शून्य ते अनंतापर्यंत......

प्राचीन भारतीय गणितज्ञांनी जगाला शून्य ही संख्या दिल्यामुळे गणितविश्वाला कलाटणी मिळाली हे कुणीही नाकारू शकत नाही. प्राचीन काळातील बॅबिलोनियन, ग्रीक, सुमेरियन, इजिप्त इत्यादींच्या संस्कृतीत वापरात असलेले अंक व गणितीय पद्धती कळण्यास फारच क्लिष्ट होत्या व सामान्यांच्या आकलनाच्या पलिकडच्या होत्या. भारतातून अरबांच्याद्वारे इतर देशात शून्य ही संकल्पना पोचल्यानंतरच तेथील तज्ञांना शून्याचे महत्व कळू लागले. शून्य ही 1, 2, 3 ... सारखी फक्त संख्या नव्हती. तर दशमान पद्धतीची सुरुवातच या संख्येने झाली. व काही शतकानंतर शून्याला पर्याय नाही हे जगाला कळून चुकले.

परंतु प्राचीन काळातील भारतीय गणितज्ञांचे योगदान फक्त शून्य वा दशमान पद्धतीपुरतेच मर्यादित नव्हते. या गणितज्ञांनी लहानातील अत्यंत लहान व मोठ्यातील अत्यंत मोठ्या संख्यांचाही विचार केला होता, असे त्यांनी केलेल्या अशा संख्याच्या नामकरणावरून वाटते. महाभारताच्या युद्धप्रसंगात वापरलेल्या अक्षौहिणी या शब्दावरून त्यांच्या कल्पनाविलासाची झलक आपल्या लक्षात आली असेलच. (एक अक्षौहिणी सैन्यात 21,870 रथ, 21,870 हत्ती; 65,610 घोडदळ व 109,350 पायदळ असतात व असल्या 18 अक्षौहिणी सैन्याचा वापर महाभारत युद्धाच्या वेळी केला होता असा उल्लेख महाभारत ग्रंथातील आदी पर्वात आढळतो.)

बौद्ध वाङ्मयातील अशा प्रकारच्या अती प्रचंड संख्यांचा उल्लेख आश्चर्यचकित करणारा आहे. भारतीय अंकगणनेनुसार दशम् (101), शतम् (102), सहस्र (103), दशसहस्र (104), लक्ष (105), दशलक्ष (106), कोटी (107), या चिरपरिचित आकड्यांबरोबरच खालील आकड्यांचा उल्लेखही बौद्ध वाङ्मयात सापडतो. *
1 आयुत = 100 कोटी (109 ),
1 ऩियुत = 100 आयुत (1011),
1 कंकर = 100 नियुत (1013),
1 विवर = 100 कंकर (1015),
1 क्षोभ्य = 100 विवर (1017),
1 विवह = 100 क्षोभ्य (1019),
1 उत्संग = 100 विवह (1021),
1 बहुल = 100 उत्संग (1023),
1 नागबल = 100 बहुल (1025),
1 तितिलंब = 100 नागबल (1027),
1 व्यवस्थानप्रज्ञापती = 100 तितिलंब (1029),
1 हेतुहिल = 100 व्यवस्थानप्रज्ञापती (1031),
1 कराहू = 100 हेतुहिल (1033),
1 हेत्विंद्रिय = 100 कराहू (1035),
1 समाप्तलंब = 100 हेत्विंद्रिय (1037),
1 गणनगती = 100 समाप्तलंब (1039),
1 निरवद्य = 100 गणनगती (1041),
1 मुद्राबल = 100 निरवद्य (1043),
1 सर्वबल = 100 मुद्राबल (1045),
1 विशज्ञगती = 100 सर्वबल (1047),
1 सर्वज्ञ = 100 विशज्ञगती (1049),
1 विभूतंगम = 100 सर्वज्ञ (1051),
1 तल्लक्षण = 100 विभूतंगम (1053)

(इंग्रजी स्पेलिंगवरून देवनागरीत शब्द लिहित असल्यामुळे चू.भू. संभाळून घेणे. संस्कृत/ अर्धमागधी/ पाली भाषातज्ञ यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.)

तल्लक्षण ही संख्या एवढी मोठी आहे की संपूर्ण विश्वाची लांबी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मीटरमध्ये मोजल्यानंतर येणाऱ्या संख्येचा वर्ग केल्यास ती संख्या तल्लक्षणाच्या जवळपास येईल. परंतु बुद्धकालीन गणितज्ञ येथेच थांबले नाहीत. यापुढील मोठमोठ्या संख्यांच्यासाठी ध्वजाग्रवती, ध्वजाग्रणीशामणी इत्यादी नामकरण असून शेवटची संख्या 1x10421 एवढी आहे. म्हणजे 10 पुढे 421 शून्य!

विश्वोत्पत्तीच्या महा विस्फोटा (Big Bang) नंतरच्या कालगणनेसाठी सर्वात लहान मापक म्हणून प्लांक काल (Planck Time) चा वापर होतो. एक सेकंद म्हणजे सुमारे 1x10-43, प्लांक काल. महा विस्फोटानंतर ते आतापर्यंत 1x1060 प्लांक काल एवढी अवधी झाली असेल. त्याचप्रमाणे विश्वभर व्यापलेल्या सर्व वस्तूंमधील एकूण अणूंची संख्या 1x1080 येवढी असेल. आतापर्यंतच्या अवधीच्या संख्येला एकूण अणूंच्या संख्येनी गुणिल्यावरसुद्धा 1060 X 1080 = 10140. ही संख्या 10421 या संख्येपासून किती तरी लांब आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ही बुद्धकालीन प्रचंड संख्या आपल्या व्यवहारात निरुपयोगी ठरेल!

बुद्धकालीन गणितज्ञ केवळ प्रचंड संख्येच्याच मागे होते असेही नाही. त्यांना सूक्ष्मातीसूक्ष्म संख्याही अवगत होती. त्या काळी 10 किमी अंतर मोजण्यासाठी योजन हा शब्दप्रयोग केला जात असे. (मुळात एक योजन म्हणजे एका दिवसात एकच बैल जुंपलेल्या गाडीने पार केलेले अंतर = सुमारे 14 किमी.) एक योजन अंतरात किती अणू असू शकतील याचा अंदाज त्यानी खालील प्रमाणे वर्तविला आहे.

1 योजन =4 कोस**
1 कोस= 1000 धनु
1 धनु= 4 रतन
1 रतन=2 वितास्ती
1 वितास्ती = 12 अंगुल
1 अंगुल = 7 जवाच्या दाण्याची लांबी
1 जवाच्या दाण्याची लांबी= 7 मोहरीच्या बियांची लांबी
1 मोहरीच्या बीची लांबी= 7 धोत्र्याच्या बियांची लांबी
1 धोत्र्याच्या बीची लांबी = गायीने उडविलेल्या 7 धुळीच्या कणांची लांबी
गायीने उडविलेल्या 1 धुळीच्या कणाची लांबी = उखळीने ठोकल्यावर उडणाऱ्या 7 धुळीच्या ठिपक्यांची लांबी
उखळीने ठोकल्यावर उडणाऱ्या 1 धुळीच्या ठिपक्याची लांबी = ससा पळताना उडालेल्या 7 धुळीच्या ठिपक्यांची लांबी
ससा पळताना उडालेल्या 1 ठिपक्याची लांबी = वाऱ्यामुळे उडालेल्या 7 ठिपक्यांची लांबी
वाऱ्यामुळे उडालेल्या 1 ठिपक्याची लांबी = 7 धुळीच्या कणांची लांबी
1 धुळीच्या कणाची लांबी = 7 सूक्ष्म कणांची लांबी
1 सूक्ष्म कणाची लांबी = 7 अणूंची लांबी

एका अंगुलाची लांबी सामान्यपणे 4 सेंमी असे गृहित धरून प्रत्येक वेळी 7 ने 10 वेळा भागाकार केल्यास एका अणूची लांबी 0. 04m X 7(10-10), = 0. 0000000001416 m एवढी होईल. ही लांबी कार्बनच्या अणूच्या लांबीशी जुळते.

अत्यंत प्रचंड व सूक्ष्मातीसूक्ष्म संख्येच्या वेडाने झपाटल्यासारखे त्याकाळचे गणितज्ञ होते. कदाचित मोठ - मोठ्या संख्यांचा वापर खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी होत असावा, हे मान्य करूनसुद्धा सूक्ष्मातीसूक्ष्म लांबी मोजण्यासाठी इतक्या गोष्टी कशा काय सुचल्या याचे खरोखरच आश्चर्य वाटू लागते.
*( वेदग्रंथामध्ये संख्यांच्याबद्दल दशम् (101), शतम् (102), सहस्र (103), आयुत (104), ऩियुत(105), प्रायुत (106), अर्बुद (107), न्यार्बुद (108), समुद्र (109), मध्य (1010), अंत (1011), परार्ध (1012), असाही उल्लेख आहे.)

**(काही संदर्भग्रंथाप्रमाणे 8 कोस = 1 योजन असाही उल्लेख आहे: 36 रथरेणू = 1 लिक्खा, 7 लिक्खा = 1 यव, 7 यव = 1 अंगुली, 24 अंगुली = 1 रतन, 4 रतन = 1 धनु, 500 धनु = 1 कोस, 8 कोस = 1 योजन (संदर्भ ))

संदर्भः Alex's Adventures in Numberland

लेखनविषय: दुवे:

Comments

एक संकलन म्हणून छान.

पण यावरून त्यांची फक्त कल्पनाशक्ती दिसते. नाहितर सश्याने किंवा गाईने उडवलेल्या धुळीएव्हडं मोघम एकक कुठल्याही शास्त्रशुद्धं अभ्यासासाठी निरुपयोगीच.

अवांतरः काही वर्षापुर्वी एका निरुपणात एक बुवा "अणुपासुनी बम्हांडा एव्हडा होत जात असे"चा दाखला देउन आपल्या संत मंडळींनी कित्येक शतके आधिच अणुचा आणि ब्रम्हांडाचा शोध लावला आहे असं सांगत होता.

समर्थ रामदासांच्या

मारुती स्तोत्रात हा उल्लेख आहे, हे साधारण ३०० वर्षे जुने आहे असे मानता येइल. आणि त्यावेळीही सर्वात लहान ते सर्वात मोठे (अणू ते ब्रह्मांड) असा उल्लेख करतात. अणू हा आजही सर्व साधारणपणे सर्वात लहान मानला जातो आणि पृथ्वी, जग, आकाश असे उल्लेख न करता अचूकपणे 'ब्रह्मांड म्हणजेच युनिव्हर्स' असे म्हणतात ह्याला काही तरी शास्त्राधार असणारच - ह्यावर इतर सदस्यांची मते वाचावयास आवडतील.
अवांतराबद्दल क्षमस्व...

1 धुळीच्या कणाची लांबी = 7 सूक्ष्म कणांची लांबी
1 सूक्ष्म कणाची लांबी = 7 अणूंची लांबी

---- !!!

७ आकडा बघून ऋषीमुनी हॅरी पॉटरच्या शाळेत शिकायला होते की काय असे वाटुन गेले.

अक्षौहिणी

लेख मनोरंजक झाला आहे. आकड्यांची नावांचा संग्रह आवडला. अणुची लांबी ही ठीक आल्याचे पाहून नवल वाटले. धुळीच्या कणाची लांबी, मोहरीच्या बीयांची लांबी, धोत्र्याच्या बियांची लांबी वगैरे गोष्टी मात्र अनुभवास जुळणार्‍या वाटल्या नाहीत.

यावरून आठवले महाभारतात अक्षौहिणी सैन्याचा उल्लेख आहे. त्यातील संख्या ही अशीच दिलेली आहे. ही संख्या चांगलीच अतिरंजित वाटली होती.

प्रमोद

गमतीदार

आकड्यांच्या नावांची यादी वाचून गंमत वाटली.

कदाचित मोठ - मोठ्या संख्यांचा वापर खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी होत असावा, हे मान्य करूनसुद्धा सूक्ष्मातीसूक्ष्म लांबी मोजण्यासाठी इतक्या गोष्टी कशा काय सुचल्या याचे खरोखरच आश्चर्य वाटू लागते.

मोठ्या संख्यांचा वापर खगोलशास्त्रासाठी केल्याचा संदर्भ आहे का? सूक्ष्म अंतरे कधी कोणी मोजली असल्याचा संदर्भ आहे कय?
नाहीतर दशमानपद्धती, गुणाकाराबरोबर भागाकाराचे ज्ञान हे भांडवल कल्पनाशक्तीकरिता पुरेसे आहे.

अंतर वा काल गणना

बौद्ध वाङ्मयातील ललितविस्तारसूत्रमध्ये लेखात उल्लेख केलेल्या प्रचंड संख्यांची नावं आहेत.

प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांना अंतर वा काल गणनेसाठी अशा प्रकारच्या ऩावांची नक्कीच गरज वाटली असावी. कारण त्या काळात विद्येचा व ज्ञानाचा प्रसार मुख्यत्वेकरून मौखिकरित्या होत असे. व त्यासाठी मोठमोठ्या आकड्यांचा उल्लेख एक दोन शब्दात करणे सोईचे ठरले असेल. आर्यभट्ट (इ.स. 476) याचे पृथ्वीचे स्वत:भोवतीचे 1587237500 प्रदक्षिणा म्हणजे चंद्राचे 57753336 पृथ्वीभोवतीचे प्रदक्षिणा हा उल्लेख कोटी, परार्ध ... हे शब्द वापरून सांगितल्यास नक्कीच अर्थबोध होत असावा.

सत्ययुग (1728000 वर्षे), त्रेता युग (1296000 वर्षे), द्वापार युग (846000 वर्षे), आणि आताचे कलीयुग (432000 वर्षे), यांची कालावधी पिढ्यान पिढ्या मौखिकरित्या लक्षात ठेवण्यासाठी ही नावे वापरली जात असावेत. (श्रृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे आयुष्य (311 ट्रिलियन्स 40 बिलियन्स, i.e. 311.04 x 1012 वर्ष! ), कल्प, प्रलय, घटिका, पळे, निमिष, क्षण, याम, इत्यादी संकल्पनासुद्धा अशाच प्रचंड व लहान संख्यांच्या उल्लेखातून स्पष्ट होतात; संदर्भ)

पद्म पुराणात या विश्वात 8400000 प्रकारचे प्राणी, 900000 प्रकारचे जलचर, 2000000 वनस्पती व 1100000 क्रीमी - कीटक आहेत असा उल्लेख आहे. कदाचित हे आकडे स्वप्नरंजनातून आलेले असावेत. परंतु यांच्या उल्लेखासाठी मोठ्या संख्यांच्या नावाचा वापर केला असावा.

भागाकार-गुणोत्तरांकरिता ठीक

भागाकार आणि गुणोत्तरांनी आवाक्यातल्या संख्या सांगण्याकरिता मोठ्या संख्या लागतील हा उपयोग बहुधा खराखुरा आहे. म्हणजे चंद्राचा भ्रमणकाल 1587237500/57753336 =२८.४८३०... दिवस आहे, हा उपयोग ऐहलौकिक आणि वाजवी वाटतो. कारण २८ आणि २९ या पूर्णांकामधील आंशिक भाग काही प्रमाणात मोजता येतो.

अर्थात 1587237500 दिवस (४३४५७३८ वर्षांपेक्षा अधिक) कोणी मोजमाप केले असा भ्रम न-झालेला बरा. आंशिक संख्या भागाकाराने सांगण्याकरिता मोठमोठाले आकडे फक्त सोयीकरिता वापरलेले आहेत.

तरी या भागाकाराकरितासुद्धा १०१० पेक्षा मोठ्या संख्या वापरणे म्हणजे कल्पनाविलासच होय.

काही सैद्धांतिक आकडे मोजमाप न-करतासुद्धा (रॅशनल संख्यांचे अवयव म्हणून) प्रचंड मोठ्या असतात. उदाहरणार्थ "पाय" (सैद्धांतिक वर्तुळाचा परिघ/व्यास). परंतु ही संख्या संगमग्रामाच्या माधवानेदेखील फक्त ११ दशमान आकड्यांपर्यंतच ठरवली. आणि हे इसवी १४-१५व्या शतकात).

चांगले संकलन

संकलन आवडले. दशमान पद्धतींवर मीरा फाटक यांनी मनोगतावर मानाचे दशमान हा लेख लिहिला होता त्याची आठवण झाली.

काय हे थोतांड

ही माहिती वाचुन गम्मत वाटली आणि सुशिक्षीत लोक काय गोष्टी खर्‍या मानुन घेत आहेत ते बघुन वाइट वाटले.

१. बुद्ध साहित्यात प्रचंड आकडे बघुन प्रभाकर काका चकीत झाले. त्यात चकीत होण्यासारखे काय आहे? १० चा ५३ वा घात का? ५३० वा घात घेउन त्याला पण काहीतरी नाव देता येइल. पण ह्या मोठ्या संख्येचा काही उपयोग केल्याचे दिसते का बुद्ध साहीत्यात?

२. भारतीय संस्क्रुती मधे प्रत्येक छोटी गोष्ट कित्येक पट करुन सांगण्याची पद्धत आहे. त्याचेच १८ अक्षौहिणी हे उदाहरण आहे.

३. ज्या काळी भारतीय लोकांना साधे अंतर मोजण्यासाठी काही standard scale करावी असे वाटले नाही, तिथे अणु चा आकार शोधणे म्हणजे नुस्त्या च गप्पा आहेत.

प्रभाकर काकां कडे कोणत्या खास जाती चे धोत्र्याचे झाड आहे ज्याच्या सगळ्या बिया एका च लांबीच्या असतात.

 
^ वर