एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतराजी ही सर्वपरिचित आहे. किनारपट्टीला साधारणपणे समांतर असलेली ही सह्याद्री पर्वतराजी, भारताच्या दक्षिण टोकापासून ते पार महाराष्ट्रामधील नाशिक शहराच्या थोड्या उत्तरे पर्यंत विस्तारलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या उत्तरेला असलेल्या याच स्थानापासून पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतराजीला काटकोन करून, विस्तारत जाणारी आणखी एक पर्वतराजी फार कमी लोकांना माहिती आहे. सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.

साधारण 2200वर्षांपूवी किंवा इ.स.पूर्व 200या कालात याच पर्वतराजीच्या दक्षिण उतारावर, अतिशय अरूंद व खोल असलेल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण दर्‍यांमध्ये, दोन बौद्ध मठ स्थापन केले गेले. या दोन्ही दर्‍यांमध्ये तळाला छोटेखानी नद्या वहात होत्या. दोन्ही दर्‍या संपूर्णपणे घनदाट जंगलांनी व्यापलेल्या होत्या आणि दर्‍यांच्या दोन्ही बाजूंना असलेले कडे सरळ रेषेत तुटलेले होते. हे दोन्ही मठ जरी या कालखंडात दख्खनची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण) शहराच्या उत्तर दिशेलाच असले तरी या मठांपैकी एक मठ पूर्व दिशेला होता तर एक पश्चिमेकडे होता. हे दोन्ही मठ अतिशय भव्य आणि विशाल दिसतील याच पद्धतीने त्यांचे आराखडे बनवण्यात आलेले होते. बौद्ध धर्माचे वर्चस्व असलेल्या या काळात या दोन्ही मठांना खूप प्रसिद्धी मिळाली व भारतीय उपखंडात त्यांचे नाव सर्वश्रुत झाले. यापैकी पूर्वेकडचा व अजंठा या नावाने ओळखला जाणारा बौद्ध मठ अजूनही म्हणजे 21व्या शतकातही प्रसिद्धच आहे. जगभरातून या ठिकाणी असलेली 1500ते 2000 वर्षांपूर्वीची शिल्पे व भित्तीचित्रे बघण्यासाठी म्हणून पर्यटकांची गर्दी अजिंठ्याला आजही होत असते.

पश्चिमेकडे असलेला दुसरा मठ मात्र आज सर्वस्वी अपरिचित आहे. ज्यांना भारताच्या बौद्धकालीन इतिहासात विशेष रुची किंवा रस आहे असे फारच तुरळक असलेले पर्यटक, या बौद्ध मठाला आज भेट देताना आढळतात. हा बौद्ध मठ आज पितळखोरे गुंफा या नावाने ओळखला जातो. पितळखोरे गुंफांबद्दल, अजंठ्याच्या गुंफाच्या मानाने, सर्वसाधारण पर्यटकांना अज्ञान असण्याला काही कारणे आहेत. पहिले महत्वाचे कारण म्हणजे पितळखोरे दरी ही खोल, अरूंद व कमी लांब पसरलेली असल्याने भेट देण्यासाठी बरीच दुर्गम आहे. अजंठा गुंफा असलेली दरी ही या मानाने उथळ,रूंद आणि एखाद्या घोड्याच्या नालाच्या आकाराची आहे. यामुळे या दरीची एकूण लांबी बरीच जास्त आहे. या कारणामुळे इ.स. नंतर 6व्या शतकापर्यंत अजंठा येथे नवीन नवीन गुंफांची खोदाई चालूच राहिली आणि एकूण 30गुंफा येथे खोदल्या गेल्या. पितळखोरे दरीत मात्र फक्त 14 च गुंफा आहेत. याशिवाय एक दुसरे महत्त्वाचे कारण पितळखोरे गुंफा फारशा माहिती नसण्यामागे आहे. अजंठा आणि पितळखोरे या दोन्ही ठिकाणच्या गुंफा जरी दख्खनचे पठार ज्या काळ्या बॅसॉल्ट पाषाणाचे बनलेले आहे त्यातच खोदलेल्या असल्या तरी पितळखोरे येथील बॅसॉल्ट पाषाण हा जरा मृदू प्रकारातील आहे व हवामान व पाण्याचा मारा यापुढे हा पाषाण तितकासा टिकाव न धरता तो भंग होत असल्याचे दिसून आले आहे. या कारणांमुळे पितळखोरे गुंफा आज अत्यंत खंडप्राय अवस्थेत व भग्न झालेल्या असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असेच म्हणावेसे लागेल. मात्र प्राचीन काळी म्हणजे जेंव्हा भारतात बौद्ध धर्म लोकप्रियतेच्या शिखरावर होता त्यावेळची परिस्थिती अतिशय निराळी होती. पितळखोरे मठ त्यावेळी सर्वज्ञात होता. टॉलेमी याने पितळखोर्‍याचा ' Petrigala' असा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे तर बौद्ध धर्माच्या इतिहासाची नोंद करणार्‍या महामयूरी या ग्रंथात पितळखोर्‍याला 'Pitanglya' असे संबोधले आहे.

मी आता पितळखोरे येथील पुरातन लेण्यांना भेट देण्यासाठी म्हणून निघालो आहे. पितळखोरे लेणी ज्या खोल दरीमध्ये आहेत ती, सातमाला पर्वतराजीच्या डोंगरांच्या मध्ये असलेली, दरी, मुंबई—आग्रा महामार्ग या उत्तर व पश्चिम भारताला जोडणार्‍या व अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या महामार्गावर वसलेल्या चाळिसगाव या शहरापासून 12मैलावर आहेत. असे असले तरी पितळखोरे येथे जाण्यासाठी औरंगाबाद शहरापासून निघणे जास्त सोईचे पडते असे मला वाटते. एकतर औरंगाबाद शहरामध्ये रहाण्यासाठी असलेल्या सुविधा जास्त चांगल्या दर्जाच्या व भरपूर प्रमाणात आहेत आणि अजंठा, वेरूळ व दौलताबाद या सारखी इतर प्रेक्षणीय ठिकाणेही औरंगाबादच्या याच वास्तव्यात बघता येतात. अतिशय सुस्थितीत असलेला व डांबरीकरण केलेला औरंगाबाद- धुळे हा एक रस्ता औरंगाबादकडून उत्तर दिशेला जातो. या रस्त्यावर पुढे दौलताबादचा किल्ला, वेरूळ लेणी सारखी प्रेक्षणीय स्थळे तर वाटेत लागतातच. परंतु या शिवाय, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर व औरंगजेबची कबर ही ठिकाणे सुद्धा या रस्त्यावरून प्रवास करताना मधे थांबून बघता येतात. या रस्त्यावर पर्यटकांना आकर्षित करणारी एवढी प्रेक्षणीय स्थळे आहेत की पितळखोरे येथे आवर्जून बघण्यासारखी लेणी आहेत व तेथे जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता निवडावा लागतो हेच औरंगाबादला भेट देणार्‍या बहुतेक पर्यटकांना माहीत सुद्धा नसते.

डाव्या बाजूला दिसणारा भव्य दौलताबादचा किल्ला ओलांडून मी आता पुढे निघालो आहे. लगेचच पुढे वेरूळचा घाट लागतो. आसमंतात भरपूर प्रमाणात झाडी असल्याने सगळीकडे हिरवेगार दिसते आहे. उजव्या हाताला डोंगरतळाशी एक मोठा जलाशय दिसतो आहे. वेरूळ घाटाच्या माथ्यावरच्या भागात असलेले खुलताबाद गाव ओलांडून पुढे आल्यावर या रस्त्याला दोन फाटे फुटताना दिसतात. डावीकडचा फाटा नाशिककडे जातो तर उजवीकडचा चाळिसगाव मार्गे धुळ्याला! दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सोडले तर महाराष्ट्रातील बाकी सर्व प्रमुख शहरे औरंगाबादपासून इतक्या जवळच्या अंतरावर आहेत की महाराष्ट्राची राजधानी म्हणून याच परिसरात असलेले पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे याची खात्री पटते. आता रस्ता वेरूळचा घाट उतरू लागला आहे. त्यामुळे गाडी अतिशय वळणे घेत खाली जाते आहे. सध्या सगळ्याच रस्त्यांवर भराव्या लागणारा पथकर या रस्त्यावरही भरावा लागतोच व त्यासाठी गाडी येथे थांबवावी लागते आहे. गाडी घाटपायथ्याशी पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या गर्द झाडीमधून खूप लांब अंतर पसरलेली वेरूळची लेणी मला दिसतात पण बराच पल्ला गाठायचा असल्याने आम्ही पुढे जात राहतो.

घाट ओलांडून पुढे निघाल्यावर आता सभोवतालचे दृष्य महाराष्ट्रातील सर्वसाधारण ग्रामीण भागात दिसते तसेच दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंना दृष्टी पोचेल तिथपर्यंत शेते पसरलेली आहेत. पुष्कळ शेतात कापणीसाठी जवळजवळ तयार झालेला ऊस ऊभा आहे तर अनेक शेतात मका व कपाशीची छोटी छोटी रोपे काळ्या मातीतून नुकतीच फुटलेली दिसत आहेत. आसमंतात झाडोराही बर्‍यापैकी दिसतो आहे. उत्तर आणि पश्चिम दिशांना दूर क्षितिजावर मला धूसर निळसर हिरवट दिसणार्‍या पर्वतांच्या रांगाही दिसत आहेत. आमची गाडी मधून मधून रस्त्याच्या कडेला वसलेल्या छोट्या छोट्या गावांमधून जाते आहे. यापैकी बहुतेक गावांच्यात, मी प्रवास करत असलेला औरंगाबाद- धुळे रस्ता हा एकच रस्ता असल्याचे दिसते आहे. प्रत्येक गावात दिसणारे वाणीसामानाचे वा मोबाईल फोन आणि सिम कार्ड हे विकणारी दुकाने रस्त्याच्या कडेलाच दिसत आहेत. साधारण एका तासाच्या प्रवासानंतर आम्हाला कन्नड गाव लागते. या गावाभोवती असलेली तटबंदी व बुरुज अजूनही सुस्थितीत बघून मला आश्चर्य वाटते. मात्र हायवे या तटबंदीच्या बाजूने जातो आहे व त्यामुळे गावाची मुख्य बाजारपेठ या तटबंदीच्या बाहेरच वसलेली आहे. थोडे पुढे गेल्यावर, डाव्या बाजूला जाणारा एक छोटासा रस्ता लागतो. या रस्त्याच्या कडेला कालीमठाकडे म्हणून बाण दाखवलेला एक छोटासा फलक मला दिसतो. आम्हाला येथेच वळायचे आहे. हा कालीमठ म्हणजे कोण्या एका स्वामी प्रणवानंद महाराजांनी स्थापन केलेले एक मंदिर आहे. या फाट्यापासून साधारण 2किमी अंतरावर असलेले लाल रंगाचे हे मंदिर दिसायला तरी मोठे आकर्षक वाटते आहे. परंतु आम्ही तसेच पुढे जातो.
साधारणपणे बरा म्हणता येईल असा व एका वेळी एकच वाहन जाऊ शकेल एवढाच रूंद असलेल्या या रस्त्याने आम्ही साधारण 8किमी तरी पुढे जातो. पुढे अचानक रस्त्यावर एक प्रवेशद्वाराची कमान, दोन्ही बाजूंना संरक्षक गार्डसच्या खोल्या व मध्यभागी रस्त्यावर एक मोठे प्रवेशद्वार दिसते. या कमानीवर लावलेल्या फलकाप्रमाणे, रस्त्याचा यापुढे जाणारा भाग गौताळा वन्य प्राणी संरक्षित विभागामधून जात असल्याने प्रवेशासाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक दिसते आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे कोणी चिटपाखरूही नाही व प्रवेशद्वार पूर्णपणे उघडे असल्याचे मला दिसते आहे. एखादा किमी अंतर पुढे गेल्यावर समोर एक वाहनतळ दिसतो. एका कडेला असलेल्या झाडाखाली चालक गाडी उभी करतो. ही जागा म्हणजे सभोवती पसरलेल्या एका जंगलवजा भागात वनविभागाने निर्माण केलेला एक वाहनतळ आहे हे माझ्या लगेच लक्षात येते. परंतु येथे असलेली बहुसंख्य झाडे वनीकरण करून वाढवलेली आहेत हेही माझ्या लक्षात आल्यावाचून रहात नाही. काहीही असो! हा भाग अतिशय सृष्टीसौंदर्ययुक्त व रमणीय आहे यात शंकाच नाही. मी खाली उतरतो. गाडीचा चालक मला समोरच दिसणारा व बाजूच्या लोखंडी कठड्यासह उत्तम रित्या बांधून काढलेला एक पदपथ दाखवतो व पितळखोरे लेण्यांकडे जाण्याचा तो मार्ग असल्याचे सांगतो.

या पदपथावरून चालत थोडे पुढे गेल्यावर माझ्या लक्षात येते की एका खोल व अरूंद दरीच्या अगदी कडेवर मी पोचलो आहे. माझ्या समोर, फक्त समोरच्या दरीत, गोलगोल फिरत खाली उतरणार्‍या पायर्‍या मला दिसत आहेत. पुरातत्व विभागाने बांधलेल्या, दगडाचा पृष्ठतल व मजबूत लोखंडी कठडा असलेल्या या पायर्‍या कोठे जात आहेत हे मात्र दिसत नाहीये. समोर दिसणारी दरी संपूर्णपणे हिरव्यागार झाडाझुडुपांखाली झाकलेली दिसते आहे. एकूणच दृष्य अतिशय सुंदर दिसते आहे. समोर दिसणार्‍या जंगलात, मोठी पाने असलेले सागाचे वृक्ष मला ओळखू येतात. जंगलातील बाकी झाडे काही माझ्या ओळखीची वाटत नाहीत. आपण समोरच्या अज्ञातात काहीतरी साहसी मोहीमेवर निघालो आहोत असे माझ्या मनाला समोरचे दृष्य बघून उगीचच वाटू लागते व त्याच उत्साहात मी पायर्‍या उतरण्यास सुरूवात करतो.

पायर्‍या उतरत बरेच अंतर खाली आल्यानंतरही समोर दिसणार्‍या घनदाट जंगलामुळे पितळखोरे लेण्यांचे कोणतेही दृष्य मला अजूनही दिसू शकलेले नाही. अनंत पायर्‍या मी उतरलो आहे असे वाटू लागल्यावर अखेरीस लेण्यांचे प्रथम दृष्य माझ्या नजरेसमोर साकार होते आहे. काळ्या कातळाचे कडे दोन्ही बाजूंना असलेली व समोर दिसणारी ही दरी, वक्राकार आकारात पुढे पसरत गेलेली मला दिसते आहे व या वक्राकार असलेल्या समोरच्या काळ्या कातळावरच पितळखोर्‍याची 8किंवा 10 लेणी पसरलेली आहेत. लेण्यांच्या तोंडांच्या उर्ध्व दिशेकडे उभा कडा दिसतो आहे तर खालच्या बाजूला, दरीच्या खोल तळाला, पाऊसकाळातील पाण्याने फोफावणारी पण सध्या मात्र फारसे पाणी नसलेली एक छोटी नदी दिसते आहे. मी उतरत असलेल्या पायर्‍या मला याच पावसाळी नदीच्या वरच्या अंगाला असलेल्या एका धबधब्याच्या वरील खडकाळ भागात घेऊन जातात. नदीला पाणी नसल्याने मी ती नदी सहज पार करू शकतो आहे. मात्र तिथला एकूण प्रकार बघता, पितळखोरे ही वरूणराजांच्या कृपाकाळात भेट देण्याची जागा नव्हे याबाबत माझी खात्री पटते आहे.

आणखी थोड्या पायर्‍या उतरल्यावर, खालच्या खोल नदीवर, पुरातत्व विभागाने बांधलेला एक मजबूत लोखंडी पूल सहजपणे पार करता येतो आहे. पलीकडच्या तीरावर पोहोचल्यानंतर मी समोर बघतो.

समोर दृष्टी टाकल्यावर माझ्या लक्षात येते की मी पितळखोरे लेण्यांपाशी पोहोचलो आहे. माझ्या समोर असलेला कड्याचा भाग एखाद्या अर्धवर्तुळाकार आकाराचा कसा काय दिसतो आहे? म्हणून मी जरा कुतुहलानेच समोर बघतो. मात्र हा समोरचा अर्धवर्तुळाकार आकाराचा कडा, खालच्या अंगाला खोदलेल्या गुहेच्या संपूर्ण छताचा खडक खाली कोसळल्यामुळेच निर्माण झाला असावा असे स्पष्टपणे दिसते आहे. प्रत्यक्षात ही नष्ट झालेली गुहा म्हणजे पितळखोरे लेण्यामधील 1क्रमांकाची गुंफा आहे. गुंफेच्या तळाला बौद्ध भिख्खूंसाठी खोदलेल्या छोट्या छोट्या शयनगृहांच्या पडक्या भिंती व भिख्खूंसाठी पाषाणात कोरलेले मंचक स्पष्टपणे दिसत असल्याने ही गुंफा म्हणजे बौद्ध भिख्खूंच्या रहाण्यासाठी बनवलेला 'विहार' असला पाहिजे हे स्पष्ट आहे.

क्रमश:

1ऑगस्ट 2012

या लेखासोबत असलेली छायाचित्रे या दुव्यावर क्लिक केल्यास पहाता येतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

एक शंका

यापैकी पूर्वेकडचा व अजंठा या नावाने ओळखला जाणारा बौद्ध मठ अजूनही म्हणजे 21व्या शतकातही प्रसिद्धच आहे.
अजंठा गुंफा / लेणी हा सुरवातीपासून बौद्ध मठ आहे का?

बौद्ध मठ

अर्थातच! अजंठा मठ सुरूवातीपासून ते तेथील राबता बंद होईपर्यंत बौद्ध मठच होता. तुमच्या मनात कदाचित वेरूळ व अजंठा या मध्ये गोंधळ झाला असावा. वेरूळच्या लेण्यात बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांनी खोदलेल्या गुंफा आहेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वॉव...

दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.

हिमालयानं आणि आल्प्सनं(काही प्रमाणात सह्याद्रीनंही) बर्‍याच आक्रमणकार्‍यांना नुसत्या हवामानानं परतायला लावलं, तसं ह्या पर्वतरांगांमुळं नेहमीच कुणी दूर राहिले वगैरे ऐकले नाही.
खिल्जीही एलिचपूरानंतर हे ओलांडूनच आला, नंतर दिल्लीची मुघल सल्तनतही आदिल-निजाम शाह्यांवर इथूनच कडाडून तुटून पडली.
लिखित उल्लेख नाहीत पण उत्तरेतील मौर्यसत्तेखालीही हा भाग असावाच(दक्षिणेपर्यंतच्या भौगोलिक सलगतेचा विचार केल्यास.)

पितळखोरे मठ त्यावेळी सर्वज्ञात होता. टॉलेमी याने पितळखोर्‍याचा ' Petrigala' असा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे तर बौद्ध धर्माच्या इतिहासाची नोंद करणार्‍या महामयूरी या ग्रंथात पितळखोर्‍याला 'Pitanglya' असे संबोधले आहे.
नव्यानेच समजले.

औरंगाबादला भेट देणार्‍या बहुतेक पर्यटकांना माहीत सुद्धा नसते.

पर्यटक सोडा, औरंगाबादला काही दशके राहूनही, अधूनमधून ह्या भागात फिरायची हौस असूनही बर्‍याच जणांना तिथे काही असते हे ठाउकच नसते.

डाव्या बाजूला दिसणारा भव्य दौलताबादचा किल्ला ओलांडून मी आता पुढे निघालो आहे. लगेचच पुढे वेरूळचा घाट लागतो. आसमंतात भरपूर प्रमाणात झाडी असल्याने सगळीकडे हिरवेगार दिसते आहे. उजव्या हाताला डोंगरतळाशी एक मोठा जलाशय दिसतो आहे. वेरूळ घाटाच्या माथ्यावरच्या भागात असलेले खुलताबाद गाव ओलांडून पुढे आल्यावर
गंमत सांगतो. कधी निवांत वेळ असताना तिथे गेलात तर एक करुन बघा. खुल्ताबादहून पुढे वेरूळपर्यंत गाडीने जायला त्या काळात अर्धाएकतास वगैरे लागायचा. आम्ही दोन् तीन् वेळेस पायी पोचलो फक्त् दहा-बारा मिनिटात! योग्य रस्ता माहीत हवा फक्त.
गुंफाच बघत असाल तर एक अनवट जागा सांगतो, त्याच परिसरात आहे. "शरणापूर". इथे डोंगर् आहे आणि डोंगराच्या मधोमध माणूस जेमतेल् उभा राहील इतपत खोदत खोदत जागा बनवली आहे. ४-५ हजार स्क्वेअर फूट तरी असावी. मध्ये खांब आहेत, फारसे नक्षीकाम नाही. पुढे रेणुकेची मूर्ती( शेंदूर् फासलेला दगड) आहे. पण् आपण् डोंगराच्या आतमध्ये आहोत, ही कल्पनाच भारी वाटते. तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने तिथे काही सापडेल की नाही ठाउक नाही, पण एकदा तरी अवश्य पहावे असे खोदकाम् आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सोडले तर महाराष्ट्रातील बाकी सर्व प्रमुख शहरे औरंगाबादपासून इतक्या जवळच्या अंतरावर आहेत की महाराष्ट्राची राजधानी म्हणून याच परिसरात असलेले पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे याची खात्री पटते.
छे हो. ती "आजची " मोठी शहरे असतीलही. दीडेक हजार वर्षापूर्वीही तिथंच वस्ती असेल असे कसे म्हणू शकतो? तेव्हा कल्याण-चौल -महिकावती इकडॅ समुद्रकिनार्‍याला, बीड-नांदेड, झालच तर तुमच्याच लेखात आल्याप्रमाणं नाणेघाटाच्या आसपासचा परिसर (जुन्नर मावळ, जुन्नर पेठ) जिल्हा ही प्रमुख वस्ती होती. सातारा, सांगली, कोल्हापूर ही "आजची " शहरे तेव्हा वसायची होती.

घाट ओलांडून पुढे निघाल्यावर आता सभोवतालचे दृष्य महाराष्ट्रातील सर्वसाधारण ग्रामीण भागात दिसते तसेच दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंना दृष्टी पोचेल तिथपर्यंत शेते पसरलेली आहेत. कुठल्या काळात गेलात म्हणायचं? मी हिरवीगार शेतं सलग पसरलेली प्रथम पुणे आणि आसपासच्या भागातच पाहिली. आमच्याकडे अजूनहे ग्रामीण भाग बराचसा भकास, कोरडा कोरडा जाणवतो वर्षातले बहुतेक काळ.

दरीच्या खोल तळाला, पाऊसकाळातील पाण्याने फोफावणारी पण सध्या मात्र फारसे पाणी नसलेली एक छोटी नदी दिसते आहे.
बहुतेक तो चंदन नाला असावा. तिथं भटाकायला गेलेलं पब्लिक तिथलं पाणी बिंदास प्यायला वगैरे वापरायचं. चांगलं स्वच्छ, ताजं पाणी असायचं त्याला. वनविभागाने बिबट्यांची मोजणी करतानाही त्याच्या आसपास, त्याच्या काठानं नजर ठेवायला सांगितली होती.
--मनोबा

उत्तम प्रतिसाद

मनोबा

नैसर्गिक तटबंदी होती
हा माझा शोध नाही. बॉम्बे गॅझेटियरच्या नाशिक जिल्ह्याबद्दलच्या खंडात सातमाला पर्वताबद्दल हा उल्लेख आहे.
पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे

पैठण हे गाव कसे मध्यवर्ती आहे एवढेच दाखवण्याचा उद्देश आहे. कोल्हापूरला सातवाहन कालात वस्ती होती हे तिथे सापडलेली नाणी व जवळ सापडलेला शिलालेख यावरून सिद्ध झालेले आहे. या काळात इतरही शहरे होतीच मुंबईजवळचे सोपारा,पुण्याजवळचे जुन्नर, तुम्ही म्हणता तसे बीड, खानदेशातील शहरे आणि नागपूरजवळच्या वैनगंगा नदीकाठी वसलेले शहर ही सगळी होती. पैठण या सर्वांसाठी मध्यवर्तीच होते.

मी पितळखोर्‍याला जुलै महिन्यात गेलो होतो. या महिन्यात जे मला दिसले त्याची मी नोंद केली आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मध्यवर्ती पैठण

पैठण गाव हे राजधानी म्हणून सातवाहन राजांनी का निवडले असावे

मध्यवर्ती हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्याशी सहमत आहेच. शिवाय बाजूला बारा महिने वाहणारी नदी, व्यापार केंद्र वगैरे गोष्टीही महत्त्वाच्या. औरंगाबाद वगैरे ही नवी शहरे असतील पण मौर्य साम्राज्यापासून वेगळे झालेल्या तरीही खेटून असणार्‍या सातवाहन साम्राज्याला तत्कालीन उज्जैन, भडोच, अमरावती वगैरे शहरांसाठीही पैठण हे मध्यवर्ती ठिकाण होते. राजधानीच्या दृष्टीने महत्त्वाचे होते असे वाटते.

पुरातत्त्व खाते एकूणच सगळीकडे ठीक काम करते आहे असे वाटते.

नाही हं! थोडा ढीला कारभार असतो. साफसफाई, रस्ते काढणे हे काम ठीक करतात पण काही रिस्टोर (मराठी गंडलं) करायचं झालं की फारच स्वस्त काम करून टाकतात. थत्ते याला सहमती देतील. ;-)

मान्य.

>>उत्तम प्रतिसाद
थांकू थांकू .

किंवा
>>उत्तम प्रतिसाद
सहमत. +१ ;)

किंवा
>>उत्तम प्रतिसाद
उत्तम लेख (score settling ;) )
असो. थट्टा पुरे मनोबा आता मूळ मुद्द्याकडं या.

पैठण हे गाव कसे मध्यवर्ती आहे एवढेच दाखवण्याचा उद्देश आहे. कोल्हापूरला सातवाहन कालात वस्ती होती हे तिथे सापडलेली नाणी व जवळ सापडलेला शिलालेख यावरून सिद्ध झालेले आहे.
ओह्. अस्सय होय. नाणी आणि शिलालेख ह्याबद्दल आयडीया नव्हती. म्हणजे "महायोगपीठे तटे भीमरथ्याम्" असं म्हणवून घेणारा पंढरीचा पांडुरंगच नव्हे तर मराठी संस्कृतीचे अजून एक प्रतीक असलेली कोल्हापूरची अंबाबाई ही सुद्धा इतकी प्राचीनच का काय. म्हणजे कोल्हापूर प्राचीन आहे तसच मंदीरही प्राचीन आहे का?

या काळात इतरही शहरे होतीच मुंबईजवळचे सोपारा,पुण्याजवळचे जुन्नर, तुम्ही म्हणता तसे बीड, खानदेशातील शहरे आणि नागपूरजवळच्या वैनगंगा नदीकाठी वसलेले शहर ही सगळी होती. पैठण या सर्वांसाठी मध्यवर्तीच होते.
मान्य. शिवाय ह्यासोबतच नदीकाठचं मोक्याचं ठिकाण असं काहीसं प्रियालीतै म्हणाल्या तेही असेल.

--मनोबा

अवांतरः पैठण

उगीच आठवलं म्हणून.

पठाणकोट (पंजाब) या शहराचे पूर्वीचे नावही "पैठण" (प्रतिष्ठानपूर) असे होते हे वाचल्याचे आठवते.

अवांतर...

सकाळ मध्ये http://72.78.249.107/esakal/20101012/5381744796877185534.htm
हे वर्णन् दिसलं बहुतेक मी म्हणतोय त्याच ठिकाणाचं असावं.
त्याचं धार्मिक कमर्शिअलायझेशन व्हायचा धोका दिसतोय.

--मनोबा

उत्तम वर्णन

सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.

हे सातपुडा आणि विंध्याद्रीशी मेळ खाणारे दिसते.

आणखी थोड्या पायर्‍या उतरल्यावर, खालच्या खोल नदीवर, पुरातत्व विभागाने बांधलेला एक मजबूत लोखंडी पूल सहजपणे पार करता येतो आहे. पलीकडच्या तीरावर पोहोचल्यानंतर मी समोर बघतो.

वा! फोटोत पूल चांगला बांधलेला दिसतो. पुरातत्त्व खात्याने येथे बरे काम केलेले आहे असे म्हणायला हवे.

बाकी वर्णन उत्तमच. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

खरे आहे!

अजिंठा सर्वांना माहिती आहे पण या गुंफा ज्या पर्वतराजीमध्ये आहेत तिची माहिती फारशी कोणाला नाही.मलाही नव्हती. बॉम्बे गॅझेटियर वाचूनच मला समजले. गॅझेटियरचे खंड हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अमूल्य असा ठेवा आहे.

पुरातत्त्व खाते एकूणच सगळीकडे ठीक काम करते आहे असे वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पुरातत्त्व खाते एकूणच सगळीकडे ठीक काम करते आहे असे वाटते.

पुरातत्त्व खाते एकूणच सगळीकडे ठीक काम करते आहे असे वाटते.

ह्याबद्द्ल इथे चंदीगडामध्ला अनुभव सांगू इच्छितो. इथे आसपास भटाकण्यासारखं काय आहे (विशेषतः जे आम्हा बाहेरच्यांना ठाउक नाही असे काहीतरी ) म्हणून स्थानिक सहकार्‍यांना विचारले तेव्हा सगळ्यानी कुलु-मनाली नेहमीचीच ठिकाणं सांगितली. काहींनी हायवेवरील पिझ्झा आणि बर्गरसेंटरही प्रेक्षणीय वगैरे म्हणून सांगितले.
शेवटॅए कुठून तरी मुघल गार्डन म्हणवल्या जाणार्‍या पिंजोर गार्डन किंवा यादविंद्र गार्डनचा पत्त्ता मिळाला. चंदिगडाबाहेर तीसेक किलोमीटार असावे फक्त.
ते गार्डन बर्‍याच जणांनी पाहिलेले. अगदि सुंदर्, छान्, नेटाके होते. आत मध्ये केवळ फुलांची झाडे नसून आमरायाही होत्या. इतर स्थानिक प्रजातीचे वृक्षही होते. एकत्रित केलेल्या दोन-चार क्रिकेट स्टेडिअम एवढे तरी ते भव्य असावे. वरतून चिंब , श्रावणात सतत पडणारा पाऊस आणि खाली मस्त मी फिरत निघालेलो.
तिथे आलेल्या जवळपास कित्येक पर्यटकांस मी सहज बोलणे काढून "भीमादेवी टेम्पल" पाहण्यास उत्सुक आहात काय असे विचारले, बहुतांशांना(अगदि चंदिगडाच्या पिढिजात स्थानिकांनाही) ते माहितीच नव्हते! ज्यांना ठाउक होते त्यांना "तिथे जाउन काय करायचे?" हा रास्त, रोकडा, व्यवहारी सवाल होता. पण पिंजोरच्या दुकानदार, हाटॅलवाल्यांना मात्र व्यवस्थित माहीत होते.

दोन प्रश्न उद्भवतात भीमादेवी टेम्पल म्हणजे काय? किती दूर् आहे?

तर ते भीमादेवी टेम्पल म्हणजे काय?

तोमर का कुठल्यातरी प्राचीन भारतीय वंशाच्या राजवटीत हजारवर्षाहूनही पूर्वी पंचपूर(आजचे पिंजोर) शहर भरभराटीस आले होते. त्या राजघराण्याने बदामी, कोणार्क, खजुराहो इथल्या राजघराण्यांप्रमाणेच एक मंदिर उभारून घेतले पाषाणाचे. तिथले नक्षीकाम वगैरेही उत्तम होते. इस्लामी आक्रमणात बाराव्या का तेराव्या शतकात प्रथम त्याची नासधूस करण्यात आली. पुन्हा मुघल कालात त्याची संपूर्ण् तोडफोड करून शब्दशः धुळीस मिळवण्यात आले. ते मंदिर (भारतभरातल्या अगणित इतर मंदिरांप्रमाणे)पांडवकालीन मानले जात होते. पांडवांचे अज्ञातवासात जाण्यापूर्वीचे व तिथून परततानाचे निवासस्थान होते म्हणतात. नंतर कालौघात नष्टा करण्यात आले. १९७४ साली झालेल्या उत्खननात शेवटी त्याचे अवशेष खणून काढले गेले तेव्हा बरेच काही हाती लागले.
(शिखराचा तीनेक फूट् उंचीचा सर्वोच्च भाग, खांबांवरील नक्षीकाम केलेले भाग.सगळे भाग जवळ जवळ तीन-चार् फूट् उंचीचेच् होते. सुंदर असे हजार बाराशे वर्स्।आपूर्वीचे नक्षीकाम होते.)
मंदिर असे एकसंध अस्तित्वात आज नाही, फक्त् त्याचे जोते(base) तेवढा आहे. बाकीचे तुकडे बाजूच्याच खोल्यांमध्ये ठेवलेत.

किती दूर् आहे?
पिंजोर गार्डानच्या भिंतीला भिंत लागून आहे!
पिंजोर गार्डनच्या तटाबंदितही ह्याचे अवशेष दिसून येतात म्हणे! पण जाण्यात कुणालाच इंटरेस नव्हता.

अजिंठा सर्वांना माहिती आहे पण या गुंफा ज्या पर्वतराजीमध्ये आहेत तिची माहिती फारशी कोणाला नाही
काही गोष्टी फारच अपरिचित भीमादेवी टेम्पलप्रमाणे का राहतात ते समजले नाही.

क्रीडा पत्रकार द्वारकनाथ संझगिरी पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले होते तेव्हा त्यांना दीडेकशे किलोमीटरवरील तक्षशीला विद्यापीठाला भेट द्यायची इच्छा झाल्यावर "तिकडं कशाला जातोस, आम्हीही कधी फारसे गेलो नाही; माझ्या माहितीतल्या लोकांपैकीही कुणी तिकडे गेलेलं नाही " असे पाकिस्तानी मित्राने सांगितले होते.

त्या लोकांना तक्षशीला, तक्षशीला विद्यापीठ, पुरु, आंभी ह्यांची फारच त्रोटक् माहिती होती. असो, फारच अवांतर होतय. क्षमस्व.
--मनोबा

अत्युत्तम

धन्यवाद चंद्रशेखर. कार्ल्यापासून पितळखोऱ्यापर्यंत अतिशय उत्तम धागे झाले आहेत. तूर्तास घाईत एवढेच लिहितो. काही प्रश्न आहेत. ते नंतर टाकतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान

माझ्यासाठी पुर्णपणे नवी माहिती आहे. फोटो असते तर आणखी मजा आली असती. तुमच्या नजरेने पाहतो आहे.





चांगले प्रवासवर्णन, माहिती

चांगले प्रवासवर्णन आणि माहिती. धन्यवाद.

यः पलायते स जीवति|

चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते. माना वाकडया करून पाहिल्यास दरीच्या कडेवरून जवळच खाली आम्हास लेणीहि दिसत होती पण दरीत उतरायचे असेल तर प्रथमच पंधरावीस फूट उघडया खडकावरून खा्ली उतरणे भाग होते. कोरडया दिवसात तेहि अवघड गेले नसते पण खडक ओला आणि शेवाळलेला होता, आम्ही दोघे आणि आमची गाडी ह्याशिवाय आसपास दोनतीन किमी अंतरात कोणी माणूस नव्हता. पाय घसरून अपघात झाला असता तर आडनिडया जागी अडकलो असतो म्हणून ’य: पलायते स जीवति’ हे वचन स्मरून आम्ही लेण्यापर्यंत जाण्याचे टाळले आणि निराशेने माघारी फिरलो.

आमच्या दौर्‍याचा पुढचा भाग होता चाळिसगावनजीकच्या पाटणदेवीच्या मंदिराला भेट द्यायचा कारण हे पाटण गाव द्वितीय भास्कराचार्यांचे वसतिस्थान असू शकेल असा माझा विश्वास आहे. त्या दौर्‍याविषयीचा माझा 'उपक्रम'मधील लेख येथे आहे.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०४, २०१२

आँ?

भास्कराचार्य द्वितीय म्हणजे गणिती, "लीलावती" ग्रंथ लिहिणारेच ना?
त्यांचे वास्तव्य बुलडाण्याला होते असे ऐकले होते. आमच्याकडचे ज्येष्ठ त्यास चूक म्हणताना,
भास्कराचार्यांचा चंपावतीनगरीमधील वाडाही दाखवायचे.(चंपावतीनगर = बीड जिल्हा.
त्यांचा समजला जाणारा वाडा बीड शहरात चोर गल्लीत अगदि १९८५ पर्यंत उभा होता. खरे तर तो वाडा त्या काळात त्यांचा गोठा होता म्हणतात. नंतर मागच्या दोनेकशे वर्षात लोकांनी तिथे वाडा बांधला.)

बुलडाणा, पाटण की बीड?

ता. क् . :- वरती दुवा दिलेला लेख अजून वाचायचा आहे. माझे मत बदलायच्या आत म्हटले नोंदवून ठेवावे. ;)

--मनोबा

वा! वा!

आधी घृष्णेश्वर मग भद्रा मारूती आणि आता भांगसीदेवी वा!वा! औरंगाबाद दक्षिण काशी होण्याच्या मार्गावर दिसते. एंजॉय!

चन्द्रशेखर

 
^ वर