशा बातम्या आता लक्ष वेधून घेत नाहीत.

डॉ. टी. व्ही. रामन यांचा हा परिचय शैलेशरावांनी करून दिला हे बरे झाले. नाहीतर निदान मी तरी या बातमीबद्दल आणि रामन यांच्या अपंगत्वावर मात करून मिळवलेल्या यशाबद्दल अनभिज्ञ राहिलो असतो. हे यश फक्त भारतीय म्हणूनच काय पण एक मानव म्हणूनही अलौकिक आहे.

उत्कृष्ट लेख

शैलेशराव, डॉ. रमन आणि त्यांच्या भगीरथप्रयत्नांचा परिचय करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद! अश्याच आणखी व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्या कार्याची माहिती वाचण्याची उत्सुकता आहे.
आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

सुंदर लेख

सुंदर आहे.

- योगेश

व्हीजन्

एका एनासएस च्या कर्यक्रमात गेलो होतो. पुण्यालल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात्. तीनेक वर्षांपुर्वी .
तिथे कॉलेज च्या वर्षात् अंधत्व आलेल्या तरूणाने संगंणक क्षेत्रात उडी घेतली होती. त्याच्या भाषणात त्याने सुरवात करताना." I got the vision, when i became blind " असे म्हटले. मला अंगावर शहाराच् आला. त्याचे शब्द छत भेदून गेले.त्या तरूणाने सुंदर भाषण केले, त्याच नाव लक्षात नाही,
प्रकाश घाटपांडे

आभार

जगन्नाथ, युयुत्सु, प्रमोदकाका, यनावाला, तात्या, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, शशांक, अनु, दिगम्भा, विसुनाना, वासुदेव, आजानुकर्ण, प्रकाश घाटपांडे,

आपल्या सर्वांच्या अभिप्रायांसाठी मनःपूर्वक आभार!

स्नेहांकित,
शैलेश

आनंदाचे अश्रू...

... डोळ्यात आणणार्‍या ह्या माणसाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

शैलेश - बरेच दिवस आपण लिहिलेले वाचले नव्हते. ती कसर छान भरून काढलीत.
दिलेल्या दुव्यातील लेखही आवडला - रुबिक, काड्यांचे कोडे सोडविण्याचे सूत्र, झोम हे सारे सारे सुंदरच!!

जाता जाता - शोधपत्र आणि आचार्य अगदी सहजपणे आले आहे. लिहिते राहा.

(गुरुभक्त) एकलव्य

सुरेख लेख

लेख उशीरा वाचला म्हणून उशीरा प्रतिसाद परंतु मनाला भिडला. वेगळ्या लोकांचे कौतुक वाटते. या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. असेच आणखी परिचय येऊ दे.

 
^ वर