हा काय प्रकार आहे?

अमूक देवीच्या नावाने २०० पत्रके छापून वितरीत करा.असे केलेत तर तुमचे भाग्य उजळेल! नाहीतर काहीतरी आपत्ती येईल.
अशा तर्‍हेची पत्रके आपण नियमित बघतो,वाचतो. आपल्यापैकीचे काही देवभोळे,पापभीरू लोक ह्या अशा गोष्टीने प्रभावित होऊन म्हणा अथवा घाबरून जाऊन म्हणा त्या पत्रकाचे मुद्रण आणि वाटप करतात. हल्ली तर ह्या महाजालावर देखिल हा प्रकार आढळतो आहे. अमूक एक विरोप १० जणांना पाठवा आणि पाहा चमत्कार! नाही पाठवलात तर गंभीर संकट ओढवेल... वगैरे वगैरे.

मंडळी वैयक्तिकरित्या सांगायचे तर माझा ह्या भाकड गोष्टींवर विश्वास नाही आणि मी अशांना केराची टोपली दाखवतो. पण प्रश्न केवळ माझा नाहीये.प्रश्न हा आहे की ह्या अशा गोष्टी कोण शोधून काढतो आणि कशा पसरवतो?अगदी प्रथम हे कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाले?(ह्यावर इतिहास अभ्यासक काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते. त्या निमित्ताने इतिहासाचीही उजळणी होईल!)त्या मागे त्यांचा नेमका काय हेतू असू शकतो? लोक ह्याला कसे काय बळी पडतात? हे सगळे धंदे करणार्‍यांचा ह्यातून नेमका काय फायदा असतो? ह्यावर पोलिस,शासन आणि आपण जनता काय आणि कसे उपाय योजू शकतो जेणेकरून ह्या गोष्टी भविष्यात घडणार नाहीत?

हे केवळ भारतातच घडते की जगात इतरत्रही असे धंदे चालतात?

मंडळी आपली ह्या बाबतीतली अमुल्य मते जाणून घ्यायची आहेत!

Comments

छान

इतिहास अभ्यासक काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते. त्या निमित्ताने इतिहासाचीही उजळणी होईल!

छान. सदर अभ्यासक मंडळी आपली मदत करतील अशी शुभेच्छा! लेखाच्या वर्गीकरणात भाषा, अर्थकारण,तत्त्वज्ञान, धर्म, कायदे, प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे यासोबत इतिहास असते तर अधिक सयुक्तिक ठरले असते असे वाटते.

त्यानिमित्ताने माणसे इतिहासात रुची घेतात याचे कौतुक वाटले.

सहमत आहे.

प्रियालीजी आपल्याशी मी सहमत आहे. हा विषय केवळ इतिहासाशी संबंधित नाही हे मान्य.
पण कोणतीही गोष्ट प्रथम कधी घडली,कुठे घडली,कशी घडली,कोणत्या परिस्थितित घडली अशा सर्व बाजूंचा विचार इतिहास संशोधक विचार करतात. असे करताना त्यांना कोणत्याही विषयाचे बंधन असावे अथवा असते असे मला वाटत नाही. म्हणून मी ह्या गोष्टींवर इतिहास अभ्यासकांचेही मत जाणून घेऊ इच्छितो. ऐतिहासिक,वैज्ञानिक,धार्मिक आणि एकूणच बहुअंगाने ह्याचा विचार व्हावा अशी इच्छा आहे.
माझी अशी अपेक्षा आहे की ह्या माझ्या वाटण्यात काही वावगे नाही ह्याची आपल्याला खात्री पटेल.

तसेच, इतिहासाची उजळणी इतिहासाची शालेय किंवा ऐतिहासिक पुस्तके वाचून करता येईल, गूगलवर शोधूनही मिळेल.

आपण म्हणताहात तेव्हा हे इतर विषयांनाही लागू होईल असे वाटते. मग चर्चा करण्याचा मतब काय आहे?
हल्ली कोणत्याही विषयाची माहिती जर महाजालावर उपलब्ध आहे म्हणून मग ती तिथेच वाचावी आणि आपले आपण गप्प बसावे असा ह्याचा अर्थ असल्यास'चर्चा प्रस्ताव' हा पर्यायही इथून काढून टाकणे संयुक्तिक होईल असे नाही का वाटत?

अगदी बरोबर

आपण म्हणताहात तेव्हा हे इतर विषयांनाही लागू होईल असे वाटते. मग चर्चा करण्याचा मतब काय आहे?

हे माझ्याही लक्षात आले म्हणूनच मी माझा प्रतिसाद बदलला असो. माझ्या प्रतिसादाची वेळ आणि आपल्या प्रतिसादाची वेळ यात सुमारे २० मि. चा फरक दिसतो, तरी आपल्याला माझा जुना प्रतिसाद कसा दिसला ते सांगावे. मूळ प्रतिसादात नसलेली वाक्ये उद्धृत करण्याचे प्रयोजनही समजवून द्यावे.

कोणत्याही विषयाची माहिती जर महाजालावर उपलब्ध आहे म्हणून मग ती तिथेच वाचावी आणि आपले आपण गप्प बसावे असा ह्याचा अर्थ असल्यास'चर्चा प्रस्ताव' हा पर्यायही इथून काढून टाकणे संयुक्तिक होईल असे नाही का वाटत?

माहिती महाजालावर सहज शोधता येते. निदान उजळणी करता तरी. उजळणी म्हणजे गोष्ट लक्षात राहण्यासाठी वारंवार वाचून/ पठण करून बुद्धी तल्लख करणे असा नाही का? जर एखादी गोष्ट माहितच नसेल तर महाजालावर ती कशी शोधावी असा प्रश्न अनेकांना पडतो त्यावेळेस चर्चा असाव्यात. माणसांची मते जाणून घेण्यासाठीही चर्चा असाव्यात परंतु जी गोष्ट आपल्याला माहित आहे परंतु फारशी आठवत नाही तिचा शोध सर्वप्रथम गूगलून पाहायला काहीच हरकत नाही. माहिती मिळाली नाहीच तर चर्चा आहेतच. हे केल्याने, बाष्कळ चर्चा कमी होतील. आपली चर्चा बाष्कळ आहे असे मला म्हणायचे नाही हे कृपया लक्षात घ्यावे.

एखाद्याने माहिती वाचावी आणि गप्प बसावे असे मला वाटत नाही. ती माहिती चांगल्या शब्दात लिहून त्याचे लेखही बनवता येतील. आपण जे वाचले ते इतरांनी वाचलेले असेल असेच नाही किंवा त्यावर त्यांना वाचायची इच्छा झाली नसेलच असे नाही. त्याचे लेख केल्याने उपक्रमावर येणारी मंडळी ते सहज वाचतील. परंतु, उजळणी हा शब्द गोष्ट आधीच माहित असून ती कालांतराने पुनश्च लक्षात येण्याची प्रक्रिया दर्शवते आणि त्यासाठी सर्वप्रथम शोधयंत्राचाच वापर करावा आणि नंतर चर्चा असे मला वाटते.

आपण करता ते बरोबर आहे.

ह्यावर पोलिस,शासन आणि आपण जनता काय आणि कसे उपाय योजू शकतो जेणेकरून ह्या गोष्टी भविष्यात घडणार नाहीत?

अशा पत्रांच्या उगमापर्यंत जाणे व ती निघूच नयेत अशी व्यवस्था करणे हे कदाचित् आपल्याला जमणार नाही. परंतु आपण एक करू शकतो. ते म्हणजे अशा पत्रांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना केराची टोपली दाखवणे. ते आपण अगोदरच करता आहात.

आपले चांगले होईल की वाईट हे "करावे तसे भरावे" या त्रिकालाबाधित नियमानेच ठरते, बाकी कशानेही नाही. हा नियम निरपवाद का आहे हे स्पष्ट करणारा एक लेख मी २२ मार्च २००६ ला मनोगतवर टाकला होता. त्याचा येथे दुवा द्यावा म्हणून मनोगत उघडले तर तो लेख मनोगतवरून गायब झाल्याचे आढळून आले.

चांगला प्रश्न

विनाकारण गाडीवर ब्लेडच्या रेघोट्या मारणारे, इमारतींच्या जिन्यांमध्ये पचापचा थुंकणारे, बस किंवा रेल्वे अथवा सार्वजनिक वास्तूंमध्ये स्वतःची नावे कोरणारे अशा प्रकारच्या मनोवृत्तीचा एक विशिष्ट वर्गच असतो. त्यातच असल्या भाकडकथा रचणारेही असतातच. दुर्दैवाने त्याला बळी पडणा-यांची संख्याही आहेच. या गोष्टींवर विश्वास ठेवून ही डांबराची शेपटी वाढवायला मदत करायची किंवा नाही हा प्रत्येकाने तारतम्यने सोडवायचा प्रश्न आहे.

उपद्व्यापी लोक सर्व जगभर पसरले असल्याने हे प्रकार सगळीकडे चालतात. असल्या विरोप शृंखलांची जंत्रीच आपल्याला ब्रेक द चेन या इंग्रजी संस्थळावर मिळू शकेल.

माझ्या मते

माझ्या मते अश्या निरोपांना केराची टोपली दाखिवलेले बरे.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

संतोषी माता

प्रश्न हा आहे की ह्या अशा गोष्टी कोण शोधून काढतो आणि कशा पसरवतो?अगदी प्रथम हे कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाले?

संतोषी मातेची पत्रांची ही चेन ही कल्पना पत्राचा खप वाढावा म्हणून एका पोस्टमास्तर्च्या सुपीक डोक्यातून आली असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे.

प्रकाश घाटपांडे

मूळ्/कारण

याचे मूळ रशिया/अल्बानियात आहे असे (खात्रीलायक सूत्रांवरून ;) ) समजते. हे सारे सोव्हिएट रशियाच्या पतनाच्या सुमारास सुरू झाले. या सार्‍यातूनच पुढे पिरॅमिड योजना पुढे येत गेला. यात थोडक्या कालावधीत कित्येक पट अधिक लाभाचे गाजर दाखवले जात असे. मूळ गणितात/संकल्पनेतच असलेल्या अडचणीमुळे, या पाया अर्थातच पिरॅमिडप्रमाणे स्थिर नसलेल्या, मुळात बांधकाम वरच्या टोकाने सुरू केलेल्या योजना कोसळत राहिल्या.

यामागची मूळ कल्पना अर्थिक लाभ हीच होती. सध्याची देव देवतांची पत्रके अशा योजनांच्या यशापयशाची चाचपणी तर नव्हे ?

अवांतर: पायापासून सुरूवात न करता, छतापासून सुरूवात करून पूर्ण केलेली इमारत अस्तित्वात आहे?

(दुवा देणे हेतुतः टाळले आहे. 'तो काय इथले तिथे करतो' असे वाटत राहू नये म्हणून! बाकी अंतरजालावर हवी ती माहिती शोधणे कठीण नाही. पण 'या'साठी तो गूगल वापरत नाही.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

संतोषी माता की जय !


अत्यानंद साहेब,

या विषयावर मानोसपचारतज्ञच खुलाशावर माहिती देऊ शकतील असे वाटते. पूर्वी संतोषीमाताची पत्रे यायची,नंतर वेगवेगळ्या देव-देवतांची पत्रके रस्त्यावर लहान मुले ही पत्रके द्यायची, बरं जाऊद्या ! आपल्याला ही पत्रके वाटायची नाही,पण दुस-याला नावे कशाला ठेवायची म्हणून गुपचुप ती पत्रके वाचायची अन भितभित ते फाडून टाकायची ,असा या पत्रकांचा प्रवास.काही श्रद्धा प्रत्येकाच्या मनात बसलेल्या असतात,त्याचा फायदा काही विकृत माणसं घेतात असे वाटते.पण निश्चित काही सांगू शकत नाही ?

अवांतर;) एक उदाहरण- "जो कोणी कंटाळवाणी माहिती येथे देत राहील,त्याच्या संगणकामध्ये नुसता विषाणू येणार नाही,तर त्याच्या संगणकातील मदरबोर्डातील २३१नंबरचा रजिस्टन्स खराब होईल,प्रतिसाद वाचणा-यांनी ही माहिती खरडवहीतून एकमेकांना द्यावी.या पूर्वी ही माहिती 'म' यांनी न दिल्यामुळे त्यांच्या संस्थळावर दुरुस्त्या,सुधारणा कायम चालू असतात.व ही माहिती दिल्यामुळे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांना इथे अनेक चांगले लेखक मित्र मिळालेत.ते सतत प्रसन्न असतात.त्यांना वेतनवाढी मिळाल्यात,प्रवास करताना त्यांना सतत खिडकीत जागा आणि वय वर्ष चाळीस, पन्नास,साठी ची तरुणी शेजारी म्हणून लाभते."

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत..

मंडळी वैयक्तिकरित्या सांगायचे तर माझा ह्या भाकड गोष्टींवर विश्वास नाही आणि मी अशांना केराची टोपली दाखवतो.

सहमत आहे. शिवाय मी ते पाठवणार्‍या माणसाला त्याची किमान दोन रात्र झोप उडेल अश्या रिप्लाय मेलने मजबूत शिव्याही देतो जेणेकरून मला संबंधित व्यक्ति पुन्हा असले मेल पाठवायचे धाडस करणार नाही! ;)

अगदी प्रथम हे कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाले?(ह्यावर इतिहास अभ्यासक काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते. त्या निमित्ताने इतिहासाचीही उजळणी होईल!)

हा हा हा! मस्त हाणला आहे! ;)

तात्या.

विकिपिडियावर..

अगदी प्रथम हे कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाले?(ह्यावर इतिहास अभ्यासक काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते. त्या निमित्ताने इतिहासाचीही उजळणी होईल!)

या संबंधातील अधिक माहिती विकिपिडियावर मिळते का ते पाहावे!

हाणामारी

अगदी प्रथम हे कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाले?(ह्यावर इतिहास अभ्यासक काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते. त्या निमित्ताने इतिहासाचीही उजळणी होईल!)

हा हा हा! मस्त हाणला आहे! ;)

हानामारी मलाबी आवडली पर तेची गरज कळली नाय बा! मंजी हितं ६०० डोकी सुदिक नसताना काई मान्सांना अशी हानामारीची खुमखुमी का येती? इतिहास अब्यासकांचे लेख हितं र्‍हातात आन् बाकीच्यांचे उडतात म्हून की काय?

(खेडुतफ्यान) राजीव.

एकाला एक न्याय !

माझा प्रतिसाद संपादित अन् हानामारीचा प्रतिसाद ठेवला,तो प्रतिसाद संपादित करा की ?
एकाला एक न्याय,अन दुस-याला एक. वारे मालक अजब तेरा सरकार.

सदस्यांचे नाव घेऊन त्यांच्यावर केलेली अनावश्यक टिप्पणी उपक्रमाच्या संपादक मंडळाला काढून टाकणे भाग असते. लेखन करताना असे थेट रोख टाळण्याची सवय सदस्यांनी लावून घ्यावी. - उपसंपादक.

'जय संतोषी माँ' ऊर्फ साखळी पत्रे

या विषयावर प्रचंड अभ्यास करून त्याचा विदा जालावर उपलब्ध करून देण्याचे काम डॅनियल व्हॅनअर्सडेल यांनी केले आहे असे दिसते. हे पहावे.
भारतात मात्र हे लोण 'जय संतोषी माँ' चित्रपटापासूनच सुरू झाले असावे. पहा स्क्रीन.एका ब किंवा क दर्जाच्या भिकार चित्रपटाला (तेही एका दुय्यम देवतेवरील) 'शोले'च्या बरोबरीने प्रसिद्धी आणि प्राप्ती मिळली त्याचे कारण म्हणजे ही साखळी पत्रे!
मला अशा साखळी पत्रांचा आणि विपत्रांचा अयोग्य वापर मुळीच आवडत नाही. ती मी पुढे कधीच पाठवत नाही. पण एखाद्या १० वर्षांच्या मुलाला कांही दुर्धर आजार आहे आणि त्यावर काही उपचार उपलब्ध आहेत का? अशी विचारणा करणारी साखळी विपत्रे येतात तेंव्हा ती पुढे पाठवायची की नाही असा प्रश्न पडतो. "लांडगा आला रे आला" सारखी अवस्था झाली आहे.

एक मजेशीर आठवण

असे प्रकार हे इ-मेल वर पण होतात आगदी इतर धर्मियांच्या नावाने पण

विद्यार्थी दशेत असताना अशीच एक ए-मेल एका "धर्म भिरू" मुलाने त्याला मिळाली म्हणून (वरकरणी मजा म्हणून पण आतून "जस्ट इन केस" म्हणून) त्या इ-मेल मधे म्हणल्याप्रमाणे २० जणांना पाठवली. मी आणि इतर काही जणांनी दुर्लक्ष केले, पण माझ्या दुसर्‍या एका मित्राने वैतागून आणी धडा शिकवायला म्हणून तीच इ-मेल त्याच (धर्म भिरू) मुलाला परत २० वेळा पाठवली!

गैरसमज नको!

(ह्यावर इतिहास अभ्यासक काही प्रकाश टाकू शकतील असे वाटते. त्या निमित्ताने इतिहासाचीही उजळणी होईल!)
ह्या माझ्या वाक्यावरून बर्‍याच जणांचा गैरसमज झालेला दिसतोय तो दूर व्हावा ही इच्छा.
अमूक देवीच्या नावाने २०० पत्रके छापून वितरीत करा.असे केलेत तर तुमचे भाग्य उजळेल! नाहीतर काहीतरी आपत्ती येईल.

ह्या विषयाबद्दलची भूतकाळातील माहिती मिळावी म्हणून मी त्यात इतिहासाच्या अभ्यासकांनाही आवाहन केलेले आहे आणि त्यात कोणताही खोडकरपणा,उपहास नाही हेही इथे नमूद करतोय.आपला असा समज झालाच असेल किंबहुना तो तसा झालाय असे काही प्रतिसादांवरून वाटते आहे म्हणून हा खुलासा.
सर्वांना मी आवाहन करतो की कृपा करून मूळ प्रश्नावरच चर्चा केंद्रित राहू द्या. त्याला फाटे फोडू नका. चर्चा भरकटवू नका.
धन्यवाद!

गोबेल्स तंत्रप्रणाली

त्या मागे त्यांचा नेमका काय हेतू असू शकतो? लोक ह्याला कसे काय बळी पडतात? हे सगळे धंदे करणार्‍यांचा ह्यातून नेमका काय फायदा असतो?

यातूनच गोबेल्स तंत्रप्रणाली तयार झाली. हिटलरने गोबेल्स ची नियुक्ती उगीच नाही केली?
प्रकाश घाटपांडे

 
^ वर