एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 4

(मागील भागावरून पुढे)

नहापनाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर मी नाशिक मधील या त्रिरश्मी पर्वतावरील सर्वात महत्त्वाची गुंफा म्हणून समजल्या जाणार्‍या 3 क्रमांकाच्या गुंफेकडे निघालो आहे. ही गुंफा, गौतमीपुत्र सातकर्णी राजाची गुंफा या नावानेही ओळखली जाते. संपूर्ण सातवाहन राजघराण्यातील राजांमध्ये, गौतमीपुत्र हा राजा, सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जातो. याच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत सातवाहन साम्राज्य उत्कर्षाच्या टोकाला जाऊन पोचले होते असे म्हणता येते. शक (Scythian) क्षत्रप नहापन याने आधीच्या काळात सातवाहनांकडून जिंकून घेतलेला सर्व प्रदेश गौतमीपुत्राने परत जिंकून तर घेतलाच परंतु याशिवाय त्याने आपले साम्राज्य उत्तरेला असलेल्या माळवा प्रांताच्या पलीकडेही वाढवले होते. महाराष्ट्रात गौतमीपुत्र हा राजा शालिवाहन या नावाने ओळखला जातो व महाराष्ट्रावर राज्य करणारा प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानला जातो. कोणा एका शक (Scythian) राजाच्या नावाने इ.स.78 मध्ये चालू झालेल्या सनाला, इ.स. 1300 च्या आसपास, शालिवाहन शके असे नाव कोणीतरी व कोणत्यातरी कारणासाठी दिले गेले व आजतागायत हा सन याच नावाने आपल्याला परिचित आहे. मात्र या सनाशी गौतमीपुत्र किंवा शालिवाहन राजाचा संबंध नाही असे इतिहासकार डॉ. ए.एस.आळतेकर म्हणतात व ते योग्य वाटते.

गौतमीपुत्र इ.स.86 मध्ये सिंहासनावर आरूढ झाला. त्या वेळेस त्याचे राज्य अपकर्षाच्या न्यूनतम पातळीवर पोचले होते. क्षत्रप नहापनने सातवाहन साम्राज्याचे अनेक प्रांत जिंकून तेथे आपले स्थान मजबूत केलेले होते. पूर्वेकडून कुषाण राजा कनिष्क सातवाहन साम्राज्याचे लचके तोडण्याच्या प्रयत्नात होता. इ.स. 101 किंवा त्याच्या कारकिर्दीच्या काळात गौतमीपुत्राने आधी गमावलेले आपल्या राज्याचे सर्व प्रांत तर परत मिळवलेच पण त्या शिवाय नहापनाच्या मालकीच्या प्रांतात मोहिमा काढून त्याने काठेवाड व कुकुरा ( आग्नेय राजस्थान) हे प्रांतही जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीतच सातवाहन साम्राज्याची कीर्ती संपूर्ण भारतवर्षात प्रथम पसरली.

या प्राचीन काळातील ऐतिहासिक बारकाव्यांवरून हे स्पष्ट होते की त्रिरश्मी पर्वतावरील गुंफा क्रमांक 3 ही साधारण, कार्ले येथील लेण्यामधील मुख्य चैत्यगृह खोदले गेले, त्याच सुमारास खोदली गेली असली पाहिजे. या दोन्ही गुंफामधील मुलभूत स्थापत्यामध्ये बरेच साम्य असल्यासारखे मला वाटते आहे. या गुंफेचा व्हरांडा व समोरचे प्रांगण हा समोरील भाग मात्र अतिशय उठावदार व बराचसा मी आधी वर्णन केलेल्या नहापनाच्या गुंफेसारखाच आहे. ही गुंफा, हॉल, त्याच्या तिन्ही बाजूस असलेल्या भिख्खूंच्या 18 कोठड्या व समोरील व्हरांडा अशा 3 भागात आहे. हॉल 45 फूट खोल, 41 फूट रूंद व साडेदहा फूट ऊंच आहे. या हॉलच्या मागील भिंतीच्या मागे 6 कोठड्या खोदलेल्या आहेत तर उजव्या भिंतीत 7 व डाव्या भिंतीत 6 कोठड्या खोदलेल्या आहेत. मागील भिंतीत असलेल्या तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकांच्या कोठड्यांच्या दारांमध्ये असलेल्या भिंतीवर एक स्तूपाचे बास रिलिफ कोरलेले आहे. आतापर्यंत मी बघितलेल्या इतर सर्व गुंफांच्या मानाने ही गुंफा कोरीवकाम करून बरीच सजवलेली दिसते आहे. या कोरीवकामामुळे सुद्धा, ही गुंफा आधी बघितलेल्या गुंफांच्या मानाने नंतरच्या कालातील असल्याची खात्री पटू शकते.

हॉलच्या मागील भिंतीवर कोरलेला स्तूप हा 10 क्रमांकाच्या गुंफेतील हॉलच्या मागील भिंतीवर असलेल्या परंतु नंतर बर्‍याच अंशी नष्ट केला गेलेल्या स्तूपाप्रमाणेच दिसतो आहे. या स्तूपाच्या डोक्यावर दुहेरी छत्री कोरलेली आहे तर बाजूच्या दोन छत्र्या कमल पुष्पांच्या देठाच्या आधारावर उभ्या आहेत. या बाजूंच्या छत्र्यांच्या जरा खाली 2 गंधर्व आकाशात विहार करताना दाखवलेले आहेत.

उजव्या बाजूचा गंधर्व दोन्ही हातात पुष्पमाला घेतलेला दाखवला आहे तर डाव्या बाजूचा गंधर्व डाव्या हातात फुलांची परडी घेऊन उजव्या हाताने स्तूपावर पुष्पवृष्टी करताना दर्शवलेला आहे. उजव्या बाजूच्या गंधर्वाने सातवाहन कालातील सर्वसामान्य केशरचनेप्रमाणे कपाळाच्या जरा वर असा केसाचा बुचडा बांधलेला आहे तर डाव्या बाजूच्या गंधर्वाच्या डोक्यावर, ग्रीक शिल्पात दिसतात तसे कुरळे केस दाखवलेले आहेत. दोन्ही गंधवांच्या कानात लांब कर्णभूषणे व मनगटावर कडी आहेत. उजव्या बाजूच्या गंधर्वाच्या खाली एक सिंहमूर्ती कोरलेली असून डाव्या गंधर्वाच्या खाली धर्मचक्र कोरलेले आहे. सिंह मूर्तीच्या खाली सुदृढ अंगकाठीची एक स्त्री आपले डावे पाऊल उजवीकडे व उजवे डावीकडे अशा मोठ्या विचित्र पोझमध्ये उभी असून स्तूपाला नमस्कार करताना कोरलेली आहे. तिच्या घोट्याजवळ पायात 2 कडी आहेत व कानात लांब कर्णभूषणे आहेत. कंबरेला तिने समोर गाठ मारलेला शेला बांधलेला आहे. या शिवाय तिच्या अंगावर काय वस्त्रे किंवा आभूषणे असल्याचे दाखवले आहे हे नीटसे कळू शकत नाहीये. धर्मचक्राच्या खाली उजव्या हातातील चवरी, स्तूपावर ढाळणारी एक स्त्री शिल्पात कोरलेली आहे. या स्त्रीने आपला हात गुढघ्याच्या थोड्या वर आपल्या मांडीवर ठेवलेला दिसतो आहे. आतल्या हॉलमध्ये या शिवाय दुसरे काहीच बघण्यासारखे नसल्याने मी बाहेरच्या व्हरांड्यात येतो.

व्हरांड्याच्या आतील भिंतीच्या मध्यभागात हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे द्वार अंदाजे 6 फूट रूंद आणि 10 फूट ऊंच आहे. या द्वाराच्या दोन्ही बाजूस आणखी दोन, 4 फूट रूंद व 8 फूट ऊंच असलेली प्रवेशद्वारे आहेत. मधले द्वार व बाजूची द्वारे या मध्ये 6 फूट रूंद व 3 फूट ऊंच असलेली 2 गवाक्षे आहेत. व्हरांड्याची पुढील बाजू म्हणजे बसता येईल असा एक दगडी ओटा असून त्या मधूनच 6 स्तंभ व कडांना असलेले 2 पिलॅस्टर वर काढलेले आहेत. हे सर्व स्तंभ अष्टकोनी असून वरच्या बाजूस उलटा ठेवलेल्या घटाचा आकार दिलेला आहे. या उलट्या ठेवलेल्या घटाच्या वरच्या बाजूस, क्रमांक 10च्या गुंफेप्रमाणेच प्रत्येक बाजूला एक आयताकृती गवाक्ष असलेली एक चौरस आकाराची पेटी ठेवलेली आहे. या पेटीच्या बाजूंना बौद्ध रेलिंगचे कोरीव काम आहे. या पेटीच्या आत एखाद्या कंगणासारखी दिसणारी एक गोल बांगडी कोरलेली आहे. या कंगणाच्या परिघावर खाचा-खाचांचे डिझाइन आहे. मधल्या 4 स्तंभांवर असलेल्या या चौकोनी पेट्यांच्या चारी कोपर्‍यांवर पक्षी प्राणी व मुले यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. यापैकी काही वाघाचा चेहरा, सशाचे कान व पंख असलेल्या कल्पनेतील प्राण्याच्या आहेत तर काही वाघाचा चेहरा व हरणाची शिंगे असलेल्या आहेत. या प्राण्यांच्यावर स्वार आरूढ झालेले दाखवलेले आहेत. मधल्या दोन स्तंभावर असलेल्या आकृत्या मानवी असून बाजूच्या स्तंभावर हे कल्पनेतले प्राणी आहेत. या चौकोनी पेट्यांच्या वरच्या बाजूस एक उलटा ठेवलेला पायर्‍या पायर्‍यांचा चौकोनी पिरॅमिड कोरलेला असून या पिरॅमिडचा वरचा भाग व छत या मधील जागेत एकमेकाकडे पाठ करून बसलेल्या प्राण्यांच्या 2 जोड्या कोरलेल्या आहेत. यापैकी एक जोडी व्हरांड्याच्या बाजूने तर एक बाहेरील प्रांगणातून दिसू शकते. या प्राण्यांच्यात मला स्वार आरूढ झालेले हत्ती, बोकड व ग्रीक पुराणांतील सिंहाच्या शरीरावर चोच असलेल्या पक्षाचे तोंड असलेला ग्रिफिन हा प्राणी ओळखता येतो आहे. या प्राण्यांवर आरूढ झालेल्या स्वारांत स्त्री पुरुष असे दोन्ही आहेत.

या गुंफेमधील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूंना, सांची येथील प्रसिद्ध तोरणासारखे दिसणारे संपूर्ण तोरण कोरलेले दिसते आहे. या तोरणावर प्रत्येकी 1 फूट चौरस आकाराची 19 पॅनेल्स कोरलेली आहेत. यापैकी 7 पॅनेल्स द्वाराच्या वरच्या बाजूस असून प्रत्येकी 6 पॅनेल्स द्वाराच्या बाजूंना आहेत. वरच्या 7 पॅनेल्समध्ये स्तूप, ज्याच्या खाली शाक्यमुनी गौतम सिद्धार्थ यांना दैवी ज्ञान प्राप्त झाले तो बोधि वृक्ष, धर्मचक्र, आणि काही उपासक कोरलेले आहेत. द्वाराच्या बाजूला असलेल्या पॅनेल्सवर, पतीशी प्रामाणिक व अप्रामाणिक असणार्‍या दोन स्त्रियांच्या कहाण्या कोरलेल्या आहेत. या पैकी एक पत्नी अनेक प्रलोभने असताना सुद्धा पतीशी प्रामाणिक राहते वा त्यामुळे तिला शेवटी पतीचा आधार मिळतो अशी गोष्ट आहे तर अप्रामाणिक पत्नी, तिचा पती प्रेमळ असूनही दुसर्‍या पुरुषाचा हात धरून पळून जाते व त्यामुळे तिला पती जबरदस्तीने ओढत परत घरी आणतो अशी कथा आहे. अतिशय कडक नियम व ब्रम्हचर्य पाळणार्‍या भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या या विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रामाणिक, अप्रामाणिक भार्यांची पॅनेल्स कोरण्याचे काय प्रयोजन असावे हे खरे तर मला कळत नाहीये. कदाचित जातककथांप्रमाणे या कथांतून काहीतरी बोध या भिख्खूंना दिला जात असावा. प्रवेशद्वाराभोवती असलेल्या या पॅनेल्सच्या बाजूंना 6 फूट उंचीचे दोन यक्ष द्वारपाल कोरलेले आहेत. दोघेही धोतर नेसलेले असून त्यावर शेला पुढच्या बाजूस गाठ मारून बांधलेला आहे. व या शेल्याची दोन्ही टोके पुढे लोंबत आहेत. डाव्या बाजूच्या यक्षाच्या हातात 2 ब्रेसलेट आहेत. दोन्ही यक्षांची केशरचना सातवाहनकालीय म्हनजे पुढे बुचडा बांधलेली अशी आहे. उजव्या बाजूच्या यक्षाच्या मनगटावर एकच ब्रेसलेट व दंडावर पोची आणि कानात लांब कर्णभूषणे आहेत. दोन्ही यक्षांच्या उजव्या हातात देठासह असलेले कमलपुष्प आहे. व्हरांड्याच्या जोत्यापर्यंत येणार्‍या पुढच्या भिंतीवर, मध्यभागी असलेल्या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना, प्रत्येकी तीन अशा एकूण 6 यक्ष मूर्ती कोरलेल्या आहेत. पृथ्वी व स्वर्ग या मध्ये असणारे हे यक्ष या विहाराला आधार देत आहेत.

व्हरांड्याच्या मागील व बाजूच्या भिंतींवर अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रसिद्ध शिलालेख कोरलेले आहेत. असे म्हणता येते की गौतमीपुत्र राजा व त्याच्यावेळचे सातवाहन साम्राज्य यांची जी काय माहिती आपल्याला आहे त्यापैकी बहुतांशी माहिती याच शिलालेखामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे.

क्रमशः
18 नोव्हेंबर 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

उत्तम

बारकावे टिपत केले वर्णन खूपच सुरेख होत आहे.

मात्र या सनाशी गौतमीपुत्र किंवा शालिवाहन राजाचा संबंध नाही असे इतिहासकार डॉ. ए.एस.आळतेकर म्हणतात व ते योग्य वाटते.

शक संवत् हे कनिष्काने सुरु केले आणि पुढे शक क्षत्रपांनी ते प्रचलित केले असे मिराशी म्हणतात. गौतमीपुत्राने तो सुरु केला नाही हे निश्चित कारण नहपानाचा पराभव इ.स. १२५ च्या सुमारास झाला.
गौतमीपुत्राच्या उदयाच्या वेळी कुषाण सम्राट कनिष्काच्या मृत्युनंतर कुषाण साम्राज्य कमजोर झाले होते व शकांचे वर्चस्व वाढले होते. नहपान हा क्षत्रप पदावरून महाक्षत्रप झाला होता व जवळपास स्वतंत्रपणेच राज्य करत होता.

अतिशय कडक नियम व ब्रम्हचर्य पाळणार्‍या भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या या विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रामाणिक, अप्रामाणिक भार्यांची पॅनेल्स कोरण्याचे काय प्रयोजन असावे हे खरे तर मला कळत नाहीये.

ही पॅनल्स गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्याचा मुलगा वाशिष्ठीपुत्र पुळुवामी यांच्या राज्यसत्तेचे, पराक्रमाचे प्रतिक मानले जाते.
डावीकडच्या खालच्या शिल्पचौकटीमधे एक तरूण एका तरूणीबरोबर अनुनय करताना दाखवला आहे हे म्हणजे गौतमीप्पुत्राचा पिता शिवस्वाती आणि सातवाहन राज्यलक्ष्मी एकत्र नांदतांनाचे प्रतिक आहे. तर त्यावरच्या पटांमध्ये एक तरूण त्या तरूणीला जबरदस्तीने हरण करून नेतांना दाखवला आहे. हे म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहनांच्या राज्यावर ताबा मिळवला याचे प्रतिक तर त्यापुढील पटांमध्ये त्या तरूणीला एक तरूण दुसर्‍या तरूणाकडून खेचून घेतांना दाखवला आहे. हे म्हणजे नहपानाने बळकावलेले सातवाहनांचे राज्य गौतमीपुत्राने कसे परत मिळवले याची कहाणी. नंतरच्या पटांमध्ये त्या तरूणीचे म्हणजेच सातवाहनांच्या राज्यलक्ष्मीचे पालन गौतमीपुत्र आणि त्याच्या पुत्र पुळुवामीने निष्ठापूर्वक कसे केले हे दाखवले आहे.

पॅनेल्स

भटक्या यांचे माहितीबद्दल आभार

उत्तम माहिती

लेखमालेतून नेहमीच वाचायला आणि पाहायलाही चांगली माहिती मिळते. चर्चेतूनही विशेषतः भटक्या यांच्या प्रतिसादातून त्यात भर पडली आहे. शक संवताबद्दल गेल्या लेखात शंका उपस्थित केली होती त्याचे व्यवस्थित उत्तर मिळाले आहे. अधिक वाचायचीही उत्सुकता आहे.

प्रमोद

प्रतिसाद संपादित

प्रतिसाद संपादित केला आहे याची नोंद घ्यावी. लेख आणि चर्चेत बाधा येतील असे प्रतिसाद या पुढे अप्रकाशित केले जातील. - संपादन मंडळ.

आवडला.

भाग आत्ता वाचला आवडला.

 
^ वर