विश्वचषकाचा ज्वर उतरला!

राम राम मंडळी,

काल आपल्याला लंकेने हरवले आणि तुम्हाआम्हा भारतीयांचा चेंडूफळीचा ज्वर काही दिवसांपुरता उतरला! विश्वचषकाचा सूर्योदय पाहण्याकरता आता चेंडूफळीवेड्या माझ्या मायभूला पुढील चार वर्षे तरी थांबावे लागेल!

आमचे सगळे रथी महारथी वीर आता हात हालवत परत येतील. नुसत्या गप्पा, मोठमोठ्या जाहिराती, आम्ही यांव करू, आम्ही त्यांव करू, 'वीरूबाबा' असे आहेत, नी 'दादा' तसे आहेत, नी सचिन तो सचिन! या सगळ्या गप्पा आता काही दिवस तरी बंद होतील! चपळ गुरुजी बहुधा आता आपल्या मायदेशी परत जातील.द्रविडकाकांची उचलबांगडी होऊन आमचा नवा म्होरक्या कोण, याबाबत यथावकाश विचारविनिमय सुरू होईल!

चालायचंच मंडळी! अहो अशी हिंमत हरू नका. अहो खेळ म्हटला की हारजीत ही व्ह्यायचीच!

पण कधीतरी (म्हणजे मोक्याच्या प्रसंगी!) आपली जीतही व्हावी असं वाटतं! ;)

आज पुढे ढललेल्या एका इपत्रातून मला एक चित्र मिळाले, ते इथे डकवीत आहे. चित्र टाईमपास आहे, छान आहे! ;)

आम्ही जातो आमच्या गावा! ;)

असो!

आपला,
तात्या वेंगसरकर!

Comments

भारत हरला...

विश्वचषक स्पर्धेतून भारत बाद झाला. तसं जर बांगलादेश हरला तर आपल्याला पुढे जाण्याची संधी आहे. पण बांगलादेश हरणार नाही हे नक्की. म्हणून आतापासूनच भारत हरला हे स्पष्ट झालयं! आता याला जबाबदार कोण असं म्हणाल तर सगळाच संघ आहे.

एक तर एकाहून एक म्हातारे जमवलेत. सचिन एकेकाळी चांगला खेळत होता. पण यंत्र पण २० वर्षानी थकते.... तो तर माणूस आहे. आणि त्याला नजर लागली आहे अशी हूल उठली त्यावेळी त्याच्या (मानस) आईने जाहिर सभेत त्याची नजर काढली. त्याच्या आईने कधी इतक्या जाहीरपणे त्याची नजर काढली होती का कधी? असो... तो त्यांचा प्रश्न आहे.

मि. डिपेंडेबल असणारा द्रविड ठरावासाठी नेहेमीच मार्गदर्शकावर अवलंबून असतो. आता ज्याला स्वतःचं मत नाही तो संघ काय कपाळ सांभाळणार?

गांगूली खेळतो आहे... पण संघामध्ये वापसी करण्यासाठीच. हे कळतं.... दिसून येतं.

आणि गोलंदाजी तर.... बोलूच नाही.... एकदम सुमार.... करो या मरो सामन्याच्या पहिल्या षटकात १० धावा!!!!???? हरे परमात्मने.... धन्य तो जहीर आणि धन्य ती टीम ईंडिया...

अपेक्षांचं ओझं घेउन आलेला संघ मैदानावर सराव करण्यापेक्षा छोट्या पडद्यावर जास्ती दिसून आली.... सांघीक खेळ होता.... प्रत्येकाचा हातभार लागणार होता.... जिंकला की सगळे आणि हरला की द्रविडची कप्तानी असं म्हणून चालू शकत नाही.... क्रिकेट पेक्षा आपल्या राष्ट्रीय खेळ हॉकीला आवडता खेळ म्हणावे की काय हा विचार करते आहे.

पल्लवी.

भारतीय क्रिकेटपटूंना धन्यवाद

भारतीय क्रिकेटपटूंनी सुमार खेळ करून ते सुपर ८ मध्ये न जाताच हात हलवत परत येणार आहेत याबद्दल त्यांना धन्यवाद! कारण त्या कारणामुळे माझ्यासारख्या अनेकांचा पुढील एक महिना वाचेल.कारण आता कोणीही जिंकले किंवा हरले तरीही फारसा फरक पडणार नाही.कोणी किती धावा काढल्या किंवा किती बळी मिळवले याचे सोयरसुतक नाही की डोक्याला अजिबात ताप नाही. व्यर्थ दवडला जाणारा वेळ आता सत्कारणी लागेल. तेव्हा 'टीम इंडिया', तुम्हाला शतशः धन्यवाद. असेच काहीतरी चांगले काम करा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)

नवीन संघ

बीसीसीआय टीमच्या पराभवानंतर संधी साधून आम्ही एसीसीआय संघाची घोषणा करीत आहोत.

कलमे:
१. बेटिंग व सामना निश्चिती ला फुल्लटाकी परवानगी.
२. जाहिराती व प्रॉडक्ट एन्डॉर्समेंट हा जोडधंदा करण्यास प्रोत्साहन.
३. संघाची भाषा मराठी व तमिळ राहील. संजय पोवार संघकप्तान. "क्रिश श्रीकांत माचा" व "सचिन तेंडूलकर" हे दोघे प्रशिक्षक.
४. सर्व सामने भारतातच खेळवले जातील.
५. तथाकथित मिनोज (Minnows) सोबतच सामने खेळवले जातील.
६. एसीसीआय च्या अध्यक्षपदी सोनिया गांधी राहतील. (बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शरद पवार असेपर्यंत)
७. एकही बिहारी खेळाडू संघात घेतला जाणार नाही. (राज ठाकरे झिंदाबाद)
८. एसीसीआयच्या वतीने आयसीसीच्या धर्तीवर आयबीसी ही नवीन आंतरराष्ट्रीय संस्था सुरू करण्यात येईल.

(क्रीडापती) योगेश

ठीकच..

बाबा भोलेनाथच्या कृपेने जे झाले ते ठीकच झाले. केवळ जाहिरातबाजी करणार्‍या भारतीय संघाला बाबा भोलेनाथने सुपर ८ मध्ये प्रवेश नाकारून योग्य तिच शिक्षा केली आहे.

बाबा भोलेनाथ आणि बाबा काशीविश्वेश्वर सर्व खेळाडूंना चांगली बुद्धी देवोत..

जय बाबा भोलेनाथ!

बाबा त्रिकाल

कलियुगाचा महिमा/अवांतर

रामनवमी काही दिवसांवर आली असताना लंकेच्या संघाकडून भारतीय संघाचा पराभव हा कलियुगाचा महिमा म्हणावा की काय?

अवांतर - मुळात अकरा (की सोळा अधिक प्रशिक्षक, व्यवस्थापक इ.) नाकर्त्या लोकांच्या पराभवाचा भार भारताने का वाहावा? भारताचा पराभव झाला म्हणण्याऐवजी भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला असे म्हटले पाहिजे का?

नाही

भारताचा पराभव झाला म्हणण्याऐवजी भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला असे म्हटले पाहिजे का?

नाही. कारण चुकुन संघ विजयी झाला असता तर तो 'भारता'चा विजय ठरला असता.

मुकलो

भारताचा संघ स्पर्धेबाहेर् जाण्याने आपण इतर चांगल्या संघांचे सामने आणि क्रिकेट याकडे दुर्लक्ष करत आहोत.

 
^ वर