दुहेरी अर्थाचे सुभाषित

कॉलेजात असताना राहुल सांकृत्यायन यांच्या संस्कृत वेच्यांच्या संग्रहात बिज्जका (म्हणजे विजया) ह्या कवयित्रीची एक कविता मी वाचली होती. नीट आठवत नाही, आणि विभक्तीप्रत्यय आणि "चालवणं" वगैरे रामो राजमणिः च्या पलिकडे येत नाही. तर उद्धृत करताना चुका होणारच, त्यांना हसू नका--

मेघैर्व्योम नवाम्बुभिर्वसुमतीं विद्युल्लताभिर्दिशोः
धाराभिर्गगनं वनानि कुटजैः पूरैर्व्ृताः निम्नगाः
एकां घातयितुं वियोगविधुरां दीनां वराकीं स्त्रियं
प्रावृट्काल हताश! वर्णय कृतं मिथ्या किमाडम्बरम्?

थोडक्यात म्हणजे पाऊस, विरही स्त्री, हा देशी कवितेतला "सीन". बांधणी सुंदर आहे. प्रश्नच नाही. पण एक दिवस विचार करता करता वेगळं जाणवायला लागलं. ह्या रचनेत काहीतरी गोम आहे असं वाटलं. बघा पटतं का ...

आधी भावार्थ: मेघांनी आकाश झाकले, पहिल्या पावसाने माती भिजली, विजांनी दिशा व्यापल्या ... अर्थ तसा सरळ आहे. पण पहिल्या दोन ओळींत ढग-आकाश, पाऊस-धरणी अशा जोड्या-जोड्याच एकामागून एक आल्या आहेत. शेवटी केवळ एका क्रियापदाने ("वृत") त्या सगळ्या बांधल्या गेल्या आहेत. ह्या अलंकाराला काहीतरी नाव असणारच, पण ते तेव्हढं महत्त्वाचं नाही. खरा प्रश्न असा की ह्या पार चोथा झालेल्या प्रतिमांची उतरंड कवयित्रीला का रचावीशी वाटली?

काहीच लिहून झालं नाही आणि "डेडलाईन" येऊन ठेपली आहे, तर पाट्या टाकून काहीतरी बिदागी मिळवायची, असल्या "प्रक्रिये"तून ही निर्मिती झाली का? असेल. पण ती इतक्या खालच्या दर्जाची वाटत नाही.

थोडा वेळ हे बाजूला ठेवून पुढच्या दोन ओळी पहा. त्यांचा सारांश काय, की अरे पावसा, एका दीनवाण्या विरहग्रस्त स्त्रीलाच छळायचं, तर एवढा उपद्व्याप का केलास?

ही भावकविता म्हणून चांगलीच झाली. पण तरी ही विरही अबल स्त्री सरळ बोलते आहे असं वाटत नाही ना? जरा पुढे जाऊन विचार केला की असं वाटतं, की पहिल्या दोन ओळींतल्या ठराविक संकेतांच्या भडिमाराला ती "आडम्बर" म्हणते आहे! नाहीतर "मिथ्या" ह्या शब्दाचे तरी प्रयोजन काय? मग लक्ष्यार्थाच्या मागून एक वक्रोक्तीचा पदर जाणवायला लागतो.

वाचून बघा. नवरा परगावी म्हणून झुरत जाणारी गरीब बिचारी बाई आणि "आडम्बर" करणारा पाऊस, आणि त्याच त्याच गोष्टींची रम्य वर्णने शतकानुशतके वृत्तांत ठोकून बसवणा-या (म्हणजेच "स्त्रीहृदय जाणणारे" वगैरे असतात त्या) पुरुष कवींनाच बाईंनी सणसणीत हाणली की नाही? म्हणजे विनोदबुद्धी बघा. इतका उपरोध बेमालूमपणे कवितेत सोडून देणारी काय हुशार बाई असेल ही!

बरं मग कवितेचा खरा अर्थ काय? अर्थ दोन्ही. एकसंधपणे अनेक अर्थ वाहता येणे ह्यातच कवीच्या जातीची अस्मिता साठली आहे ना. मला असं वाटतं की तिने राजसभेत ही कविता वाचली, आणि बहुतेक बावळट पुरुषांनी वाह, क्या बात है, वगैरे म्हटलेलं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर रात्री उशिरा कधीतरी दोघातिघांना त्याच्यातला ध्वनित अर्थ उमगला. तेव्हा ते अचानक गप्प झाले, आणि स्वतःशीच पुटपुटले ... she is cunning past man's thought ...

Comments

वा

छान लेख. प्रावृट्काल हताश! याचा अर्थ मात्र कळला नाही.

राधिका

दुहेरी अर्थाचे सुभाषित

छान लेख. प्रावृट्काल हताश! याचा अर्थ मात्र कळला नाही.

मला वाटतं त्याचा अर्थ "रे प्रावृट्काल, हताश, ...", म्हणजे "अरे हट्" असा असावा.

ओह्ह्

ते प्रावृट्+काल म्हणजे पावसाळा असे आहे का? मी ते आतापर्यंत प्रावृद् +काल असे वाचत होते, त्यामुळे अर्थ लागला नाही. (प्रावृट् आणि प्रावृष् असे दोन्ही शब्द शक्य आहेत ना? मला शब्दकोशात प्रावृट् सापडला नाही)
राधिका

प्रावृट्+काल

ते प्रावृट्+काल म्हणजे पावसाळा असे आहे का? मी ते आतापर्यंत प्रावृद् +काल असे वाचत होते, त्यामुळे अर्थ लागला नाही. (प्रावृट् आणि प्रावृष् असे दोन्ही शब्द शक्य आहेत ना? मला शब्दकोशात प्रावृट् सापडला नाही)

मोनियर विल्यम्स मध्ये सापडला . . . म्हणजे माझ्या घरच्या आवृत्तीत आहे. पुढे प्रावृट्काल हा शब्द पंचतंत्रात आणि "Var." म्हणून कशात तरी आहे असा उल्लेख आहे. Var. म्हणजे काय हे सूचीत कुठेही नाही.

वेबवरच्या आवृत्तीत शोधायला कठीण पडला पण ह्याच्यातली ४८वी नोंद पहा . . . तोच आहे असं वाटतं.

:ऑ

तुमच्याकडे मोनियेर विल्यम्स आहे???????? :ऑ
सही आहे.

राधिका

:ऑ

तुमच्याकडे मोनियेर विल्यम्स आहे???????? :ऑ
सही आहे.
राधिका

आहे म्हणजे? काल होता. आज एकजण घेऊन गेला आहे. १४०$ डिपॉझिट आणि १७.५% व्याजाने मी तो देत असतो.

:ड्

आहे म्हणजे? काल होता. आज एकजण घेऊन गेला आहे. १४०$ डिपॉझिट आणि १७.५% व्याजाने मी तो देत असतो.

:D चांगली कल्पना आहे. पण असे दुर्मिळ कोश जतन करायचे असतील तर असेच करावे लागते. मी आजवर एकदाच मोनियेर विल्यम्स कोश हाताळला आहे. आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शिरताना एक दालन लागते. त्या दालनात फक्त आणि फक्त शब्दकोश आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे. त्यातच मो.वि. सुद्धा विराजमान होते. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून संस्कृत- जर्मन शब्दकोशाचे ३ की ४ खंड उभे होते. पण ते उघडून वाचायला परवानगी लागत असल्याने त्यांना स्पर्श करण्याचे भाग्य कधी लाभले नाही. :(
राधिका

वा!

संस्कृत फारसे कळत नसले तरी तुमच्या विश्लेषणातून गर्भितार्थ समजल्यावर मजा वाटली.
आपला
(गभितार्थज्ञ) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

पु. शि. रेगे

यांची अशीच एक केवळ दोन ओळींची गूढ कविता आठवली :

अन् फिकट गुलाबी ढगा आडच्या,
खुणा मांडीवर तिच्या नभाच्या..

मला ही कविता चौदावीला होती. पण दुर्दैवाने ती उलगडून सांगणे आमच्या शिक्षकांना जमले नाही व ती आमच्यासाठी शेवटपर्यंत गूढच राहिली.

 
^ वर