लिनक्स विषयी थोडेसे
उबंटू लिनक्स हा, लिनक्स या कार्यकारी प्रणालीचा एक स्वाद आहे. या लेखात लिनक्स आणि मुक्त प्रणालींविषयी जास्त माहिती देत आहे.
लिनक्स ही काही केवळ एक संगणक प्रणाली नाही. ती एका जागतिक चळवळीचा महत्वाचा भाग आहे. सारे जग एकाच अर्थधर्माचे पालन करत असताना, संगणक हा त्यातला महत्वाचा घटक बनला आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. या अतिमहत्वाच्या घटकावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही धसका घ्यावा असे तत्वज्ञान लिनक्स मागे आहे.
ज्यावेळी संगणक क्षेत्रात घडवल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्मितीची केवळ दामदुप्पटच नव्हे तर कैक पट वसुली करण्याची पद्धत होती, त्यावेळी मुळच्या फिनलंडच्या आणि नंतर अमेरिकास्थित लिनस टोरवाल्ड्स या संगणक तज्ञाने मोठ्या संगणकावर वापरल्या जाणाऱ्या युनिक्स या कार्यप्रणाली सारखी ताकदवान आणि तिच्याशी नाते सांगणारी नवी प्रणाली व्यक्तिगत संगणकांसाठी लिहिली.... खरे तर त्याचा गाभा तयार केला. आणि इंटरनेट वरून तो इतरांसाठी खुला केला. जगभर पसरलेल्या संगणक तज्ञांना तो आवडला. नंतर त्यांनी त्या गाभ्यावर अवलंबून अशी कार्यकारी प्रणाली जन्माला घातली. वाढवली. आता या बाळाने चांगलेच बाळसे धरले आहे.
त्याही आधी रिचर्ड एम्. स्टॉलमन या संगणकतज्ञाने असा विचार मांडला की प्रत्येक संगणक प्रणाली मुक्त असायलाच हवी. हा विचार त्याने मग त्याच्या फ्री सॉफ्टवेअर फौंडेशन या संस्थेमार्फत जगभर पसरवला. या विचारांमधील मूळ तत्व असे की प्रत्येक प्रणाली व त्यातील प्रोग्राम्स सर्वांना वाचण्यासाठी, कॉपी करण्यासाठी , वापरण्यासाठी आणि बदल करून सुधारणा करण्यासाठी खुले असायलाच हवेत. हा खुलेपणा-स्वातंत्र्य ' फ्री ' या शब्दात अभिप्रेत आहे.
तलवारी पेक्षा तराजू बरा या न्यायाने नवनिर्मिती, उत्पादन व विक्री याचा वापर इतरांवर ताबा मिळवण्यासाठी करण्याचे तंत्र, यंत्रसंस्कृतीने रुजविले आणि बाजाराचे रूपांतर रणांगणात केले. अशा काळात उत्पादनाच्या वापरकर्त्याला ते उत्पादन बनवण्याची प्रक्रिया सांगून टाकून, त्याची इच्छा आणि कुवत असेल तर त्या उत्पादनात बदल, सुधारणा करण्याचे स्वातंत्ऱ्य देणारे हे तत्वज्ञान स्टॉलमन यांनी मांडले. ज्या बाजारात एखादी वस्तू विकताना किंवा विकण्यासाठी दुसरी वस्तू फ्री म्हणजे फुकट देणारी फसवी युक्ती वापरली गेली, तिथेच फ्री या शब्दाचा दुसरा अर्थ – स्वातंत्र्य , निदान संगणकाच्या क्षेत्रात तरी प्रत्यक्षात आला आहे.
लिनक्स ही फ्री ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण याचा नेमका अर्थ काय हे नीट समजून घेऊया. त्यासाठी संगणकीय क्षेत्रातल्या काही पारिभाषिक संज्ञांचा परीचय करून घ्यावा लागेल.
संगणक म्हणजे आपल्या समोर दिसणारा पडदा, कीबोर्ड, माऊस आणि त्याचा मेंदू. या मेंदूला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. संगणकाच्या विविध भागांशी आणि वापरणाऱ्याशी संपर्क निर्माण व्हावा यासाठी आणि विविध कामे करणाऱ्या प्रणाली वापरता याव्यात म्हणून एक मूलभूत संगणक प्रणाली संगणकाच्या स्मृतिकक्षात भरावी लागते. ती कार्यकारी प्रणाली होय. प्राण्याचे पिल्लू, अगदी लहान असतानाही पहाणे , ऐकणे, हालचाल करणे, आवाज काढणे अशा अनेक प्राथमिक क्रिया करू शकते. या करण्यासाठी या पिल्लाकडे जी प्रणाली असते. तशीच संगणकाची कार्यकारी प्रणाली असते. एकदा या क्रिया करता यायला लागल्या की मग इतर गोष्टी ते पिल्लू शिकू शकते. नंतर शिकण्याच्या गोष्टींची तुलना आपल्याला संगणकात वापरल्या जाणाऱ्या इतर उपयुक्त प्रणालींशी करता येते. या प्रणालींना इंग्रजीत अँप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते. यात कचेरीत वापरल्या जाणाऱ्या ऑफिस सूट, हिशेब प्रणाली, चित्रे काढण्याची प्रणाली या सारख्या प्रणालींचा अंतर्भाव करता येईल.
संगणकाची एकूण परिणामकारकता त्यावरील कार्यकारी प्रणालीवर अवलंबून असते. जगभर प्रसिद्ध असलेली आणि अनेक ठिकाणी वापरली जाणारी विंडोज ही प्रणाली, अनेकांना ठाऊक असते. हल्लीच निरनिराळ्या कारणांमुळे लिनक्सचे नाव आपल्यापैकी अनेकांच्या कानावर आहे. साधारणपणे विंडोज वर ज्या ज्या गोष्टी करता येतात, त्या सर्व लिनक्स वर करता येतातच. पण अनेक बाबतीत लिनक्स जास्त सरस आहे. पूर्वी लिनक्स ही फक्त अभियंते आणि शास्त्रज्ञ यांनी वापरण्याची प्रणाली होती. माऊसचा कमी वापर आणि उपयोजित प्रणालींची कमी संख्या, आणि लोकप्रिय विंडोजच्या पेक्षा वेगळ्या आज्ञा या कारणांमुळे लिनक्स लोकाभिमुख झाली नाही. आता मात्र, गेल्या काही वर्षात जागतिक संगणकतज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या सर्व अडचणींवर मात करून लिनक्सने आपले प्रभावक्षेत्र प्रचंड वाढवले आहे.
"लिनक्समधे असे काय आहे की ज्यामुळे आम्ही विंडोजचा वापर बंद करून लिनक्स वापरावे ?” हा अनेकांचा प्रश्न असू शकतो. त्यातल्या अनेकांना आपल्या संगणकाबरोबरच "आणतानाच बसवून मिळालेली " जागतिक दबदब्याची विंडोज प्रणाली वापरायला लायसेन्स लागते आणि त्यासाठी सुमारे ४-५ हजार रुपये जादा मोजावे लागतात याची कल्पनाच नसते. पण "तसे सगळेच तर करतात " या सबबीवर या कडे दुर्लक्ष केले जाते. "तसे असेल तर मग आता पर्यंत आमच्यावर काहीच कारवाई का झाली नाही ?” या त्यांच्या प्रश्नाचे अजिबात उत्तर न देता लिनक्स का वापरावे या प्रश्नाचे उत्तरआता आपण पहाणार आहोत.
लिनक्स वापरावे कारण त्याची संगणकावर प्रतिस्थापना करणाऱ्या सी.डी. मधेच ही प्रणाली इतरांना कॉपी करून देण्याचे
स्वातंत्र्य देणारे लायसेन्स अंतर्भूत असते.
लिनक्स वापरावे कारण, लिनक्स स्थापना करण्याची सी.डी. आपल्याला कोऱ्या सी.डी. पेक्षा थोड्या जास्त किमतीत (सुमारे २५ ते १०० रु.) उपलब्ध होऊ शकते. किंवा तुमच्या मित्राकडून मोफत मिळू शकते.
लिनक्स वापरावे कारण ते वापरणे अवघड नाही फक्त थोडेसे वेगळे आहे.
लिनक्स वापरावे कारण ढोबळ मानाने पहाता त्याला व्हायरसचा त्रास होऊ शकत नाही.
लिनक्स वापरावे कारण ते महिनोन्महिने दिवस रात्र अविरत चालू शकते. ते स्थिर आहे. त्याच्या वरील प्रणाली सहजासहजी कोलमडून पडत नाहीत.
लिनक्स वापरणे अधिक सुरक्षित आहे कारण ते पारदर्शी आहे. या प्रणालीचे सर्व अंतरंग सर्वांना पहाण्यासाठी खुले आहेत. त्यामुळे कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट करणारी प्रणाली त्यात लपवणे अवघड आहे. आपण माहितीच्या जालात विहार करताना आपला संगणक इतर संगणकांना जोडलेला असतो. अशा वेळी ज्या प्रणाली पारदर्शक नसतात त्या वापरकर्त्यासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेषतः संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा व व्यक्ती, राष्ट्रीय संरक्षणाबाबतची गुपिते संभाळणारे संगणक, किंवा लहान मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार अपारदर्शी प्रणाली वापरल्याने असुरक्षित असतात.
लिनक्स वापरावे कारण या प्रणालीत होणाऱ्या सुधारणा तत्परतेने आणि सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचतात.
लिनक्स वापरावे कारण जागतिक दर्जाच्या प्रणाली कशा लिहिल्या आहेत ते संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना समजू शकते. या विद्यार्थ्यांना विविध प्रणाली लिहिण्यासाठीची अवजारे ती प्रणाली प्रस्थापित करतानाच संगणकावर घेता येतात. ही अवजारे मुक्त आणि मुफ्त असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही (किंवा चोऱ्या कराव्या लागत नाहीत).
संगणकाचा हा आत्मा असा जवळजवळ फुकट वाटणे कोणाला कसे परवडते हा प्रश्न अनेकांना पडू शकेल. जगभरातले लाखो संगणकतज्ञ आपापल्या (फारसे न आवडणारे काम असणाऱ्या) नोकऱ्या संभाळून घरी आल्यावर संगणकावर ही नवी निर्मिती करतात. त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला असतो, पण निर्मितीचे वेड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी मुक्त आणि मुफ्त लिनक्सवर त्यांनी लिहिलेली प्रणाली अनेकांच्या उपयोगी पडू शकते. उपयुक्ततेत कणभरही कमी नसणारी ही प्रणाली, विकण्याची त्यांना इच्छा नसते किंवा तसली धडपड करण्याची त्यांची कुवत नसते वा त्यांना तेवढा वेळ नसतो. मग पडेल भावात कोणातरी बड्या दादाला (बिग ब्रदर) ती विकण्यापेक्षा लिनक्स मार्फत जगभरच्या लोकांनी ती वापरली यातच त्यांचा आनंद असतो.
लिनक्सचे यश दडले आहे ते ज्या परवान्याखाली ते वितरित केले जाते त्या परवान्याच्या (लायसेन्स) रचनेत. हा परवाना (GNU-GPL) या नावाने प्रसिद्ध आहे. या परवान्यातील कळीचा शब्द आहे स्वातंत्र्य. ही कार्यकारी प्रणाली वापरण्याचे, कॉपी करण्याचे, इतरांना वाटण्याचे, ती वाचून त्यात योग्य ते बदल करून सुधारणा करण्याचे आणि ती विकण्याचेही स्वातंत्र्य. विविध संगणकतज्ञांनी इंटरनेटवर ठेवलेल्या त्यांच्या (GNU-GPL परवाना असणाऱ्या) मुक्त निर्मिती, विविध कंपन्या उतरवून घेतात. त्या एकत्र करतात आणि नंतर विकतात. मोठ्या कंपन्या त्यांच्या कडून या प्रणाली विकतही घेतात. कारण मोठ्या कंपन्यात काम करणाऱ्या लोकांचा वेळ वाचवण्यासाठी मोठ्या कंपन्या लिनक्स कंपन्यांकडून अडचणी सोडवण्याची सेवा मिळवतात. असे घडते कारण (GNU-GPL) परवाना कशाचीही सक्ती करत नाही .अगदी प्रणाली फुकट वाटण्याचीही.
भारतीय संगणक तज्ञांचा यात काय सहभाग आहे ? काही सन्माननीय अपवाद वगळता अगदी थोडासाच. भारतीय बुद्धिमत्ता सेवा क्षेत्रात थोडीशी पुढे आहे पण नव्या उपयुक्त प्रणाली लिहिण्यात मात्र नाही हे मान्य करावेच लागेल. म्हणूनच कमी किंवा शून्य खर्चाची पण अतिशय ताकदवान लिनक्स वापरून नव्या उपयुक्त प्रणाली लिहिणे आणि नंतरच्या सेवा दिल्या बद्दल युरो किंवा डॉलर मिळवणे हा मार्ग नक्कीच श्रेयस्कर ठरेल.
प्रणाली वापरण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी लिनक्स कंपन्यांकडेच धाव घ्यावी लागते असेही नाही. जगभर चालू असणारे लिनक्स वापरणाऱ्यांचे गट (Linux User Groups) कोणाही लिनक्स वापरणाऱ्याला ही सेवा मोफत देतात. पुण्यात असा गट पुणे लिनक्स यूजर् ग्रुप (PLUG) या नावाने कार्यरत आहे. दोन हजार पेक्षा जास्त सदस्य असणारा हा गट लिनक्सचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण ना नफा या तत्वावर करीत असतो.
तुम्ही जेव्हा लिनक्स वापरता किंवा दुसऱ्याच्या संगणकावर बसवता, तेव्हा तो दुसरा, तुमचे गिऱ्हाइक बनत नाही .मित्र बनतो. लिनक्स वापरल्याने बड्या दादाच्या खोडावरचे तुम्ही बांडगूळ बनत नाही ते सहजीवन असते. लिनक्स वापरून तुम्ही एकाच कंपनीला जगात सर्वशक्तिमान आणि एकाच व्यक्तीला सर्वात धनवान बनण्यापासून थोपवू शकता.
उद्या येऊ घातलेल्या सर्वव्यापी संगणकविश्वात वसुधैवकुटुंबकम् हा मंत्र सांगणाऱ्या भारताला लिनक्स ही प्रणालीच सुयोग्य आणि श्रेयस्कर नाही काय?
(हा लेख उबंटू लिनक्स १०.०४ या लिनक्स प्रणालीचा आणि लिबर-ऑफिस या उपयुक्त प्रणालीचा वापर करून टंकलिखित केला आहे.)
Comments
उत्तम माहिती
उत्तम तसेच उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद्,एक प्रश्न आहे कि
UBUNTU जेव्हा CD वरुन install न करता boot केले असता Internet configure करता येते का?या बाबत काहि माहिती मिळु शकेल का?
कारण मी प्रयत्न केला पण जमले नाही.
उबंटू - इंटरनेट
तुमच्या संगणकाच्या हार्डवेअरवर ते थोडेसे अवलंबून आहे. पण माझा असा अनुभव आहे की, बऱ्याचशा संगणकांवर सी.डी. तून उबंटू बूट केल्यानंतर आपोआपच इंटरनेट चालू होते. ते मुद्दाम वेगळे कॉन्फिगर करायला लागत नाही. फक्त इंटरनेटच का- अनेक प्रिंटर्स त्यांचे ड्रायव्हर न टाकता, उबंटूवर आपोआप आणि सुरळीत चालतात.
--प्रसाद मेहेंदळे
मस्त लेख!
काही वर्षापुर्वी फक्त रजिस्टर केल्यावर मोफत मिळते म्हणून मागवलेली उबुंटू लिनक्सची तबकडी घरी तशीच पडून आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे लागणारे सगळे अॅप्लिकेशन्स लिनक्सवर चालत नाहीत.
विंडोज चालण्याचं एकमेव कारण म्हणजे ते आधी आलं.
उबंटू सी.डी.
श्री. दादा कोंडके यांस ,
आपल्याशी संपर्क साधण्याची माझी फार वर्षांची इच्छा होती !
आपली सी.डी. किती जुनी आहे त्यावर ते अवलंबून आहे. आज इंटरनेटवरून उबंटू सी. डी. मोफत डाउनलोड करायला फार तर तास दीड तास लागेल. उबंटूचे वैशिष्ट्य असे की त्यातच तुम्हाला पाहिजे ती उपयुक्त प्रणाली इंटरनेट वरून शोधून आणून देणारी यंत्रणा (सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर किंवा उबंटू सॉफ्टवेअर सेंटर) उपलब्ध आहे. (स्वर्गात इंटरनेट आहे का हो? का इंटरनेट म्हणजेच स्वर्ग?)
आपण पुण्यात रहात असतात तर लेखात उल्लेख केलेल्या PLUG या संस्थेच्या सभेत आपल्याला अशी सी.डी. अत्यल्प दरात मिळू शकली असती. आपण इतर मार्गदर्शनासाठी त्यांच्या email digest चे सदस्यही होऊ शकता. (www.plug.org.in)
माझ्या माहितीत आता असे एकही application नाही की जे windoze वर चालते पण लिनक्स वर नाही.
लेखाला प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
--प्रसाद मेहेंदळे
छान
लेख छान जमला आहे. उबंटु छान आहे हे मान्य आहेच. पण एकुणच मजा कमी झाली आहे अस माझा स्वानुभव आहे. विंडोज वापरायला सर्वात सोपे आणि आणि ते सर्वात पहिले सोपे झाले हे आपल्याला मान्य करावे लागेल. कधी काळी मी उबंटूचा चाहता आणि विंडोजचा विरोधक होतो. पण सध्या मला विंडोज जास्त आवडते आहे.
भारतासारख्या देशात संगणक प्रसार करण्यासाठी सरकारी पातळीवर लिनक्सचा हट्ट गरजेचा होता. सिडॅकची बॉस हि प्रणाली लिनक्सच आहे पण मग ती सगळीकडे का नाही?
सध्याच्या जगात या सर्वांवर मात करुन अँड्रॉईड फोनमुळे जास्त प्रसिद्ध झाली आहे आणि भारत वगळता आयओस सुद्धा. येथे सुद्धा लिनक्स मागे आहे असे वाटत नाही का?
प्लग पाहतो एकदा.
संपादकांना विनंती - हा लेख उबंटू समुदायात टाकता येईल का?
उबंटू
धन्यवाद!
>भारतासारख्या देशात संगणक प्रसार करण्यासाठी सरकारी पातळीवर लिनक्सचा हट्ट गरजेचा होता. सिडॅकची बॉस हि प्रणाली >लिनक्सच आहे पण मग ती सगळीकडे का नाही?
याच संकेतस्थळावरील आकाश टॅबलेट वरचा लेख आपण वाचला असणारच. सरकारी पातळीवर कोणाचा हट्ट चालतो बरे?
>कधी काळी मी उबंटूचा चाहता आणि विंडोजचा विरोधक होतो. पण सध्या मला विंडोज जास्त आवडते आहे.
एखाद्याच्या आवडीविषयी इतरांनी काहीच बोलणे बरे नाही. मी फक्त इतकंच म्हणतो, लिनक्सचे खरे यश तुम्हाला आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आहे. आपण नेमके कशासाठी संगणक वापरता याची मला कल्पना नाही. आपण जर हौस किंवा व्यवसाय म्हणून संगणक प्रणाली लिहीत असाल तर किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, उपयोजित चित्रकला या विषयात काम करीत असाल तर लिनक्स इतकी ताकदवान, स्थिर आणि गुणी प्रणाली आपणास मिळणार नाही हे खचितच.
>सध्याच्या जगात या सर्वांवर मात करुन अँड्रॉईड फोनमुळे जास्त प्रसिद्ध झाली आहे
अँड्रॉइड हे लिनक्सचेच रूप आहे.
अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
--प्रसाद मेहेंदळे
ज्ञानाची कवाडे खुले हवेत
ज्ञानाच्या ब ज्ञानाच्या साधनांवर कुणा एकट्याची मक्तेदारी असता कामा नये; त्या सामायिक असाव्यात याचे प्रतिपादन करणारा हा लेख.
नाण्याची दोन बाजू
हे म्हणणे पुर्णपणे पटत नाही. ज्ञान मिळवण्याची किम्मत आणि कष्ट कोणी कसे मोजायचे हे प्रत्येकावर आहे. उद्या अणू बाँबचे ज्ञान जर असे खुले करुन वाटले तर चालेल का? किंबहुना ज्ञान मिळवताना आणि मिळवल्यावर त्याचा उद्देश काय यावर बरेच काही अवलंबून आहे.
विंडोजचा पुरस्कर्ता म्हणून नव्हे तर वापरकर्ता म्हणून बोलायचे झाले तर ते वापरायला सोपे म्हणून जास्त चालले आणि त्यावर पैसा मिळवला गेला.
भारतापुरता विचार केला तर नवे लॅपटॉप आणि आस्थापनांमधले सोडल्यास किती जणांनी आजवत विकत घेतलेले विंडोज आहे? सध्या फोन घेताना आपण ओएसचे सुद्धा पैसे देतो. तसे संगणाकचे करतो का? तसे तर मग सध्या जगभरात अॅपलचे आयफोन एवढे महाग का? आणि तरी सुद्धा सर्वात जास्त का खपतात?
धागाविषयाशी थोडे अवांतर.
महोदय,
हे थोडे चुकीचे वाटले. युरेनियम नामक किरणोत्सर्गी मूलद्रव्याचे (यू२३५ बहुतेक) 'क्रिटिकल मास' एकत्र आणले असता चेन रिअॅक्शन सुरू होऊन अणुबाँब तयार होतो हे मला ३०-४० वर्षांपूर्वी ८वीत शिकवलेले आठवते. त्या काळी देखिल हे ज्ञान खुले करून फुकटच वाटलेले होते.
अॅटमबॉम्ब रेसिपी असे गूगलल्यास फुक्कट सगळे डिट्टेलवार मिळेल. पण याचा अर्थ सगळ्यांनाच बॉम्ब बनवता येईल असे नाही. एन्रिच्ड युरेनियम बनवण्यासाठीची अणुभट्टी अन तत्सम हज्जार लफडी या पाठी आहेत.
हे अवांतर सोडले, तरीही, तुमच्या मूळ मुद्याशी असहमती नोंदवितो.
अमुक ज्ञान मी कष्टाने मिळवले, म्हणून ते मी माझ्यापाशीच जपून ठेवीन या संकल्पनेपायीच अनेक 'ज्ञाने' लयाला गेली. उदा. आयुर्वेद अन इतरही अनेक गुरूच्या विद्या. आजच्या मेडिसिनकडे पहाल, तर उदा. समजा मला एक नवी व सोपी शस्त्रक्रिया सुचली, किंवा आहेत त्या उपचार पद्धतीत छोटी सुधारणा सुचली, तर मी किंवा माझ्यासारखे सगळेच डॉक्टर्स आधी कॉन्फरन्समधे जाऊन बोम्ब मारून (उच्च रवाने) सगळ्या दुनियाभरच्या डॉक्टरांना ती पद्धत शिकवतो. (कॉन्फरन्स मधे पेपर वाचतो.) मग इतर डॉक्टर्स ते वापरून पाहून, त्याबद्दल मत नोंदवतात मग नंतर ही पद्धती जगत्मान्य होऊ शकते. मूळ "संशोधकाला" शून्य रुपये पैसे मिळतात. मिळतो फक्त मान. (याला मी लायनक्स म्हणेन)
या उलट, मेडिकल कंपन्या ९९% वेळा आहे त्या औषधाच्या रेणूतील एक बॉण्ड बदलून मग त्यावर आम्ही कित्ती ब्वा रिसर्च केला म्हणून नोटा छापतात. १% मूळ संशोधन असतेच. कुणाला पेनिसिलिन सापडलेले असते, किंवा कुणाला लसीकरणाचे तत्व, तर कुणा लिस्टर ला हात धुवून ऑपरेशन केले तर जखमेत पू होत नाही हे सुचलेले असते = जसे बिल गेट्स यांनी पहिली ब्रिलियंट आयडिया वापरून विण्डोज आणली. त्यापुढे मात्र ती विण्डोज च आहे ;)
मुद्दा असा आहे, की मूळ संशोधकाला त्याचा शोध दाबून ठेवावा असे वाटत नाही, वाटूही नये, या तत्वाशी मी सहमत आहे.
तुमचे म्हणणे : संशोधकाला मोबदला हवाच, हे मार्केटिंग प्रिन्सिपल आहे, पण ते धोकादायक आहे, कारण मग ते संशोधन एकतर प्रोहिबिटिव्ह कॉस्ट मुळे मरते, किंवा मोनोपली बनून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवते.
या बद्दल थोडे चिंतन असे :
या मतप्रणालीचे मूळ गेल्या शतकातील अनेक संशोधक ज्यांच्या युगप्रवर्तक शोधांनंतरही विपन्नावस्थेत मेले, याच्याशी संबंधीत असू शकते. आजकालची पेटंट व्यवस्था यासाठी उत्तम असे मी म्हणेन. अमुक वर्षांनंतर मूळ संशोधनावर पैसे कमवणे बंद करा, अन ते खुले करा, हे तत्व मला पटते.
चिंतन
तुमच्या चिंतनातला मुळ मुद्दा मला सुद्धा तंतोतंत पटतो. प्रश्न एवढाच आहे की मी केलेल्या कष्टाचा मी मोबदला घ्यावा का? आणि तो घेतल्यास तो चुक आहे का? तसे तर विंडोजवर चालण्यासाठी लागणारी अॅप्लिकेशन्स सुद्धा या प्रकारे तयार करुन चांगला समन्वय राखता आला असता. पण लिनक्सवाल्यांना स्वतःचे वेगळेपण अथवा हम भी कुछ कम नही या बद्दलचे कंडशमन हा प्रकार मला याची एक दुसरी बाजू वाटते.
लिनक्सच्या अनेक विवादांमध्ये अथवा चर्चांमध्ये हा सुर नक्की जाणवतो की जे काही विंडोजवर जमते ते सगळे लिनक्सवर जमवता येते. पण येथे सुद्धा विंडोजला उजवे मानल्याची भावना आहेच. किंबहुना जे लिनक्सवर चालते ते विंडोजवर सुद्धा चालवता येते असा सुर ऐकायला जास्त आवडेल पण आज सुद्धा उबंटूचा इंटरफेस अॅपलकडे का झुकला? विंडोजसारखी अॅप्लिकेशन्स का हवीत हे प्रश्न लिनक्स का वापरावे याचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. मग कोणी सांगितली हि कटकट येथे येते आणि पायरेटेड विंडोज जिंकून जाते.
मला वाटते भविष्यात लहान पणा पासूनच वेगळ्या ओएसची ओळख केल्यास हे प्रश्न जास्त लवकर सुटतील. आणि कदाचित मोबाईल फोन्सच्या वेगवान प्रवासाने याची सुरवात झाली आहे.
चाणक्यजी,
(मी मेडिसीनचा डॉक्टर आहे. कॉम्प्यूटर्स, त्यातही सॉफ्टवेअर हा माझा छंद आहे. चूभूद्याघ्या) आता पुढे :
मुळात विण्डोज का?
लायनक्सशी तुलना करताना विण्डोज सोडा, डॉस का?? हा प्रश्न हवा.
बिल गेट्स हे प्रतिविश्वामित्र म्हणवितात ते का?? इन्टरनेटचे व्हर्चुअल जग कसे उभे राहिले?
कारण, त्यांनी 'डॉस' ही ऑपरेटिंग सिस्टिम व्हिजुअलाईज केली. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, डी.ओ.एस.
यात विशेष ते काय?
त्यापूर्वी देखिल अनेक लोक स्वतःचा संगणक बनवीत, व त्याला चालविण्यासाठी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम लिहित. पण मग चाणक्याच्या काम्प्यूटरावरील प्रोग्राम इब्लिसाच्या कॉम्प्यूटराने वाचायचा, तर लिपी येते पण भाषा समजत नाही असला प्रकार असे.
अॅक्रॉस द मशीन्स युनिफॉर्मिटी आणणे ही मूलभूत संकल्पना त्यांनी आणली.
अगदी डॉस च्या दिवसांतही वर्डस्टार बंद करायचा तर कंट्रोल क्यू, अन डेव्ह बंद करायचा तर कंट्रोल एक्स. प्रिन्स नामक गेम बंद करायला परत वेगळीच की काँबो. असे काहीतरी असे. प्रत्येक अॅपची कमाण्ड वेगळी.
विण्डोजने अधिक युनिफॉर्मिटी आणली.
कर्सरवर कमाण्ड टाईप करायची गरज संपली. उदा. लाल फुली = खिडकी बंद. पहिला मेनू आयटम फाइल. दुसरा एडिट, शेवटला नेहेमी हेल्प. हे विण्डोजने केले. याशिवाय आयकॉन नामक प्रकार आणला. ज्यामुळे निरक्षर लहान मुलालाही नुसत्या क्लिकने कॉम्प्यूटरशी बोलणे सोपे केले. अन तिसरे, मल्टी टास्किग आणले. म्हणजे 'राईट' (वर्डचा आजेबाप) मधे लिहिताना शेजारच्या खिडकीत कॅल्क्युलेटर अन तिसर्या खिडकीत पेण्टब्रश वापरून चित्रे काढणे शक्य झाले. एका खिडकीतला डेटा दुसरीत पेस्टवता येऊ लागला.
एक कॉम्प्यूटर दुसर्याशी बोलू लागला. इथेच इन्टरनेटचे बीज पेरले गेले. टॉवर ऑफ बेबेल ची स्टोरी आठवून पहा. अनेक भाषांची एक करणे हे मोठे काम आहे.
आता हे सगळे आयकॉन्स वगैरे मॅकवरून चोरले असे काही लोक म्हणतात. पण समहाऊ मायक्रोसॉफ्ट मॅनेज्ड टू हॅव्ह ह्यूज यूजर बेस. या बेसिक इनोव्हेशन्स करिता श्री गेट्स डिझर्व्स टू बी द रिचेस्ट मॅन इन वर्ल्ड, असे मला वाटते.
इथपर्यंत मायक्रोसॉफ्ट व विण्डोज दोघेही विश्वामित्र फेज मधे होते.
मग बिनसले कुठे?
बिनसले ते जेव्हा लोक विण्डॉजवर बेस्ड अॅप्स लिहू लागले.
मग उदा. डीबेस ची कंपनी विकत घेऊन फॉक्सबेस मग फॉक्स्प्रो मग व्हिजुअल फॉक्स करून, तो सडवून एक मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस तयार केला. मायक्रोसॉफ्टच्या डेव्हलपर्स ची अॅप्स जास्त चांगली चालतील असे हिडन प्रोग्रामिंग हूक्स आले. थोडक्यात मोनोपली आली.
तुम्ही म्हणता तसे ओपन सोर्स अॅप्स विण्डोजवर आहेतच. फायरफॉक्स आहे. क्रोम आहे. ओपन ऑफिस आहे. हजारो सुपर्ब क्वालिटी अॅप्स आहेत जी विण्डोज बेस्ड असूनही फुकट व ओपनसोर्स तत्वप्रणालीवर आधारित आहेत. इर्फानव्ह्यू नामक एक अतीव सुंदर इमेज व्ह्यूअर आहे. फुकट. विन आरएआर. फुकट. अनेक उदाहरणे देता येतील.
या प्रोग्रामर्सने केलेल्या कष्टांचा मोबदलाही त्यांना मिळतोच आहे. अगदी पैशाच्याच रूपात मिळतो आहे. पेड व्हर्जन्स आहेत. व लोक पैसे देतातही. मी स्वतः डोनेशन पाठवत असतो. मनीवाईज, दे विल नेव्हर बी बिल गेट्स, बट, बिल गेट्स वोन्ट बी इर्फान आयदर.
लायनक्स हे डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीमला आव्हान आहे, असे म्हणण्यापेक्षा, पर्याय आहे असे म्हणू शकतो. जसे एम एस ऑफिस, ओपन ऑफिस, व मॅकवरील ऑफिस सदृश अॅप्सची तुलना करता येईल, किंवा आय.ई, फायरफॉक्स, क्रोमची - तशीच लायनक्स, युनिक्स, डॉस, विण्डोज यांची आपसात होईल.
माझे मत व सहानुभूती नेहेमीच लायनक्स सदृष प्रकल्पांना राहील. पण कॉन्फरन्सचे प्रेझेंटेशन मी पॉवरपॉईंटमधेच लिहीन. कीनोट नाही. अम ओपन ऑफिसही नाही. फॉर सिम्पल रीझन, की जिथे जाऊन मला प्रेझेंटेशन द्यायचे, तिथे सीडी/पेनड्राईव्ह्/वा ईमेलवरून डाऊनलोड करून ते प्रेझेंटेशन नीट चालेलच याची ग्यारंटी. अगदी माझा लेटेस्ट मॅक नेला तरी तो तिथल्या १० वर्षे जुन्या प्रोजेक्टर्शी बोलेल याची ग्यारंटी नसते, अन मग प्रेझेंटेशन कॉपी करून तिथल्या लोकल कॉम्प्यूटरवर चालणेही शक्य नसते.
सी माय पॉईंट? इट्स नॉट ओन्ली अबाऊट ड्यूअल स्टँडर्ड्स ऑफ एथिक्स इन इण्डियन मेण्टॅलिटी. ऑर पायरसी, अॅज यू हॅव्ह सेड हिअर, इन सम ऑफ युर रिस्पॉन्सेस, सर.
मस्त
प्रतिसाद आवडला. पण परत मुद्दा आहेच कि तुमच्या एवढे जाणणारे आणि जाणून घेणारे किती जण आहेत? आज मी चीनमध्ये जेंव्हा गुगल सर्च वापरायचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याची गॅरंटी नसते गुगलचे अॅप चालायची. पण बायडू सर्च अथवा क्युक्यु नक्की चालेल. येथे लोकांची त्या शिवाय काही अडत नाही. हे कशामुळे झाले? तर एक म्हणजे काही गोष्टींना प्रतिबंध आणि काही गोष्टींचा जास्त वापर आणि प्रसाराने पर्याय म्हणून असलेल्या गोष्टी मुख्य झाल्या. हे सांगायचे कारण काय? आपल्याकडे असे प्रयत्न झाले नाहीत? झाले ना. बॉस ओएस आहे, गुरुजी सर्च आहे. वगैरे वगैरे. पण जिथे लोकांना जे सहज शक्य आणि सोप्या प्रकारे मिळते ते मान्य आहे. मग ते अनएथिकल असले तरीही. हाच मुद्दा मी मांडतो आहे की जिथे जगाची सर्वात जास्त लोकसंख्या एकवटली म्हणजेच सर्वात जास्त बाजारपेठ आहे तिथे ती बाजारपेठ नियंत्रीत करण्याचे अधिकार आपल्याकडे असताना आपण ते करत नाही. जर आजच्या घडीला आम्ही ठरवले तर लिनक्सला सर्व शाळा/सरकारी कार्यालये इत्यादी इत्यादी ठिकाणी अनिवार्य करुन त्याचे वापरकर्ते वाढवून ते जास्त लोकप्रिय करु शकतो तसेच यात वाचणारा पैसा जास्त परिणामकारकपणे वापरु शकतो.
विंडोजचे पर्याय भारतात जास्त चालले नाहीत याला कारण फक्त आणि फक्त एथिक्स आहे. सरकारी संस्थांमध्ये याचे निर्णय घेणार्यांना रस होता मला काय मिळणार यात? जिथे ओएसच फुकट आहे तिथे कमिशन कुठून मिळणार? आणि जर वापरच नाही होणार तर वापरकर्ते वाढणार कसे? सरकारची धोरणे समाजाची जडणघडण करण्यात हातभार लावत असतात. तिथे आम्हाला एथिक्स नको आहेत. जर आडातच नाही तर ....
आता प्रश्न गेट्स डिसर्वड.. कारण विंडोजचा प्रसार आणि प्रचार करण्यात त्यांनी काय फक्त ते तयार करण्याचे प्रयत्न घेतले? नाही!! सर्व प्रकारचे प्रयत्न केले. त्याची फळे ते चाखतात. अगदी नव्या लॅपटॉपवर प्री-ईन्स्टॉल्ड विंडोज हा त्याचाच एक भाग. त्याच मोनोपॉलीचा दुसरा भाग त्यांनी पाहिला आहेच. आज आयओस आणि अँड्रॉईड हे सशक्त पर्याय आहेतच. मोबाईल मार्केटमध्ये भारत सोडता अनेक ठिकाणी अॅपलची मक्तेदारी इतके दिवस चाललीच. चांगले पर्याय आले आणि लोकांना आवडले कि ते कसे आत्मसात होतात आणि मोनोपॉली कशी मोडली जाते हे आपण बघतोच. मग ते ऑर्कुट नंतर फेसबुक असो, मराठी टाईपिंगमुळे आधी आवडलेले मनोगत आणि मग गमभनमुळे तयार झालेले उपक्रमासारखे पर्याय असो, याहू मेसेंजर नंतर आलेले जीटॉक असो...
आय होप यु अल्सो सी माय पॉईंट. आम्हा भारतीयांना एथिकल अन एथिकल कळत नाही असे नाही. पण अनेक गोष्टींचे मूळ सहजसाध्य गोष्टींमध्ये आहे. तिथे एथिक्सला फाट्यावर मारले जाते. स्त्रीभ्रूण हत्या हा त्यातलाच प्रकार नाही का? लोकं एकवेळ मुर्ख माना, पण डॉक्टर्स? (मुद्दा थोडा विषतांतर आहे पण एथिक्ससाठी योग्य आहे.) चीनमध्ये गेल्या ३ दशकात ३३ कोटी गर्भापात केले पण ते एथिकल आहेत कारण धोरण एका मुलाचे आणि सरकार मान्यता देते. एकापेक्षा जास्त मुले कोणाला नाहीत असे नाही. पण त्यासाठीची लागणारी सर्व प्रकारची किंमत चिनी नागरीक फेडतो. ते सुद्धा एथिकली.
असो हा कायचा विवादाचा मुद्दा आहे की एथिकल काय आणि अनएथिकल काय? पण जर एखादी गोष्टीचा वापर, प्रसार आणि प्रचार जास्त होणे अपेक्षीत असेल तर तसे प्रयत्न हवेत आणि ते का होत नाहीत? तशी धोरणे का आखली जात नाहीत? या प्रश्नांमध्ये लिनक्स आणि विंडोजच्या वापराची उत्तरे आहेत.
उबंटू लिनक्स
घरी आणि कामात नेहमीच विंडोज वापरतो. उबंटू लिनक्सचे कौतुक वाटत असल्याने म्हटले ही पण वापरून पहावी. स्टुडियोत फक्त लिनक्स आधारित संगणक ठेवला हट्टाने त्यात विंडोज पार्टीशन ठेवली नाही. बर्याच अडचणी आल्या, काहींवर मात केली आणि काही तशाच राहिल्या पण सिस्टीम बदलली नाही.
पहिल्यांदा अडचण आली की लॅन काही चालेना. त्यामुळे इंटरनेट आले नाही. संगणक विक्रेत्याने सांगितले यावर विंडोज -इंटरनेट चालते पण लिनक्स इंटरनेट चालत नाही. (ड्रायवर नाही का काहीसे.) शेवटी ते कार्ड बदलावे लागले. इंटरनेट सुरू झाले.
प्रिंटर हवा म्हणून नवीन घेतला. (एप्सनचा १११). याचा ड्रायवर मिळेना. एप्सन कंपनीला लिनक्स साठी ड्रायवर ठेवण्यात काही रस नसावा. पर्याय म्हणून एप्सन ११० वा असा काहीसा ड्रायवर लोड केला. पण तो प्रिंटींगला चालायचा. पण कुठली शाई संपली आहे ते सांगू शकत नसे. शेवटी प्रिंटर बदलला. (घरचा तिथे नेऊन ठेवला.)
मला कोणी कौतुकाने सांगितले होते की ओपन ऑफिस हे माऑ सारखेच आहे. पूर्वी मी विंडोजवर ओपन ऑफिस वापरायचो. पण त्यात मराठी लिहिताना अडचणी यायच्या. विशेषतः प्रतिध्वनी आल्यासारखी अक्षरे प्रतिबिंबित दिसायची. तेव्हा लिनक्सवाले म्हणायचे की लिनक्सवर ओपन ऑफिस उत्तम चालते. मला मराठी साठी फोनेटिक कीबोर्ड वापरायची सवय आहे. उबंटू वरील ओपन ऑफिसवर मी अजूनही मराठी टंकू शकलो नाही. कारण फोनेटिक किबोर्ड अजून मिळाला नाही. फोनेटिक की बोर्डची सवय बदलण्याशिवाय बहुदा गत्यंतर नसावे.
सुरुवातीला उबंटू (माझ्या कडे १०.४ आहे.) समजून घेण्यात काहीसा वेळ गेला. अजूनही नीटशी समज आलेली नाही. सिमँटिक मॅनेजर वापरणे काहीसे जमते. पण आपण नक्की काय करतो आहोत याचा थांगपत्ता लागत नाही. पेनड्राईववर कधी काही लिहिले तर ते बाहेरील सिस्टीमवर उमटेलच असे नाही असाही एक अनुभव आला.
या अडचणी सोडल्यास उबंटूचे अनेक फायदे मला जाणवले. पहिली गोष्ट म्हणजे सिस्टीमचा वेग चांगला आहे. याच कॉन्फिगरेशनच्या संगणकावर विंडोज बर्याच कमी वेगात चालली असती. अँटीवायरस प्रकरण नाही त्यामुळेही वेग चांगला आहे. (हल्ली माझे मत झाले आहे की अँटीवायरस प्रणाली हीच एक वायरस आहे.) गाणी वाजवणे, चलचित्र बघणे, जिम्प (चित्र एडिट करणे.) इत्यादी व्यवस्थित चालते. ब्राउजर देखिल नेहमीसारखा चालतो. माझ्याकडे येणार्या नव़ख्यांना त्याची काही फारशी अडचण वाटत नाही. (विंडोज सारखे बरेचसे चालत असल्याने.)
पुस्तकातून वा ट्युटोरियल मधून वा कम्युनिटीच्या वेबसाईटवरून येथे शिकण्यासारखे फारसे नाही. पुस्तके घेऊनही फारसे समजले नाही. यामुळे एखादी छोटीशी अडचणही लवकर सुटत नाही. नेटाने मी ही सिस्टीम धरून बसलो आहे पण त्याबद्दल नवीन शिकणे फारसे होत नाही. पुढचे वर्शन आले आहे, माझ्या जवळ त्याची सीडी पण आहे. पण तीही इन्स्टॉल करणे जमलेले नाही. (फॉर्मॅट करू का? अशी धमकी पहिल्यांदा येते.)
एक ओपन सिस्टीम असणे याचे मला कौतुक आहे. पायरेटेड विंडोज पेक्षा ती कितीतरी चांगली आहे. (तुलना करायची असल्यास दोन फुकटच्यांची करावी.) अडचणींवर मात करण्याचा सोपा उपाय म्हणजे वापरणार्यांची संख्या वाढवणे. म्हणजे एकमेकाच्या आधाराने अडचणींवर मात करता येते. पण हे झालेले नाही.
विंडोज प्रणालीला ही प्रणाली शह देऊ शकते. पायरसीचे नियम कडक केले तर ही विंडोज कोणी विकत घेणार नाहीत. आपसूकच लिनक्स सारखी प्रणाली पुढे सरकेल (मोबाईल मधील अँड्रॉईड सारखी.).
(एवढे लिहिल्यावर जाणवले की प्रतिसाद विस्कळीत झाला आहे!)
सर्व साधारण अडचणी
नक्कीच. पण पायरसीमध्येच विंडोजचे भले आहे आणि होते म्हणूनच काही एक केले जात नाही. तसेच जसे चीनमध्ये गुगलवर तसेच फेसबुकवर बंधने आणून त्यांनी स्वतःची उत्पादने वापरणे जास्त प्रमोट केले जते तसे करणे सुद्धा गरजेचे आहे. चीनमध्ये बायडू सर्च जोरात चालतो. गुगल औषधाला सुद्धा नसते. अँड्रोईडपेक्षा आय ओस अथवा स्वतःचे अलियुन आता जास्त चालते आहे. सांगायचा मुद्दा हा की उपाय आहेत पण भारतीय वापरकर्ते सुद्धा या लायकीचे नाहीत कि आपले असे काही जमवून त्यांनी वापरावे. तसेच तुम्ही ज्या अडचणी लिहिल्या आहीत त्या सर्व साधारणपणे सर्वांनाच येतात पण भारतीय लिनक्स युजर ग्रुप्सना त्याचे फारसे पडलेले नसते. त्यांनी काही केल्यास त्याला ग्राहक नाहीत असे ते दुष्टचक्र आहे.
भारतीयांमध्ये दाखवायचे एथिक्स वेगळे आणि स्वतःचे वेगळे आहे. त्यामुळे पायरेटेड विंडोजची चलती नेहमीच असणार.
ओपनसोर्स म्हणजे फुकट हि एक चुकीची संकल्पना घेऊन लिनक्सची ओळख होते. पण फ्री म्हणजे काय हे वर लेखात लिहिले आहेच. त्याकडे सर्वसाधारण वापरकर्ते सोयिस्कर दुर्लक्ष करतात.
जाता जाता, मी आजवर उबंटू एचपी लॅपटॉप तसेच डेल डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर वापरले आहे पण मला या अडचणी आल्या नाहीत. वुबी वापरुन ड्युअल बुट वापरणे सर्वोत्तम उपाय म्हणजे अगदी गरज लागल्यास विंडोज उपलब्ध असते.
नको ती भानगड
आपण त्या लिनक्स च्या भानगडीत पडलो नाही . एकमार्गी आपल विंडोज बरे! डोक्यात उगीच गोंधळ नको.
विकत?
तुमच्याकडचे विंडोज विकतचे आहे की पायरेटेड?
पायरटेड
पायरटेड आहे.
हेच तर
विंडोज चालण्याचे आणि उबंटूचा प्रसार होण्याचे हेच तर कारण आहे. लेखात लिहिल्या प्रमाणे आजचे उबंटू विंडोज इतकेच सरस आहे. पण आम्हा भारतीयांना आपली सोय आवडते. एथिक्स बाजूला राहतात मग आणि सुरु होतो खेळ आडमार्गांचा. पायरेटेड ओएस मिळवण्याठी भानगडी करतील पण जेन्युइन नाही वापरणार :)
विंडोज
असो मी जेन्युइन विंडोज फुकटात वापरतो - ऑफिसात! ऑफिसात इतकावेळ कंप्युटर समोर असतो की घरी कंप्युटर क्वचितच उघडला जातो.
घरी जेन्युइन विंडोज लॅपटॉप बरोबरच आले असल्याने कशाला इतका ताप करून घ्यायचा? या विचाराने लिनक्सकडे वळलेलो नाही
उपकरणे आणि ओएस
सध्याच्या घडीला आपण अभ्यास केला तर वेगळेच चित्र समोर येते आणि तिथे लिनक्सला थोडा उशीर झाला आहे पटते.
संगणक - विंडोज सर्वात जास्त
टॅबलेटस - आय ओस आणि अंड्रॉईड जास्त
फोन्स - जगभरात - आय ओस आणि अंड्रॉईड जास्त, मग सिंबियन आणि विंडोज फोन - पण आता विंडोज फोन थोडे जास्त चांगले वाटू लागले आहेत.
या तिनही प्रकारच्या उपकरणांसाठी लिनक्स/उबंटू आहे. पण उशीर झाल्याने थोडे मागे आहे. कदाचित भविषयात अग्रेसर असेल सुद्धा.
अँड्रॉईड
येथे पाहाः http://en.wikipedia.org/wiki/Android_%28operating_system%29
Android is a Linux-based operating system
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
लिनक्स
मी गेले पाचसहा वर्षे लिनक्स वापरत आहे. गेल्या तीनचार वर्षात काहीही अडचण आलेली नाही. सध्या लिनक्स मिंट इसाडोरा (उबुंटू 10.04 वर आधारित ) माझ्या लॅपटॉपची एकमेव ओएस आहे. अजून अत्यंत स्मूथ चालते. अपग्रेड करावेसे वाटत नाही.
उबंटू मोबाईल
जर अँड्रॉईड लिनक्साधारित आहे तर मग उबंटू मोबाईल ओएस काढून काय वेगळे असेल?
उबंटू मोबाईल ओएस
अँड्रॉइड गूगलने तयार केलेले उत्पादन आहे . त्यासाठी त्यांनी लिनक्सचे केरनेल (गाभा) वापरला आहे. पण ते वापरण्याच्या लायसेन्स मधे (अपाचे लायसेन्स)आणि उबंटूच्या मोबाइल ओ.एस्.च्या लायसेन्स (GPL)मधे फरक आहे. GPL (आवृत्ती २) सोर्सकोड देण्याची सक्ती करते. तर अपाचे तशी करत नाही.
मुळात आम्ही ओपन सोर्स समुदायातील लोक ऑपरेटिंग सिस्टीम/उपयोजित प्रणालीतला फरक ठरवताना मिळणारे / दिले जाणारे स्वातंत्ऱ्य हाच फक्त महत्वाचा मुद्दा समजतो. कारण त्यावरच त्या प्रणालीत होणारी उत्क्रांती अवलंबून असते.
माझे अँड्रॉईड
मी माझे स्वतःचे अँड्रॉईड वर्जन काढू शकतो का?
स्वतःचे अँड्रॉईड
होय . तुम्ही स्वतःसाठी त्याचा गाभाही बदलून वापरू शकता. त्यावर नव्या उपयोजित प्रणाली ही तयार करू शकता.
गाभा बदलण्याची एक पद्धत या लिंक्सवर उपलब्ध आहे--
स्वतःचा अँड्रॉइड गाभा
माझे अँड्रॉइड
--प्रसाद मेहेंदळे
अरे वा
अरे वा, निवांत पाहतो.
उबुंटू ओएस
डिस्ट्रोवॉच येथे पाहा. http://distrowatch.com/
लिनक्सवर आधारित शेकडो डिस्ट्रोज आज डेस्कटॉपवर आहेत. उबुंटू ही त्यापैकी केवळ एक आहे. त्याचप्रमाणे लिनक्सवर आधारित अँड्रॉईडप्रमाणेच उबुंटूलाही एखादी ओएस काढावी लागली तर त्यात काही हरकत नाही. मोझिलातर्फेही फायरफॉक्सओएस बाजारात येत आहेच.
गूगल अँड्रॉईड जसे फुकट मिळते तसे उबुंटू ओएसही फुकट मिळेल मात्र या कंपन्यांची स्वतःची ऍपस्टोअर्स असल्याने तिथल्या वस्तूंच्या विक्रीतून त्यांना फायदा होतो. शिवाय ओएसमध्ये अंतर्भूत केलेल्या जाहिरातींचेही मार्केट प्रचंड आहेच.
हार्डवेअर
चर्चा आवडली.
यात भर घालण्यासारखा एकमेव मुद्दा आहे म्हणजे विण्डोज ओ.एस. मॅक वगळता बाकी सर्व संगणकांवर, विशेषतः लॅपटॉप्सवर येतंच; ते नको असेल तर डोकेफोड करावी लागते. शे-पाचशे रूपये वाचतात. मॅक भारतात फार लोकप्रिय नसला तरीही पाश्चात्य जगात आहे; किंमत थोडी जास्त असली तरी सौंदर्याखातर लोक तेवढे जास्तीचे पैसे मोजतात. लिनक्स अशा कोणत्याही प्रकारच्या हार्डवेअरवरून मिळत नाही. डेल मधे लिनक्सवाले लॅपटॉप्स विकत होतं, अलिकडच्या काळात काय आहे माहित नाही.
बहुतांश लोकांचा संगणकवापर हा इमेल पहाणे, गेम्स (पत्ते) खेळणे, बँक-शेअर व्यवहार करणे, गाणी-व्हीडीओ यांच्यापुरता मर्यादित असतो. या लोकांना गोष्टी आतून कशा चालतात हे काही समजत नाही; समजून घेण्याची इच्छा नसते. गेल्या तीन-चार वर्षांत, उबुंटूची सीडी टाकली आणि चहा पिऊन येईपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू झालं एवढं सोपं झालेलं आहे. त्याआधी लिनक्स इन्स्टॉल करणं आणि विविध सेवा (आवाज, इंटरनेट इ) सुरू करणं हे तापदायक काम होतं. जेन्टू लिनक्ससारखे सोर्सकोड कंपाईल करणारे फ्लेवर्स वापरायचे तर संपूर्ण सेटप व्हायला तीनेक दिवस लागायचे. पण एकदा इन्स्टॉल झालं की मक्खन. त्या काळात रोजच्या वापरात उबुंटूही जेन्टूपेक्षा जास्त वेळखाऊ होतं. तोपर्यंत भारतात (पायरेटेड) विण्डोजने निश्चितच बाजी मारलेली होती/आहे.
लॅपटॉप्स विकणार्या कंपन्या, कंप्यूटर संबंधित सेवादाते जोपर्यंत लिनक्सकडे वळत नाहीत, निदान असा पर्याय उपलब्ध करून देत नाहीत, तोपर्यंत लिनक्स वापरण्यासाठी सोपी आहे आणि विण्डोजपेक्षा कंप्यूटरला खूपच कमी त्रास देणारी आहे हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. मिक्रोसॉफ्टने ज्याप्रकारे मोनॉपॉली प्रस्थापित केली ते पहाता, ती फक्त हौशी लोकांच्या प्रयत्नांनीच मोडून निघेल असं वाटत नाही.
सरकारी लोक विण्डोज वापरतात याच्या दोन टोकांचा अनुभव घेतलेला आहे. विज्ञान संशोधन करणार्या संस्थेत शैक्षणिक कामाशी संबंधित नोकर लिनक्सच वापरतात; क्वचित कुठे खास उपयोगासाठी 'सन'चे कंप्युटर्स असतात. माझ्या मागच्या ऑफिसात आम्ही सगळे लिनक्सच वापरायचो, सॉफ्टवर्स फक्त लिनक्स (क्वचित मॅक) वर चालणारीच होती.
आमचा पगार 'बँक ऑफ इंडीया'त होत असे. सरकारी बँक. यांचं इंटरनेट बँकिंग फक्त आय.इ. - फक्त विण्डोज-वरच चालणारं होतं. इंटरनेट बँकिंगची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली तेव्हा आम्हां सरकारी कर्मचार्यांची पंचाईत झाली होती. आम्ही पाच-सात लोकांनी शाखेत जाऊन आणि इंटरनेटवर दोन्ही ठिकाणी सतत तक्रारी केल्या. ती नोकरी सोडेपर्यंत आमच्या लिनक्सवरून इंटरनेट बँकिंग शक्य झालं.