जागतिक पर्यावरण दिवस

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात 'पर्यावरण' हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता. त्याचा उद्भव किंवा उद्गम नक्की कधी झाला हे मला माहीत नाही, पण त्याचा प्रसार मात्र नक्कीच अलीकडच्या काळात झाला आहे. मला कळायला लागल्यापासून निसर्ग, सृष्टी वगैरे शब्द ओळखीचे झाले होते. ग्रामीण भागात रहात असल्यामुळे घराबाहेर पडून कोणत्याही दिशेने दहा पंधरा मिनिटे चालत गेल्यावर पुढे नजर पोचेपर्यंत निसर्गाचेच साम्राज्य असे. किंबहुना चहूकडे वाढलेल्या वनस्पतींनी झाकलेल्या नैसर्गिक भूमीवर अधूनमधून तुरळक अशी मानवनिर्मित वस्ती दिसत असे. निसर्गाकडून मिळत असलेल्या ऊन, पाऊस, थंडी, वारा वगैरे गोष्टी जशा प्रकारे मिळतील त्यांच्याशी सलोखा करून त्यानुसार आपली राहणी ठेवली जात असे. अचानक उद्बवणार्‍या नैसर्गिक आपत्तींपासून आपला बचाव करणे हे सर्वात मोठे दिव्य असायचे. आपल्यासारख्या यःकश्चित प्राण्याकडून एवढ्या भव्य आणि बलवान निसर्गाला कसलाही धोका पोचू शकतो असे तिथे कोणी सुचवले असते तर इतरांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. त्या काळात परदेशातलीच काय पण भारतातील शहरांमधील परिस्थिती कशी आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती. मानव प्राणी हा 'अनंत हस्ते' आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवणार्‍या 'विपुला च पृथ्वी' वर सर्वस्वी अवलंबून असलेला एक क्षुद्र जीव आहे अशी माझी पक्की धारणा झाली होती.

इंग्रजी भाषेचे शिक्षण घेत असतांना त्या भाषेतला 'एन्व्हायरनमेंट' हा शब्द निराळ्या अर्थाने ओळखीचा झाला होता. 'घर, शाळा, कॉलेज, ऑफीस वगैरे ज्या ठिकाणी आपण काही वेळ घालवत असू तेथील आपल्या सभोवतालचे वातावरण' हा त्याचा अर्थ आजसुध्दा प्रचलित आहे. आजूबाजूची माणसे, त्यांचे आचार, विचार वगैरेंचा देखील यात प्रामुख्याने समावेश होतो. 'एन्व्हायरनमेंट' या शब्दाचा 'आसपासची जमीन, हवा, पाणी' असा दुसरा संकुचित अर्थ आणि या अर्थाने 'पर्यावरण' हा या शब्दाचा नवा प्रतिशब्द आजकाल रूढ झाला आहे. निदान एकदा तरी हा शब्द वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एकही दिवस जात नाही इतका तो वापरून गुळगुळीत झाला आहे. पण त्या बरोबरच काही विपर्यस्त कल्पना किंवा माहिती पसरवली जात आहे.

'मानवाने निसर्गावर विजय मिळवला आहे' अशा प्रकारच्या वल्गना जितक्या पोकळ आहेत तितकीच माणसाने केलेली 'पर्यावरणाची चिंता' निरर्थक आहे. आजच्या जगामधील सात अब्ज माणसे आणि दोन तीनशे देश या सर्वांनी त्यांची सारी ताकत एकवटली तरीही निसर्गाची रूपे असलेल्या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याच्या पुढे ती नगण्य ठरेल. सागराच्या लाटा किंवा सूर्यप्रकाश यातून क्षणाक्षणाला प्रकट होत असलेली किंवा धरणीकंपामध्ये काही सेकंदात जमीनीमधून बाहेर टाकलेली प्रचंड ऊर्जा पाहता हे लक्षात येईल. तेंव्हा आपल्यापेक्षा अनंतपटीने सामर्थ्यवान असलेल्या निसर्गाची आपण काळजी करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. पर्यावरणप्रेमी खरे तर त्यांच्या स्वतःच्या किंवा फार तर त्यांच्या वंशजांच्या चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे म्हणता येईल.

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यात सारखे बदल होत असतात. सकाळ, दुपार, संध्याळ, रात्र असे रोज होणारे बदल, उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा असे ऋतूंमधले बदल आणि भूपृष्ठात हळू हळू होत असलेले दीर्घकालीन बदल हे सारे निसर्गच घडवून आणतो. एका काळी ज्या ठिकाणी समुद्र होता तिथे हिमालयाची शिखरे झाली आहेत आणि एका काळी गर्द वनराई असलेला भूभाग आज वाळवंट झालेला किंवा समुद्राच्या तळाशी गेला आहे. डायनोसॉरसासारखे महाकाय प्राणी निर्माण झाले तसेच नामशेष होऊन गेले. इतर किती प्रकारचे जीव पृथ्वीवर राहून नष्ट झाले याची गणतीच करता येणार नाही. या सगळ्यांच्या तुलनेत पाहता मानवाच्या मूर्खपणामुळे किंवा हावरटपणामुळे आज पर्यावरणात पडत असलेला बदल अगदी मामूली म्हणता येईल.

निसर्ग हा नेहमी रम्यच असतो असे नाही. तो विध्वंसक रूपसुध्दा धारण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो न्याय अन्यायाचा विचार करत नाही. एकाने त्याच्यावर आक्रमण केले तर तो त्याची शिक्षा त्यालाच करेल असे नाही. अगदी साधी गोष्ट पहायची झाली तर एका ठिकाणी समुद्रात भर टाकली तर दुसरीकडे कोठे तरी त्याचा परिणाम दिसेल. नदीच्या वाहत्या पात्रात घाण मिसळणारा वेगळाच असतो पण त्याचे वाईट परिणाम खालच्या अंगाला राहणार्‍या लोकांना भोगावे लागतात. हवेचे प्रदूषण करणारे एक असतात आणि त्याचा त्रास इतरांनाही झाल्याशिवाय रहात नाही. 'कराल तसे भराल' हा न्याय निसर्गाच्या बाबतीत नीटसा लागू होत नाही. यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी ठरते.

यंत्रयुगाच्या आधी माणसाची विध्वंस करण्याची क्षमता अगदी कमी होती. त्याने दोन हाताने केलेल्या लहान सहान नुकसानाची भरपाई निसर्ग आपल्या अनंत हस्तांनी सहजपणे करत होता. त्यामुळे निसर्गात होणारे बदल हे त्याच्याच नियमानुसार घडत असत आणि त्यात एक नियमितता होती. माणसांची उत्पत्ती आणि विनाश यातसुध्दा नैसर्गिक समतोल पाळला जात असल्यामुळे जगाची लोकसंख्यासुध्दा जवळजवळ स्थिर होती. गेल्या शतकात यात मोठा फरक पडला. जगाची लोकसंख्या वाढतच गेली, तसेच प्रत्येक माणसाच्या गरजा वाढत गेल्या. यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या भागवल्या जाऊ लागल्या, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या नवनव्या वस्तूंचे उत्पादन होऊ लागले आणि त्यांचा उपभोग घेण्याचा हव्यास वाढत गेला. यासाठी लागणारा कच्चा माल जमीन, पाणी आणि हवा यातून काढून घेतला जाऊ लागल्यामुळे त्यांचे साठे कमी होत चालले आणि यांत्रिक क्रियांमधून निर्माण होणारा कचरा निसर्गाच्या स्वाधीन केला जात असल्यामुळे त्यांचा उपसर्ग होणे सुरू झाले. यातून होणार्‍या समस्यांवर निसर्ग आपल्या परीने मार्ग काढत असतो, पण तो माणसांच्या फायद्याचा नसल्यामुळे किंवा आपल्याला त्रासदायक वा धोकादायक असल्यामुळे आपण हैराण होतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास मिठी नदीच्या किनारी राहणार्‍या लोकांनी तिच्या पात्रात टाकलेल्या कचर्‍यामुळे ते अरुंद झाले म्हणून पावसाचे पाणी मुंबईच्या अन्य भागात पसरले आणि यापूर्वी कधीही जिथे पाणी तुंबत नव्हते तेथील लोकांना जलप्रलयाचा अनुभव घ्यावा लागला.

जमीन, पाणी आणि हवा या तीन्हींचा समावेश पर्यावरणात होतो आणि माणसाच्या कृतींचा प्रभाव या तीन्हींवर पडतो. जमीनीवर पडणारा प्रभाव फक्त स्थानिक असतो, वाहत्या पाण्याबरोबर त्यावर पडलेला प्रभावसुध्दा पसरत जातो, वातावरणातील बदल क्षीण होत होत जगभर पसरतात. यामुळे वायुप्रदूषणाचा मुद्दा जागतिक झाला आहे आणि त्यामुळे त्यावरील उपाययोजना आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवल्या जात आहेत. हवेचे पृथक्करण केल्यास नत्रवायू (नायट्रोजन) आणि प्राणवायू (ऑक्सीजन) हे त्याचे मुख्य घटक असतात, त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्बद्विप्राणील वायू (कार्बन डायॉक्साईड) सुध्दा असतो. सर्व वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. फक्त वनस्पतींना ते सामर्थ्य मिळाले आहे.

सर्व वनस्पती दिवसा यातला थोडा थोडा कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन प्राणवायू हवेत सोडतात, सर्वच प्राणी आणि वनस्पतीसुध्दा दिवसाचे चोवीस तास श्वसन करत असतात आणि या क्रियेत प्राणवायू शोषून घेऊन कर्बद्विप्राणील वायू हवेत सोडतात. लक्षावधी वर्षांच्या काळात या दोन्ही क्रियांमध्ये एक समतोल साधला गेला होता आणि त्यामुळे हवेमधील प्राणवायू व कर्बद्विप्राणील वायू यांचे प्रमाण स्थिर राहिले होते. पण गेल्या काही दशकांमध्ये कारखाने आणि स्वयंचलित वाहने यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे कर्बद्विप्राणील वायूची निर्मिती खूप वाढली आहे आणि ती वाढतच आहे. उलट माणसाच्या हावेपोटी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यांची कर्बद्विप्राणील वायूपासून प्राणवायू तयार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रकारे वातावरणामधील संतुलन बिघडत आहे. शिवाय कारखान्यांमधून इतर काही प्रकारचे विषारी वायू बाहेर पडत असल्यामुळे त्यांचाही परिणाम वातावरणावर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग या बिघाडात भूपृष्ठाचे सरासरी तपमान वाढल्यामुळे बर्फांच्या राशी वितळतील, त्यामुळे नद्यांना महापूर येतील, समुद्राची पातळी वाढल्यामुळे तो किनार्‍यावरील जागा व्यापेल आणि मुंबई, न्यूयॉर्कसारखी महानगरे पाण्याखाली बुडून जातील वगैरे भीतीदायक चित्र उभे केले जात आहे आणि हे होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुचवल्या जात आहेत. शक्य तेवढी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सुरू झालेली आहेच.

प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे रोजमर्राचे जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तेही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षांचे संवर्धन समाविष्ट केले गेले आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी चालवल्या जात असलेल्या आताच्या योजना चांगल्या आणि आवश्यक आहेत यात शंका नाही, पण त्यांच्या बाबत काही गैरसमजुती पसरवल्या जात आहेत, त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. सगळ्या झाडांची सगळी पाने दिवसभर प्राणवायू तयार करत असतात आणि त्यामुळे घनदाट जंगले हे प्राणवायूचे मोठे कारखाने आहेत असे अनेक लोकांना वाटते, पण ते पूर्ण सत्य नाही. कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन त्यापासून अन्न तयार करण्याचे काम करण्यासाठी झाडांना इतर काही गोष्टींची आवश्यकता असते. पाणी आणि सूर्यकिरणे हवीतच, शिवाय जमीनीतून काही क्षार मिळावे लागतात. हे सगळे उपलब्ध नसले तर ते झाड अन्न निर्माण करू शकत नाही, ते उपाशी राहते आणि सुकून जाते. हे सगळे प्राप्त होत असले तरीही त्या झाडाला अन्नाची आवश्यकता असावी लागते. त्याची वाढ होत असतांना हे अन्न मोठ्या प्रमाणावर तयार होते, पण झाड पूर्ण वाढल्यानंतर त्याला अन्न निर्माण करण्याची तितकीशी आवश्यकता वाटत नाही. जेंव्हा झाड अन्न तयार करत नाही तेंव्हा प्राणवायूही तयार होत नाही.

झाडांच्या सर्व भागांचे आयुष्य समान नसते. त्याचे खोड आयुष्यभर त्याच्यासोबत असते तर फुले एक दोन दिवसांपुरतीच असतात. बहुतेक झाडांची पाने पिकून झडून जात असतात आणि त्यांच्यी जागी नवी पाने येत असतात. त्यातही काही झाडे हिवाळ्यात पूर्णपणे निष्पर्ण होतात, तर काही झाडांची पाने अंशतः गळतात. जंगलामध्ये हा झाडांच्या खाली पडलेला पालपाचोळा कुजून जमीनीत मिसळतो किंवा वणव्यात भस्म होऊन जातो. या दोन्ही क्रियांमध्ये त्यातून कर्बद्विप्राणील वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. कुजण्याच्या क्रियेत मीथेन वायूच्या रूपात कर्बाचे उत्सर्जन होते. अशा प्रकारे वर्षभराच्या अवधीत हवेमधील कर्बद्विप्राणील वायूच्या द्वारे ही झाडे जेवढा कर्ब हवेमधून शोषून घेतात तेवढाच तो परत करतात. त्यामुळे जंगलतोड करणे वाईट आहे आणि नवी राने वाढवणे चांगले आहे असे असले तरी हवेमधील कर्बद्विप्राणील वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी ती झाडे काही काळापर्यंतच उपयुक्त असतात. एक कारखाना सुरू केला आणि त्याचा चहू बाजूला झाडे लावली की कर्बद्विप्राणील वायूची काळजी कायमची मिटली असे होत नाही. याच्या उलट पाहता कुठल्याही झाडाची पाने तोडली किंवा फांद्या छाटल्या की लगेच पर्यावरणाचा नाश झाला असेही होत नाही. झाडाना नवे कोंब फुटतात, नवी पल्लवी येते, त्याची वाढ सुरू होते आणि त्याचा पर्यावरणाला लाभ सुध्दा होऊ शकतो.

गेल्या काही हजारो किंवा लक्षावधी वर्षांमध्ये पृथ्वीच्या पाठीवरील पशुपक्षी आणि वनस्पती यांचा एक समतोल साधला गेला होता. वनस्पतींच्या तुलनेत प्राणीमात्रांचे आकार आणि संख्या फारच लहान असल्यामुळे पृथ्वीच्या पाठीवरील कर्ब (कार्बन) हे मुख्यतः वनस्पतींमध्येच असते. भूपृष्ठावर उगवणार्‍या आणि नष्ट होणार्‍या वनस्पतींमध्ये साठलेले कर्बाचे प्रमाण हजारो वर्षांपासून स्थिर राहिले होते. पण लक्षावधी वर्षांपूर्वी जमीनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेल, नैसर्गिक वायू (पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस) वगैरेंमध्ये होऊन गेलेले आहे. यंत्रयुगात ते जमीनीखालून बाहेर काढले जाऊ लागले आणि त्यांच्या ज्वलनातून निर्माण झालेला कर्बद्विप्राणील वायू हवेत मिसळत असल्यामुळे भूपृष्ठावरील कर्बाचे प्रमाण वाढत चालले आहे. ते हवेमधून शोषून घेऊन नव्या वनस्पतींच्या शरीरांमध्ये त्याला स्थिर करण्यासाठी प्रदीर्घ काळाचा अवधी लागेल. त्यासाठी नवी अरण्ये उभारण्यासाठी मोकळी जागा कुठे आहे? उलट जमीनीच्या वाढत्या मागणीमुळे सध्या अस्तित्वात असलेली राने नाहीशी होत आहेत. याचा विचार करून जे कारखाने अशा प्रकारे जगावर अधिक कर्बाचा बोजा टाकत आहेत त्यांनी कार्बन टॅक्स भरावा अशा प्रकारचे नियम पाश्चात्य देशात केले जात आहेत आणि इतर देशांनीसुध्दा ते करावे असा आग्रह धरत आहेत. उलट भारत आणि चीन यासारख्या देशांचे असे म्हणणे आहे की दर डोई उत्पादन किंवा विजेचा वापर यात ते पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूप मागे आहेत, त्यामुळे त्यांनी असे कर लावले तर ते विकासाला बाधा आणतील यामुळे ते मागेच पडत जातील. यामुळे ते असल्या तरतुदी मान्य करणार नाहीत. अशा प्रकारे यात राजकारण आले आहे आणि सर्वमान्य धोरणे निश्चित होऊन त्यांची अंमलबजावणी होऊ लागेपर्यंत पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम होत राहतील.

जमीनीवर होणारे परिणाम स्थानिक असल्यामुळे काही प्रमाणात त्या जमीनीच्या मालकालाच किंवा त्या भागामधील लोक, प्राणी, वनस्पती वगैरेंना भोगावे लागतात. रासायनिक कीटकनाशके किंवा खतांमुळे जमीनीचा कस कमी झाला तर त्यांचे नुकसान होते, पण ती रसायने कृषीउत्पादनांमध्ये मिसळून दूर राहणार्‍या ग्राहकांच्या पोटात सुध्दा जातात आणि त्यांच्या आरोग्याला अपाय करतात. शिवाय ही रासायनिक द्रव्ये तयार करणार्‍या मोठ्या कारखान्यांमुळे हवेचे व पाण्याचे प्रदूषण होते, ते चालवण्यात ऊर्जा खर्च होते वगैरे दोष त्यात आहेत. पण या घातक द्रव्यांमुळे शेतकर्‍यांना थेट होणारा तात्कालिक लाभ अधिक आकर्षक असल्यामुळे त्यांच्याविरुध्द केलेली प्रचारमोहीम परिणामकारक ठरत नाही. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरावी यावर पर्यावरणवाद्यांचा भर आहे. याबाबतीत अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

पाण्याचे प्रदूषण ही भारतात अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. गंगेसारख्या एके काळी स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी प्रसिध्द असलेल्या नदीला आता गटाराचे रूप आले आहे. ज्या काळात लोकवस्ती कमी होती आणि नदीत भरपूर पाणी असायचे त्या काळात गावोगावच्या ओढ्यानाल्यामधून नदीत येऊन पडणारा सेंद्रीय कचरा जलचरांकडूनच नैसर्गिक मार्गाने नष्ट केला जात असे. आता कचरा अपरंपार वाढत आहे, त्यात विषारी रसायने टाकली जात आहेत आणि जलचर जीवच नष्ट होत चालले आहेत. जनजागृती तसेच आधुनिक तंत्रज्ञान या दोन्ही आघाड्यांवर नेटाने प्रयत्न केल्यानेच हा प्रश्न आटोक्यात आणणे शक्य आहे. तसे नाही झाले तर त्यापासून होत असलेले दुष्परिणाम वाढतच जातील.

"हरित अर्थकारण, तुम्ही त्त्यात आहात का ?" (Green Economy: Does it include you?) हा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिवसाचा मुख्य विषय होता. 'हरित आर्थिक व्यवस्था' म्हणजे काय आणि तुम्ही त्यासाठी काय करायचे आहे याचा सर्वांनीच विचार करण्याची वेळ आता आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनोच्या) कार्यक्रमानुसार पर्यावरणाला कमीत कमी हानी व धोका पोचवत समस्त मानवजातीचा उध्दार करणे आणि त्यांच्यामधील सामाजिक सामंजस्य वाढवणे असा काहीसा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास पर्यावरणाच्या प्रदूषणाला आळा घालायचा, निसर्गातली जैवविविधता राखायची, ऊर्जेची बचत करायची आणि हे सांभाळून अधिकाधिक जनतेसाठी उत्पन्नाची साधने निर्माण करायची. यासाठी अनुकूल अशी सरकारी धोरणे असायला हवीत आणि त्यासाठी सरकारच्या खजिन्यामधून निधी उपलब्ध करायचा हे आहेच, पण पुरेसे नाही. तुम्ही आम्ही सर्वांनी या कार्याला सक्रिय पाठिंबा द्यायला हवा. हे काम निरनिराळ्या आघाड्यांवर करू शकतो आणि करायला पाहिजे. त्यांची ढोबळ वर्गवारी खाली दिल्याप्रमाणे केली आहे.
१. इमारतींचे बांधकाम -
२. मासेमारी
३. वनसंरक्षण
४. वाहतूक
५. जलव्यवस्थापन
६. कृषि
७. ऊर्जा
८. पर्यटन
९. कच-याची विल्हेवाट
१०. कारखानदारी

प्रत्येक आघाडीवर काय काय करावे याबद्दल मार्गदर्शन केलेले असले तरी त्यात काही समान सूत्रे आहेत. कोठलेही काम करण्यासाठी संसाधनांची (रिसोर्सेसची) तसेच ऊर्जेची आवश्यकता असते. तसेच ती ऊर्जा मिळवण्यासाठी आणखी जास्त संसाधनांची गरज असते. कमीत कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त लाभ मिळवावा ( कार्यक्षमता वाढवावी), संसाधने आणि ऊर्जा यांच्या वापरात बचत करावी, यातले काहीही वाया जाऊ देऊ नये, कचर्‍याचा शक्यतोवर पुनर्वापर (रिसायकलिंग) करावा. वगैरे वगैरे गोष्टी वरील प्रत्येक क्षेत्रात निरनिराळ्या उदाहरणाने दिल्या आहेत. मी लहान असतांना माझी आई नेमक्या याच गोष्टी आमच्या कानीकपाळी ओरडून सांगत होती. याशिवाय ऊन, पाऊस, वारा वगैरे जी नैसर्गिक संसाधने आपल्याला मिळत राहतात, त्यांच्या उपयोगावर भर द्यावा. भूमीगत खनिज पदार्थांचा साठा संपून जाऊ नये, तसेच आज पृथ्वीवर वावरणारे पशुपक्षी व वनस्पती नामशेष होऊ नयेत यासाठी त्यांच्याकडे मुद्दाम लक्ष पुरवायला हवे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास पर्यावरणाच्या रक्षणासाठी काटकसर करा आणि निसर्गाकडे वळा हा पर्यावरणदिनाचा संदेश आहे.

Comments

धन्यवाद

लेख थोडासा लांबला आहे पण वाचनीय आहे. आनंद घारे अतिशय साध्या सोप्या भाषेत विषय मांडतात. हा लेखही असाच सोप्या शब्दांत मांडला आहे.

आपल्यापेक्षा अनंतपटीने सामर्थ्यवान असलेल्या निसर्गाची आपण काळजी करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. पर्यावरणप्रेमी खरे तर त्यांच्या स्वतःच्या किंवा फार तर त्यांच्या वंशजांच्या चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे म्हणता येईल.

सहमत आहे.

पटले..पण.

>>आनंद घारे अतिशय साध्या सोप्या भाषेत विषय मांडतात. हा लेखही असाच सोप्या शब्दांत मांडला आहे.
सहमत.

लेखातील विचारांशी एकंदर सहमत पण पुरोगामी समाजरचनेत हे फायदे-तोटे अंतर्भूत असतात, त्यामुळे लेखातील विचार आदर्शवाद वाटतो, उर्जेची गरजच ह्या र्‍हासाला/प्रगतीला कारणीभूत आहे, अक्षय उर्जा सोडल्यास सर्वच उर्जांचे फायदे व दूरगामी तोटे असणारच, त्यामूळे लेखातील विचार पटला तरी तो राबविणे शक्य दिसत नाही.

मध्यमवर्गीय भंपकपणा

लेख समयोचित. आवडला. शहरांतले प्रदूषण भयंकर वाढले आहे. आणि सामान्य लोकांना त्याबद्दल फारसे काही वाटत नाही. त्यांचा जगण्याचा रोजचा झगडा बहुधा इतका भीषण आहे. पण ह्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा तशा कमीच आहेत. प्रदूषणाबाबत जरा जादा वाटते ते मध्यमवर्गीयांना, उच्चमध्यमवर्गीयांना. आणि हीच मंडळी जादा ऊर्जा खरचतात. असो. मध्यमवर्गीय भंपकपणा. दुसरे काही नाही.

दुसरे म्हणजे, माझ्यामते सध्या एक सगळ्यात मोठी गरज सावर्जनिक वाहतुकीला (पब्लिक ट्रान्सपोर्ट) सक्षम करण्याची आहे. चारचाकी आणि दुचाकी गाड्यांवर ड्यूट्या वाढवायला हव्यात. हरित जीवनशैली जगण्यासाठी लोकांना उद्युक्त करायला हवे. आणि ज्यांची जीवनशैली हरित आहे त्यांना त्याबद्दल शाबासकी द्यायला हवी. म्हणजे करांतून सवलती, वेगवेगळ्या शुल्कांतून सवलती वगैरे वगैरे. थोडक्यात जे करण्यासारखे आहे ते लवकरात लवकर करायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सरकारी मदत

करांतून सवलती, वेगवेगळ्या शुल्कांतून सवलती वगैरे वगैरे
सध्या सुद्धा आहेत. पण त्या किती परिणामकारक आहेत याबद्दल थोडी शंका येते. सवलत मिळवण्यासाठी काही गोष्टी दाखवल्या जाणे आणि प्रत्यक्ष सकारात्मक कृती यात अंतर असते. समाजाच्या वर्तणुकीत फक्त कायदे करून बदल घडत नाहीत हे अनेक वेळा अनेक प्रकारे सिद्ध झाले आहे.
परिस्थितीचे दडपण येईल तेंव्हा लोकांना ते करावेच लागतील.

 
^ वर