एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 2

(मागील भागापासून पुढे)

सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात खोदलेल्या 19 क्रमांकाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर त्या गुंफेच्या बाजूलाच असलेल्या 18 क्रमांकाच्या गुंफेकडे मी आता निघालो आहे. नाशिक येथे असलेल्या या त्रिरश्मी पर्वतातील गुंफांमध्ये, ही 18 क्रमांकाची गुंफा म्हणजे येथे असलेले एकुलते एक उपासना गृह किंवा चैत्य गृह आहे. या गुंफेची वैशिष्ट्ये अभ्यासण्यापूर्वी, सातवाहन इतिहासातील या गुंफेच्या संबंधित काही संदर्भांची उजळणी करणे योग्य ठरेल.
इ.स.पूर्व 200 या कालात राज्यावर असणारा सातवाहन राजा कृष्ण हा या राजघराण्याचा संस्थापक म्हणून मानल्या जाणार्‍या सिमुक (सिमुख, श्रीमुख) या राजाचा बहुदा सख्खा भाऊ असावा असे मानले जाते. मात्र ज्या राजाच्या नावावरून सातवाहन कुल असे नाव या राजघराण्यातील राजांनी धारण केले होते तो सातवाहन राजा, सिमुख व कृष्ण यांचा पिता होता की नाही याबाबत मतभिन्नता आहे. वा.वि. मिराशी यांच्या मताने सातवाहन राजा व सिमुक यांच्यामध्ये 7 किंवा 8 पिढ्या होऊन गेलेल्या असाव्यात. सातवाहन राजाचा काल व त्याचे कृष्ण राजाशी नाते यांचा सध्याच्या विषयाच्या दृष्टीने काहीच संबंध नसल्याने त्याचा विचार न करता कृष्ण राजाच्या पुढील काळाकडे मी वळतो.

पुराणांतील माहितीप्रमाणे, कृष्ण राजानंतर गादीवर आलेला पुढचा सातवाहन राजा म्हणजे पहिला सातकर्णी हा राजा. सुदैवाने या राजाबद्दल विपुल माहिती, मुख्यत्वे, मागच्या वर्षी मी भेट दिलेल्या व जुन्नर जवळ असलेल्या, नाणेघाट येथील गुंफेमधील विस्तृत शिलालेखातून प्राप्त झालेली आहे. मात्र हा सातकर्णी राजा, पुराणे म्हणतात तसा कृष्ण राजाचा पुत्र होता का सिमुक राजाचा पुत्र होता हे सांगणे कठीण आहे. नाणेघाटातील गुंफेच्या मागच्या भिंतीजवळ सातकर्णी राजाच्या कोरलेल्या पुतळ्याच्या उजव्या अंगाला, सिमुकाचा पुतळा कोरलेला होता व कृष्ण राजाच्या नावाची नाणेघाटातील गुंफेत कोठेही नामोनिशाणीही नाही या निरिक्षणांमुळे सातकर्णी राजा, सिमुकाचा पुत्र असण्याची शक्यता मला जास्त योग्य वाटते आहे. तरीही आपण हा नातेसंबंधांचा गोंधळ तूर्त बाजूस ठेवून या गुंफेमधील इतर कोरीव पुतळ्यांकडे प्रथम वळूया. गुंफेच्या मागील भिंतीजवळ एका रांगेत असलेले असे 8 पुतळे येथे कोरलेले होते. यापैकी उजवीकडचे पहिले 4 पुतळे, राजा सिमुक, राजा सातकर्णी, राणी नयनिका व एक सरदार महारथी त्रिनक यारो यांचे होते. वा.वि. मिराशी यांच्या मताने डावीकडचे 4 पुतळे या राजा-राणीच्या भय, वेदिश्री, हकुश्री व सातवाहन या 4 पुत्रांचे किंवा राजकुमारांचे असले पाहिजेत. या पुत्रांपैकी भय व सातवाहन यांचे अकाली निधन झाल्याने प्रथम वेदिश्री ( इतिहास तज्ञ शोभना गोखले याचे नाव स्कंदश्री असे वाचतात.) व नंतर हकुश्री हे दोन राजकुमार, सातवाहनांच्या राजसिंहासनावर आले असले पाहिजेत. मिराशी यांच्या मताने यांच गुंफेत असलेल्या दुसर्‍या एका शिलालेखात या राजा हकुश्रीचा, श्री सती (शक्ती) असा उल्लेख आढळतो. श्री सतस अशी अक्षरे कोरलेली नाणीही सापडलेली आहेत. मिराशी यांच्या मते ही नाणी या हकुश्री राजाने पाडवून घेतलेली असावीत.

नाशिक गुंफांचा विषय सोडून हे नाणेघाटचे वळण मी अचानक घेतले याच्या मागे एक कारण आहे. मी आता भेट देत असलेल्या 18 क्रमांकाच्या चैत्य गृहामधील एका शिलालेखात या हकुश्री राजाचा महाहकुश्री असा उल्लेख केलेला दिसतो. मात्र नाशिक आणि नाणेघाट येथे उल्लेख असलेले हे दोन्ही हकुश्री एकच का निरनिराळे याबाबत इतिहाससंशोधकांमध्ये एकमत दिसत नाही. वा. वि. मिराशी या दोन्ही ठिकाणी उल्लेखलेल्या व्यक्तींना एकच मानतात तर ए.एस.आळतेकर यांच्या मताने या दोन निराळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत. हा विषय सध्या बाजूला ठेवून आपण चैत्य गृहाकडे वळूया.

अजंठा येथील 10 क्रमांकाचे चैत्य गृह किंवा पितळखोरे येथील चैत्य गृह यांच्याशी असलेले या चैत्य गृहाचे साम्य लगेचच नजरेत भरते व त्यामुळे या तिन्ही गुंफा साधारण एकाच कालात खोदवून घेतलेल्या असाव्यात हे लक्षात येते. नाशिक गुंफाच्या पूर्व-पश्चिम विस्ताराच्या साधारण मध्यावर असलेली ही 18 क्रमांकाची गुंफा, 40 फूट खोल व 21 फूट-6 इंच रूंद आहे. वर छताला खण कोरलेले आहेत आणि अगदी आतील बाजूची खोदाई गोलाकार आहे. मध्यवर्ती उपासनेच्या जागेच्या सभोवती अष्टकोनी स्तंभांच्या सलग ओळी आहेत. दोन्ही बाजूंना 5 व आतील गोलाकार खोदाईसमोर 5 असे एकूण 15 स्तंभ येथे आहेत. दोन्ही बाजूंचे स्तंभ व कडेच्या भिंती यामध्ये साधारण 4 फूट रूंदीचे पॅसेजेस ठेवलेले आहेत. दोन्ही बाजूंचे स्तंभ कसलेही कोरीव काम न केलेले व अष्टकोनी आकाराचे आहेत. स्तंभांच्या पायाच्या बाजूला, पायर्‍या असलेल्या चौरस प्लॅटफॉर्मवर एखादा मातीचा घट ठेवल्यावर जसा आकार दिसेल तसा आकार दिलेला आहे. मात्र आतल्या गोलाईजवळ असणारे 5 स्तंभ अगदी साधे सरळ आहेत. एका बाजूच्या स्तंभांच्या डोक्यावर चौरस आकाराचे कॅपिटल खोदलेले दिसत आहेत. दुसर्‍या बाजूस मात्र कॅपिटल्स दिसत नाहीत. या चैत्य गृहाच्या आतील भागातील अगदी साध्या रचनेमुळे हे चैत्य गृह, कार्ले येथील चैत्य गृहाच्या बर्‍याच आधी व साधारणपणे 19 क्रमांकाच्या व कृष्ण राजाच्या कालातील गुंफेच्या खोदाईच्या काळाच्या जवळपासच खोदले गेले असावे असा अंदाज केला तरी फारसा अयोग्य ठरू नये. गुंफेच्या आतील भागात असलेले स्तंभ अर्थातच मागील बाजूच्या वक्रतेला समांतर अशा वक्रतेवर खोदलेले आहेत. या वक्रतेच्या साधारण मध्यावर व प्रवेशद्वारापासून 26 फूट अंतरावर एक साधा सरळ दिसणारा स्तूप दिसतो आहे. स्तूपाच्या मध्यावर, सांची येथील प्रसिद्ध बौद्ध रेलिंगचे डिझाईन, स्तूपाच्या परिघावर कोरलेले दिसते आहे. स्तूपाच्या माथ्यावर एक चौरस पेटी व त्यावर उलटा ठेवलेला पायर्‍यांचा एक पिरॅमिड खोदलेला/ठेवलेला दिसतो आहे.
उजव्या बाजूला असलेल्या 5 आणि 6 क्रमांकाच्या स्तंभांवर मी वर निर्देश केलेला शिलालेख मला स्पष्ट दिसू शकतो आहे. या शिलालेखातील मजकूर या प्रमाणे आहे. ( मिराशी भाषांतर)


" चलिसिलण येथील राजअमात्य अरहलय याची कन्या, महा हकुश्री याची नात, राज अमात्य व भांडार अधिकारी अगियतनक याची पत्नी आणि कपणणक याची माता असलेल्या भटपालिका हिने त्रिरश्मी पर्वतामधील हे चैत्य गृह पूर्ण केले"

वा.वि. मिराशी यांच्या मताने या गुंफेचा अंतर्भाग इ.स.पूर्व प्रथम शतकाच्या सुरूवातीस खोदला गेला असला पाहिजे. या चैत्य गृहाच्या अंतर्भागातील वास्तूशास्त्रीय रचना या काळास अनुसरूनच वाटते आहे. गुंफेचा अंतर्भाग बघून झाल्याने मी बाहेर येतो. प्रवेशद्वाराच्या आजूबाजूचा भाग अतिशय बारकाईने केलेल्या हिनायन पद्धतीच्या कोरीव कामाने संपूर्णपणे भरून टाकलेला दिसतो आहे. गुंफेच्या मुखाचा हा भाग बघून कार्ले येथील चैत्यगृहाच्या प्रवेशद्वार भिंतीवरील कोरीव काम आठवते आहे. मागच्या शतकातील प्रसिद्ध पुरातत्त्व तज्ञ जॉन मार्शल याच्या मताने या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळील कोरीव काम नंतर म्हणजे इ.स.पूर्व प्रथम शतकाच्या अखेरीस केलेले असावे. कदाचित या कारणामुळे या गुंफेतील साधा अंतर्भाग व बारीक कोरीव कामाने भरलेला मुखाजवळचा भाग हे एवढे निराळे दिसत असावेत.

प्रवेशद्वाराच्या अगदी वर, घोड्याच्या नालाच्या आकाराची व आधारासाठी 11 तुळया असलेली एक कमान कोरलेली आहे. ही कमान व प्रवेशद्वार या मधील जागेत 4 कमानीदार रेलिंग कोरलेली आहेत. कमान व 4 रेलिंग्ज या मधील जागांच्यात अनेक प्राणी, फुले, मोर व मानवी आकृती कोरलेले आहेत. प्रवेश्द्वाराच्या बाजूचे दोन्ही स्तंभ याच प्रमाणे बारीक नक्षीकामाने सजवलेले आहेत. प्रवेश्द्वाराच्या उजव्या बाजूस एक बास रिलिफ पद्धतीने कोरलेली यक्षाची आकृती आहे. यक्षाने आपल्या उजव्या हातात देठासकट असलेले एक कमल पुष्प धरलेले आहे तर डाव्या हाताने कंबरेला असलेल्या शेल्याचे टोक पकडले आहे. कदाचित या हातात त्याने एखादा खंजिर घेतला असण्याचीही शक्यता वाटते. यक्षाची केशरचना सातवाहन कालातील दिसते आहे. त्याने कानात मोठी जाड कर्णभूषणे व मनगटावर कंगण घातलेले आहेत. त्याने कंबरेला झोकदार गाठ मरलेला शेला बांधलेला दिसतो आहे. या यक्ष आकृतीकडे बघताना मला पितळखोरे गुंफेमधील द्वारपाल असलेल्या यक्ष आकृतीची आठवण होते आहे कारण या दोन्ही लेण्यांमधील यक्ष आकृत्यात मला विलक्षण साम्य भासते आहे. द्वाराच्या दाव्या बाजूकडील स्तंभ व त्यापलीकडे असलेली यक्षाची आकृती या दोन्ही नष्ट झालेल्या आहेत.

प्रवेशद्वारावरील कमानीच्या वरच्या बाजूस अंदाजे 9 फूट ऊंच, 10 फूट रूंद व 4 फूट खोल असलेली एक घोड्याच्या नालाच्या आकाराची भव्य कमान खोदलेली आहे. या कमानीच्या दोन्ही अंगांना असलेला गुंफेच्या मुखपृष्ठाचा भाग याच प्रकारच्या छोट्या कमानी, बास रिलिफ पद्धतीने कोरलेले स्तंभ, स्तूप, बेर्म कमानी व बौद्ध रेलिंग डिझाईन हे सर्व कोरून भरून टाकलेला आहे. कोरलेल्या स्तंभांवर कॅपिटल्स दाखवलेले असून त्यावर प्राण्यांची चित्रेही कोरलेली आहेत. या सर्व कोरीव कामाने गुंफेचे प्रवेशद्वार अतिशय प्रभावी व उठावदार दिसते आहे.

गुंफेच्या या समोरील भागावर दोन शिलालेख आहेत. या शिलालेखातील मजकूरामुळे जॉन मार्शल यांच्या मताला मोठा आधार मिळतो. यापैकी पहिला शिलालेख प्रवेशद्वारावरील कमानीला लागून खालच्या बाजूस आहे. या शिलालेखात असलेला मजकूर या प्रमाणे आहे.

" नाशिकवासियांनी दिलेली दंभिक या ग्रामाची देणगी"

या शिलालेखाचा अर्थ बहुदा नाशिक येथील रहिवाशांनी ही गुंफा पूर्ण करून तिच्या देखभालीसाठी दंभक नावाचे ग्राम या मठातील भिख्खूंना दिले असा असावा. दुसरा शिलालेख अर्धवट वाचता येतो आहे व तो यक्ष आकृतीच्या साधारण 6 फूट उजवीकडे असलेल्या मोल्डिंगवर आहे.

" मधे असलेले रेलिंग आणि यक्ष .......... आणि नंदश्री यांनी बनवले."

या दोन्ही शिलालेखावरून गुंफेचा मुखाजवळील भाग नंतरच्या कालात पूर्ण केला गेला असावा हे स्पष्ट होते आहे.

पुढच्या गुंफेकडे मी जाणार तेवढ्यात समोर दिसत असलेल्या कमानीच्या अवतीभवती असलेल्या आणखी काही बास रिलिफ शिल्पांकडे माझे लक्ष जते. कमानीच्या दोन्ही बाजूंना फणा काढून उभे असलेल्या नागांची चित्रे कोरलेली दिसत आहेत. त्याचप्रमाणे कमानीच्या अगदी वरच्या टोकाजवळ दोन्ही अंगांना घोड्याच्या नालाच्या आकाराच्याच पण छोट्या आकाराच्या दोन दोन कमानी कोरलेल्या मला दिसत आहेत. जरा निरखून बघितल्यावर मधल्या विशाल कमानीच्या दोन्ही बाजूंना उड्डाण करत असलेल्या परंतु जरा विचित्र दिसणार्‍या यक्षिणी किंवा किन्नरांच्या आकृत्या मला दिसत आहेत. कमानीच्या उजव्या बाजूला असलेल्या आकृतीचा वरचा भाग हातात एक तबक घेतलेली मानवी आकृती असली तरी त्या आकृतीच्या शरीराचा खालचा भाग मोराचा आहे. डाव्या बाजूच्या आकृतीचा वरचा भाग तसाच हातात तबक घेतलेल्या मानवी शरीराचा आहे पण खालचा भाग मात्र एखाद्या माशाच्या शरीराचा दाखवलेला आहे. या अर्धवट मानवी आकृतींच्या पलीकडे मला आणखी काही मानवी आकृती दिसत आहेत. उजव्या बाजूस एक पुरुष व त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या दोन स्त्रिया असे बास रिलिफ पद्धतीचे शिल्प दिसते आहे. सातवाहन काळातील केशरचना असलेल्या मधल्या पुरुषाच्या बाजूच्या स्त्रिया बहुदा त्याच्या बायका असाव्यात व त्यांचे भांडण तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. उजव्या बाजूच्या स्त्रीने बहुदा साडीसारखे वस्त्र परिधान केले आहे तर डावीकडील स्त्रीने घागरा किंवा तत्सम वस्त्र परिधान केलेले असावे. पुरुष धोतर नेसलेला आहे. आणखी उजव्या बाजूला खांद्यावर घट घेतलेली आणखी एक स्त्री अस्पष्ट दिसते आहे. मधल्या कमानीच्या डाव्या बाजूस मात्र घट घेतलेल्या स्त्रीच्या शिल्पाशेजारी फक्त एका स्त्री पुरुष जोडपे कोरलेले आहे. ते सुद्धा एकमेकाशी भांडताना बहुदा दाखवलेले आहेत.
या एवढ्या वर व नीट दिसू शकणार्‍या जागी ही छोटी बास रिलिफ शिल्पे कोरण्याचे प्रयोजन काय असावे? असा विचार करूनही मला ते समजू शकत नाहीये. स्त्रिया असल्या की भांडणे होणारच! मग ती एक असो वा दोन! असे शिल्पकाराला सुचवायचे आहे की काय, कोणास ठाऊक!

क्रमश:

24 ऑक्टोबर 2012

या लेखासोबत जोडलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचनीय

लेखमाला अत्यंत रोचक होत आहे.

वाचते आहे

सध्या अतिव्यग्रतेमुळे अद्याप वाचते आहे पण उत्तम लेखमाला.

 
^ वर