वर्णमाला- उच्चारक्रिया

या भागात काही तांत्रिक संज्ञा इंग्रजी भाषेत लिहिल्या आहेत, या संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचे काम सुरू आहे. योग्य ते प्रतिशब्द सापडताच ते लेखात घातले जातील, तोवर हा इंग्रजीमिश्रित मराठी भाषेतला लेख गोड मानून घ्यावा ही विनंती! :)

आपण एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना नेमके काय होते? आपल्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. ही सर्व प्रक्रिया चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे भांडे बनवण्यासारखी वाटते मला. त्या मातीच्या गोळ्याला कसा हाताने वेगवेगळ्या ठिकाणी दाब देऊन आकार दिला जातो, हात जवळ ठेऊन दाब दिल्यास चिंचोळ्या मानेचे सुरईसदृश भांडे तयार होते, तेच वेगळ्या तर्‍हेने दाब दिल्यास बसके, पसरट भांडे बनते! उच्चाराचेही तसेच आहे. हवा तीच, पण पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जीभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो.

ही प्रक्रिया आणखी स्पष्ट होण्यासाठी आपण खालील चित्र पाहू.

vocal tract
vocal tract

या चित्रात आपल्याला vocal tract म्हणजे उच्चारक्रियेत जे जे अवयव भाग घेतात ते सर्व अवयव दिसत आहेत. या चित्रात दाखवले गेलेले सर्वच अवयव आपण मराठी बोलताना वापरत नाही. आपण वापरतो ते velum म्हणजे पडजीभ, palate म्हणजे टाळू, nasal cavity, lips म्हणजे ओठ, teeth म्हणजे दात, tip of the tongue म्हणजे जिभेचे टोक, body of the tongue म्हणजे जिभेचा मधला भाग, root of the tongue म्हणजे जिभेची मागची बाजू हे. pharynx, larynx इत्यादि अवयव तर वापरले जातातच. पण पडजीभेच्या मागचा भाग ज्याला uvula असे नाव दिले आहे (चित्रात हा भाग दाखवलेला नाही), तो भाग उर्दू भाषेतले काही वर्ण उच्चारण्यासाठी वापरला जातो. जसे- क़, ख़, ग़ वगैरे.

या सर्व अवयवांना articulators असे म्हणतात. आपण त्यांना उच्चारक म्हणू. वर उल्लेखिलेले उच्चारक वापरून आपण बरेच वेगवेगळे उच्चार करतो. एखादा उच्चार करण्यासाठी कोणते दोन उच्चारक वापरले आहेत, हे पाहून त्यानुसार आपण ५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

  • कण्ठ्य - पडजीभ व जीभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे वर्ण- जसे क्,ख्, ग्, घ्, ङ्
  • तालव्य - टाळू व जीभ यांचा एकमेकांशी स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण- जसे च्, छ्, ज्, झ्, ञ्, श्
  • मूर्धन्य - या प्रकारातही टाळू व जीभ यांचाच एकमेकांना स्पर्श होतो, पण वेगळ्या प्रकारे. तालव्याच्या वेळी आपली जीभ सरळ , समोरच्या दिशेला असते. तर मूर्धन्याच्या वेळी जीभ थोडी आतल्या बाजूच्या दिशेने वळवून घेतली जाते. जसे- ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, ष्
  • दन्त्य - दातांना जीभेचा स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण- जसे त्, थ्, द्, ध्, न्,स्
  • ओष्ठ्य - दोन्ही ओठ एकत्र येऊन त्यांचा स्पर्श झाल्यास निर्माण होणारे वर्ण- जसे प्, फ्, ब्, भ्, म्

uvula सारखाच आणखी एक उच्चारकही आपण वापरत नाही तो म्हणजे alveolar ridge. हा उच्चारक तोंडाच्या आतील बाजूस दातांच्या वर आहे.- त्याच्या व जीभेच्या टोकाच्या संयोगातून ट्, ठ्, ड्, ढ् हे इंग्रजी भाषेतले उच्चार निर्माण होतात. हे वर्ण आपल्या ट्, ठ्, ड्, ढ् हून वेगळे आहेत, कारण दोन्ही भाषांत वेगवेगळ्या अवयवांच्या संयोगातून ते निर्माण झाले आहेत. दोन्हीं वर्णगटांचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे उच्चार करून पाहिल्यास, त्यांतला फरक लक्षात येईल.

आता आपण पाहिलेली माहिती एका तक्त्यात मांडून आपण पाहू, म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे ते आपल्या लक्षात येईल.

क् ख् ग् घ् ङ् - कण्ठ्य
च् छ् ज् झ् ञ् श् तालव्य
ट् ठ् ड् ढ् ण् ष् मूर्धन्य
त् थ् द् ध् न् स् दन्त्य
प् फ् ब् भ् म् - ओष्ट्य

ज्यांना ही दन्त्य वगैरे 'प्रकरणे' पूर्वी माहित नव्हती, किंवा माहिती होती पण त्यांचा अर्थ माहिती नव्हता (म्हणजे माझ्यासारखे लोक) त्यांना आता आपल्या वर्णमालेत पहिल्या ५-५ व्यंजनांच्या गटांच्या वर्गीकरणामागचे कारण कळले असेल. आता यावरून पुढे असा प्रश्न पडतो, की जर स्, श्, ष् हे ही या ५ पैकी ३ गटांत समाविष्ट होतात, तर मग त्यांना पहिल्या २५ व्यंजनांच्या बरोबरीने का ठेवले नाही? या व इतर काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्यंजनांबद्दल अधिक माहिती देणार्‍या पुढच्या भागात मिळेल.

गेल्या वेळी 'श्' व 'ष्' यांत फरक काय असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. सर्व वाचकांनी वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे लक्षात येईल.

Comments

स्वरयंत्र

लॅरिंक्सला मराठीत स्वरयंत्र म्हटल्याचे वाचले आहे.

इंग्रजी टी चा उच्चार आपल्या ट हून वेगळा आहे हे एकदा लोकांना त, ट, थ वगैरे सांगताना कळले होते. कसा वेगळा ते आज कळले. लेख आवडला.

च आणि ज

जहाज मधील ज आणि जनता मधिल् ज तसेच चहा मधील च आणि चमचा मधिल च यांच्या उच्चारात फरक नोंदवायचा कसा?

प्रकाश घाटपांडे

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा सांगते, फरक नोंदवण्यासाठी दोन्ही वर्णांना आपल्याला वेगवेगळी अक्षरचिह्ने द्यावी लागतील. अक्षरचिह्ने हा या लेखमालेचा विषय नाही. दोन्ही वर्णांच्या उच्चारांमधील फरक पुढील लेखात.

राधिका

गीताई मधे ज़, च़ असे प्रयोग आहेत.

पुण्याचे पेशवे

उर्दू/ इंग्रजी

या भाषांत येणारे उच्चार कसे करायचे हे या लेखाने कळले आणि श, ष ही. धन्यवाद. आता जरा जीभ वळवून पाहते. :)

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

छान

लेख आवडला.

श हा केवळ तालव्य आहे की दन्ततालव्य? स प्रमाणे श चा उच्चार करतानाही दातांचा वापर होतो ना?
-----------------------------
ही सहीच् आहे, नाही? :)

उत्तरे

श हा केवळ तालव्य आहे की दन्ततालव्य?
तुला नेमके काय म्हणायचे आहे, ते कळले नाही. दन्ततालव्य म्हणजे जीभ दातांना स्पर्श करून मग टाळूला स्पर्श करायला जाते असे की दात व टाळू यांच्या मधल्या भागाला स्पर्श करते असे म्हणायचे आहे?

स प्रमाणे श चा उच्चार करतानाही दातांचा वापर होतो ना?
दातांचा वापर करून 'श्' सदृश उच्चार करता येतो हे खरे. परंतू तो दन्त्य 'श्' आपण मराठीत वापरत असलेल्या 'श्' सारखा नाही. 'श्' तालव्य आहे म्हणजे जीभ अगदी टाळूच्या मध्यभागी स्पर्श करत नसली तरी alveolar ridge च्या अलिकडेच स्पर्श करते. त्यामुळे त्याला तालव्यच म्हणायचे.

एकमेकांना लागून असलेल्या उच्चारकांशी जीभेचा स्पर्श झाला, तर काहीसे सारखे उच्चार उमटू शकतात आणि त्यामुळे थोडा गोंधळ उडू शकतो. जसा माझा उडाला होता. मी लेखात म्हटल्याप्रमाणे त्, थ्, द्, ध् ही व्यंजने दन्त्य आहेत. परंतू मी स्वतः ही व्यंजने alveolar ridge ला स्पर्श करून उच्चारते. त्यामुळे 'ही व्यंजने दन्त्य नाहीच मुळी' असा थोडासा वाद मी माझ्या प्रोफेश्वरांशी घातला होता. पण नंतर त्यांनी हे दाखवून दिले की मूळात ही व्यंजने दन्त्यच आहेत. पण alveolar ridge दातांना लागून असल्याने तेथे स्पर्श केल्यास दन्त्यव्यंजनसदृश उच्चार निघू शकतात. पण गुणात्मक दृष्ट्या दोहोंत फरक आहे.

राधिका

छान

दुसरा भागही छान आहे. एक शंका, य्, र्, ल्, व्, ह् आणि ळ् बद्दल माहिती पुढच्या भागात येणार आहे का?
आपला
(वाचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

लेख

लेख आवडला.
स्वाती

उत्तम/श-ष-क्ष

उत्तम लेख - माहिती आणि मांडणी दोन्हींच्या दृष्टीने छान.
उर्दू भाषेतले क़, ख़, ग़ वर्ण आणि देवनागरीतले क, ख, ग यातला नेमका फरक काय? उर्दू ख़ चा उच्चार ख्व (ख्वाब) सारखा आणि ग़ चा उच्चार थोडाफार देवनागरी ग आणि घ यांच्या मधला होतो का? (बोमन इराणी-शबाना आझमीचा हनिमून एक्स्प्रेस मधील विनोदी प्रसंग आठवला.)

थोडेसे अवांतर म्हणजे 'ष' आणि 'क्ष' चे शुद्ध, स्पष्ट उच्चार ऐकायचे असतील तर बाबूजींचे 'फिटे अंधाराचे जाळे' ऐकावे. [अनु. 'चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक' आणि 'क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास']

उपजत ज्ञान

लेख आवडला. काही गैरसमज दूर झाले.
वाचताना मनात एक विचार आला. आपल्याला एखादा नवीन स्वर ऐकून त्याचा उच्चार करण्यासाठी कोणते अवयव वापरायचे याचे उपजत ज्ञान असावे. अन्यथा लहान बाळाला बोलायला शिकणे अशक्य होईल. आणि दुसरी गंमत म्हणजे हे ज्ञान आपल्या नेणिवेत असते. एखाद्या स्वराचा उच्चार न करता, त्यासाठी कुठले अवयव वापरावे लागतील हे सांगणे शक्य होईल किंवा नाही ठाउक नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आवडला/सूचना

लेख आवडला. माहितीपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने लिहिलेला वाटला. भाषाशास्त्राचे असे मूलभूत शास्त्रीय शिक्षण या लेखाच्या माध्यमातून होते आहे, याचा आनंद आहे.
एक सूचना: लेखतील आकृती तुम्ही स्वतः काढली आहे का? असल्यास उत्तम; नसल्यास त्याचा संदर्भ नमूद करणे इष्ट ठरेल. हे इतर संदर्भ नि लेखांच्या बाबतीतही लागू करता आल्यास उत्तम.
शुभेच्छा.

संदर्भ

अभिप्रायाबद्दल आणि सूचनेबद्दल धन्यवाद. या लेखातली आकृती मी काढलेली नाही, ती http://images.google.co.in/imgres?imgurl=http://www.indiana.edu/~hlw/Pho... या संकेतस्थळावरून घेतली आहे.
लेख मात्र मी स्वतःच लिहिले आहेत, त्यामुळे त्यासाठी कोणत्या संकेतस्थळाचा दुवा द्यायची गरज नाही. हे लेख लिहिण्यापूर्वी मी ज्या पुस्तकांवरून या विषयाचा अभ्यास केला, त्यांचे संदर्भ मी शेवटच्या भागात देईनच. असे संदर्भ मी 'दशरूपक' या माझ्या दुसर्‍या लेखातही दिले होते. स्वप्नवासवदत्तम् च्या बाबतीत मूळ नाटक हाच सर्वात मोठा संदर्भ होता, तो लेख या संदर्भावरच लिहिला असल्याने त्याचा वेगळा उल्लेख केला नाही.
राधिका

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याबद्दल क्षमस्व. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याबद्दल क्षमस्व. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याबद्दल क्षमस्व. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरल्याबद्दल क्षमस्व.

मस्त !

लेख आवडला !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला

हा आणि याच्या आधीचा लेख समजायला अवघड असेल, म्हणून बाजूला ठेवला होता. आज दोन्ही वाचले. उत्तम लिहीले आहे. सर्व अक्षरांचे उच्चार करुन पाहिले.
अवांतरः कोणत्या शब्दात श वापरायचा आणि कोणत्यात ष याचे काही नियम आहेत का?
शहामृग,शपथ,शतपाद
षटकोन,षडयंत्र
यावरुन असे वाटते की नंतरचे अक्षर ट मालेतले असेल तर ष वापरायचा. बरोबर आहे का माझा तर्क?

कोणत्या शब्दात श वापरायचा आणि कोणत्यात ष याचे काही नियम आहेत का?
शोधावे लागतील, सापडल्यावर लिहीन.
षटकोन,षडयंत्र
यावरुन असे वाटते की नंतरचे अक्षर ट मालेतले असेल तर ष वापरायचा. बरोबर आहे का माझा तर्क?

अनुताई,
आपला तर्क ९९ टक्के खरा आहे. ऋ, र, ट, ठ, ड, ढ ,ण आणि ष ही मूर्धन्य भावंडे. ष बरोबर ही बाकीची बहुतेक सापडतात.

ष ने सुरू होणारे शब्द फारच थोडे. बहुतेक षष् म्हणजे सहा पासून झालेले. पुढे कचपश आले की षष् चे षट् होते. षट्‌कोण,
षट्पद, षट्चक्र, षट्शास्त्री वगैरे.
म आला की षण् होते. षण्मास, षण्मुख इत्यादी.
अन्यथा षड्. षडानन, षड्ज्, षड्‌यंत्र इ. षड् + दश = षोडश. ज्या वयात गर्दभीही अप्सरा होते ते वय!
ष चे आणखी शब्द म्हणजे षंड/षंढ/षिङ्ग, ष्टिव्(=थुंकणे), ष्वक्(=जाणे) अन् षेध म्हणजे निषेध.

याशिवाय फारशीतून मूळ श ने सुरू होणारे पण मराठीत आल्यावर षकारादी होणारे षोक/षोकी(न). तसेच अरबी शादमानीचा मराठी अवतार-षादमानी-एक पेशवेकालीन शब्द. अर्थ रयतेच्या खुशखयालीचा अहवाल.
बस्स्. संपले ष ने सुरू होणारे शब्द.

ष सुरुवातीला नसलेले शब्द अनेक.
ट बरोबर येणारे: - अष्ट, आकृष्ट, इष्ट, उद्दिष्ट, उष्टेमाष्टे, कनिष्ट, कष्ट, कोष्टक, कोष्टी, कोपिष्ट, कोळिष्टक, क्लिष्ट, खाष्ट, गोष्ट, चेष्टा, छंदिष्ट, छंदिष्ट, तुष्ट, दुष्ट, दृष्ट, द्रष्टा, नष्ट, नादिष्ट, पुष्ट, मिष्टान्न, मुष्टी, यष्टी, रुष्ट, (वि)शिष्ट, सुष्ट, सृष्टी , स्पष्ट , स्पृष्ट, हृष्ट, वगैरे.
आणखी शब्द म्हणजे अंतेष्टी, अनुष्टुभ, उत्कृष्ट, धारिष्ट, प्रविष्ट, राष्ट्र, वैशिष्ट्य. आणि अस्सल मराठी--पोष्ट आणि बेष्ट.
यातील काही शब्द च्छकारान्त, जकारान्त, सकारान्त, शकारान्त आणि षकारान्त संस्कृत धातूंपासून झाले आहेत. मृज्/मृश्-मृष्ट; शास्/शिष्-शिष्ट; इष्/यज्-इष्ट; प्रच्छ्-प्रष्ट; इत्यादी.

ठ बरोबर येणारे: - अंगुष्ठ, कुष्ठ, गर्विष्ठ, गोष्ठी, घनिष्ठ, ज्येष्ठ, (ध)निष्ठा, निष्ठुर्, पराकाष्ठा, पृष्ठ, प्रतिष्ठापना, बलिष्ठ, वरिष्ठ, वसिष्ठ, शर्मिष्ठा, श्रेष्ठ, इ.

ड, ढ बरोबर नसावेत.
ण बरोबर उष्ण, कृष्ण, तृष्णा, निष्णात, विष्णू, सहिष्णू, सुदेष्णा.
ऋ/र बरोबर आकर्षण, ईर्षा/ईर्ष्या, ऋषी, कृषी, तितीर्षा, तृषा, धार्ष्ट्य, पार्षद, मुमूर्षू, वर्ष, वर्षाव, वृषण, शीर्ष, हर्ष, हृषीकेष.

ष चे 'कपफमय' शी पण छान जमते. निष् -कपट, कलंक, कर्ष, काम, कारण, काळजी, कांचन, क्रिय. आविष्कार, चतुष्कोण, खुष्की(फार्सी-खुश्की), पुष्कराज, पुष्करिणी, पुष्कळ, बाष्कळ, शुष्क. तसेच निष्-पत्ती, पन्न, पाप, प्रभ, फळ. याशिवाय पुप्ष्प, बाष्प. ऊष्मा, ग्रीष्म. भीष्म, करिष्मा, किल्मिष,(संस्कृत किल्बिष), चष्मा(फार्सी-चश्मा), नामुष्की(फार्सी-नामूसी), मष्गूल(अरबी-मशगूल), मिष्कील(अरबी 'मिसकीन'वरून अर्थबदल होऊन आलेला), मुष्कील(अरबी-मुशकील).
य बरोबर-धनुष्य, पुष्य, हृष्यशृंग.
क् + ष = क्ष. क्षचे अनेक शब्द. त्यामुळेच बहुधा वारंवार अक्षरे जोडून लिहावी लागू नयेत म्हणून क्ष, ज्ञ मराठीत जोडाक्षरे नसावीत.
आता उरले , षचे जोडाक्षर नसलेले शब्द. तेसुद्धा अनेक आहेत. थोडे खाली देत आहे.
अनुषंग, अभिषेक, अभिलाषा, अमिष(मांस), आमिष(लाच), आषाढ, उषा, औषध, कोश(ष), जिगीषा, ज्योतिष, दूषण, दोष, द्वेष, निषाद, निषेध, पुरुष, पोषण, पोषाख(फार्सी-पोशाक), प्रेषित, भाषा, बदमाष(फार्सी), मनीषा, महिषा, माषुक(अरबी-माशूक), मिष(निमित्त, सबब), रोष, (वि)शेष, विष(य), विषाद, खुषी/खूष(फार्सी).
ऋ, र, ष, ट आदी मूर्धन्यांना आणखी एक छोटे गोंडस, गुटगुटीत सावत्र भावंड आहे. ळ! ते कद्धी कुणाच्या अध्यात नसते. असले तर मध्यात किवा मांजराच्या पिल्लासारखे पायात घुटमळते. एकट्या ष बरोबर ते येत नाही. बरोबर क-फ सारखा बुजुर्ग असला तरच दिसते. पुष्कळ, बाष्कळ, निष्फळ इत्यादी शब्दात त्याचे अस्तित्व जाणवते!!
इत्यलम् ॥

हृषीकेश?

आपला लेख खूपच माहितीपूर्ण आहे.
आपल्या तुलनेत मी अज्ञानीच आहे. तरीही माझ्या अत्यल्पज्ञानानुसार आपण जो "हृषीकेष" असा शब्द लिहिलेला आहे, त्याबद्दल शंका वाटते. हृषीकांचा (इंद्रियांचा) ईश हृषीकेश असावा असे वाटते. कृपया खुलासा केल्यास उपकृत होईन.
(अर्थात् चूक माझी असल्यास आगाऊ क्षमा मागतो.)
"ण"त्व विकृती (न चे ण मध्ये रूपांतर) असते तशी "ष"त्व विकृतीही (स, श चे ष मध्ये रूपांतर) संस्कृतात असते का?
- दिगम्भा

हृषीकेश

चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद . हृषीकेश बरोबर आहे. अन्त्य श च्या जागी ष लिहिणे हा माझ्या हातून घडलेला टंकनदोष होता.

आपल्या तुलनेत मी अज्ञानीच आहे.

इतका नम्रपणा रास्त नाही. आपल्याला चूक जाणवली यातच आपले ज्ञान दिसून येते.
--वाचक्‍नवी

स,श,चे ष मध्ये रूपांतर

"ष"त्व विकृतीही (स, श चे ष मध्ये रूपांतर) संस्कृतात असते का?

संधि नियमाप्रमाणे 'स ' नंतर श ष आले तर स चे अनुक्रमे श ष होतात.
उदाहरणार्थ हरिस् + शेते = हरिश्शेते. रामस् + षष्ठ: = रामष्षठ: | याहून जास्त काही माहीत नाही. नामांच्या सप्तमीच्या बहुवचनाच्या रूपाशेवटी 'षु" असतो. जसे रामेषु, हरिषु वगैरे. क्वचित् 'सु' असतो, जसे रमासु, गोपासु इ. हा फरक का ते ठाऊक नाही.
--वाचक्‍नवी

सुषेण?

आणखी उदाहरणे या क्षणी आठवत नाहीत.
पण वानरसेनेतील वैद्य "सुषेण" होता असे काहीतरी आठवते.
हे नाव सु+सेन आणि स चे ष मध्ये, न चे ण मध्ये, रूपांतर होऊन झाले असावे असा माझा अंदाज.
अशीच इतरही काही नावे ऐकल्यासारखे वाटते आहे.
सप्तमीचे सुद्धा मूळ सु असावे व त्याचे काही ठिकाणी षु होत असावे असे वाटते.
यामागे काही शास्त्र/व्याकरण असल्यास आपण अथवा अन्य तज्ञांनी सांगावे.
- दिगम्भा

स् + च वगैरे

नमस्कार, पुरस्कार, वाचस्पती, पुरस्सर . इथे स् पुढे क, प, स आले तरी स तसाच राहतो. (स् मागे अकार पुढे क.प,स्.)
आविष्कार, निष्कासन, निष्पन्न, निष्फळ, निष्ठा यात ष होतो.(स् मागे इकार पुढे क.ख.प.फ.स)
निश्चल मध्ये श होतो आहे. (स् मागे इकार पुढे च.)
सप्तमी बहुवचनाचा प्रत्यय सु आहे, पण जवळजवळ सर्वत्र षु का होतो ते बघावे लागेल.
सुषेण बद्दल शोधाशोध करून कळवीन.
--वाचक्‍नवी

खाली बघावे

खाली "अपदान्तस्य मूर्धन्यः" विषयी मी चर्चा दिलेली आहे. त्या संदर्भात शोधता तुम्हाला सप्तमीच्या "-षु" आणि सुषेणबद्दल माहिती मिळेल.

इ/ई, उ/ऊ, ऋ/ॠ, लृ, ए ऐ, ओ औ, ह्, य्, व्, र्, ल्, क्, ख्, ग, घ्, ङ्, :, ं (याला "नुम्" म्हणतात) यांच्यापुढे सप्तमीचा -सु प्रत्यय आल्यास त्याचा -षु होतो. (हे -सु साठी विशेष नाही. कुठल्याही स्-आदि प्रत्ययाबाबत हाच नियम आहे. म्हणूनच दास्यामि=मी देईन, पण गमिष्यामि=मी जाईन)

सु-षेण (= सु-सेन) वगैरे त्याच नियमावलीतून. या नियमावलीत ६०-६४ सूत्रे आहेत. पैकी एक नियम येथे दिला तर तुम्ही निरीक्षक लोक बाकी उदाहरणे शोधाल! आणि सर्व ६०-६४ नियम मी इथे दिलेत तर वाचकाला निश्चित कंटाळा येईल. म्हणून येथे इतकेच.

स्->ष् चा "रामः+टीकते"="रामष्टीकते" हे मात्र वेगळ्या संधिप्रकरणातील. ते वाचक्नवींनी वरती दिलेच आहे.

स चा कधीकधी ष होतो

तुमचे निरीक्षण जबरदस्त, आणि उदाहरणे बरोबर आहेत. "अपदान्तस्य मूर्धन्य:।" या सूत्रापासून पुढे या बाबतीतले नियम आणि अपवाद पाणिनींनी सांगितलेले आहेत. किचकट विस्तारभयास्तव ते येथे देत नाही. शिवाय वाचक्नवींनी पुढे त्याच्यापैकी अनेक समजावून सांगितलेच आहेत.

धनंजय

विस्तार चालेल

अपदान्तस्य मूर्धन्य:।

म्हणजे काय? आपणास अष्टाध्यायीची चांगली माहिती असलेली दिसते. कृपया मला सांगाल का, उच्चारांसंबंधीची सूत्रे अष्टाध्यायीत कशी शोधावीत, किंबा सिद्धांतकौमुदीमधे त्याचे वेगळे प्रकरण आहे का, असल्यास कोणते?
राधिका

अपदान्तस्य मूर्धन्य:

अष्टाध्यायीबद्दल माझे ज्ञान म्हणजे थोडे "पढतमूर्खाचे" आहे. पाणिनीय व्याकरणपरंपरेतील काही ग्रंथ मी पुस्तक उघडून वाचलेले आहेत, पण कुठल्याही व्यासंगी गुरूकडून सांगोपांग समजावून घेतलेले नाहीत. तरी माझ्याकडून मिळालेली माहिती तितक्याच अधिकाराची समजावी.

अपदान्तस्य मूर्धन्य:।८.३.५५
या सूत्राचा अर्थ असा -
पदाच्या शेवटी नसलेल्या (वर्णाचा त्याच्याशी जास्तीत जास्त साधर्म्य असलेला) मूर्धन्य (वर्ण करावा).
येथे कोष्टकात दिलेली वाक्यपूर्ती पाणिनीय सूत्रांच्या नियमानुसार आहे. येथपासून ८.३.११९ पर्यंत, म्हणजे ६४ सूत्रे या प्रकरणला वाहिलेली आहेत. पैकी २ सूत्रे पुढील नियमांना एक चौकट देतात, ६० सूत्रे "स्" या वर्णाचा मूर्धन्य (म्हणजे "ष्") कधी करायचा (आणि त्याच नियमांना असतील तर अपवाद) ते सांगतात, आणि २ सूत्रे "ध्" या वर्णाचा मूर्धन्य (म्हणजे "ढ्") कधी करायचा ते सांगतात.
("स्" चा "ष्" पैकी काही उदाहरणे वाचक्नवींनी दिलेलीच आहेत.)

उच्चारासंबंधी बरीचशी माहिती (म्हणजे कंठ दन्त वगैरे तोंडातील स्थाने; स्पृष्ट, महाप्राण वगैरे प्रयत्न) सिद्धान्तकौमुदीत "तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम् । सूत्र क्र १०" याच्यानंतरच्या "वृत्तीत" (म्हणजे सूत्राच्या स्पष्टीकरणाची वाक्ये) दिलेली आहे. खुद्द अष्टाध्यायीत हे विद्यार्थ्यांस आधीच माहीत आहे असे गृहीत आहे. "पाणिनीय शिक्षा" या छोटेखानी श्लोकसंचात तीच माहिती पाठांतरास सोप्या अशा गेय पद्धतीत सांगितलेली आहे.

पण जर "स् चा ष्" वगैरे हेदेखील उच्चारविषयक नियम मानले, तर "उच्चारासंबंधी सूत्रे अष्टाध्यायीत कुठे आणि सिद्धांतकौमुदीत कुठे सापडतील" त्याचे उत्तर देण्या आधी मोठेच विषयांतर करून स्पष्टीकरण द्यावे लागेल. खरे म्हणजे हे असले नियम "उच्चारशास्त्राचे" नाहीत तर संस्कृत भाषा बोलणा-यांचा उच्चाराच्या (पण अन्य भाषांत गैरलागू असलेल्या) लकबी आहेत. हे जाणल्यास पुढेचे पाल्हाळ वाचायची गरज नाही!

अष्टाध्यायी ग्रंथाची रचना करण्याचा हेतू हा की त्या काळातल्या भाषेचे तंतोतंत आणि परिपूर्ण वर्णन व्हावे. भाषेशी अनोळखी व्यक्तीला व्याकरण शिकवणे हे नव्हे. जी व्यक्ती अमुक एक भाषा लहानपणापासून स्वभाषा म्हणून बोलत असेल, त्या व्यक्तीला (शब्द माहीत असले तर) आपले मनोगत "अस्खलित" भाषेत (किंवा बोलीत) व्यक्त करायची एक तरी पद्धत माहितच असते - त्यासाठी व्याकरण शिकावे लागत नाही. पण दुस-या अनोळखी (विशेषकरून दूरगावच्या) व्यक्तीचे बोलणे किंवा काव्य (विशेषतः पूर्वीच्या काळचे) सवयीपेक्षा वेगळे वाटले तर ते शुद्धच आहे की नाही ते सांगता येत नाही.

उदाहरणर्थ (मराठीत) आमच्या घरी माझी आई आणि बाकी बायका "मी जाते, मी करते" असे शब्दप्रयोग करतात. मी पहिल्यांदा पुण्यात "मी जात्ये, मी करत्ये" अशी शब्दरूपे ऐकली. तेव्हा मराठी माझी मातृभाषा असून मी बुचकळ्यात पडलो, की मी ऐकले ते नीट ऐकले का? अशा ठिकाणी मला व्याकरणाच्या "नियमांची" गरज पडते - की होय, पुण्याच्या बोलीत त्या शब्दांची तशीही स्त्रीलिंगी रूपे आहेत.

अशा लोकांसाठी अष्टाध्यायी लिहिलेली आहे. स्-ष् प्रकरणतली दोन उदाहरणे घेऊया. १. "परिष्कन्द" असा एक शब्द आहे (अमरकोषातून त्याचा अर्थ आदमासे "ऐतखाऊ" असा कळतो). हा शब्द "परिस्कन्द" की "परिष्कन्द" असा विचार ती भाषा बोलणा-या व्यक्तीच्या मनात देखील येणार नाही. पण "भरत" कुळाच्या देशातील पूर्वेकडच्या भागात शब्द "परिस्कन्द" असाच वापरला जातो, त्या संदर्भात ऐकला तर तो ठीक, अन्य संदर्भात नाही, असे एक सूत्र आपल्याला सापडते.
परिस्कन्दः प्राच्यभरतेषु । ८.३.७५
२. अग्निष्टेSग्रम् की अग्निस्तेSग्रम् ? (अर्थ : अग्नी तुझ्या पुढे...)
यजुष्येकेषाम् । ८.३.१०४
यजुर्वेदात एकेका आचार्याच्या मते प्रथम रूप होते, बाकींच्या मते दुसरे रूप होते (हे जाणून शुद्धाशुद्धत्व तुमचे तुम्ही ठरवा असे पाणिनि सांगतात.)

रोज उपयोगासाठी नव्हे तर कधीतरी विशेष उपयोगासाठी समस्त नियम लागतील म्हणून पाणिनींनी सर्व नियमांचे संकलन केले. ते "अमुक शब्दरूप कसे तयार करायचे?" असे विचारणा-याच्या सोयीने केलेले नाही. "बहुतेक बरोबर/चूक शब्दरूपे मला माहीत आहेत, 'अमुक'चे काय?" असे विचारणा-याच्या सोयीने केलेले आहे. समग्र (संस्कृत) भाषेच्या समस्त शब्दरूपांचे ज्ञान कधीतरी लागेल म्हणून अवघे शास्त्र मुखोद्गत करण्यासाठी कमीतकमी शब्दांत कमीतकमी सूत्रे (केवळ ~४०००!) लिहून पाणिनींनी विद्यार्थ्यांची मोठी सोय लावून दिली.

"कौमुदी" नावाचे ग्रंथ अलीकडे अलीकडे सोळाव्या सतराव्या शतकांत लिहिले गेलेले आहेत. या काळात संस्कृत मातृभाषा म्हणून क्वचितच बोलली जाई. "अमुक शब्दरूप कसे तयार करावे?" असा प्रश्न असणा-यांची सोय महत्त्वाची झाली. तर एक एक शब्दरूप घेऊन ते तयार करण्यासाठी पाणिनींची कुठली कुठली सूत्रे (मूळ अष्टाध्यायीच्या क्रमात ती कुठे दूरदूर का असेनात) या "कौमुदी" ग्रंथांत संकलित केलेली आहेत. या ग्रंथांपैकी सर्वात प्रसिद्ध आहे भट्टोजिदीक्षितांची "सिद्धान्तकौमुदी".

या काळातले विद्यार्थी "रामः,रामौ,रामा:,...,रामे,रामयो:,रामेषु" अशी शब्दरूपे क्रमाने शिकत असावेत. (आपल्या काळातही तोच क्रम आहे). तेव्हा "रामेषु" शब्दाचे रूप तयार करताना सिद्धान्तकौमुदीत (सूत्र क्र २१०-२१२) पाणिनींची नेमकी ८.३.५५, ८.३.५७ आणि ८.३.५९ अशी इतकीच तीन सूत्रे संदर्भानुसार दिलेली आहेत. मग सिद्धान्तकौमुदी "सर्वः,सर्वौ,सर्वे..." शब्दरूपांकडे वळते. पुढे कधीतरी "तुराषाट्" असे शब्दरूप तयार करायची वेळ येते तेव्हा सिद्धान्तकौमुदीत (सूत्र क्र ३३५) पाणिनींचे ८.३.५६ हे सूत्र संकलित केलेले आहे.

अशा प्रकारे एका वेगळ्याच क्रमात वेगळ्याच त-हेच्या विद्यार्थ्याच्या सोयीसाठी त्याच ~४००० सूत्रांचे सिद्धान्तकौमुदीत पुनर्लेखन केले गेले आहे.

विषयांतराचे प्रयोजन हे की "उच्चारांसंबंधीची सूत्रे अष्टाध्यायीत कशी शोधावीत, किंवा सिद्धांतकौमुदीमधे त्याचे वेगळे प्रकरण आहे का, असल्यास कोणते?" या प्रश्नाचे उत्तर देणे मुश्किल आहे.

जर आपले उच्चारविषयक कुतूहल त्या दोहोंच्या प्रयोजनाच्या चौकटीत बसवता आले, तर आपल्याला तशी सूत्रे त्या त्या ग्रंथांत सापडू शकतील. उदाहरणार्थ - "न् चा कधीकधी ण् होतो, कधीकधी होत नाही - ते सगळे एकच प्रकरण आहे काय?" होय. ते सर्व नियम अष्टाध्यायीत ८.४.१ ते ८.४.३९ असे सापडतात. पण "राम शब्दाची विभक्तिरूपे करायची आहेत, ती कशी करावीत, त्यात उच्चार-बदल कसे कसे होतात?" असा प्रश्न विचारला तर ती सर्व सूत्रे सिद्धान्तकौमुदीत सूत्र क्र १७८-२१२ अशी छानपैकी एकत्र संकलित सापडतात. पण " 'सर्व' शब्दाची विभक्तिरूपे करायची आहेत, ती कशी करावीत, त्यात उच्चार-बदल कसे कसे होतात?" असा प्रश्न विचारला तर गडबड होते - "राम"च्या ठिकाणी सांगितलेल्या सूत्रांची पुनरुक्ती कौमुदीतही केलेली नाही, पैकी काही 'सर्व'ला लागू आहेत, म्हणजे संकलन विस्कळित झालेच म्हणायचे.

शिवाय पाणिनींच्या भन्नाट "लघुतम"चौकटीत आपल्याला शिकल्याशिवाय सहजासहजी विचार करता येत नाही, आपण फसतो.
सः एषः दाशरथी राजा । (तोच हा दशरथपुत्र राजा आहे...)
येथे "सः" पुढचा विसर्ग कधीकधी लोप पावतो, तो कसा? असा आपण प्रश्न विचारू. पण पद्य संदर्भातला नियम अष्टाध्यायीत ६.१.१३४ येथे सापडतो, आणि गद्य संदर्भातला नियम खूप दूर ८.३.१९ येथे सापडतो. असे केल्यामुळे सूत्रसंख्या कमी कशी होते ते कोणी आपल्याला समजावल्यानंतर अगदी तर्कशुद्ध आणि स्पष्ट होते, पण त्या आधी नाही!

पाल्हाळ बंद व्हावे. इत्यलम् .

छान

आपला हाही प्रतिसाद आवडला. अष्टाध्यायी व सिद्धांतकौमुदी दोन्ही ग्रंथांचे स्वरूप मला अभ्यासाने थोडे फार माहित आहे. महाविद्यालयात सिद्धांतकौमुदीतले कारकप्रकरण आम्हाला अभ्यासाला असल्याने भट्टोजी दीक्षिताच्या संकलनपद्धतीशी व वृत्तींशी ओळख आहे. म्हणूनच वरील प्रश्न मी आपल्याला विचारला. आपण अपादान्तस्य.... हे सूत्र सांगितल्याने 'उच्चारासंबंधी 'म्हणजे केवळ स् चा ष् कुठे होतो एवढेच नव्हे, तर स्पृष्टाची व्याख्या वगैरे असे सर्व या संबंधीची सूत्रे आपल्याला माहित असतील असे मला वाटले. ही सूत्रे कशी शोधावीत हा मोठा प्रश्न मला आधीपासूनच पडला आहे. ती शोधायचा प्रयत्न करूनही सापडली नाहीत. तेव्हा या लेखमालेसाठी सेकन्डरी रेफरन्सेसची मदत घ्यावी लागली. म्हणूनच जसे भट्टोजी दीक्षिताने कारकप्रकरण वेगळे केले आहे, तसे उच्चारासंबंधीचे प्रकरण वेगळे केले आहे का? असा माझ्या विचारण्याचा उद्देश होता. अष्टाध्यायीतही आपल्याला हव्या असलेल्या विषयासंबंधीची सूत्रे क्रमाने येतील याचा अजिबात नेम नसतो. त्यात अनुवृत्ती वगैरे प्रकार असतातच. म्हणूनच वरील प्रश्न.

उच्चारासंबंधी बरीचशी माहिती (म्हणजे कंठ दन्त वगैरे तोंडातील स्थाने; स्पृष्ट, महाप्राण वगैरे प्रयत्न) सिद्धान्तकौमुदीत "तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम् । सूत्र क्र १०" याच्यानंतरच्या "वृत्तीत" (म्हणजे सूत्राच्या स्पष्टीकरणाची वाक्ये) दिलेली आहे. खुद्द अष्टाध्यायीत हे विद्यार्थ्यांस आधीच माहीत आहे असे गृहीत आहे. "पाणिनीय शिक्षा" या छोटेखानी श्लोकसंचात तीच माहिती पाठांतरास सोप्या अशा गेय पद्धतीत सांगितलेली आहे.

या आपल्या परिच्छेदात मला माझ्या प्रश्नांची उत्तरे सापडली. आता पाणिनीय शिक्षा व तुल्यास्य... ची वृत्ती शोधून काढून वाचते.
धन्यवाद.

राहिता राहिला प्रश्न उच्चारशास्त्र या शब्दाचा, तर मला वाटतं, 'शास्त्र' हा शब्द पूर्वी ज्या अर्थाने वापरला जायचा, व आता ज्या अर्थाने वापरला जातो त्यांत महदंतर आहे. पूर्वीची शास्त्रे prescriptive असत तर आताच्या काळात ती descriptive (जीवशास्त्र वगैरे) असतात असे मला वाटते. त्यामुळेच मी phonetics साठी प्रतिशब्द म्हणून उच्चारशास्त्र (उच्चारविज्ञान हिंदी वाटतो) हा शब्द वापरला आहे, पाणिनीला किंवा इतर व्याकरणकारांना हा शब्द असाच वापरावा तसाच नाही असे सांगायचे होते, असे मला सूचित करायचे नाही. त्यांनी निरीक्षण करून अमुक उच्चारांचे स्थान दन्त आहे म्हणून त्यांना दन्त्य म्हणुया, तमुक उच्चारांच्या वेळी जीभ व दात दोहोंचा पूर्ण स्पर्श होतो म्हणून त्यांना स्पृष्ट ही संज्ञा देऊया असे काहीसे ते असावे. याऊलट या शब्दात मूर्धन्यच उच्चार करायला हवा असा आग्रह कुण्या व्याकरणकाराने केला असल्याचे माझेही म्हणणे नाही.

राधिका

आपला प्रतिसाद

बरीच चांगली माहिती देतो. आभार. एकदा वाचला. परत एकदा नीट वाचेन.

ळ आणि ख

आसामी (असमीया)भाषेत श, ष, स या तिन्ही अक्षरांचा उच्चार (जर्मन) ख सारखा होतो. 'शतायुषी भव' चे 'हतायुही भोब'!
म्हणून म्हणतात की पूर्व भारतातील लोकांकडून आशीर्वाद घेऊ नयेत. आशीर्वादान्‌ न गृह्णीयात्‌ पूर्वदेशनिवासिन: ।

मराठी ळ चे जरी ष शी फारसे जमत नसले तरी ख शी छान जमते.

पहा:-खळ, खळखळ, खळाखळा, खळगा, खळगी, खळी, खळे, खिळखिळा, खिळा, खीळ, खुळखुळा, खुळा, खूळ, खेळ, खोळ. शिवाय , ओळखपाळख, काळोख, खवळणे सारखे अनेक. --वाचक्‍नवी

सुषेण - व्याकरण आणि अर्थाकलन

पण वानरसेनेतील वैद्य "सुषेण" होता असे काहीतरी आठवते.
हे नाव सु+सेन आणि स चे ष मध्ये, न चे ण मध्ये, रूपांतर होऊन झाले असावे असा माझा अंदाज.

संस्कृतमध्ये सु ने सुरू होणारे जेवढे शब्द आहेत त्यातले १३ टक्के सुसं ने सुरू होतात, ६ टक्के सुश ने आणि फक्त ३ टक्के सुष ने. याचा पर्यायाने अर्थ असा होतो की स चा ष होणे हा मूळ नियमाचा अपवाद आहे. पाणिनीमध्ये अक्षरबदलासाठी जी सूत्रे आहेत त्यातून अपवाद सांगणारी सूत्रे शोधल्यावर खालील चार सूत्रे सहज मिळाली.

समासेSङ्‌गुले: सङ्‌ग: । भीरो: स्थानम्‌ । ज्योतिरायुष: स्तोम: । सुषामादिषु च ।--पाणिनी ८.३.८०,८१, ८३,९८.

खालील शब्दांच्या समासामध्ये स चा ष करावा.
अङ्‌गुलि + संङ्‌ग: = अङ्‌गुलिषङ्‌ग: ; भीरु + स्थानम्‌ = भीरुष्ठानम्‌: ज्योतिस्‌ + स्तोम: = ज्योतिष्टोम:;
आयुस्‌ + स्तोम: = आयुष्टोम: ; तसेच ---सुषामा, नि:षामा, सुषेध, सुषेण, सुषन्धि, सुष्ठु, दुष्ठु इत्यादी.
न चा ण का झाला त्यासाठी --
एकाच शब्दामध्ये ऋ, र्, ष् आणि न यांच्या मध्ये कुठलाही स्वर, ल खेरीज अर्धस्वर,अनुनासिक, ह किवा कवर्ग-पवर्गातले व्यंजन आले की न चा ण होतो. हा पाणिनीचा सुप्रसिद्ध नियम. रषाभ्यां नो ण:समानपदे । अट्‍कुप्वाङ्‌नुम्व्यवायेपि ॥ पाणिनी VIII .४. १ आणि२.

एकाच शब्दामध्ये(समानपदे) ऋ, र, ष पासून(रषाभ्यां) वाटेत कोणताही स्वर आणि हयवर हे वर्ण(अट्), क किंवा प वर्गातील व्यंजने(कुप्), अथवा(वा), ङ, न, म सारखी अनुनासिके(ङ्‌नुम्‌) आड(व्यवायी) आली तरी(अपि) न चा ण (नो णः)करावा.
पाणिनीने आठव्या अध्यायात या नियमाचे अनेक अपवाद आणि उपनियम सांगितले आहेत. उदा. शब्दांती न् आल्यास ण करू नये.(रामान्). मद्यपान याअर्थी सुरापान किंवा सुरापाण. पण दारु पिणारे (पूर्वस्थ भारतीय )म्हणजे फक्त सुरापाणाः.... इंद्रवाहम् म्हणजे इंदाच्या मालकीचे वाहन, परंतु इक्षुवाहम् - उसाची गाडी... गिरिनदी/गिरिणदी, स्वर्नदी/स्वर्णदी. .कोटर + वनम् = कोटरावणम्...पूर्वाह्ण परंतु निरह्न. वगैरे वगैरे.

त्याच अध्यायात स चा ष केव्हा होतो त्याची आणखी सूत्रे आहेत. विसर्गापूर्वी अकार पुढे क,प इ. --नमस्कार, परस्पर.
विसर्गापूर्वी इकार पुढे क,प इ. --आविष्कार, निष्पत्ती.
विसर्ग नसला तरी-- प्रति + कश + प्रतिष्कश. कि + किन्धा = किष्किन्धा. ....पुढे चालू.
--वाचक्‍नवी

सुषेण व्याकरण आणि अर्थाकलन

सुषेण शब्दाचा शोध घेताना बरीच माहिती मिळाली. दुसऱ्या गणाच्या सि(फेकून मारणे, भिरकावणे ) धातूपासून सेना शब्द झाला. अर्थ अस्त्र. याच अर्थाचा त्याच धातूपासून झालेला दुसरा आपल्या परिचयाचा शब्द सायक-म्हणजे परत-- बाण किंवा अस्त्र.
गीतरामायणातल्या नवव्या गीतात विश्वामित्र रामाला म्हणतात-

जोड झणिं कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका
रामचंद्रा !

तेव्हा सुषेण म्हणजे चांगले अस्त्र बाळगणारा. त्यामुळे हा शब्द श्रीकृष्णाच्या बाबतीत योग्य विशेषण म्हणून वाङ्‌मयात आढळतो. याशिवाय,
विष्णुसहस्रनामातले ५४० वे नाव.
धृतराष्ट्राचा ३५ वा पुत्र.
एक राक्षस
माघ महिन्यात प्रकाशित होणाऱ्या आदित्याबरोबर असणारा एक गंधर्व .
एक विद्याधर(उपदेव).
एक यक्ष.
दुसऱ्या मनूचा एक मुलगा.
परीक्षितपुत्र.
कंसाने मारलेला पहिला देवकीपुत्र (जन्मापूर्वीच नाव ठेवले होते? की मेल्यानंतर?).
शंबरपुत्र.
विश्वगर्भाचा मुलगा.
वेत(त्या काळीसुद्धा पंतोजी लांब बसणाऱ्या मुलांना फेकून मारण्यासाठी वेताच्या छडीचा अस्त्र म्हणून उपयोग करत असले पाहिजेत).
करवंद .
एक भुईकोहळ्याच्या जातीची वनस्पती. तिची मराठी नावे- दुधाणी, देवकुंभी, दूधकलमी, निशोत्तर, शेतवड, तेवडी. हिंदी-निसीथ, निसोथ, कालपर्णी, पिटोऱ्ही. बॉटॅनिकल नाव Operculina Turpethum. हिच्या मुळ्यांवरच्या सालीपासून टरपेंटाईन करतात.
आणखी काही पौराणिक व्यक्ती. आणि शेवटी आपल्या माहितीचा
धर्म नावाच्या वानराचा मुलगा, ताराचा पिता, वालीचा सासरा आणि सुग्रीवाच्या वानरसैन्यातील एक युद्धविशारद व हुशार वैद्य. युद्धकाळात बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला ज्याने विशल्यकरिणी, सावर्ण्यकरिणी, संजीवनी संधानी आदी औषधे वापरून शुद्धीवर आणले तो सुषॆण.. --वाचक्‍नवी

साधु! साधु!

वाचक्नवी,
नाव सार्थ केलेत.
"ष" व "ण" या दोन्ही विषयांवरील आपले सविस्तर निरूपण सर्वतः समाधान करणारे व वेगळे काढून जपून ठेवण्याजोगे आहे.
आपल्या विद्वत्तेस, व्यासंगास व साक्षेपास माझा प्रणाम.
- दिगम्भा

अगदी असेच

आपल्या विद्वत्तेस, व्यासंगास व साक्षेपास माझा प्रणाम.

अगदी असेच मलाही वाटले. आपले आणखी लिखाण वाचण्याची उत्सुकता आहे.

आपला
(प्रभावित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

वर्णमाला- उच्चारक्रिया

सौरभ

संस्कृत शास्त्रकारांनुसार 'कण्ठ, मूर्धा, तालु, दन्त, ओष्ठ' हे तोंडाचे अवयव नेमके कोठे आहेत याची अशीच एखादी आकृती कुणाकडे आहे का ? कारण पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञांना अपेक्षित असलेले उच्चार आणि आपल्याकडील उच्चार यांमध्ये खूप फरक आहे.

शंका

उर्दू भाषेतले क़, ख़, ग़ वर्ण आणि देवनागरीतले क, ख, ग यातला नेमका फरक काय?

मी उर्दूचा अभ्यास केला नसल्याने माझे मत ग्राह्य धरता येणार नाही. परंतू मराठी वगैरे भाषांतील क् वगैरे उच्चारताना जीभेच्या मागच्या भागाचा स्पर्श पडजीभेला होतो. तर उर्दूतील नुक्तावाल्या कवर्गाचा उच्चार घशातून होतो असे ऐकले आहे.

संस्कृत शास्त्रकारांनुसार 'कण्ठ, मूर्धा, तालु, दन्त, ओष्ठ' हे तोंडाचे अवयव नेमके कोठे आहेत याची अशीच एखादी आकृती कुणाकडे आहे का ?

नाही.

कारण पाश्चात्य उच्चारशास्त्रज्ञांना अपेक्षित असलेले उच्चार आणि आपल्याकडील उच्चार यांमध्ये खूप फरक आहे.

सर्वच उच्चारांच्या बाबतीत असे म्हणता येईल असे वाटत नाही. शेवटी दन्त्य उच्चार व डेन्टल उच्चार दोन्हींमधे जीभ व दात यांचा संयोग अभिप्रेत असल्यावर दोन्हींत फरक निघेल असे वाटत नाही. कण्ठ्य व्यंजनांबद्दल मात्र शंका घ्यायला जागा आहे. तरीही मला आधी न मिळालेले काही संदर्भ धनंजयमहोदयांनी मला सांगितलेले आहेत. ते संदर्भ वाचण्याइतका वेळ व ते ग्रंथ दोन्ही एकत्र मिळाल्यावर वाचून, समजून येथे अधिक लिहीनच.

धन्यवाद.
राधिका

 
^ वर