भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5
18 क्रमांकाच्या गुंफेचा व्हरांडा व आतील हॉल यांच्या सामाईक भिंतीच्या उजव्या कोपर्यात जाळीचे डिझाईन असलेले एक गवाक्ष खोदलेले आहे, त्या गवाक्षाच्या बरोबर खालच्या भिंतीवर आणि त्याच्या उजवीकडे मिळून आणखी काही विलक्षण बास रिलिफ शिल्पे दिसत आहेत. यापैकी 3 आकृत्या गवाक्षाच्या अगदी खाली कोरलेल्या आहेत. याशिवाय गवाक्षाच्या उजव्या खालच्या कोपर्याला लागून, शिंगे असलेले एक हरीण आपली मान वळवून बघत असल्याचे एक बास रिलिफ शिल्प आहे.
हरिणाच्या शिल्पाखाली मागे कलून आणि दोन्ही हात मस्तकाच्या मागे घेऊन बसलेल्या एका बालकाचे शिल्प आहे. या बालकाचे डोळे मोठे, टपोरे आहेत. अनेक रिंगा गुंफलेली कर्णभूषणे कानात आहेत व उजव्या हातात 4 कंगणे दाखवलेली आहेत. त्याच्या कपाळावर एक रत्नखचित पट्टा किंवा मुगुट आहे व मस्तकामागे नेलेल्या उजव्या हातात त्याने एक काठी धरलेली आहे. बासरी हातात धरलेल्या बाळकृष्णाचे जे एक चित्र आपल्याकडे काढले जाते त्या चित्राशी मला या शिल्पाचे अतिशय साम्य वाटते आहे. या बालकाच्या डाव्या बाजूला मोठे राक्षसी डोळे आणि जबडाभर असलेले भलेथोरले दात वासून हिंस्त्र हास्य करणार्या एका लठ्ठमुठ्ठ राक्षसीचे शिल्प आहे. (या राक्षसीचा चेहरा तिबेटी चित्रांमधे सिंहाचा म्हणून काढतात काहीसा तसाच आहे.) या राक्षसीने आपल्या उजव्या हातात एक कुर्हाड धरलेली असून ती त्या कुर्हाडीने तिच्या उजव्या बाजूला असलेल्या बालकावर हल्ला करण्याच्या तयारीत वाटते आहे. ही राक्षसी व हरीण यांच्या मध्ये असलेले शिल्प अत्यंत अस्पष्ट आहे. माझ्या मते ते बहुधा एथना या ग्रीक देवतेचे घुबड असावे असे वाटते आहे.
हरीणाच्या शिल्पाच्या वरच्या बाजूला असलेले शिल्प अत्यंत अस्पष्ट झालेले आहे. एकूण आकारावरून एखाद्या राक्षसाचे ते असावे असे वाटते. हा राक्षस बहुधा त्याच्या बाजूला असलेल्या रथाचे (खाली वर्णन केलेल्या) चाक धरून तो रथ थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे असे वाटते.
या राक्षसाच्या वरच्या बाजूस एका घोड्यावर आरूढ असलेल्या असलेल्या शिलेदाराचे शिल्प आहे. या स्वाराने आपले पाय रिकिबीमध्ये अडकवलेले आहेत. घोड्याच्या तोंडावर लगाम अडकवलेला असून त्याची टोके स्वाराने आपल्या डाव्या हातात धरलेली आहेत तर आपल्या उजव्या हातात त्याने एक भाला धरलेला आहे. घोड्याच्या मानेच्या खालच्या बाजूस मण्यांनी सजवलेला एक पट्टा आणि डोक्यावर मोरपीसांचा तुरा आहे. शिलेदाराच्या अंगावर गुढग्यापर्यंत येणारे धोतर आहे आणि डोक्याला मुंडासे गुंडाळलेले आहे. आहे. कानात लांब लोंबकळणारी कर्णभूषणे, हातात कंगण व गळ्यात एक मण्यांची माळ आहे. घोड्याला ज्या अलंकारानी सजवले आहे ते अलंकार या वेळेस बहुधा अतिशय प्रचलित असावेत कारण पितळखोरे गुंफांत मिळालेल्या एका बास रिलिफ शिल्पात दाखवलेल्या घोड्याच्या अंगावरही असेच अलंकार मी बघितले होते.
या घोडेस्वाराच्या उजव्या हाताला असलेले शिल्प याच चित्राचा भाग असले तरी ते व्हरांड्याच्या उजव्या टोकाच्या भिंतीवर कोरलेले आहे. या शिल्पात, 4 अश्व ओढत असलेल्या एका रथात, उभा असलेला एक राजा दाखवलेला आहे. राजाच्या डोक्यावर एक रत्नजडित मुगुट व गळ्यात दुहेरी पदर असलेला हार आहे. राजाच्या बाजूला रथातच, दोन स्त्रिया उभ्या आहेत. राजाच्या डाव्या अंगाला असलेली स्त्री त्याच्या डोक्यावर एक छत्र धरून उभी आहे तर उजव्या अंगाला असलेली स्त्री त्याच्यावर चवरी ढाळत आहे. दोन्ही स्त्रियांच्या कानात लोंबकळणारी कर्णभूषणे, गळ्यात रत्नजडित हार आणि कंबरेला कंबर पट्टे आहेत. रथाच्या बाजूस घोड्यावर आरूढ असलेला आणखी एक शिलेदार दिसतो आहे. वर वर्णन केलेल्या शिलेदाराप्रमाणेच हा शिलेदार कोरलेला आहे.
राजाचा रथ दोन राक्षसांच्या पाठीवरून मार्ग काढताना दाखवला आहे. कदाचित हे राक्षस राजाचे अपहरण करून त्याला आपल्या पाठीवरून घेऊन जाताना दाखवले असण्याची सुद्धा शक्यता वाटते.
व्हरांड्याच्या उजव्या टोकाच्या भिंतीमध्ये जी भिख्खूंची कोठडी खोदलेली आहे त्याच्या एका बाजूला वर वर्णन केलेले शिल्प आहे तर दुसर्या बाजूला एक मोठे विलक्षण चित्र कोरलेले आहे. या चित्राचा मध्यवर्ती बिंदू हा हत्तीवर स्वार झालेला एक महाराजा आहे. या राजाच्या गळ्यात, त्याच्या पायापर्यंत लांबी असलेले फुलांचे अनेक हार दिसत आहेत. त्याच्या दंडावर कोपरापर्यंत येणार्या फुलांच्या पोची आहेत. त्याने आपल्या उजव्या हातात हत्तीची पराणी धरलेली आहे तर डाव्या हाताने त्याने आपल्या छातीजवळ असलेला फुलांचा हार धरून ठेवला आहे. त्याच्या मागे एक पुरुष व्यक्ती हर्त्तीवर आरूढ असून त्या व्यक्तीने बौद्ध पद्धतीचे दुहेरी त्रिशूळ हातात धरलेले आहे. हतीने आपल्या सोंडेत एक झाड पकडलेले आहे.
या हतीच्या सभोवती अनेक पुरुष, स्त्रिया आणि पशु-पक्षी यांची चित्रे कोरलेली आहेत. या चित्रात मला एक बोधि वृक्ष, एक वाद्य वाजवत असलेली एक पुरुष व्यक्ती व एक नर्तिका हेओळखू येतात. या चित्रातून काहीतरी बोधपर कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे नक्की! माझ्या मताने ही कथा साधारण अशी असावी. एका राजावर राक्षसांनी हल्ला करून ते त्याला पळवून नेत आहेत. भगवान बुद्ध येऊन त्या राक्षसांचा नाश करतात. अर्थात हे राक्षस म्हणजे दुष्ट किंवा पापी विचार असले पाहिजेत. व बुद्धांच्या शिकवणीने त्यांचा समूळ नायनाट होतो; असे सूत्र या गोष्टीमागे बहुधा असावे.
भिंतीवरील शिल्पचित्रे बघून झाल्यावर माझे छताकडे लक्ष जाते आहे. अगदी छताजवळ आळीपाळीने स्तूप व काही आकृती (बहुधा यक्षांच्या) यांची शिल्पे कोरलेला एक सलग पट्टा व्हरांड्याच्या 3 बाजूंना कोरलेला दिसतो आहे. या शिवाय पायर्या-पायर्यांचे डिझाईन असलेला एक सलग पट्टाही येथे छताला लागून कोरलेला आहे. छताला एक चतुर्थांश वर्तुळाकार कमानीचा आकार दिलेला आहे व त्यात अनेक वक्राकार तुळया कोरल्याने छत कप्याकप्यांचे दिसते आहे.
या गुंफेला अनेक लेखकांनी सूर्यदेवाचे मंदिर असे नाव दिलेले आहे. परंतु असे नाव का दिले असावे हे समजणे कठीण आहे. ही गुंफा म्हणजे एक बौद्ध विहार आहे हे उघड आहे. मात्र या गुंफेचे वैशिष्ट्य म्हणजे व्हरांड्यातील भिंतीवर असलेली व अतिशय बारकावे दर्शवणारी शिल्पे, असे खात्रीने म्हणता येईल.
भाजे येथील माझी भेट आता संपलीच आहे. सातवाहन कालात खोदलेल्या आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या बौद्ध गुंफांना आणि दक्षिणेकडे असलेल्या बनवासी येथील मधुकेश्वर मंदिराला मी आता भेट दिली आहे. मात्र माझ्या हातातील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला उत्तर व पूर्वेकडे असलेल्या आणखी 3 स्थळांना भेट द्यायची आहे. मात्र ही तिन्ही स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर आणि बर्याच दूर अंतरावर आहेत. अर्थात यावरून सातवाहन साम्राज्य किती दूरपर्यंत पसरलेले होते हे खचितच लक्षात आल्यावाचून रहात नाही.
समाप्त
या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.
Comments
उत्तम
सुर्यगुंफेतील हे शिल्प आजही एक गूढ आहे.
काही जणांना डावीकडील शिल्प सूर्याचे आहे असे वाटते. सर्वसामान्यतः सूर्यरथ ७ घोड्यांचा असतो पण प्राचीन शिल्पांमध्ये सूर्यरथ चार घोड्यांसहसुद्धा दाखवलेला आहे. सूर्याच्याच बाजूला त्याच्या दोन पत्नी आहेत. संध्या आणि छाया. तर तो रथ ज्या राक्षसाच्या अंगावरून जात आहे तो राक्षस नसून राक्षसी आहे आणि दोन नसून एकच आहे. तीचे पाय उलटे वळलेले दाखवलेले आहेत.
तर उजवीकडील शिल्प हे इंद्राचे आहे असे म्हटले गेले आहे. इंद्र त्याच्या ऐरावतावरून स्वर्गात विहार करत आहे. नंदनवनातील इंद्रप्रजेचे सुखासीन, आनंदी जीवन येथे दाखवलेले आहे.
पण बौद्ध लेण्यांत इंद्र, सूर्य कसे असू शकतील? त्यामुळे ही उपपत्ती ग्राह्य मानता येत नाही.
दिव्यावदानातील मांधाता याची कथा या कथानकाशी जुळते. मांधाता हा राक्षसीचा नाश करून देवतांना मदत करत करतोय असे येथे दाखवलेले आहे तर उजवीकडच्या शिल्पामध्ये तो हत्तीवरून उत्तर कुरुंचे राज्य जिंकण्यासाठी जात आहे असे दिसते.
अमरावतीच्या (आंध्र प्रदेश) स्तुपातल्या कठड्यावर इंद्राने मांधात्याचा सत्कार केल्याचे तसेच मांधात्याचे इंद्रपदाच्या लोभामुळे स्वर्गपतन झाल्याचे दर्शवले आहे.
ही दोन्ही लेणी समकालीन असल्याने भाजेतील शिल्पपट हा मांधात्याच्या कथेचा आहे असे मला वाटते.
तर काही जणांना ह्यात ग्रीकांच्या हेलियोस आणि अपोलो यांचा भास होतो. आणि ही शिल्पे तर अगदी ग्रीक पुतळ्यांसारखी रेखीव आहेत. आणि याच गुहेतील सेंटॉर, पॅगेसस आदी ग्रीक प्रतिमा पाहिल्या की उपपत्ती पण ग्राह्य वाटू लागते.
इंद्र
बौद्ध कथात इंद्र ही व्यक्ती कधी मधी येते. मात्र सूर्य कधीच आलेला ऐकलेला नाही. तो वैदिक संस्कृतीचे प्रतीक आहे. बालकृष्णासमान दिसणारे शिल्प कोणाचे असावे? काही अंदाज? त्या शिल्पाला लागून असलेली अस्पष्ट प्रतिमा एथना देवीच्या घुबडासारखी मला तरी वाटते,तुमचे काय मत? या शिल्पाचा अर्थ लावणे सिंधू संस्कृतीतील लिपीचा अर्थ लावण्याइतकेच कठिण आहे.
अवांतर
मी नुकतीच जुनागढ येतील बौद्ध लेणी बघूब्न आलो. त्या लेण्यांचा बाज तर संपूर्ण निराळाच आहे. सवडीने त्यावर लिहिनच.
थोडेसे
ही शिल्पे इतकी अस्पष्ट आहेत की नक्की हे कुणाचे शिल्प आहे ते ओळखणे खूप अवघड आहे. बाळकृष्णासारखे दिसणारे शिल्प माझ्यामते यक्षाचे असावे. मोठे डोके, बटबटीत डोळे ही यक्षांची वैशिष्ट्ये या शिल्पामध्येही व्यवस्थित जाणवतात. त्याचे पोट मात्र यक्षांप्रमाणे सुटलेले दिसत नाही. आणि ते मधले शिल्प अथेनाचेच आहे का दुसर्या एखाद्या पशूचे ते ही नीट कळत नाही इतके ते अस्पष्ट आहे.
बाकी ह्या अलीकडच्या डावीकडच्या शिल्पामध्ये एक स्त्री घोड्यावर रिकिबीत पाय अडकवून बसली आहेत तर उजवीकडच्या शिल्पामध्ये खालच्या बाजूला एक स्त्री तबला वाजवताना दिसत आहे.
रिकिबीचे आणि तबल्याचे हे दृश्य भारतीय शिल्पकलेमध्ये सर्वात प्राचीन समजले जाते.
भाजे लेणीतील ह्या सूर्यगुंफेवर मी मागे कधीतरी लिहिले होते, ते येथे पहा.
धन्यवाद
लेख वाचते आहे, आवडतो आहे. नंतर सविस्तर प्रतिसाद देते. ह्या भागासाठी तूर्तास धन्यवाद.