ज्यूलीचे चौघडे
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी. गरीब भरपूर, पण शिकणारे कमी. ह्या काळानंतर तब्बल दोनेक दशकांनी मी शाळेत गेलो तेव्हाही "अव्वा! मुलींशी बोलतो का काय हा " असे म्हणत आम्ही पोरींशी बोलणार्यांना चिडवू. मिसरूड फुटून , कंठ फुटून दहावी-बारावीतही गेलो तरी अभिमानाने "आमचा हा कध्धी कध्धी म्हणून मुलींशी बोलत नाही हां" असे कौतुकानं आत्या-मावश्या सांगायच्या. ती भूषणाची गोष्ट होती. हे सगळं कधी? तर नव्वदच्या दशकाच्या मध्यावर. १९७५ तर साली तर काय अवस्था असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.
आणि ह्या अशा देवभोळ्या, सात्त्विक, कर्मनिष्ठ, कर्तव्यपरायण , परमपवित्र भारतीय मनावर एकादिवशी सूं सूं करत धम्मकन बॉम्बगोळा आदळला. "लव्ह इन प्यारिस" मध्ये पोरींनी टांगा उघड्या दाखवणं वगैरे ठीक होतं, पडद्यावर नायकाशी "असं तसं" करायलाही लोकांची हरकत नव्हती. पण इथे थेट ते "असं तसं" केल्यावर "जे काही" स्त्रीच्या पदरात पडतं ते दाखवलं तेव्हा मात्र तेच सीन चवीचवीनं बघणार्यांना कसंसंच झालं, मळमळलं. लग्नाआधी स्त्रीला चक्क मूल झालं होतं!!
पिक्चर होता "ज्यूली". अँग्लो इंडियन (ब्रिटिश्-भारतीय मिश्रवंशीय) ख्रिश्चन घरातल्या पोरीला एका मित्रापासून दिवस जातात. होणारं मूल मारून टाकवत नाही, पण कुठे तरी "टाकून देऊया" म्हणून एका अनाथाश्रमासम ठिकाणी ते "टाकले जाते". त्याची आई कुमारिका बनून पुन्हा परत(लग्नाच्या बाजारात??) येते. राहवत नसले तरी इच्छा मारत राहते. दरम्यान पुनश्च नवरा परगावाहून परत येतो, त्याच्या परंपराप्रिय,धार्मिक हिंडू घरात ही बातमी फुटून गजहबही होतो. हो- नाही करत शेवटी त्याच्या घरचे मुलीचा स्वीकार करतात असं दाखवलंय; उगीच सुखांत दाखवायचा म्हणून. खरोखर सांगा, ह्याच्या एक शतांश जरी त्या काळात घडलं असतं तर किती आणि काय झेलावं लागलं असतं? सुखांत झाला असता?
पिक्चरची तेव्हाच्या प्रिंटमिडियात, उच्चभ्रू वर्तुळात बरीच चर्चा झाली. गाणी हिट्ट असल्यानं, मांडणी रंजक असल्यानं गल्ल्याचाही प्रश्न मिटला. संगीताचं फिल्मफेअरही नवखा राजेश रोशन घेऊन गेला. काही शिक्षित घरातही त्याबद्दल चर्चाविषयही निघे, पण तेवढ्यापुरताच.
शांतम् पापम्... कसं व्हावं आता? बिघडलेली चार दोन तरुण पोरपोरी त्या सिनेमाला गेलीत म्हणून पिक्चर तेवढ्यापुरता चालतोय असं म्हणत सात्त्विकांनी आपलं समाधान करून घेतलं. पुन्हा सगळं कसं शांत शांत झालं. जणू काही झालंच नव्हतं.
चौकटितलं जीवन पुन्हा चौकटीत परतलं. दोन्-अडीच दशके झाली.
.
.
.
ज्यांनी ज्यूली रिलीज झाला तेव्हा अडनिड्या वयात नुकताच प्रवेश केला होता त्यांची आता पोरे होऊन ती पोरे अडनिड्या वयात प्रवेश करू लागली होती. आणि तेव्हाच अजून एक फटाका फुटला. "क्या केहना".
कॉलेजकुमारी प्रिटी झिंटा कॉलेजातल्या आकर्षणातून एका मुलाला जन्म देते. पण प्रिटी झिंटाची पिढी बरीच धीट होती. ज्यूली सारखं तिला आपलं मूल टाकून द्यावंसं वाटलं नाही. ते मूल घेऊन मी जगेन अशा विचारांनी उभं राहिलेलं ते पात्र चित्रपटात दाखवलं गेलं. ज्यूलीला पहिल्याच आठवड्यात ब्लॅकनं तिकिट काढलेल्या आणि आता आई-बाबा झालेल्यांनी आता मात्र नाकं मुरडली! त्यांची मुलं अगदी दहावी-बारावीतलीही शेवटी पिक्चरला गेलीच, आई बाप गेले होते त्यांच्या आई बापांना चुकवून, तसंच काहीस. ज्यूली कुमारी माता बनल्याबद्दल लज्जित, घाबरली होती, लपवू पहात होती. तिचाच दोन दशकांनी आलेला अवतार मात्र तुलनेनं निश्चिंत होता, विचारात ठाम होता. "हे मूल माझं नाही" असं म्हणून पुरुष कधीही पितृत्व नाकारु शकतोच. "अरेरे ! स्त्रीला तसं करता येत नाही; मातृत्व नाकारता येत नाही" म्हणून कित्येकांना तसं मनातल्या मनात वाईटही वाटतं. पण प्रिटिला मात्र "अरेरे ! स्त्रीला तसं करता येत नाही;" असं वाटायच्या ऐवजी वाट्तं ते "स्त्रीनं मातृत्व नाकारायची गरजच काय" असा काहीसा तिचा पवित्रा आहे. इतके दिवस बाळाच्या होणार्या बाबाला "हे तुझंच आहे" म्हणून एक स्त्री विनवण्या करते हे सामान्य दृश्य. पण "हे माझं मूल आहे" (read:- "तुझं नाही. तू झिडकारलंस तेव्हाच हा गर्भ केवळ माझा झाला.")हे ठासून ती चित्रपटाच्या शेवटी सांगते तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटतं. इथेही सुखांत शेवट करायचा म्हणून दगा देणार्या आणि नंतर पस्तावणार्या सैफला सोडून ती सरळ चंद्रचूड सिंगला होकार देताना दाखवलंय.(एरवी कुमारी मातेला कोण होकार देणार हा माता पित्यांना पडलेला प्रश्न. इथे कुमारी माताच दोघांपैकी कुणाला होकार देणार यावर आख्खा शेवटचा सीन आहे.)
अर्थातच हाही कमर्शिअल पिक्चर वगैरे आहे म्हणून लोकांनी सोयीस्कर रित्या सोडून दिला. तसंही "बॉलीवुडी धंदे पिक्चरातच होत असतात. आपल्या लोकांच्यात कुठं असतं का तसं." असं म्हणत पांघरूण घेऊन पुन्हा सगळे निवांत.
.
.
.
पण ...पुन्हा एकदा सात्त्विक समजल्या जाणार्या प्रादेशिक/मराठी चित्रपटातच सई ताम्हणकर - सुबोध भावे अभिनित "सनई चौघडे" अवतरला. चित्रपट पाहून शेवटी दोन चार जणांना दोन पाच सेकंदांसाठी का असेना वाटलच "कुमारी माता हे प्रकरण इतकं दडवण्यासारखं आहे काय? तिला चार चौघांसारखं जगायचं असेल तर "तिचं तिनं" काहीतरी बघून घेऊन, एखाद्याला पटवलंच पाहिजे का? कुणीतरी फार मोठा त्याग करतोय म्हणूनच तिला स्वीकारलं पाहिजे का? ती अरेंज मॅरेज म्हणतात त्या प्रकारानी तसं सर्व साधारण चार चौघे जर लग्नाच्या बाजारात उतरतात तसं उतरायला हरकत काय? जोडिदाराचा अजून एक ऑप्शन म्हणून consider करता येणार नाही का हिला ? की जगावेगळ्ं केल्यासारखच दिसलं पाहिजे?"
चित्रपट समाजसुधारणेसाठी, विचारप्रवर्तनासाठी वगैरे बनत नाहीत, धंद्यासाठी बनतात. पण बदलाचे वारे कुणीकडे वाहणार ह्याचा हल्कासा अंदाज ते देउनही जातात.
.
.
.
दोनेकशे वर्षांपूर्वी काही काही ठिकाणी सती जात. हळूहळू पाच-सात दशकातच ते बंद झाले. मग समाजानं प्रचंड खळखळ करुन का असेना स्त्री शिकली. शिकूनही बहुसंख्येने घरातच राहिली. परावलंबी राहिली.दरम्यान कुठे कुठे विधवा विवाह होताना दिसले. त्यानंतर आजवर कधी फारसे दिसत नसलेले दृश्य दिसले. चक्क काडीमोड्/घटस्फोट हा शब्द नव्यानेच शब्दकोशात आला. तोवर नवरा कसाही अगदी दारूडा, अर्धवट, खुनशी , बाहेरख्यालीही असला तरी तोच उत्पन्नाचे साधन असल्याने त्याच्याचकडे आपल्या एकनिष्ठपणाचे इमान सिद्ध करणे भाग होते. आता अशा काही केसेसमध्ये तरी कर्तबगार स्त्री हक्काने तथाकथित एकनिष्ठेला नि परावलंबनाला नकार देउ लागली. विधवा विवाह झाले तसे शहरांतून घटस्फोटिंतांचे अल्प का असेना विवाह सुरु झाले.
सतीबंदी,स्त्रीशिक्षण,आधुनिक स्त्रीपोषाख आजवर ह्यातली हरेक गोष्ट, हरेक घटना निव्वळ अशक्य, निदान पुढच्या पाच-सात शतकात तरी "ह्या देशात होणे नाही " अशा क्याटेगरीतली वाटायची. आवाक्याबाहेरची वाटायची. आज मला कुमारी मातेचा सर्वसाधारणपणे विवाह होणे, समाजस्वीकृती मिळणे ह्या देशात कधीही शक्य होणार नाही असेच वाटते; आवाक्याबाहेरचे वाटते. हे कधीही होणार नाही ह्याबद्दल मी ठाम आहे.
तुम्ही आहात?
का आहात किंवा का नाही आहात?
टीपः- लेखन मनोगताच्या शुचिमध्ये तपासलेले आहे.
--मनोबा
Comments
एग्जॅक्टली....सॉरी!
इवनिंग इन पॅरिस हवे का मनोबा? लव इन पॅरिस वाचताना टांगेत टांग अडकून पडले. ;-)
प्रीती झिंटा आणि सैफच्या सलाम नमस्तेला विसरला आहात. पाहिजे तर आराधनाला पास देऊ कारण त्यात कुमारी मातेशी लग्न करण्यास उत्सुक कोणी नव्हतेसे वाटते. (आता सिनेमा आठवत नाही) पण कुमारी माता विषयावरील हा चित्रपट ज्यूलीच्या आधीचा आणि त्याही आधी काही आले असावे. धूल का फूल वगैरे असावे पण ते लेखातील विषयावर आधारित नाहीत.
विद्या बालनचा "पा" ही थोडासा हटके होता. कुमारी मातांवरील सर्वच चित्रपटात शेवटी कोणा मसीहाने त्यांचा स्वीकार केला असे चित्र नसावे पण पैसे कमावणे हाच उद्देश असेल तर शेवटी नायक-नायिकेचे मीलन दाखवले की निर्माता, प्रेक्षक, फायनॅन्सर आणि इतर सर्वांच्या डोक्याचा ताप कमी होत असावा. ;-)
----------------
ठरवून विवाह होतो त्यात अनेक गोष्टी तोडीस-तोड पाहिल्या जातात. शिक्षण, जात, परिस्थिती, आवड-निवड इ. यांत एखादी विनापत्य व्यक्ती सापत्य व्यक्तीच्या किंवा उलट तोडीस तोड असणे शक्य नसू शकते. या कारणास्तव ठरवून असे विवाह होणे कठीण आहे. अशक्य नाही.
प्रेमविवाहांत आधीचे अपत्य असणार्या व्यक्तीला स्वीकारणारे अनेक पाहिले आहेत.
भारतातील सद्य पिढी संक्रमणातून जात आहे. बदल घडू शकतील.
पूर्वी अपत्ये असणार्या बिजवराला गरीबा घरची एखादी धोंड देऊन लग्न केले जाई. आता त्या परिस्थितीत बदल झाला असावा असे दिसते आणि हा बदल झाला असेल तर ती सुधारणाच आहे असे मला वाटते. उलट बाजूने सुधार होण्यास थोडाफार वेळ लागेल. सध्या कठीण आहे, अशक्य असे काही नाही.
---------
मध्यंतरी नीना गुप्ताची मुलाखत वाचली. कुमारी माता होऊन आपण आपल्या मुलीवर अन्याय केला आहे याची टोचणी आपल्याला लागून राहिली आहे असे तिने सांगितले होते. असो.
अवांतर:
तो मित्र होता ना नवरा कधी झाला? ;-) आणि मनोगताचा शुचि इतका श्मार्ट नाही की हिंदू आणि हिंडू-बागडूमध्ये फरक करेल. ;-) ह. घ्या पण लेख घाईत लिहिलेला वाटला. नेमकं काय सांगायचे ते लक्षात आले नाही.
सर्कल
आपला लेख आवडला.
ज्युली पिक्चर पाहिला नव्हता (सुटून गेला पाहायचा) आपल्या चांगल्या लेखाने आठवण करुन दिली. राजेश रोशनची गाणी हिट झाली होती....
अगदी पुर्वीच्या काळी कुटूंब संस्था नव्हती, मग ती सुरु झाली. काही दिवसानी ह्या संस्था मोडीत निघतील. त्या बरोबर जन्म घेणारे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी तरी समाज सुधारक होईल. हळूहळू लोकांना लग्न संस्था किती चांगली आहे त्याची त्या वेळच्या समाजाला कल्पना यायला लागेल व परत लग्न पद्धत सुरु होईल.......रहाट गाडगे चालत राहणार. प्रत्येक वेळेला आत्ताचा माणूस पुर्वीचा माणूस कसा जुन्या विचारांचा होता व आपण किती शहाणे झालोत हे दाखवत राहील. चालायचेच.
अवांतर ---------------------------------
मला ज्युलीतली गाणी अजून आवडतात. त्या मानाने क्या केहनातले एकच गाणे जरा बरे वाटले. (जनरेशन गॅप ह्यालाच म्हणतात का कोण जाणे)
प्रवाह
प्रश्न वेगळा हवा होता, मी ठाम असण्यासाठी तुम्हाला वाटते तसे मला वाटले पाहिजे. असो, रुढ अर्थी सुधारणेच्या शक्यता अनेक आहेत, अधिक खुले वातावरण निर्माण होण्यास पोषक परिस्थिती सध्या आहे असे नक्कीच म्हणता येईल, असे का वाटते ह्याचे कारण म्हणजे गेल्या ५०-६० वर्षात दिसणारी सुधारणा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती चालूच रहाणार, सुधारणेसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न न होता, त्या विविध अंगांनी येणार्या माहिती/विचारधारांचे आनुषंगिक परिणाम आहेत, असे असल्यास वेगाने होणार्या वैश्विकिकरणात निर्माण होणार्या अनंत विचारांतुन जे जास्त काळ टिकतील ते समाजाची दिशा ठरवतील असे वाटते.
हे वाक्य बोल्ड वाटले, परावलंबित्वातून निर्माण होणार्या भावनेला एकनिष्ठता म्हणणे गैर वाटते, कर्तबगार स्त्री एकनिष्ठ(तथाकथित म्हणजे नक्की काय?) नसते हे अधिक बोल्ड वाटते.
लेखकाची स्वतःची अशी काय भुमिका आहे ते निटसे कळत नाही.
...
@प्रियाली :-
इवनिंग इन पॅरिस
यप्स. हेच हवे.
सलाम नमस्तेला विसरला आहात.
नको. तो तर् म्हणे लिव्ह इन वगैरे प्रकार, तिसराच. इतके मोठाले बॉम्बगोळे नकोत.
धूल का फूल
नाव प्रथमच ऐकतोय. अधिक माहिती मिळाल्यास उत्तम.
प्रेमविवाहांत आधीचे अपत्य असणार्या व्यक्तीला स्वीकारणारे अनेक पाहिले आहेत.
आधीचे अपत्य आधीच्या विवाहातून आलेले स्वीकारणारे समजू शकतो. अद्धीचे अपत्य विवाहपूर्व/विवाहबाह्य् असेल तरी स्वीकरताना पाहिलेत कुठे? भारतीयांत?
भारतातील सद्य पिढी संक्रमणातून जात आहे. बदल घडू शकतील.
नक्कीच.
हा बदल झाला असेल तर ती सुधारणाच आहे असे मला वाटते
ह्याच्याशी सहमत होनारे सध्या विरळाच मिळतील.
---------
मध्यंतरी नीना गुप्ताची मुलाखत वाचली.
हल्ली खर्याखुर्या माणसांवर कमेंट करणे टाळतो.
लेख घाईत लिहिला गेला हे मान्य आहे. डोक्यात आहे ते कागदावर झटकन उतरवलं नाही तर शाईपेक्षा जास्त् वेगानं सुकतं, हवेत विरघळतं. ज्यूली प्रथमच पाहिला परवा टीव्ह्व्व्वर, ते बघून अचानक काहीसं डोक्यात आलं ते टंकलं. सनई चौघडे गेल्यावर्षी पाहिला होता.
सुधारणेसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न न होता, त्या विविध अंगांनी येणार्या माहिती/विचारधारांचे आनुषंगिक परिणाम आहेत, असे असल्यास वेगाने होणार्या वैश्विकिकरणात निर्माण होणार्या अनंत विचारांतुन जे जास्त काळ टिकतील ते समाजाची दिशा ठरवतील असे वाटते.
भाषा थोडी अवघड वाटली, पण मुद्दा अत्यंत महत्वाचा. कुणी मुद्दाम प्रयत्न असा नाही केला तरी नवीन "ट्रेंड्"(मराठी गंडलं) रुजू होणे शक्यतेत दिसते आहे.
हे वाक्य बोल्ड वाटले, परावलंबित्वातून निर्माण होणार्या भावनेला एकनिष्ठता म्हणणे गैर वाटते, कर्तबगार स्त्री एकनिष्ठ(तथाकथित म्हणजे नक्की काय?) नसते हे अधिक बोल्ड वाटते.
कर्तबगार् स्त्री स्वेच्छेने एकनिष्ठ असते. सध्या इतकेच टंकू शकतो.
लेखकाची स्वतःची अशी काय भुमिका आहे ते निटसे कळत नाही.
हम्म.... कल्पना नाही. सात्विक, परंपराप्रिय घरात आणि निम्न मध्यमवर्गात संगोपन झालेले असल्याने हे असले बदल् अजूनही चमत्कारिक, जगावेगळे वाटतात; कारण आमचं जगच मुळी वेगळं, मर्यादित.
वाचकांचे पुनश्च आभार.
--मनोबा
प्रतिसाद
धूल का फूल
(दिव्य भाषेतील परिचय.)
हो. जाहीरात क्षेत्रातील काही व्यक्ती. नावे सांगू इच्छित नाही. हा उच्चभ्रू क्लास असला तरी सुरुवात झाली आहे असे मानायला हरकत नाही.
असो.
सापत्य व्यक्तीशी विवाह नाकारणार्यांची (यांत भेदभाव केलेला नाही. बाई-पुरुष कोणीही असो.) बाजू मला समजते. त्यात फारसे गैर आहे असे वाटत नाही आणि योजून असे विवाह व्हावेत असेही वाटत नाही. सद्यस्थितीत भारतात अशी पद्धत सर्रास प्रचलीत होणे कठीण वाटते.
ही जूली चौघडे कशाला?
मन, विषय आवडला. पण आपल्या थोर सनातन भारतीय संस्कृतीतले, आपल्या मातीतले कुंतीमातेचे प्राचीन उदाहरण असताना ही 2-3 दशकांपूर्वीची ही जूली चौघडे कशाला हवी. आपल्या कुंतीमातेशिवाय येशूमाता कुमारी मेरीचे उदाहरण आहेच. जाणकार ह्यावर अधिक प्रकाश पाडतीलच. तोपर्यंत चूभूद्याघ्या. तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
:)
कुंतीला पुत्रत्याग करावा लागला होता. महाराणी वगैरे असूनही(म्हणजे सत्ताधारी वर्तुळातील असूनही) लोकापवादाचे भय बाजूला सारू शकली नाही. नवा "ट्रेंड" तिने प्रस्थापित केला नाही. ह्या चित्रपतातल्या हिरोइनींनी मात्र कल्पनेत तरी तसा करायचा यत्न केला.
येशूमाता कुमारी होती पण ती विवाहित असावी, जोसेफ हा तिचा नवरा. ती कुमारी असणे हे सांगितले जाते ते उलट "(येशू वगळता)मनुष्याचा जन्म पापातूनच होतो" हे सिद्ध करायला. तो "तसा"(नॉर्मल माणसासारखा) जन्मला नाही म्हणूनच तो पवित्र आहे म्हणे.
आपल्याकडे विवाहपूर्व संतती म्हणजे "पाप" वगैरे म्हणतात. तिकडे बाय डिफॉल्ट जन्मलात म्हणजेच पाप करुन आलात्!
विवाहपूर्व काय आणि विवाहोत्तर काय. जन्माला आलात हेच पाप :- theory of arch sin and apple
:)
--मनोबा