नेटिझन्सचा उर्मटपणा!

संगणक (व संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधा) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. तरीसुद्धा नेटवर वावरणार्‍यांसाठी काही नीती - नियम, आचारसंहिता वा स्वनियंत्रण असे काहीही नसल्यासारखे नेटिझन्सचे वर्तन असते.

नेटवरील माहिती संकलन व होत असलेले विनिमय यांचे विश्लेषण केल्यास 16.8 कोटी डीव्हीडी भरतील एवढ्या माहितीची देवाण घेवाण एका दिवसात होत आहे. प्रती दिवशी 29400 कोटी ई मेल्स पाठवल्या जात असतात. रोज 20 लाख ब्लॉगपोस्टवर मजकूर चिटकवला जात असतो. या ब्लॉगपोस्टवरील मजकुरांची मुद्रित प्रत काढल्यास 60- 64 पानाच्या साप्ताहिकाला पुढील 770 वर्षे पुरेल एवढा मजकूर उपलब्ध होऊ शकेल. 17.2 कोटी नेटिझन्स फेसबुकला भेट देतात. यासाठी 470 कोटी मिनिटं खर्ची घातल्या जातात. रोज 25 कोटी फोटो अपलोड होतात. या अपलोड झालेल्या फोटोंचे प्रिंट्स काढून एकावर एक ठेवल्यास 80 एफेल टॉवर्स इतकी उंची होईल. नेटवरून रोज 2.2 कोटी तास जुने चित्रपट व सिरियल्स बघण्यासाठी खर्ची घातला जातो. रोज 864000 तासाचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्या जातात. एकट्यानेच रोज, 24 तास, हे सर्व बघायचे ठरविल्यास 98 वर्षाचा काळ सहजपणे निघून जाईल. रोज 1.87 कोटी तास संगीत ऐकले जाते. प्रती दिवशी 1288 अप्लिकेशन्स अपलोड होतात व 3.5 कोटी अप्लिकेशन्स डाउनलोड होतात.

इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लॉगोस्फेर व इतर गोष्टी आपल्या जीवनाचा ताबा घेत असल्यामुळे आपण सर्व संगणक, इंटरनेट व इतर माहिती तंत्रज्ञानाच्या सोई - सुविधांची गुलामी करत आहोत की काय असे वाटू लागले आहे. सिटीझन्सचे रूपांतर नेटीझन्समध्ये झपाट्याने होत आहे. यानंतरच्या पुढच्या पिढीच्या दिवसाची विभागणी झोप व ऑनलाइन अशीच करावी लागणार आहे. झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल कानाशी व लॅपटॉप समोर अशा अवस्थेतून ही पिढी जाणार आहे. गंमत अशी आहे की कुणीही उठावे व लाइक/डिसलाइक वर क्लिक करत रहावे अशी स्थिती आता आहे. विकिपिडियातील पानांचाही यातून सुटका नाही. हातात माउसचे बटन आहे, व नेट कनेक्ट आहे एवढ्याच भांडवलावर या गोष्टी सर्रासपणे होत आहेत. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्कसुद्धा नेटिझन्सच्या मनमानीपणातून सुटलेले नाही.

ब्लॉग, फोरम, वा फेसबुक वरील प्रतिसाद/प्रतिक्रिया वाचत असताना चर्चेसाठीच्या धाग्याबद्दल (उगीचच्या उगीच) उलट - सुलट, टोकाचे व काही वेळा कुत्सित मत प्रदर्शन करत असल्याचे प्रमाण वाढत आहे. मराठी नेटवर जरी हे काही प्रमाणात कमी वाटत असले तरी इंग्रजीतील - विशेष करून राजकीय, आर्थिक व सामाजिक विषयावरील - धाग्यांच्या संदर्भात नेटिझन्सचा भावनोद्रेक प्रकर्षाने जाणवतो. आपण केलेली विधाने, आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो. विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो. क्षुल्लक विधानावरून तावातावाने भांडत असल्याचे चित्र बघायला मिळते. काही वेळा शिवराळ भाषा वापरली जाते. काहींना साधे लिहितानाही शिव्याची पेरणी करण्याचा सोस असतो. त्यांना साधे लिहिता येत नाही. साधे व सरळ लिहिल्यास आपल्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही, असा त्यांचा समज असतो. व अशा ट्रॉल्सच्या (trolls) संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. परंतु मानसतज्ञांच्या दृष्टीने नेटिझन्सची ही वर्तणूक सवयीत बदलल्यास सामाजिक व संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास इजा पोचू शकते. म्हणूनच वेळीच जागे होऊन अशा गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे आग्रह ते धरू लागले आहेत. मुळात अशा नेटिझन्सच्या बहुतेक प्रतिक्रिया केवळ आक्रमक या सदरात मोडतात. त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. आपले म्हणणे कुणीच ऐकत (वाचत) नाही म्हणून ते वैतागलेले असतात. मानसतज्ञांच्या मते आपल्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद यात इतकी भावनिक गुंतवणूक करणेसुद्धा हानिकारक ठरणार आहे. गंमत अशी आहे की जेव्हा नेटिझन्स थंड डोक्याने विचार करू लागतात तेव्हा हे सर्व चुकीचे होते हेही त्यांना कळत असते.

तरीसुद्धा ही मंडळी असे का वागतात?
अनेक घटक एकाच ठिकाणी जमत असल्यामुळे उर्मटपणा, उद्धटपणा, आक्रमकता, खोडसाळपणा इत्यादींचा विस्फोट होत असावा असे तज्ञांना वाटत आहे. मुळात प्रतिसाद देणारे व धागाकर्ते बिनचेहर्‍याचे, मुखवटे चढवलेले व एकमेकांना ओळखत नसल्यामुळे चिखलफेक करण्यात कुणालाही संकोच वाटत नाही. संताप व्यक्त करणारे कुठे तरी दूर असण्याची शक्यता असल्यामुळे आपले कुणीही वाकडे करणार नाही, आपल्याला शारीरिक इजा होणार नाही, याची त्यांना खात्री असते. समोरासमोर असल्यास अशा प्रकारची टीका टिप्पणी ते कधीच करणार नाहीत. याशिवाय प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा काही तरी लिहिणे अगदी सोपे असते. मुळात ब्लॉग, फोरम, ई - मेल अकौंट, लॉगइन, पासवर्ड इत्यादीसाठी आर्थिक वा तांत्रिक अशी कुठलीही अडचण नसल्यामुळे जाता जाता पिंक मारणार्‍यांची संख्या वाढत आहे.

प्रतिसाद लिहिणार्‍यांकडे भरपूर वेळ असणे हेसुद्धा एक कारण असावे. व एका प्रकारे ते त्यांचे स्वगत भाषणच असते. या स्वगत भाषणात कुठलीही टोकाची भूमिका घेतली तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. माणसं प्रत्यक्ष संवाद साधत असताना एकमेकांच्या देहबोलीनुसार आक्रमकता कमी जास्त करतात. कुठे थांबावे, कुठे रेटावे, याची कल्पना दोघांनाही असते. राग आला तरी ते व्यक्त करण्यात थोडीशी सुसंकृतता त्यात असते. त्यामुळे रागाच्या भरात दोन शब्द जास्त उच्चारले तरी काही वेळातच राग शांत होऊन संवाद मूळपदावर येऊ शकतो.

याचबरोबर आपण काही तरी भव्य दिव्य करत आहोत अशा पवित्र्याने नेटवरील प्रतिक्रिया लिहिली जात असते. मुळात हा पवित्रा तद्दन खोटा, अविचारी व अविवेकी असतो. दुसरे म्हणजे सुरक्षित ठिकाणी बसून काहीही खरडायला फार मोठे बुद्धीकौशल्यही लागत नाही. उपदेशाचे डोज पाजणे, सल्ला देत राहणे, प्रसंगाची चिरफाड करणे, मूळ मुद्दा सोडून कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवर भाष्य करणे यातच ते स्वत:ला धन्य समजतात. त्यामुळे धाग्यावरील चर्चा भरकटत जाते व हाती काही लागत नाही.

अजून एका तज्ञाच्या मते नेटिझन्सच्या या उर्मटवृत्तीला काही अंशी इलेक्ट्रॉनिक माध्यम जबाबदार आहे. टीव्हीसारख्या माध्यमावरील चर्चेत भाग घेणार्‍यांसाठी आपण कसे बोलावे, कसे वागावे याबद्दल कुठलिही आचारसंहिता नाही. चर्चेपूर्वी कुणी तरी जबाबदार व्यक्ती काही ब्रीफिंग देतही नसेल. चर्चेच्या दरम्यान टोमणे मारणे, एकमेकाचे उखाळे पाखाळे काढणे, नको त्या गोष्टी उकरून काढणे, विषयाशी धरून न बोलणे इत्यादी गोष्टी न्यूज व इतर चॅनेल्सवर बघून सवय झालेले नेटिझन्स जेव्हा संधी मिळते तेव्हा झोडपून काढण्याच्या पावित्र्यात असतात. माध्यमं जर जबाबदारीने, संयमितपणे चर्चेचे संयोजन करत असते तर कदाचित नेटिझन्स एवढे आक्रमक झाले नसते.

एक मात्र खरे की इतर कुठल्याही माध्यमापेक्षा इंटरनेटचा वापर यानंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे नेटिझन्सच्या विधानांना गंभीरपणे घेण्याकडे कल वाढत जाणार. अशा वेळी काहीतरी पोरकट विधान करून स्वत:चे हसे करून घेण्यात हशील नाही, हे आता नेटिझन्सना कुणी तरी सांगण्याची गरज आहे. नेटवरील चर्चा सुरळितपणे चालावी ही संयोजकांची जबाबदारी असते. चर्चेतून काही तरी निष्पन्न होणे अपेक्षित असते. काही नवीन माहिती, माहितीत भर, नवीन मुद्दे, यामुळे चर्चा रंगू शकते. येथे मात्र त्याचीच उणीव भासत आहे. दुसर्‍या नेटिझन्सचे काहीही ऐकायचे नाही हाच अजेंडा पुढे ठेऊन सर्व जण आक्रमकपणे चर्चेत भाग घेत असतात. आक्रमकतेने एखादा चांगला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केल्यास वाचकांचे लक्ष मुद्याकडे न जाता आक्रमकतेकडेच जास्त जाते. त्यामुळे जे काही पटवून द्यायचे असते ते बाजूला राहते. व चर्चा भलत्याच ठिकाणी वाहवत जाते.

नेटिझन्सनी टीव्हीसारख्या माध्यमाचा कित्ता गिरवला पाहिजे अशी काही अट नाही. संयमितपणे व विचारपूर्वक केलेले भाष्य चर्चा पुढे नेण्यास मदत करत असते. त्यामुळे ब्लॉग्स व फोरमच्या चालकानी वेळीच दखल घेऊन अशा उर्मट नेटिझन्सना दूर ठेवण्यासाठी काही तंत्रज्ञान विकसित करण्याची वा नियमाची चौकट तयार करण्याची गरज भासत आहे.

संदर्भ

Comments

ट्रोल्सवरील चित्रफीत

चांगला लेख

मला तर कधी कधी उर्मटपणा पेक्षा उन्माद अथवा सोप्या भाषेत 'माज' जास्त दिसतो. तो मानवी स्वभावाचा भाग आहे. प्रत्यक्ष भेटी व जालावरील भेटी यात शेवटी काही फरक असल्याने प्रत्येकाची मर्यादा व बलस्थाने वेगळी आहे. आपण इतरांपक्षा कसे श्रेष्ठ आहोत हे इतरांवर ठसवणे हे त्यांच्या अस्तित्वाची गरज असते. असो वेगवेगळे जालदांडगे पहाण्यातही मौज वाटते कधी कधी.

नेटिझन

मी मरठीत हलीच नेटिझन झालो आहे.
इथे मजा येतेय! तुम्हि म्हणता तसा वाइट अनुभव नाही

लेख आवडला

नेटावर प्रत्येकजण इतरांना ट्रोल आणि स्वतःला पिडीत समजत असतो; या पुढे अधिक बोलण्याची गरज वाटत नाही. असो.

चालायचंच..

कालाय तस्मै नम:

अहो पण नानावटी साहेब, हे सगळं लिहायला तुम्ही स्वत:ही शेवटी नेटचाच आधार घेतलाय की..! :)

तात्या.

सहमत

मुळात प्रतिसाद देणारे व धागाकर्ते बिनचेहर्‍याचे, मुखवटे चढवलेले व एकमेकांना ओळखत नसल्यामुळे चिखलफेक करण्यात कुणालाही संकोच वाटत नाही

हे अगदी पटले.
आपली ओळख लपवून हवा तो धिंगाणा घालायचे परमिट (कधी कधी संस्थळाकडूनच) मिळाल्यावर असल्या ट्रोलांकडून काय अपेक्षा ठेवायची?

म्हणजे?

आपली ओळख लपवून हवा तो धिंगाणा घालायचे परमिट (कधी कधी संस्थळाकडूनच) मिळाल्यावर असल्या ट्रोलांकडून काय अपेक्षा ठेवायची?

असे परमिट न देणारी संकेतस्थळे (विशेषतः संवादी संकेतस्थळे) माहित आहेत का तुम्हाला? कारण माझ्यामते, मनोगत, मायबोली, उपक्रम, मिसळपाव आणि ऐसीअक्षरेवरही असे परमिट मिळतेच.

बाकी ट्रोलिंगसाठी ओळख लपवायची गरज नसते हे वेगळ्याने सांगायला नको. काही माणसे त्याच उद्देशाने काही संकेतस्थळांवर वावरत असतात.

ऑनलाईन डिसइन्हिबिशन इफेक्ट

उपक्रमवर ओळख लपवून धिंगाणा घालायचे परमिट आहे? नव्या माहितीबद्दल आभार!
बाकी उल्लेखलेल्या व न उल्लेखलेल्या अन्य संस्थळांवर ओळख दाखवून वा लपवून धिंगाणा घालण्याचे परमिट असल्याचे मी अजून तरी वाचलेले नाही. (माझी वाचन मर्यादाही असेल कदाचित)

बाकी संकेतस्थळे म्हटल्यावर फक्त मराठी संस्थळेच सुचतात याची गंमत वाटली.
माझ्या मते श्री नानावटी याच्याकडेनिर्देश करत होते.

स्वतःला किती त्रास द्यायचा!

उपक्रमवर ओळख लपवून धिंगाणा घालायचे परमिट आहे? नव्या माहितीबद्दल आभार!
शांत व्हा आणि ट्रोलिंग बंद करा बघू आधी. स्वतःला किती त्रास द्यायचा!

प्रशासन समर्थ आहे!

हे ट्रोलिंग नहिच्चे! असते तर एव्हाना उपक्रम प्रशासनाने उडवले असते असा पूर्वानुभव आहे
तुम्हाला काळजी नको, इथले प्रशासन समर्थ आहे!

नक्कीच

प्रशासन समर्थ आहे हे नक्कीच पण उपक्रमवर सहसा ट्रोलिंग उडवले जात नाही. फारच वैयक्तिक कोणी लिहित असेल आणि फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने लिहित असेल तर ते उडवले जाते. अन्यथा, "हे असे करू नका" अशी विनंती इतर सदस्य करतात.

तशीच मीही विनंती करते की उपक्रमवर येत चला, लिहित चला पण इथे कृपया ट्रोलिंग करू नका आणि हे तुम्हालाच नाही तर इतर सर्वांनाच लागू आहे.

नीट वाचा

उपक्रमवर ओळख लपवून धिंगाणा घालायचे परमिट आहे? नव्या माहितीबद्दल आभार!
बाकी उल्लेखलेल्या व न उल्लेखलेल्या अन्य संस्थळांवर ओळख दाखवून वा लपवून धिंगाणा घालण्याचे परमिट असल्याचे मी अजून तरी वाचलेले नाही. (माझी वाचन मर्यादाही असेल कदाचित)

बाकी संकेतस्थळे म्हटल्यावर फक्त मराठी संस्थळेच सुचतात याची गंमत वाटली.
माझ्या मते श्री नानावटी याच्याकडेनिर्देश करत होते.

नानावटी कशाकडेही निर्देश करो तुमचे निर्देश कुठे आहेत हे एव्हाना सर्वांना कळलेले आहे.

वर काय लिहिले आहे ते नीट वाचा. असे परमिट सर्वच संकेतस्थळांवर आहेत. तुमचे वाचन मर्यादित आहे याबद्दल शंका नाहीच. तुम्हीच ते कबूल केल्याबद्दल अनेक धन्यवाद पण तुमची आठवण मर्यादित असू देऊ नका कारण यापूर्वीही मी तुम्हाला इतर (जसे, याहू, हॉटमेल वगैरे) संकेतस्थळांवर एकापेक्षा अधिक इमेल आयडी काढता येतात, ओळख लपवता येते आणि त्याला परवानगी असल्याचे पटवून दिले होते. तरीही तुम्हाला ते आठवू नये आणि वर लिहिलेली फक्त उपक्रमवरील आरोपबाजी पाहता तुमचा उद्देश ध्यानी येतो आहे. यावेळी मराठी संकेतस्थळांविषयी लिहिले कारण तुमचा वावर तेथे जास्त असतो आणि मागे उपक्रमची बदनामी करताना तुम्ही त्यांचा वापर केला होता. अन्यथा, फेसबुकवरही ओळख लपवता येते वगैरे साधी गोष्ट तुम्हाला माहित नसावी याचे वैषम्य वाटते.

असो.

प्रथेप्रमाणे,

मागे उपक्रमची बदनामी करताना तुम्ही त्यांचा वापर केला होता

प्रथेप्रमाणे, मीही विनंती करतो की उपक्रमवर येत चला, लिहित चला पण इथे कृपया चुकीची माहिती पसरू नका आणि हे तुम्हालाच नाही तर इतर सर्वांनाच लागू आहे.
जर उपक्रमावर बदनामी व्हावे असे काही घडलेच नसेल तर बदनामी होईलच कशी? असो. माझ्याकडून इत्यलम!

माहिती योग्य आहे.

तुम्ही टाकलेल्या चर्चेला ऐसी अक्षरे आणि मनोगत आणि मी मराठी यांनी ज्या प्रकारे ट्रिटमेंट दिली त्यावरून जे झाले ते स्पष्ट आहे. उपक्रमनेही तुमची चर्चा येथे का ठेवली हे सांगितले होते. त्यामुळे माहिती चुकीची नाहीच आणि त्यातून तुमचे आजचे प्रतिसादही बरेच काही सांगणारे आहेत.

तेव्हा तुम्ही यावर थांबावे, मीही थांबतेच आहे तरीही एक शेवटचे - उपक्रमचे तुम्ही जुने सदस्य आहात. येथे तुम्ही केलेल्या लेखनाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. उपक्रमबद्दल तुम्हाला प्रेम उरले असेल किंवा नसेल पण इथे जो वेळ घालवता तो चांगले वाचण्यासाठी आणि चांगले लिहिण्यासाठी खर्च करावा ही विनंती.

पटले नाही

संताप व्यक्त करणारे कुठे तरी दूर असण्याची शक्यता असल्यामुळे आपले कुणीही वाकडे करणार नाही, आपल्याला शारीरिक इजा होणार नाही, याची त्यांना खात्री असते. समोरासमोर असल्यास अशा प्रकारची टीका टिप्पणी ते कधीच करणार नाहीत. याशिवाय प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा काही तरी लिहिणे अगदी सोपे असते. मुळात ब्लॉग, फोरम, ई - मेल अकौंट, लॉगइन, पासवर्ड इत्यादीसाठी आर्थिक वा तांत्रिक अशी कुठलीही अडचण नसल्यामुळे जाता जाता पिंक मारणार्‍यांची संख्या वाढत आहे.
पटले नाही. ह्यात शारीरिक इजा झाल्याशिवाय किंवा काही वाकडे झाल्याशिवाय ही मंडळी काही ऐकणार नाहीत, त्यामुळे तसे व्हावे असा एकंदर सूर दिसतो आहे. मला वाटते लेखकाला आंतरजालाचे मुख्य आकर्षण काय ते कळलेले नाही. आंतरजालाचे मुख्य आकर्षण आहे स्वांतंत्र्य. आता एखादा मुखवटा घालतो की खरा चेहरा मिरवतो ह्या गोष्टीला हे स्वातंत्र्य स्वीकारले की काही अर्थ उरत नाही. हिंसेसाठी जोपर्यंत कुणी प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे चिथावणी देत नाही तोपर्यंत एखाद्याविषयी कोण काय बोलते आहे ह्याबद्दल फार हळवे होण्यात अर्थ नाही.

नेट वरील भांडणे

अतिशय उत्तम लेख. तुम्ही अगदी योग्य शब्दात वस्तुस्थिती मांडली आहात.

 
^ वर