छोट्यांची पंचायत

आपल्या समाजात गरीब, अनाथ अशा बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना मूलभूत गरजांपासूनही दूर राहावे लागते, शिवाय सुरक्षेचा प्रश्‍नही असतोच. अशा परिस्थितीत जेव्हा मोठी माणसे मुलांना अपेक्षित मदत करू शकत नाहीत, तेव्हा लहान मुलेच आपली यंत्रणा उभी करतात. भारतभरातील छोट्या मुलांनी त्यासाठीच बाल ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे.

या बाल ग्रामपंचायतीत सरपंचांपासून अध्यक्षांपर्यंतची कामे छोटी छोटी मुलेच करत आहेत. या बालग्रामपंचायतीच्या एकूण बारा शाखा आहेत. अजयकुमार हा 12 वर्षांचा मुलगा या पंचायतीचा अध्यक्ष आहे, तर मिर्झापूरची रागिणी सरपंच आहे. ही छोट्या मुलांची संस्था समाजकंटकांविरुद्ध लढण्याचे काम करते आहे. जी मुले पैशांअभावी शाळेत जाण्यापासून वंचित आहेत, अशा मुलांना शिक्षण मिळावे म्हणून बाल ग्रामपंचायत काम करते.

ज्या मुलांना फसवले जाते, बालकामगार म्हणून ज्यांच्याकडून अघोरी कामे करून घेतली जातात, अशा मुलांच्या पाठीशी ही संघटना सदैव उभी असते. अजयकुमार हा बिहारमधील छोटा मुलगा. गावाला दारूमुक्त करण्याचे काम या छोट्या मुलाने केले. या चांगल्या कामासाठी अर्थातच या बालग्रामने गावातील ग्रामपंचायतीचीही मदत घेतली. बिहारच्या रामचंद्रनगरमधील घटनेने तर बालग्रामचे वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. इथेही या संघटनेची एक शाखा आहे.

हे गाव पाटण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. शाळा दूरवर असल्यामुळे या गावातील दलित मुले शाळेत जाऊ शकत नव्हती. इतक्‍या लांबवर जाऊन शिकणे परवडत नसल्याने ही मुले शाळेपासून वंचित होती. या गोष्टीचा स्थानिक प्रशासनाला ना खेद होता, ना खंत. बालग्रामच्या छोट्या कार्यकर्त्यांनी ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

गावातच या मुलांच्या शिक्षणाची सोय केली, तर ती नियमित शाळेत जाऊ शकतील, हे लक्षात आल्याने गावातच शाळेची इमारत बांधायची असे ठरले. त्यांनी गावातील सधन माणसांकडून वर्गणी गोळा केली, गावाच्या पंचायतीलाही मदत करण्याचे आवाहन केले आणि सर्वांच्या साह्याने या गावात शाळेची इमारत उभी राहिली, मुले शाळेत जाऊ लागली.

शाळेव्यतिरिक्त या गावातील मुलांची एक मोठी समस्या होती. घरात कुणीतरी दारू पिऊन आल्यामुळे त्याचा परिणाम अख्ख्या घरादारावर होत असे. लहान मुलांवर तर त्याचा अतिशय वाईट परिणाम होई. म्हणून बाल ग्रामपंचायतीने गावातील दारूची दुकाने बंद करण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात केली. त्यासाठी गावातील महिलांना गोळा केले, पोलिसांची मदत घेतली. शेवटी गावातील दारूची दुकाने बंद झाली. बालग्रामची एक शाखा राजस्थानमध्येही आहे.

ही शाखा छोट्या मुलींच्या सबलीकरणासाठी काम करते. या ग्रामपंचायतीने तर खूप चांगल्या कामांचा पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागात बहुतांशी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय नसते. त्यामुळे बालग्रामच्या छोट्या मुलींनी प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला. इतकेच नव्हे, तर बालविवाह, हुंडा, मुलींचे शिक्षण, आरोग्य या विषयांवर शाळेत जाणाऱ्या मुलींची चर्चा घडवून आणण्यासाठी किशोरी बाल मंडळाची स्थापना केली.

बालग्राम छोट्या मुलांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी काम करते, तसेच गावातील दारूबंदी, शाळांमध्ये स्वच्छतागृह, मुलांना शिक्षण मोफत मिळावे यासाठी प्रयत्नशील असते. या संघटनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींचे या मुलांना पाठबळ मिळतेच असे नाही; पण ही मुले गावातील शहाण्यासुरत्या मोठ्या माणसांचा सल्ला घेतात, त्यांची प्रत्येक चांगल्या कामात मदत घेतात.

बालग्रामच्या माध्यमातून छोट्या मुलांची छोट्यांनी उभारलेली चळवळ नक्कीच कौतुकास्पद आहे. असे प्रयोग गावागावांतील छोट्या मुलांनी केल्यास त्यातून नक्कीच आशादायी चित्र दिसेल.

Comments

हे पण बाल विहाराला जोडता येवू शकेल!

वा छान आहे हा उपक्रम.
(हे पण बाल विहाराला जोडता येवू शकेल!)
आपला
(बा.बु.)
गुंडोपंत

काही प्रश्न.

या बालग्रामपंचायतीच्या एकूण बारा शाखा आहेत.

या बारा शाखा भारतात कुठे कुठे आहेत याची माहिती मिळेल का?

अजयकुमार हा बिहारमधील छोटा मुलगा. गावाला दारूमुक्त करण्याचे काम या छोट्या मुलाने केले.

बिहारमधील कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावाला दारुमुक्त करण्याचे काम अजयकुमारने केले?

धन्यवाद,

तात्या.

उज्वल भारत

हे सर्व वाचून, भारताचे भविष्य उज्वल आहे याची खात्री पटत जाते. कदाचित बालविहार.कॉम चे सदस्य आणि या पंचायती नवे जगतिक नेते घडवतील :)





मराठीत लिहा. वापरा.

चांगली माहिती आणि आशादायक भविष्य!

शिल्पाजी अतिशय चांगली माहिती आपण इथे सादर केलीत ह्याबद्दल मनापासून आभार!
उद्याच्या भारताचे एका बलाढ्य भारतात रुपांतर करण्यास ही तरूण पिढी निश्चितच सक्षम आहे .
भारत आणि भारतीय जनतेचे भविष्य ह्या युवकांच्या हातात सुरक्षित आहे असेही वाटते.

हम्म!!

भारतभरातील छोट्या मुलांनी त्यासाठीच बाल ग्रामपंचायतीचा अनोखा प्रयोग सुरू केला आहे.

१०-१२ वर्षांची मुले स्वतःहून अशी संघटना उभारू शकतात यावर आश्चर्य वाटले. त्यांच्या मागे कोण आहे याचा उलगडा झाला नाही. बातमी वाचल्यावर अभिमानास्पद(?) वाटली परंतु वास्तविक वाटली नाही.

सुशिक्षित माणसेही घरातील मुलांना कितीदा आपल्या निर्णयांत सामील करतात याचा अनुभव सर्वांनाच असेल तर गावात दारूबंदी आणणे, शाळा बांधणे, मुलींचे सबलीकरण करणे इ. कामे १०-१२ वर्षांची मुले स्वतःहून करतात हे पचले नाही. प्रसंगी गावातील मोठ्यांची मदत इ. ठीक आहे परंतु ती मदत मिळवण्यासाठीही कोणीतरी मोठा सोबत असणे आवश्यक असते. मुलांचे कौतुक करताना मोठ्यांना विसरण्यात आले की काय असे वाटले.

फळणीकरांचे आपले घरही बरेचसे मुलांकडून चालवले जात असावे, ती ही आपल्या घराला हातभार लावत असतीलच ना... ती कितीही स्पृहणीय असली तरी फळणीकरांच्या उल्लेखाशिवाय बातमी छापून आली तर मात्र योग्य नाही. मुलांना याप्रकारे प्रेरीत करणार्‍या मोठ्यांचीही दखल घेणे गरजेचे होते.

या माहितीचे संदर्भ, तसेच ही माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचली किंवा आपला या कार्यात सहभाग आहे का हे जाणून घ्यायला आवडेल. (तसा अंदाज आला म्हणा! )

शोधा म्हणजे

शोधा म्हणजे सापडेल.

दुवे.

वरील हकिकत विश्वासार्ह वाटत नाही. या संबंधीचे दुवे दिल्यास बरे होईल असे वाटते. एखाद्या बातम्यांच्या वाहिनीवर अथवा प्रमुख वर्तमानपत्रातून या संबंधीची माहिती दिली गेल्याचे आठवत नाही.

चूभूद्याघ्या.

--ईश्वरी.

 
^ वर