एक भौमितिक गंमतः पायाविना खूर

धोक्याची सूचना: खालील लेख पूर्णपणे त्रिमिती-भूमिती/गणित याविषयी आहे व थैल्लर्ययुक्त नाही. अशा विषयात स्वारस्य नसणार्‍यांना तो विरंगुळा न वाटता कंटाळवाणा वाटेल, त्यांनी न वाचल्यास बरे.

सर्वप्रथम सांगतो की हे कोडे नाही, पण मी याला कोडेसदृश रूप दिले आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी ही गंमत माझ्या ध्यानात आली, पण त्या काळी हे सांगावे कोणाला हे न कळल्यामुळे व तशी माध्यमेही उपलब्ध नसल्यामुळे मनातच राहून गेले. (मध्यंतरी एकदा मीराताई फाटकांशी याविषयी निरोपानिरोपी झाली होती पण ते तेवढ्यावरच राहिले.) आता नव्याने स्फूर्ती येऊन येथे - खरे तर "दोन्ही"कडे - प्रकाशित करतो आहे.

घोड्याच्या पायाच्या टोकाला खूर असतात, म्हणजे पाय नसला तर खूर असणेही शक्य नाही. (अर्थात हे जरा ओढूनताणून आणलेले उदाहरण झाले, कल्पनादारिद्र्याबद्दल क्षमस्व.)

पण अगदी याचप्रमाणे वर्तुळ व त्यासंबंधित सर्व द्विमित आणि त्रिमित आकारांची परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ काढताना "पाय" (अथवा ३.१४१५९२६५३५......) या स्थिरांकाचा वापर अपरिहार्य असतो. जर कोणी आपल्याला असे एखादे सूत्र दाखवले व त्यात "पाय" नसला तर डोळे झाकून आपण सांगू की बाबारे तुझ्या ह्या सूत्रात काहीतरी गडबड आहे. वर्तुळ किंवा लंबगोल किंवा इतर आसपासच्या पुष्कळशा भौमितिक आकारांच्या लांबी, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ यांच्याशी संबंधित सर्व सूत्रांत पाय येणारच / आलाच पाहिजे अशी जवळजवळ आपली खात्री किंवा श्रद्धा असते. मला वाटते या बाबतीत आपणा सर्व गणितप्रेमी वा गणित अभ्यासकांचे एकमत व्हायला हरकत नाही. पण .....

मित्रहो, १९८६ साली मी असेच एक सूत्रांचे पुस्तक पहात बसलो होतो तेव्हा मला एक असा वर्तुळावरून आलेला घनाकार सापडला की ज्याच्या घनफळाच्या सूत्रात आपला हा "पाय" नाही. मी आश्चर्यचकित होऊन वेगवेगळ्या संदर्भातून ते सूत्र तपासले पण दृष्टोपत्तीला आलेली ही गोष्ट खरीच निघाली.

तर, मित्रांनो सांगा - असा कोणता वर्तुळसंबंधी घनाकार आहे की ज्याच्या घनफळसूत्रात पाय येत नाही. (एक उदाहरण माझ्याकडे आहे, पण त्याहून वेगळी माहितीही मिळाली तर आनंदच वाटेल.)

आता ही माहिती आपण गुगलून काढा की विकीपीडिया पाखडून काढा की तज्ज्ञांना/मित्रांना विचारून. हवा तेवढा वेळ घ्या.
पाहूदे तरी हा "शोध" जगात आणखी किती लोकांना लागलेला आहे ते.
आणि असली आणखी किती माहिती मिळते तेही.

उत्तर सध्यातरी व्यनि मधून द्यावे. सूत्रात पाय का नसावा याचाही अंदाज द्यावा जमले तर.
(पण मीराताई किंवा त्यांचे आप्त अमित यांच्याकडून उत्तर अपेक्षित नाही कारण त्यांना ते आधीच माहीत आहे.)

Comments

विसूनानांकडून

एक उत्तर आलेले आहे. तत्वतः अटीत बसणारे असले तरी त्यात व्यावहारिक अडचण आहे.
पण नवी दिशा व सोपे उत्तर म्हणून मला मान्य आहे.
माझ्या उत्तराशी जुळणारे नाही, पण म्हणून काय झाले?

- दिगम्भा

थैल्लर्ययुक्त

.. हा नवीन शब्द कळला.

बाकी विचार चालू आहे.

थैल्लर्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.दिगम्भा यांनी 'थिल्लर' या विशेषणा पासून 'थैल्लर्य' हे भाववाचक नाम बनवले आहे.व्याकरणाच्या नियमांनुसार हा शब्द सिद्ध होतो. पहिल्या स्वराची वृद्धी (इ चा ऐ) झाली. अंत्य अ कार जाऊन तिथे य हा प्रत्यय लागला. जसे: विविध (वि.)पासून वैविध्य (भाव. नाम)

पण ही पद्धत केवळ संस्कृत तत्सम विशेषणांसाठी वापरतात. शुद्ध मराठी अथवा प्राकृत शब्दांसाठी नाही....स्थिर विशेषणापासून स्थैर्य हे भाववचक नाम होते कारण तो तत्सम शब्द आहे. पण थोर पासून थौर्य होत नाही.कारण तो मराठी शद्ब आहे. त्या पासून थोरपणा ,थोरवी ही भाववाचक नामे होतात. 'थिल्लर हा शब्द तत्सम नाही.(किंबहुना 'थ' पासून सुरू होणारा कोणताच संस्कृत शब्द मला आठवत नाही).म्हणून "थैल्लर्य" असा शब्द होऊ नये.
.........यनावाला.

किंबहुना 'थ' पासून सुरू होणारा कोणताच संस्कृत शब्द मला आठवत नाही
आणि शोधून सापडलाही नाही. हे एक नवलच.
आपला
(चकित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

संस्कृत 'ळ'

इथे भौमितिक कोडं वाचून आणि त्याखाली संस्कृतोत्भव शब्दांबद्दल चर्चा पाहून मलाही एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे (ज्याचं एक उत्तर मला ठाऊक आहे)

असा कोणता संस्कृत शब्द आहे ज्यात ' ळ् ' हा वर्ण वापरला आहे?

कृपया प्रतिसाद व्य नि नेच द्यावा अशी काही माझी अट नाही. उपप्रतिसाद दिलात तर तो सगळ्यांना वाचता येईल.

वैदिक आहेत, "संस्कृत" माहीत नाहीत

वैदिक भाषेत खूप उपयोग आहेत. त्यांची सूची देण्यापेक्षा नियम दिलेला पुरतो.
"ड" दोन स्वरांच्या मध्ये आला की "ळ"; "ढ" दोन स्वरांच्या मध्ये आला की "ळ्ह"
ऋग्वेदातातल्या प्रथम ऋचेत "ईळे" शब्द आला आहे. संस्कृतात त्याचा वापर "ईडे" असाच करावा. (अर्थ : [मी] स्तुती करतो.)

संस्कृतात "ळ" वापरला जाऊ नये असे वाटते.

वैदिक ळ

तुमचं बरोबर आहे. मला माहीत असलेलं उदाहरण हे संस्कृत भाषेतील नसून वैदिक आहे. मंत्र-पुष्पांजलीमध्ये "एकराळिति" असा शब्द आहे. कृपया त्याचाही अर्थ सांगावा.

एकराळिति = एकराडिति

एकराळिति = एकराडिति = एकराट्+इति
राड्/राट् (राज् चे प्रथमा एकवचन) = शोभणारा, (रूढ अर्थ) राजा
एकराड् = एक(मेव)राजा / एक(मेव)शोभणारा
इति = असे (वाक्य संपवताना वापरतात)

...समुद्रापर्यंत पृथ्वीसाठी "एकच राजा, असे."

वेदांतली भाषा नेहमीच्या संस्कृतपेक्षा अर्थाच्या दृष्टीने वेगळी असते; या बाबतीत माझे चांगले ज्ञान नाही, तसा कुठला दावा नसल्याचे आधीच सांगतो! :-)

असे आणखी कितीतरी निघू शकेल, पण अपेक्षित नाही

याच प्रमाणे त्रिज्या पाय् च्या वर्गमुळाच्या पटीत घेतल्यास कुठल्याही दंडगोलाचे (सिलिंडर) व शंकू (कोन) चे घनफळ पाय शिवाय येईल.
पण युयुत्सू म्हणतात त्याप्रमाणे अपेक्षित उत्तर त्या प्रकारचे नाही - अचूक सांगायचे तर चलांच्या (व्हेरिएबल्स् च्या) किंमतींना कुठलेही बंधन असू नये अशी अपेक्षा आहे.
या दृष्टीने पाहता विसूनानांचे उत्तर अती सोपे असले व फार पसंत पडले नसले तरी अमान्य करता येत नाही.
- दिगम्भा

युयुत्सुंचा जुजुत्सु

युयुत्सूंनी माझ्या मनातले उत्तर दिलेले आहे.
आहेत बाबा शोधयंत्राचे बाप!

- दिगम्भा

गूगल/विकी

त्यानेही 'नेमका शब्द' बराच आठवत नसल्याने बरेच हात'पाय' मारले. गूगलून काढले, विकीवर धुंडाळले. बर्‍याच दा तो 'ग्रीस' ला न जाता 'टांझानिया'ला देखील गेला.शेवटी पाय टेकले नि दिगम्भांना (ससंदर्भ) व्यनि नावा शिवाय केला. नाव कळताच (हिंदी चित्रपट पात्राप्रमाणे) इतर गोष्टी आठवत गेल्या.
(विकीवर माहिती सध्यातरी नाही :) )

हा 'पाय' गेला कुठे यावर विचार चालू आहे. (मात्र इथे 'चलावर मर्यादा नाहीत' असे वाटत नाही.)

(उत्तर लेखातच दडले आहे हे उशीरा कळले!'खोल पाण्यात' पोहोणार्‍यांना 'हा शब्द' नवा नसावा.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

माझे उत्तर-

तसे मलाच फारसे अचूक वाटत नाही. ते कमकुवत आहे पण फक्त कोड्याच्या 'शाब्दिक' नियमात बसते म्हणून कदाचित बरोबर वाटू शकेल.;) योग्य उत्तराचा शोध सुरूच आहे.

सापडले!!!

विश्वजालाला रेस जिंकण्यासाठी अनेक फेर्‍या मारल्या आणि जॅकपॉट लागला एकदाचा!
दिगम्भा, तुम्ही भलतेच खोल संशोधन केले आहे.

युयुत्सु, मी एकूण तीन उत्तरे पाठवली. त्यातले एकच तंतोतंत आहे हे समजल्यावर जाणवले.
तुमच्या (माझ्या पहिल्या उत्तराबद्दलच्या) अंदाजाप्रमाणे मी विचार केला नव्हता. तेही एक यंत्राने शोधलेले उत्तरच होते.

असो. एकूण काय - ही सारी आपल्यासारख्या शोधयंत्र 'उपयोजकांची' कृपा!

टाईम प्लीज्

उत्तर लगेच देऊ नये ही विनंती...

 
^ वर