गज़वा-ए-हिन्द हादिथ

अल्-का’इदा आणि पकिस्तानी आयएसआय ह्यांच्या अन्तर्भागात पोहोचून माहिती गोळा करणारे पाकिस्तानी पत्रकार सय्यद सलीम शाहजाद ह्यांची मे २०११ मध्ये हत्या करण्यात आली. हे कृत्य नक्की कोणी केले हे ठाऊक नसले तरीहि अल्-का’इदा आणि पकिस्तानी आयएसआय ह्यांच्याकडे ’संशयाची सुई’ वळतांना दिसते. सय्यद सलीम शाहजाद ह्यांनी लिहिलेले ’Inside Al-Qaeda and the Taliban - Beyond Bin Laden and 9/11' हे पुस्तक त्यांच्या हत्येपूर्वी काही दिवसच प्रकाशित झाले होते आणि अलीकडेच माझ्या वाचनात आले आहे.

पुस्तकाच्या प्रारंभाच्या भागात अल्-का’इदाचा उगम आणि अफगाणिस्तान-पकिस्तानमधील अल्-का’इदाच्या कारवाया ह्याबाबत काही माहिती देण्यात आली आहे. अल्-का’इदाच्या वैचारिक भूमिकेमागे हिंदुस्तानचा जवळचा संबंध आहे असे तेथे लिहिले आहे. मला तरी ह्या संबंधाची आजवर काहीच कल्पना नव्हती. ’उपक्रम’च्या सदस्यांना आणि वाचकांना तिचा परिचय घडविण्यासाठी हे लिखाण करीत आहे.

सोवियत संघाविरुद्धच्या अफगाणी जिहादमध्ये भाग घेण्यासाठी अन्य अनेक देशातील इस्लामचे कडवे अनुयायी तेथे दाखल झाले. त्यांचे दोन गट होते. त्यांपैकी एकाला येमेनी आणि दुसर्‍याला इजिप्शिअन म्हणता येईल. बहुसंख्य जिहादी येमेनी गटात मोजता येतील. सोवियत संघाविरुद्धच्या विरोधापलीकडे त्यांच्यात अन्य राजकीय विचार नव्हता. १९८०च्या दशकाच्या अखेरीस हे जिहाद शांत होऊ लागल्यावर त्यांपैकी पुष्कळजण आपापल्या देशात परत गेले, काहींनी अफगाणिस्तान-पाकिस्तानात कायमचे वास्तव्य करावयाचे ठरविले आणि लग्ने करून ते स्थानिक जनतेमध्ये मिसळून गेले. अशांना ’दरवेश’ (easy-going) हे नाव मिळाले.

काही थोडया जिहादींमध्ये एक निश्चित राजकीय विचार होता. त्या गटास ’इजिप्शिअन’ म्हणता येईल कारण त्यांची मूळची प्रेरणा इजिप्त-स्थित ’मुस्लिम ब्रदरहुड’ ह्या संघटनेमधून आलेली होती. मात्र निवडणुकीच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने समाज आणि पावलापावलाने सर्व जग बदलण्याच्या मुस्लिम ब्रदरहुडच्या धोरणांना त्यांची मान्यता नव्हती. प्रत्यक्ष संघर्षातूनच हा बदल होईल असे ते मानत. अल जवाहिरीसारखे शिकलेसवरलेले, इजिप्शिअन सैन्यातील काही असंतुष्ट अधिकारी अशा प्रकारचे जिहादी ह्या ’इजिप्शिअन’ गटामध्ये होते. १९९०च्या दशकाच्या मध्यावर ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तानात प्रवेश मिळाला आणि तोहि ’इजिप्शिअन’ गटात दाखल झाला.

’इजिप्शिअन’ गटाची ध्येये दोन - मुस्लिम देशांमधील भ्रष्टाचारी आणि हुकुमशाही सरकारांविरुद्ध जनमत तयार करणे आणि अशा सरकारांना आणि इस्रायलला पाठिंबा देणार्‍या अमेरिकन धोरणाला विरोध करणे. ’इजिप्शिअन’ गटाने अधिकाधिक स्वयंसेवक जमवून आणि शिक्षणशिबिरे इत्यादि भरवून अशा स्वयंसेवकांना ’शिक्षित’ करण्यास प्रारंभ केला. ह्याच सुमारास बिन लादेनच्या नेतृत्वाखाली आणि जवाहिरींसारख्यांच्या मदतीने अल्-का’इदाची पायाभरणी झाली.

अल्-का’इदाचे मूळ तत्पूर्वीच्या ’मकताब अल-खिदमत’ ह्या संघटनेमध्ये आहे. ’मकताब अल-खिदमत’चा प्रणेता अब्दुल्ला युसुफ़ अझम ह्याने १९८० च्या दशकात जिहादमध्ये भाग घेण्यासाठी स्वयंसेवक तयार करायचे ह्या उद्देशाने तिची निर्मिति केली होती. हा अब्दुल्ला युसुफ़ अझम बिन लादेनचा शिक्षक आणि मार्गदर्शक होता आणि त्याच्यामुळेच बिन लादेन जिहादी चळवळीत ओढला गेला होता. अब्दुल्ला युसुफ़ अझम १९८९ मध्ये एका बॉंम्बस्फोटात मारला गेला.

जवाहिरीच्या मदतीने बिन लादेनने मकताब अल-खिदमतचे नाव आणि मार्गदर्शक विचार ह्या दोन्हींमध्ये मूलभूत बदल घडवून आणला. नाव बदलून ते ’अल्-का’इदा’ असे करण्यात आले आणि ’शुद्ध इस्लाम’ हा त्याचा मार्गदर्शक विचार ठरला.

ह्या ’शुद्ध इस्लाम’ला अल्ला हा एकच ईश्वर मान्य आहे आणि त्या ईश्वराची अनिर्बंधित सत्ता ही एकच राजकीय प्रणालि मान्य आहे. लोकशाही, समाजवाद अशा मानव-निर्मित विचारांना ’शुद्ध इस्लाम’ची मान्यता नाही.

अशा रीतीने अल्-का’इदा ही इजिप्तमध्ये मूल असलेली संघटना आहे पण तिचा विस्तार इजिप्तमध्ये न होता अफगाणिस्तानात करण्यात आला ह्यामागेहि एक कारण आहे आणि ते म्हणजे महम्मद पैगबराची भविष्यवाणी, जिच्याअनुसार काळाच्या अंताला होणारी आणि अटळ अशी ’अखेरची लढाई’ खोरासान प्रान्तात प्रारंभ होईल. महम्मद पैगबरास अभिप्रेत असलेला हा ’खोरासान प्रान्त’ आजच्या इराणपासून पाकिस्तानापर्यंत पसरलेला आहे. आजचा पाकिस्तान हाही ६५ वर्षांपूर्वी ’हिंद’चा भाग होता आणि संदर्भात ’गज़वा-ए-हिन्द’ अशीहि एक ’हादिथ’ आहे. (हादिथ म्हणजे पैगंबराचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेले वचन. अधिक माहितीसाठी येथे पहा. इस्लामी शासनव्यवस्थेत हादिथला कुराणापाठोपाठचे स्थान असते.)

हा ’गज़वा-ए-हिन्द’ शब्दप्रयोग मी पहिल्यानेच पाहिला आणि उत्सुकतेपोटी त्याचा अधिक शोध घेतला. ह्याचा सोपा अर्थ म्हणजे मुस्लिमांकडून संपूर्ण हिंदुस्तान जिंकला जाणे. ह्यावर शब्दश: विश्वास ठेवणे म्हणजे स्वप्नांच्या देशात राहण्यासारखे आहे असे कोणाहि सर्वसामान्य विचारी व्यक्तीस वाटेल पण आश्चर्याची आणि चिन्तेची बाब अशी की मुस्लिम विश्वात त्यावर शब्दश: विश्वास ठेवणार्‍यांची संख्याहि कमी नाही. ’Ghazwa-e-Hind’ असा शोध गूगलमध्ये घेतल्यास शेकडो संस्थळे आणि यूट्यूब विडिओ पाहण्यास मिळतील.

’गज़वा-ए-हिन्द’ च्या मागे पैगंबराचे शब्द आहेत आणि शुद्ध इस्लामला पैगंबराच्या प्रत्येक शब्द शब्दश: मान्य असतो आणि पैगंबराची प्रत्येक भविष्यवाणी अक्षरश: खरी ठरणार आहे अशी त्यांची खात्री असते. ’गज़वा-ए-हिन्द’ अनुसार ’अखेरचे युद्ध’ खोरासान आणि हिंदमध्ये प्रारंभ होईल, ते युद्ध जिंकल्यानंतर विजयी इस्लामी सेना मध्यपूर्वेकडे वळून पैगंबरानेच भविष्यवाणी केलेल्या ’महदी’ (the ultimate reformer) शी हातमिळवणी करेल आणि आपला मोहरा ’सैताना’कडे (अमेरिका आणि अन्य पा्श्चात्य संस्कृति) वळवेल, ज्यांचे पतन हे पैगंबराने सांगून ठेवलेलेच आहे.

सारांश म्हणजे पैगंबरानेच सांगितल्यामुळे अल्-का’इदाने आपल्या कार्याचा प्रारम्भ अफगाणिस्तानापासून केला आहे, जो खोरासानचा एक भाग आहे. पैगंबराच्याच आज्ञेप्रमाणे हिंदुस्तानचा क्रमांकहि ह्यानंतर लगेचच आहे.

माझ्यापुरता तरी हा चक्रावून टाकणारा विचार नवीन आहे. पैगंबराच्या शब्दाचा त्याला आधार असल्याने माथेफिरूंच्या हातातील ते एक खतरनाक शस्त्र आहे असे वाटते.

(टीप १: ’गज़वा-ए-हिन्द’ ला जरी पुष्कळ पाठिंबा दिसत असला तरी ती खरी हादिथ आहे का नाही ह्याबाबतहि काही अभ्यासकांना शंका आहे हेहि येथे नमूद करून ठेवतो.
टीप २: ’अल्-का’इदा’ हे उच्चारण मी येथून घेतलेले आहे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

हा आमचा आवडता विषय आहे. (काळेकाका कुठे गेले?) पण तूर्तास घाईत एवढेच म्हणतो की गज़वा ए हिन्द म्हटले की आम्हाला आपले झैद हमीद आठवतात. मन उदास असले, मूड ऑफ असला की त्यांच्या यूट्यूबवरील फिती बघाव्यात. मन पुन्हा प्रफुल्लित होते. आम्ही भारतावर आक्रमण करून फतेह हासिल केल्यावर शूद्रांना सोडू. मात्र ब्राह्मणांना माफी नाही वगैरे वगैरे. एकंदर अशा लोकांचा व्यासंग, विद्वत्ता, आत्मविश्वास वगैरे वगैरे बघितला की भारावून गेल्यासारखे होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

+१
--मनोबा

अल्

अल कायदा नावाचा प्रकार येमेनी आहे खरे.. पण त्यांचे अफगाणीस्तास्थानतले आगमन फारच नंतरचे.
१९९६ पर्यंत रब्बानी, मसूद ह्ह्या स्थानिक जिहादी गट व कमजोर पडत गेलेला कम्युनिस्ट नजीबुल्ला ह्यांच्यात यादवी युद्ध सुरु होते.
यादवी युद्धात अफगाणिस्तानची राखरांगोळी झाली. १९९६ च्या अखेरिस अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांवर तालिबान ह्या पाक(आय् एस आय) पुरस्कृत अति कडव्या लढाउ संघटनेने
घट्ट् पकड बसवली. तालिबान्यांत थोडेसे पंजाबी, काही पख्तून होते. काही इतर अफगाणी टोळीवाले होते. हे तालिबानी सत्तेवर आल्यानंतर लादेन अफगाणिस्तानात परतला.
अल कायदाची उभारणी,पायाभरणी त्याआधीच बरीचशी झालेली होती, लेखात लिहिल्याप्रमाणे त्यात इजिप्त कनेक्शनही सापडते. लादेनचे १९९०च्या पुढचे वास्तव्य सुदानमध्ये होते, तिथेही
ते दिसते.
१९९८ ला टांझानिया आणि केनिया इथल्या अमेरिकन् दूतावासात स्फोट केल्यानंतर तर अमेरिकन अदृश्य दबावामुळे अल कायदाला आख्ख्या जगात कुठेच नीट बस्तान बसवता येइना.
कारण शीतयुद्धोत्तर जगाला भीती होती एकमेव महासत्ता असल्याच्या तोर्‍यात वागणार्‍या अमेरिकेची. अमेरिकेचा आता शत्रू होता लादेन. कोण आश्रय् देइल?
गंमत म्हणजे ९०च्या काळात अमेरिकेचे हाडवैरी बनलेले जाणारे, इराकचे सद्दाम् काय् किंवा लिबियाचे गद्दाफी काय ह्यापैकीसुद्धा कुणीही अमेरिकेशी शत्रुत्व आहे
ह्याकारणासाठी का असेना पण त्याच्याशी मैत्री केली नाही.

अशा काळात त्याला उघड आश्रय् एकाच संघटनेकडून मिळाला, तो म्हणजे, तालिबान. उत्त्तरोत्तर मात्र तालिबान् आणि अल् कायदा भलतेच एकजीव होउन् गेलेले दिसतात.

येमेनबद्दल माहित नसेल् त्यांच्यासाठी:- मध्य पूर्व देशांत/ अरब देशांत आकाराने सर्वात मोठा व धार्मिक कारणाने महत्वाचा असा देश सौदी अरब(बोली भाषेत अरबस्थान.) ह्याला भिडून दक्षिणेला दोन् इटुकले पिटुकले देश आहेत येमेन आणि ओमान. भारताचे जसे पारंपरिक सांस्कृतिक नातेसंबंध नेपाळ व श्रीलंका ह्या तुलनेने इवल्याशा देशांशी आहेत, तसेच येमेन् आणि ओमान ह्यांचे सौदी अरब सोबत आहेत्. कागदोपत्री वेगळे देश, पण् दोन्ही समाजांत घट्ट सांस्कृतिक वीण असे हे नाते आहे.(असेच नाते चीन चे कोरिया -सिंगापूर ह्यांच्याशी दिसून येइल.)
त्यामुळे अरबस्थानातील कुठल्याही घटनेचे पडसाद येमेनी लोकांत सहज उमटतात.अरबस्थानातील अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीचा राग येणारी मंडळी मग साहजिकच अल कायदात सामील होतात, हे पटतं.

हादिथ बद्दल एक मोठ्ठा घोळ आहे, तो म्हणजे त्याच्या काही वेगवेगळ्या व्हर्जन्स अस्तित्वात आहेत. ह्याचे कारण् म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या हादिथ जपणार्‍या मौखिक् परंपरा. पैगंबराच्या अयुष्यातील काही प्रमुख घटना विविध प्रतींमध्ये एक सारख्याच आहेत. काही थोड्याश्याच वेगळ्या आहेत्. नेमके लफडे हेच आहे. काही हादिथचा आधार घेउन काही पुरोगामी मुस्लिम इस्लाममध्ये बुरख्याची सक्ती नाही हे स्पष्ट करतात, तर प्रतिगामी मंडाळी सोयीचे दाखले देत त्यांच्याकडचे "न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हते" छापाचे विचार लादत राहतात,प्रचार करीत राहतात.
काहिंनुसार इस्लाममध्ये हिंसा नामंजूर आहे, फक्त अगदिच एखाद्या सज्जन,पण् दुर्बलाच्या सहाय्यासाठी शस्त्र हाती घ्यावे म्हणतात, "अमन" ही तात्कालिक स्थिती नाही तर अंतिम उद्दिष्ट् आहे म्हणतात तर जिहादी गट मात्र इस्लामप्रसारासाठी हिंसा अनिवार्य असल्याचे पसरवतात. तीच कथा blasphemy बद्दलच्या सध्याच्या इस्लामिक जगातील वादग्रस्त कायद्याबद्दलची.
काही कथांनुसार(हदिथ अनुसार) पैगंबराचे पुढील् उद्गार सापडातात :- "एखादा माणूस इस्लामची निंदा करीत असेल तर विषय बदलावा अथवा कान मिटून् घ्यावेत. नच जमले तर
उठून् निघून् जावे." ह्यात हिंस्त्र व्हावे,असे कुठेही सुचवलेले नाही. तर काही कट्टरवादी मात्र blasphemy कायद्याच्या समर्थनार्थ इस्लमाची निंदा केल्यास देहदंडाच हवा; असे मत् दाखवतात्चशाच किश्शांचे दाखले देत कुणी संगीत-कला इस्लामला वर्ज्य नाही म्हणतो, तर कुणी त्याचाच नायनाट तशाच कथांचा आधार् घेत क्रु पाहतो.(उदाहरनासाठी "खुदा के लिये"
ह्या चित्रपटाचा शेवटचा अर्धा तस पहावा, किंवा निदान् नसीरुद्दीन शहाची कोर्टातील जबानी.)
हदिथ म्हणजे पैगंबराचे त्याच्या सहकार्‍यांनी, अनुयायांनी त्यांना समजेल तसे व आठवेल तसे केलेले वर्णन् आहे हे एकदा लक्षात घेतले तर ह्या विरोधाभासाचा अंदाज येउ शकतो; पण फक्त अंदाजच.

आता राहिलं गझ्वा - ए - हिंद बद्दल, ते थोडं फुरसतीत लिहिन म्हणतो.

--मनोबा

यू ट्युब विडिओ

काल लेख वाचून यूट्यूबवर विडिओ पाहिले. वर म्हटल्याप्रमाणे झैद हमीदचे इतके मजेशीर विडिओ आहेत की पाहायला नको. पैकी एका विडिओमध्ये झैद हमीद आणि टीम काहीतरी बोलतात आणि त्यानंतर बहुधा एका भारतीयाची "एक्स्पर्ट कमेंट" येते. हे दोन्ही प्रकार इतके विनोदी आहेत की कोण सरस हे ठरवणे कठीण आहे.

------------

गज़वा-ए-हिंद मधील गज़वाचा नेमका अर्थ कोणता?

-------------

लेखात जागोजागी 'बिन लादेन' असा शब्द प्रयोग आहे तो चुकीचा नाही का? हा अमेरिकेने आपल्या अज्ञानातून प्रसिद्ध केलेला चुकीचा शब्दप्रयोग आहे. अरेबिक जगतात कोणीही एकमेकांचा उल्लेख बिन रशीद, बिन फैझल असा करत नाहीत हे स्वानुभावाने सांगते. करायचाच झाला तर रशीद बिन मोहम्मद असा पूर्ण केला जातो कारण बिन लादेन हे अमेरिकी नावात येणारे लास्टनेम नसून पितृत्व दर्शवणारे विधान आहे. अशाचप्रकारे काही दाक्षिणात्य नावांचा उल्लेख (ज्यात गावाचे किंवा वडिलांचे नाव प्रथम येते उदा. कृष्णम्माचारी श्रीकांत यात बहुधा श्रीकांत यांच्या वडिलांचे नाव कृष्णम्माचारी असावे. चू. भू. द्या. घ्या. परंतु ज्यांना अशा नावाची सवय नाही ते त्यांचा उल्लेख श्रीकांत ऐवजी कृष्णम्माचारी करतील. माझ्या सोबत काम करणार्‍या अनेक दाक्षिणात्य लोकांचा हा प्रॉब्लेम होताना पाहिले आहे. इतकेच नव्हे तर पासपोर्ट आणि कायदेशीर बाबींच्या वेळीही त्रास होतो असे खुद्द माझ्या घरात लक्षात आल्याने नावे बदलून घ्यावी लागली आहेत.)

 
^ वर