बौद्ध साहित्यातील नावे!

मिलिंद, राहुल अशी दोनतीन नावे भारतात बुद्धधर्माचा सर्वत्र प्रसार होता तेव्हापासून प्रचारात आलेली आहेत, हे आपल्याला माहित असते. पण आणखी कितीतरी ओळखीच्या शब्दांचा व नावांचा उगम बौद्ध साहित्यात आहे ह्याची कित्येकदा कल्पना नसते. उदाहरणार्थ "माध्यमिक", किंवा "प्रासंगिक", किंवा चक्क "सर्वधर्मसमभाव" . . . हे बुद्धप्रणीत तत्त्वज्ञानातले पारिभाषिक शब्द असावेत ह्याचा मला अगदी अलीकडे वास लागला. तर ज्यांना असे शब्द व नावे माहित असतील त्यांनी ते इथे टाकावेत. मला खूप उत्सुकता आहे.
हा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न पडला असेल तर ही पुढची "प्रस्तावना" वाचा. भारत ही बुद्धाची भूमी आहे. पण आपण हे विसरलो, असं मला वाटायला लागलं आहे. आपण शंकर, मध्व, रामानुज ही नावं ऐकलेली असतात. गोरखनाथ, गहिनीनाथ ही अर्थातच ऐकलेली असतात. कबीर, नानक ही तर नक्कीच असतात. पण सहसा दिङ्नाग, वसुबन्धु, चंद्रकीर्ति ही ऐकलेली नसतात. आणि खरोखरच साक्षात् बुद्धाने तरी काय विशेष सांगितलं, तर खरं बोला, चोरी करू नका आणि मनातल्या वासना निपटून टाका, असं थातुरमातुर काहीतरी सांगितलं, असंच आपण धरून चालतो. हे मी बघितलेलं सांगतो आहे. तसं नसेल तर सांगा, मी ऐकायला तयार आहे. पण स्पष्टच बोलायचं तर "बौद्ध" म्हटल्यावर ह्या विषयावर टवाळक्या करणारेच लोक आम्ही वर्षानुवर्षे बघितले. (ते तसं का करतात हे सगळ्यांना माहित आहे, तो विषय इथे नको.)

तर हे काही बरोबर नाही. आपल्याला ह्या परंपरेची जास्त माहिती झाली पाहिजे. हेही एक "दर्शन" आहे, त्याची झळाळी जगभर पसरलेली आहे, त्याचा प्रचंड ग्रंथसंभार आहे, आणि त्याचा अभ्यास करता यावा म्हणून गेली हजार-बाराशे वर्षं तिबेटपासून जपानपर्यंत लोक संस्कृत शिकत आहेत. मुख्य म्हणजे हे आपलंच आहे. तर आपल्याला त्याची ओळख असायला हवी. हे माझं मत. म्हणून साध्या रीतीने का होईना पण कुठून तरी सुरुवात करावी म्हणून फक्त शब्द आणि नावं, अशी कल्पना मला सुचली. नुसती यादी करून ठेवून द्यायची असा त्यामागचा उद्देश नाही . . .

Comments

वा

आपले म्हणणे पटले. दिङ्नागाचे नाव वाचून थोडे आश्चर्य वाटले. त्याने भाषा किंवा शब्दांचे अर्थ अशा भाषेशी संबंधित गोष्टीवर लेखन केले आहे, असे ऐकले आहे.
राधिका

दिङ्नाग

आपले म्हणणे पटले. दिङ्नागाचे नाव वाचून थोडे आश्चर्य वाटले. त्याने भाषा किंवा शब्दांचे अर्थ अशा भाषेशी संबंधित गोष्टीवर लेखन केले आहे, असे ऐकले आहे.

मला तरी कुठे माहित होतं? पण दिङ्नाग हा बौद्धमताचा महान दार्शनिक मानला जातो. भाषेवर चर्चा करण्याचे कारण असे की भाषेच्या योगाने माणसानेच जगात वैचित्र्य निर्माण केले, आणि खरे या जगात तसे काही नाही (किंवा मर्ढेकरांच्या शब्दांत, संज्ञेचे "दळण" फक्त आहे), असा थोडाफार त्याचा सिद्धांत आहे. मला तितकसं कळत नाही, चुकलं असेल . . .

हम्म!

स्पष्टच बोलायचं तर "बौद्ध" म्हटल्यावर ह्या विषयावर टवाळक्या करणारेच लोक आम्ही वर्षानुवर्षे बघितले. (ते तसं का करतात हे सगळ्यांना माहित आहे, तो विषय इथे नको.)

हेच तर सर्वात महत्त्वाचे वाक्य आहे. वेगळ्या शब्दांत मांडायचे झाले तर अधिकारी लोकांना जे मान्य नसते (समाज परंपरा/ रुढी/ कर्मठपणा/ भीती इ. मुळे) किंवा ज्यावर आक्षेप असतो किंवा जी गोष्ट डावलण्याची मुभा असते तेथे त्यांच्या नावडीच्या/ बिनमतलबाच्या गोष्टी लपवल्या जातात किंवा मागे टाकल्या जातात.

हीच गोष्ट हिंदू धर्मालाही लागू आहेच. सीता, वैदेही, मैथिली, सुभद्रा ही नावे आढळतात तसे द्रौपदी, कुंती ही नावे आढळत नाहीत असे वाटते. (यांत मजेची गोष्ट म्हणजे पांचाली आणि कृष्णा ही नावे सर्रास आढळतात.)

त्याचा प्रचंड ग्रंथसंभार आहे, आणि त्याचा अभ्यास करता यावा म्हणून गेली हजार-बाराशे वर्षं तिबेटपासून जपानपर्यंत लोक संस्कृत शिकत आहेत.

संस्कृत?? बौद्धसाहित्य संस्कृतात आहे?

असो. मला सिद्धार्थ, आम्रपाली अशी नावेही आवडतात.

संस्कृत?? बौद्धसाहित्य संस्कृतात आहे?

होय!

किंबहुना जगातील पहिले छापील पुस्तक हे बौद्धधर्मीयांच्या संस्कृत ग्रंथाचे चायनीज भाषांतर होते असा उल्लेख आहे. हवे असल्यास दुवे शोधून नंतर पुरवितो.

मिळालं!!!

या माहितीबद्दल धन्यवाद, मला फारशी कल्पना नव्हती. शोधल्यावर मिळालं.

येथे अधिक वाचता येईल.

जगातील पहिले छापील पुस्तक

किंबहुना जगातील पहिले छापील पुस्तक हे बौद्धधर्मीयांच्या संस्कृत ग्रंथाचे चायनीज भाषांतर होते असा उल्लेख आहे. हवे असल्यास दुवे शोधून नंतर पुरवितो.

ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. तर आपल्याला काही माहितच नाही. अरे ह्यूएन त्संग वगैरे लोक भारतात का आले ह्याचा सुद्धा मला पत्ता नव्हता. पण सूत्रांचे चीनी भाषांतर करणा-यांत कुमारजीवानंतर ह्यूएन त्संगचेच नाव घेतले जाते. तो काय प्रवासवर्णन लिहायला आलेला नव्हता.

हम्म!

(यांत मजेची गोष्ट म्हणजे पांचाली आणि कृष्णा ही नावे सर्रास आढळतात.)

पांचाली ही मुळातली एक वेगळीच द्रविडी देवता आहे, असा संशोधकांना सुगावा लागला आहे. मला जास्त माहिती नाही.

द्रौपदी हे नाव आढळत नाही हे मात्र मला पटत नाही. तिची "धुर्पदी" झाली तरी ती द्रौपदीच ...

संस्कृत?? बौद्धसाहित्य संस्कृतात आहे?

सुरवातीचं पाली त्रिपिटक सोडलं तर सगळं संस्कृतातच ... नाहीतर वादविवाद कसा करणार?

प्रश्न..

पांचाली ही मुळातली एक वेगळीच द्रविडी देवता आहे, असा संशोधकांना सुगावा लागला आहे.

दुवे मिळाले तर द्याच. मी ही शोधते.

तिची "धुर्पदी" झाली तरी ती द्रौपदीच

हे नाव कोणत्या प्रांतात लावतात? मराठी भाषकांत ऐकल्याचे आठवत नाही. चू. भू. द्या. घ्या.

... नाहीतर वादविवाद कसा करणार?

म्हणजे? सविस्तर समजावणे शक्य आहे का? बौद्ध साहित्य संस्कृतात का लिहिले गेले?

द्रौपदी व संस्कृत

महाराष्ट्रात खेड्यात द्रौपदी, द्रुपदा, धुर्पदा ही नावे पुष्कळ प्रचलित आहेत. 'श्यामची आई'मध्येही वाचल्यासारखे वाटते.
ग्रंथ संस्कृतमध्ये कारण संस्कृत ही ज्ञानभाषा. भारतातील अनेकानेक प्रांतांतील अनेकानेक भाषांमध्ये ग्रंथ लिहिण्यापेक्षा संस्कृतात लिहिले तर ते सगळीकडे वाचले जातील, विद्वांनाच्या सभेत चर्चिले जातील, म्हणून असावे असा तर्क.

धन्यवाद.

महाराष्ट्रात खेड्यात द्रौपदी, द्रुपदा, धुर्पदा ही नावे पुष्कळ प्रचलित आहेत. 'श्यामची आई'मध्येही वाचल्यासारखे वाटते.

समाजाला जे मान्य नाही ते अधिकारी लोक लपवण्याचा प्रयत्न करतात असेच म्हणावेसे वाटले. शहरात, स्वतःला उच्चभ्रू समजणार्‍या समाजात मी ही नावे सर्रास पाहिलेली नाहीत. (नसतीलच असे नाही परंतु अभावाने आढळतात असे वाटते.)

ग्रंथ संस्कृतमध्ये कारण संस्कृत ही ज्ञानभाषा. भारतातील अनेकानेक प्रांतांतील अनेकानेक भाषांमध्ये ग्रंथ लिहिण्यापेक्षा संस्कृतात लिहिले तर ते सगळीकडे वाचले जातील, विद्वांनाच्या सभेत चर्चिले जातील, म्हणून असावे असा तर्क

यावर विचार केला असता माझाही तर्क असाच चालला. धन्यवाद.

ग्रंथ संस्कृतमध्ये . . .

ग्रंथ संस्कृतमध्ये कारण संस्कृत ही ज्ञानभाषा. भारतातील अनेकानेक प्रांतांतील अनेकानेक भाषांमध्ये ग्रंथ लिहिण्यापेक्षा संस्कृतात लिहिले तर ते सगळीकडे वाचले जातील, विद्वांनाच्या सभेत चर्चिले जातील, म्हणून असावे असा तर्क

यावर विचार केला असता माझाही तर्क असाच चालला. धन्यवाद.

हे मला आधी दिसलं नाही हां!

माझ्या म्हणण्याचा अर्थ जवळपास हाच होता. संस्कृत भाषा नसेल तर केरळातला माणूस काशीला जाऊन कोणाशी कसा वाद घालणार? कारण तिथे "क्वेट्ट्यापासून रंगूनपर्यंत"चे लोक. हे एक. दुसरं म्हणजे तात्त्विक चर्चा असेल तर त्याला रोजची भाषा चालणार नाही, कारण तिच्यात परिभाषाच जास्त. त्या काळात ती सोयीची झाली असणार, एवढंच माझं म्हणणं. नंतर ते वाद शुष्क झाले आणि संस्कृतची आडकाठी व्हायला लागली, आणि प्राकृत भाषांमध्ये संतसाहित्याने क्रांती केली, हा सुद्धा माहितीतला इतिहास आहे. खरं तर अजूनही संस्कृतप्रचुर भाषा असली की लोक जास्त सीरीयसली ऐकतात. ते एक त्रांगडं आहे.

(अमेरिकेसारख्या देशात सुद्धा हेच. विशिष्ट प्रकारची इंग्रजी वापरली की लोक ऐकतात, कामं लवकर होतात, हा अनुभव आहे. इथे सगळं "मेरिट" वर चालतं, हे बोलायला फक्त.)

नाही तेवढेच नाही.

दुसरं म्हणजे तात्त्विक चर्चा असेल तर त्याला रोजची भाषा चालणार नाही, कारण तिच्यात परिभाषाच जास्त. त्या काळात ती सोयीची झाली असणार, एवढंच माझं म्हणणं.

हे एवढंच नाही. एकदम जाहिर लिहावे की नाही या संभ्रमात मी आहे परंतु क्षत्रियांनी मोठ्याप्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारून वैदिक धर्माला शह दिला असे अनेक ठिकाणी वाचले आहे. यामागे वैदिक धर्माचे वर्चस्व झुगारून देणे हा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणून मला प्रश्न पडला की साहित्य संस्कृतात का? परंतु थोडा विचार केल्यावर कळले की ज्यांना शह द्यायचा होता ते जर विद्वान असतील तर त्यांना त्यांच्या भाषेत शह देणे उत्तम.

दुसरे म्हणजे मध्यंतरी पुश्यमित्र शुङगाचा विषय निघाला होता, या राजाबद्दल वाचले आणि बौद्ध साहित्यातील अशोकचरित्रे वाचली तर बौद्ध धर्माची वाटचाल शाब्दीक/ साहित्यिक अहिंसेच्या वाटेने झाली होती की काय असा प्रश्न पडतो.

बाकी, खोलात लिहावे की नाही या संभ्रमात.
असो. चू. भू. दे. घे.

मग?

क्षत्रियांनी मोठ्याप्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारून वैदिक धर्माला शह दिला असे अनेक ठिकाणी वाचले आहे. यामागे वैदिक धर्माचे वर्चस्व झुगारून देणे हा एक महत्त्वाचा भाग होता.

म्हणजे पौरोहित्य (?) राजांच्याही जास्त ताकदवान झाले होते का?
जर ते तसे ताकदवान आणी राजालाही अंकित करुन घेवू शकत होते, तर मग राजांनी अशी धर्मच बदलण्याची हिम्मत कशी काय केली?
की या उलट राजांना बुद्धाचे तत्व पटले व ते बौद्ध होत गेले. 'सत्तेच्या सोबत राहणे फायद्याचे' म्हणून ब्राह्मणही त्यात सामील झाले?

आपला
गुंड्या

अधिक माहिती गोळा करून पाहा.

म्हणजे पौरोहित्य (?) राजांच्याही जास्त ताकदवान झाले होते का?

हो असे माझे स्पष्ट मत आहे. त्यानंतर बौद्ध भिक्षूंचे शिरकाण करून पुन्हा अतिशय कर्मठ हिंदू धर्माला चालना मिळाली.

जर ते तसे ताकदवान आणी राजालाही अंकित करुन घेवू शकत होते, तर मग राजांनी अशी धर्मच बदलण्याची हिम्मत कशी काय केली?

अंकित नाही परंतु पीडत नक्कीच होते. आजही आई-वडिलांचा त्रास व्हायला लागला की मुले घरे बदलतात म्हणे. ;-) (शिवाजीराजांना साधे निर्णय देण्यास किंवा घेण्यास किती झगडावे लागले होते त्याची आठवण करा.)

उलट राजांना बुद्धाचे तत्व पटले व ते बौद्ध होत गेले. 'सत्तेच्या सोबत राहणे फायद्याचे' म्हणून ब्राह्मणही त्यात सामील झाले?

सुखासुखी धर्म बदलत गेले असे किती समाज आहेत? ते ही आपल्या हातातील सत्ता सोडून भणंग होणारे? असते तर दिन-ए-इलाही देखील अस्तित्त्वात असता.
असो.

एका मजेशीर अनुदिनीमुळे लोकसत्तेतील हा लेख वाचायला मिळाला होता, तो लोकांनी संदर्भासाठी वाचावा म्हणून खास साठवून ठेवला होता. हा त्यातील एक भाग आहे, अधिक संदर्भ सध्या मी ही शोधते आणि इथे देईन तुम्हालाही शोधून इतर अनेक संदर्भही मिळतील, परंतु हा विषय येथेच संपवावा.

अवांतरः

लोकसत्तेतील लोकमुद्रा हे सदर वाचनीय असते.

इतरांना शिव्याशाप द्यायला तुम्हाला आवडतात असले फालतू आरोप काही लोक करण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा अपरिपक्व मानसिकतेच्या समोर हे विषय मांडणे अयोग्य वाटते म्हणून अशा मंचावर न बोलणे उत्तम.

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो . . .

ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय इतकं साधंसोपं ते नसावं. गीता "क्षत्रियांची" आहे असंही म्हणता येईल, मग ती वैदिक धर्माला शह देण्यासाठी उत्पन्न झाली का? बुद्ध क्षत्रिय कुळातला होता हे महत्त्वाचे नसून त्याने क्षत्रियवृत्ती सोडली हे महत्त्वाचे आहे. आणि त्याचे सुरुवातीचे अनुयायी ब्राह्मणच होते. म्हणजे आपण ताकदवान कसे होऊ हा त्यामागे विचार नक्कीच नाही. त्यांच्या मते जुना धर्म काम देईनासा झाला होता. मनात ज्या नवीन शंका उत्पन्न झाल्या होत्या त्यांचे समाधान होत नव्हते. ते बुद्धाच्या प्रवचनांनी झाले. पुढे तो धर्म लुप्त झाला ह्याला कारण ब्राह्मणांचा कर्मठपणा, हेही बरोबर वाटत नाही. भारतात बुद्धधर्माला अवकळा आली ही वस्तुस्थिती आहे. तंत्र आणि वामाचार ह्यांचा सुळसुळाट झाला की लोकांनाच त्याबद्दल सहानुभूती वाटेनाशी होते. काळाच्या ओघात सर्व नाहीसे होते हे तर बुद्धानेच सांगितले आहे. पाचशे वर्षांत आपला धर्म संपणार असे त्याचे भविष्य होते.

"उच्चभ्रू" नावे

समाजाला जे मान्य नाही ते अधिकारी लोक लपवण्याचा प्रयत्न करतात असेच म्हणावेसे वाटले. शहरात, स्वतःला उच्चभ्रू समजणार्‍या समाजात मी ही नावे सर्रास पाहिलेली नाहीत. (नसतीलच असे नाही परंतु अभावाने आढळतात असे वाटते.)

कबूल आहे.

खरं तर धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ह्यांपैकी एकही नाव ह्या उच्चभ्रूंमध्ये नाही! शंतनु मात्र चालतो.

प्रकाटाआ

...

भीमसेन जोशी, अर्जुन सिंग,

अनेक भीमार्जुन तरी माहित आहेत. बाकी पांडव कमी दिसतात. पण त्याचा "उच्चभ्रू" असण्या नसण्याचा फारसा संबंध असावा असे वाटत नाही.

धूरपदाबाई,आणि अट्ठकथा .

द्रौपदी, द्रुपदा, धुर्पदा ,आणि धुरपदाबाई असे नावात बदल झालेले आहेत.धूरपदाबाई ही नावे अनेक ग्रामिण स्रियांची असतात.(आता त्याचा दुवा कसा द्यावा असा माझ्यासमोर प्रश्न आहे)आणि बौद्ध साहित्यातील नावाबद्दल, " नामसिध्दि जातकामधे पापक नावाचा शिष्य आपल्या आचार्यांना सांगतो,नाव केवळ आवाज देण्यासाठी असते नावाने कुठलीच सिध्दि प्राप्त होत नाही,माझे जे नाव आहे तेच कायम राहावे" असे जरी तो म्हणत असला तरी, बुद्धघोष;जातक अट्ठकथा भाग ४ ;पृ.३५ वर अनेक नावे आहेत,असे म्हणतात,ती नावे कोणती, ते काही आम्ही वाचलेले नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रश्न..

पांचाली ही मुळातली एक वेगळीच द्रविडी देवता आहे, असा संशोधकांना सुगावा लागला आहे.

दुवे मिळाले तर द्याच. मी ही शोधते.

हे एक बघा. आता वाचल्यावर वाटते की द्रौपदी मुळात वेगळी होती असे लेखकाला म्हणायचे नाही, तर तिचे निमित्त करून इतर लोकदेवतांचा समन्वय केला गेला असे म्हणायचे अाहे.

तिची "धुर्पदी" झाली तरी ती द्रौपदीच

हे नाव कोणत्या प्रांतात लावतात? मराठी भाषकांत ऐकल्याचे आठवत नाही. चू. भू. द्या. घ्या.

धुर्पदी हा एक विनोद म्हणून द्या सोडून. पण कोकणात तरी द्रौपदी नाव आहे बुवा.

प्रकाटाआ

...

 
^ वर