आकाश टॅब्लेट पीसीची 'सुरस' कहाणी !

शासनाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, अहवाल व रोज करत असलेल्या आश्वासनांची खैरात यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्यास आपला देश अमेरिकेसकट सर्व विकसित राष्ट्रांना मागे टाकून क्रमांक एकवर केव्हाच पोचला असता. त्यासाठी एपीजे कलाम व भविष्यवेध घेणाऱ्या इतर टेक्नोक्रॅट्स यांनी निर्दिष्ट केलेल्या 2020सालाची वाट पहायची गरज पडली नसती. मुळात टेक्नोक्रॅट्सचा भर आपण विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानावर आहे. तोंडपाटीलकी करून तंत्रज्ञान विकसित होत नसतात. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून भरपूर गाजावाजा केलेल्या आकाश टॅब्लेट पीसीचा उल्लेख करता येईल.

आक्टोबर 2011 मध्ये आपल्या देशाचे मानव विकास संसाधन व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही खात्याचे मंत्रीपद भूषविणारे कपिल सिब्बल यांनी दिल्ली येथील विज्ञान भवनात समारंभाचे आयोजन करून आकाश टॅब्लेट पीसीचे काही विद्यार्थ्यांना वितरित केले. आपल्या राजकीय नेत्यांना ऊठसूट, समारंभ, पत्रकार परिषद भरवून पत्रकारांसमोर सणसणी घोषणा करण्याची वाईट सवय जडलेली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पेपरात मोठ्या मथळ्यात आपले नाव व टीव्हीच्या पडद्यावर आपला चेहरा झळकल्यानंतरच त्यांना खाल्लेले अन्न (व पैसा) पचत असावा. सिब्बल यांच्याकडे त्यादिवशी सांगण्यासारखे भरपूर काही होते हे मात्र खरे. उत्साह ओसंबडून वाहत होता. चेहरा प्रफुल्लित झाला होता. हातात एक टॅब्लेट पीसी नाचवत हा एक ऐतिहासिक क्षण असून हा मैलाचा दगड पुढील अनेक पिढ्यांच्या लक्षात राहील असे विधान त्यांनी केले. केंद्र सरकार शालेय व कॉलेज विद्यार्थ्यासांठी केवळ 1750 रुपयात (व इतरांसाठी 2900 रु)आकाश टॅब्लेट पीसी विकणार आहे व याची पूर्ण तयारी झाली आहे. असेही त्यांनी त्याच वेळी सांगितले.

जमलेल्यांकडून टाळ्या, हारतुऱ्यांचे सोपस्कार संपवून हसत चेहऱ्याने मंत्री महाशय बंद काचेच्या गाडीत बसून गेले. दुसऱ्या दिवशीच्या पेपरमधील बातम्यात आकाशचीच बातमी प्रकर्षाने झळकली. आपल्या देशातील 20000 कॉलेजमधून सुमारे 30 लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी फार फार तर 10 टक्के विद्यार्थ्यांकडे संगणक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे फार पैसै असलेल्या विद्यार्थ्याला आपल्याजवळही स्वस्तात मिळणारा पीसी असावा असे वाटणे साहजिकच आहे. मंत्र्यानी तोंड भरून आश्वासन दिलेल्या या आकाश टॅब्लेट पीसीचे पुढे काय झाले, किती मुलापर्यंत त्या पोचल्या, बाजारात त्याची काय स्थिती आहे, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शोधपत्रकारितेत वेळ देणाऱ्यांनी हे प्रश्न विचारण्याची तसदी घेतलेली नाही. कारण असल्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने Non -Issue या सदरात मोडत असावेत. परंतु मुद्रित पाठ्यपुस्तकांची हकालपट्टी करून संबंधित विषयावरील जगभरातील नावाजलेल्या शिक्षणसंस्थेकडून मिळत असलेली अद्यावत माहिती व त्याचे विश्लेषण एका क्लिकनिशी स्क्रीनवर येऊ शकते असे मधाचे बोट दाखवून गायब झालेल्या या आकाश टॅब्लेट पीसी संबंधीच्या माहितीचा शोध घेतल्यास ती एक 'सुरस' व 'चमत्कारिक' कहाणी आहे हे लक्षात येईल.

2006मध्ये निकोलस नेग्रोपांटी या एमआयटी मिडिया लॅबच्या संस्थापकाने प्रत्येक मुलाच्या हातात एक लॅपटॉप अशा एका महात्वाकांक्षी योजनेची घोषणा केली व त्यासंबंधी बोलणी करण्यासाठी भारत सरकारशी त्यानी संपर्क साधला. (One Laptop Per Child:OLPC) त्याच्या अंदाजाप्रमाणे भारतात त्याची किंमत 100 डॉलर्स (सुमारे 5000 रु) एवढी होती. सरकारला शक्य असल्यास सबसिडी देवून त्याची किंमत कमी करणे शक्य आहे, असेही त्यानी सुचविले. मानव विकास संसाधन या खात्याशी या गोष्टी संबंधित असल्यामुळे त्या वेळचे मंत्री महोदय, अर्जुन सिंग व इतर अधिकार्‍यांनी त्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. मंत्री महोदयाला या प्रस्तावात काही दम नाही असे वाटल्यामुळे त्यानी काही भाष्य केले नाही. परंतु तेथील एक वरिष्ठ अधिकारी, एन के सिन्हा यांना मात्र या प्रस्तावात काही तथ्य आहे असे वाटल्यामुळे त्यांनी अमेरिका जर 100 डॉलर्समध्ये हे उत्पादन देत असेल तर आपण तेच 10 डॉलर्समध्ये देवू शकतो अशी शेखी मिरवली. मंत्री महोदयानी होकार दिला. व मंत्रालयातील कागदी घोडे नाचू लागले. सिन्हांचे शब्द खोटे ठरू नयेत म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करून पाच वर्षानंतर सिब्बल यांच्या हातात आकाश टॅब्लेट पीसी पडला. 10 डॉलर्सला नसला तरी 35 डॉलर्स ही किंमत ठरली. (व पुढे मागे कधीतरी ही किंमत खाली येऊन 10 डॉलर्स होईलही!) सिब्बल यांनी 1 कोटी टॅब्लेट पीसींचे उत्पादन केले जाईल अशी घोषणाही केली. किंमत कमी असली तरी हा टॅब्लेट पीसी बाजारात उपलब्ध असलेल्या कुठल्याही पीसीशी स्पर्धा करू शकेल, हा आत्मविश्वास त्यांच्या विधानात होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, टच स्क्रीन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, जमल्यास स्मार्ट फोन सुविधा, 3 तासाचा बॅटरी बॅकअप इत्यादी किमान अत्याधुनिक सोई-सुविधा त्यात असतील अशी अपेक्षा होती.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये शेकडोंनी भारतीय संगणक तज्ञ काम करत असून त्यांच्याशिवाय अमेरिकेतील संगणक उद्योग येवढ्या ऊर्जितावस्थेत कधीच पोचला नसता, हे मान्य करावे लागेल. परंतु भारतीय संगणक तज्ञांचे प्रभुत्व प्रामुख्याने software क्षेत्रात असून hardware क्षेत्रातील अनुभव नगण्य आहे, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच कपिल सिब्बल यांना अत्याधुनिक टॅब्लेट पीसी अत्यंत स्वस्तात विकसित करून देणे हे आव्हान आपण स्वीकारल्यास (व त्यात यशस्वी झाल्यास) जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे (व कपिल सिब्बल यांचे) नाव सुवर्णाक्षरात कोरले जाईल असे वाटले असण्याची शक्यता आहे. ही एक महात्वाकांक्षी योजना होती व आपण स्वतंत्ररित्या हार्डवेर क्षेत्रातही यशस्वी होऊ शकतो या फाजिल आत्मविश्वासाने हा प्रकल्प रेटला गेला. यात फक्त सिब्बल या राजकीय नेत्यांचेच नव्हे तर भारताच्या इभ्रतीचा प्रश्न होता. परंतु हा आकाश आहे तरी कुठे? त्याचे पुढे काय झाले व काय होणार? हे प्रश्न आज आपल्या समोर आहेत. वास्तव हे आहे की या क्षणी ही आकाश टॅब्लेट पीसी बाजारात (कुठल्याही किमतीत!) उपलब्ध नाही.

मूरच्या नियमाप्रमाणे प्रती 18 महिन्याला संगणकांची क्षमता दुपटीने वाढल्या व त्याच्या किमती अर्ध्याने कमी होत गेल्या. 1957 मध्ये IBM 610 या पहिल्या डेस्क टॉप पीसीची किंमत 55000 डॉलर्स होती.(म्हणजे आताचे 450000 डॉलर्स) परंतु संगणकाच्या किंमतीत घसरण होत होत आज त्यांची किंमत 300 डॉलर्सच्या जवळ पास आहे. तरीसुद्धा बहुतेक विकसनशील व अविकसित देशांना ही किंमत अजूनही जास्त वाटते.

आपण भारतीय स्वस्त व कामचलावू वस्तूंच्याबद्दल नेहमीच विचार करत असतो. नेलकटरपासून स्पेसक्राफ्टपर्यंत कुठलिही वस्तू असू दे, त्याचे क्लोन केलेले उत्पादन जागतिक बाजारपेठेतील किमतीपेक्षा अगदी स्वस्तात आपल्या देशात कुठे ना कुठे तरी नक्कीच मिळणार याची खात्री असते. (फक्त त्याच्या गुणवत्तेबद्दल न विचारलेले बरे!) त्यामुळेच लुधियाना, उल्हासनगर, दिल्ली इत्यादी शहरातील तथाकथित उद्योजकांची चलती आहे. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनापेक्षा असेंबल्ड गॅजेट्स घेण्याकडे आपला कल जास्त असतो. कचऱ्यातून निर्मिती करण्यात आपला हातखंडा आहे. म्हणूनच आकाश टॅब्लेट पीसीचे विकसन करण्यात काही अडचण येणार नाही असेच सर्व संबंधितांना वाटले असेल.

2006च्या नेग्रोपांटीच्या भेटीतील 100 डॉलर्समध्ये विद्यार्थ्याच्या हातात अत्याधुनिक पीसी या प्रस्तावाबद्दल अर्जुन सिंग यांना विशेष काहीही वाटले नसावे. परंतु या मंत्र्याला सल्ला देणाऱ्या वरिष्ठ आयएस् अधिकाऱ्यांना मात्र स्वत:चे करीयर उजळण्याची संधी दिसली असेल. त्यामुळे ते कामाला लागले. या प्रकल्पाची आकाश ऐवजी साक्षात या नामकरणाने सुरुवात केली होती. कदाचित प्रत्यक्ष परमेश्वराचे साक्षात दर्शन टॅब्लेटवर होत राहील असे त्यांना वाटले असावे.

2009 सालापर्यंत फक्त कागदी घोडे नाचवण्यातच वेळ गेला. त्यानतर सिन्हा यांनी या प्रकल्पाचे सर्व सूत्रं नुकत्याच सुरु झालेल्या आयआयटी, राजस्थानचे संचालक, डॉ. प्रेमकुमार कालरा यांच्याकडे सोपविले. मुळातच त्यांचा अनुभव अध्यापनक्षेत्राशीच जास्त निगडित होते. कालरा यांचा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील अनुभव शून्य होता.

देशभरातील आयआयटीचे नावलौकिक चांगले असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना परदेशात मागणी असते. व सामान्यपणे येथे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले अभियंते आपल्या देशात न राहता अमेरिका, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथे स्थलांतरित होतात. (व आपल्या देशाला तेथून मदत करतात) आयआयटी, राजस्थानला हे सर्व बदलायचे होते. योग्य संधी मिळत असल्यास (व त्यास आर्थिक प्राप्तीची जोड असल्यास) हेच अभियंते याच देशात राहून काही भव्य दिव्य करून दाखवू शकतील, याच उद्देशाने कालरा यांनी हा प्रकल्प हाती घेतला असावा. उत्पादन प्रणाली विकसित करून 10 डॉलर्समध्ये अत्याधुनिक लॅपटॉप देणे वाटते तितके सोपे नाही. नुकतेच शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याकंडून अशा प्रकारचे महात्वाकांक्षी प्रकल्प तडीस नेण्यासाठी त्याच ताकदीचे नेतृत्वगुण असलेल्या प्रकल्प मुख्यस्थांची गरज असते. येथे त्याचीच उणीव होती.

डॉ. प्रेमकुमार कालरा यांना या प्रकल्पासंबंधी प्रश्न विचारल्यावर काय झाले यापेक्षा यापुढे काय करणार याविषयीच जास्त बोलत होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठाबरोबर RGALM (Realizing Engineers' Aspiration for the Last Man, Woman and Child) प्रकल्पात सहभागी होण्यासाठी केलेला करार याबद्दलच ते माहिती सांगत होते. हे सगळे करणारा मी कोण? कर्ता करविता तो आहे . ही निरिच्छा त्यांच्या बोलण्या-वागण्यात दिसत होती.

परंतु हाच कर्ता करविता परमेश्वर दोन वर्षापूर्वी आकाश टॅब्लेट पीसी प्रकल्पाच्या मदतीला धावून आला नाही. आकाशसाठी ग्लोबल टेंडर्स भरत असताना परमेश्वराने सावधान राहाण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या नाहीत. आकाश टॅब्लेट पीसीच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी सगळ्यात स्वस्त टेंडर कॅनडास्थित सुनीत व राजा तुली बंधूंच्या डाटाविंड या कंपनीचा होता. 22.7 कोटी रुपयात एक लाख टॅब्लेट पीसींचे (प्रती टॅब्लेट - 2370 रु) उत्पादन या कंपनीच्या ब्रिटनमधील युनिट तयार करणार होती. आकर्षक वेष्टनातील पहिले 500 टॅब्लेट पीसी हातात पडल्या पडल्या मंत्री महोदयांनी समारंभाचे आयोजन करून आपली या क्षेत्रातील प्रगतीविषयीची माहिती सर्व जगाला पुरवली.

त्या संपूर्ण महिनाभर टॅब्लेट पीसींची आयआयटी, राजस्थानच्या कॅम्पसमध्ये प्रत्यक्ष चाचणी होऊ लागली. टेंडरच्या तपशीलाप्रमाणे व मापदंडाप्रमाणे उत्पादन आहेत की नाही याची ती चाचणी होती. तेव्हाच आकाश हे एक अयशस्वी झालेले उत्पादन आहे हे जाणकारांच्या लक्षात येऊ लागले. 33 टक्के पीसी ऑन होत नव्हत्या. इतर काही ड्रॉप टेस्टमध्ये फेल झाल्या. काहींचे स्क्रीन बधिर होऊन काही दिसेनासे झाले. आत उघडून बघितल्यावर कांपोनेट्संची जुळणी व्यवस्थित नव्हती. काहीत अप्लिकेशन्स उघडत नव्हते. काहीत अप्लिकेशन्स उघडण्यासाठी नको तेवढा वेळ लागत होता. थोडक्यात सांगायचे तर अनेक टॅब्लेट्स चक्क टाकाऊ होत्या. चाचणी करणाऱ्या काही अननुभवी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मात्र हे एक अभूतपूर्व गॅजेट वाटत होते. किंमत कमी असल्यामुळे त्यांचे functions इतके slow असणारच. कालरा मात्र यासंबंधी एकही अक्षर बोलण्यास तयार नव्हते. कदाचित तोंड उघडल्यास हे तंज्ञज्ञान परदेशातील कुणी तरी चोरी करेल अशी भीती त्यांना वाटत असावी. परदेशी पत्रकारांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या मते लोकांना उत्पादन हवे, सणसणाटी बातम्या नकोत.

कालराच्या मागे डाटाविंड या कंपनीच्या वकीलांचा ससेमिरा लागला होता. त्यांनी आयआयटी, राजस्थानकडून नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला आहे. परंतु या उलट डाटाविंडकडून अडीच कोटी रुपये येणे बाकी आहे, असे संस्थेने दावा केला आहे. कालरा मात्र अशा कठिण परिस्थितीतच माणसाची कतृत्व शक्ती उजळून निघते असे दावा करत आहेत. नवीन काही करत असताना अशा प्रसंगाना तोंड द्यावेच लागते. युरोपची भरभराटी अशाच प्रकारच्या मंथनातून झाली. त्यासाठी कणखर नेतृत्व हवे.

हे सर्व प्रकरण अंगलट आल्यामुळे कपिल सिब्बल यानी कालरांची या प्रकल्पातून हकालपट्टी केली. सिब्बल यांच्या कार्यालयातील उमाशंकर या अधिकाऱ्याच्या मते आकाश प्रकल्प अजूनही जिवंत आहे. "फक्त काही हजार टॅब्लेट पीसी जागतिक बाजारपेठेतून विकत घेऊन विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत." या विधानात या अधिकाऱ्याला काहीही विसंगत वाटले नाही. "आकाश प्रकल्पाने आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. बाजारपेठेत आता उत्पादकांमध्ये कमीत कमी किंमतीत टॅब्लेट पीसी उत्पादन करण्याची स्पर्धा लागली आहे. व हेच आकाश प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. आता बाजारपेठ याचा ताबा घेईल."

कुठल्या बाजारपेठेच्या गोष्टी हे अधिकारी करत आहेत? दुसरीकडून विकतच घ्यायचे असल्यास हा प्रकल्प का राबविला? या प्रश्नांना उत्तर मिळत नाही. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळूरू येथील इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत फेरफटका मारल्यास भारतीय बनावटीचे लोकप्रिय असलेले एकही उत्पादन दिसणार नाही. सर्व काही चीन, कोरिया, जपान, अमेरिका... येथील माल. आकाश बाजारात नाही, फक्त पेपरवर किंवा इंटरनेटच्या पानावर...

कालरा यांच्या राजिनाम्याच्या नाट्यानंतर कपिल सिब्बल यांनी हे काम आयआयटी पवई येथील प्रो. दीपक फाटक यांना दिले. एका मीटिंगमध्ये फाटक यांना विचारण्यात आले की आपण हे करू शकता का व फाटक हो म्हणाले. प्रकल्प त्वरित हस्तांतरित करण्यात आला. प्रकल्प व्यवस्थापनाचा हा एक अजब नमूना म्हणून याकडे पाहता येईल.

64 वर्षाचे दीपक फाटक हे मुळात संगणक वैज्ञानिक आहेत. उत्पादन क्षेत्रातला काहीही अनुभव नाही. त्यांच्या नावे अनेक शोधनिबंध आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून भारत जगातील इतर राष्ट्रापेक्षा पुढे जाणार, हे स्वप्न ते बाळगून आहेत. "विद्यार्थ्यांना उत्तेजन दिल्यास व त्यांना काम करण्याची संधी दिल्यास त्यांच्या इतके उत्तम काम इतर कुणीही करू शकणार नाही. Fantastic Students!"

परंतु आकाश प्रकल्पावर काम केलेले 'फँटास्टिक स्टुडंट्स' फाटक यांना सहकार्य देण्यास तयार नाहीत. काय चुकले, कुठे चुकले, स्पेसिफिकेशन्स काय होते, त्यांची चाचणी कशी केली, इत्यादी गोष्टी नवीन प्रकल्प मुख्यस्थाला कळले नाहीत. फाटक यांचे कालरा यांच्याशी याविषयी बोलणी झाल्या नाहीत. जी काही कागदपत्रं फाटक यांना उपलब्ध करून देण्यात आली त्यावरून 'एकमेकावरील विश्वासाचा अभाव हेच प्रकल्प अयशस्वी होण्यास एकमेव कारण', हा निष्कर्ष फाटक यांनी काढला. केवळ अविश्वास? तंत्रज्ञान, उत्पादन प्रणाली, गुणवत्ता... या गोष्टींचे काय?

प्रकल्पाचा कारभार हाती घेतल्यानंतर फाटक यानी डाटाविंडची अनामत रक्कम देऊ नये असे बँकेला कळविले. मुळात कॉंट्रॅक्ट डॉक्युमेंट्समध्ये असे काही नमूद केले नव्हते म्हणून कंपनी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. फाटक यांच्या मते हा एक महात्वाकांक्षी प्रकल्प असून त्याच्या delivery date चा नीटसा अंदाज न आल्यामुळे हा घोळ झाला आहे. तंत्रज्ञानातील गुंतागुतीवर उपाय शोधण्यासाठी दिलेला वेळ फारच कमी होता.

वर्ष उलटून गेले तरी अजून आकाशचा पत्ता नाही. गेले वर्षभर विद्यार्थी या अत्याधुनिक टॅब्लेट पीसी ची वाट पहात आहेत. या मध्यंतरीच्या काळात डाटाविंड कंपनाने इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या मॉडेल्सची जाहिरात करत पैसे गोळा करू वागली. (व पैसे दिलेले हात चोळत बसलेले आहेत.)

आकाश प्रकल्प हे एक तंत्रज्ञानव्यवस्थापन कसे असू नये यासाठीचे एक चांगले उदाहरण होऊ शकेल. भारतीय तंत्रज्ञानातील व व्यवस्थापनातील उणिवावर नेमके बोट ठेवणारा हा प्रकल्प होता (आहे) असे म्हणता येईल. 'आकाशा'शी नाते जोडण्याऐवजी आता 'आकाश'च कोसळून पडत आहे की काय अशी आजची स्थिती आहे.

(संदर्भ: 1 , 2 3)

Comments

पुन्हा भाबडे पणा

आपण लोकांन्नी बुद्धी गहाण टाकली आहे का? भारतात कुठलाही मंत्री काहीही घोषणा करतो त्या मागे फक्त भ्रष्टाचार करायचा उद्देश ( Motive ) असतो. हे तुम्हा लोकांना अजुन कळत नाही का?

ही पहा तुमच्या अगदी जवळची उदाहरणे.

हा हा...

किती निराशावादी हो तुम्ही! ;)

टॅब्लेट

अमेझॉन किंडल फायर किंवा गूगल नेक्सस 7 हे बऱ्यापैकी स्पेक्स असलेले टॅब्लेट्स बनवण्यासाठी 119 ते 139 डॉलरपर्यंत सध्या खर्च येतोय ऍप्पलचे मार्केट काबीज करण्यासाठी दोन्ही कंपन्या हार्डवेअर कॉस्टवर तोटा सहन करून पूर्वी 220 डॉलरपर्यंत खर्च करून 200 डॉलरमध्ये या गोष्टी विकत होत्या (शिपिंग व इतर सपोर्ट खर्च स्वतः गूगल किंवा अमेझॉन करतात)

म्हणजे साधारण याच स्पेक्सचे टॅबलेट बनवले तर 35 डॉलरमध्ये थेट ग्राहकापर्यंत टॅब्लेट पोचवण्यासाठी प्रति टॅब्लेट सुमारे 100 डॉलरची सबसिडी आवश्यक आहे. सरकारकडे पैसे असतील तर टॅबलेटवर सबसिडी देण्यापेक्षा स्वयंपाकाच्या गॅसवर दिलेली बरी. शिवाय टॅबलेटचा शिकण्यासाठी काय वापर होईल हे कोडेच आहे.

टेक्नो-कमर्शियल फिझिबिलीटी

सिब्बल यांनी 1 कोटी टॅब्लेट पीसींचे उत्पादन केले जाईल अशी घोषणाही केली.

बापरे! कितीही जुगाड इंजिनीअरींग म्हणलं तरी १ कोटी पीसींच्या उत्पादनासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, नॉलेज बेस शुन्यातून तयार होण्यासाठी किमान १० ते १५ वर्षे लागतील हे दोन-चार वर्षे इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री मध्ये काम केलेला शेंबडा इंजिनीअरसुद्धा सांगेल!

मूळ संदर्भ

वरील लेखाच्या शेवटी एप्रिल रॅबकिन यांचा लेख मूळ संदर्भ म्हणून उल्लेख राहून गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. डॉ. अरविंद कोल्हटकर यांनी व्य.नि. द्वारे याची आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

दुरुस्ती
शेवटून दुसर्‍या परिच्छेदात कंपना असे चुकीचे टायपिंग झाले आहे. तेथे कंपनी म्हणून कृपया दुरुस्ती करून वाचावे. त्याचप्रमाणे नेग्रोपांटी ऐवजी नेग्रोपॉँटे असे वाचावे.

आकाश-परम

लेख आवडला. (संदर्भही)

अशीच काहिशी चित्तरकथा परम संगणकाची आहे. (असावी.) जेव्हा भारताला 'सुपर क्म्प्युटर' नाकारण्यात आला तेव्हा अशाच वल्गना करत भारतीय तंत्रज्ञांनी (सी डॅक) आम्ही तो लगेच तयार करू असे सांगितले होते. हा संगणक तयार झाला, काही ठिकाणी तो ठेवला ही. पण माझ्या माहितीनुसार तो कुचकामी ठरला.

आकाश टॅब्लेट (कॅपॅसिटीव टच नसलेला?) सारखे टॅब्लेट हल्ली रस्त्यावर उपलब्द्ध आहेत. त्यांची किंमत पाच हजारापेक्षा कमी आहे. (२५०० नसावी). साधारणतः ३५ टक्के विक्रि-नफा धरला तर त्याचे उत्पादन मूल्य ३००० आसपास जाईल.

कधी कधी वाटते की 'आधार' कार्डाचेही असेच काही होणार नाही ना?

प्रमोद

दोष महत्त्वाकांक्षेचा

आकाश नावाच्या या प्रकल्पाची आणि त्याही पूर्वी साक्षात या प्रकल्पाची सुरूवात केवळ महत्त्वाकांक्षेपायी झाली होती. कदाचित चीनप्रमाणेच आम्हीही स्वस्तातले टॅब्लेट बनवू शकतो, हे दाखविण्याची महत्त्वाकांक्षा असावी किंवा राजीव गांधी यांच्या स्वप्नातील तंत्रज्ञान-उन्मुख देश म्हणून भारताला पुढे आल्याचे दाखविण्याची महत्त्वाकांक्षा असावी.
या टॅब्लेटच्या घोषणेनंतर तीन महिन्यांतच त्याच्या शिडातील हवा गेल्याच्या बातम्या येण्यास सुरूवात झाली. (दुवा 1) आधी हा प्रकल्प आयआयटी राजस्थानला देण्यात आला होता, त्यानंतर डाटाविंडच्या उत्पादनात दोष आढळल्याने तो आयआयटी मुंबईला देण्यात आला. गेल्या महिन्यात आयआयटी मुंबईला नवीन आकाश टॅब्लेट देत असल्याचे डाटाविंडने जाहीर केले. (दुवा 2)
आकाश किंवा युबीस्लेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या टॅब्लेटसाठी काही महिन्यांपूर्वी नोंदणी चालू होती, तेव्हा सहा महिन्यांची प्रतीक्षा यादी होती. गेल्या महिन्यात नोंदणी बंद झाल्याचेच कळाले. युबिस्लेटचे विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी वेगळे मॉडेल होते. मात्र त्यातील कोणतेही आज उपलब्ध नाही, ही लेखातील माहिती आणि वरील तपशील बरोबरच आहेत.

आकाश प्रकल्प हे एक तंत्रज्ञानव्यवस्थापन कसे असू नये यासाठीचे एक चांगले उदाहरण होऊ शकेल.

तंत्रज्ञानव्यवस्थापन असो, प्रशासकीय व्यवस्थापन असो किंवा व्यापारी व्यवस्थापन असो, एखादा प्रकल्प कसा असू नये, याचेच हे उदाहरण आहे. साक्षातच्या लाँचपूर्वी त्याबद्दल खूप औत्सुक्य निर्माण झाले होते. मात्र ऐन सादरीकरणाच्या वेळी साक्षातचे फक्त मॉडेलच सिब्बल यांनी सादर केले होते. त्याबद्दल एका फ्रेंच पत्रकाराने माझ्याकडून माहिती मागितली होती. मात्र त्या समारंभातील फजिती सांगितल्यानंतर, "better I would not speak of that bad joke" असे उद्गार त्याने काढले होते.

आकाश

मुळात आकाश साठी लागणारे मदरबोर्ड आणि डिस्प्ले युनिट हे चिनी बनावटीचे आहेत आणि फक्त त्यांची जुळणी भारतात केली गेली आहे, अशी बातमी आहे.

मी थोडीशी माहिती काढल्यावर मला कळाले की चिनी बनावटीचे टॅबलेट मदरबोर्ड आणि डिस्प्ले युनिट हे फक्त १५००/- मध्ये मिळतात. फक्त मोठ्या प्रमाणावर घेतले तरच.

माझ्या माहितीची एक टॅबलेट कंपनी ४४००/- मध्ये टॅबलेट विकते आणि ५०% टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमवते. त्यामुळे डाटाविंड ही नफ्यातच आहे आणि यामागचे कर्ते-धर्ते कोण हे सांगावयास नकोच..

- पिंगू

 
^ वर