हा खेळ सावल्यांचा

काही दिवसांपूर्वी आपण डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्या लेखाविषयी आणि त्यांचा पुरस्कार करणार्‍या 'भविष्यपत्रा'विषयी (दैनिक सकाळ) चर्चा केली. (पाहा: हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा
http://mr.upakram.org/node/3804 )

सकाळच्या सप्तरंग या दर रविवारी प्रकाशित होणार्‍या पुरवणीत 'श्रीराम भट' हे साप्ताहिक भविष्य हे सदर चालवतात. १२ राशींच्या भविष्यावाणीबरोबर, चालू घडामोडी, काही आधुनिक बझवर्डस् यांची सरमिसळ करून गूढ, अभ्यासपूर्ण वाटणारे पण काही जणांना असंबद्ध आणि अर्थहीन वाटू शकणारे असे एक दोन परिच्छेद लिहितात. हे लिखाण बर्‍याचदा विनोदी म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे असले तरी गेल्या रविवारचे लेखन त्याला अपवाद म्हणावे लागेल. त्यांचे ते अभ्यासपूर्ण लेखन दुर्दैवाने इंटरनेट वर मिळाले नाही. सर्व उपक्रमींच्या सोयीसाठी ते विद्वत्तापूर्ण लेखन इथे देत आहे. (विशेष सूचना: एकदा वाचून कदाचित कळणार नाही त्यामुळे सदर उतारा २-३ वेळा वाचावा लागेल.)

आम्ही ज्योतिषशास्त्राकडं अगदी वेगळ्या दृष्टीनं बघतो. ज्योतिषशास्त्र हे अध्यात्मशास्त्राचं एक अंग आहे. अध्यात्मशास्त्राच्या तुलनेत या शास्त्राला जरी गौणत्व प्राप्त होत असलं तरी हे शास्त्र विश्वनिर्मितीच्या गूढाची उकल करण्यासाठी मदत तर निश्चितच करू शकतं. कारण प्रकाशाशी नातं जुळवणारं हे ज्योतिषशास्त्र अध्यात्मशास्त्राची महती आणखीनच वाढवतं. असो.

सध्या विश्वनिर्मितीचं गूढ उलगडण्याच्या प्रयत्नांत खगोलशास्त्रज्ञ आहेत. आमच्या मते, पदार्थभावना निर्माण होणं ही एक विशिष्ट स्थिती आहे. ही भावनाच विश्वनिर्मिती करते आणि ही मूळ भावना छाया-प्रकाशाच्या द्वैतातून निर्माण होते. निराकाराचं आकारात रूपांतर होणं, ही छाया-प्रकाशाची किमया आहे. ही किमया राहू आणि केतू हे छायाग्रह साधत असतात. ही किमया पुढं नियती या शब्दानं संबोधली जाते. जीव किंवा चिद्-अणू ज्या ज्या पदार्थाची जशी जशी भावना करतो, तसा तसा तो तो पदार्थ भासतो किंवा त्या पदार्थाकडून विशिष्ट क्रिया केली जाते, असं भासतं. यालाच व्यापक अर्थानं नियती म्हणतात, जे शून्य आहे त्याला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम नियती करते. निर्मिती आणि नियती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जिथं जिथं म्हणून ब्रह्मांड आहे, तिथं तिथं राहू-केतू या छायाग्रहांच्या माध्यमातून नियतीचा एक चलच्चित्रपट अखंड सुरू आहे. सध्याच्या वृश्चिकेतील राहूमुळेच जगात विश्वनिर्मितीचा किंवा नियतीचा एवढा उहापोह सुरू आहे. ’योगवसिष्ठ’ या ग्रंथात नियतीचा पदोपदी उल्लेख आहे. वसिष्ठ म्हणतात: जीवनाला वेगवेगळे अर्थ प्राप्त करून देणारी नियती जीवनात संख्या, कल्पना, भ्रांती, प्रमाद आणि अनर्थ यांच्या माध्यमातून प्रचंड गुंतागुंत निर्माण करते. माणसाच्या बुद्धिचा ताबा घेणारं ’विद्वत्तेचे भूत’हाही एक नियतीचा आविष्कार आहे!

ज्योतिषामुळे विश्वनिर्मितीच्या गूढाची उकल करण्यात मदत होऊ शकते, "पदार्थभावनाच विश्वनिर्मिती करते", "मूळ भावना छाया-प्रकाशाच्या द्वैतातून निर्माण होते", "निराकाराचं आकारात रूपांतर होणं, ही छाया-प्रकाशाची किमया आहे" "जिथं जिथं म्हणून ब्रह्मांड आहे, तिथं तिथं राहू-केतू या छायाग्रहांच्या माध्यमातून नियतीचा एक चलच्चित्रपट अखंड सुरू आहे" आणि ही सर्व "किमया" राहू आणि केतू करतात; अशी बरीच नवीन माहिती यानिमित्ताने कळाली. तसेच तथाकथित वैज्ञानिकांच्या मानगुटीवर बसून त्यांच्याकडून शोध लावून घेणारे 'विद्वत्तेचे भूत' हे ज्योतिष्यांनीच राहू-केतू मार्फत सोडलेले आहे हे समजल्याने त्यांच्याविषयीचा आदर शतगुणित झाला.

याविषयी उपक्रमींना काय वाटते ते जाणून घेण्याची इच्छा आहे.

उपविषय : आपण केलेल्या विधानांच्या समर्थनार्थ काही पुरावे द्यावे लागत नाहीत, प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नाहीत त्यामुळे अशी विधाने करण्याकडे हल्लीच्या मुद्रितमाध्यमातील लोकांचा कल वाढतो आहे का? असे होत राहिल्यास मुद्रित माध्यमे इंटरऍक्टिव्ह माध्यमांच्या (वृत्तवाहिन्या, इंटरनेट) मागे पडतील का?

Comments

असंबद्ध विधानांची मालिका

लालसर रंगातला मजकूर वाचून "व्हाय फायर इंजिन्स आर रेड" यावरचा खूप जुना जोक आठवला.

There are twelve men on the fire engine. Twelve inches make a foot. Foot is measured with ruler. Queen Elizabeth is ruler of England. England is close to sea. There are fish in the sea. Fish have fins. Fins live in Finland. Finland is next to Russia. Since Russia is Red, the fire engines are also red.

नितिन थत्ते

हाहाहा! | पण एक फरक आहे

हाहाहा! विनोद भारी आहे :)

पण एक फरक आहे. तुम्ही दिलेल्या विनोदातील वाक्ये सुटी सुटी पाहिल्यास त्यांना अर्थ आहे आणि ती बव्हंशी (पहिल्या वाक्याविषयी मला कल्पना नाही) खरी आहेत.

+

पहिल्या वाक्याविषयी मलाही कल्पना नाही. विलायतेतल्या बंबावर १२ माणसे असतीलही.

नितिन थत्ते

खासच

साहेब चुटकुला छानच आहे आवडला. बादरायण संबंध लावलात.

अध्यात्म, द्वैत, नियती, ब्रह्म

अध्यात्म, द्वैत, नियती, ब्रह्म वगैरे शब्द, त्यांचे अर्थ, प्रयोजन मला कळत नाही. मला कविताही कळत नाही. म्हणून मी कवितांच्या वाटेला जात नाही आणि ज्योतिषाच्याही.

बाकी, हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट सुरेख आहे. अद्यापही तो बघताना कुतूहल वाटते, गूढ जाणवते. फक्त केसांची झुलपे उडवत, बेलबॉटम मध्ये धांगडधिंगा करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर वात आणतात. त्यामानाने आशा काळे सुसह्य वाटते.

हा खेळ.....

छान आठवण करुन दिलीत. आशा बाईंची गाणी छान आहेत. परत पुर्वीचे दिवस आठवले. धन्यवाद.

हल्ली...

भोंदू लोक बरीच झाली आहेत. कोण चांगले आहे व कोण भोंदू आहे ते पण खरे म्हणजे चटकन ओळखून यायला लागले आहे. श्रीराम भट हे पोटा पाण्यासाठी सदर चालवतात. काही तरी लिहायचे व कॉलम भरायचे. मी महाराष्ट्रा बाहेर राहातो त्यामुळे ही मासिके वाचायला मिळत नाहीत (बरेच आहे म्हणा) पण मराठी लेखांचा दर्जा एकूणच खालावलेला दिसतो. नविन साहेबांचे कौतूक करावेसे वाटते की ते चिकाटीने लिहितात ह्या बद्दल. नाहितर आम्ही आवडत नाही म्हणून ही असली सुमार मासिके वाचणच बंद केले असते.
नविन साहेबांचे पुन्हा एकदा कौतूक.

उपविषय

उपविषय महत्त्वाचा वाटला.

आपण केलेल्या विधानांच्या समर्थनार्थ काही पुरावे द्यावे लागत नाहीत, प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नाहीत त्यामुळे अशी विधाने करण्याकडे हल्लीच्या मुद्रितमाध्यमातील लोकांचा कल वाढतो आहे का?

आपण केलेली विधाने, आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो. विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो.

असे होत राहिल्यास मुद्रित माध्यमे इंटरऍक्टिव्ह माध्यमांच्या (वृत्तवाहिन्या, इंटरनेट) मागे पडतील का?

सांगता येत नाही. इंटरनेटवरही अनेक बिनबुडाची विधाने, लेख असतात आणि आजही इंटरनेट माध्यमाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

तमसोमा ज्योतिर्गमय..

विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो.

वैद्यकात भावनांना हात कसा घातला जातो याबद्दल आमचे काही प्रबोधन करून आम्हास अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे हे प्रिया ली ताई तुम्ही न्या!

उजेड!

वैद्यकात भावनांना हात कसा घातला जातो याबद्दल आमचे काही प्रबोधन करून आम्हास अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे हे प्रिया ली ताई तुम्ही न्या!

लख्ख उजेडात अंधारातून (मग तो अज्ञानाचा का होईना) प्रकाशाकडे न्यायची गरज नसते कारण तो अंधार अज्ञानाचा नसून डोळे गच्च बंद करून घेणार्‍यांच्या डोक्यातील असतो. - इति मा प्रियाली. ;-)

आजूबाजूला नजर टाका. बालाजी तांबेंसारखे काही दिसतीलच पण आम्ही कॅन्सरसारखे दुर्धर रोग बरे करतो, एड्सवर आयुर्वेदी उपाय यासारखे अनेक दावे दिसतील. अडलेल्या, पिडलेल्या, गांजलेल्यांच्या भावनांना हात घालण्याचे हे उद्योग नाहीत असे म्हणता का तुम्ही?

सहमत आहे

आपण केलेली विधाने, आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो. विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो.

सहमत आहे.

इंटरनेटवरही अनेक बिनबुडाची विधाने, लेख असतात आणि आजही इंटरनेट माध्यमाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

एक फरक असा आहे की इंटरनेटवर कुणा एकाची/एका मतप्रवाहाची मक्तेदारी नाही. उदा. असे लेखन कोणी केले असेल तर तिथे प्रतिसाद देऊन त्याचे संदर्भ/आधार विचारता येतात, खंडन करता येते. प्रतिसाद प्रतिबंधित केले तर इतर संकेतस्थळावर किंवा ब्लॉग्सवर अशी मते व्यक्त करता येतात. वृत्तवाहिन्यातही लोकलज्जेस्तव का असेना विविध/परस्परविरोधी मतप्रवाहाच्या लोकांना बोलायची संधी मिळते. मुद्रित माध्यमात हे शक्य होत नाही.

विद्वत्तेचे भूतच.

या माणसाच्या बूद्धीचा ताबा विद्वत्तेच्या भूताने घेतला आहे असे मला वाटते.
(आमच्या बाबतीत म्हणाल तर आजवर आम्ही बूद्धी सोडून इतर फारशा गोष्टी ताब्यात ठेऊ शकलो नाही... )

काही गोष्टी

काही गोष्टी त्याच त्या होउनही रंजक असतात. त्या सकाळ पेपरवाल्या पवाराचे आणि नवीनशेठचे ह्या विरंगुळ्यासाठी आभार.
थत्त्यांचा ज्योक हुच्च आहे. जाम आवडला.
अशा लोकांमुळे आपलं मराठी कच्चं आहे अशा न्यूनगंडातून (सोप्या मराठीत इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स) बाहेर यायला मदत होते.
मराठी समजा चांगलं जरी असलं असतं तरी पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क असलं काही लिहावं लागलं असतं हे ध्यानात येउन देवानं दिलेल्या आयुष्याचं महत्व कळतं.

--मनोबा

हा तर

हॅहॅहॅ ! हा तर बालाजी तांब्यांचा प्रभाव आहे.
प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

शनि, मंगळ, राहू, केतू यांचा प्रभाव ऐकला होता. आता बालाजी तांबेही प्रभाव टाकू लागले का? "नशीब नवाचे" मधून त्यांनी नुकतीच नशीब, लहान मुलांचे खेळ (सापशिडी), सामान्य ज्ञान आणि आयुर्वेद यांची युती केली आहे. विज्ञान, आध्यात्म, संगीत वगैरे तर त्यांना वश आहेतच. पुन्हा पादाभ्यंग, साजूक तूप वगैरे दैवी उपायही त्यांच्याकडे आहेत. "विद्वत्तेच्या भुताचे" श्रेय आता ताब्यांच्या भ्रमणाला द्यावे का? हॅहॅहॅ :)

 
^ वर