देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....
वैधानिक इशारा:-
पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.
काही शे सामंतांचे/knights लोकांचे विखुरलेले प्रदेश अशीच ह्यांची रूपे होती. त्यातल्या त्यात एकसंध होता रशिया(आणि ऑस्ट्रियाही), पण तोही मागच्या पन्नासेक शतकात पीटर द ग्रेटच्या काळातच उभा राहू लागलेला. स्वीडन, तुर्कस्थान ह्यांचे काही भाग मारुन समुद्रापर्यंत प्रथमच त्याने सलग अशी रशियन सत्ता प्रस्थापित केली.
स्वित्झर्लंड, डेन्मार्क, पोलंड हे ही असे बर्यापैकी विखुरलेलेच होते. त्यांचे आकार पाहिले तर आपल्या मैसूर(टिपू सुल्तान), हैद्राबाद(निजाम) आणि पुणे-सातारा(पेशवे-छत्रपती) ह्यांच्या राज्यांपेक्षा काही फार मोठे नव्हते.
म्हणे भारत विखुरलेलाच होता, "एकसंध" नव्हता.
अहो, प्रशिया हा जर्मनीचा आज एक प्रांत आहे. त्या एका प्रांतातील काही भागावर एका घराण्याची सत्ता होती. एकोणीसाव्या शतकात इतरांवर हल्ले करत , ते जिंकत त्याने आजचा जर्मनी म्हणतात त्या धर्तीवरचा सलग देश उभा केला.
तीच कथा इटालीची. गॅरिबाल्डी, मॅझिनी ह्यांच्या सशस्त्र क्रांतीमुळे इटाली नावाचे काहीएक एकसंध अस्तित्वात आले.
संपूर्ण जग तेव्हा nation , country(राष्ट्र, देश) ह्या शब्दांतील फरक शोधत होतं.
nation हे एखाद्या जातीचं, जमातीचं, मोठं रूप(extension) मानलं जात होतं.race आणि nation (वंश/कबिला/टोळी आणि राष्ट्र)ह्या कल्पना एकमेकांना स्पर्श करत होत्या. त्यांच्या सीमा धूसर होत्या.
जवळच्या नात्यातील लोक एकत्र आले की कुटुंब बनते. समानता असणारी काही कुटुंबे एकत्र आली की एक वंश, एक राष्ट्र , एक टोळी बलागते.त्यामुळेच कधीकधी भारतातली हरेक जात एक अशीच स्वतंत्र राष्ट्र वाटू लागते.
नकाशावरच्या भूभागाला "देश " म्हणतात. देश = जमीन = भूमी बस्स. इतकच.
कुटुंब हे चार भिंतीमध्ये/फ्लॅटमध्ये "वसते " तसेच राष्ट्र हे देशात "वसते". राष्ट्र हा चालक असून देश हे चाल्य(गाडी/वाहन) आहे.
दोन देश exclusively वेगळ्या भागातच असतात. पण एकाच देशात्/एकाच भूभाग काही वेगवेगळे समाज, वेगवेगळी राष्ट्रे नांदू शकतात. हंगेरी ह्या देशात बराच काळ रोमन आणि हूण ही दोन राष्ट्रे मध्ययुगाच्या प्रारंभी वसत होती; तसेच.
घरातून कुटुंब जागा सोडून जाते. तसेच एखाद्या राष्ट्राला एखाद्या देशातून घालवून देता येते.
एखादे राष्ट्र एखाद्या देशाचा ताबा घेउन त्याला आत्मसात करते. ग्रीको-रोमन राष्ट्राला तुर्क राष्ट्राने बायझेंटाइन्/तुर्कस्थान "देशातून" काढले तसेच. किंवा "स्पेन्/अल अंदालूस" देशातून अरब राष्ट्र बाहेर फेकले गेले तेराव्या शतकापर्यंत तसेच काहीसे.
देश शब्दाची आजची "व्यवस्था"/system ह्याजवळ जाणारी व्याख्या अजून बनायची होती. आज melting pot भासणारी अमेरिका अजून नीट बनलीही नव्हता. जी बनली होती, ती फक्त काही फुटीर सैन्याच्या लोकांची इवल्याशा प्रांतातली सत्ता ह्यापुरतीच मर्यादित होती.(आज जी अमेरिका दिसते त्यात पन्नास राज्ये, तेव्हा ह्यापैकी फक्त पंधरा एक राज्ये अमेरिकेत होती. अमेरिकेच्या पश्चिमेला जमीन होती, समुद्र नाही. ती जिंकून त्यांनी सीमा वाढवत वाढवत समुद्राला नेउन भिडवली.)
आज काही प्रमाणात एक संस्कृती एक देश असेही पहायला मिळते, पण "व्यवस्था", "करार" वाल्यांची संख्या सध्या जास्त दिसते.
असो. तर अठरावे शतक. तेव्हा खुद्द इंग्लंड -स्कॉटलंड ह्यांच्यात कमी का असेना पण धुसफुशी सुरुच होत्या. आयर्लंडने तर ब्रिटिश सत्ता झुगारुन देत लढा उभा केलेला.
अगदि त्याच वेळेला त्याच धर्तीवर पश्चिम्-उत्तर (वायव्य शब्द मुद्दाम टाळतोय) भारतात एक अशीच सत्ता उदयास येउ लागली.शीखांचे राणा रणजितसिंग ह्याच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली एक नवीन सत्ता उदयास आली, प्रस्थापित झाली. ती ह्या राज्यांपेक्षा लहान वगैरे मुळीच नव्हती.
आम्ही फुटलेलो होतो, विखुरलेलो होतो वगैरे म्हणतो , ते काही प्रमाणात खरेच आहे. पण फक्त आपणच तसे होतो असे नाही. सर्वत्रच राष्ट्र-राज्ये ही कल्पना अजून अस्तित्वात यायची होती.
उगीचच आम्ही फारच मागे पडलो बुवा असे म्हणत ऊठसूट स्वतःला थोबाडित मारुन घ्यायची गरज नाही.
ह्याबद्दल जे आणि जसे सुचत जाइल ते प्रतिसादातूंन टंकत राहणार आहे.
तुम्हा लोकांची मतं जाणून् घ्यायला आवडेल.
Comments
उकळ्या
>>आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.
ठीक ठीक पण उकळी फुटायला आग कुठे लागली होती? त्याचे संदर्भ द्या की राव.
थुत्
"थुत् तुम्हा भारतीयांच्या .एकसंध म्हणूनही कधी रहायची अक्कल नव्हती. तुम्ही खरोखरीचे कम अस्सल "असं कुणी तरी संभाषणादरम्यान म्हणालं.
त्यानंतर जी (शाब्दिक) हाणामारी झाली, त्यातला माझा प्रतिक्रियेचा एकूण ढाचा इथे माडलाय.
"आम्ही ब्रिटिश्", "आम्ही अमेरिकन" , "आम्ही चायनीज/मँडरिन" अशी स्वत्वाची जाणीव identity इतर ठिकाणी पूर्वीपासूनच होती, तेव्हाही तुम्ही स्वतः कोण आहात ह्याची अक्कल नव्हती असे तो म्हणाला. "तुमच्याकडे जाणीव फक्त् एवढीच की आम्ही अमुक एका जमीनदाराचे , warlord चे चाकर." तो संपला की तुमची ओळखही संपली. तुम्हा भारतीयांची सलग अशी काहीही आयडेंटीटी नव्हती. वगैरे छापाचं एक भारतीयच बोलताना पाहून आम्ही पेटलो.
--मनोबा
बहुतांशी सहमत
सर्वात प्रथम कुटुंब, कुटुंब वाढले की बनते टोळी, टोळी वाढली की बनते जमात (ट्राइब), त्या जमाती एकत्र आल्या की बनते राज्य/ नगर-राज्य इ. आणि या राज्यांना जेव्हा एक शासक मिळतो तेव्हा साम्राज्य निर्माण होते. या जमातींमध्ये, राज्यांमध्ये एकमेकांशी साधर्म्य साधणार्या तरीही एकमेकांपासून वेगळ्या असणार्या चालीरिती असू शकतात. तरीही, साधर्म्याचे प्रमाण अधिक असल्याने ते एकमेकांशी बांधलेले राहतात आणि राजनिष्ठ राहतात. त्यामानाने देश, नेशन, कंट्री हे शब्द नवीन आहेत.
नैसर्गिक रित्या नद्या, डोंगर, समुद्र, वाळवंट वगैरे प्रकार राज्याच्या सीमा निश्चित करतात. अन्यथा, जिंकून घेतलेला प्रदेश सीमा ठरवतो. देश, सीमा वगैरे या चल गोष्टी आहेत. त्या भूतकाळातही सतत बदलत होत्या. त्यांची परिमाणे बदलत होती, आताही बदलत आहेत आणि भविष्यातही बदलत राहतील. ब्रिटिशांपासून भारत स्वतंत्र होताना असलेली राज्ये आणि सद्य कालीन राज्ये, सोविएत संघ फुटून झालेली राष्ट्रे, ऑस्ट्रियासारखे देश फुटून झालेली राष्ट्रे वगैरे अनेक प्रकार आताही होत आहेत.
राष्ट्र एकसंध राहण्यासाठी एक भाषा, एक संस्कृती, एक लिपी, एकसंध आर्थिकीकरण, दळणवळण, देवाणघेवाण वगैरे अनेक गोष्टींची आवश्यकता असते. येथे ४०० वर्षांपूर्वी जगाच्या इतर भागांतून आलेल्या आणि वसलेल्या अमेरिकेचे उदाहरण देता येईल. तिथल्या इमिग्रंट्सनी आपली संस्कृती घरात ठेवून व्यवहारासाठी एक भाषा, एक लिपी आणि समान अमेरिकन कल्चर/ समाज स्वीकारले. भारतात अद्यापही याची वानवा आहे. समान भाषा, समान लिपी आणि समान संस्कृती आपल्याकडे रुजणार नाही असे वाटते. बिहारसारख्या राज्यांतून इतरत्र लोंढे जात असतात. ते इतरांना नकोसे असतात पण स्वस्त मजुरी हवीही असते. अर्थातच, याचा मला खेद वाटत नाही आणि भविष्यात भारतीय राज्ये फुटून त्यांचे वेगवेगळे लहान देश झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. (अर्थातच, तेही व्यावहारिक नसल्याने होईलच असे नाही.)
जसे, पूर्वी एकसंध राष्ट्रे नव्हती हे या चर्चेतून लक्षात येते त्याप्रमाणेच समान संस्कृती असली तरी काही भूभाग आपल्या देशाचेच भाग होते असे म्हणणेही मला खोडसाळ वाटते. उदा. नेपाळ, गांधार, ब्रह्मदेश वगैरे.
---
जास्तच विस्कळीत झाला वाट्टं? ;-)
नक्कीच
नक्कीच. किंबहुना सध्या त्याच वाटेवर आहोत. राष्ट्रीय पक्षांना स्वतःचे बळ राहिलेले नाही. प्रत्येक राज्यातला एक गट थोडी सत्ता मिळवतो आणि सरकारला पाठिंबा दिल्यावर ब्लॅकमेल करतो, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र ही आघाडीवर आहेत. सर्वांची एकच भाषा होणार नाही. एकतर भाषेच्या अभिमानाचा अतिरेक अथवा नवी भाषा आत्मसात करण्याचा न्युनगंड यातुन सगळे एका भाषेवर कधीच येणार नाही अन त्यामुळे एक राष्ट्र ही भावना खोलवर रुजणार नाही. केली मदत तर पाकिस्तानच करेल. एखादा हल्ला झाला की मग देश प्रेमाचे भरते येते. ते तेवढेच.
भाषा..
भारत एकसंध होण्यात भाषेची तितकी अडचण वाटत नाही. आपलेपणा जाणवणं हे महत्वाचं. दिल्लीच्या माणसाला चेन्नै किंव बेंगलोरला जाताना "यहीं पर तो जाना है" किम्वा "उसमे क्या बडी बात है" असे वाटू लागेल तर हे नक्कीच शक्य आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. नागपूर, पुणे, मुंबै, कोल्हापूर , औरंगाबाद म्हटले तर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण महाराष्ट्राचे सामाजिक अभिसरण उत्तम सुरु आहे. इकडच्या कित्येक लोकांचे नातेवाइक आता तिकडे आहेत.
पाकिस्तानच्या बाबत् उलट् होते आहे. काही हजार वर्षे त्यांचे सामाजिक लागेबांधे दक्षिण आशियाशी होते. पण आता (उच्चभ्रूंच्या आणि धार्मिक लोकांच्या) घरोघरी दुबै, इजिप्त असे कुठेही नातेवाइक भरपूर सापडतील. त्यांच्या टीव्हीवर वगैरे तिथल्या घटानांची अधिक दखल घेतलेली आढळेल . लग्नसंबंधाने हे घडते आहे. तिथे सरकार समर्थित प्रोपागेंडा असा आहे की आपण पाकिस्तानी पूर्वीपासूनच अरब नि पर्शियन जगाशी जोडलेलो होतो. आज पाकिस्तान म्हणतात तिथे पूर्वी प्राचीन काळी धड स्थित असे काहीही नव्हते. नागर समाज वगैरे नव्हता. काही फुटाकळ लोकांच्या विरळ वस्त्या होत्या. तो जाहिल, रानटी लोकांचा काळ(इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत). "जाहिलियत " त्यास म्हणता यावे. कासिम नामक भला माणूस आठव्या नवव्या शतकाच्या आसपास इथे आला. ह्या बहुतांशाने रिकाम्या प्रदेशात त्याने वस्ती केली. शहरे वसवली. न्यायाचे राज्य, काय्दा सुव्यवस्था प्रस्थापित केली. स्थिर शासन दिले. त्याच्या भल्या आचरणातून इथल्या काही अल्पसंख्य रानटी लोकांनाही सत्याची जाणीव झाली. व ते स्वतःहून कासिमला जॉइन झाले. कसलीही जोरजबरदस्ती झाली नाही. सर्वांना समान वागवणारा असा हा आमचा राष्ट्र पुरुष पाच सात वर्षांच्या सत्तेनंतर जिथून आला होता तिथे परतला.(बहुदा बगदाद) पाकिस्तानचा "राष्ट्र" बनण्याचा प्रयत्न हा असा आहे.
भारत वेगळ्या मार्गावरून जातो आहे. आम्ही एकसंध नाहीत. पण आमच्यात एक धागा अशी ही कल्पना आहे. आपण वेगळे असलो तरी तुला मारलं की मला दुखतं अशी काहीशी एक कल्पना आहे. मध्यमवर्गानं ही स्थापित होण्यास नकळातपणे फार मोठा फातभार लावलाय. भारत ही "संकल्पना" जाणवून घ्यायची असेल तर तुम्ही सलग पाच-सात वेळेस मूळ "मिले सूर मेरा तुम्हारा" हा सुंदर मैफिल पाहिली पाहिजे. साध्या साडीतली कुलीन गुजराती स्त्री "बणे सूर जो तारो मारो बणे आपणो सूर निराळो" असं काहीसं म्हणते ; पूर्वेकडच्या राज्यात कुणीतरी " सृष्टी होउ कोइ कोतान्/कोइ कोशू" अशी सुरेल कुणी हाक देतं, मराठीत फिल्मस्टार तनुजा "तुमच्या माझ्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा" म्हणत समेवर येते.
अहाहा. सुरेख. सुंदर. त्या गीतातल्या सगळ्याच भाषा समजतात असे नाही, पण खूपच प्रसन्न वाटते. "मला तुमची भाषा येत नाही पण मी तुमच्या भावना समजू शकतो" ह्या अर्थाचे काहीसे हे भारतीय संघराज्य एकत्रित आहे. ह्यात भाषाभिमानी अतिप्राचीन वाङ्मयासोबत तमिळ आहेत, बाबो मोशाय त्याच्या मिठायांसोबत आहे, नेकिचा नोकरदार नि कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी मराठीही आहे. परंपराप्रिय राजपूत्/राज्स्थान हे आहेत नि आमचेच निसर्गाच्या सहवासात राहणारे उडिया लोकंही आहेत.
दिल्लीकडच्यांना अकबराबद्दल प्रेम्/आदर आहे ना, असूं देत, त्याचं (मेवाडी)राजपूतांना आदरस्थानी असणार्या राणा प्रतापाशी युद्धही झालं होतं ना? असूंदेत. तरीही आम्ही दोन्हीचा सांस्कृतीक वारसा सांगू. कुणीकडून काय मिळालं हे मांडू.
"मिले सूर मेरा तुम्हारा " च्याच धर्तीवर, त्या दर्जाची नसली, काहीशी populist वाटली तरी "तारक मेहता का उल्टा चश्मा" मध्ये ही भारताच्या वैविध्याची नि एकतेचीही कहाणी मस्त मांडलिये. म्हणजे, तो कथेचा मूळ गाभा नसेलही, पण प्रत्येकाला त्यात आपलच, किंवा आपल्या जवळच्यांचं representation सापडतं. एका हिंदी सिरियलमध्ये " पापड कसले बनवतेस तू माधवी" म्हणणारा मराठी श्रीयुत भिडे नि कच्छवाले(गुजराती) जैन व्यावसायिक जेठालाल एकमेकांची सुमडी सुमडीत खेचू पाहतात. पण खरच अवघड वेळ आली तर भिडेला जेठालाल ला सोडून जेवणही जात नाही. अर्थात जेठालाल सुटला की ह्यांचे पुन्हा ट ऑम अॅन्ड जेरी सारखे उद्योग सुरुच. सोसायटीच्या बाहेर व्यवसाय करणारा अब्दुल त्यांच्या परिवाराचाच एक सदस्य आहे. सरदारजी त्यांच्या पारशी बायकोसाबत धमाल आणताहेत. ते मद्राशाला(हौ. सगळे साउथ इंडिअन हे मद्राशीच असतात.) छोले भटुरे आठवणीनं आणून देतात , मद्राशी सगळ्या उत्तर भारताच्या उत्सवात सहभागी होताना दिसतो. "आपण वेगळे आहोत पण आपण शत्रू नाहीत" अशी काहीशी ही भावना आहे.
सध्याची भारत ही संकल्पना यशस्वी झाली तर ती जणू एका मोठ्या प्रच्चंड मोठ्या कोलाज च्या रुपातील असेल. मोठा कॅनव्हास, अनेकानेक रंग तरी त्यांची एकमेकांना सोबत. एकजिनसीपणा नाही, पण एकत्रित बांधणी पक्की आहे.
एकाच पुस्तकात प्रत्येक पान वेगवेगळ्या रंगाचं असावं तरीही त्याची बायंडिंग घट्ट असावी, तसच काहीसं.
कालच एक सिनियर सहकारी, सरदारजी "नामदेव की बाणी कहां से मिली " असं मला मी वाचायच्या प्रयत्नात असताना म्हणाले. म्हटलं नामदेवाचा जन्म आमच्या इथलाच की नर्सी-नामदेव, मराठवाड्यातला. ज्ञानेश्वरांसोबत काही कळ राहून आमचा नामदेव इथे कसा आला? त्याने इथल्या लोकांशी नाळ कशी जोडली हे शोधतोय. मला वाटतं तो एकमेव non-sikh संत कवी आहे, ज्यास गुरुबाणी ह्या शिखांच्या ग्रंथात स्थान आहे. असा pan india प्रवास त्याला का करावासा वाटाला ते शोधायचय. शंकराचार्यांनी केला तसा तो अजून कुणी केला का? अनेकानेक पवित्र क्षेत्रे उत्तरेत आणि दक्षिणेत असल्याने ये-जा होत राहून हे अभिसरण आधीही थोड्याप्रमाणावर का असेना होत होतं का? बरेच प्रश्न होते. "वोह छोड, अभी जल्दी रिपोर्ट बनाके भेज" इतकच म्हणून ते निघून गेले; तो भाग वेगळा :(
"एक भारत" म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर रेल्वेने प्रवास करावा. आधी जम्मू ते मदुरै आणि नंतर सुरत ते गुवाहाटी असं जाउन पहा. रेल्वेतच बसले राहिलात तरी खूप काही बघणं होइल. अल्पशा मोबदल्यात आख्खे भारत दर्शन होउन जाइल्.रेल्वेत भेटणारी माणसे, त्यांची आयुष्ये त्यांनी "भारत " कल्पनेबद्द्ल काहीही भाष्य न करताच तुम्हाला खूप काही सांगून जातील. कॅनव्हास मोठा करायला एकदा स्लीपर कोच, नि एकदा तरी ए सी असे जा. खूप काही जाणवेल.
सामान्यांसाठी भारताची अजून एक व्याख्या म्हणजे जिथवर बॉलीवूड्प्रेम दिसेल, तो तो भाग भारताचा. दक्षिणेत हिंदि बोलत नाही म्हणतात, पण तिकडेही बॉलीवूड गाणी हिट्ट आहेतच. अजून एक व्यवच्चेदक लक्षण म्हणजे पैसे खायला, कामात कुचराई करायला अचाट मार्ग शोधून काढणारी बुद्धी, नोकरशाही दिसली(आणि त्याबदल्यात शोषितांची तक्रार न दिसता "चलता है" अशी भूमिका दिसली ), तर ते भारतीय रक्तच समजा. ते आपले व्यवच्छेदक लक्षण आहे!
मग भारताचे पुढे मागे ७-८ देश झाल्यास काही नवल नाही किंवा तसे वेगळे होण्याची कुण्याची इच्छा झाल्यास त्यास विरोध करायला नको. असेही कुणी म्हणताना दिसते. पण हे होणे सोपे नाही. हे स्थित्यंतर पुन्हा फाळणीच्या काळासारखा प्रपात घडावायची शक्यता अधिक. काही सीमा नेहमीच अशा असतात की त्यावर दोन्ही बाजूंकडून् दावे होउ शकतात.
ह्यामुळे होते काय, की आजचे "शेजारी" उद्या "परके" किंवा घुसखोर ठरतात. शिवाय लहान आकार असण्यास समस्या हीच की भारतीय राज्ये लहान बनली की मेली. अर्थ, संरक्षण,परराष्ट्र् नीती ह्यात ती दुबळी आहेत. विज्ञान - तंत्रज्ञानात, रोजगार उभारणी ह्यातही ह्यांची एकेकेट्यांची बोंब आहे. एकूणच आधुनिक बलशाली देश म्हणवून घेण्याइअतपत् ह्यांचे अस्तित्व नाही.
मध्यपूर्वेत पन्नासेक देश आहेत. कुणाही पाश्चात्याने यावे नि टपली मारुन् जावे,रशिया चीनने मोहरा बनवावे ही त्यांची अवस्था. ह्यांना आपसात भांडायला बाहेरची फंडिंग, तंत्रज्ञान मिळाली तर कोण आनंद होतो. इराकी सत्ता कुर्द, शिया वगैरेंचे हत्याकांडा घडवते.(सुन्नींचेही घडावले ठाउक आहे.) उग्गीच बुशला लहर आली म्हणून तो बगदाद बेचिराख करायला उठतो.वाटॅल तेव्हा लिबियावर हल्ले होतात. कल्पना करा, ज्या नाटोच्या विमानांनी लिबियावर हल्ले केले, त्यांची तसेच हल्ले दिल्लीवर करायची हिंमत आहे का?
नाही. कारण दिल्ली म्हणजे १८५७ च्या काळातली दिल्ली राहिलेली नाही. लाल किल्ला नि त्याच्या आसपासची वस्ती असे त्याचे रूप नाही. आज दिल्लीला बोट लावाल तर आख्खे भारतीय संघराज्याचे लष्कर उभे राहील. गुरखा, शीख, राजपुताना, मराठा, महार ह्या सगळ्याच गाजलेल्या पलटाणी त्यात आहेत. दिल्ली, युपी, बंगाल, केरळ एकेकटे काहीही नाहीत. पण त्यांनी एकत्रित एक फौज उभारली आहे. त्यांच्या सहकार्य निधीतून त्यांनी काही थोडिफार का असेना आधुनिक विमाने घेतलीत, अणुबॉम्ब बनवलाय. त्यामुळेच आज दिल्लीवर हल्ला होउ शकत नाही.
पण भारताचे असे तुकडे झाले तर आपलीही मध्यपूर्वच होइल; ही धास्ती आहे. किंवा, मराठा सत्तेच्या शेवटच्या काळात तसे झालेलेच होते.
तुम्ही म्हणाल तसेच होइल असे काही नाही, आपला युरोपही होउ शकतो. युरोपातही अनेकानेक् भारतापेक्षा लहान लहान पण प्रबल सत्ता/देश आहेत. यु के, फ्रान्स , जर्मनी हे सगळे प्रत्येकी आठ आठ कोटींहून अधिक नाहीत. हो. हे खरे आहे. की ते प्रबळ आहेत. पण तुम्ही आम्ही तसे आहोत का?
ओरिसा फ्रान्सशी स्पर्धा करु शकेल? ब्रिटन जर कावेरी पाणीवाटापातल्या वादात लवाद्/ मांजर म्हणून घुसले तर तामिळ आणि कर्नाटक राष्ट्रे एकेकटी त्याला काय झाट रोखू शकणार आहेत?
इटाली जो भारतासमोर भुक्कड् भासतो, तो बंगाल - दार्जिलिंग/गोरखालँड वादात एकट्या बंगालचे कंबरडे कधीही मोडू शकतो. त्याच्या बंगालपेक्षा कैकपट आर्थिक, राजनितीक ताकद व् तंत्रज्ञान आहे.
आपल्याला भारतरूपी allied forces चे एकछत्री राज्यच बरे नाही का?
एखाद्यावेळेस गुण्यागोविंदाने तुम्ही वेगळे होउही शकाल. पण त्यानंतर एकटे राहण्याइतपत तुम्ही सबळ आहात का? इशान्य राज्ये स्वतंत्र झाली तर चीन नुसत ती घशात घालेल असे नाही तर तिबेट आणि सिक्यांग* प्रांतात त्यांनी जसा वंशविच्छेद केलाय, शतकानुशतकांचा लोकसंख्येचा तोल एका पिढीत पालटावलाय तसे कधीही करु शकेल. तर व्यावहारिक् मुद्दे म्हटाले तर हेच आहेत, बाकी काही नाही.
*सिक्यांग मध्ये मूळ चीनी वंशाचे लोक अल्पसंख्य होते.पन्नासवर्षापूर्वीपर्यंत. चीनने नियोजनबद्ध पद्धतीने लष्कराच्या काही लाख लोकांना तिथे कायमचे स्थायिक केले. स्त्रिया उचलून नेल्या. जबरदस्ती करण्यात आली. ह्या प्रकारातून निर्माण झालेली प्रजा आता "चीनी राष्टृ" ही कल्पना गळी उतरवून् घेण्याच्या तयारीत आहे. भारताने असेच काही काश्मीर मध्ये केले, तर तो भारताचा भाग होइल् असे काही कट्टरवाद्यांचे म्हणणे आहे. पण अर्थातच भारत असे काही पोलादी पकडीने करेल हे शक्यच नाही.
ह्म्म
तुमचे म्हणणे हे भारताच्या प्रेमापोटी आहे जे आम्हाला सुद्धा आहे. भारता बाहेर भारतीयांना भेटा. तिथे देशप्रेम जास्त जाणवेल. पण तिथे सुद्धा रिजनल टच जास्त जाणवेल. परवा एकजण माझ्या सहकार्याशी थेट दाक्षिणात्य भाषेत सुरु झाला. चेहरा पाहून असे वाटले असावे.
मिलेसुर काय अथवा रेल्वेचा प्रवास काय? भारताची भावना आणि विविधता हे आपल्या ओळखीचे आहेत. पण आज पाहिलेत तर पहिला येतो प्रादेशिकतेचा वाद देश नंतर. तुम्ही जे काही मुद्दे सांगितले, एक बॉलिवुड आणि दुसरा चलता है, हे कॉमन असे मुद्दे झाले. पण त्यात राष्टियत्वाची भावना नाही.
युरोप पहा आता युनियन करुन एकत्रच राहतो आहे. आम्ही काहीसे तसेच होऊ. जम्मु काश्मिरच्या प्रश्ना बद्दल किती भारतीयांना खरी जाण आहे? त्यांना वेगळे स्टेटस का? आता आम्हाला सुद्धा हवे म्हटल्यास काय करणार? जम्मु काश्मिर किती स्वयंपुर्ण आहे? पण त्यांच्यातल्या अनेकांना वेगळं व्हायच आहे.
राष्ट्र बनायचे असेल तर सर्वामान्य एकच नेता हवा, एक हाती सत्ता हवी. आपल्याकडची लोकशाही महान आहे कारण ती आता हाता बाहेर गेली आहे. कदाचित ती अशा प्रकारे महान जास्त आहे. विविधतेत एकता आम्हाला आवडतेच पण भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता एकच गोष्ट सगळीकडे एप्लाय करणे वेडेपणाचे आहे.
...
तुमचे म्हणणे हे भारताच्या प्रेमापोटी आहे जे आम्हाला सुद्धा आहे.
म्हणजे आमची wishful thinking आहे म्हणा ना.
युरोप पहा आता युनियन करुन एकत्रच राहतो आहे.
युरोप् एकत्र म्हणजे राजकिय् दृष्ट्या नाही. सांस्कृतिक् दृष्ट्या नक्कीच् एकत्रित् आहे. समान रोमन सत्तेचा वारसा तिथले देश सांगतात्.(रोमनांनी ज्यांच्यावर् राज्य केले, तेसुद्धा. स्वाभाविकच् आहे.) एकत्र म्हणजे त्यांनी फक्त् चलन एक करायचा प्रयत्न् केला.
पण् प्रत्येकाचे सरकार वेगळे, धोरण् वेगळे. प्राधान्य् वेगळे. अगदि लष्करही वेगळेच.
उद्या स्वीडनवर चीनने हल्ला केला तर आख्खा युरोप मदतीला येइलच असे नाही. चीन इतर देशांशी स्वतंत्र करार करुन् एकाकी स्वीडनचा नक्कीच् फडशा पाडू शकतो.
आपले असे होउ नये असे वाटते. आज तामिअळनाडूत् त्सुनामी आली, तर् केंद्र सरकार कधेही प्राप्तीकरावर् पावटक्का अधिभार्/cess लावू शकते. इतरेजन तामिळनाडूच्या मदतीस बाध्य् आहेत्. आज महाराष्ट्र नि मुबै देशाल जितका महसूल् मिळवून् देते त्यापेक्षा फार् म्हणजे फारच कमी रक्कम् आपल्या विकासवर् खर्च् ह् ओते. अत्यंत् कमी महसूल् असलेल्या मागा बिमारु राज्यांत् केंद्र खर्च् करते. ते उद्या पुढे येतील्, हातभाअर् लावतील् ही अपेक्षा आहे. आज आपण आपली रोटी त्यांच्याह्सी वाटून् खातोय.(त्यात फार चूक नाहीच.) आपण् स्व्वतंत्र, सुटे सुटे झालो तर हे होइलच ह्याची खात्री नाही.
जम्मु काश्मिरच्या प्रश्ना बद्दल किती भारतीयांना खरी जाण आहे?
मुद्दा रास्त आहे. पण जनसामान्यांना कधीच ती जानीव नसतेरमेरिकेचे उदाहरण् घ्या. तिथे टेक्सास(की म्यू मेक्सिको?) का कुठलेतरी सीमावर्ती राज्य नक्की अमेरिकेचेच आहे का ह्याबद्दल् जनसमान्य संभ्रमात् दिसतात. तिथे गाडीच्या पाट्यांवर् मुद्दाम् तो स्वतंत्र् उल्लेख् करव लागतो . "खरी जाण" सोडूनच द्या, "थोडीफार् जाण्" असणरे अत्यल्पसंख्य आहेत हे मान्य.
त्यांना वेगळे स्टेटस का?
ह्या मागणीवर रोडरोलर् चालवून काश्मीरचे सात्मीकरण केले नाही, तर तुकडे पडणार हे नक्की.
पडू नयेत् ही इच्छा/प्रार्थना.
आपल्याकडची लोकशाही महान आहे कारण ती आता हाता बाहेर गेली आहे.
दुर्दैवने अंधार वाढतानाच दिसतोय. मान्य.
भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता एकच गोष्ट सगळीकडे एप्लाय करणे वेडेपणाचे आहे.
एकच गोष्ट अप्लाय् नका करु. पण् एक मजबूत आअघाडी, अलायन्स्, महासंघ बनवून् तर् रहा ना.
--मनोबा
महसूल
आपण महसूल देणे आणि तो योग्य कारणासाठी वापरला जाणे मान्य आहे. पण हे असे किती चालायचे? महाराष्ट्रात सुद्धा गरजेची अनेक कामे आहेत. आता वांग मराठवाडीच पहा ना. तिथे द्या ना हवे ते. गेल्या ६५ वर्षात किती महसूल जाऊन कोणाचा फायदा झाला हे आपल्याला माहित नाही काय?
युरोपाचे म्हणाल तर मित्र राष्ट्रे शक्यतो नेहमीच धावतात एकमेकांच्या मदतीला. बाकी त्यांचा एकमेकांबद्दलचा मत्सर मी पाहिला आहे. पण तरिसुद्धा एक चलन केल्याने आणि शेंगेन व्हिसाने त्यांना जास्त उपयोग झाला. तुम्ही तामिळनाडूचे उदाहरण दिले पण किती पुर्वोत्तर राज्यांना आपण आपुलकिची, आपल्यातली वागणुक देतो? आपल्या पेक्षा थोडे वेगळे दिसणारे आहेत तर लगेच नेपाळी चिनी करुन आपणच त्यांना वेगळे करतो. मुख्य प्रवाहात त्यांना कधी पाहिलय? भारताचे गृहमंत्री पहा गेल्या काही वर्षात, आपले मराठीच - शिवराज पाटिल आणि आता सुशि, काय कारण आहे ते होण्याचे? फक्त निस्सिम भक्तिने श्रेष्ठी खुष आहेत. पण कधी मेघालय, मिझोरामचे असे महत्वाच्या पदावरचे मंत्री पाहिले आहेत? नुसते महाराष्ट्राचे महसुलाचे राग आळवून काय फायदा? खरा फायदा राष्ट्र आपले आहे. आपल्याला एक आदर्श बनायचे आहे हि भावना हवी आहे. ती अशक्य आहे कारण प्रत्येकाचा आदर्श वेगळा आहे आणि आदर्श घोटाळे आहेत.
समान धागे
पाकिस्तानच्या बाबत् उलट् होते आहे. काही हजार वर्षे त्यांचे सामाजिक लागेबांधे दक्षिण आशियाशी होते. पण आता (उच्चभ्रूंच्या आणि धार्मिक लोकांच्या) घरोघरी दुबै, इजिप्त असे कुठेही नातेवाइक भरपूर सापडतील. त्यांच्या टीव्हीवर वगैरे तिथल्या घटानांची अधिक दखल घेतलेली आढळेल ... तिथे सरकार समर्थित प्रोपागेंडा असा आहे की आपण पाकिस्तानी पूर्वीपासूनच अरब नि पर्शियन जगाशी जोडलेलो होतो.
सरकारचे सोडून द्या हो त्यांची ती मजबुरी आहे. पाकिस्तानची 'ओळख' त्यावर अवलंबून आहे. उपखंडाची आपण लेकरे आहोत असे मानणाऱ्यांची पाकिस्तानात संख्या मोठी आहे. किंबहुना ती सायलेंट मेजॉरिटीही असू शकते. राजेश खन्ना गेल्यावर तिथे खास कार्यक्रम होतात. गाणी, सिनेमे, मालिका ह्यांची तर पाकिस्तानात क्रेझ आहे. हसन निसार सारखे तिथले पत्रकार खुलेआमपणे म्हणतात की अरबांशी आपला काही संबंध नाही. अरब पाकिस्तान्यांना/भारतीय उपखंडातल्या मुसलमानांना तुच्छ लेखतात हे सगळ्यांना माहीत आहे.
आम्ही एकसंध नाहीत. पण आमच्यात एक धागा अशी ही कल्पना आहे. आपण वेगळे असलो तरी तुला मारलं की मला दुखतं अशी काहीशी एक कल्पना आहे.
एक माणूस दुसऱ्या माणसाबाबतही असे म्हणू शकतो. त्यासाठी तो भारतीयच असायला हवे असे नाही. युरोपातल्या, अमेरिकेतल्या, आशियातल्या राष्ट्रांत आणि संस्कृतीत समान धागे आहेत. तरीही युद्धे होत असतात. जुन्यांची शकले होऊन नव्या राष्ट्रांची निर्मिती होत असतो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
.
. उपखंडाची आपण लेकरे आहोत असे मानणाऱ्यांची पाकिस्तानात संख्या मोठी आहे. किंबहुना ती सायलेंट मेजॉरिटीही असू शकते.
हे खरे असेल तर नशीब आपले ( त्यांचे आणि जगाचेही) बलवत्तर म्हणावे लागेल.
हसन निसार सारखे तिथले पत्रकार खुलेआमपणे म्हणतात की अरबांशी आपला काही संबंध नाही.
हसन निसार, नजम सेठी हे तिथले ठिकाणावर असलेले, sane voice वाटतात. पण तिकडं झैद हमीद खुलेआम् टीव्हीवर भलत्याच् गर्जना करतो. हफिज सइद, मौलाना मसूद अझर ह्यांना मिळणारी तिथली भयंकर जनमान्यता दुसरेच काही दर्शवते.
भारतात धरला गेलेला मौलाना मसूद अझर १९९९ मध्ये विमान अपहरणानंतर सोडवला गेला.
म्हणजे थेट् इथल्या जेलमध्ला माणूस हे दिवसाढवळ्या नेताहेत, तरीही "पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे" असे म्हणायची चोरी आहे. त्यानं इथून् गेल्यानंतरच जैश् ए मोहम्मद् आणि लष्कर ए तोयबा ह्यांची एकत्रित् मोट बांधली. त्याला हात लावणे तिथे भारताशी सहकार्य करु इच्छिणारे सरकार आले तर त्यांनाही शकय् नाही. आपल्याकडे कुठल्याही ठाकर्यांना काहीही करता येउ शकत नाही, तोगडिया, अडवाणी आणि इमाम बुखारी हे सगळेच कायद्याच्या वर आहेत; त्यांना आपल्याकडे licence to kill देण्यात आलय असं वाटावं अशी स्थिती आहे. अगदि तश्शीच स्थिती तिकडे ह्या हफिज, मसूद अझर बद्दल् आहे.
कालच वाचत होतो. कनिष्ठ लश्करी अधिकारी असणार्या नेपोलिअनने १७९९ च्या आसपास वरिष्ठांचा आदेश धुडाकावून इजिप्त मोहिमेतून लष्कर परत बोलावले. हा गुन्हा होता. बेअदबी होती; फ्रेंच कायद्यानुसार. पण प्रभाव वाढलेल्या नेपोलिअनपुढे काउन्सिल् काय् करु शकत् होती? त्यांनी कायदाच बदलायचा उद्योग सुरु केला, नेपोलिअनला जणू कायद्याच्या वर् ठेवले गेले, त्याच्या धकाने! इथेही तशीच् स्थिती आहे.
अरब पाकिस्तान्यांना/भारतीय उपखंडातल्या मुसलमानांना तुच्छ लेखतात हे सगळ्यांना माहीत आहे.
एक माणूस दुसऱ्या माणसाबाबतही असे म्हणू शकतो.
मी तेवढ्या मोठ्या पातलीवर म्हणत् नाहीये. आपली सध्याला एक अभेद्य अशी आघाडी/alliance आहे. तामिळनाडू पुरामध्ये बर्बाद झाल तर् केंद्र सरकार त्याच्या कमदतीस इन्कम टॅक्सवर कधीही अधिभार्/ cess लावू शकते. उर्वरित् संपूर्ण भारत हा तामिळनाडूच्या मदतीस् येण्यास बाध्य आहे. हेच जर ते स्वतंत्र राष्टृअ असेल् तर होणार् नाही. मी त्या अर्थाने म्हणतोय. बिमारु राज्यांच्या उत्थानासाठी केंद्र बराच पैसा खर्च करते. महाराष्तृआतून जितका महसूल् मिळतो, त्याहून् खूपच कमी पैशांच्या योजना इथे राबवण्यात् येतात, आपण आपली रोटी त्यांच्याशी वाटतो आहोत.
--मनोबा
लाल टोपीवाला मस्खरा
पण तिकडं झैद हमीद खुलेआम् टीव्हीवर भलत्याच् गर्जना करतो. हफिज सइद, मौलाना मसूद अझर ह्यांना मिळणारी तिथली भयंकर जनमान्यता दुसरेच काही दर्शवते.
झैद हमीद ऊर्फ लाल टोपी पाकिस्तानातही टिंगल टवाळीचा विषय आहे. मारवी सरमेद सारखी मंडळी झैदला धरून झोडत असतात. हाफिझ सईद, मसूद अझहर ह्यांना जनाधार आहे पण भयंकर जनमान्यता आहे असे वाटत नाही. पाकिस्तानात असे झाले आहे की मुल्लामौलवी, संकुचित विचासरणीला विरोध करणे हे परवडण्यासारखे नाही. सलमान तासीर ह्यांना जी किंमत चुकवावी लागली ते सगळ्यांनाच माहीत आहे.
लिहिण्यासारखे बरेच आहे. पण तूर्तास घाईत एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भावनिक प्रतिसाद
मनोबा हा प्रतिसाद भावनिक झाला पण अर्थातच त्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत.
हे बरोबर आहे म्हणूनच "सध्या" आपण एकत्र आहोत. अशी परिस्थिती भविष्यात राहिल असे नाही. भूतानसारखा लहान देश बघा. गुजराथ किंवा महाराष्ट्राच्या अपेक्षेत त्याच्याकडे काय आहे? तरीही वेगळे राष्ट्र म्हणून तो जिवंत आहे. अगदी शेजारी चीनच्या नाकावर टिच्चून. याचा अर्थ तो कायम तसा राहिल आणि भारतात किंवा चीनमध्ये विलिन होणारच नाही असे नाही. हेच मालद्विप बेटसमूहाबद्दल म्हणता येईल. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्यावर हे सर्व अवलंबून आहे.
ब्रिटनला कावेरी पाणी वाटपात घुसण्यात काय हशील? याकडे पाहिले तरी अनेक प्रश्न उत्तरे न देताच सुटतील. प्रबळ होणे, न होणे, आयात-निर्यात वाढवणे ही सतत बदलणारी गणिते आहेत. या गणितांच्या उत्तरांवरच अनेक साम्राज्ये उभी राहिली आणि मोडली.
भारताचीच परिस्थिती लक्षात घेतली तर स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड, झारखंड वेगळी राज्ये म्हणून अस्तित्वात आलीच पण वेगळा विदर्भ वगैरे मागणीही सुरू असते. धर्म, भाषा, जातीयवाद, प्रांतवाद हा प्रत्येकाच्या मनात इतका रुजला आहे की आपण इतरांपेक्षा कसे वेगळे हे दाखवण्यात मोठेपणा मानला जातो. त्यामुळेच अशी शंका घेता येते की आजची परिस्थिती उद्या बदलून भारताचेही लहान भाग होऊ शकतात. याचा अर्थ पन्नास शकले नाही पण कदाचित इशान्य भारत किंवा तमिळनाडु, गुजराथ वेगळे होण्याची मागणी करणे अशक्य नाही.
खलिस्तानची मागणी झाली होतीच आणि ती चिरडावी लागली.
...
चीनने भूतान सोडून कसा दिला ह्याचेच मला आश्चर्य वाटते.
ब्रिटनला कावेरी पाणी वाटपात घुसण्यात काय हशील?
अरे, हशील् म्हणजे आमचे अंतर्गत वाद् सुरु झाले तर पुन्हा कुणीतरी बाहेरचा येउन् एकाची बाजू घेउन् दुसर्याला धोपटेल् आणि मग हलूहळू पहिल्यालाही घशात् घालेल.(आठवा तैनाती फौजेची संकल्पना.)
कदाचित इशान्य भारत किंवा तमिळनाडु, गुजराथ वेगळे होण्याची मागणी करणे अशक्य नाही.
गुजरात नाहीच जाणार. तो मध्य आणि पस्चिम भारताचा इंटिग्रेटेड् आणि इंटिग्रल भाग् आहे.
निघाले तर् राजस्थान- गुजरात-निम्मा एम पी असे काहीसे निघतील्. तिकडे पंजाब् स्वतः निघेल्, जम्मू, हरयाणा ह्यांचा काही भाग् जाता घेउन् जाइल्. फुटलेल्या भारतात् त्यातल्या त्यात् पश्चिम् आणि दक्षिण भारत स्थिर , समृद्ध् असेल. उत्तरेच्या(युपी-बिहार्-झारखंड-उत्तराखंड ह्यांच्या) ठिकर्या उडतील.
पूर्व(ओडिसा) आणि इशान्य भारताचे ठाउक् नाही.
खलिस्तानची मागणी झाली होतीच आणि ती चिरडावी लागली
खलिस्तान हे भूत संपलेले नाही. बाटलीला बूच मारून सध्या ती बाटली दबवण्यात आली आहे इतकेच.
--मनोबा
माझेही काही विस्कळित विचार
विचार आणि विषय बघता कुठूनही कुठे जाता येईल. त्यामुळे प्रस्ताव आवडला.
युरोपातली नेशन स्टेटची संकल्पना ही १९व्या शतकातली आहे. १८व्या १९व्या शतकातले इंग्रज असंख्य राजेरजवाडे असलेल्या भारताचा विचार एकसंधपणे (हिंदुस्थान, इंड्या वगैरे वगैरे) असा करीत असत का? अवांतर: इटलीची निर्मिती झाली तेव्हा बहुसंख्य इटालियन लोक इटालियन भाषा बोलत नसत.
ख्रिश्चन धर्म सर्वत्र असूनही युरोपात इतकी राष्ट्रे आहेत तर मग भारताचे पुढे मागे ७-८ देश झाल्यास काही नवल नाही किंवा तसे वेगळे होण्याची कुण्याची इच्छा झाल्यास त्यास विरोध करायला नको. गुण्यागोविंदाने असे देश निर्माण झाले तर त्यात वाईट काय आहे असे मला एकेकाळी वाटत असे. आता हे किती व्यावहारिक आहे वेगळा मुद्दा. तसेही गुजरात आता जवळपास वेगळे राष्ट्र झालेच आहे म्हणा.
मराठवाड्यातल्या औरंगाबादेत जन्मलेल्या जमाते इस्लामीच्या मौलाना मौदुदींनी धर्माच्या आधारावर वेगळ्या राष्ट्रनिर्मितीचा (पाकिस्तानिर्मितीचा) विरोध केला. जिनांना शिव्या दिल्या. पण अखेर ते पाकिस्तानात गेले. त्यांचा शिष्य जनरल झियाने नंतर पाकिस्तानची वाट लावली हा भाग वेगळा. पण एकंदरच देवबंदींनी आणि जमात्यांनी पाकिस्तानला विरोध केला होता. धर्म आणि वांशिकतेच्या आधारावर राष्टनिर्मिती होऊ शकत नाही असे मौलाना हुसैन अहमद मदनीसारख्यांचे मत होते. ही भारताची फाळणी नसून भारतीय मुसलमानांची फाळणी आहे असे त्यांचे म्हणणे होते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
-१०००
----
हो...
१८व्या १९व्या शतकातले इंग्रज असंख्य राजेरजवाडे असलेल्या भारताचा विचार एकसंधपणे (हिंदुस्थान, इंड्या वगैरे वगैरे) असा करीत असत का?
"हिंद मध्ये असे होते. हिंद मध्ये सुबत्ता आहे. हिंदमधील कापड,हस्तीदंत चांगले आहे." असा हिंद नावाचा उल्लेख मनुची वगैरे सारखे औरंगजेबाच्या काळात भारतात दिल्ली,लाहोरपासून ते गोव्यापर्यंत प्रदीर्घ राहिलेले लोक करताना दिसतात. पण मनुची हा इटालियन डॉक्टर/वैद्य/हकिम होता. इंग्रज नाही.
नेपोलिअनने हिंदमधील ब्रिटिशांच्या भरभराटीस आलेल्या व्यापारास अटाकाव करायला, नाकाबंदी करायला काय करावे? त्याने सरळ आख्खे इजिप्त फक्त लष्करी बळावर घशात घालायचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या आसपासची जल वाहतूक सहजच खंडित करता येइल. आपल्या साम्राज्यातील किंवा साम्राजाच्या प्रभावाखालील देशांना (खरे तर राज्यांना ) इंग्लंडशी भूमार्गातून व्यापारास प्रतिबंध केला. त्यातही हिंद असा उल्लेख आहे म्हणे. इथल्या स्थानिक सत्तांशी हातमिळवणी करुन(टिपू वगैरेने केला तोच प्रयत्न) ब्रिटिशांना शह द्यायचा त्याचा प्लॅन होता.
असो. तर त्या उल्लेखातही इथल्या राजे रजवाड्यांचा एकत्रित,सरसकट उल्लेख आढळतो.
मला आजच्या भारताला बर्याचदा India mainland म्हणावेसे वाटते.
नेपाळ, श्रीलंका हे Indian periphery वर येतात.
ख्रिश्चन धर्म सर्वत्र असूनही युरोपात इतकी राष्ट्रे आहेत
ती बनली तेव्हा धार्मिक नव्हे तर भाषिक, (काहीशी)वांशिक आधारावर बनली. हिटलरने भाषिक आधारावरच ऑस्ट्रिया - जर्मनीचे एकीकरण केले. "आपणही जर्मन आहोत" ही भावना ऑस्ट्रियन जनतेत असावी का? कारण हिटलरला तिथे प्रतिबंध असा फारसा झालाच नाही. लोण्याच्या गोळ्यातून सुरी फिरावी तसे त्याचे सैन्य घुसले म्हणतात.
तसेही गुजरात आता जवळपास वेगळे राष्ट्र झालेच आहे म्हणा.
अजून नाय् झाले. झाले तरी तात्कालिक असेल. दोन निवडणूका उलट्या पडल्या(किंवा हेलिकॉप्टरला तथाकथित अपघात वगैरे झाला) की सगळी गणितं पुन्हा उलटी. ६६ टक्क्याहून अधिक जागा सतत जिंकणारा चंद्राबाबू आंध्रात कायम राहू शकला नाही; पंचवीस वर्षानंतर का असेना कॉम्रेड्सची बंगालातून हकालपट्टी झाली. त्यामुळेच हे ही गचकणार नाहीतच असे नाही.
मराठवाड्यातल्या औरंगाबादेत
विशेष माहितीबद्दल आभार.
जमाते इस्लामीची अधिकृत भूमिका काहीशी अशी होती :- "संस्कृती हा एका देशाचा पाया हवा, धर्म हा नाही." पण खरेतर त्यांना कट्टर हिंदुत्ववाद्यांसारखाच अखंड हिंदुस्थान हा प्रांत हवा होता. एकाला भगवा हवा होता, एकाला हिरवा हवा होता. संपूर्ण देशावर आज ना उद्या आमचाच झेंडा फडाकावा अशी काहीशी ती भूमिका होती.
नुसता तुकडा मागण्याऐवजी अखंड मुस्लिम/शरिया भारत घडवा अशी भूमिका घेणार्या देवबंदी लोकांना त्यांनी केलेल्या पाकिस्तान विरोधामुळे देशप्रेमी वगैरे समजणारेही बक्कळ आहेत.
पाकीस्तानात फजलूर रेहमान ह्यांचे प्राबल्य वाढते आहेमसे दिसताच इथल्या भारत-पाक मैत्री प्रेमींना आणी शांतीवाद्यांना लागलिच ते देवबंदी चळवळीचे समर्थक आहेत वगैरे म्हणून धन्य धन्य वाटू लागले होते.
--मनोबा
मस्त छान आवडले
शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.
अगदी बरोबर
http://rashtravrat.blogspot.in/2010/05/rashtravrat.html
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
मस्त
मुक्तकासारखं हे जे लिहिलयं ते आवडलं.
आता माझे काही विचार-
विचार करणारा समाज/प्रगल्भ समाज राष्ट्रवादाच्यापलिकडे चालला आहे, राष्ट्रवादाच्या भिंती वैश्विक एकसंधतेमधे अडसर बनू शकतील अशा प्रकारचा त्यांचा दावा आहे, विचार न करणारा समाज स्वतःतच गुरफटलेला असल्याने त्याला ह्या संकल्पनांमुळे फार फरक पडत नाही, ह्या दोन टोकांमधे अनेक अविचारी-ते-विचारी लोक आहेत, हे लोक अहम-राज्यवाद-राष्ट्रवाद-समाजवाद ह्या श्रेणीत कधी उमजत तर कधी भंजाळत कधी मवाळ तर कधी कट्टर होत प्रगल्भतेकडे जात आहेत, त्या पातळीवर बहूदा भाषा/समाज/राज्य/राष्ट्र ह्या संकल्पना प्रगतीसाठी/मानवतेसाठी अडसर वाटत असाव्यात.
वतन् ----कौम् ---मुल्क
उर्दु भाषेतलं उदाहरण त्यातल्या त्यात परिचित असल्यामुळं घ्यायचं म्हटलं तर काय दिसतं?
"ऐ वतन ऐ वतन तेरी राहों में हम जां तक लुटा जाएंगे" असं कुणी म्हणतं. "गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे" हे त्याचं मराठी रूप. भूमी- जमीन- वतन ह्यांच्याशीही बांधिलकी मानलेलीच दिसते.
इथे जमीन- वतन हे शब्द निष्प्राण, निर्जीव नाहीत, आपले, आपल्या लोकांचे तिथे पूर्वापार वास्तव्य आहे ही भावन त्या जमिनीच्या तुकड्याला मोल प्राप्त करुन देते. एरव्ही "जमीनीचा तुकडा" ह्या अर्थाने हेच शब्द जमीन्-दार, वतन-दार असे दिसतात.
.
सध्या बोली उर्दु मध्ये मुल्क हा शब्द सर्रास आढळतो. मराठीत आपण "देश" म्हणतो; बोलीभाषेतही "देश" वापरतो अगदि त्याच अर्थाचा आणि वापराचा हा शब्द. ह्यात मला तितकासा जिवंतपणा जानवत नाही. कलरलेस, ओडरलेस, निरुपद्रवी असा हा शब्द.
.
"राष्ट्र " ह्या कल्पनेशी "बृहद कुटुंब" किंवा "टोळी" किंवा "वंश" ह्याच्या जवळ जाणारा उर्दु शब्द म्हणजे "कौम"
"कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा
यह जिंदगी है तू कौम पे लुटाये जा" असं आझाद हिंद सेनेचं विजय गीत होतं. भारत ही एक "कौम" मानण्यात आली होती. एक बृहत कुटुंबच. पण अर्थातच ह्या शब्दाचं मूळ तितकं उदात्त नाही. आज आफ्रिकन एकाच आफ्रिकन "देशा"त अनेक "कौम " पहायला मिलतात. एक "कौम" दुसर्या "कौम" ला हाकलायला पाहते ; उर्दु च्यानेल पाहिल्यावर "कौम" ह्या शब्दाचा हा अर्थही जाणवेल.
वतन, मुल्क, कौम हे मराठीत अनुक्रमे वतन/भूमी/जमीन,देश, राष्ट्र बनून येताना दिसतात.
.
एक रिकामी जागा आहे, तो "देश" असू शकतो का? टेक्निकली , हो. पण ते राश्ट्र असू शकत नाही असे मी वर लेखात म्हटले आहे. देश- राष्ट्र ही तुलना सर्वात अचूक करता येइल ती संस्था/संघटना -- संस्थेचे कार्यालय ह्या जोडिशी.
एखाद्या संस्थेला एखाद्या कार्यालयातून, बिल्डिंगमधून घालवून देता येते. पण म्हणून त्यांची संघटना संपत नाही, तिचे फक्त कार्यालय जाते, तसेच काहीसे. संघटना असणे, संघटनेचे सभासद असणे हे एका नात्याने, धाग्याने बांधले जाणयसारखे आहे . "राष्ट्र " ह्या कल्पनेत असे बांधले जाणे अपेक्षित आहे. एकमेकांशी नाते अपेक्षित आहे.
त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा
बराचसा निर्जीव.
राष्ट्र - देश
>>त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा बराचसा निर्जीव.
सहमत आहे. म्हणूनच जनगणमन हे देशातल्या लोकांचा (पंजाब, सिंध गुजरात मराठा, द्राविड ....)उल्लेख असलेले गीत राष्ट्रगीत म्हणून अधिक सार्थ आहे का?
राष्ट्रगीत
जन गण मन हे आपण राष्ट्रगीत म्हणून मानलेले आहे त्यामुळे त्यात बदल होता कामा नये असे माझे मत. प्रगल्भ देश राष्ट्रगीत बदलत नसतात.
बदलायचा
राष्ट्रगीत बदलायचा उल्लेख थत्त्यांनी केलेला नाही. त्यांच्या प्रतिसादाला सुप्रीम कोर्टाल्या सिंधू शब्द वापरावा की सिंध ह्या वादाची पार्श्वभूमी आहे.
@थत्ते :- होय. लोकसमूह,संस्कृतीदर्शक दर्शवणारा म्हणून " सिंध" ह शब्द ठेवला तरी काहीही प्रॉब्ल्मे मला वाटत नाही. "अधिक योग्य" म्हणजे "वंदे मातरम" शी तुलनेत म्हणत असाल तर ह्याक्षणी मी मौन धारण करु इच्छितो.
@चितळे :- हो. शक्यतो बदलू नये. legacy म्हणून एक काही प्रकार असतो.राष्ट्रैय चिन्ह वगैरे.ते तसेच असलेले मला जास्ती आवडेल.
सहमत
सहमत साहेब
प्रतिसाद आवडला
कौम म्हणजे वंशाशी संबंधित हे योग्य. भारतीयांची कौम (सर्वधर्मांसकट) असे म्हणता येईल. माझ्यामते एक रिकामी जागा हा देशही असू शकत नाही. ती केवळ जमीन/ भूमी असते. देश माणसे बनवतात. उदा. अंटार्टिका हा देश नाही पण (भू)खंड आहे. राष्ट्र हा शब्द जिवंतपणा दर्शवतो हे आवडले.
मुलखाचे अवांतर
मुल्कवरून आठवले मराठीतही मुलुख हा शब्द आहेच की. (मुलुख मैदान तोफ आठवते ना?) मुल्कचे बहुवचन ममालिक. उदा.सार्क ममालिक. पाकिस्तानच्या क़ौमी तराण्यात 'क़ौम, मुल्क, सल्तनत ' (राष्ट्र, देश, राज्य) असा क्रम आहे. क़ौमचा अर्थ जन (पीपल) असाही होतो. उदा. क़ौमे यहूद. युनायटेड नेशन्ज़ला अक़्वामे मुत्तहिदा म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय सामना म्हणजे बेनुलअक़्वामी मॅच. आणखी एक गंमत म्हणजे मुल्क हा शब्द पुल्लिंगी आहे. मेरा मुल्क हे बरोबर. तर क़ौम हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे मेरी क़ौम म्हणायला हवे.
Inline HTML
अतिअवांतर....
मुस्लिमी भाषेत(उर्दु) काही शब्द थेट जशाला तसे वापरले जातात. म्हणजे जो जसा आहे तसा. एक कौम एका ठिकाणी राहत असायची.(नगर राज्ये. शाक्य, वृज्जी, वृष्णी वगैरे.) ह्यातल्या प्रत्येकास आपण एक स्वतः एक "कौम" वाटायचो. तीच परंपरा ह्यांनी पुढे चालवलेली दिसते.
उर्दु मध्ये जुबाँ हा शब्द. जुबाँ = जीभ. "औरंगजे़ब़ ने दारा शुकोह की जुबाँ खींचने का हुक्म़ दिया!"
आणि जुबाँ = भाषा सुद्धा.
"किस जुबाँ से बात कर रहे हो ज्ञाब़?"
आणि जुबॉं म्हणजे "तोंड्/चेहरा"सुद्धा
"क्या जुबाँ लेके सामने जाउं परवरदिगार के|"
ह्यातला तोंड दाखवणे,जीभ हासडाणे आणि भाषा बोलणे ह्यातल्या तीन्ही क्रियात त्यांनी एकच शब्द , "जुबाँ" वेगळ्या र्थच्छटेतून वापरलाय.
"हलाल " हा शब्दही तसाच. "दुश्मनो को हलाल कर दिया" आणि "आज खाने क्को हलाल मुर्गी है|" दोन्ही वाक्प्रचार ऐकलेत.
जवळ जाणार्या र्थाला वेगळ्या छटेने तोच शब्द उर्दुत वापरतात. आपल्याकडे तशा केसेस कमी आढळतात.(म्हणजे केआच शब्दाचे दोन अर्थ होत असतील तर ते दोन अर्थ पार भिन्न भिन्न असतात. को-रिलेटेड नाही.)
.
"यह मेरा मरद है"(किंवा "ये मेरी औरत है") असं तिथल्या चांगल्या घरच्या स्त्रियाही एक दोन वेळा बोलताना पाहून कसंतरीच वाटलं. नंतर समजलं, त्यांच्याकडे नवर्यासाठी तो सर्वसामान्य वापरात आहे.(निदान ज्या वर्तुळाला मी दुरून पाहिलय तिथे तरी.)
.
तसेही पाकिस्तनात हल्ली "कौमी दंगे" नित्याचेच आहेत. आम्तर पंथीय, आंतर भाषिक सगळेच "कौमी" दंगे मध्ये अध्याहृत आहे.
नवीनच
'क़ाबा किस मुंह से जाओगे' वगैरे ऐकले आहे. 'शिकवा अल्लाह का ख़ाकम बदहन है मुझको' देखील माहीत आहे. मात्र तोंड आणि जीभ ह्यात उर्दू भाषा भेद करत नाही हे नवीन आहे. तज्ज्ञांना विचारायला हवे.
ह्यावरून आठवले
'चांगल्या' घरांत उर्दू भाषेत (मुसलमानांत नव्हे) 'शौहर' किंवा 'मियाँ' हे शब्द वापरताना बघितले आहे. 'अहलिया' आणि 'शरीक़े हयात' हे शब्द बायकोसाठी. 'मरद' आणि 'औरत' उर्दूपुरते मर्यादित नाहीत. हिंदुस्तानीत, हिंदीत हे शब्द वापरतातच. आता उर्दू, हिंदुस्तानी आणि हिंदी ह्यात भेद काय हा पुन्हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण तूर्तास एवढेच.
जाता-जाता:
एक मस्त गाणे
अजून एक...संघराज्य संकल्पना
भारत अमेरिका दोन्हीही ढोबळ मानानं संघराज्य म्हटली जातात. दोन्हीत लोकशाही आहे, वैविध्य आहे, प्रचंड मोठा भूभाग,लोकसंख्या आणि प्रचंड मोठा भूगोल ह्यांना लाभलाय; हे खरं. पण त्यांच्या रुपात मूलभूत फरक आहे. संकल्पनेतच फरक आहे.
America is destructible unit of indestructible states.
India is indestructible unit of destructible states.
तिथली राज्ये (कागदोपत्री तरी) स्वेच्छेने एकत्र आहेत.(अपवाद अमेरिकन यादवी/गृह युद्ध).
भारताच्या सीमांना कुठलेच भारतीय राज्य च्यालेंज करु शकत नाही. भारतीय त्यातून फुटून निघण्याची मागणी करणं हेच मुळात घटनाबाह्य, असंवैधानिक ठरवण्यात आलय.(कश्मीर स्वतंत्र करा म्हणणार्यांना अरुंधती रॉय वगैरेंना हे कलम लावलं जाउ शकतं.) दुसर्या एखाद्या शेजारी सत्तेस आम्हास जोडून घ्यायची इच्छा असेल तर मात्र भारत सर्कार त्यावर विचार करु शकते. ठिक वाटल्यास जोडून घेउही शकते.(सिक्कीम १९७३ पर्यंत भूतान सारखाच स्वतंत्र देश होता तसेच काहीसे.)
एकूणच इतिहासातून आपल्या घटनाकारांनी हा बोध घेतलेला दिसतो.(प्रबळ केंद्र सरकार असण्यासाठी नेहरु/काँग्रेस ह्यांनी हटून बसणे हे फाळणी होण्याच्या कारणांपैकी एक आहे असे म्हणतात. मुस्लिम राज्ये करा, त्या राज्यांना विशेषाधिकार इथपर्य्म्त जिन्ना ऐकायला तयार होते, फाळणी टाळायला म्हणे.)
भारतीय राज्ये तोडून त्यातून नवी राज्ये तयार करण्याचे सर्वाधिकार केंद्राकडे आहेत.
अमेरिकेचे उलट. तिथे राज्ये फोडली जाणे अपेक्षित नाही. शिवाय हवे तर राज्यांना स्वतंत्र होण्याचा (कागदोपत्री तरी) अधिकार आहे म्हणतात.
ऋषिकेश च्या "एक ऐतिहासिक घटना" नावाच्या एका माहितीपूर्ण मालिकेत ह्याचा उल्लेख पाहिल्याचं आठवतय.