मंत्रसामर्थ्य

परवा एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
त्यांच्या या विधानात काही तथ्य आहे काय? या ऊर्जेचा प्रत्यक्ष प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला? ॐ मधील प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली भरमसाट विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक भोळसट गलिबलांना असली विधाने महान सत्ये वाटतात .ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,वा! काय विद्वत्ता आहे असे म्हणतात , हे खरे.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली.त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी थोडातरी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? का त्या मंदिरात प्रत्यही ओम् ओम् जपणारे महात्मे त्यावेळी ओय् ओय् म्हणत होते? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले? आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध गेंगाणा खर्जस्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा या देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युन्निर्मिती का करत नाही? असे काही करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणण्यात काय अर्थ आहे? या ऊर्जेचा उपयोग कोणत्या क्षेत्रात ,कशा पद्धतीने होतो?
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून बसून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले..साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो...मी मुक्त झालो...मी ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत.त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
बरेच अध्यात्मप्रेमी गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे.या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात.अखिल ब्रह्मांड पवित्र करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे.जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त ,शुद्ध आणि पवित्र होईल.असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत भारावून जातात. मग सी.डी.लावून "ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा गायत्री मंत्र ऐकत बसतात. खिडकी उधडी असते.डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतात. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतात.मंत्राच्या त्याच त्या ओळी ऐकून ऐकून कंटाळतात."आता राहूं दे.नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतात.दिवा लावून डास शोधायला लागतात. आंतर जालावर गायत्री मंत्राविषयी एक लेख आहे.त्यातील दोन वाक्ये,"
....विद्वानांच्या म्हणण्या नुसार गायत्री मंत्र ही "4 1H + 2 e --> 4He + 2 neutrinos + 6 photons " या सूर्यावर हायड्रोजन वायूपासून हेलियम, मुक्त Neutrons , Photons आणि उर्जा निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन आहे"."हा गायत्री मंत्र लाल, शुभ्र असा अतिशय तप्त असल्याने त्याला ओम हा फिल्टर लावला जातो."
अशा लेखनाने अध्यात्मवादी हास्यास्पद ठरतात.
"गं गणपतये नम:।" या मंत्रजपाने विश्वशांतीचे संधारण,संवर्धन आणि पोषण होते ." हे तथ्यहीन विधान भोळसट श्रद्धाळूंना खरे वाटते.गणेश जयंतीला गणेशयाग करतात.दिवसभर ध्वनिवर्धकांवर "ॐ--गं गणपतये नम:।" चालू असते.ऐकून कान किटतात. शेजारच्या गल्लीत रात्री टोळी युद्ध होऊन एखादा खून पडला तरी "गं गणपतये नम:।" मंत्र विश्वशांतीचे पोषण करतो ही भोळसटांची श्रद्धा अढळ राहाते.
हे मंत्र, तसेच "ॐ नम: शिवाय।,ॐ नमो भगवते वासुदेवाय।जय जय रघुवीर समर्थ।," असे मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण वास्तव जाणावे.थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान,प्रजाहितदक्ष होते.दुर्दैवाने तरुणपणीच त्यांना क्षय रोगाने ग्रासले.अनेक आयुर्वेदाचार्य धन्वंतरींच्या उपचारांनी गुण आला नाही.अंतिम समयीं मृत्युंजय मंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो दशग्रंथी ब्रह्मणांना नियुक्त केले.पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला.
" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले.देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीच पाप मोठे. मंत्रजप व्यर्थ ठरले. झांशीवालीस गोळी लागली.भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."-----या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हे एक होते.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे.त्यातील संग्रामविजय मंत्र:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते.मंत्राने काहीही विशेष गोष्ट साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे .मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक,खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने आश्चर्यकारक चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.

.....................................................................................................................................................................................

Comments

एक त्रुटी

गायत्री मंत्राविषयी आंतरजालावर एक लेख आहे असे म्हटले आहे.त्या लेखाचा दुवा(लिंक) लिहिला होता.पण लेखातील प्रत्येक ओळीतील शेवटचे काही शब्द दिसत नाहीत.त्यांत हा दुवा गेला. तो लेख http://iamgajanan.blogspot.in/2012/02/blog-post.html#!/2012/02/blog-post.html
येथे आहे.

आजचे मंत्र!

असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत!

फक्त आजचे मंत्र
|ॐ परपीडनाय नमः |
| ॐ स्वहिताय नमः |
| ॐ सुखाय नमः |
|ॐ मतलबे नमः |
| ॐ सेल्फिशाय नमः |
असे असतील.
(या मंत्रात दैवी सामर्थ्य नसले तरी परमेश्वराच्या कृपेने व आमच्या 'गुरुमहाराजां'च्या आशिर्वादाने जमेल तेवढे प्रयत्न करत आम्ही हे साध्य करून दाखवू शकतो!)

उच्चशिक्षित अध्यात्मवादी

यनावाला सर

अहो राजकारणी, उच्चशिक्षित अध्यात्मवादी आणि जातीद्वेष्टे यांची भाषणे किंवा लेखन यांच्याकडे दुर्लक्ष करायचे असते हो!

बाकी लेख एकदम बेष्ट! +१

"आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.

एक जबरि झन्झावात....!!!!

शिवी मंत्र

या वरुन एक प्रयोग डोक्यात आला कि सार्वजनिक ठिकाणी शिवी ही मंत्रासारखी उच्चारुन त्याचा आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होतो. तसेच एखादा मंत्र वा सुवचन हे शिवी च्या आविर्भावात म्हणून पहायचे काय परिणाम होतो ते. मेंदूच्या मनात हे सुबोध जावडेकरांच पुस्तक वाचताना त्यात माणसे शिव्या का देतात हे प्रकरण आहे.त्यावरुन सुचले.
बाळासाहेब ठाकरेंच्या निधना अगोदर अनेक हितचिंतकांनी परमेश्वराला साकडे घातले होते.त्याने बाळासाहेबांना काही बरे वाटले नाही पण साकडे घालणार्‍या लोकांना बरे वाटले.
काही लोकांना कविता गाणी यांनी पण बर वाटते. हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे, कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा,शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी .... हे कवी ना काहीतरी भंपक बोलत असतात. आता शुक्र काय तारा आहे काय तो तर ग्रह आहे.. हिरवे गालिचे कसले? निसर्गात वनस्पतींच्या पानांना क्लोरोफिल मुळे रंग हिरवा दिसतो हे शास्त्रीय सत्य आहे.कवितेतला प्रियकर प्रेयसी साठी आकाशातले चांद तारे तोडून आणतो. ती काय झाडावरची फुल आहेत काय तोडायला. काहीतरी अशास्त्रीय लिहितात. त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेउनि फिरतो, इथे तिथे टेकीत.... ती काय रिकामी शबनम आहे का आन अस काठी टेकत टेकत काय जायच? रिकामे हृदयाला कसले वजन? उगा महालक्ष्मीच्या पावलांचा छाप घरभर टेकवत फिरवल्या सारखा फिरवत बसवायच? असो कविला हे रसग्रहण ऐकून फिट यायची!
<<हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.>>
अगदी खर आहे. देव व दगडात काही फरक नाही. फरक आहे तो ते मानणार्‍याच्या मेंदू मध्ये. बाकी यनावालांचे लिखाणातील प्रहारसातत्य अगदी सामर्थ्यवान मंत्रासारखेच :) :-)

हा हा...

या वरुन एक प्रयोग डोक्यात आला कि सार्वजनिक ठिकाणी शिवी ही मंत्रासारखी उच्चारुन त्याचा आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होतो.

किंवा मग अगदी गायत्री मंत्राचे शेवटचे दोन शब्द जोर देउन मोठ्ठ्याने म्हणायचे. ;)

बाकी लेख एकदम मस्तच!

सहमत

बाळासाहेब ठाकरेंच्या निधना अगोदर अनेक हितचिंतकांनी परमेश्वराला साकडे घातले होते.त्याने बाळासाहेबांना काही बरे वाटले नाही पण साकडे घालणार्‍या लोकांना बरे वाटले.

मंत्र तंत्र वगैरे उपचार मनाला उभारी देण्यासाठी असतात. एक प्रकारे प्लासिबो इफेक्ट असतो.

घाटपांडेंच्या प्रतिसादाशी सहमत आहे. जगात अनेक गोष्टी कल्पनांच्या पुलांवर बांधलेल्या असतात कारण मनुष्य कल्पना करू शकतो आणि तिचा विस्तारही. कविकल्पना हा त्यातलाच एक भाग. फक्त त्या कल्पनांवर डोळे झाकून विश्वास ठेवू लागले (जसे, प्रेयसी बायको झाल्यावर "मागे तू माझ्यासाठी यंव आणि त्यंव करेन अशा शपथा घेतल्या होत्यास.." असे सुनावते तसे) की सर्व प्रश्न उद्भवतात.

बाकी, लेख आवडला. :)

स्वर्ग आणि नरक

नमस्कार यनावालासर,

आपल्या इतर लेखाप्रमाणेच डोळयात झणझणीत अंजन घालणारा लेख.

एक विनंती, कोणत्या गाढवाने स्वर्ग आणि नरक बांधले त्याचाही जरा समाचार घ्या की.

नरे निर्मिले

कोणत्या गाढवाने स्वर्ग आणि नरक बांधले त्याचाही जरा समाचार घ्या की.

देव दानवा नरे निर्मिले हे मत कळवू या लोका .... असे काहीतरी केशवसुतांनी म्हटले आहे याची आठवण झाली. तसेच हे स्वर्ग नरक आहे.

सार्वजनिक ठिकाणी शिवी

शिवीची डेफिनिशनच महत्वाची असते.
तसेच मंत्राचे आहे.
मला अमुक शिवी दिल्यावर किती राग येतो? यावर शिवीची पावर ठरते. उदा. कुणी मला 'समाजवादी' अशी शिवी हासडली, तर मला अ‍ॅक्चुअली तो गौरव वाटू शकतो. सामर्थ्य मी मानण्यावर आहे. (कॉलेजला असताना एका बिचार्‍या प्राण्याचे आडनांव हीच शिवी बनवली होती आम्ही. अबे तू काय क्ष्क्ष्क्ष्क्ष आहेस का? असे म्हटले की आई बहिणीवरून शिवी दिल्यासारखे करायचे असे आमचा ग्रूप करीत असे. इट वॉज व्हेरी इफेक्टिव. आमचा हेतू साध्य झाला होता.)

तात्पर्य,

वालावलकर गुरूजींनी कुंडलिनी जागृतीचे वर्णन केले ते पर्फेक्ट आहे. सेल्फ हिप्नॉटिझम आहे.

जोपर्यंत हार्मलेस आहे, समाजाचे नुकसान करीत नाही तो पर्यंत लोकांनी मंत्रजप करावा असे माझे मत आहे. पण उदा. अतिक्रमण करून बळकावलेल्या जागेत भेसूर आवाजात, लाऊडस्पीकर लाऊन, 'श्री स्वामी समर्थ' अश्या किंवा तत्सम "मंत्राचा" जप २-२ तास सकाळ संध्याकाळ करून इतरांचे जिणे हराम केले तर मी जाऊन लाऊडस्पीकर बंद करण्याची ताकत ठेवतो, (हो. 'त्या' धर्मातल्या लोकांची बांगही आवाज लिमिटेड केली आहे. तो बांगी पेशंट आहे माझा ;) तेव्हा 'ते' खुसपट काढले तर उत्तर आहे. सब घोडे मेरे लिये १२ टके.) त्यासाठीचे समाज (शेजार्‍या पाजार्‍यांचे) "प्रबोधन" (ब्याकप प्लॅन) देखिल करण्याची उर्मी असे लेख वाचून येते. (प्रबोधन = आपल्याला त्रास होतो आहे, तो यांचा फक्त लाऊडस्पीकर बंद केल्यावर बंद होईल. यांनी जप करावा. मला फरक पडत नाही. फक्त आपल्या घरी करावा, हे बहुसंख्येस पटवून देणे.)

अवांतरः
"बिग ब्यांग झाला तेंव्हाचा ढूऽम! असा आवाज युगानुयुगे विश्वात दुमदुमत होता. (अजूनही आहे. तुमच्यात सिद्धि नाय हो..) आमच्या ऋषींनी तो ऐकण्याची सिद्धी प्राप्त केली अन ऐकला तो ॐ असा ऐकू आला" अशी भाकडकथा लै भक्तीभावाने सांगताना ऐकली आहे मी ! त्या वक्त्याच्या फँटसायझिंग पावरला सलाम!

वांधा

जोपर्यंत हार्मलेस आहे, समाजाचे नुकसान करीत नाही तो पर्यंत लोकांनी मंत्रजप करावा असे माझे मत आहे.

इथच तर वांधा आहे ना? हार्मलेस आहे हे ठरवणार कोण? तसच समाजाचे नुकसान आहे की नाही हे कसे व कोण ठरवणार? या प्रश्नाशी चर्चा येउन ठेपते.
काही श्रद्धावान इतरांनीही श्रद्धावान असले पाहिजे असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आग्रह धरतात तर काही अश्रद्ध इतरांनीही अश्रद्ध असले पाहिजे असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आग्रह धरतात. ही रस्सी खेच कैक शतके चालूच आहे.भविष्यातही ती अशीच चालू राहिल असे वाटते. श्रद्धावान असणे हे अंधश्रद्धाळू पणाचे लक्षण मानले जाते तर अश्रद्ध असणे हे विवेकवादी / बुद्धीप्रामाण्यवादी/ विज्ञानवादी असल्याचे लक्षण मानले जाते.
असाही वर्ग नक्कीच आहे कि जो अश्रद्धते कडे झुकणारा असला तरी त्यांना इतरांचे श्रद्धावान असणे मान्य आहे .त्यांच्या सहअस्तित्वाचा अधिकार ते मान्यही करतात. त्यांच्या श्रद्धेचा ते मतभिन्नता ठेउनही आदरही करतात. हीच बाब सश्रद्धतेकडे झुकणार्यां काही लोकांची आहे.

हार्मलेस

समाजाचे नुकसान आणि हार्मलेसच्या वाख्या इतक्या मजेशीर आहेत की समाज नक्की कशाला काय मानतो तेच कळत नाही. अनेकदा स्वतःला हार्म होणार नाही याकडे बघून आंदोलनाचा हार्मलेस मोड निवडला जातो. दिल्लीत बलात्कार झाला की रस्त्यावर यायचे. पण जिथे अतिरेकी हल्ले होतात तिथे शांत रहायचे.
रस्त्यावर येऊन सरकार आणि पोलिसांना शिव्या हासडायच्या पण वाहतुक नियम तोडला की चिरिमिरीला समाजच पुढे. सर्वात हार्मलेस मार्ग म्हणजे असे संकेतस्थळांवर/फेसबुकवर चकाट्या पिटायच्या. तावातावने लिहायचे. कृती करायची वेळ आली की मात्र चिडीचुप. मग यंत्रणांना दोष द्या.
वर शिवी बद्दल चांगले उदाहरण दिले आहे. शिवी कोणती आहे त्यावर अनेकांची प्रतिक्रिया अवलंबुन आहे. ते शिवीचे सामर्थ्य.
कोणी कशाला महत्व द्यावे हा ज्याचा त्याच वैयक्तिक प्रश्न आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतोच. असो.

 
^ वर