एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 1

नाशिक मधील त्रिरश्मी पर्वतामध्ये असलेल्या प्रसिद्ध बौद्ध गुंफा बघण्यासाठी मी आता निघालो आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून जरी आजमितीला नाशिक प्रसिद्ध असले तरी ऐतिहासिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा नाशिकचे स्थानमाहात्म्य कोणत्याही प्रकारे कमी लेखता येत नाही. नाशिक शहराचे भौगोलिक स्थानच मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडे पसरत जाणार्‍या सह्याद्री पर्वताच्या रांगा व पूर्वेकडे पसरणारी सातमाला पर्वतराजी यांच्या कुशीत नाशिक पहुडले आहे असे म्हणता येते. शहराच्या कोणत्याही भागातून आजूबाजूला एक नजर जरी टाकली तरी सभोवती दिसणारा आसमंत काही आगळाच भासतो. कोणत्याही दिशेला बघितले तरी त्या परिसरात दिसणारे अनेक मध्यम उंचीचे डोंगर सुळके एकदम जमिनीतून मधूनच बाहेर आल्यासारखे दिसतात. अशा दिसणार्‍या दोन सुळक्यांमधली जमीन मात्र एकदम सपाट आहे हेही लक्षात येते. या अशा अनेक डोंगर सुळक्यांच्या परिसरात सुद्धा, अगदी विरुद्ध दिशेला असलेले परंतु जुळे भाऊ शोभतील असे दिसणारे व जमिनीतून अचानकच उगवलेले दोन उंच डोंगर सुळके मात्र माझे खास लक्ष वेधून घेतात. यापैकी उत्तरेला असलेला डोंगर सुळका "चांभार टेकडी" या नावाने ओळखला जातो. या टेकडीच्या एका कड्यावर जैन लेणी आहेत तर दक्षिणेकडे असलेला डोंगर सुळका "त्रिरश्मी पर्वत" या नावाने परिचित आहे. तीन सूर्यकिरण असे मोठे आकर्षक नाव धारण करणार्‍या या पर्वताच्या एका बाजूच्या साधारण मध्यावर मी ज्या गुंफा बघण्यासाठी म्हणून निघालो आहे त्या गुंफा आहेत.

16 लाख लोकवस्ती असलेले नाशिक हे आज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. मुंबई-आग्रा या महत्त्वाच्या राजरस्त्यावर असलेले नाशिकचे स्थान व मुंबई-नाशिक या प्रवासासाठी लागणारा फक्त दोन अडीच तासांचा कालावधी या कारणांमुळे उत्पादन उद्योगाबरोबरच नाशिक मध्ये सेवा उद्योग मोठ्या प्रमाणात आलेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे इथल्या प्रसिद्ध द्राक्षांपासून वाईन बनवणारे उद्योगही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या किंवा इतर काही कारणांमुळे नाशिकची गणना मात्र आता श्रीमंत शहरांत केली पाहिजे असे दिसते आहे. रस्त्यांवर मधून मधून दिसणारे व ओळीने लावलेल्या असंख्य विद्युतदीपांमुळे लखलखणार्‍या समोरील काचेच्या भिंती दिमाखाने दर्शवणारे बडे बडे मॉल बघून माझी या बाबतीत खात्री पटते आहे. माझ्या आजूबाजूने जाणारा मोटारींचा प्रवाह मेट्रो शहरांइतका दाटी वाटीचा नसला तरी बर्‍यापैकी दाट आहे आणि रस्त्यावर दिसणार्‍या मोटारींमध्ये आलिशान लिमुझिन गाड्याही मोठ्या प्रमाण दिसत आहेत, रस्त्यावरून जात असताना अशा बर्‍याच आलिशान गाड्यांच्या शो रूम्सही मला दिसत आहेत. या सर्व दृष्यांमुळे नाशिकच्या नवश्रीमंतीबद्दल माझी खात्री पटत चालली आहे. असे जरी असले तरी नाशिकची खरी व पूर्वापार चालत आलेली ओळख ही असंख्य धार्मिक स्थळे व देवळे असलेले एक ऐतिहासिक शहर म्हणूनच केली पाहिजे. नाशिक एवढ्या धर्मादाय संस्था बहुदा काशी सोडल्यास दुसरीकडे कोठेही नसाव्यात. हे शहर कमीत कमी दोन हजारांपेक्षा जास्त वर्षे अस्तित्वात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. भारतातील एक अत्यंत महत्त्वाची नदी 'गोदावरी' नाशिक जवळच उगम पावते. मात्र नाशिक शहरामध्ये मध्ये असलेले या नदीचे स्वरूप उन्हाळ्यात जवळ जवळ कोरडा ठणठणीत पडणारा एक ओढा असेच करावे लागेल.

नाशिकची दोन औद्योगिक उपनगरे आहेत. यापैकी एक उपनगर सातपूर या नावाने ओळखले जाते तर दुसर्‍याला अंबड असे नाव आहे. मी आता या अंबड उपनगरात आलो आहे. मला भेट द्यायची आहे तो 'त्रिरश्मी' पर्वत, या अंबड उपनगराच्या अगदी कडेला उभा आहे. नाशिक कडून मुंबई कडे जाणारा मुंबई-आग्रा रस्ता हा नाशिक शहराची दक्षिण हद्द असे पूर्वी समजले जात असे. मात्र आता नाशिक बरेच आणखी दक्षिणेकडे वाढलेले दिसते आहे. 'त्रिरश्मी' पर्वत या मुंबई-आग्रा रस्त्याला लागूनच दक्षिणेकडे आहे.

या पर्वताच्या पायथ्याजवळचा संपूर्ण भाग नाशिक महानगरपालिकेने मोठ्या विचारपूर्वक विकसित केला असावा असे वाटते आहे. नेहरू उद्यान म्हणून हा भाग आता ओळखला जातो आहे. पर्वतांच्या तळापासून ते मध्य भागापर्यंत गर्द हिरवीगार अशी दाट झाडी दिसते आहे. पर्वताच्या तळाशी एखाद्या बौद्ध स्तूपाचा आकार दिलेले फाळके स्मारक या परिसरात मोठे खुलून दिसते आहे. फाळके स्मारकाशेजारूनच पर्वताकडे जाणारा रस्ता जातो आहे. या रस्त्याच्या कडेला आम्ही गाडी ठेवतो व समोरच दिसणार्‍या पायर्‍या चढण्यास प्रारंभ करतो. पायर्‍या वर चढणे सोपे जावे या विचाराने बनवल्या गेल्या आहेत हे लगेचच लक्षात येते आहे.

घडीव दगडांनी बसलेल्या इथल्या प्रत्येक पायरीची उंची फारशी जास्त नाहीये आणि ती अरुंद न बनवता चांगली पसरट अशी बनवली आहे. या दोन्ही कारणांनी पर्वत चढणे हे एकदम सोपे काम वाटते आहे. पायर्‍या अतिशय घनदाट अशा झाडी खालून जात असल्याने वर तळपणार्‍या सूर्याचा प्रकाश खाली पोहोचतच नाहीये त्यामुळे ही सर्व चढण फारसा थकवा न जाणवता मी पार करू शकतो आहे. एकूण 230 पायर्‍या येथे आहेत. आणि पायर्‍यांचा रस्ता वळणावळणांचा असल्याने थोडा गूढरम्यही भासतो आहे. पायर्‍यांच्या शेवटाला एक लोखंडी गेट व तिकीट ऑफिस दिसते आहे. आत जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून तिकीट घ्यावे लागते. परंतु त्याची किंमत अगदीच माफक म्हणजे फक्त 5 रुपये आहे.

गेट मधून आत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूंना म्हणजे माझ्या डाव्या व उजव्या हातांना, या गुंफाचा विस्तार पसरलेला मला दिसतो आहे.
नाशिकच्या त्रिरश्मी पर्वतमधील या एकूण 24 बौद्ध गुंफा साधारणपणे उत्तर किंवा ईशान्येकडे मुख असलेल्या आहेत. क्रमांक 1 ते 20 या गुंफांसमोर एकाच पातळीत असलेले व पूर्व- पश्चिम पसरलेले असे एक प्रांगण आहे व त्या प्रांगणातच मी आता उभा आहे. पहिल्या नजरेतच माझ्या लक्षात येते आहे की पुरातत्त्व विभागाकडून इथल्या गुंफांची देखभाल अतिशय योग्य रितीने केली जात असल्याने जवळपास सर्व गुंफांना भेट देणे शक्य आहे. कार्ले येथील गुंफांशी तुलना केली तर तेथील बर्‍याचशा गुंफांना कुलुपे लावून टाकलेली आहेत व आत जाण्यासाठी योग्य परिस्थितीत असलेले मार्गही राखलेले दिसत नाहीत. अजंठ्याला सुद्धा काहीं गुंफा कुलूप लावलेल्या दिसतात.

इ.स. 629-645 या कालखंडात भारतवर्षाला भेट देणारा चिनी प्रवासी शुएन त्झांग याने आपल्या परतीच्या प्रवासात महाराष्ट्राच्या राजधानी जवळ असलेल्या एका बौद्ध मठाचा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात केलेला आहे. त्याने आपल्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राच्या राजधानीच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी आजूबाजूचा प्रदेश व इतर स्थळे यांच्या वर्णनावरून तो वर्णन करत असलेली ही राजधानी नाशिकच असली पाहिजे याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. त्याचप्रमाणे तो वर्णन करत असलेला बौद्ध मठ म्हणजे मी आता उभा आहे तो त्रिरश्मी पर्वतातील बौद्ध मठच असला पाहिजे याची मला खात्री वाटते आहे. महाराष्ट्राच्या राजधानीचे वर्णन करताना शुएन त्झांग म्हणतो:
"(या शहरात) शंभराहून जास्त बौद्ध मठ असून त्यात पाच सहस्त्राहून जास्त भिक्षू रहात असतात. महायान व हिनयान या दोन्ही पंथांचे येथे पालन होते. येथे देवांची शंभर मंदिरे असून त्यात अनेक पंथांचे साधू वास्तव्य करून असतात."

नाशिकला हे वर्णन चपखलपणे लागू होते असे मला वाटते. शुएन त्झांग राजधानीजवळ असलेल्या बौद्ध मठाचे वर्णन या शब्दात करतो:

"(राजधानीच्या) अगदी जवळच, दक्षिणेला, एक बौद्ध मठ असून त्यात बोधिसत्त्वाची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या दैवी सामर्थ्याची कीर्ती दूरवर पसरलेली असून या मूर्तीपाशी गुप्तपणे प्रार्थना केलेल्या अनेकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे."

शुएन त्झांग या ठिकाणी त्रिरश्मी गुंफांमधील 20 क्रमांकाच्या गुंफेतील 10 फूट उंच बुद्ध मूर्तीकडे निर्देश करतो आहे या बाबत माझ्या मनात तरी शंका नाही.

त्रिरश्मी गुंफांमधील 19 क्रमांकाची गुंफा ही सर्वात प्रथम खोदलेली गुंफा आहे असे मानले जात असल्याने त्या गुंफेला प्रथम भेट द्यावी असे मी ठरवतो. साधारणपणे अशा गुंफा समुहाच्या मध्यवर्ती भागात खोदलेल्या आढळतात. त्याचप्रमाणे ही गुंफा साधारण इतर गुंफांच्या मध्यावरच आहे. ही गुंफा 18 क्रमांकाच्या गुंफेच्या उजव्या बाजूला लागूनच आहे व 20 क्रमांकाच्या गुंफेच्या खाली आहे. मी उभा असलेल्या प्रांगणाच्या साधारण समपातळीतच ही गुंफा आहे. ही गुंफा म्हणजे भिख्खूंसाठी बांधलेला व सर्वात जुना असा एक छोटा विहार आहे. गुंफेचे 3 भाग आहेत. पुढे व्हरांडा त्याच्या मागे हॉल आणि हॉलच्या तीन बाजूंना असलेल्या भिख्खूंच्या सहा कोठड्या असे या विहाराचे स्वरूप आहे. मधला हॉल 14 फूट रूंद, 14 फूट खोल व 8 फूट उंच आहे. हॉलच्या मागे आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी 2 कोठड्या खोदलेल्या आहेत.

प्रत्येक कोठडीच्या प्रवेशद्वारावर घोड्याच्या नालाच्या आकाराची कमान कोरलेली आहे व दोन कमानींच्या मधील भागात 1 फूट रूंद असलेले सांची स्तूप पद्धतीचे बौद्ध रेलिंग कोरलेले आहे. हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे व या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस, पाषाणातच जाळी कोरून दोन गवाक्षे बनवलेली आहेत. व्हरांड्याच्या समोरील बाजूस दोन साधे स्तंभ खोदलेले आहेत. या स्तंभांचा आकार मध्यात अष्टकोनी असून खालच्या व वरच्या बाजूस तो चौरस ठेवलेला आहे. एका स्तंभावर अर्धकमल कोरलेले आहे.

वरील वर्णनावरून हे लगेच लक्षात येऊ शकते की ही गुंफा अगदी साधी व कोणतेही कोरीव काम न केलेले एक भिक्षू निवासस्थान किंवा विहार आहे. तरीसुद्धा ही गुंफा नाशिकच्या गुंफांपैकी एक महत्त्वाची गुंफा म्हणून गणले जाते. याचे कारण म्हणजे उजव्या बाजूला असलेल्या व जाळीचे डिझाईन कोरलेल्या गवाक्षाच्या व्हरांड्याच्या बाजूच्या वरच्या सिलवर असलेला 2 ओळींचा शिलालेख हे आहे.
हा शिलालेख सांगतो की,

"सातवाहन कुलातील कृष्ण राजा असताना नाशिक येथील श्रमण महामात्र याने (हे) लेणे कोरविले."

या शिलालेखाचा अर्थ कसा लावायचा या बाबत तज्ञांत मतभेद असले तरी सेनार्टने लावलेला अर्थ मला तरी जास्त सयुक्तिक वाटतो. या अर्थाप्रमाणे सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात श्रमणांसाठी (बौद्ध भिख्खूंसाठी) नाशिक येथे नेमलेल्या ज्येष्ठ धर्माधिकार्‍याने हे लेणे कोरविले असे हा शिलालेख सांगतो.

पुराणांतील वर्णनाप्रमाणे कृष्ण राजा हा सिमुक राजानंतर झालेला दुसरा सातवाहन राजा मानला जातो. या राजाने बौद्ध भिख्खूंसाठी नाशिकमध्ये एका ज्येष्ठ धर्माधिकार्‍याची केलेली नेमणूक ही सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराच्या पद्धतीतील अशाच प्रकारच्या नेमणूकींसारखी असल्याने असे अनुमान काढता येते की सम्राट अशोकाचा काल व कृष्ण राजाचा काल यामध्ये फारसे अंतर नसावे. यामुळे कृष्ण राजा इ.स.पूर्व 200 च्या सुमारास होऊन गेला असावा असे म्हणता येते.

क्रमश:

18 ऑक्टोबर 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

नव्या लेखमालेबद्दल आभार. वाचते आहे.

सुरेख

नव्या लेखमालिकेची उत्तम सुरुवात झाली आहे.

हा 'कृष्ण' राजा म्हणजे सिमुक सातकर्णीचा धाकटा भाऊ. सिमुकाच्या मृत्युनंतर सिमुखाचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने हा गादीवर आला. याचे आणि प्रथम सातकर्णीचे संबंध ठिक नसावेत कारण नाणेघाटातल्या प्रतिमालेखात प्रथम सातकर्णीची पत्नी नागनिका हिने कृष्ण सातवाहनाची प्रतिमा कोरलेली नाही अथवा त्याचा उल्लेखही केलेला नाही याचा अर्थ पहिल्या सातकर्णीला आपले राज्य कृष्णाशी झगडूनच मिळवावे लागले असले पाहिजे.

पुराणांनी जरी सिमुकाला आद्य सातवाहन म्हटलेले असले तरी हल्लीच उपलब्ध झालेल्या पुराव्यांनुसार तो आद्य सातवाहन नाही. सातवाहन कुळाचा प्रमुख 'सातवाहन' नावाचाच राजा होता. 'सातवाहन' असे त्याचे नाव कोरलेली नाणी औरंगाबाद, हैदराबाद, अकोला येथे जमिनीवर आणि नेवासे, कोंडापूर येथे उत्खननात सापडली आहेत. या नाण्यांवर 'रञो सिरी सादवाहनस' असे कोरलेले असून मागील बाजूस उज्जैन चिन्ह कोरलेले आहे. या आद्य सातवाहनापासूनच त्याच्या कुळाला सातवाहनकुल असे म्हटले गेले.

सातवाहन

धन्यवाद भटक्या! सातवाहन राजांचा थोडाफार इतिहास या मालिकेच्या पुढील भागात देण्याचा मी प्रयत्न करणार आहेच.
अवांतर: वि.वा.मिराशी यांच्या मताने सिमुख व कृष्ण हे राजे अशोकाचा मांडलिक असलेल्या मूळ सातवाहन राजाचे पुत्र नसून त्यांच्यात कही पिढ्यांचे अंतर असावे. तज्ञात मतभिन्नता असल्याने मी या गोष्टीचा उल्लेख माझ्या लेखात केलेला नाही.

सहमत आहे.

वि.वा.मिराशी यांच्या मताने सिमुख व कृष्ण हे राजे अशोकाचा मांडलिक असलेल्या मूळ सातवाहन राजाचे पुत्र नसून त्यांच्यात कही पिढ्यांचे अंतर असावे.

सहमत आहे. सिमुख अतिशय सामर्थ्यवान होता. केवळ सातवाहनाच्या एकाच पिढीत सातवाहन राज्य इतक्या उत्कर्षाला पोचेल आणि त्याचा इतका विस्तार होईल असे वाटत नाही. तेव्हा किमान एक ते दोन पिढ्यांचे अंतर असलेच पाहिजे. अर्थात सातवाहन आणि सिमुख यादरम्यान असलेल्या सातवाहनांच्या पिढ्यांचा कुठलाही उल्लेख पुरातत्विय किंवा पौराणिक पुराव्यांत नाही हे ही खरे.

पुढच्या भागाची वाट पाहातो आहेच.

बाकी ते वि. वा. मिराशी नसून वा. वि. मिराशी -वासुदेव विष्णू मिराशी.

सुंदर लेख

अतिशय छान लेख. अभिनंदन आणि धन्यवाद.

 
^ वर