भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4

(मागील भागावरून पुढे)

18 क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेरील व्हरांड्याच्या आतील भिंतीवर, काही निराळ्याच पद्धतीची बास रिलिफ भित्तीचित्रे आहेत. या प्रकारची भित्तीचित्रे दख्खन मधील दुसर्‍या कोणत्याच गुंफेमध्ये बघण्यास मिळत नाहीत. या भितीचित्रांतील आकृत्यांच्या अंगावर दाखवलेले कपडे, त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या जवळ असलेली शस्त्रे हे सर्व अगदी निराळे व मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे.

या भिंतीच्या डाव्या बाजूला म्हणजे घोड्याच्या धडांवर मानवी चेहरा असलेल्या सेंटॉरच्या कोरलेल्या आकृती ज्या खांबाच्या (pilaster) कॅपिटलवर कोरलेल्या आहेत, त्या खांबाच्या बाजूला, एका द्वाररक्षकाचे बास रिलिफ शिल्प कोरलेले आहे. हा द्वाररक्षक त्याच्या डावीकडे असलेल्या व्हरांडा व विहार यांमधील द्वाराकडे चेहरा फिरवून बघताना दाखवला आहे. या रक्षकाचा चेहरा लंबवर्तुळाकार व लांबसर असून हनुवटी टोकदार काढलेली आहे. पठाणी लोकांसारखा दिसणारा असा चेहरा दुसर्‍या कोणत्या दख्खनमधील लेण्यांमध्ये मी बघितल्याचे मला तरी स्मरत नाही. त्याचे केस खांद्यापर्यंत लांब आहेत व त्यावर त्याने एक घुमटाकार जिरेटोप घातलेला आहे. या प्रकारची शिरस्त्राणे मध्य एशियामधील सैनिक पूर्वी घालत असत. म्यानात असलेला व पुढे दोन अग्रे असलेला एक कमी लांबीचा भाला त्याने आपल्या छातीजवळ डाव्या हाताने धरलेला आहे. या भाल्याला असलेली दोन अग्रे त्यावर घातलेल्या म्यानामधूनसुद्धा स्पष्ट्पणे दिसत आहेत. थोडीफार वक्रता असलेल्या एका रूंद पात्याच्या तलवारीच्या मुठीवर त्याचा उजवा हात आहे. ही म्यानात असलेली तलवार त्याने आपल्या कंबरेला बांधलेल्या शेल्यामध्ये असलेल्या गाठीत अडकवलेली आहे. कंबरेवरच्या या शेल्याची गाठ त्याने पुढे बांधलेली आहे व शेल्याची दोन टोके पुढे लोंबकळत आहेत. सात वळी एकत्रित रित्या गुंफून बनवलेली वजनदार व मोठी अशी लोंबती कर्णभूषणे त्याने आपल्या कानात घातलेली आहेत. आपल्या गळ्यात निरनिराळी लांबी असलेले कमीत कमी 3 हार तरी त्याने घातलेले आहेत. यापैकी सगळ्यात खालचा हार सर्वात लांब आहे व त्यात 5 ते 6 पदके गुंफलेली आहेत व हाराच्या मध्यभागी अजूनही स्त्रिया तन्मणीचे खोड घालतात त्याप्रमाणे आकार दिलेले एक रत्नखचित पेंडंट आहे.सर्वात वरचा व गळ्याजवळ घट्ट असलेला मण्यांचा नेकलेस एखाद्या गंड्याप्रमाणे दिसतो आहे. मधला नेकलेस हा बर्‍याच प्रमाणात रत्नजडित असून बारीक कोरीव काम केलेला आहे. मनगटावर त्याने रत्नजडित अशी 3 कंकणे घातलेली आहेत तर दंडावर फुलाच्या 3 पाकळ्यांप्रमाणे दिसणारी एक रत्नजडित पोची बांधलेली आहे. सरकारी कचेर्‍यांतील पट्टेवाले जसा पट्टा बांधतात तसा एक कापडाचा पट्टा त्याने डाव्या खांद्यावरून घेतलेला आहे व त्याची गाठ त्याने आपल्या कंबरेच्या उजव्या बाजूला घट्ट बांधलेली आहे. कदाचित, कंबरेला बांधलेला शेला व हा पट्टा हे एकाच वस्त्राचा भाग या पद्धतीने बांधलेले असू शकतात. त्याने कंबरेला बांधलेले वस्त्र मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे. ही साधे धोतर न दिसता त्याला अनेक निर्‍या दिसत आहेत. हे वस्त्र दिसण्यास तरी रोमन किंवा ग्रीक योद्धे घालत असत तशा प्रकारचा आखूड स्कर्ट किंवा स्कॉटिश किल्टसारखे वाटते आहे. कदाचित निराळ्या पद्धतीने निर्‍या काढून नेसलेले धोतर सुद्धा हे वस्त्र असू शकते. आपल्या डाव्या मांडीवर गुढग्याच्या जरा वर त्याने एक पट्टा बांधलेला आहे. हा पट्टा प्रत्यक्षात काय असावा हे अस्पष्ट असल्याने नीट दिसू शकत नाहीये. या सगळ्या वर्णनावरून हा द्वाररक्षक काही सामान्य द्वारपाल नसून कोणीतरी सरदार किंवा वरिष्ठ अधिकारी असणार हे स्पष्ट होते आहे.

व्हरांड्यातून विहारच्या हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी जी दोन द्वारे आहेत त्या मध्ये असलेल्या पुरुष आकृतीच्या भित्तीशिल्पाचा बराचसा भाग नष्ट झाला आहे किंवा केला गेला आहे. या आकृतीत दाखवलेला चेहरा मात्र सर्वसाधारण मराठी लोकांचा असतो तसाच म्हणजे गोलसर आहे व डोक्यावर पूर्वी शेतकरी डोक्याला जसे मुंडासे बांधत असत तसे मुंडासे दाखवलेले आहे. याच्या गळ्यातही 3 हार असले तरी ते मोठ्या मण्यांचे किंवा फुलांचे वाटत आहेत. कानात 7 वळ्यांची बनवलेली वजनदार व लोंबती कर्णभूषणे आहेत. खांद्यावरून घेतलेला व कंबरेशी बांधलेला पट्टा किंवा शेला याच्याही अंगावर दिसतो आहे. कंबरेला असलेल्या तलवारीचे मान शेल्यात खोचलेली आहे. तलवार कमी लांबीची असावी कारण आता फक्त म्यानाचे टोकच शिल्लक राहिलेले आहे.कंबरेला बांधलेले धोतर पायघोळ असून उजवा घोटा व डावा गुढगा यावर स्पष्ट दिसते आहे.

उजव्या हाताच्या द्वाराच्या उजव्या बाजूला एक जाळीचे डिझाइन खोदलेले गवाक्ष आहे. या दोन्हीच्या मध्ये आणखी एका योद्ध्याची आकृती कोरलेली आहे. या योद्ध्याच्या डोक्यावरही शेतकरी बांधतात तसेच मुंडासे बांधलेले आहे. हे मुंडासे म्हणजे प्रत्यक्षात कापडाचा एक लांब पट्टा असतो व डोक्याभोवती बांधून त्याची टोके मागच्या बाजूला खांद्यापाशी लोंबती ठेवण्याची पद्धत आहे. याच्या गळ्यात फुलांचे दोन हार दिसत आहेत. मनगटावर 4 कंगणे आहेत तर दंडावर 3 फण्यांच्या नागाचा आकार दिलेली पोची आहे. आहे.कानातील कर्णभूषणे मात्र निराळ्या डिझाइनची आहेत. त्याचा डावा हात म्यान केलेल्या एका वक्र तलवारीच्या मुठीवर असून त्याने ही तलवार आपल्या अंगाबरोबर घट्ट धरलेली आहे. याच्या उलव्या हातात एक धनुष्य आहे त्याच्या पाठीवर असलेला बाणांचा भाता शिल्पात स्पष्ट्पणे दिसतो आहे. कंबरेला व्यवस्थित व पायघोळ निर्‍या काढलेले व त्याच्या घोट्यापर्यंत येणारे धोतर हा योद्धा नेसलेला आहे.

या शिल्पाच्या खाली पाषाणातून कोरून काढलेले एक आसन आहे. या आसनाच्या कडांना गोलाई देऊन ते लाकडी आसन असावे या पद्धतीने चार पाय व त्यामधील आडव्या गोल सळया कोरून त्यावर बारीक नक्षीकाम कोरलेले आहे.

या आसनाच्या उजव्या हाताला आणि गवाक्षाच्या खालील बाजूस अनेक आकृती दिसत आहेत. जवळून बघितल्यावर माझ्या लक्षात येते आहे की हे एक मोठे म्यूरल आहे व ते इथून सुरू होऊन भिंतीच्या कोपर्‍यावरून पुढे उजव्या हाताच्या भिंतीवर असलेल्या भिख्खू कोठडीच्या द्वारा पर्यंत पसरलेले आहे. या म्यूरलमध्ये एक काहीतरी मोठी कथा सांगण्याचा शिल्पकाराचा प्रयत्न आहे. मात्र बर्‍याच आकृती आता अस्पष्ट दिसत असल्याने ही कथा अचूकपणे सांगणे शक्य नाही.

क्रमश:

१५ जानेवारी २०१३

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख

माझ्यामते ते द्वारपालाचे शिल्प एखाद्या ग्रीक योद्ध्याचे असावे. वेषभूषा, चालढब तर अगदी तशीच आहे.
दुर्दैवाने या गुहेत कुठलाही शिलालेख नाही (असला तरी माझ्या पाहण्यात तरी आलेला नाही) त्यामुळे ही गुहा म्हणजे एक गूढच आहे.

या गुहेला धेनुकाटक (बहुतेक डहाणू) इथल्या यवनांनी दान दिले असावे किंवा त्यांच्यातल्याच कारागीरांनी हे लेणे खोदलेले असावे असा माझा तर्क आहे. कारण तिथे यवनांची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती साहजिकच हे लेणे खोदताना किंवा खोदवून घेतांना त्यांनी आपली संस्कृती पण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला असावा.

द्वारपाल

मला तरी हे शिल्प ग्रीसपेक्षा मध्य एशियातील व्यक्तीचे वाटते. डोक्यावरील पगडी साधारण तुर्की (तुर्कमेनीस्थान) पद्धतीची वाटते. चेहरा लांब व निमुळती हनुवटी दाखवलेली आहे. अर्थात तुम्ही म्हणता तशी ग्रीको-रोमन व्यक्ती सुद्धा असू शकते.

तुर्की

तत्कालीन तुर्कमेनीस्थान/ तुर्कस्थान रोमन बायझन्टाईन साम्राज्यात समाविष्ट होता. त्यामुळे एखाद्या ग्रीक -रोमन योद्ध्याने तसा वेष धारण करणे सहजशक्य आहे किंवा ग्रीकोरोमनबरोबरच तिकडली स्थानिक व्यक्ती सुद्धा इकडे येणे शक्य आहे.

भाग आवडला

भाग आवडला. सोबत तुमचे आणि भटक्याचे प्रतिसादही वाचनीय असतात.

सुरेख.

वाचतोय. वेळेअभावी इतकेच.

माहितीपूर्ण लेख

पुण्याला तीन वर्षं शाळेत असूनही आणि नंतर येउन जाऊन वास्तव्य तेथे राहूनही या गुंफा पाह्यचे राहून गेले. आता पुढच्या भारतवारीत भाज्याला जायचा निर्धार आपली हि अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला वाचल्यावर करीत आहे. आता थोडे विषयांतर: अजिंठा येथील बौद्ध गुंफा क्रमांक १मध्ये एका भित्तिचित्रात चार हरणे पण त्यांचे एकच शीर असा विषय आहे. त्याचा मतितार्थ किंवा तात्पर्य काय असावे?

पाचवा भाग?

पुढचा भाग कधी?

 
^ वर