विशेषज्ञांच्या भाकितांची ऐशी तैशी!

कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वृत्तपत्रावर ओझरती नजर फिरवा, राशीफलांच्या नेहमीच्या रतीबाबरोबरच कुठल्याना कुठल्यातरी विशेषज्ञांच्या भाकितांचा उल्लेख ठळक मथळ्याखाली वाचायला हमखास मिळतोच. पेट्रोलचे भाव वाढणार, कांद्याचे भाव कोसळणार, भाजीपाला, दूध महागणार, अमुक दिवशी मन्सून अंदमानला पोचणार, अमुक तारखेला वादळी पाऊस पडणार, बंगाल उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पाऊस कोसळणार, पाऊस पाण्याच्या अभावी अमुक पीक जळणार, अर्थव्यवस्था कोसळणार, शेर मार्केट आपटी खाणार, अमुक कंपनीचे शेर वधारणार, जीडीपीची घसरगुंडी रोखणार, निवडणुकीत अमुक पक्षाचा विजय नक्की, अमुक उमेदवार हरणार, फ्लॅट्स आणखी महागणार, दहशती हल्ले होणार, 2020 साली भारत देश जगातील प्रथम क्रमांकाचा देश होणार, ..... अशा कितीतरी भाकितांची वाचून (ऐकून) आपल्याला सवय झालेली आहे. वृत्तपत्राचे रकाने भरण्यासाठी (वा टीव्हीची टीआरपी वाढवण्यासाठी) अशा प्रकारची सणसणाटी भाकितं वृत्तसंपादकांना लागतात असे गृहित धरले तरी वाचक (वा प्रेक्षक) सहजासहजी ही भाकितं दुर्लक्ष करत नाही, हेही तितकेच खरे आहे. मागणी तसा पुरवठा या मार्केटिंगच्या तत्वाप्रमाणे भाकितांचा रतीब लक्ष वेधतो.

हे भाकितांचे लोण फक्त महाराष्ट्र वा भारत या पुरतेच मर्यादित नसून हे जगभर पसरलेले आहे. अमेरिकेच्या टाइम या साप्ताहिकाने 21व्या शतकातील पहिले दशक काळेकुट्ट असेल व नंतरचे दशक तुलनेने चांगले असेल असा उल्लेख केला होता. अमेरिकेवरील 2001साली झालेले दहशती हल्ले, इराक युद्ध, कट्रिना वादळाचा तडाखा, 2008 सालची आर्थिक मंदी इत्यादी कारण त्या दशकाला काळेकुट्ट म्हणण्यास समर्पक ठरतील. परंतु यानंतरचे दशक चांगले असेल याबद्दलच्या भाकिताला आधार काय? त्यासाठीचे पुरावे कुठे आहेत? परंतु असले अडचणीचे प्रश्न कुणी विचारतही नाहीत व विचारले तरी उत्तर देण्याच्या भानगडीत कुणी पडतही नाहीत. एखाद्या कारखान्यात तयार होत असलेल्या उत्पादनासारखे रोज रोज काहीना काही भाकितांची भर पडत असते. 2040मध्ये चीनची अर्थव्यवस्था अत्युच्च शिखरावर असेल; अमेरिकेतील उपनगरामध्ये 2050 नंतर चणचण भासणार नाही; 21व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप अमेरिकेला मागे टाकेल... अशा प्रकारच्या तज्ञांच्या विधानांना कुठलेही बंधन नाहीत. आपल्या मुलांच्याबद्दल, आपल्या नातवांच्याबद्दल त्यांनी सांगावे व आपण मुकाट्याने ऐकत रहावे अशा स्थितीला आपण पोचलो आहोत.

त्यातल्या त्यात अर्थतज्ञांची भाकितं आजकाल हवामान खात्याच्या भाकितांसारखे वाटू लागले आहेत. अतिरथी - महारथी अर्थतज्ञांची फौज पंतप्रधानांच्या दिमतीला असली तरी आपल्या देशाच्या आर्थिक नाडीचा थांगपत्ता अजूनही या तज्ञांना नाही. भाकितांची नेमकी प्रक्रिया कशी असते याचीसुद्धा जाण नसल्यासारखी त्यांची विधानं असतात. एके दिवशी आर्थिक मंदी नाही असे विधान केलेले असते व त्याच्या दुसऱ्याच दिवशी रिझर्व बँक मंदी रोखण्यासाठी पाऊल उचलल्याची घोषणा करते. अशा प्रकारची परस्पर विरोधी भाकितं व कृतीबद्दलच्या बातम्या वाचकांना गोधळात टाकतात. व तज्ञांच्या विधांनावरील विश्वास कमी कमी होत जातो. 2008 मधील जागतिक आर्थिक मंदीची चाहूल कुणालाही कशी काय लागली नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. त्या कालखंडातील पत्रकारितेतील विशेषज्ञ मंदगतीने जाणारी अर्थव्यवस्था हे शीर्षक देऊन जागतिक अर्थव्यवस्थेला धोका नाही असेच सांगण्याचे प्रयत्न करत होते. परंतु बघता बघता हा डोलारा कोसळला व अजूनही आपण त्या ढिगाऱ्याखालून बाहेर पडू शकत नाही.

विशेषज्ञ या व्याख्येतच त्या त्या क्षेत्रातील अद्यावत ज्ञान, त्याचे चहू अंगाने केलेले विश्लेषण, व त्यातून पुढची दिशा देणारा हे अभिप्रेत असते. अर्थतज्ञ आर्थिक क्षेत्रातील घडामोडीवरून, राजकीय तज्ञ राजकीय परिस्थितीतील चढ उतारावरून , पर्यावरण तज्ञ पर्यावरणाच्या स्थित्यंतरावरून व प्रदूषणाच्या पातळीवरून काही आडाखे बांधू शकतात व जनसामान्यांना मार्गदर्शन करू शकतात, धोक्याची सूचना देऊ शकतात. परंतु आजकालच्या विशेषज्ञांच्या वक्तव्यावरून फलज्योतिषी, हस्तसामुद्रिक वा धर्मप्रचारकांच्या अंदाजे - पंचे विधानाप्रमाणे यांची भाकितं आहेत की काय असे वाटत आहेत. बुद्धी प्रामाण्यवादी , फलजोतिष वा हस्तसामुद्रिक इत्यादींच्या कुठल्याही दाव्यावर विश्वास ठेवत नाहीत. आता विशेषज्ञांचेही नाव या यादीत समाविष्ट करावे की काय असे वाटत आहे. परंतु आपली मानसिकता या विशेषज्ञांना नाकारण्यास अजूनही तयार होत नाही. फलजोतिषींचा धंदा तेजीत आहे. त्याचप्रमाणे तथाकथित विशेषज्ञांचाही धंदा जोरात चालू आहे. कारण त्याच्या विधानांचे चर्वितचरण करण्यात जनसामान्यांना आवडते. त्यामुळे त्यांचे कितीही अंदाज साफ चुकले तरीही भाकितं ऐकण्यात लोकांचा कल असतो.

मुळात या जगातील व्यवहार फारच गुंतागुंतीचे असतात. आणि ही गुंतागुंत सहजपणे, एकट्याने सोडवण्याइतकी आकलन शक्ती मानवी मेंदूत नाही, हे मान्य करायला हवे. मानवी मेंदू परिपूर्ण नाही. अनेक वेळा तीच तीच चूक करण्यात व केलेल्या चुकांचे समर्थन करण्यात त्याला अपराधीपणा वाटत नाही. काही वेळा पद्धतशीरपणे जाणून बुजून चुका करण्यापासून मेंदूला थांबवू शकत नाही. जगातील घडामोडींची अनिश्चितता, घडत असलेल्या घटनांचा वेग व चुका करणारा मेंदू यामुळे गोंधळात भर पडते. भविष्यातील घटनाबद्दलची उत्सुकता व भाकितांवर विश्वास ठेवण्याची मानसिकता कदाचित हार्डवायरिंग केल्यासारखे मेंदूत अंतर्भूत झालेले असतील. भविष्यात काय घडणार याचे उपजतच असलेले कुतूहल व यानंतर नेमके काय घडणार याबद्दलची अनिश्चितता या कोंडीत सापडल्यामुळे आपण कुठेतरी पॅटर्न मिळतो का याचा शोध घेतो. सर्व गोष्टी साच्यात बसवण्याच्या या वृत्तीमुळे नको तेथे पॅटर्नची कल्पना करत आपण आपल्या मनाचे समाधान करून घेत असतो. योगायोगाने घडलेल्या गोष्टीतसुद्धा आपल्याला पॅटर्न दिसतो. कावळा बसल्या बसल्या फांदी तुटणे यातही आपण पॅटर्न शोधतो. अपवादात्मकरित्या घडलेल्या घटनांच्या भोवती आख्यायिकांचे जाळे पसरले जाते. काही काळानंतर या अफवासदृश आख्यायिका, प्रत्यक्ष अनुभव व चक्षुर्वैसत्यम घटना म्हणून आपल्या मनावर नोंदल्या जातात. आणि या आख्यायिकावर विश्वास ठेवत आपण भ्रमावस्थेत असल्यासारखे वागत असतो.

इतरांना फसवल्याप्रमाणे आपण स्वत:ला फार काळ फसवू शकत नाही, हे जरी खरे असले तरी वेळोवेळी आपली उत्सुकता जागृत होत असल्यामुळे शेरबाजार, पाऊस-पाणी, हवामान, पेट्रोलचा साठा, राजकीय - सामाजिक - आर्थिक घडामोडी, इत्यादीविषयी पुढे काय होणार याबद्दल कळून घ्यावेसे वाटत असते. त्यासाठी आपण विशेषज्ञांच्या भाकितांकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो. कारण आपल्या मनाच्या कोपऱ्यात त्यांच्याबद्दल एक वेगळे स्थान असते. या विशेषज्ञांकडे विशेष ज्ञान आहे, त्यांना त्यांच्या विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे यावरून आपण त्यांची पारख केलेली असते. शिवाय हे तज्ञ कायम प्रसार माध्यमांवर चमकत असतात, पेपरमध्ये मोठमोठे मथळे देऊन त्यांच्या विधानांना प्रसिद्धी दिलेली असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यावर आपण विश्वास ठेवू लागतो. नाट्यमय रीतीने केलेली त्यांची भाकितं आपल्याला खरे खुरे वाटू लागतात. मुळात फलजोतिषीप्रमाणे आपल्याला जे ऐकल्यामुळे समाधान मिळत असते तेच वेगळ्या शब्दात विशेषज्ञ सांगत असल्यामुळे आपण खुश होतो. त्यात मानसिक समाधान मिळते. काहीही झाले तरी आपल्याला विश्वास ठेवायचाच या मानसिकतेमुळे या तथाकथित भविष्यवेत्त्यांची चलती आहे.

खरे पाहता या भाकितांचे चिकित्सकरित्या विश्लेषण करणे सहज शक्य आहे. प्रत्येक भाकितांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. विशेषज्ञाचा काही अंतस्थ हेतू आहे का याचाही शोध घेता येईल. थोडेसे प्रयत्न केल्यास वास्तव काय आहे व विशेषज्ञाचा अंतस्थ हेतू काय होता हे नक्कीच कळू शकेल. परंतु आपण त्या खोलात जात नाही. अंदाज खोटा ठरला तरी आपण त्याला माफ करतो. अजून एक संधी देतो. कारण आपल्यालाच त्यांच्या भाकिताची गरज असते. आपल्या जीवनात, उद्योगधंद्यात, भविष्यात काय होणार, हे समजून घेणे आपल्याला गरजेचे वाटत आले आहे. यांच्या भाकितांच्या आधारे आपण आपल्या योजना आखतो. गुंतवणूक करत असतो. लहान मोठे निर्णय घेतो. पैशाची तरतूद करतो. भविष्याबद्दल थोडीशीसुद्धा माहिती नसल्यास आपल्या योजनांचे भवितव्य काय याच काळजीने आपण अर्धमेले होऊ याची धास्ती वाटू लागते. भाकितं चुकलेली असली तरी चालतील, परंतु भाकितं पाहिजेच अशी मनस्थिती असते. आपल्या नियोजनांसाठी विशेषज्ञांची भाकितं कितपत उपयोगी पडतात याबद्दल शंका घेण्यास भरपूर वाव आहे. चिकित्सकरित्या विचार केल्यास, संभाव्य धोक्यांचा आढावा घेत आपल्या व्यवहारांचे नियोजन करत असल्यास भाकितांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

एक मात्र खरे की भविष्य हे अनिश्चित असते, याची जाणीव आपल्याला असायला हवे. व ही अनिश्चितता, कुंडली मांडून वा सदृशीकरणातून वा प्रारूपावरून वा विशेषज्ञांच्या भाकितावरून पूर्णपणे दूर करता येणार नाही, याची आपल्याला जाणीव असल्यास भविष्यात काही अघटित घडले तरी आपल्याला धक्का बसणार नाही. व हीच जाणीव समस्यांवर उपाय शोधण्याइतपत आपल्यात मानसिक कणखरपणा आणू शकेल.

जगभरातील विशेषज्ञांचे यापूर्वीच्या भाकितांचे रेकॉर्ड्स तपासल्यास हे विशेषज्ञ काही तरी फेकत असतात, असे वाटण्याची शक्यता आहे. त्याकाळातील मर्यादित ज्ञानाच्या आधारावरुन केलेल्या भाकितांच्यात काही चुका राहून गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या या काळातील भाकितांच्यात फरक जाणवतो का, ते अचूक आहेत का हेही तपासणे आवश्यक आहे. मात्र अलिकडील काही उदाहरणावरून यात फार मोठा फरक पडला आहे हे जाणवत नाही. लोकसंख्येचा स्फोट, शीतयुद्धाचे दुष्परिणाम, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, अण्वस्त्र संग्रहाचे धोके, हवामान बदलामुळे अतीवृष्टी - अनावृष्टीची टांगती तलवार, अन्नधान्याचा तुटवडा, अविकसित देशातील कुपोषण व उपासमार, एड्समुळे मरणाऱ्यांची संख्या, इत्यादी प्रकारच्या विषयावरील तज्ञांचे अंदाज 60 - 70 टक्के चुकीचे ठरले आहेत. छाप काटा टाकूनही या प्रकारचे बिनबुडाचे अंदाज आपणही सांगू शकतो. तर्क व पुरावे यांच्या आधारावरून या तथाकथित भाकितांचा पुरेपूर समाचार घेण्यास भरपूर वाव आहे.

या संबंधात दि इकॉनॉमिस्ट या अर्थविषयक इंग्रजी साप्ताहिकाने भाकितांच्या खरे - खोटेपणाविषयी, त्यांच्या विश्वासार्हतेविषयी एक चाचणी घेतली. जगभरातील 16 विशेषज्ञांना, आर्थिक वाढ, महागाई दर, तेलांच्या किंमती, व काही इतर अर्थविषयक निकष लावता येऊ शकणाऱ्या समस्यांच्याबद्दल या पुढील 10 वर्षाचे भाकितं करण्यास विनंती केली. या विशेषज्ञात चार अर्थ मंत्री, चार बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्याधिकारी, चार ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असलेले अर्थशास्त्राचे विद्यार्थी व चार जण इंग्रजीत बऱ्यापैकी वाचन करणारे कार्मिक होते. दहा वर्षानंतर या सर्वांच्या भाकितांचा आढावा घेण्यात आला. जे निष्कर्ष निघाले ते सर्व परस्पर विरोधी व वास्तवाशी संबंध नसलेले असेच निघाले. काही भाकितं तर एकदम रद्दड निघाल्या. कार्मिकांची भाकितं व कंपन्यांच्या सीईओंच्या भाकितं यात फरक नव्हता. अर्थमंत्र्यांच्या भाकितांचा शेवटचा क्रमांक होता. अशाप्रकारच्या चाचण्या वेळोवेळी ठिकठिकाणी घेतले जात असतात. परंतु बहुतेक चाचण्यांचे परिणाम शून्य! एका नियतकालिकेने विशेषज्ञाचे भाकित व चिंपांझीने बोट ठेऊन केलेले भाकित अशी तुलना केली. व या तुलनेत चिंपांझी सरस ठरली. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी अंदाज करणे सोपे नसते हे लक्षात येईल. अचूक अंदाजासाठी भरपूर इनपुट्स, भरपूर प्रयोग व विश्लेषण करण्याची गरज आहे.

अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी विशेषज्ञांचा गट असावा लागतो. हे विशेषज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रामधून निवडलेले हवेत. वेगवेगळ्या राजकीय निष्ठेचे संस्थेचे, पार्श्वभूमीचे व वयोगटाचे हवेत. त्यांना प्रश्न विचारताना त्यात संशयाला जागा असू नये. होय किंवा नाही हे स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. तरच पुढील अमुक अमुक वर्षभरात भारत - पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील की नाही? या व अशा प्रकरच्या प्रश्नांना ठाम उत्तर देणे शक्य होईल. केवळ जुजबी, कामचलावू, बाइट्सची भर असलेली जर तरची भाषा यात नसावी. खरे पाहता भाकितांची टक्केवारीत विधान करता आले पाहिजे. संपूर्ण गटाची एखाद्या विषयी पूर्ण खात्री असल्यास 100 टक्के, थोडे फार फरक असल्यास अमुक अमुक टक्के असे सांगता आले पाहिजे.

या सर्व गोष्टींचा अर्थ विशेषज्ञांची हकालपट्टी करून छाप काटा टाकून निर्णय घ्यावे असे नसून विशेषज्ञांकडून जास्त जबाबदारीयुक्त विधानाची अपेक्षा आहे. कारण विधानांची चिकित्सकपणे विचार करण्याची मानसिकता सामान्यांच्यात अजूनही नाही. त्यामुळे भाकितांचे उत्तरदायित्व विशेषज्ञांनी स्वीकारले पाहिजे. उगीच सरधोपट विधान करणे व विधान खोटे ठरल्यास त्याच्या समर्थनार्थ पळवाटा शोधणे हे कुणाच्याही हिताचे नाही.

Comments

सहमत

भविष्यात काय घडणार याचे उपजतच असलेले कुतूहल व यानंतर नेमके काय घडणार याबद्दलची अनिश्चितता या कोंडीत सापडल्यामुळे आपण कुठेतरी पॅटर्न मिळतो का याचा शोध घेतो.

ज्योतिषाकडे जाणारा जातक याचाच आधार घेत असतो.

आज जगबुडी होणारे

मायन कॅलेंडरप्रमाणे आज जगबुडी होणार आहे, सांभाळून राहा. :प ;-)

 
^ वर