वर्णमाला- (समज- गैरसमज)

काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग आहे हा. एकदा एका व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला की 'इतर भाषा शिकताना संस्कृतचा काय फायदा होतो?' तेव्हा मी संस्कृत साहित्याची विद्यार्थिनी होते. भाषाशास्त्राशी मात्र अद्याप ओळख व्हायची होती. मी बेधडक उत्तर दिले- 'संस्कृतभाषेत सर्व उच्चार असल्याने, आपल्या जिभेला आपण हवे तसे वळवू शकतो. परिणामी इतर कुठल्याही भाषेतले उच्चार आत्मसात करणे सोपे जाते.' मजा म्हणजे प्रश्नकर्त्या व्यक्तीलाही हे उत्तर पटले. त्यानंतर २-३ वर्षांनी मी भाषाशास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि माझ्या अशा अनेक गैरसमजांना धडाधड सुरूंग लागत गेले.

आपणा सर्वांच्याच मनात असे अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ अक्षरांनाच उच्चार मानणे. जसे इंग्रजी भाषा शिकवताना आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलेले असते की या भाषेत ५ स्वर आहेत- a, e, i, o, u. पण ही तर केवळ अक्षरे झाली. उच्चारांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मात्र या भाषेत ५-१० नाही तर चांगले २०च्या आसपास स्वर आहेत. याचाच अर्थ, आपण लिहितो ती अक्षरे व त्यांचे उच्चार यांत बराच फरक आहे.

दुसरा गैरसमज म्हणजे मी वरील प्रसंगात उल्लेखलेला 'संस्कृतभाषेत सर्व उच्चार आहेत' हा गैरसमज. कोणत्याही भाषेत जगातले सगळे उच्चार नसतात. संस्कृतभाषेत जे आहेत, ते सर्वच इंग्रजीत नाहीत (उदाहरणार्थ-'भ') व इंग्रजी भाषेतले काही संस्कृतात नाहीत(उदाहरणार्थ- 'ऍ'). या दोन्ही भाषांत नसलेले असे आणखी अनेक उच्चार आहेत, जे जगातल्या इतर भाषांत आहेत. त्यामुळे माझ्या वरच्या प्रसंगातल्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ उरत नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर संस्कृतभाषा ही इतर भाषांप्रमाणेच मानवनिर्मित आहे व तिला स्वतःच्या मर्यादा आहेत. पण आपण लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या भाषेत अनेक गमती जमती आहेत आणि त्या हेरून प्राचीन काळातल्या भाषाभ्यासकांनी तिचे स्वतंत्र तर्कसंगत शास्त्र निर्माण केले आहे. हे शास्त्र उच्चारशास्त्र, व्याकरणशास्त्र अशा विविध पातळ्यांवर बांधले गेले आहे.

संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.

या लेखाचे प्रयोजन लेखमालेची थोडीशी पार्श्वभूमी देणे हे आहे. म्हणजे ही लेखमाला वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी जेव्हा थ्, द्, न् , आ अशी अक्षरे लिहीन तेव्हा त्यांकडे लिखित अक्षरे या दृष्टीने न पाहता, आपल्या मुखातून बाहेर पडणारे उच्चार या दृष्टीकोनातून पहावे. व्यंजने लिहिताना ती हलन्तच असतील. याचे कारण म्हणजे त्या व्यंजनात कुठलाही स्वर मिसळलेला नाही, हे दाखवणे. उदाहरणार्थ्- 'ण' या उच्चारात 'ण्' आणि 'अ' हे दोन उच्चार आहेत, एक व्यंजन आणि एक स्वर आहे. हे टाळण्यासाठी हलन्त व्यंजने योजली जातील.

हे आणखी नीट समजून घेण्यासाठी अणू-रेणू सारखी संकल्पना लक्षात घेतलीत तरी चालेल. जसे 'ण्' हा एक अणू आहे. 'अ' हा दुसरा अणू आहे. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा 'ण' हा रेणू बनतो. त्याचप्रमाणे 'क्ष' हा 'क्', 'ष्', 'अ' या अणूंपासून बनलेला रेणू आहे तर 'ज्ञ' हा आजच्या काळानुसार 'द्', 'न्', 'य्' या अणूंपासून बनलेला रेणू आहे. (आजच्या काळानुसार असे अशासाठी म्हटले की पूर्वीच्या काळी 'ज्ञ' या उच्चारात 'ज्' व 'ञ्' हे दोन उच्चार होते असे मानले जाते.) वर्णमालेत जरी आपण इतर व्यंजन-स्वरांसोबत 'क्ष' व 'ज्ञ' यांचाही समावेश करत असलो, तरीही आपल्याला फक्त 'अणूं'त रस असल्याने, या दोन 'रेणूं'चा विचार आपल्याला येथे करायचा नाही.

आणि सर्वांत महत्त्वाचे - मी जे काही थोडेफार वाचले व त्यातून मला वर्णमालेतील ज्या काही बाबींचा उलगडा झाला, त्या माझ्या कुवतीनुसार येथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. मी या विषयातील तज्ज्ञ नसून केवळ एक विद्यार्थिनी आहे, त्यामुळे वाचकांच्या सर्वच प्रश्नांना मला उत्तरे देता येतील असे नाही. परंतू अशा प्रश्नांचे स्वागतच आहे, कारण असे प्रश्न उत्तरे शोधण्यासाठी विचारांना चालना देतील.

पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत- उच्चार करण्याच्या क्रियेत सहभागी असलेले विविध अवयव (vocal tract). तोवर मी येथे वर्णमाला देते आहे, जेणेकरून ज्यांना पाठ नसेल त्यांना वर्णमालेवर विचार करता येईल.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ, ॠ व लृ

क्, ख्, ग्, घ्, ङ्
च्, छ्, ज्, झ्, ञ्
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
त्, थ्, द्, ध्, न्
प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्

स्, श्, ष्, ह्

ळ्

Comments

वा

अतिशय उपयुक्त आणि चांगला लेख.
येथे होणार्‍या चर्चेकडे डोळे लावून बसलो आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
--लिखाळ.

परदेशात भारतीयांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करावे असे मला वाटते.

असेच

म्हणतो. लेखमालेतील पुढील भागांविषयी उत्सुकता आहे.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

उच्चारशास्त्र आणि वर्णमाला

आवडला लेख,

उच्चारशास्त्र आणि भाषाशास्त्र ज्याला भाषाविज्ञान असे ही म्हणतात म्हणे हे वेगवेगळे विषय असतील पण मला एक प्रश्न आहे तो असा ज्याचा आपणही उल्लेख केला आहे,'ऍ' आणि ऑफीस 'ऑ' चा उच्चार कसा ? आणि मराठी वर्ण मालेत अधिकृतरीत्या 'ऍ' आणि 'ऑ' चा समावेश झाला किंवा नाही.?

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ,अं,आ: ('ऍ' आणि 'ऑ' )

ऐरणी =चा उल्लेख करतांना दोन मात्रे दिले असते तर चालले नसते का ?
जसे पैसा, दोन मात्रे पण ऐ वर दोन मात्रे न देण्याचे कारण काय असेल .
मला समाधानकारक स्पष्टीकरण करता येत नाही,म्हणून हा प्रश्न.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'इ'ला एकही वेलांटी नसते, तरी तिचा उच्चार इकारान्त होतो. एकाच वेलांटीने 'इ' ची ' ई' होते, तसेच एकाच मात्रेने 'ए'चा 'ऐ' होतो, यात काय आश्चर्य?--वाचक्‍नवी

ए आणि ऐ चा समारोप कोण करेल.

आपण सांगितलेले जर बरोबर असेल तर पे चा पै का नाही होत.? याचे स्पष्टीकरण कुठे आहे.

जसे ऐ या वर्णाला चिन्हाने दाखवितांना दोन मात्रेच दाखविले जातात.बाराखडीतल्या 'कै' वर म्हणूनच दोन मात्रे आहेत.

ए= अ+इ किंवा ई
ऐ=आ+इ किंवा ई = दोन स्वर एकत्र येऊन हे स्वर बनले असल्यामुळे यांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात. -हस्व व दीर्ध हे स्वरांचे प्रकार त्यांचा उच्चार करावयास लागणा-या कालावधीवरुन ठरवितात.त्यांनाच "मात्रा" म्हणतात. -स्व स्वर उच्चारायला जो वेळ लागतो त्याची एक मात्रा मानतात.दीर्घ व संयुक्त स्वरांच्या दोन मात्रा मानतात.म्हणुन दोन मात्रा दिल्या पाहिजेत असे माझे मत आहे.

यनावाले आणि अन्य अभ्यासकांच्या मताची मी वाट पहात आहे.

व्याकरणाच्या प्रकरणात गोंधळलेले, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इ,ई,उ,ऊ,ए,ऐ - वेगळ्या पध्दतीने लिहिले तर

इ -हे अक्षर अ ला पहिली (र्‍हस्व) वेलांटी
ई -हे अक्षर अ ला दुसरी (दीर्घ) "
उ - हे अक्षर अ ला पहिला (र्‍हस्व) उकार
ऊ - " " अ ला दुसरा (दीर्घ) "
ए - " " अ ला एक मात्रा
ऐ - " " अ ला दोन "

असेही लिहिता येते. (इथे टंकलेखनाच्या मर्यादेमुळे लिहिता येत नाही.) त्यामुळे ऐ ला (ए वर) दोन मात्रा नसतात तर त्या प्रत्यक्षात अ वर दोन मात्रा असतात असे वाटते.
बरोबर की चूक?

वेगळी पद्धत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं ,अ:
ही बारा स्वरांची बारा चिह्ने आहेत. ती तशीच लिहायला हवीत.या लेखनासाठी अन्य कोणतीही पद्धत योग्य नाही; असे माझे मत आहे.

प्र का टा आ

प्र का टा आ

वर्णमाला

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(खरड वहीतील तुमचे लेखन वाचले.तरीसुद्धा मी तत्पूर्वी जे मनात ठरविले होते ते इथे लिहितो.)
........बारास्वर हे 'अ'च्या बाराक्षरीच्या(बाराखडी हा बाराक्षरीचा अपभ्रंश आहे. क्ष चा ख होतो. जसे: क्षीर->खीर )स्वरूपात लिहिता येईल का?असा प्रश्न श्री.विसुनाना यांनी उपस्थित केला होता.त्याला उत्तर म्हणून माझा प्रतिसाद आहे. तो मी त्यांना संबोधित करायला हवा होता म्हणजे तुमचा गैरसमज झाला नसता.असो.
.......तुमच्या लेखातील कोणत्याही विधानाचा मी प्रतिवाद केलेला नाही.वर्णमाले विषयीचे तुमचे ज्ञान इतके मूलगामी आणि सखोल आहे की त्यासंदर्भात तुमची अधिकारवाणी निर्विवाद आहे.लेखात काही नगण्य चुका आहेत पण ते अनवधानाने राहिलेले दोष आहेत हे स्पष्ट आहे. (नाही म्हणायला एक दोष आहे."हलन्त व्यंजने वापरली...असे काहीसे ते विधान आहे. पण "एकोSहि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दो: किरणेष्विवाङ्कः|" असे म्हटलेच आहे.)
.......तुमचा दुसरा लेख तर अधिकच मौलिक आहे.एवढी माहिती तुम्ही मिळवता तरी कुठून?अशा लेखांवर प्रतिसाद तरी काय लिहिणार?हे लेख वाचावे आणि शक्य तेव्हढे समजून घ्यावे एवढेच.तुमचे लेख स्वयंसिद्धच आहेत.इथे श्री.तात्या लिहितात त्याप्रमाणे"बाकी तुमचे ते तिकडे चालू द्या."असे लिहिणेच हाती राहाते.
.....यनावाला.

चुका

लेखात काही नगण्य चुका आहेत पण ते अनवधानाने राहिलेले दोष आहेत हे स्पष्ट आहे.

ओह्ह्ह् हो का? कोणत्या चुका आहेत, त्या सांगितल्यात तर लगेच त्या दुरुस्त करता येतील. स्, श्, ष् ची चूक कळली. पुढच्या लेखापासून आपण सांगितलेल्या क्रमाने लिहिन.

नाही म्हणायला एक दोष आहे."हलन्त व्यंजने वापरली...असे काहीसे ते विधान आहे.

ह्म्म्म्म् यात काय दोष आहे ते लक्षात आले नाही.

राधिका

हलन्त

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हल् या संस्कृत शब्दाचा अर्थ व्यंजन असा आहे. 'त' हे अक्षर तर 'त् 'हे व्यंजन आहे. ('अ' हे अक्षर असून तो स्वरही आहे. 'अमर' या शब्दात 'अ' हे अक्षर असून म=म्+अ यात अ हा स्वर आहे.) व्यंजन हे पाय मोडकेच लिहावे लागते.तुम्ही लिहिले आहे:" लिहिताना ती हलन्तच असतील." इथे 'ती' हे सर्वनाम ' व्यंजने' या नामासाठी आलेले आहे. आता व्यंजने हलन्त असतील म्हणजे काय? 'भगवन्',' 'सरित्' या शब्दांच्या शेवटी व्यंजन आहे. म्हणून त्याना व्यंजनान्त अथवा हलन्त शब्द म्हणणे योग्य आहे. परंतु "हलन्त व्यंजन" हा शब्दप्रयोय चुकीचा आहे.असो .हे काही महत्त्वाचे नाही. तुम्ही विचारले म्हणून लिहिले. चूक असल्यास कळवावे.

अच्छा,

असे आहे होय! मी इतकी वर्षे हलन्त म्हणजे पायमोडकी अक्षरे व हल् म्हणजे अक्षराचा पाय मोडण्याची खूण असलेली तिरकी रेष असे समजत होते. आता आपले स्पष्टीकरण वाचून डोक्यात प्रकाश पडला व हलन्त व्यंजन ही द्विरुक्ती आहे हे समजले.
व्यंजन म्हटले की त्यात स्वराचा समावेश नसतो, हे मान्य. पण तरीही आपण व्यंजन व स्वरमिश्रित व्यंजन (किंवा अक्षर) यांत गफलत करतोच, म्हणून मला 'पायमोडके अक्षर केवळ व्यंजन सूचित करण्यासाठी वापरले आहे' असे मुद्दाम सुचित करायचे होते. माझ्या गैरसमजामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा, माझी त्यासाठीची शब्दनिवड चुकली.
असो, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

श् ष् स् ह्.

अक्षरांचा क्रम श ष स ह असा आहे हे लेखिकेच्या कुणीतरी आणून दिले आहे, पण तशी दुरुस्ती अजून मूळ लेखात 'उपक्रमा'कडून केली गेलेली नाही. ती दुरुस्ती झाल्यास लेख 'अखोड' होईल. अजून एक सुधारणा सुचवावयाशी वाटते. स्वरांचा क्रम : इ,ई,उ,ऊ,ऋ. ॠ, ऌ, ॡ असा आहे. ऋ, ॠ, ऌ (लृ नको!) शेवटी टाकले आहेत आणि ॡ घेतलेलाच नाही. खरे तर (हा क्रम बरोबर असल्याने) अर्धस्वरांचा क्रमसुद्धा य्, व्. र्, ल् असा हवा. फार पूर्वी कुणीतरी चूक केली आहे. आपण ती आता सुधारू शकत नाही, कारण शब्दकोशात चुकीच्याच क्रमाने शब्द असतात. --वाचक्नवी

ह्म्म्म्

ॡ घेतलेलाच नाही.

याची कारणे दोन आहेत. एकतर हा माझ्या माहितीप्रमाणे प्लुत स्वर आहे व संस्कृत वाङ्मयात त्याचा फारसा उपयोग होत नाही. आणि जर ॡ हवा असेल, तर इतर प्लुत स्वर का नकोत, असा प्रश्न उभा राहिल. स्वरांवरील लेखात मी एक-दोन ओळींत प्लुत स्वरांची माहिती देईन, त्याहून जास्त माहिती एक तर माझ्याकडे नाही, कुणाकडे असल्यास कृपया स्वरांवरील लेख लिहून झाल्यावर ती द्यावी.

ऌ (लृ नको!)

हे मलाही मान्य आहे पण ऌ हे अक्षरचिह्न कसे टंकायचे ते मला माहिती नाही, कृपया सांगावे.

अर्धस्वरांचा क्रमसुद्धा य्, व्. र्, ल् असा हवा

हे खरे, पण तसा तो नाही. मी मुळात वर्णमालेत ज्या क्रमाने वर्ण आले आहेत, त्या क्रमाने दिले आहेत. जर आपल्याला य् र् ल् व् वर आक्षेप घ्यायचा असेल, तर ळ् शेवटी का असेही विचारावे लागेल. मुळात य् र् ल् व् आणि संबंधित स्वर (इ, ऋ, ऌ, उ) यांच्यातला संबंध काय तो मी दाखवून दिला आहे. वर्णमालेचा क्रम काय आहे, यापेक्षा त्यात तर्क काय आहे, हे मला अधिक महत्त्वाचे वाटले. याऊप्पर स्वतः म्हणताना किंवा दुसर्‍याला शिकवताना य् र् ल् व् या क्रमाने म्हणावे की य्,व्,र्,ल् या, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे वाटते.
राधिका

आपल्या मताचे स्पष्टीकरण

यनावालासाहेब, आपल्या मताचे स्पष्टीकरण जाणून घेण्यास उत्सुक आहे.
आ, ओ,औ,अं आणि अ: या स्वरांना 'अ'असलेली अक्षरे का आहेत? इ,ई, उ,ऊ,ए,ऐ - या स्वराक्षरांप्रमाणे त्यांनाही स्वतंत्र अक्षरे का नाहीत?
आपल्या मताला विरोध नाही. पण त्यामागचे कारण आपल्यासारख्या ज्येष्ठ जाणकाराकडून समजावून घ्यावेसे वाटते. म्हणजे माझी याबाबतची मते तपासून पाहता आणि योग्य वाटले तर बदलता येतील. कृपया राग मानू नये.

' अ' ची बाराखडी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना यांसी ,
आपण 'म्'ची तसेच 'अ'ची बाराखडी लिहू:
...........म..................अ
..........म्+अ=म..........अ+अ=अ
...........म+आ=मा........अ+आ=आ
...........म् +इ=मि........अ+इ=?
............म् +ई =मी.......अ+ई=?
............म् +उ =मु.......अ+उ=?
............म् +ऊ =मू.......अ+ऊ=?
............म् +ए =मे........अ+ए=?
............म् +ऐ=मै..........अ+ऐ=?
...........म् +ओ =मो.........अ+ओ=ओ
............म्+औ =मौ.........अ+औ =औ
.............म् +अं=मं.........अ+अं =अं
............म् +अ:=मः.......अ+अ: =अ:
समीकरण उच्चारांनुसार बरोबर हवे.जिथे ? आहे तिथे कोणते अक्षर लिहिता येईल?
आपणांस काय वाटते ते कृपया कळवावे.
या संदर्भात श्री.युयुत्सु यांनी लिहिले आहे ते योग्य आहे. परंतु सावरकरांचा हेतू देवनागरी लिपी सुलभ करण्याचा आहे. इंग्रजीत(रोमन लिपी) २६ मूळक्षरे आहेत तर देवनागरीत ५२. तसेच अक्षरांची वळणे अवघड आहेत(ई.ह,छ..इ.) अ ची बारखडी केली तर काही अक्षरे कमी होतील. लिपी शिकणे सोपे होईल असा त्यामागे विचार आहे.

विसुनाना सहमत !

आपण आणि मी जो तर्क केलाय,तो खटला व्याकरणाच्या कोणत्याही कोर्टात चालू द्या. मला विश्वास आहे,आपण जसे बरोबर् आहात,तसा
मीही बरोबर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पे चा पै

आपण सांगितलेले जर बरोबर असेल तर पे चा पै का नाही होत?
जसा एका मात्रेने ए चा ऐ होतो अगदी तस्साच एका मात्रेने पे चा पै होतो.--वाचक्‍नवी

सुरेख

वा! लेखमाला उत्तम आहे. मलाही या विषयातील ज्ञान अत्यल्प असल्याने येथे कोणती चर्चा होईल त्याबाबत उत्सुकता आहे. काही प्रश्न

१. अं आणि अ: हे मराठीत आले का? ते संस्कृतात नाहीत का?
२. श् आणि ष् यांचे वेगवेगळे उच्चार कसे करावे? तसेच क्ष = क् + ष् असेल तर त्याचा उच्चारही पोटफोड्या ष् मुळे वेगळा करायचा असतो का?

अं, अः, श, ष

संस्कृतमधील 'अ'च्या अठरा उच्चाराफैकी 'अं' हा एक उच्चार आहे. मराठीत अं/अः हे स्वर समजले जातात. (२) संस्कृतातील विसर्ग हे शब्दान्ती येणाया हलन्त 'स' किंवा 'र' च्या ऐवजी येणारा विकल्प आहे. तो स्वर नाही. विसर्गाचे उच्चारही नमः, दुःख किंवा कःपदार्थ यात असल्याप्रमाणे तीन वेगवेगळे आहेत. (३) 'श' तालव्य तर 'ष' मूर्धन्य आहे, अर्थात उच्चार वेगळे. 'क्ष'मध्ये 'ष 'असल्याने उच्चार 'क्श 'होणार नाही. --वाचक्‍नवी

अणुरणीया थोकडा तुका आकाशाएवढा...

जसे 'ण्' हा एक अणू आहे. 'अ' हा दुसरा अणू आहे. हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा 'ण' हा रेणू बनतो. त्याचप्रमाणे 'क्ष' हा 'क्', 'ष्', 'अ' या अणूंपासून बनलेला रेणू आहे तर 'ज्ञ' हा आजच्या काळानुसार 'द्', 'न्', 'य्' या अणूंपासून बनलेला रेणू आहे.

राधिका,

आमच्या अण्णांनी मालकंसात म्हटलेला एक अभंग आहे,

'अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा!'

तुझ्या या लेखमालेची व्याप्ती मालकंसासारखी सात्विक आणि आकाशाइतकी माहितीपूर्ण होऊ दे, अशी कौतुकपूर्ण शुभेच्छा देतो! खरं सांगायचं तर तुझ्या लेखाचा जो विषय आहे त्यासंबंधी मला फारच कमी माहिती आहे.

सदर लेखामध्ये 'स्वर' हा शब्द वाचला आणि मला आमच्या भाषेतल्या १२ स्वरांची आठवण झाली. जिथे उच्चार आला तिथे स्वर आला! मग तो गाण्यातला असो वा तुझ्या लेखातल्या व्याकरणातला असो!

आमच्या भाषेतल्या स्वरांची महती,

'तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार'

अशी आहे!

तुझ्या ह्या स्वरांच्या, व्यंजनांच्या, वर्णांच्या लेखमालेतून आम्हाला 'अक्षर ओळख' होऊ दे आणि माउलीच्या 'ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन' ची आठवण होऊ दे हीच शुभेच्छा देतो.

अवांतर - वरील 'अक्षर ओळख' या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. मी एका माणसाला सहज म्हटलं होतं की मला अजून 'अक्षराची' ओळख नाही. त्यावर तो हसला आणि मला म्हणाला, 'छे! काहीतरीच काय? तुम्ही तर अक्षरं लिहिता, आणि ओळख नाही असं म्हणता?'! ;)

पण मी त्या माणसाला हसणार नाही. कारण 'अक्षर' हा शब्द वाटतो तितका साधा नाही. माउलींच्या, तुकोबांच्या, आणि तुमच्या क्षेत्रातल्या कालिदासाच्या साहित्याचा आयुष्यभर अभ्यास केल्यास कदाचित 'अक्षरओळख' होऊ शकते एवढंच या लांबलेल्या प्रतिसादाच्या (की प्रवचनाच्या?) शेवटी म्हणू इच्छितो!

असो, लेखमालेकरता मन:पूर्वक शुभेच्छा!

आपला,
(बारा स्वरांच्या दिंडितला एक वारकरी!) तात्या अभ्यंकर.

साक्षर

गुजराथीमध्ये साक्षर म्हणजे पंडित किंवा विद्वान लेखक. त्या अर्थाने आम्ही निरक्षर आहोत.--वाचक्‍नवी

वावा!

वावा! फारच छान विषय आहे.
पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का?
या प्रश्नांच्या उत्तरांविषयी उत्सुकता आहे.
आपला
(जिज्ञासू) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

सहमत

वावा! फारच छान विषय आहे.
पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का?
या प्रश्नांच्या उत्तरांविषयी उत्सुकता आहे.

जिज्ञासूरावांशी सहमत.

धन्यवाद.

या लेखाच्या विषयाला अनुसरून प्रतिसाद दिलेल्यांना धन्यवाद.

राधिका

उत्तरे

या भागावर काहींनी फार चांगले प्रश्न विचारले. आपल्या मनात अक्षरे म्हणजेच उच्चार असे समीकरण किती खोलवर रुजले आहे ते दिसून येते.

'ऍ' आणि ऑफीस 'ऑ' चा उच्चार कसा ?

'ऍ' हे अक्षर खरे म्हणजे मी चूक लिहिले आहे, कारण योग्य अक्षर टंकित करण्याची सोय नाही. 'ए' वर मी चंद्र काढला आहे. पण तो 'अ' वर हवा. हा उच्चार 'कॅट' या इंग्रजी शब्दातील स्वराचा उच्चार आहे. 'ऑ' हा ऑफिस मधला 'ऑ' आहे हे आपणच सांगितलेत.

मराठी वर्ण मालेत अधिकृतरीत्या 'ऍ' आणि 'ऑ' चा समावेश झाला किंवा नाही.?

याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृत वर्णमालेशी आपला तसा संबंध नाही. कारण तसेही आपण अधिकृत वर्णमालेतील 'अं', 'अ:', 'क्ष', 'ज्ञ' ही अक्षरे विचारात घेतलेली नाहीतच. या लेखमालेत आपण विचारात घेणार आहोत ते केवळ उच्चार, ते लिखित स्वरुपात मांडायला जरी आपण चिह्न म्हणून अक्षरांची मदत घेतली, तरीही या लेखमालेपुरता आपल्या अभ्यासाचा विषय उच्चार हा आहे.

ऐरणी =चा उल्लेख करतांना दोन मात्रे दिले असते तर चालले नसते का ?

वर्णांसाठी चिह्ने निर्माण करताना चिह्नकर्त्यांनी नेमका विचार काय केला असेल ते सांगता येणार नाही. परंतू ए व ऐ तसेच ओ व औ यांच्यात जो संबंध आहे, तो ऐ व ऍ तसेच औ व ऑ यांच्यात नसल्यामुळे आणखी एक मात्रा देण्याचा विचार टाळला असेल असे वाटते. आता ए व ऐ, ओ व औ यांच्यात काय संबंध आहे ते स्वरांवरील लेखात पाहू.

अं आणि अ: हे मराठीत आले का? ते संस्कृतात नाहीत का?

संस्कृतात अनुनासिके व विसर्ग दोन्ही आहेत. या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपल्याला स्वरांवरील लेख वाचल्यावर मिळेलच. तोवर अं व अ: हे दोन स्वर आहेत असे आपल्याला वाटते का? या माझ्या प्रश्नावर विचार करा.

श् आणि ष् यांचे वेगवेगळे उच्चार कसे करावे?

व्यंजनांवरील लेखात याचे उत्तर मिळेल.

तसेच क्ष = क् + ष् असेल तर त्याचा उच्चारही पोटफोड्या ष् मुळे वेगळा करायचा असतो का?

वरील प्रश्नाच्या उत्तरावरून या प्रश्नाचे उत्तर आपले आपणच मिळेल.

राधिका

छान

उत्तम आणि रोचक विषय. मांडलाही चांगला आहे. लेख आवडला. तू दिलेल्या वर्णमालेमध्ये ऋ का नाही? कारण त्याचा विचार ह्या लेखमालेमध्ये करायचा नाही म्हणून? पाठ करण्यासाठी वर्णमाला लिहायची असेल तर त्यात ऋ हवा असे वाटते.

अवांतर - लेखामधले "आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते." हे विधान पटले नाही. इंग्रजी वर्णमाला ए ते झेड/झी पर्यंत बिनचूक म्हणता येणारे अनेक मिळतील, मात्र अगदी मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असले, वा सध्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असणार्‍या बहुतेकांना आपली वर्णमाला पाठ नसते. अगदी स्वर-व्यंजने क्रमाने नाही म्हटलीत तरी चालेल, सगळे वर्ण सांगता आले तरी चालतील असे विचारले तरी ते अनेकांना सांगता येत नाहीत. त्यामुळे आपली वर्णमाला पाठ असायला हवी हे बरोबर, पण तशी ती असते हे म्हणणे फारच धाडसाचे आहे.

(उपक्रमींपैकी किती जणांना वर्णमाला क्रमाने पाठ आहे ह्याचे प्रामाणिक उत्तर मला जरूर पाठवा. )

----------------------------------
ही सहीच आहे, नाही? :)

उत्तरे

तू दिलेल्या वर्णमालेमध्ये ऋ का नाही?

क्षमस्व माम्! ऋ, ॠ व लृ हे तीन स्वर स्वरयादीत समाविष्ट करायचे राहिलेच. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
संपादकमंडळाला स्वरयादी संपादित करून त्यात हे ३ स्वर समाविष्ट करायची विनंती.

पाठ करण्यासाठी वर्णमाला लिहायची असेल तर त्यात ऋ हवा असे वाटते.

नाही, मी ही वर्णमाला पाठ करायला येथे दिलेली नाही. मला केवळ वर्णमालेतील वर्णांचे म्हणजेच उच्चारांचे परस्परसंबंध वा त्यांतील गंमती दाखवायच्या आहेत. या वर्णांच्या अक्षरचिह्नांशी मला या लेखमालेपुरते काहीही कर्तव्य नाही. त्यामुळे माझ्या लेखमालेत अभ्यासायला घेतलेली 'संपादित' वर्णमाला पाठ करावयाच्या उपयोगाची राहणार नाही.

आपली वर्णमाला पाठ असायला हवी हे बरोबर, पण तशी ती असते हे म्हणणे फारच धाडसाचे आहे.

:D

उपक्रमींपैकी किती जणांना वर्णमाला क्रमाने पाठ आहे ह्याचे प्रामाणिक उत्तर मला जरूर पाठवा.

मला पाठ आहे बुवा. ऋ वगैरे केवळ नजरचुकीने राहिले. नाहीतर तशी पाठच आहे. :D
राधिका

उत्तम

लेखाची कल्पना व मांडणी उत्तम आहे. पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत.

संपादकमंडळाला विनंती

संपादकमंडळाला विनंती

कृपया येथे आलेले अक्षरचिह्नांवरचे प्रतिसाद वेगळे काढून देवनागरी 'लिपी' संबंधातली वेगळी चर्चा सुरू करता येईल का?
राधिका

बा युयुत्सुदेवा,

सदर लेखावर एक उपचर्चा

यापेक्षा एक वेगळी चर्चा सुरू केल्यास जास्त संयुक्तिक होईल.

हल = नांगर

हे जरी खरे असले, तरी हलन्त हा शब्द हल् + अन्त असा आहे, हल + अन्त= हलान्त असा नव्हे. हल् म्हणजे व्यंजन.

हलन्त हे अक्षरचिन्ह की स्वरचिन्ह ?

यनावालामहोदयांचा मूळ प्रतिसाद नीट वाचलात, तर आपल्या लक्षात येईल, की हलन्त हे कोणतेही चिह्न नसून व्यंजन शेवटी येणारा शब्द आहे.

लेखिकेच्या मते अक्षरचिन्हावरचे प्रतिसाद ह्या लेखातून काढून टाकावे.

असे वाक्य लिहून आपल्याला लेखिकेशी सहमती दर्शवायची आहे, की विरोध?

बा युयुत्सुदेवा,

सदर लेखावर एक उपचर्चा

यापेक्षा एक वेगळी चर्चा सुरू केल्यास जास्त संयुक्तिक होईल.

हल = नांगर

हे जरी खरे असले, तरी हलन्त हा शब्द हल् + अन्त असा आहे, हल + अन्त= हलान्त असा नव्हे. हल् म्हणजे व्यंजन.

हलन्त हे अक्षरचिन्ह की स्वरचिन्ह ?

यनावालामहोदयांचा मूळ प्रतिसाद नीट वाचलात, तर आपल्या लक्षात येईल, की हलन्त हे कोणतेही चिह्न नसून व्यंजन शेवटी येणारा शब्द आहे.

लेखिकेच्या मते अक्षरचिन्हावरचे प्रतिसाद ह्या लेखातून काढून टाकावे.

असे वाक्य लिहून आपल्याला लेखिकेशी सहमती दर्शवायची आहे, की विरोध?

वर्णमाला- (समज- गैरसमज)

सौरभ

'हलन्त' याविषयीं मला आणखी जरासें वेगळें वाटतेंय तें इथे लिहितो, पहा तुम्हाला योग्य वाटतंय का.

हल्=व्यञ्जन, अन्त=शेवट, म्हणून हलन्त='हल्'ने होणारा शेवट, आणि अशा प्रकारचा शेवट असलेला जो शब्द त्याला 'हलन्त' शब्द न म्हणता 'हलन्त्य' शब्द म्हणावे.

हल्=व्यञ्जन
अन्त=शेवट
हलन्त=व्यञ्जनात्मक शेवट (व्यञ्जनाने होणारा शेवट)
हलन्त्य=व्यञ्जनात्मक शेवट असलेले असे जे काही असेल ते
आता तुम्ही म्हणाल 'हलन्त' आणि 'हलन्त्य' यांत फरक काय ? तर फरक असा की 'हलन्त' हे 'नाम' आहे आणि 'हलन्त्य' हे विशेषण आहे.

अजूनही लक्षात येत नसेल तर थोडासा इंग्लिशचा आधार घेऊन स्पष्ट करतो:
हल् = व्यञ्जन = Consonant
अन्त = शेवट = End
हलन्त = व्यञ्जनात्मक शेवट (व्यञ्जनाने होणारा शेवट) = Consonantal end
हलन्त्य = व्यञ्जनात्मक शेवट असलेले असे जे काही असेल ते = Consonantally ending….

उदाहरणार्थ :
हलन्त्य शब्द = Consonantally ending word
हलन्त्य शब्दसमूह = Consonantally ending phrase
हलन्त्य वाक्य = Consonantally ending sentence

दुसरी एक गमतीची गोष्ट लक्षात आली, हलन्त दाखवण्याकरता देवनागरीत जे चिह्न वापरतात, ते हलाच्या म्हणजे नांगराच्या फाळासारखेच दिसते. त्यामुळे 'हल्' आणि 'हल' यांचे एकमेकांशी काही नाते अहे कायसे वाटते.

हलन्त

हल् हे पाणिनीय व्याकरणातले एक पारिभाषिक नाम आहे. तिथे शिवसूत्रे (अथवा माहेश्वरसूत्रे) नावाच्या सूत्रमालेत त्या शास्त्रास उपयुक्त अशी लुघुतम वर्णमाला सांगितलेली आहे. त्या सूत्रावलीतील क्रमबद्ध वर्णांच्या गटांना अत्यंत सुटसुटीत पारिभाषिक नामे योजता येतात. पैकी दोनच प्राकृत भाषांमध्ये वापरात आलेली दिसतात - अच् आणि हल्. कारण क्रमाने त्यांचे "स्वर" आणि "व्यंजन" हे अर्थ संस्कृताबाहेरही उपयोगी पडतात. हल् म्हणजे सूत्रक्रमात "ह"पासून सुरू करून "ल्" या खुणेपर्यंतचे सर्व वर्ण. हा शब्द मुळात अर्थपूर्ण असला तरी ती सूत्रमाला (आणि तो वर्णक्रम) मराठीत शिकवत नसल्यामुळे आता "हल्" शब्द "व्यंजन" यासाठी (अन्यथा) निरर्थक प्रतिशब्द मानण्यास हरकत नाही.

हलन्त हा शब्द विशेषण आणि नाम दोन्ही प्रकारे प्रचलित आहे. हा बहुव्रीही समास आहे. त्याची फोड आहे - "हल् ज्याचा अंत आहे असा". हवी तर अशी फोड मराठीत करता येईल. न आवडल्यास (तशी फोड संस्कृतात व्याकरणशुद्ध आहे असे जाणून) त्यास मराठीत आलेला तत्सम शब्द मानता येईल.

एकच शब्द विशेषण आणि नाम म्हणून संदर्भानुसार वापरायची मराठी भाषेची (अनेक भारतीय भाषांची) लकब आहे. "मोठ्यांस नमस्कार आणि लहानांस आशीर्वाद" - या वाक्यात "मोठा" आणि "लहान" शब्द नामे म्हणून वापरलेली आहेत. "मोठे मासे, छोटे मासे" या वाक्यखंडात "मोठा" आणि "छोटा" शब्द विशेषणे म्हणून वापरलेली आहेत.

शब्दक्रमामुळे अर्थ स्पष्ट असतो. त्यामुळे केवळ इंग्रजीच्या समांतर म्हणून विशेषण आणि नाम असे वेगवेगळे पारिभाषिक शब्द करणे जरुरीचे नाही. कधी भाषांतर करण्याची वेळ आलीच तर संदर्भाने योग्य इंग्रजी प्रतिशब्द कळेलच.

धनंजय

वा

फारच सुंदर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
राधिका

वर्णमाला- (समज- गैरसमज)

सौरभ

मी वरील विवेचन इंग्लिशाच्या समांतर असण्याकरिता मांडलेले नाही. त्याचबरोबर माझा दृष्टीकोन 'नाम' आणि 'विशेषण' यातील भेद असा देखील नाही.....मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या नेमकं लक्षात आलेले नाही...

'हलन्त' आणि 'हलन्त्य' या शब्दांनी बोध होणर्या गोष्टी एकच नाहीत....असे मला म्हणायचे आहे.

माझ्या मतानुसार 'हलन्त' शब्दाने त्या शब्दाचा बोध न होता त्या शब्दाच्या अंताचा बोध होतो....'हलन्त्य' मधून त्या सम्पूर्ण शब्दाचा बोध होतो.

उदा० शब्द कसा आहे ? शब्द 'हलन्त्य' आहे. शब्दाचा अंत कसा आहे ? शब्दाचा अन्त 'हलात्मक' आहे.
शब्दात 'हलन्त' असल्यामुळे शब्द 'हलन्त्य' आहे.

कल्पना एक की दोन

तुम्ही हा मुद्दा उत्तम आणि स्पष्ट मांडला आहे.

दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकाच वर्णक्रमाने ("शब्दाने") बोध करायचा, पण संदर्भानुसार मथितार्थ नि:संदिग्ध असण्याची लकब बहुतेक भाषांमध्ये दिसते.

उदा.
१. "मोठा माणूस नमस्कार करण्याजोगा असतो",
२. "मोठ्यांस नमस्कार करावा"

१. माणूस कसा आहे? माणूस "मोठा" आहे. (समांतरः शब्द कसा आहे? "अमुक")
२. ज्याच्यापाशी मोठेपणा आहे तो (माणूस) कोण? "मोठा". (समांतरः "अमुक" गुणाने युक्त तो [शब्द] कोणता?)

तुमची सूक्ष्म दृष्टी येथे मान्य! हलन्त हा "हल्+अन्त" असा समास आहे असे समजल्यावर, तो सामासिक शब्द जर प्रथमच ऐकला असेल, तर तुम्ही लावलेला अर्थ अगदी योग्य आहे:
" 'हलन्त' ...ने ... अंताचा बोध होतो "
अनोळखी समासाचा अर्थ आधी तत्पुरुष समास मानून लावावा. आणि तत्पुरुष समासात दुसरे पद प्रधान असल्यामुळे, तो समास कुठल्याशा अन्ताचा बोध करत असावा.
उदा: युगान्त, दु:खान्त,... हे सर्व कुठल्यातरी प्रकारचे अन्त आहेत.

त्यातही पहिले पद "गुणवचन ~ विशेषणासारखे काहीतरी" असेल तर तो कर्मधारय समास म्हणून अर्थ काढावा.
उदा: दु:ख हा गुण असलेला अन्त = (गोळाबेरीज अर्थः दु:खात्मक अन्त)

पहिले पद गुणवचन नसेल तर तो षष्ठी तत्पुरुष मानून अर्थ काढावा:
उदा: युगाचा अन्त (युगात्मक अन्त असे म्हणून चालत नाही, कारण "युग" हे गुणवचन नाही.)

"हलन्त" हा सामासिक शब्द जर रूढ नसता, तर अशाप्रकारे त्याचा अर्थ
"हलाचा अन्त" असा करावा लागला असता. (अर्थात् हा अर्थ तुम्हाला अभिप्रेत नाही . "हल् आत्मक अन्त" असा कर्मधारय तुम्हाला अभिप्रेत असावा. पण "हल्" [अर्थ "व्यंजन"] हे पद गुणवचन नसल्यामुळे त्याचा स्पष्ट अर्थ लागत नाही.)

रूढ सामासिक शब्दांची फोड मात्र रूढीप्रमाणेच करावी लागते, नाहीतर अर्थाचा विपर्यास होतो.
नाहीतर आमच्या घरी दररोज जो "काकबली" देतो त्याचा अर्थ आम्ही "कावळ्यांचा बळी" देतो असा भयंकर निघेल! खरे तर आम्ही "कावळ्यासाठी बळी" (म्हणजे रोजच्या अन्नातला एक छोटा भाग) देतो. तो अर्थ रूढीप्रमाणेच (चतुर्थी तत्पुरुष) काढला पाहिजे.

तसाच 'लंबोदर' समासाचा "default" अर्थ 'कुठल्यातरी प्रकारचे उदर' जाणून 'मोठे पोट' (कारण 'लंब' गुणवचन आहे) असा होतो. गरीब बिचारा गणपतिबाप्पा!
'लंबोदर' समासाची फोड रूढीप्रमाणे
लंब उदर ज्याचे तो = मोठ्या पोटाचा (पुरुष व्यक्ती) असा बहुव्रीही समास जाणूनच करावी लागते.

"हलन्त" हा सामासिक शब्द रूढ असल्यामुळे त्याची रूढीप्रमाणे बहुव्रीही म्हणूनच फोड केली पाहिजे. "हल् ज्याचा अन्त आहे असा (वर्णसमूह)".

अर्थात् रूढ शब्द कधीकधी पूर्णपणे विसरला जातो, आणि मग तुम्ही म्हणता तसा "default" समासाचा अर्थ निघू शकतो. याची उदाहरणे मराठीत आहेत. पण हलन्त हा रूढ शब्द अजून पूर्णपणे विसरला गेला आहे का?

अहो - मजेमजेची चर्चा आहे, तुमचे लेख मी विचारपूर्ण म्हणून आनंदाने वाचतो. लोभ असावा क्षोभ नसावा.

धनंजय

कल्पना एक की दोन

सौरभ

अहो लोभ आहे मणूनच तर एव्हढं लिहिलंत, नाहीतर कोण आपला वेळ फुकट घालवून इतकं समजावून सांगतोय ?
त्यामुळे आमचाही लोभच आहे... :):)

बाकी तुम्ही आणि राधिका ताई खूपच छान आणि अभ्यासपूर्ण लिहिता.....

'देवनागरी लिपी'

सुबोध लिपी - एक नवी सुरवात

'देवनागरी लिपी' या विशयावर मी काही लिखाण एक हेतु मनाशी बाळगून केले आहे. ते माझ्या http://rawlesatish.info या वेब साईट वर प्रकाशित केले आहे. या विशयाची आवड असणार्‍यांना ह्या वेब साईट ला भेट देवून त्या वरील लिखाण वाचण्याचे आमंत्रण देत आहे.

मी स्वत: टकनाचे रितसर प्रशि़क्षण घेतलेले आहे परंतु काही कारणास्त्व युनिकोड मध्ये टंकन करताना माझी भारी दमछाक होते आणि म्हणूनच तुमच्या या चर्चेत मला ईच्छा असून ही सहभागि होता येत नाही. तुम्ही माझे लिखाण वाचुन जर त्यावर प्रतिक्रीया दिलीत तर मलाही तुमच्या चर्चेत सहभागि झाल्याचे समाधान लाभेल.

 
^ वर