भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 3

(मागील भागावरून पुढे)

एका अरुंद पायवाटेवरून थोडे अंतर चालून गेल्यानंतर मी 18 क्रमांकाच्या गुंफेच्या प्रांगणापाशी पोचतो आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे ही गुंफा येथे असलेल्या गुंफांमधील सर्वात रोचक असलेली गुंफा म्हणून मानली जाते. प्रथम दर्शनी ही गुंफा नाशिक मधील 19 क्रमांकाच्या किंवा कृष्णराजाच्या गुंफेच्या समान असल्याचे भासते. परंतु जरा बारकाईने निरीक्षण केल्यावर व्हरांड्याचा बाह्य भाग आणि तेथे असलेले स्तंभ या पुरतेच हे साम्य सीमित आहे हे माझ्या लक्षात येते. याही गुंफेत असलेले व्हरांड्याच्या बाहेरील बाजूकडील स्तंभ, हे नाशिक मधील 19 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच तळाला व छताजवळ चौरस आकाराचे आहेत व मध्यभागी त्यांना अष्टकोनी आकार दिलेला आहे. या स्तंभांच्या मागे असलेल्या व्हरांड्याच्या आतील भिंतीवर असलेल्या एका गवाक्षाला नाशिक गुंफेप्रमाणेच जाळीचे डिझाइन खोदलेले आहे.
ही गुंफा म्हणजे एक छोटा विहार किंवा बौद्ध भिख्खूंचे निवासस्थान आहे. या विहाराच्या रचनेत पुढे व्हरांडा व त्याच्या मागे एक 16 फूट रूंद आणि 17 फूट खोल या आकाराचा हॉल आहे. या हॉलच्या आतील भिंतीच्या मागे भिख्खूंसाठी 2 कोठड्या खोदलेल्या आहेत तर अशाच 3 कोठड्या पुढील व्हरांड्याच्या दोन्ही टोकांना खोदलेल्या आहेत. मी आधी बघितलेल्या सर्व विहारांमध्ये व्हरांड्यातून हॉलमध्ये जाण्यासाठी खोदलेली द्वारे ही साधारणपणे हॉल-व्हरांडा यांच्या सामाईक भिंतीच्या मध्यावर किंवा मध्याच्या दोन्ही बाजूंना समान अंतरावर अशी खोदलेली होती. परंतु या विहारात अशी 2 द्वारे एकंदर आराखड्याचा कोणताही विचार न करता जेथे जागा मिळेल तेथे खोदलेली दिसत आहेत. या शिवाय या भिंतीच्या डाव्या बाजूला असलेल्या द्वाराच्या आणखी डावीकडे जाळीचे डिझाइन असलेले एक गवाक्षही एका कोपर्‍यात जेथे जागा मिळाली तेथे खोदलेले आहे.
हॉलच्या आतल्या अंगाला ज्या भिख्खूंच्या दोन कोठड्या खोदलेल्या आहेत त्यांच्या दारावर इतर विहारांप्रमाणेच घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी कोरलेल्या आहेत. या कमानींच्या आतल्या बाजूस तुळयांची बाहेर आलेली टोके, बेर्म रेल आणि चौकटीचे जाळी डिझाइन कोरलेले दिसते आहे. कोठड्यांच्या द्वारामधील भिंतीमध्ये एक कोनाडा खोदलेला आहे. या कोनाड्याच्या 3 बाजू आयताकृती असून चौथ्या बाजूला घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानीचा आकार दिलेला दिसतो आहे. या कमानीचा आकार द्वारावरील कमानींच्या आकाराशी मिळता-जुळता आहे. या कोनाड्याच्या खाली सांची पद्धतीच्या बौद्ध रेलिंगचे पट्टे कोरलेले आहेत. या पट्ट्याखाली मध्यभागी एक यक्षाची आकृती आपले दोन्ही हात उंचावून या विहाराला आधार देताना दर्शवते आहे. या यक्षाचे दोन्ही हात वरच्या बौद्ध रेलिंगला, बाजूच्या 2 कोठड्यांच्या द्वारांमधील अंतराच्या बरोबर मध्यभागी टेकलेले आहेत.
समोरच्या प्रांगणातून व्हरांड्यात प्रवेश घेण्यासाठी बांधलेल्या 3/4 पायर्‍या सुद्धा व्हरांड्याच्या मध्यावर नसून एका बाजूला आहेत. या पायर्‍यांच्या डाव्या बाजूला एक पूर्ण स्तंभ व एक कोरलेला स्तंभ (pilaster) आहे तर उजव्या बाजूस 5 स्तंभ आणि एक कोरलेला स्तंभ आहे. स्तंभांचा आकार (तळाला व छताजवळ चौरस आणि मध्यभागी अष्टकोनी) आणि जाळीच्या खिडकीचे डिझाइन यांचे नाशिक मधील कृष्णराजाच्या गुंफेशी असलेले साम्य लक्षात घेता ही गुंफा इ.स.पूर्व 200 च्या सुमारास आणि भाजे येथील इतर गुंफांच्या काही काळानंतर खोदलेली गेलेली असावी. मात्र व्हरांड्यातील मागच्या भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात असलेला एक कोरलेला स्तंभ (pilaster) त्याच्या रचनेमुळे मला मोठा वैशिष्ट्यपूर्ण वाटतो आहे. या कोरलेल्या स्तंभाचा तळाजवळील आणि मध्यभाग हा बाहेरील स्तंभांसारखाच कोरलेला असला तरी छताजवळील भाग हा कार्ले किंवा नाशिक येथील इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात कोरलेल्या स्तंभांच्या डिझाइन प्रमाणे, म्हणजे एका उलट्या ठेवलेल्या घटावर ठेवलेला पायर्‍या-पायर्‍यांचा उलटा ठेवलेला पिरॅमिड, या पद्धतीचा दिसतो आहे. यावरून असे म्हणता येईल की जरी ही 18 क्रमांकाची गुंफा मूलतः इ.स.पूर्व 200 मध्ये खोदलेली असली तरी आतील कलाकुसर बर्‍याच नंतर म्हणजे इ.स.पूर्व प्रथम किंवा दुसर्‍या शतकात किंवा 300 किंवा 400 वर्षांनंतर केली गेली असावी. त्यामुळेच या व्हरांड्यात जेथे जागा मिळेल तेथे बास रिलिफ पद्धतीची शिल्पे कोरलेली आहेत यात आश्चर्य व्यक्त करण्याजोगे मला फारसे काही दिसत नाही. मात्र ही शिल्पे बघून एवढे नक्की म्हणता येते की ही गुंफा म्हणजे अभ्यासकांसाठी असलेला एक अद्भुत कलाविष्कार आहे. या शिल्पांत काय नाही? मानवी आकृत्या, काल्पनिक प्राणी, पक्षी, राक्षस यांची येथे रेलचेल आहे. ग्रीक पुराणांतील काल्पनिक प्राणी, पेगॅसस, सेंटॉर हे तर येथे आहेतच पण त्यांचे भारतीय अवतारही येथे दिसत आहेत. मला हे सर्व बघितल्यावर कमालीचा उत्साह वाटतो आहे व मी अगदी बारकाईने या गुंफेतील शिल्पे बघण्यास प्रारंभ करतो आहे.
आधी मी भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात असलेल्या ज्या कोरलेल्या स्तंभाचा उल्लेख केला आहे त्या स्तंभाच्या छताजवळ असलेल्या कॅपिटलवर मला अतिशय विचित्र भासणार्‍या काही आकृती कोरलेल्या दिसत आहेत. जरा जवळ जाऊन बघितल्यावर तेथे एकूण 4 आकृत्या आहेत असे लक्षात येते. अगदी डावीकडची व उजवीकडची या दोन्ही आकृत्या म्हणजे घोड्याचे माने पर्यंतचे धड व त्यावर कंबरेपासून वर मानवी पुरुष असलेल्या एका विचित्र प्राण्याच्या आहेत. हा ग्रीक पुराणांतील सेंटॉर हा प्राणी आहे हे माझ्या लगेच लक्षात येते आहे. आहे. मात्र कॅपिटलच्या मध्यभागात असलेल्या दोन आकृत्या या आणखीनच विचित्र आहेत. या दोन्हीमध्ये धडाचा मानेपासून खालचा भाग बसलेल्या गाई प्रमाणे कोरलेला आहे तर वरचा भाग म्हणजे कंबरेपासून वर दाखवलेला भाग हा एका मानवी स्त्रीचा आकार आहे. ही आकृती बहुधा सेंटॉरची देशी आवृत्ती असली पाहिजे. कॅपिटलवरील हे शिल्प माझ्या दृष्टीने सर्वात रोचक ठरते आहे. या स्त्री-गोमातेने केसात मोत्यांच्या अनेक माळा गुंफून मोठी वैशिष्ट्यपूर्ण पण भली-थोरली केश रचना केलेली आहे. तिच्या कानात मोठी कर्णकुंडले आहेत तर गळ्यात दोन सरींचा एक हार घातलेला आहे तर दुसरा घातलेला हार लांब असून तो तिच्या नाभी पर्यंत येतो आहे. या हारात एक मोठे पेंड मध्यभागी झळकते आहे. माझ्या डाव्या बाजूला असलेल्या स्त्री-गोमाता आकृतीने आपला उजवा हात वर करून छताला आधार दिलेला आहे तर माझ्या उजवीकडील तशाच आकृतीने आपला डावा हात वर करून छताला आधार दिलेला आहे. दोन्ही आकृतींच्या मनगटावर कंगणे आहेत. खाली असलेल्या गाईंच्या आकृतींच्या गळ्यात ( जेथून मानवी स्त्री आकृती वरच्या बाजूस कोरलेल्या आहेत.) मोठ्या मण्यांच्या माळा घातलेल्या आहेत.
माझ्या उजवीकडे असलेल्या सेंटॉर आकृतीने आपला आपला डावा हात खाली मोकळा सोडलेला आहे व उजवा हात शेजारी बसलेल्या स्त्री-गोमातेच्या पाठेवर ठेवलेला आहे. त्याच्या उजव्या हातात कंगण, कानात कर्णभूषणे आणि गळ्यात फुलांचा हार दिसतो आहे. डोक्यावर महाराष्ट्रातील शेतकरी जसे मुंडासे बांधतात तसे मुंडासे असून कंबरेला शेला बांधलेला आहे. हा शेला कंबरेला किंवा खालच्या घोड्याच्या आकृतीच्या मानेजवळ दाखवलेला आहे. माझ्या डाव्या हाताला असलेला सेंटॉरची आकृती साधारण अशीच आहे परंतु त्या आकृतीने आपल्या उजव्या हाताने छताला आधार दिलेला आहे आणि डावा हात शेजारी बसलेल्या स्त्री-गोमातेच्या पाठीवर ठेवलेला आहे.
या कोरलेल्या खांबाच्या उजव्या बाजूला किंवा व्हरांड्याच्या उजव्या टोकाला ज्या दोन भिख्खूंच्या कोठड्या खोदलेल्या आहेत त्यांच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूस कोरलेल्या आकृत्यांचा एक पट्टा दिसतो आहे. या पट्ट्यातील आकृत्या म्हणजे सुद्धा एक अतिशय अनोखे असे मिश्रण आहे. माझ्या डावीकडून सुरुवात केल्यास प्रथम दिसते ती पंख असलेल्या दोन घोड्यांची किंवा पेगॅससची जोडी, त्याच्या पलीकडे आहे, एक हात उंचावलेला यक्ष, एक घोडेस्वार, उंच केशरचना असलेली किंवा डोक्यावर घट घेतलेली एक स्त्री, एक यक्ष व शेवटी एक बैल आणि घोडा यांच्या प्रतिमा. या प्रतिमांच्या खाली अगदी तळाजवळ काही आता अगदी अस्पष्ट दिसणार्‍या आकृत्या आहेत. पितळखोर्‍यामधील चैत्यगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांच्या कडांना पेगॅसस कोरलेले मी बघितले होते. तसेच पेगॅसस येथेही आहेत. पुढे असलेल्या पेगॅससच्या पंखावर असलेली पिसे शिल्पकाराने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही ही दिसू शकतात. यक्षाच्या आकृतीवर त्याच्या गळ्यात असलेला व नाभी पर्यंत पोचणारा फुलांचा हार, कंगणे, कंबरेवरचे धोतर यासारख्या अगदी बारीकसारीक गोष्टीसुद्धा दाखवलेल्या आहेत.
यानंतर मी आता व्हरांडा-हॉल यांच्यामधल्या सामाईक भिंतीकडे वळतो आहे. या भिंतीवर सुद्धा मला असाच एक बास रिलिफ शिल्पांचा खजिना दिसतो आहे.

क्रमश:
या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख

सूक्ष्म निरीक्षणाने बनलेली ही लेखमाला अतिशय माहितीपूर्ण होत आहे.

भाजे लेणीतील ही गुंफा अत्यंत गूढ आहे यात काही वादच नाही.
बाकी पेगॅसस आदी ग्रीक शिल्पे इतरही काही ठिकाणी दिसतात परंतु सेंटॉरचे शिल्प निदान महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये तरी इतरत्र असल्याची कल्पना नाही.

सहमत!

सूक्ष्म निरीक्षणाने बनलेली ही लेखमाला अतिशय माहितीपूर्ण होत आहे.

तंतोतंत सहमत!
माहितीपूर्ण लेखन कसे असावे हे या लेखमालेतून शिकण्यासारखे आहे - मी शिकत आहे.

अरे वा

हे पहिल्यांदाच कळले. मला वाटले चंद्रशेखर अनुभवकथन करतात. कदाचित ते ललितलेखनात येत असावे. पण आता एका संकेतस्थळाचे संपादकच सांगत आहेत म्हटल्यावर विचार करायला हवा.
भटक्या यांनी या लेखाला चित्रे टाकून साज चढवला आहे.

वाह!

माहितीपूर्ण भाग, सुरेख चित्रे.

तुम्ही चित्रे इथे टाकायचे शिकून घ्या.. फार त्रास होतो पुढे मागे करून वाचायला नाहीतर इंग्रजी लेख पुन्हा वाचावा लागतो

असेच म्हणतो

लेख अभ्यासपुर्ण आहेत पण हि खास वर्णने असुन चित्रांची जोड असल्यास ते जास्त खुलतील.

छायाचित्रे

भटक्या आणि प्रियाली यांची अडचण मला समजू शकते. माझी अडचण अशी आहे की प्रत्येक भागात बरीच छायाचित्रे असल्याने ती सर्व फ्लिकर सारख्या ठिकाणी अपलोड करून परत त्याचे संदर्भ येथे देणे मोठे जिकिरीचे आहे.तसेच फ्लिकर वर 200 चित्रांची मर्यादा असल्याने तेही बंधन आहेच. म्हणून नाईलाजाने हा मार्ग मला स्वीकारावा लागतो आहे. क्षमस्व

काही फोटो

मी ही लेणी कित्येकदा पाहिली असल्याने त्यांची सर्वच प्रकाशचित्रे मजकडे आहेत.

मी काढलेले हे फोटो इतर सदस्यांच्या सोयीसाठी येथे डकवतो.

सूर्यगुंफा बाहेरून

सेंटॉर प्रतिमा

पॅगेसस

धन्यवाद भटक्या

:-)

धन्यवाद

श्री भटक्या यांना धन्यवाद. माझी मोठीच अडचण दूर केल्याबद्दल. या लेण्यातील लेखमालिकेच्या पुढच्या २ भागात पण हीच मदत करावी हीच अपेक्षा ठेवू का?

नक्कीच

नक्कीच.
पण तुम्ही जर पिकासा अथवा गूगल प्लस सेवेचा लाभ घेतलात तर ही २०० चित्रांची मर्यादा दूर होईल.

किंवा

किंवा स्काय ड्राईव्हचा.

फारच छान

सुरेख चित्रण आणि माहिती . लेण्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

 
^ वर