ईदका चाँद आणि ब्ल्यू मून
या दोन्ही प्रकारच्या चंद्राचे उदाहरण साधारणपणे 'दुर्मिळ' या एकाच अर्थाने दिले जाते. एकादा माणूस सहसा भेटेनासा झाला तर त्याला उद्देशून "तुम तो भाई अब ईदका चाँद हो गये हो!" असे म्हंटले जाते आणि क्वचित कधी तरी घडणार्या घटनेला 'वन्स इन ए ब्ल्यू मून' असे म्हणतात. या दोन्ही प्रकारचे चंद्रदर्शन थोडे दुर्लभ असले तरी त्या अगदी वेगळ्या आणि परस्पराविरुध्द प्रकारच्या घटना असतात. ईदचा चंद्र दिसलाच तर तो अत्यंत फिकट रेघेसारखा दिसतो तर ब्ल्यू मून हा पौर्णिमेचा चंद्रमा चांगला गरगरीत आणि पूर्ण वर्तुळाकृतीच्या रूपात असतो. ईदका चाँद जेमतेम दिसला न दिसला एवढ्यात मावळून अस्ताला जातो तर ब्ल्यू मून रात्रभर पिठूर चांदण्याचा वर्षाव करत असतो.
प्रत्येक अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. त्याचा अर्धा भाग सूर्याकडे असतो आणि सूर्यकिरणांनी उजळत असतो, पण पाठीमागचा आपल्याला पृथ्वीवरून दिसणारा भाग अंधारात असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही असे कारण दिले जाते आणि ते बव्हंशी खरे आहे. पण खग्रास चंद्रग्रहणातसुध्दा काही मिनिटांसाठी पृथ्वीच्या छायेमधून चंद्र सरकत असतांना सूर्याची किरणे चंद्रावर पडू शकत नाहीत, तरीही पृथ्वीच्या वातावरणामधून परावर्तित झालेले सूर्यकिरण चंद्रावर पडतात आणि पृथ्वीच्या प्रकाशात तांबूस रंगाचा चंद्राचा आकार आपल्याला दिसतो. चांदण्या रात्री जसे चंद्राच्या प्रकाशात आपल्याला पृथ्वीवरले आजूबाजूचे दिसते, तसेच पृथ्वीच्या प्रकाशात चंद्रावरचेही दिसते. पण अमावास्येला हे सुध्दा घडत नाही. याचे मुख्य कारण असे आहे की अमावास्येच्या रात्री चंद्र आकाशात मुळी हजरच नसतो. त्या दिवशी तो सकाळी साधारणपणे सूर्याबरोबरच पण त्याच्या थोडासा बाजूला पूर्वेलाच उगवतो, दिवसभर सूर्याच्या जवळच राहून आभाळात भ्रमण करतो आणि त्याच्याबरोबरच सायंकाळी पश्चिमेला आपल्या अस्ताच्या जागी मावळून जातो. रात्रीच्या संपूर्ण काळात तो क्षितिजाच्या खालीच असतो.
साधारणपणे असे असले तरी सूर्य आणि चंद्र यांच्या आकाशमार्गे जाण्याच्या गतींमध्ये थोडा फरक असतो. सूर्याच्या मानाने चंद्र किंचित सावकाशपणे चालतो आणि जास्त वेळ आकाशात असतो. त्यामुळे अमावास्येच्या नंतर आलेल्या शुक्ल प्रतीपदेच्या दिवशी सूर्याच्याबरोबर किंवा थोड्या वेळानंतर चंद्र उगवतो, पण त्याची कला अत्यंत निस्तेज आणि आकार एकाद्या बारीक रेघेसारखा असल्यामुळे सूर्याच्या प्रखर प्रकाशात आपल्याला चंद्र दिसू शकत नाही. सूर्यास्तानंतर काही काळ हा क्षीण चंद्र मावळतीजवळच्या आकाशात असतो. पण सूर्य मावळून गेल्यानंतरसुध्दा बराच वेळ त्याचा उजेड आकाशात पसरलेला असल्यामुळे त्यात चंद्र ओळखून येत नाही. अनेक वेळा आकाशातले धूलिकण किंवा हलकेसे पांढरे ढग सुध्दा त्याला झाकून टाकतात. यामुळे प्रतिपदेचा चंद्र पहाणे थोडे कठीण असते. इस्लामी पध्दतीनुसार अमावास्येनंतर चंद्र दिसल्यानंतरच पुढील महिना सुरू होतो. रमजानच्या महिन्यात महिनाभर दिवसाचा उपास केलेला असल्यामुळे त्याची सांगता ईदच्या सणात उत्साहाने केली जाते. यामुळे या ईदच्या चाँदला जास्त महत्व असते. पण सर्वसामान्य लोकांना तो सहसा सहजपणे दिसत नाही. कोणाला तो दिसेल आणि कोणाला दिसणार नाही. यावरून मतभेद आणि वाद होतील. ते टाळण्यासाठी नव्या महिन्याची सुरुवात करणारा चंद्र कोणी पहावा आणि ते जाहीर करावे याचे अधिकार विशिष्ट धर्मगुरूंना दिले आहेत. त्यामुळे अमक्या शहरात चंद्र दिसला आणि ईद साजरी झाली, दुसर्या शहरात तो दिसला नाही. अशा प्रकारच्या बातम्या वाचनात येतात. द्वितीयेच्या चंद्रकोरीने जरासे बाळसे धरलेले असते आणि ती कोर सूर्यास्तानंतर तास दीड तास आकाशात असते आणि सहजपणे दिसते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आज ईद साजरी झाली नाही तर उद्या ती नक्कीच होते.
ब्ल्यू मून हा मुळीसुध्दा निळा नसतो. इतर कोणत्याही पौर्णिमेप्रमाणे तो सुध्दा शुभ्र धवलकांती किंवा किंचित केशरी छटा असलेला ऑफव्हाईट असतो. याचे नवल एवढ्याचसाठी असते की एकाच इंग्रजी महिन्यांतला तो दुसरा पूर्णचंद्र असतो. फेब्रूवारीचा अपवाद वगळता इतर इंग्रजी महिन्यांमध्ये तीस किंवा एकतीस दिवस असतात आणि एका पौर्णिमेपासून दुसर्या पौर्णिमेपर्यंतचा कालावधी सुमारे एकोणतीस ते तीस दिवस एवढा असतो. त्यामुळे बहुतेक वेळा एका महिन्यात एकच पौर्णिमा येते. पण एकादे वेळेस महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १ तारखेला पौर्णिमा आली तर पुढील पौर्णिमा त्या महिन्याच्या अखेरीस येते. त्याला ब्ल्यू मून (डे किंवा नाईट) असे म्हणतात. भारतीय पंचांगात एका अमावास्येला सूर्याने एका राशीतून पुढील राशीत संक्रमण केले आणि पुढील अमावास्येपर्यंत तो त्याच राशीत राहिला तर अधिक महिना येतो. तसाच हा प्रकार आहे. यामुळेच तीस बत्तीस महिन्यांनंतर अधिक महिना येतो त्या प्रमाणे तीस बत्तीस महिन्यांनंतर ब्ल्यू मून येतो. दर एकोणीस वर्षात सुमारे सात वेळा हा योग येतो.
ब्ल्यू मूनच्या बाबतीत आणखी एक गंमत आहे. एकादे वर्षी १ जानेवारीला पौर्णिमा असली तर ३१ तारखेला पुढली (दुसरी) पौर्णिमा म्हणजे ब्ल्यू मून येईल, पण पुढे २८ दिवसांचा फेब्रूवारी महिना उलटून गेला तरी त्याच्या पुढची पौर्णिमा येतच नाही. ती तिसरी पौर्णिमा मार्चच्या १ तारखेला आली तर त्यानंतरची चौथी पौर्णिमा पुन्हा मार्चमध्येच ३१ तारखेला येईल. अशा रीतीने तीन महिन्यातच दोन ब्ल्यू मून येतील. हा योगायोग पुन्हा पुन्हा येण्यासाठी मात्र मध्ये अनेक वर्षे जावी लागतील.
या वर्षी ऑगस्ट महिन्यात ब्ल्यू मूनही आला, रमझान ईदही आली आणि अधिक महिनाही सुरू झाला. तो आणखी थोडे दिवस राहणार आहे. असा योगायोग पुन्हा किती वर्षांनंतर येणार आहे कोण जाणे. त्याचे गणित आहे आणि तज्ज्ञ मंडळी ते नेमकेपणे सांगू शकतील, पण माझी धाव तिथपर्यंत जात नाही.
Comments
आभार!
घारे सरांचे लेखन 'वन्स इन अ ब्ल्यु मुन' येत असले तरी ते ईदच्या चंद्राइतकेच आनंद देऊन जाते.
माहितीपूर्ण लेखन! आभार!
छान
थोडक्यात नेहमीप्रमाणेच साधीसरळ सोपी माहिती. आवडली. :-)
नेहमीप्रमाणेच मस्त माहिती.
नेहमीप्रमाणेच मस्त माहिती.
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर "आधिक महिना" हे आहे. आत्ता पूर्णपणे आठवत नाही पण www.avakashvedh.com वर विस्तृत विवेचन आहे. (ऑफिसातून साईट ब्लॉक असल्याने दुवा देता येत नाही.)
अवकाशवेध
हे अतीशय सुंदर आणि माहितीपूर्ण संकेतस्थळ आहे. आकाशामधील ग्रह व तारे यांची भरपूर सचित्र आणि मनोरंजक अशी सविस्तर माहिती त्या स्थळावर मिळते. पण ब्ल्यू मून, रमझान ईद आणि अधिक महिना या युरोपीय, अरब आणि भारतीय संकल्पना एकाच महिन्यात येतील असा योगायोग पुन्हा किती वर्षांनंतर येणार आहे या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर तिथे मिळेल असे मला वाटत नाही. निदान वर वर पाहता तरी मला तसे दिसले नाही.
मस्त
मस्त माहिती, अनेक धन्यवाद.
ब्ल्यु मून आणि रमझान
लेख आणि प्रश्न आवडला. लेखातील अमावस्येच्या चंद्राचे स्पष्टीकरण फार छान जमले आहे. यावरून त्यासारखा एक प्रश्न आठवला चंद्रकोर नेहमी आपल्याला खाली कोर वरती काळोख अशी दिसते. तशी ती का दिसते? उलटी कोर का दिसत नाही. किंवा शुक्ल पक्षातील संध्याकाळची कोर सुलटी दिसते तर कृष्णपक्षातली पहाटेची कोर कशी दिसेल?
ब्ल्यु मून आणि ईद का चांदवर थोडेफार अकलेचे तारे तोडतो.
चांद्रमास २९.५ दिवसांचा मानला तर ३१ दिवसांच्या महिन्यात पौर्णिमा दोनदा येण्याची शक्यता (३१-२९.५)/३१ एवढी असेल. (चु.भू.दे.घे.)
३० दिवसांच्या महिन्यात हाच आकडा (३०-२९.५)/३० एवढा असणार.
वार्षिक ३१ दिवसांचे ७ महिने आणि ३० दिवसांचे ४ महिने घेतले तर एका वर्षातील शक्यता ढोबळमानाने ७*१.५/३१ + ०.५*४/३० म्हणजे साधारणपणे १२.५/३० म्हणजे ०.४ एवढी असणार. म्हणजेच साधारणपणे अडीच वर्षात एकदा ब्ल्यु मून येणार. एका वर्षात साधारण पणे एकदाच रमझान ईद येते. (एका सौर वर्षात दोनदा रमझान ईद आता पर्यंत किती वेळा आली असणार हा एक उपप्रश्न तयार होतो. आणि यास काय म्हणायचे?) अडीच वर्ष गुणिले १२ म्हण्जे ३० वर्षात रमजान आणि ब्ल्यु मून एकत्र येणार.
प्रमोद
चांगले प्रश्न
१.चंद्रकोर नेहमी सुलटीच का दिसते?
या प्रश्नाचे सविस्तर सचित्र उत्तर एक वेगळा लेख लिहून द्यावे लागेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास चंद्राच्या ज्या बाजूला सूर्य असतो तिकडचा भाग त्याच्या प्रकाशात उजळलेला दिसतो.
कृष्ण पक्षातील त्रयोदशीला पहाटे उठून सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजाकडे पहा, तेंव्हा दिसणारी चंद्राची कोर डिट्टो शुक्ल पक्षामधील द्वितियेच्या संध्याकाळी पश्चिमेकडे दिसणार्या कोरेसारखी दिसते.
२.साडे एकोणतीस, तीनशे पासष्ठ पूर्णांक एक चतुर्थांश वगैरे आडमोडी आकड्यांमुळे या शास्त्रामधील गणिते बरीच गुंतागुंतीची होतात. भारतीय पंचांगातली तिथी केंव्हाही सुरू होते आणि संपते, पण कॅलेंडरमधला दिवस चोवीस तासांचाच असावा लागतो, त्यामुळे महिन्यामधील दिवसांचे आकडे निरनिराळे असतात. सोप्या अंकगणितातून हे प्रश्न समाधानकारक रीत्या सुटत नाहीत
खगोलशास्त्रात नेमकेपणा आवश्यक असतो. स्टॅटिस्टिक्सप्रमाणे शक्यता वर्तवून चालत नाही.
३.एका सौर वर्षात दोनदा रमझान ईद आता पर्यंत किती वेळा आली असणार हा एक उपप्रश्न तयार होतो. आणि यास काय म्हणायचे?
हिजरी कॅलेंडरनुसार फक्त ३५४ दिवसांचे एक वर्ष असते. त्यामुळे १ ते ११ जानेवारीमध्ये एक ईद आली तर त्याच वर्षाच्या २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान पुढील वर्षाची ईद येणारच. त्यालाही ईदच म्हणायचे. आणखी काय म्हणणार?
याच काळात मराठी पंचांगाप्रमाणे कोणाचा वाढदिवस येत असेल तर त्याचेही तिथीनुसार दोन वाढदिवस एकाच वर्षात येतील. पण तीन वर्षात एक अधिक महिना आला की ते वर्ष ३८४ दिवसांचे होईल आणि त्या वर्षात त्या माणसाचा एकही वाढदिवस येणार नाही.
मस्त....
सोपे, पण माहितीपर.
उपक्रम नावाचे थिएटर असेल, तर तुमचे लेख ही त्यातली सर्वात दर्जेदार मूव्हिंपैकी एक मूव्हि आहे.
उपक्रमाला यायचे पैसे असले असते तर मी चित्रपटाला मुद्दाम बाल्कनीत जागा शोधतो तसे किम्वा नाटकाला पहिली राम्ग पटकावतो तशा जागेचे महागडे तिकिट काढण्यास तयार असेन.