एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा, भाग 5

(मागील भागावरून पुढे)

नाशिकमधील त्रिरश्मी किंवा पांडव लेण्यांमध्ये असलेल्या गौतमीपुत्राच्या गुंफेत एकूण 4 शिलालेख आहेत. अर्थात हे सर्व शिलालेख, राज परिवारातील सदस्यांनी, या गुंफेत वास्तव्य करणार्‍या भिख्खूंना, वेळोवेळी दिलेल्या देणग्यांबद्दलची दानपत्रे म्हणून खोदलेले आहेत. या दानपत्रांतून प्रत्यक्षरित्या, प्रसंगानुरूप आलेली काही गावांची नावे, त्रिरश्मी पर्वतावरील या बौद्ध मठाचा व नाशिक गावाचा ज्यात समावेश केला जात असे त्या जिल्ह्याचे त्या काळचे "गोवर्धन" हे नाव, त्या काळातील (इ.स. पहिले शतक), शेतजमीन मालकी नोंदणी व शेतसारा वसूल करण्याच्या पद्धती, एवढीच माहिती जरी मिळत असली तरी अप्रत्यक्षरित्या ऐतिहासिक महत्त्व असलेली बरीच अतिरिक्त माहिती मिळू शकते. या दृष्टीकोनातूनच आपण या शिलालेखांचा विचार करुया.

goutamiputra's order

यापैकी पहिला शिलालेख या गुंफेतील व्हरांड्याच्या पूर्वेकडील भिंतीवर, छताजवळ खोदलेला आहे. नहापनाच्या सैन्यावर संपूर्ण विजय मिळाल्यानंतर, सैन्याच्या छावणीमधून राजा गौतमीपुत्राने दिलेल्या एका आदेशाचे हे रेकॉर्ड आहे. त्याच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षात किंवा इ.स. 102 मध्ये त्याने हा मौखिक आदेश दिलेला आहे. या शिलालेखामुळे गौतमीपुत्राने शकांचा (Scythians) संपूर्ण पराभव कधी केला होता? ही महत्त्वाची माहिती आपल्याला मिळू शकते. या शिलालेखात ऋषभदत्ताच्या मालकीच्या शेतजमिनीचा उल्लेख आहे. क्षत्रप नहापन याचा ऋषभदत्त हा जामात होता व कोकण आणि पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये तो नहापनाचा व्हाइसरॉय म्हणून काम बघत असे त्याचप्रमाणे कार्ले, कान्हेरी व नाशिक मधील 10 क्रमांकाच्या गुंफेत त्याचा उल्लेख आल्याचे वाचकांना स्मरत असेलच. या शिलालेखात स्पष्टपणे असा उल्लेख आहे की ऋषभदत्त याच्या मालकीची शेतजमीन आता राजाच्या मालकीची झालेली आहे. किंवा ऋषभदत्ताची सत्ता आता संपुष्टात आलेली असून तो युद्धात मारला तरी गेला आहे किंवा त्याने पळ काढला आहे.
या गुंफेतील दुसरा शिलालेख हा वरील शिलालेखानंतर लगेचच सुरू होतो. या शिलालेखात राजा गौतमीपुत्र व त्याची माता गौतमी या दोघांनी मिळून दिलेला एक आदेश, गोवर्धन जिल्ह्यातील राजाच्या मंत्र्याकरवी येथे खोदवून घेतलेला आहे. या शिलालेखाचा काल गौतमीपुत्राच्या राजवटीचे 24 वे वर्ष असा नोंदवलेला असल्याने गौतमीपुत्र इ.स.110 पर्यत गादीवर होता असे खात्रीलायकपणे म्हणता येते. हा शिलालेख खोदवला गेल्यानंतर काही महिन्यांतच बहुधा गौतमीपुत्राचा मृत्यू झालेला असावा. या शिवाय या शिलालेखातून गोवर्धन जिल्ह्यासाठी राजाने एक राजमंत्री नियुक्त केलेला होता ही माहिती सुद्धा मिळते. त्या काळातील शासकीय व्यवस्था कशी असेल यासंबंधी हा एक दुवा महत्त्वाचा वाटतो.

मी विचारात घेत असलेला तिसरा शिलालेख व्हरांड्याच्या मागील भिंतीवर प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस खोदलेला आहे. हा शिलालेख, गौतमीपुत्राची राजमाता गौतमी हिने राजा गौतमीपुत्राचा पुत्र व त्यावेळील राजा वसिष्ठिपुत्र पुळुमवी याच्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षात, किंवा इ.स.129 मध्ये दिलेल्या देणगीचे दानपत्र या स्वरूपातला आहे. या शिलालेखात, सातवाहनांचा महाधिराज म्हणून संबोधलेल्या राजा गौतमीपुत्राचे व त्याच्या कर्तुत्त्वाचे त्याच्या आईने मोठ्या गर्वाने केलेले वर्णन दिलेले आहे. इतिहासकार वा.वि. मिराशी यांनी केलेले या शिलालेखातील वर्णनाचे भाषांतर मी खाली देतो आहे.
balasiri's inscription about goutamiputra

या शिलालेखातील वर्णनावरून या महाशक्तीमान राजाबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते. या माहितीमध्ये या राजाच्या राज्याच्या सीमा कोठपर्यंत पसरलेल्या होत्या? राज्यातील महत्त्वाचे पर्वत कोणते होते? याच बरोबर त्याचे शौर्य, त्याचा पराक्रम, त्याचे वैयक्तिक गुण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मातेला त्याच्याबद्दल असलेला प्रचंड गर्व व प्रेम याची झलक आपल्याला मिळू शकते.

प्राचीन भारताच्या इतिहासातील हा शिलालेख, बहुधा "यासम हा" असा एकच एक असावा ज्यात सर्वश्रेष्ठ राजा म्हणून गणल्या गेलेल्या या राजाचे त्याच्या आईने केलेले वर्णन आजही उपलब्ध होऊ शकते आहे. या राजाने त्याच्या प्रजेची पारतंत्र्याच्या जोखडातून 1900 वर्षांपूर्वी सुटका केली होती. माझ्या मताने गौतमीपुत्र राजाच्या क्षत्रप नहापन राजाबरोबर झालेल्या या युद्धाचे, महाराष्ट्राचे किंवा दख्ख:नचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध असे नामकरण करणे योग्य ठरावे आणि त्यानंतर 1500 वर्षांनी शिवाजी महाराजांनी आदिलशाही व मोगल यांच्या बरोबर केलेल्या युद्धांशी या युद्धाची तुलना करणे उचित ठरावे.
या राजाबद्दल मनात मोठे कौतुक बाळगतच मी आता या गुंफेमधून बाहेर पडतो आहे. बाहेर पडल्यावर मी मागे वळून बघतो. व्हरांड्याच्या पुढच्या भागात असलेल्या स्तंभांच्या कॅपिटल्सवर, कोरलेल्या प्राण्यांच्या आकृत्यांवर मला कोरीव काम केलेला एक सलग पट्टा दिसतो आहे. या पट्ट्यात अगदी बारीक कोरीव काम करून चित्रित केलेले असंख्य प्राणी, मानवी आकृती व पाने-फुले मला दिसतात. सर्वात वरच्या बाजूला सलग अर्धकमलांचे आरेखन केलेला एक पट्टा आहे.

गुंफेसमोरील प्रांगणाच्या डाव्या अंगाला मला आणखी काही बास रिलिफ शिल्पे दिसत आहेत. मी जरा जवळ जाऊन ती पाहण्याचे ठरवतो. गुंफेच्या तोंडाच्या वरच्या भागावर कोरलेल्या पट्ट्याला सलग असा एक पट्टा या भागात कोरलेला दिसतो आहे. या सलग पट्ट्यांतर्गत, अर्धकमले, बौद्ध रेलिंग यासारखे कोरीव काम व त्या खाली 3 पिलॅस्टर कोरलेले मला दिसत आहेत. या 3 पिलॅस्टरवर उभ्या असलेल्या स्त्रियांच्या 3 आकृती आहेत. पाऊसपाण्याने झीज होऊन या आकृती बर्‍याचशा प्रमाणात नष्ट झालेल्या आहेत. अगदी आतल्या अंगाला असलेल्या स्त्री आकृतीजवळ एक वृक्ष कोरलेला असून त्या वृक्षाकडे तिने आपला उजवा हात पसरलेला आहे तर डावा हात स्वत:च्या कंबरेवर ठेवलेला आहे. मधल्या पिलॅस्टरवर उभ्या असलेल्या स्त्रीने सुद्धा डावा हात कंबरेवर ठेवलेला आहे व स्वत:च्या खांद्याचा आधार देऊन कोणतीतरी वस्तू (बहुधा चवरी असावी) उजव्या हातात धरलेली आहे. अगदी उजवीकडे असलेल्या स्त्रीच्या अंगावर भिख्खूंची कफनी किंवा नेसलेली साडी आहे. या स्त्रियांच्या आकृतींखालील भागात अस्पष्ट अशा कोरलेल्या आकृत्या आहेत. त्यातील काही पक्षी मला ओळखू येतात.

नाशिक येथे असलेल्या व सातवाहन कालाशी संबंधित अशा बहुतेक गुंफांना आता माझी भेट देऊन झालेली आहे. या ठिकाणी महायान कालातील अनेक गुंफा आहेत. त्यातील बौद्ध मूर्ती बघत बघत माझी त्रिरश्मी पर्वताची भेट मी आवरती घेतो आहे.
तरी सुद्धा गुंफा क्रमांक 23 मध्ये बुद्ध मूर्तीच्या पायापाशी बसलेले, ग्रीक देवता एथनाचे घुबड माझे लक्ष जाता जाता वेधून घेतेच. ही लेणी कोरणार्‍या कारागीरांवर असलेल्या ग्रीक शिल्पकलेच्या परिणामाचे हे आणखी एक उदाहरण आहे.
पायर्‍या उतरून परत खाली जाण्याच्या तयारीत असतानाच गौतमीपुत्राच्या गुंफेशेजारीच असलेल्या एका गुंफेकडे माझे लक्ष वेधले जाते व माझी पावले थबकतातच! ही एक छोटीशी गुंफा आहे. व्हरांड्यासमोर 2 स्तंभ व 2 पिलॅस्टर आहेत. स्तंभांची रचना बरीचशी गौतमीपुत्राच्या गुंफेमधील स्तंभ, त्यावरील कॅपिटल्स व त्यावरचे कोरलेले प्राणी या सारखीच आहे. मात्र कॅपिटल्सवरील शिल्पकला मला फारच अजोड वाटते आहे. डावीकडून दुसर्‍या असलेल्या स्तंभावरील कॅपिटलवर, दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यावर बर्‍याच स्त्रिया आरूढ झालेल्या दाखवलेल्या आहेत. वर चढू पाहणार्‍या एका स्त्रीला वर आरूढ झालेली एक स्त्री हात देऊन वर ओढण्याचा प्रयत्न करताना दाखवलेली आहे. इतक्या बारकाईने केलेले हे कोरीव काम डोळ्यात अगदी भरून जाते आहे हे नक्की.

सातवाहन कालातील नाशिक गुंफांचे वैशिष्ट्य असे मानता येते की 2000 वर्षे उलटल्यावरही या गुंफांची व गुंफांतील शिल्पकलेची सुंदरता अजून टिकून आहे. नाशिकच्या गुंफा व त्यातील महत्त्वपूर्ण शिलालेख आपल्याला सातवाहनांच्या इतिहासाबद्दल बरेच काही सांगून जातात याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.
सातवाहन साम्राज्याच्या पाऊलखुणांचा मी घेत असलेला हा मागोवा अजूनही पूर्ण झालेला नाही. आणखी काही स्थळांना भेटी देण्याचा माझा मानस आहे. त्यानंतरच हा शोध पूर्ण झाला असे मला म्हणता येईल.

(समाप्त)

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम माहिती.

नाशिकलेणीविषयीची लेखमाला अत्यंत सुंदर झाली.
पण हा लेख अपुरा वाटला किंवा अजून एक भाग हवा होता.
देवी लेणीतीलच वाशिष्ठीपुत्र श्री पुळुवामी याच्या शिलालेखाबद्दल थोडी माहिती हवी होती.
शिवाय लेणी क्र. २० हा यज्ञविहार. येथे श्री यज्ञ सातकर्णीचे शिलालेख आहेत.

तुमची पुढची लेखमाला कान्हेरी लेण्यांवर असेल असे वाटतेय. तिथेही पुळुवामी आणि यज्ञ सातकर्णीचे शिलालेख आहेत.

नाशिक मधील इतर गुंफा

भटक्या यांचे मत मला मान्य आहे.परंतु मी असे ठरवले होते की या लेखमालेत फक्त हिनयान गुंफाच कव्हर करायच्या. 20 क्रमांकाची गुंफा ही महायान असल्याने मी घेतलेली नाही इतकेच.
पुळुमावी या राजाचे3 शिलालेख मी कार्ले गुंफावरील भागात घेतले आहेत म्हणून परत घेतले नाहीत. आणि त्या शिलालेखातून अतिरिक्त काही माहिती मिळत नाही असेही मला वाटले.
या पुढील लेखमाला भाजे गुंफावर आहे. तेथे जरी प्रत्यक्ष सातवाहन राजांचा उल्लेख नसला तरी त्या गुंफा सर्वात प्राचीन गुंफापैकी एक मानल्या जात असल्याने मी त्यांचा समावेश केला आहे. कान्हेरी नंतर घेऊ.

खरे आहे.

पुळुवामी आणि यज्ञश्री सातकर्णी यांचे लेख फक्त दानाविषयीच आहेत.
भाजे गुंफांविषयी अधिक वाचायला नक्कीच आवडेल.

कान्हेरी लेण्यांविषयी जर लेखमाला येणार असेल तर

एका मुद्द्याविषयी खुलासा व्हावा म्हणून आधीच एक शंका उपस्थित करीत आहे. कान्हेरी लेण्यांतल्या एका मोठ्या विहारात दोन लांब असे कमी उंचीचे दगडी ओटे बांधलेले आहेत. ब्रिटिशांनी त्याला भोजनगृह म्हटले आहे. पण ते तितकेसे पटत नाही. कारण आपल्याकडे एक तर खाली बसून जेवण्याची पद्धत होती.(थंड हवेच्या प्रदेशात जमीन गार पडत असल्याने खुर्ची मेजे वगैरे लाकडी वस्तू वापरण्याची प्रथा पडली असेल.) बसण्याचा पाट आणि जेवायच्या ताटाखालचा पाट हे बहुधा एकाच पातळीत असत. शिवाय भिक्षूंच्या त्यक्त-विरक्त जीवनशैलीत हा ताटापाटाचा थाट विसंगत वाटतो. आणखी एक सबळ कारण असे आहे की या विहारानजीकच (बहुधा आतमध्येच) असलेल्या एका शिलालेखामध्ये इतर अनेक वस्तूंबरोबर ग्रंथांसाठी कुणीतरी दानधर्म केल्याचा उल्लेख आहे. यावरून हे एक वाचनालय असावे. ते ओटे जाडजूड ग्रंथ ठेवण्यासाठी बांधलेले असावेत.

ओटे

ओटे सर्व ठिकाणच्या विहारात मी बघितले आहेत. ते मुख्यत्वे भिख्खूंना आणि प्रवचन करणार्‍या आचार्यांना बैठकीची व्यवस्था म्हणून खोदलेले असावेत. भाजे यथील ओट्याला तर लाकडी बैठकीसारखा आकार दिलेला आहे.

कान्हेरीटील ओटे

कान्हेरीतील ओटे वेगळ्या प्रकारचे आहेत.
प्रशस्त विहार आणि मधल्या भागात समोरासमोर अंतर ठेवून बांधलेले ओटे अशी यांची रचना.

मला तरी कान्हेरीतील ते ओटे म्हणजे भोजनगृहच अधिक वाटते. कान्हेरी म्हणजे अतिशय मोठा बौद्धमठ होता हे तिथल्या विहारांच्या प्रचंड संख्येवरून लक्षात येतेच. कान्हेरीचा बौद्धमठ म्हणजे बौद्ध तत्वज्ञान शिकवणारी शाळाच साहजिकच तेथे विद्यार्थी मोठ्या संख्येने असतील शिवाय शिवाय कान्हेरी तसे आडबाजूला असल्याने भिक्षा मागून निर्वाह करणे अशक्यच तेव्हा त्यांच्या जेवण्यासाठी भोजनगृह असणॅ गरजेचेच आहे.
ग्रंथांचे अध्ययन इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि तेही एकाच वेळी चालत असेल असे वाटत नाही.

कान्हेरीतील तो विहार

स्वयंपाकशाला

त्याकाळी कदाचित स्वतःचे जेवण स्वतः बनवण्याची पद्धत असावी. इतक्या लोकांसाठी एकाच ठिकाणी अन्न शिजवायचे तर त्यासाठी स्वयंपाकशाळा,मुदपाकखाना अशी काही तरी स्वतंत्र व्यवस्था हवी, जी तिथे दिसत नाही.
उरलेली चर्चा कान्हेरी लेखमालेत होईलच.

ओटे

कूर्ग मधील बायलाकुपे येथील बौद्ध मठातील प्रार्थनागृहाचे फोटो खाली दिले आहेत. समोरासमोर मांडलेली मेजे हे या प्रकारच्या सर्व बौद्ध मठांत दिसणारे साधारण दृष्य असते. त्यामुळे कान्हेरी मधील ओटे हे याच कामासाठी खोदलेले असणार असे मला वाटते.

IMG_0620

IMG_0621

ओटे

आता चर्चेसाठी कान्हेरी लेखमालेची वाट पाहणे आले पण कूर्ग मठातील छायाचित्रांमुळे कान्हेरी लेण्यांतील भोजनगृह हे ग्रंथालय असू शकते हे तर्कसंगत वाटतेय.
एकच शंका: त्याकाळचे (महायानकाळातील) ग्रंथांचे स्वरूप नेमक्या कशा प्रकारचे असे म्हणजे भूर्जपत्रांवर लिहिलेले किंवा कसे?

जिन आंग

जमल्यास चीन मधल्या जिन आंग मंदिरातले फोटो टाकेन येथे. मुर्ती समोर गुडघे टेकुन वाकता येईल अशी व्यवस्था केलेली असते. त्यांची उंची भटक्या यांनी दिलेल्या चित्रा एवढीच असते पण त्यावर गादी असते. लोकं त्यावर गुडघे टेकुन नमस्कार करनाना आणि प्रर्थना करताना पहिले आहेत.

पठणाची खोली

लेर्ख आणि चर्चा रोचक आहे. भटक्या यांनी दिलेले चित्र बोलके आहे (भटक्या यांचेही आभार)
चित्रावरून ही खोली पठणासाठी वाटते. पूर्वी मौखिक पाठांतरांची पद्धत असे तेचा अश्या ओट्यांवर भिक्खु एका ओळीत बसून एका तालात पठण करत असत.

गेल्यावर्षी भुतानला एका मॉनेस्ट्रीमध्ये हे विलोभनीय दृश्य पाहिले होते आणि अंगावर काटा येईल असा एका तालातील तो नादध्वनी ऐकला होता. तिथे हे भिक्खु अश्याच लांब ओट्यावर आपापली बसकणे घेऊन बसले होते.

जर हे भोजनालय असते तर खोलीची उंची बरीच अधिक हवी होती (कारण वाढपी वगैरेंना सतत उभे रहायचे असते वगैरे) शिवाय मुदपाकखाना जवळ हवा कारण भांडी मोठी असत.

वाचनालय हे मतही ग्राह्य आहे मात्र पुर्वी वाचनासाठी छापील साहित्य इतक्या प्रतींमध्ये उपलब्ध होते का याविषयी शंका आहे.

ग्रंथालयच बहुधा

छापील ग्रंथ अजिबातच नव्हते. पण भूर्जपत्रे, हातकागद, वगैरेवर लिहिलेल्या ज्ञानपोथ्या प्रचंड प्रमाणात होत्या. अजूनही जागोजागच्या प्रसिद्ध ग्रंथालयांत (उदा.तंजावुर) शेकडो हजारो पोथ्या प्रकाशात येण्याची वाट पहात पडून आहेत. ह्युएन त्सांग ने उंटांच्या पाठीवर लादून कितीतरी ग्रंथसंपदा आपल्याबरोबर नेली. नालंदा जेव्हा जाळले तेव्हा तिथले ग्रंथ जळून खाक होण्यासाठी अनेक दिवस लागले. शिवाय कान्हेरी बाराव्या तेराव्या शतकापर्यंत जागते होते.( ही कालमर्यादा सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत खेचता येईल. कारण सोळाव्या शतकात जेव्हा साष्टी बेट पोर्चुगेझांच्या ताब्यात गेले तेव्हा कान्हेरीसाठी वर्ग असलेला मागाठणे आदि गावांचा महसूल त्यांनी आपल्या धर्ममठांकडे वळवला. ती कान्हेरीचा आधीच मृतप्राय झालेला धर्मव्यवहार पूर्णपणे बसण्यासाठीची शेवटची काडी ठरली.) बाराव्या शतकापावेतो कागद तयार करणे,त्यावर ग्रंथनिर्मिती होणे,ग्रंथांच्या नकला करणे/करविणे हा एक कटकटीचा असला तरी राजमान्य आणि लोकमान्य व्यवहार/उद्योगधंदा बनला होता. कान्हेरीची लेणी बर्‍याच आधी निर्माण झाली असली तरी त्या काळातही विपुल ग्रंथ उपलब्ध होते. ह्या विहारात स्तूप नाही. तेव्हा इथे मंत्रपठण किंवा गुढगे टेकून प्रार्थना वगैरे होत नसाव्यात. शिवाय हा विहार भरपूर खिडक्यायुक्त प्रकाशमान असा आहे जो वाचनास अत्यंत उपयुक्त ठरू शकत होता. असो. नाशिक गुंफांच्या धाग्यावर कान्हेरीची चर्चा कदाचित उचित नव्हती. पण ह्या अवांतराला माझ्याकडून हातभार लागला हे खरे.

उंची

>>जर हे भोजनालय असते तर खोलीची उंची बरीच अधिक हवी होती
फोटोमध्ये जरी हा विहार उंचीला थोटका दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र बर्‍यापैकी उंच आहे. कमीत कमी १० फूट उंच तर सहज असावा.
तशाही ह्या विहारामध्ये अंतर्गत खोल्यासुद्धा आहेत.

शुएन त्झांग

ह्युएन त्सांग ने उंटांच्या पाठीवर लादून कितीतरी ग्रंथसंपदा आपल्याबरोबर नेली.

हे वाक्य अयोग्य वाटते.त्याने नालंदा येथील वास्तव्यात अनेक पुस्तकांच्या स्वत: नकला करून घेतल्या होत्या. ही पुस्तके त्याने बरोबर नेली होती. वायव्येकडील एक नदी पार करताना त्याची नाव बुडाली व हे सर्व ग्रंथ नष्ट झाले.. शुएन त्झांगची चिकाटी एवढी की यातील काही ग्रंथांच्या परत नकला त्याने करून घेतल्या.

ह्या विहारात स्तूप नाही.

विहारात स्तूप कधीच बांधत नसत. विहार ही भिख्खूंच्या राहण्याची जागा असे.

स्तूप

विहारात स्तूप कधीच बांधत नसत. विहार ही भिख्खूंच्या राहण्याची जागा असे.

विहारात मुख्य स्तूप नसे. पण कालांतराने भिख्खूंची गर्दी वाढल्यामुळे प्रार्थनेच्या सोयीसाठी चैत्यगृहाबरोबरच विहारांमध्येसुद्धा स्तूप कोरले जाऊ लागले. नाशिक लेणीमध्ये नहपान विहार आणि देवीलेणीमध्ये समोरील भिंतीवर उठावात अर्धस्तूप कोरलेले आहेत तर लेण्याद्री गणपतीची जी मूर्ती आहे तो पूर्वी असाच उठावात कोरलेला स्तूप असावा असे मानले जातात. कान्हेरीतील बर्‍याच विहारांमध्ये असे स्तूप दिसतात.

अर्थात चैत्यगृहांतील स्तूप रचना आणि विहारांमधील स्तूप रचना यांत बराच फरक आहे.

विहारातील स्तूप

भटक्या यांचे म्हणणे बरोबरच आहे. म्हणूनच मी वर स्तूप बांधत नसत असे म्हटले आहे. स्तूपाचे बास रिलिफ बर्‍याच विहारात आढळतात. स्तूपाची मूळ कल्पना अस्थी ठेवण्याची जागा अशी बहुदा असावी. कारण स्तूपाच्या वर अस्थी मंजुषा कोरलेली असते. परंतु अस्थी सहसा यात ठेवत नसत. भाजे येथे एका उघड्या गुंफेत असे 14 स्तूप शेजारी शेजारी बांधलेले आहेत. त्यावर निरनिराळ्या आचार्यांची नावेही कोरलेली आहेत.

स्तूप

स्तूप ह्या शब्दाचे मूळ अर्थ ढीग किंवा ढिगारा तर जोडणे किंवा एक करणे असे दोन अर्थ आहेत तर स्तू या शब्दाचा स्तवन करणे असाही होतो.
स्तूपाची मूळ कल्पना अस्थी ठेवायची जागा हे बरोबरच आहे पण त्याच बरोबर अस्थि किंवा बुद्धाच्या अथवा श्रेष्ठ भिख्खुंच्या वापरत्या वस्तू ठेवूनही त्याभोवती स्तूप बांधले जात.
अर्थात अशोककालीन स्तूपांमध्येच प्रामुख्याने या वस्तू ठेवल्या जात कारण हे स्तूप बांधीव असत. म्हणजेच मध्यभागी अस्थी किंवा वस्तू ठेऊन त्याभोवती विटांचे आणि मातीचे बांधकाम केले जात असे. सह्याद्रीतील गिरीशिखरांमधील स्तूप मात्र मुख्यतः बुद्धाच्या स्मरणाप्रीत्यर्थच बांधले जात. हे स्तूप अखंड कोरीव असल्याने त्यात अस्थी किंवा इतर वस्तू ठेवता येत नसे.

कारण स्तूपाच्या वर अस्थी मंजुषा कोरलेली असते.

ही अस्थी मंजुषा म्हणजे नेमके काय ते समजले नाही.
कारण सर्वसाधारणपणे सह्याद्रीतील कोरीव स्तूपांची वर्तुळाकार जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटकार अण्ड, त्यावर चौकोनी हर्मिका आणि हर्मिकेवर लाकडी छत्र अशी रचना आहे. का हर्मिकेच्या वरील सपाट पृष्ठभागावरच लहानसा खड्डा करून त्यावर छत्र ठेवले जात असे?

बाकी अवांतर फारच झालेय पण विषयच असा उत्साहवर्धक आहे की लिहिण्याशिवाय राहवले पण नाही.

अस्थी मंजुषा

स्तूपावर पेटीसारखा दिसणारा एक ठोकळा बांधला जात असे. त्याला Relic Box म्हटले जाते. भटक्या म्हणतात तसे त्याला हर्मिका म्हणूनही संबोधले आहे

सुधारणा

ह्युएन त्सांग ने उंटांच्या पाठीवर लादून कितीतरी ग्रंथसंपदा आपल्याबरोबर नेली.
हे वाक्य असे सुधारता येईल :- शुएन त्झांग ने कितीतरी ग्रंथांच्या नकला करवून नकललेली ती सर्व ग्रंथसंपदा उंटांच्या पाठीवर लादून आपल्याबरोबर नेली.
मुळात नकला करण्यासाठी कितीतरी ग्रंथ उपलब्ध होते. (एकाच ग्रंथाच्या अनेक नकला करविल्या गेल्या असणे शक्य आहे व त्यामुळे 'उंटांच्या पाठीवर विपुलतेने लादलेले जितके नकलीकृत ग्रंथ, तितकेच विपुल मूळ ग्रंथ' हे अनुमान थोडेफार चुकेलही. पण यावरून ग्रंथ विपुल नव्हते असे सूचित होत नाही.) ऋषिकेश यांच्या प्रतिसादात ग्रंथांच्या विपुल प्रमाणात उपलब्धतेविषयी शंका उपस्थित केली गेली होती, त्यास अनुलक्षून हे वाक्य होते.
सगळ्याच विहारांत स्तूप असत असे नाही. तरीही, स्तुपाशिवायही प्रार्थनाघर म्हणून विहाराचा वापर होऊ शकतो हे खरे.

आभार!

मला ही माहिती नव्हती. आभार!
वाचनालयांना दोन्ही बाजुने प्रकाश येणे अपेक्षित नाही काय? असा प्रश्न पडू शकतो पण ही शक्यताही ग्राह्य धरत आहे.

अवांतराबद्दल क्षमस्व

अति अति अवांतर

प्रस्तरात खोदलेल्या बहुतेक सर्व गुंफा ह्या अंधार्‍या आहेत. एकाला एक लागून अशा जर ओवर्‍या असतील तर त्यांची बहुधा समोरची बाजूच प्रकाश आत येण्यास मोकळी असते. मागील बाजू ही सहसा ज्यात गुफा खोदल्या आहेत त्या पाषाणाचीच असते त्यामुळे तिथून प्रकाशास वाव नसतो. गुफांसाठी डोंगर निवडताना जास्तीत जास्त काळ प्रकाशाभिमुख राहाता येण्याजोगा कोन योजता येईल अशीच निवड दिसते. अर्थात ही अनेक बाबींपैकी एक बाब झाली. बाकी प्रस्तराचे काठिण्य, व्यापारमार्गापासून जवळ तरीही निवांत असणे या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्याच. कान्हेरीचा डोंगर हा समुद्रकिनार्‍यापासून अवघा आठनऊ कि.मी. आहे. सध्या जी दहिसर नदी गटारसदृश दिसते तिला आताआतापर्यंत खूप पाणी बारमाही असे. गोराई खाडीतून जवळजवळ अडीजतीन कि.मी. पर्यंत होडीने आत येता येई. मध्ये सर्व सुपीक सपाट प्रदेश आहे (होता). पश्चिमेला मंडपेश्वर गुंफाही अशाच आठ कि.मी आहेत. पूर्वेच्या बाजूने ठाणेही जवळ आहे. उत्तर आणि पश्चिम हिंदुस्तानातून उत्तर कोंकणातील अत्यंत महत्त्वाच्या अश्या कल्याण,चौल,सोपारा बंदरात येण्यासाठी सुरत भडोचपर्यंत खुष्कीच्या मार्गाने व तेथून पुढे जलमार्गाने येण्याची वहिवाट होती. वसई ते भिवंडी ही जलवहातूक तर १९३०-४० सालापर्यंत चालत असे. रेल मार्ग झाल्यानंतर सगळेच बदलले.
अंधाराविषयी सांगायचे तर आपल्याकडे प्रकाशाला मुक्त वाव असलेली घरे बांधायची पद्धत नव्हती. धनवान वर्गामध्ये मध्ये छोटे चौक ठेवून त्या भोवती खोल्या बांधत. भरपूर खिडक्या, दरवाजे वगैरे नसत. एकंदरीत जिणे अंधकारमयच होते. मध्ययुगात तर गवाक्षांतून घरातल्या मुलीबाळींचे बाहेरच्यांना दर्शन होणे म्हणजे महापापच. जयपूर-उदेपूरच्या जुन्या राजवाड्यांमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. राजकन्यकांच्या मुक्त विहारासाठी बांधलेल्या 'सहेलियोंकी बाडी'लाही चारही बाजूंनी उंच उंच भिंती आहेत.
मुंबईच्या इतिहासाविषयीच्या अतीव जिव्हाळ्यातून हे अतिअवांतर झाले. क्षमस्व.

अजूनही काहि प्रमाणात शक्य

गोराई खाडीतून जवळजवळ अडीजतीन कि.मी. पर्यंत होडीने आत येता येई.

या उल्लेखाने नॉस्टॅल्जिक झाल्याने न राहवून र्पतिसाद देत आहे.. पुन्हा एकदा अवांतराबद्दल क्षमस्व!
अजूनही दहिसर स्मशानभुमीपर्यंत, जवळजवळ ऑक्टोबर ते मार्चपर्यंत, होडक्यातून प्रवास करता येतो (इतके पाणी असते) असे समजते. माझ्या लहानपणी जवळजवळ अजून अर्धा किलोमीटर (दहिसरच्या बांधापर्यंत जो नंतर तोडण्यात आला) जाता येत असे. काही मच्छीमार मित्रांबरोबर बर्‍याच लहानपणी (साधारण १९८७-८८ असेल, कारण तेव्हा तेव्हा एस्सेलवर्ल्डचे बांधकाम चालु झाले होते.) होडक्यातून गोराईपर्यंत जाऊन पुढे चालत/सायकलवरून उत्तनपर्यंत गेल्याचे आठवते. तिवराच्या जंगलातून नदी वाट काढत जाते व एकूणच प्रवास थरारक आहे हे ही आठवते

 
^ वर