भाजे येथील बौद्ध गुंफा भाग २

(मागील भागावरून पुढे)

भाजे येथील चैत्यगृहाच्या मुखाजवळील कोरीव काम हे त्याच कालात खोदलेल्या पितळखोरे, अजंठा व नाशिक येथील चैत्यगृहांमधील कोरीव कामापेक्षा बरेच निराळे दिसते. पितळखोरे येथील चैत्य गृहाप्रमाणेच या चैत्यगृहाच्या मुखाचा संपूर्ण भाग पूर्णपणे खुला आहे आणि चैत्य गृहाचे छत सुरू होते त्याच उंचीवर पण बाहेरील बाजूस, इतर ठिकाणच्या चैत्य गृहांप्रमाणेच दिसणारी, घोड्याच्या नालाच्या आकाराची भलीथोरली कमान येथेही खोदलेली दिसते आहे. या कमानीखालच्या खुल्या भागात पुरातत्वज्ञ जेम्स बर्जेसच्या म्हणण्याप्रमाणे, एक लाकडी पार्टिशन पूर्वी उभे केलेले होते. मात्र वर असलेल्या या कमानीच्या दोन्ही बाजूंना व वरच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले येथे दिसते आहे.

कमानीच्या खालच्या भागाच्या दोन्ही बाजूंना (सांची येथील) बौद्ध रेलिंग पॅटर्नचा व 5 किंवा 6 पायर्‍या असलेला असा एक पट्टा कोरलेला आहे. मात्र डाव्या बाजूचा पट्टा हा उजव्या बाजूला असलेल्या पट्ट्याच्या थोडा खाली कोरला गेलेला आहे. डाव्या बाजूकडील कोरीव काम व उजवीकडील काम यात सारखेपणा किंवा साधर्म्य असे फारसे दिसत नसल्याने या दोन्ही बाजू निरनिराळ्या काळात सजवल्या गेल्या असाव्यात असे मला तरी वाटते आहे. या पट्ट्याच्या बर्‍याच वर, उलट्या ठेवलेल्या 5 पायर्‍या-पायर्‍यांच्या पिरॅमिडच्या डिझाइनसारखे डिझाइन असलेला एक सलग पट्टा आहे. या पट्ट्याची डावी व उजवी बाजू मात्र एका सरळ रेषेत कोरल्या गेलेल्या आहेत. कमानीच्या उजव्या हाताला असलेल्या दोन्ही पट्ट्यांच्या मधे, एक कोनाडा खोदलेला असून त्यात 2 धर्मचक्रे व लॅटिस डिझाइन कोरलेले आहे तर कमानीच्या डाव्या हाताला मात्र याच भागात अनेक छोटे छोटे कोनाडे खोदलेले दिसत आहेत. असेच कोनाडे, पिरॅमिडचे डिझाइन असलेल्या पट्ट्याच्या वरच्या बाजूसही (कमानीच्या दोन्ही बाजूंना) खोदलेले आहेत. या पिरॅमिडचे डिझाइन असलेल्या पट्ट्याच्या वर दोन्ही बाजूंना, घोड्याच्या नालाच्या आकाराच्या दोन कमानी खोदलेल्या आहेत व त्यांच्या आतल्या बाजूंना बेर्म रेल व लॅटिस डिझाइन कोरलेले आहे. या 2 वरच्या कमानींच्याही वरच्या बाजूस, बौद्ध रेलिंग डिझाइन असलेले 2 सलग पट्टे कोरलेले आहेत. डाव्या बाजूंच्या कोनाड्यांत, 3 ठिकाणी युगुले कोरलेली आहेत आहेत् तर उजव्या बाजूच्या खालच्या पट्ट्याच्याही खाली,आता खूप प्रमाणात नासधूस झालेले असे एका स्त्रीचे शिल्प आहे.

आपला डावा हात कंबरेवर ठेवून उभ्या असलेल्या या स्त्रीच्या कंबरेला जाळीचे डिझाइन असलेला शेला किंवा मण्यांनी बनवलेला पट्टा बांधलेला आहे. तिच्या डोक्यावर, राजस्थानी किंवा गुजराथी स्त्रिया आजदेखील जसे घुंघट घेतात तसेच घुंघट आहे. कोनाड्यातील अस्पष्ट दिसणार्‍या युगूल शिल्पांच्या गळ्यात, फुलांचे हार, हातात कंकणे व कानात कुंडले स्पष्ट दिसू शकत आहेत तर पुरुषांच्या डोक्यावर मुंडासे आहे. स्त्रियांची केशभूषा मात्र मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. एका स्त्रीच्या डोक्यावर मुगुट असण्याची शक्यता आहे. एका शिल्पामधील स्त्री, शेजारील पुरुषाच्या गळ्यात पुष्पहार घालताना दाखवलेली आहे.

चैत्यगृहाच्या मुखाजवळच्या कोरीव कामाचे निरिक्षण करून झाल्यावर, मी 1 ते 11 क्रमांकांच्या गुंफांमधून एक धावती चक्कर टाकण्याचे ठरवतो आहे. यापैकी बहुतेक सर्व गुंफा या 2 किंवा 3 भिख्खूंच्या कोठड्या असलेले विहार आहेत. यापैकी एका विहाराच्या भिंतीवर मला अजिंठा गुंफातील 12 क्रमांकाच्या गुंफेत असलेल्या एका रेलिंग डिझाइनशी तंतोतंत जुळणारे डिझाइन दिसते आहे. या रेलिंग डिझाइनला असिरियन पॅटर्न (Assyrian pattern) या नावाने ओळखले जाते. पायर्‍या-पायर्‍या असलेले, एका शेजारी एक, काढलेले त्रिकोण या पॅटर्न मधे असतात व इराण किंवा पर्शिया मध्ये हा पॅटर्न आढळून येतो. अजंठा आणि भाजे येथे फक्त एकाच कोठडीच्या द्वाराच्या वर हा पॅटर्न कोरलेला आहे व तो तसा कोरण्यामागचे प्रयोजन मला समजू शकत नाहीये. कदाचित ती कोठडी वरिष्ठ आचार्यांची किंवा महत्त्वाच्या भिख्खूंची आहे हे दर्शवण्यासाठी हा पॅटर्न कोरलेला असावा. एका दुसर्‍या गुंफेत मला असाच व्हरांड्यासमोर उभारलेल्या स्तंभाच्या वर असलेल्या कॅपिटलचा एक ढासळलेला भाग दिसतो आहे. या कॅपिटलवर एकमेकाकडे पाठ करून बसलेले दोन हत्ती कोरलेले आहेत.

मी आता 12 क्र्मांकाच्या चैत्य गृहाकडे परत आलो आहे व दक्षिणेकडे पुढच्या गुंफा बघण्यासाठी पुढे निघतो आहे.

पुढच्या बहुतेक गुंफा, हिनयान कालातील साध्या व कोरीव काम विरहित अशाच आहेत. लॅटीस डिझाइनच्या खिडक्या काही ठिकाणी कोरलेल्या आहेत तर कोठड्यांवर बौद्ध रेलिंग डिझाइन व घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी या बहुतेक गुंफात आहेतच.

17 क्रमांकाच्या गुंफेच्या दक्षिणेस एका उघड्या गुंफेत, दोन पाण्याची टाकी खोदलेली दिसत आहेत. या टाक्यांवर एक शिलालेख आहे. या शिलालेखात फक्त एवढाच मजकूर आहे.

” कोसिकी महारथीचा पुत्र विन्हुदता याने धार्मिक कारणानिमित्त दिलेली भेट ”

या मजकुरावरून फारशी काहीच माहिती मिळत नाही. या पुढे अशाच एका उघड्या गुंफेत 14 बांधलेले स्तूप दिसत आहेत. वरिष्ठ भिख्खूंच्या अस्थी बहुदा यात ठेवलेल्या असाव्यात. यापैकी बहुतेक स्तूपांच्या डोक्यावर कॅपिटल्स वा अस्थी मंजूषा किंवा हर्मिका होत्या. आता फक्त उत्तरेकडे असलेल्या एका स्तूपाच्या डोक्यावर अशी हर्मिका किंवा अस्थी मंजूषा उरलेली दिसते आहे. त्यावर बरेच कलाकुसरीचे कोरीव काम केलेले दिसते आहे.

पूर्वेच्या दिशेने आणखी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक जुनी पण अत्यंत रोचक अशी गुंफा समोर दिसते आहे. व्हरांड्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या स्तंभांवरून व गुंफ़ा समुहाच्या अगदी एका कडेला असलेले या गुंफेचे स्थान, यावरून ही गुंफा चैत्यगृह खोदलेल्या कालाच्या बर्‍याच नंतर खोदली गेली असली पाहिजे हे स्पष्ट आहे. ही गुंफा दगड मातीने एवढी भरून गेलेली होती की इ.स. 1879 पर्यंत या गुंफेचा शोधच लागलेला नव्हता. आता 18 हा क्रमांक देण्यात आलेली ही गुंफा, संपूर्णपणे बौद्ध विहार असूनही काही अज्ञात कारणांमुळे, सूर्यदेवाचे मंदिर म्हणून ओळखली जात असली तरी या गुंफेला भाजे गुंफांमधील सर्वात प्रेक्षणीय व रोचक बौद्ध गुंफा असेच म्हणावे लागेल.

क्रमश:

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

हा भागही सुरेख आण इ तपशीलवार.

बाकी ठाणाळे लेणीमध्ये पण असे लहान लहान स्तूप बांधलेले आहेत.

सूर्यगुंफेबद्दलच्या लिखाणाची वाट पाहात आहे.

छोटे स्तूप

पितळखोरे येथे देखील असे छोटे स्तूप आहेत. मात्र ते मुख्य मठापासून जरा लांब व नदीच्या पैलतीरावर बांधलेले आहेत.

पुढचा भाग कधी?

पुढचा भाग कधी?

पुढे

पुढचा भाग १/२ दिवसात नक्की टाकतो.

 
^ वर