‘सुरकोटला’ अश्व: भाग 1

‘सुरकोटला‘ हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. या लाल मातीमुळे या सर्व भागाला लालसर ब्राऊन रंग प्राप्त झाला आहे. हा सर्वच भाग एकूण दुष्काळी व वैराण असल्याने मधून मधून दिसणारी, निवडूंग, बाभूळ आणि पिलू या वनस्पतींची काटेरी, खुरटी झुडपे सोडली तर बाकी झाडोरा किंवा गवत असे दिसतच नाही.

1964 साली, भारतीय पुरातत्त्व विभागाचे एक अधिकारी, श्री. जगत्पती जोशी यांनी इतिहास-पूर्व कालातील मानवी वस्तीच्या खाणाखुणा या टेकाडावर दिसत असल्याचे शोधून काढले होते. इतिहास-पूर्व कालात या टेकाडाच्या ईशान्य दिशेला एक छोटी नदी वहात होती. या नदीतील पाणी वहात जाऊन शेवटी कच्छमधील छोट्या रणात (Little Rann) पसरत असे. या नदीचे अस्तित्व हे कदाचित या ठिकाणी इतिहास-पूर्व कालातील मानवी वसाहत असल्याचे महत्त्वाचे कारण असण्याची शक्यता होती. सध्या मात्र या इतिहासातील नदीला एका पावसाळी छोट्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी प्रथम 1970-71 मध्ये उत्खनन करण्यास प्रारंभ केला. या उत्खननात, या स्थानावर एक किल्ला व त्याच्या बाजूला वसलेले एक गाव यांचे भग्नावशेष सापडले होते. तदनंतरच्या वर्षात ( 1971-72) येथे परत एकदा उत्खनन सुरू करण्यात आले. दुसर्‍या वर्षीच्या उत्खननात, या ठिकाणी प्रत्यक्षात तीन सलग कालखंडातील मानवी वसाहती किंवा संस्कृत्यांचा राबता होता असे आढळून आले. यापैकी सर्वात जुनी वसाहत इ.स.पूर्व 2150 ते 1950 या कालखंडात अस्तित्वात होती. या सर्वात जुन्या वसाहतीला 1ए असे नाव देण्यात आले. या नंतरची किंवा 1बी हे नाव दिलेली वसाहत इ.स.पूर्व 1950 ते 1800 या कालात अस्तित्वात होती तर जमिनीच्या सर्वात वरच्या थरात खाणाखुणा सापडलेली अखेरची किंवा 1सी ही वसाहत इ.पूर्व 1800 ते 1700 या कालखंडात येथे रहात होती. या सर्व उत्खननावरून हे स्पष्ट होत होते की की या ठिकाणी अस्तित्त्वात असलेली सर्वात जुनी वसाहत ही नक्कीच ब्रॉन्झ युगातील हडाप्पा किंवा सिंधू-सरस्वती संस्कृतीचा एक भाग होती.

1बी या नावाने ओळखला जाणारा कालखंड समाप्त होण्याच्या सुमारास संपूर्ण सुरकोटला वसाहतीला भयानक आग लागली व ही सर्व वसाहत जळून खाक झाली. या दुर्घटनेचा साक्षीदार असलेला एक कमीजास्त जाडीचा राखेचा थर या संपूर्ण वसाहतीवर पसरलेला आढळून आला. 1बी या कालखंडाच्या खुणा ज्या खोलीवर सापडत होत्या तेथपर्यंत उत्खनन केल्यावर हा राखेचा थर आढळून आल्याने या आगीचा कालखंडही उत्खनन करणार्‍या शास्त्रज्ञाना लगेचच समजू शकला. मात्र आगीमुळे भस्मसात झालेली ही वसाहत परत लगेचच बांधून काढली गेली होती व येथे परत एकदा राबता सुरू झाला होता. मात्र या पुढच्या म्हणजे 1सी या कालखंडात, येथे कोणीतरी भिन्न लोक राबत्यास आले होते व एक नवीनच संस्कृती उदयास आली होती असे सापडलेल्या खाणाखुणा व वस्तू यावरून आढळून येत होते.

या टेकाडावर उत्खनन केल्यावर वर निर्देश केलेल्या ज्या कालखंडातील वसाहतींचे 3 थर आढळून आले होते त्या तिन्ही थरांमध्ये, विपुल प्रमाणात निरनिराळ्या पशुपक्ष्यांची हाडे आढळली होती. यातील पशूवर्गाच्या हाडांचे, पाळीव प्राणी, वसाहतीच्या निकट राहणारे डुकरे, उंदीर या सारखे प्राणी आणि शिकार केले जाणारे हरणासारखे वन्य प्राणी या 3 वर्गात विभाजन करता येत होते.

गेल्या काही दशकांत सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ज्या अनेक प्राचीन वसाहती सापडल्या आहेत त्या सारखीच ‘सुरकोटला‘ प्राचीन वसाहत ही एक असल्याने यात फार निराळे किंवा वैशिष्ट्यपूर्ण असे काही सापडेल अशी फारशी अपेक्षा शास्त्रज्ञांना नव्हती. परंतु सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यातील कोणत्याही प्राचीन वसाहतीच्या उत्खननात कधीही न सापडलेल्या एका पाळीव प्राण्याची हाडे सुरकोटला उत्खननात पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना सापडली व या शोधामुळे, गेले 1 शतक युरोपियन इतिहास लेखकांनी या सिंधू खोर्‍यातील प्राचीन संस्कृतीबद्दलची जी काही प्रमेये मांडली होती ती पूर्णपणे चुकीची ठरतात की काय असा प्रश्न निर्माण झाला व एका नव्या विवादाला तोंड फुटले.

हा पाळीव प्राणी होता अश्व किंवा घोडा! (Equus caballus Lin or in plain English a Horse.)

उत्खनन करणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांच्या गटामधील, पशुंच्या अस्थी अवशेषांबद्दलचे विशेष तज्ञ मानले जाणारे शास्त्रज्ञ, श्री ए.के.शर्मा यांनी, 1बी या थरात सापडलेल्या हाडांमध्ये, घोड्याचे पुढचे दात व सुळे (incisor and molar teeth) व पायामधील खुराजवळील हाडे (various phalanges and other bones) ही निःशंकपणे घोड्याचीच (Equus caballus Lin (Horse) असल्या बद्दलचे आपले मत अतिशय सुस्पष्टपणे व्यक्त केले होते. या घोड्याच्या हाडांबरोबर, गाढवासारख्या तत्सम प्राण्यांची (Equus asinus and Equs hemionus khur (wild asses) हाडेही आपल्याला मिळाली असल्याचे आणि या शिवाय सर्वात वरच्या म्हणजे 1सी थरात जी हाडे सापडली आहेत जी निःशंकपणे घोड्याचीच आहेत असे म्हणणे शक्य होणार नाही हे सांगून एकूण परिस्थिती स्पष्ट केली होती.

श्री. ए.बी.शर्मा यांचा हा शोध इतका सनसनाटी होता की जगभरातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ, इंडॉलॉजिस्ट्स आणि इतिहासकार यांच्यात खळबळ उडाली व बहुतेकांनी हा शोध मान्य करण्याचेच नाकारले. 1920 सालामध्ये जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावल्या नंतरच्या कालखंडात युरोपियन इतिहासकारांनी, भारतावर आर्य टोळ्यांचे आक्रमण झाल्यामुळे भारतीय उपखंडाचा इतिहास कसा बदलला? आर्य-अनार्य यांच्यात कशी युद्धे झाली असावीत? आर्यांचा विजय का झाला? वगैरे प्रश्नांवर विसंबून जे एक भव्य दिव्य काल्पनिक चित्र रंगवले होते, त्या चित्रालाच मुळापासूनच सुरूंग या शोधामुळे लागण्याची वेळ आली.

या युरोपियन इतिहासकारांनी रंगवलेला हा इतिहास कोणत्या प्रत्यक्ष शोधांवर आधारित होता? हे बघणे रोचक ठरेल. सिंधू संस्कृतीतील उत्खनन झालेल्या कोणत्याही ठिकाणी पाळलेला घोडा (Equus caballus Lin) या प्राण्याचे अवशेष कधीही सापडलेले नाहीत. सिंधू संस्कृती लयाला गेल्यानंतरच्या (इ.स.पूर्व 1700-1500) कालात, भारतीय उपखंडामध्ये जी वैदिक संस्कृती उदयास येऊन सर्वमान्य झाली होती, त्या संस्कृतीमध्ये पाळलेला घोडा या प्राण्याला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान दिलेले होते. या मुळे, नंतरच्या काळात घोड्यांच्या पाठीवरून तुफानी घोडदौड करत आलेल्या चेंगिझखानच्या सैन्याने जसा मध्य एशिया सहज रित्या पादाक्रांत केला होता तशाच पद्धतीने अफगाणिस्थान-इराण कडून घोड्याच्या पाठीवरून आलेल्या आर्य टोळ्यांनी आपल्या तुफानी घोडदौडीच्या बळावर सिंधू संस्कृतीतील आणि बैलगाडी हेच ज्यांचे प्रमुख वाहन होते अशा स्थानिक अनार्य वसाहतींचा संपूर्ण विनाश करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले असावे असे काहीसे चित्र या युरोपियन इतिहासकारांनी रंगवले होते. हे चित्र, या युरोपियन इतिहासकारांच्या मताने, इतके परिपूर्ण, कोणतीही शंका घेण्यास वाव नसलेले व परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते की या इतिहासावर हा अखेरचा शब्द आहे असे मानले जाऊ लागले होते. भारतातील अनेक विद्वान मंडळींनाही हा आर्य-अनार्य सिद्धांत पसंत पडला व उत्तर भारतीय म्हणजे आर्य व दक्षिण भारतीय म्हणजे अनार्य असेही काही मंडळी म्हणू लागली.

जगभर सर्वमान्य झालेल्या युरोपियन इतिहासकारांच्या या प्रिय सिद्धांताला भारतातील एक साधा सुधा पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता आव्हान देऊ बघत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, तथाकथित आर्य टोळ्यांचे आक्रमण भारतीय उपखंडावर ज्या काळात झाले असावे असे मानले जात होते त्याच्या 300 ते 500 वर्षे आधीपासूनच किंवा इ.स.पूर्व 2000 या कालखंडापासूनच पाळीव घोडा हा प्राणी हडाप्पा किंवा सिंधू संस्कृतीतील लोकांना परिचित होता नव्हे तर त्यांच्या वापरात होता.

(क्रमश)

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा

14 मार्च 2013

लेखनविषय: दुवे:

Comments

वा! वा!

हडप्पा आणि मोहेंजोदारोच्या काळात घोडा नव्हता हे तर सर्वश्रुत आहे. सूरकोटलाचा काळ आणि हडाप्पाचा काळ वेगळा असल्याचे चंद्रशेखर यांनी नमूद केलेले आहेच.

आर्य अनार्य वगैरे बाजूला ठेवून काही प्रश्न विचारावेसे वाटतात ते असे की सिंधू सरस्वती संस्कृतीतील शहरे ही नगरराज्ये आहेत. सूरकोटलाशिवाय इतरत्र घोडे आढळले का? आढळले नसल्यास या एका ठिकाणीच घोडे कसे? (इतर ठिकाणी उत्खनन झालेले नाही असे उत्तर असल्यास असो.) पण इतरत्र घोडे मिळालेले नसल्यास येथे एक वेगळी वस्ती होती असे म्हणता येईल. मग ती वेगळी वस्ती येथे स्थायिक झाली तेव्हा ती पोहोचेपर्यंत अध्येमध्ये त्यांनी वस्ती केलीच नाही की काय?

मला असे वाटते (चू. भू. द्या. घ्या) हे घोडे समुद्रमार्गे येथे पोहोचले असावे. सूरकोटलाचे स्थळ लक्षात घेता हे शक्य असावे असे वाटते.

सुरकोटला थिअरीला छेद देणारे काही येथे वाचता येईल.

प्रश्न

प्रियालीताईंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरे मिळाली आहेत तर काही अजूनही अनुत्तरीत आहेत. उत्तरे मिळालेल्या प्रश्नांबद्दल माहिती पुढच्या भागात येईलच.
सुरकोटलातील घोडे हे समुद्र मार्गाने आले असावेत याच्याशी मी सहमत आहे. या भागाचा समुद्र मार्गाने मेसेपोटेमिया बरोबर मोठा व्यापार चालत असे. तांबे व टिन खनिजांची आयात तेथूनच केली जाई. त्यामुळे घोडे आयात करणे कठीण नव्हते.

अवांतर

मेसेपोटेमिया मधील प्राचीन लेखनात 'मेलुहा' बरोबरच्या व्यापाराचा उल्लेख सापडला आहे. मेलुहा म्हणजेच सिंधू संस्कृती असावी असा एक अंदाज काही लोक बांधतात. प्रियाली ताई यावर काही प्रकाश टाकू शकतील का?

मेलुहा

मेसेपोटेमिया मधील प्राचीन लेखनात 'मेलुहा' बरोबरच्या व्यापाराचा उल्लेख सापडला आहे. मेलुहा म्हणजेच सिंधू संस्कृती असावी असा एक अंदाज काही लोक बांधतात.

मी ही एवढेच ऐकलेले आहे. यापेक्षा जास्त वाचन नाही. काही मिळते का शोधायला हवे.

वाचतोय...

वाचतोय... पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

मस्त

मस्त, अधिक वाचायला आवडेल.

वॉव

मस्त विषय आणि अभ्यास... उपक्रमाला आणि चंद्रशेखरयांच्या लेखन शैलीला साजणारी आणखीन एक लेखमाला वाचायला उत्सुक...

नवीनच....

ही नवीनच माहिती दिसत्ये.
हरप्पा- मोहेंजोदडो च्या वेळेस घोडे वापरात नव्हते असेच माझ्याही वाचण्यात आहे.
(यु पी एस सी साठी मान्यताप्राप्त बहुतांश पुस्तकात अजूनही हेच आहे.)

हडप्पा-मोहेंजोदाडो

हरप्पा- मोहेंजोदडो च्या वेळेस घोडे वापरात नव्हते असेच माझ्याही वाचण्यात आहे.

हे निरिक्षण योग्य आहे. सुरकोटलाचा कालखंड बराच पुढचा आहे.

ही लेखमाला कोठे जाणार?

ही लेखमाला कोठे हे जाणार हे जाणण्यासाठी उत्सुक आहे. ती AIT - Aryan Invasion Theory च्या दिशेने झुकणार असली तर माझी शंका आत्ताच नोंदवून ठेवतो.

AIT - Aryan Invasion Theory च्या विरोधात काहीहि असले तरी भारत ते युरोप ह्या विस्तीर्ण पट्ट्यातील डझनावारी भाषांमधील सहज दिसणारे साधर्म्य ह्या जबरदस्त मुद्द्याला AITच्या विरोधकांपाशी काय उत्तर आहे? असे पटणारे उत्तर जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत AIT - Aryan Invasion Theory ला आपल्या स्थानावरून दूर करणे अवघड वाटते. ह्या विषयातील मी मोठा जाणकार मुळीच नाही पण हे म्हणणे common sense ला सहज पटेल असे आहे.

आक्रमण आणि संस्कृती प्रसार

सिंधू संस्कृतीच्या विलयानंतर भारतीय उपखंडात वैदिक संस्कृती पसरली व ही संस्कृती मध्य एशिया मधून भारतात आली याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. याच धर्तीवर सिंधू संस्कृतीमधील मूळ लिपी/भाषा नष्ट झाली व तिची जागा पुढे प्राकृत भाषेने (बर्‍याच कालखंडानंतर) घेतली असे मला वाटते. प्राकृत भाषेचे मूळ हेही मध्य एशिया मधूनच आले असल्याचा संदर्भ मी वाचलेला आहे.मात्र सध्या तो माझ्याकडे नाही.

ही वैदिक संस्कृती आणि भाषा या भारतात पसरल्या कशा? हा कळीचा मुद्दा आहे. आर्य आक्रमण सिद्धांताप्रमाणे या प्रसाराचे कारण आर्यांचे आक्रमण हे होते. मात्र संस्कृती /भाषा पसरण्यासाठी आक्रमणाचीच गरज असते असेच काही नाही. या साठी कंबोडिया, इंडोनेशिया,मलेशिया या देशांत झालेला प्रथम हिंदू संस्कृतीचा प्रसार व नंतर इंडोनेशिया,मलेशिया मध्ये झालेला इस्लामचा प्रसार ही मोठी समर्पक उदाहरणे आहेत असे मला वाटते. येथे कोणतेही हिंदू किंवा इस्लामिक आक्रमण न होता येथे या संस्कृती व भाषा पसरल्या होत्या. (कंबोडियात सापडलेले काही शिलालेख संस्कृत भाषा व ख्मेर लिपितील आहेत.)

सिंधू संस्कृती भाषा

सिंधू संस्कृतीमधील मूळ लिपी/भाषा नष्ट झाली व तिची जागा पुढे प्राकृत भाषेने (बर्‍याच कालखंडानंतर) घेतली असे मला वाटते.

या विषयी मागे लिहिलेला एक लेख येथे आहे. हा लेख उपक्रमवर देखील आहे पण हल्ली स्वत:च्या लेखांचे दुवे शोधता येत नाहीत. कोणाकडे युक्ती असेल तर कळवावे.

दुवा

हा घ्या दुवा. गुगलवर 'उपक्रम प्रियाली सिंधू' असे शोधल्यावर मिळाला. लेखाचे नाव ठाऊक असल्यास अशा प्रकारे शोधता यावे.

धन्यवाद.

:-)

 
^ वर