भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 1

भारतीय द्विपकल्पातील कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या खोर्‍यांमधील प्रदेशाला दख्खनचे पठार असे सर्वसाधारणपणे संबोधले जाते. गेले काही महिने या दख्खनच्या पठारावर असलेल्या अनेक ठिकाणच्या बौद्ध गुंफांना मी भेटी देतो आहे. या बौद्ध गुंफा साधारणपणे इ.स.पूर्वीच्या तिसर्‍या किंवा दुसर्‍या शतकात प्रथम खोदल्या गेल्या आणि इ.स. नंतरच्या सातव्या किंवा काही ठिकाणी आठव्या शतकापर्यंत या गुंफात राबता चालू होता. या भेटींमध्ये माझ्या मनाला एक प्रश्न सतत पडतो आहे की गुंफा खोदून त्यात मठ स्थापन करण्याची ही पद्धत दख्खनमधील बौद्ध धर्मीयांत कधीपासून आणि कोणत्या गुंफेपासून सुरू झाली असेल? माझ्या मनातील हा प्रश्न दुसर्‍या पद्धतीने किंवा शब्दात विचारायचा ठरवला तर दख्खनमधे सर्वात प्रथम किंवा सुरुवातीच्या कालात कोणत्या गुंफा खोदल्या गेल्या असाव्यात? असाही विचारला जाऊ शकतो. माझ्या आतापर्यंतच्या भेटींच्यात इ.स.पूर्व दुसर्‍या शतकाच्या शेवटच्या काही दशकात खोदल्या गेलेल्या बर्‍याच गुंफा मी पाहू शकलो आहे. पितळखोरे येथील गुंफा, अजंठ्यामधील 9 व 10 क्रमांकाच्या गुंफा व नाशिक येथील 18 व 19 क्रमांकाच्या गुंफा या सगळ्या याच कालात खोदल्या गेल्या असल्याने त्यांच्यात खूपच साधर्म्य दिसून येते आहे.

मी आता पुण्याजवळच असलेल्या भाजे येथील गुंफा पहाण्यासाठी निघालो आहे. या गुंफांच्यात कदाचित माझ्या मनातील प्रश्नाचे उत्तर मला सापडेल अशी आशा मला वाटते आहे. मी या आधी भेट दिलेल्या कार्ले गुंफांच्या साधारण पश्चिमेला या गुंफा आहेत. त्यामुळे कार्ले गुंफांप्रमाणेच भाजे गुंफा या देखील भारतातील एक प्रमुख रस्ता असलेला मुंबई-पुणे हमरस्ता किंवा नॅशनल हायवे क्रमांक 4 पासून काही किमी अंतरावरच असल्याने, भेट देण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. मुंबईहून प्रवास करत असल्यास खंडाळा घाट व लोणावळा हे हिल स्टेशन ओलांडल्यानंतर उजव्या हाताला मळवलीकडे जाणारा एक छोटासा रस्ता साधारण 8 ते 10 किमी अंतरावर लागतो. या रस्त्याची अवस्था मात्र सतत जाणवणार्‍या खड्याखळग्यांमुळे अगदी दयनीय अशी झालेली वाटते आहे. हा असा रस्ता चाकाखाली असल्याने साहजिकच आमच्या चारचाकीची गती आता अगदी मंद झाली आहे व चालकाला अतिशय कुशलतेने मार्ग काढावा लागतो आहे. रस्त्याच्या डाव्या हाताला मला एक छोटेसे तळे दिसते. त्याच्या काठावर एक शिवमंदिर आहे. मला मात्र या मंदिराच्या परिसरात असलेल्या बॉटल ब्रश फुलांनी फुललेल्या झाडाचा मोह पडतो आहे. एखाद्या ब्रशसारख्या दिसणार्‍या लालभडक फुलांनी हे झाड नुसते फुलून गेले आहे. आम्ही मात्र रडतखडत पुढे जात राहतो. समोर मुंबई-पुणे रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग दिसते आहे. मात्र सुदैवाने ते खुले आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या लगतच, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे क्रॉस करण्यासाठी म्हणून बनवलेला एक ओव्हर ब्रिज पार करून खाली उतरल्यावर एक खेडेगाव लागते. या खेडेगावात, अगदी लगतच असलेला एक ऊंच पर्वत सोडला, तर सांगण्यासारखे असे काहीच मला दिसत नाही. हा गावालगतचा पर्वत म्हणजे विसापूर किल्ला ज्या पर्वतराजीवर वसवलेला होता त्याच पर्वतरांगेच्या एका टोकाला असलेला हा पर्वत आहे. गावातून पुढे जाणारा रस्ता या पर्वताला प्रदक्षिणा घालत, वळत, वर चढत राहतो. थोडे पुढे गेल्यावर गेल्यावर एक गाव दिसते आहे. गावात मध्यभागी वाहनतळ आणि बसचा थांबा दिसतो आहे, समोर एक पाटीही दिसते आहे. पाटी वाचल्यावर माझ्या लक्षात येते की आम्ही ‘भाजे‘ गावात पोहोचलो आहोत. आमची चारचाकी वाहनतळावर सोडून आम्ही समोर दिसणार्‍या, धुळीने भरलेल्या व अर्ध्याकच्च्या बनवलेल्या रस्त्याने, पुढे चालण्यास प्रारंभ करतो. या रस्त्याचे कधीकाळी डांबरीकरण केलेले असावे. सध्या मात्र तो मधे मधे असलेल्या खड्यांच्यांत खडी टाकून जेमतेम जा ये करता येईल इतपतच तयार केलेला दिसतो आहे.

या रस्त्याने साधारण अर्धा किमी पुढे गेल्यावर मला समोरच्या डोंगराच्या खड्या चढावर, वर चढत जाणार्‍या पायर्‍या दिसत आहेत. पायर्‍यांचे बांधकाम दगडी आहे व बर्‍याच जुन्या काळातले दिसते आहे. मात्र त्यांची देखभाल योग्य रितीने होत आहे हे जाणवते आहे. मी पायर्‍या चढायला सुरुवात करतो. एकूण पायर्‍या 100 च्या आसपास असाव्यात. असाव्यात. पण पायर्‍यांची ऊंची जरा जास्तच वाटते आहे. त्यामुळे 2/3 वेळा मधे थांबणे मला भाग पडले आहे. दगडी बांधकाम केलेला एक तिकिटे विकण्याचा बूथ डाव्या बाजूला दिसतो आहे. मी तेथे जाऊन पुरातत्त्व विभागाने ठरवलेले 5 रुपये हे प्रवेश शुल्क भरतो. येथून साधारण 50 मीटर अंतरावर लेण्यांच्या आवाराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार खुले आहे आणि तेथे कोणीच रक्षक दिसत नाही. कदाचित 50 मीटरवरच तिकिट बूथ असल्याने येथे कोणी रक्षक ठेवलेला नसावा. तिकिट आधीच खरेदी केलेले असल्याने मी प्रवेशद्वारातून आत शिरतो.

प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच भाजे लेण्यांमधील सर्वात प्राचीन मानल्या जाणार्‍या बौद्ध गुंफा आहेत. भाजे लेणी, अजिंठा किंवा नाशिक लेणी जशी एका आडव्या लांब पट्ट्यालगत पसरलेली दिसतात तशी न दिसता एकमेकालगत खोदल्यासारखी वाटत आहेत. लेण्यांचे प्रथम दर्शन त्यामुळेच थोडे निराळे वाटते आहे. या लेण्यांकडे टाकलेला एक दृष्टीक्षेप सांगून जातो की नंतरच्या कालात दख्खनच्या पठारावर खोदल्या गेलेल्या बौद्ध गुंफांचे उगमस्थान असे ज्या 2 किंवा 3 ठिकाणच्या गुंफांना म्हणता येईल ( भाजे, कोंडाणे व बेडसे) त्यापैकी एक किंवा त्यापैकी सर्वात आधी खोदलेल्या अशा या गुंफा असाव्यात. भाजे लेण्यांमध्ये पश्चिमेला मुख असलेल्या एकूण 18 गुंफा आहेत. यापैकी काही समोरील प्रांगणाच्या पातळीच्या थोड्याशा वर आहेत तर काही वरच्या मजल्यावर आहेत असे म्हणता येईल. उत्तरेकडून गुंफांना क्रमांक दिलेले आहेत. इतर ठिकाणच्या गुंफांप्रमाणेच मध्यभागी व प्रांगणाच्या पातळीला असलेल्या गुंफा सर्वात आधी खोदलेल्या आहेत व नंतरच्या कालात खोदलेल्या गुंफा कडांना किंवा वरच्या मजल्यावर आहेत. माझ्या समोर मला दिसत आहेत त्या मधल्या किंवा 12 आणि 13 क्रमांकाच्या गुंफा. 12 क्रमांकाची गुंफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह व पितळखोरे येथील चैत्यगृह किंवा अजंठ्यातील 10 क्रमांकाचे चैत्यगृह, यांच्यात मला विलक्षण साम्य दिसते आहे. हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या अंतर्भागात (खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता) कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा संपूर्ण अभाव आहे. या एकाच गोष्टीवरून असे अनुमान काढणे सहज शक्य आहे की बौद्ध भिख्खूंनी डोंगरातील लेण्यांमध्ये बौद्ध मठ निर्माण करण्यास प्रारंभ केल्यानंतर यशस्वी रितीने निर्माण केलेली प्रथम किंवा त्या सुमाराची ही निर्मिती आहे.

जेम्स बर्जेस भाजे लेण्यांचे वर्णन करताना लिहितो:

” लाकडापासून व फक्त लाकडापासून निर्माण केलेल्या इमारतींत वास्तव्य करण्याची ज्यांना सवय आहे आणि ज्यांनी आता (डोंगरकपारीतील खडकांसारखे) जास्त टिकाऊ असे माध्यम वापरण्यास नुकतीच सुरुवात केली आहे अशा लोकांनी निर्माण केलेली ही वास्तू आहे. दगड हे माध्यम वापरून ज्या वास्तू बांधल्या जातात त्यांचे कोणतेच वैशिष्ट्य या वास्तूमध्ये दिसत नसून या वास्तूची सर्व वैशिष्ट्ये, फक्त लाकूड हे माध्यम वापरून केलेल्या वास्तूचीच स्पष्टपणे दिसून येतात. या ठिकाणी अतिशय रोचक असा एक निष्कर्ष काढणे सहज शक्य वाटते की या वास्तू निर्मितीच्या कालानंतरच्या पुढच्या हजार वर्षात, लाकडी इमारतींच्या बांधणीच्या ठराविक साचाच्या कल्पनांतून भारतीय स्थापत्य झगडत का होईना पण हळूहळू बाहेर पडत गेले आणि दगड वापरून बनवलेल्या अतिशय भव्य व वैभवशाली वास्तू भारतीयांनी उभ्या केल्या.”

भाजे लेण्यांना भेट दिल्यानंतर हे सहजपणे स्पष्ट होते आहे की पर्वत कपारींमध्ये गुंफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून ते आन्ध्रातील अमरावती, चाळिसगावजवळचे पितळखोरे आणि दक्षिणेला कार्ले या सर्व ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले. जेम्स बर्जेसच्या मताने भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व 200 च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व 272) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत.

12 क्रमांकाचे चैत्यगृह हे 27 फूट रूंद आहे आणि साधारण 59 फूट खोल आहे. आतला अगदी मागचा भाग अर्धवर्तुळाकार आकाराचा आहे. मध्यवर्ती प्रार्थनागृह आणि बाजूचे 3-1/2 फूट रूंद पॅसेजेस या मध्ये 27 अष्टकोनी स्तंभ खोदलेले आहेत. आतल्या अंगाला असलेले स्तंभ इतर चैत्यगृहांप्रमाणेच अर्धवर्तुळाकार वक्ररेषेवर उभारलेले असून या अर्धवक्र रेषेच्या मध्य बिंदूवर स्तूपाची उभारणी आहे. स्तूप आकाराने बराच मोठा असून त्याच्या शिरावर 2 भागाची अवशेष मंजूषा ठेवलेली आहे. कडेच्या काहीं स्तंभांवर कमल पुष्प किंवा त्रिशूळ या सारखी बौद्ध पवित्र चिन्हे कोरलेली दिसत आहेत.

छताला कार्ले येथील चैत्यगृहासारखाच वक्र कमानीचा आकार दिलेला आहे. छताच्या खाली सागवानी लाकडाच्या व कमानीच्या आकाराच्या मोठ्या तुळया किंवा गर्डर्स छताजवळ बसवलेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2200 वर्षांहून जास्त काल या तुळया टिकलेल्या आहेत. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे दिसत आहेत. या छिद्रांवरून आपल्याला असे म्हणता येते की गुंफेच्या मुखाजवळच्या भागावर जमिनीपासून ते वरच्या मोठ्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी पार्टिशन उभारलेले असले पाहिजे. कार्ले चैत्यगृहातील मुखाजवळचे या सारखे पार्टिशन हे पाषाणातच खोदलेले आहे. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर 300 किंवा 400 वर्षांनी खोदल्या गेल्या असल्याने हे सहज शक्य वाटते.

मी चैत्य गृहातून बाहेर येतो व गुंफेच्या मुखावरील भागाकडे साहजिकच माझे लक्ष वेधले जाते. चैत्यगृहाचे संपूर्ण मुख अगदी वरच्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानीपर्यंत पूर्णपणे खुले आहे. परंतु या कमानीच्या दोन्ही अंगांना व वरच्या बाजूस एखाद्या लाकडी बांधकामाच्या इमारतीला जसे कोरीव नक्षीकाम असावे त्याच पद्धतीचे नक्षीकाम पाषाणात कोरलेले दिसते आहे.

क्रमश:

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

लेखमालेची सुरुवात उत्तम झालीय.

भाजे लेणी महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक यात काहीच संशय नाही. इथल्या चैत्यगृहाला वरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थात पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमआणात नुकसान झाले आहे. अशीच अवस्था इतक्याच प्राचीन असलेल्या कोंडाणे लेणीतही दिसून येते. नंतरच्या काळात मात्र ही चूक सुधारून घेत आधी वरांडा खोदण्याची पद्धत सुरु झाल्याचे दिसते.

भाजे लेण्यातील चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील कलत्या ठेवलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील या उद्देशानेच अशी योजना केलेली दिसते. अर्थात नंतरच्या काळात मात्र अशा कलत्या स्तंभांची गरज नाही असे कारागिरांच्या लक्षात आले असावे व त्यामुळे तशी रचना नंतर दिसत नाही.

भाजे लेणीतील स्तूपसुद्धा गुळगुळीत आहे. मौर्यकालीन झिलईचा हा प्रभाव. स्तूपावर एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा लेप देऊन स्तूप चमकदार आणि गुळगुळीत केलेला दिसून येतो. या स्तूपावर वेदिकापट्टीची नक्षी पण दिसत नाही.

झिलई

मोर्यकालीन पाषाणवस्तूंना झिलई देऊन अगदी गुळगुळीत करण्याची प्रथा होती हे भटक्या यांचे विधान अतिशय योग्य वाटते. पिप्रावा येथील स्तूपामध्ये कृष्ण मोहन श्रीवास्तव या भारतीय शास्त्रज्ञाला भगवान बुद्धांचे अस्थी अवशेष ज्या कलशात ठेवलेले सापडले होते त्या पाषाण कलशाला सुद्धा अशीच झिलई दिलेली होती. हा कलश सम्राट अशोकाने ठेवलेला असावा असे काही लोक मानतात.

सुरेख वर्णन आणि चित्रे

ह्या लेण्यांना मी अनेक वेळा सहलीचा भाग म्हणून भेटी दिल्या होत्या. एकदा मळवली ते पौड (विसापूर-लोहगड-तिकोना मार्गे) असे पायी चालण्याच्या वेळी तेथे रात्री मुक्कामहि केला होता. अर्थात हे त्या जुन्या काळातच शक्य होते कारण तेव्हा लेणी पूर्ण 'बेवारशी' होती आणि कोणीहि तेथे जाऊन काहीहि करू शकत असे!

वरील लाकडी तुळया पहिल्यापासूनच्या असण्याचा उल्लेख मात्र बरोबर वाटत नाही. ते पुरातत्त्व खात्याचे अलीकडचे काम दिसते. अशा तुळया पूर्वी पाहिल्याचे स्मरत नाही. इतकी शेकडो वर्षे असे उत्तम लाकूड आसपासच्या खेडेगावच्या जनतेपासून सुरक्षित राहणे अशक्य वाटते. किल्ल्यांमधील ताशीव दगडहि उतरवून नेले जातात तिथे लाकूड कोण सोडेल?

Bombay Presidency Gazetteer Series, Vol XVIII Part III (पुणे भाग ३) येथे १०९-११० पानांवर ह्याच क्र. १२ च्या लेण्याचे १८८० च्या पुढेचे-मागचे वर्णन आहे. तेथे काही तुळया नाहीशा झाल्याचा आणि उरलेल्या काहींची नासधूस झालेली असण्याचा उल्लेख आहे. हे वर्णनहि आता बरेच जुने झाले तेव्हा असे वाटते की उरल्यासुरल्या तुळया गावातील जनेतेने काढून नेल्या असणार.

पाणी झिरपण्याचा वर उल्लेख आला आहे. त्या संदर्भात असे स्मरते की लेण्यांच्या वरील टेकडीवर गेले की उतारावरचे पाणी बाजूला वाहून नेण्यासाठी खडकामध्येच कोरलेला एक चर दिसतो. पावसाचे पाणी सरळ खाली प्रवेशद्वारापुढे पडण्याऐवजी बाजून निघून जावे ह्यासाठी ती व्यवस्था केलेली दिसते.

लाकडी तुळया

लाकडी तुळया या जुन्याच आहेत. पुरातत्त्व विभागाचा हा संदर्भ बघावा.

सहमत आहे.

स. आ. जोगळेकरांच्या "सह्याद्री" मध्ये भाजे लेण्यांतील फळ्यांचा उल्लेख वाचल्याचे स्मरते.

वा!

वाह! चांगली सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

 
^ वर