रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे?

खालील चर्चा/ लेख हा एक संशयसिद्धांत म्हणून मांडत आहे. इतर संशयसिद्धांतांप्रमाणेच या सिद्धांताला खोडून काढण्यासारखे मुद्दे येथे अनेकांकडे असतील. येथे होणार्‍या चर्चेतून हे मुद्दे इतरांनी मांडायचे आहेत.

---------------

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांवर उहापोह करणार्‍यांची, त्याकडे इतिहास म्हणून बघणार्‍यांची आणि राम-कृष्ण यांची विष्णूचे अवतार म्हणून भक्ती करणार्‍यांची संख्या अमाप असावी. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेकांना या महाकाव्यांनी, त्यातील पात्रांनी आणि देवस्वरूप अवतारांनी भुरळ घातली आहे.

मध्यंतरी विसुनानांनी हेलिओडोरसच्या स्तंभाबद्दल लिहिलेल्या "गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१" या लेखातून कृष्णभक्तीची/ भागवत् धर्माची परंपरा भारतात किती पुरातन आहे त्यावर माहिती दिली होती. त्या लेखातून पुढे आलेल्या निष्कर्षात कृष्णभक्ती ही इ.स. पूर्व ३०० च्याही आधी केली जात असावी असा सहज निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला पुष्टी देण्यासाठी मेगॅस्थेनिसने इंडिकामध्ये शौरसेनींविषयी दिलेली माहिती, अलेक्झांडरने शिव आणि कृष्ण या दोन्ही देवता ग्रीकांना पूर्वापार माहित असल्याचा केलेला दावा, हेलिओडोरसचा गरुडध्वज हे पुढे करता येतात.

कृष्णाप्रमाणेच देवपदावर पोहोचलेल्या रामभक्तीची परंपरा किती जुनी असावी हा विचार मनात डोकावतो परंतु मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी राम आणि कृष्ण यांना प्रसिद्धी देणार्‍या रामायण आणि महाभारताकडे एकवार पाहू.

***

कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे मनाजोगे उत्तर मिळालेले नसले तरी "रामायण आधी की महाभारत" या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडून चटकन "रामायण आधीचे" असे दिले जाते. याला प्रमाण म्हणून रामायणाचा काळ, त्यावेळी असणारे समाजजीवन, पौराणिक व्यक्ती, वेषभूषा अशा अनेक गोष्टींच्या आधारे रामायणच आधीचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यापैकी प्रामुख्याने येणारे काही मुद्दे असे -

१. पौराणिक वंशावळीप्रमाणे राम किंवा त्याचा रघुवंश हा कुरुवंशाच्या आधी येतो.
२. रामायणात महाभारताचा उल्लेख नाही पण महाभारतात रामकथेचा आणि त्यातील पात्रांचा (उदा. हनुमान) उल्लेख/ कथा आहेत.
३. रामायणाचे कथानक त्रेतायुगात घडते आणि महाभारताचे द्वापारयुगात.

परंतु विचार केल्यास या विधानांतून राम ही व्यक्ती कुरुवंशाआधी जन्माला आली होती इतकेच कळते. रामायण हे महाभारताआधी रचले हे सिद्ध होत नाही. एखाद्या उत्तम लेखकासाठी त्याची कथा सद्य काळापेक्षा मागे जाऊन रचणे हे अशक्य कार्य नाही. उदा. लगान या चित्रपटात दाखवलेली पात्रे, काळ आणि कथा सांगते की क्रिकेट हा खेळ गुजराथमधील काही अडाणी गावकर्‍यांनी ब्रिटिशांसमवेत लीलयेने खेळून दाखवला. ही कथा २१ व्या शतकात लिहिलेली असेल तरी १००-१२५ वर्षांपूर्वीचा काळ निर्माण करणे, तत्कालीन इतिहासातील खर्‍या व्यक्तिंशी त्या कथानकाशी सांगड घालणे आणि एक नवे कथानक रचणे चांगल्या लेखकाला अवघड नसते.

एका वेगळ्या उदाहरणात, इलियडचा पूर्वभाग सायप्रिआ हा इलियडनंतर रचला गेल्याचा प्रवाद आहे. असे करताना लेखकांनी हे पूर्वभाग आहेत याची जाणीव ठेवून लेखन केल्याचे निर्वाळे तज्ज्ञ देतात. अगदी अलिकडल्या काळातील उदाहरण बघायचे झाले तर ट्वायलाइट या प्रसिद्ध कादंबरीत येणार्‍या ब्री टॅनर या संक्षेपाने येणार्‍या पात्रावर पुढे "द शॉर्ट सेकंड लाइफ ऑफ ब्री टॅनर" अशी कादंबरी लिहिण्यात आली.

अशाप्रकारे संक्षेपाने येणार्‍या पात्राचा किंवा कथानकाचा विस्तार करून नवे कथानक रचणारा लेखक योग्य काळ उभा करतो, त्या काळाशी सुसंगत मांडणी, समाजव्यवस्था, राजकारण यांचा समावेश करून कथेला सुसंगती आणतो.

महाभारताचा विचार करता, महाभारतात संक्षेपाने रामकथा (रामोपाख्यान) येते. याला रामकथा असे म्हटले आहे कारण महाभारतात वाल्मिकीने रचलेल्या रामायणाचा उल्लेख नाही. इतकेच नाही तर या कथेत राम हा एक राजपुत्र म्हणून येतो. दैवी पुरुष म्हणून नाही. वाल्मिकी नावाच्या कोणत्याही ऋषींचा महाभारतात उल्लेख नाही. महाभारतात या रामकथेच्या संक्षेपाने येण्याबद्दल चार गृहितके मांडता येतील -

  • रामायण महाभारता आधी रचले गेल्याने त्याचा संक्षेपाने महाभारतात रामकथा (रामोपाख्यान) उल्लेख येतो किंवा
  • महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले.
  • महाभारतात आलेली रामकथा ही वाल्मिकी रामायणाच्या पूर्वीच्या एखाद्या रामायणावर आधारित आहे.
  • रामकथा आणि रामायण हे एका तिसर्‍याच रामस्रोतावरून निर्माण झाले आहेत.

यापैकी कोणते विधान खरे मानायचे हा गुंता होतो. विविध तज्ज्ञ वरीलपैकी विविध मते मांडून आपापले तर्क मांडतात. सध्या आपण केवळ दुसर्‍या विधानाबाबत विचार करू.

- महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले. -

या मुद्द्याच्या पुष्टर्थ काही गृहितके खाली मांडत आहे.

१. रामायणातील राम हा कथेचा नायक आहे तर कृष्ण महाभारतातील प्रमुख पात्र नाही. एकदा विष्णूच्या अवताराने नायकाचा अवतार घेतल्यावर त्या पुढील अवतारात तो नायक नसावा ही एक प्रकारची उतरंड वाटते.

२. रामकथेतील राम हा दैवी पुरुष नाही. अहल्येचे प्रसिद्ध प्रकरण रामकथेत येत नाही. तो दैवी पुरुष आहे असे दाखवण्यासाठी जे बालकांड आणि उत्तरकांड याचा वापर होतो ते दोन्ही अनेक तज्ज्ञांच्या मते मागाहून भरती झालेले असावे असे मानले जातात. या वरून मूळ कथेला ठिगळे जोडून रामाला दैवी बनवण्याचा घाट कालांतराने घालण्यात आला. पुराणांतून रामाला आणि कृष्णाला विष्णूचे अवतार मानून रामाला कृष्णापेक्षा पुरातन ठरवण्यात आले. हे सर्व बदल गुप्त काळात झाले असावे असा अंदाज मांडला जातो. पुराणांना गुप्तकाळात प्रमाणित करताना त्यात अनेक फेरफार केले गेले असे मानले जाते. रामालाही दैवत्व तेव्हाच प्राप्त झाले असावे का? बौद्ध काळानंतर जेव्हा हिंदू धर्म पुन्हा बळकट झाला तेव्हा हिंदू दैवतांना बळकटी आली असे तर नव्हे?

३. प्रचलित प्रवादांनुसार महाभारत हा इतिहास तर रामायण हे आदिकाव्य मानले गेले आहे. बहुधा यामुळेच रामायणाच्या अनेक आवृत्ती दिसून येतात. त्या मानाने महाभारताच्या आवृत्तीतील फरक लहान आहेत आणि आवृत्तींची संख्याही कमी आहे. येथे उदाहरण द्यायचे झाले तर काही रामायणांत सीता ही रामाची बहिण आहे तर काहींमध्ये ती रावणाची मुलगी आहे. काही रामायणांत रावणाचा वध लक्ष्मणाकडून होतो तर दशरथ जातकात किष्किंधा, लंका, सीतेचे अपहरण वगैरे नाही. अध्यात्मिक रामायण नावाचे एक रामायण खुद्द वेदव्यासांनी रचले असे सांगितले जाते परंतु गुप्तकाळात ज्या प्रमाणे सर्व पुराणांचा लेखक व्यास बनले त्यातलाच हा एक प्रकार असावा असे एक मत पडते. यावरून राम हा कथानायक म्हणून अधिक प्रसिद्ध असावा असे वाटते.

४. स्थळ-काळाचा विचार केल्यास सरस्वती नदीच्या खोर्‍यातून पूर्वेकडे गंगेच्या खोर्‍यात तत्कालीन जमातींचे स्थलांतर झाले असे मानले जाते. महाभारत हे गंगेच्या पश्चिमेकडील खोर्‍यात घडते. महाभारत काळात गंगेचे पूर्वेकडील खोरे त्यामानाने उपेक्षित वाटते. महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख अनेकदा येतो. रामायणात तो किष्किंधाकांडात इतका पुसटसा येतो की तो मागाहून घातला गेला असावा अशी शंका घेतली जाते. रामायणातील कोसल देश, अयोध्या नगरी वगैरे गंगा, शरयु नदीच्या आसपासच्या भागात वसलेले प्रदेश सप्तसिंधुंना महत्त्व देत नाहीत. याउलट, महाभारतात कोसल, किष्किंधा, दंडकारण्य वगैरे प्रदेशांना महत्त्व नाही.

५. इ.स.पूर्व ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना आणि (लुप्त?) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून झालेली होती. (संदर्भः गरुडध्वज..लेख) या प्रकारे राम या दैवताची प्रस्थापना त्या काळात झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्‍या शब्दांत कृष्णाला ज्या काळी दैवताचे स्वरूप होते त्याकाळी रामही दैवी झाला होता असे स्पष्ट विधान करण्यास खात्रीशीर पुरावे मिळत नाहीत. कृष्ण हा त्यामानाने भारतात खोलवर रुजलेला दिसतो. कधी महाराष्ट्रात विठोबाच्या रुपात तर कधी ओरिसात जगन्नाथ म्हणून, राजस्थानात श्रीनाथजी म्हणून तर गुजराथेत रणछोडराय म्हणून. रामाचे असे लोकदैवतांत रुजलेले रुप दिसत नाही.

***

असो. इतके रामायण सांगितल्यावरही रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले याचा ठोस अंदाज मला लागलेला नाही तसे संदर्भ सापडलेले नाहीत पण तूर्तास राम देवपदी कृष्णानंतर फार काळाने चढला असावा असा अंदाज मांडते. या अंदाजाला पुष्टी देणारे किंवा खोडून काढणारे ससंदर्भ प्रतिसाद वाचायला आवडतील.

संदर्भः

लोकदैवतांचे विश्वः र. चिं. ढेरे
The Mahabharata, Volume 2: Book 2: The Book of Assembly; Book 3: The Book of the Forest - J. A. B. van Buitenen
एशियन वेरिएशन्स इन रामायणा

Comments

गेल्या ५-७ शतकात?

"ओल्डेस्ट राम टेम्पल इन् एन्डीया" असा शोध घेतला असता गुगलने ठोस उत्तर दिले नाही.
किंबहुना राम मंदीर म्हटल्यावर समोर आलेली मंदीरे पाचसातशे वर्षाच्या मागे जात नाही. लेण्यांपैकी वेरूळमधे बहुदा रामाची शिल्पे असावीत, अन्यत्र ऐकीवात नाही

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

शिल्पे

विसुनानांनी मध्यंतरी मला एक दुवा दिला होता त्यात रामायणातील शिल्पे आहेत. http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00routesdata/0400_0499/deog... त्या संदर्भांत अधिक माहिती मिळाली नाही पण ती इ.स.२०० नंतरची असावी असे ते म्हणतात.

त्यावरून तोपर्यंत बहुधा रामायण प्रसिद्ध झाले असावे असे वाटते परंतु त्या शिल्पांवरून राम दैवत्वाला पोहोचला असे सांगता येत नाही. ही शिल्पे दैवताची वाटत नसून कथेतील प्रसंगाची वाटतात असे माझे मत पडले. त्यामुळे अजिंठा वेरूळला शिल्पे असली तर ती दैवताची शिल्पे आहेत की कथानक चितारलेले आहे हे पाहावे लागेल.

ओल्डेस्ट रामा टेम्पल असे शोधले तरीही इसवीसनापूर्वीचे काही मिळणार नाही हे निश्चित. :-)

कैलास लेणे : रामायणाचे कथानक

वेरुळच्या कैलास मंदिर (गुंफा क्र. १६) लेण्यात रामायणाचे संपूर्ण कथानक एकाच शीळेवर कोरलेले आहे.(हेच महाभारताबद्दलही म्हणता येते.)
परंतु, कैलास लेण्यात मुख्य दैवत शिव असल्याने तेथे प्रामुख्याने 'रावणगर्वहरण' (शंकराने आंगठ्याने कैलास पर्वत दाबणे आणि रावणाला चिरडणे) हे शिल्प महत्त्वाचे आहे. (त्या कथेतला रावण जर रामायणातला रावण धरला तर-) कैलास लेणे हे शंकर विष्णूपेक्षा (किंवा तितकाच) महान होता आणि विष्णूने रावणाचा वध करण्याआधीच शिवाने त्याला नामोहरम केले होते असे स्पष्ट करण्यासाठी आहे.
हे लेणे इ.स्. ७५० (चुभूदेघे) च्या आसपास कोरले आहे. (पोस्ट पीक बुद्धीझम)
म्हणजे त्यावेळी राम हा बहुजनात महत्त्वाचा विष्णू - अवतार म्हणून प्रचलित होता. नपेक्षा रावणाला इतके महत्त्व आले नसते. (मला जे म्हणायचे आहे ते समजले असेल अशी अपेक्षा करतो.)
याअर्थी राम हा पोस्ट-पीक-बुद्धीझम काळात एक विष्णूचा अवतार म्हणून प्रसिद्ध होता इतके सिद्ध होत असावे. आता गौ/गोतम बुद्ध हा विष्णूचा अवतार कधी बनला ते पाहिले तर मला वाटते ही अवतार निर्मिती नक्की लक्षात येईल. (कदाचित बुद्धाला धर्म परंपरेत बसवण्यासाठी ही अवतारमालिका निर्माण झाली असावी आणि राम-कृष्ण त्यात जाऊन बसले असावेत.)

(@प्रियाली, आपण खाली दिलेला/ले प्रतिसाद मी वाचण्याआधी हा प्रतिसाद दिला आहे याची कृ.नों.घ्या.)

राष्ट्रकूट

वेरुळ लेणे म्हणजे राष्ट्रकुटांच्या कालावधीत राम दैवत्वाला पोहोचला होता यात शंकाच नाही. तेव्हा वाल्मिकींचे रामायण प्रसिद्ध असावेच, कालिदासाचे रघुवंश असावे, भावभूतीचे उत्तररामचरितसुद्धा प्रसिद्ध असणे शक्य आहे. त्यामुळे राम हा तेव्हा चंद्रशेखर म्हणतात त्याप्रमाणे चांगला पुत्र, पती, उत्तम नायक म्हणून प्रसिद्ध असावा.

कालिदासापूर्वीच

अधिक विचाराशिवाय ह्या विषयात उडी घेणे सध्या टाळतो पण एक लगेच सुचलेले उत्तर देता येईल.

कालिदासाचा काळ इ.स.चे पाचवे शतक मानला तर त्याच्या काळापर्यंत रामायणात वर्णिलेल्या रामकथेने चांगले मूळ धरलेले असावे आणि राम हा विष्णूचेच पृथ्वीवरील रूप आहे ही कल्पना तेव्हा मान्यता पावलेली असावी. रघुवंशाच्या एकूण १९ सर्गांपैकी १० ते १५ असे ६ सर्ग केवळ रामाच्या देहत्यागापर्यंतच्या रामकथेला दिले आहेत. ९ व्या सर्गाचा अर्धा भाग श्रावणाच्या गोष्टीला दिला आहे म्हणजे तोहि रामकथेचाच भाग मानायला हरकत नाही. १६ आणि १७ हे सर्ग कुश आणि त्याचा मुलगा अतिथि ह्यांना दिले आहेत आणि तदनंतर अग्निवर्णापर्यंतचे २० वंशज उरलेल्या दोन सर्गांत बसतात. अशा रीतीने १९ पैकी ६|| सर्ग रामाला दिले आहेत. कालिदासाला वर्णावयाचा 'रघूणां अन्वय' राम आणि कुशापर्यंतच मुख्यत्वे वर्णिला आहे.

कालिदासाची रामकथा वाल्मीकीने सांगितली तशीच आहे. सवडीने रघुवंश चाळून काही वेगळे आहे का ते पाहतो.

देवळात पूजा करण्याच्या पातळीला राम केव्हा पोहोचला हे ह्यावरून कळत नाही. दशावतार कल्पना ९व्या वा १० व्या शतकात उगम पावली असावी म्हणजे तेव्हापर्यंत रामाचे स्थान कालिदासकालापेक्षाहि वरचे झाले असावे आणि त्याची देवळेहि असतील असे मानायला प्रत्यवाय दिसत नाही.

सहमत आहे

इ. स. पाचव्या शतकात रामकथेने मूळ धरले होते याच्याशी सहमत आहे. वर मी जो शिल्पांचा दुवा दिला आहे त्या साइटवर फेरी मारली तर रामायणाविषयी इ. स. पूर्व ३००-२०० च्या दरम्यान रामायणाची प्रथम आवृत्ती निर्माण झाली असावी (The earliest strata of this great Indian epic begin to develop) असे लिहिले आहे परंतु ते कोणत्या स्रोतांवरून हे कळत नाही.

मला स्वतःला असा संशय आहे की बौद्धकाळानंतर हिंदू धर्म पुन्हा जोर धरू लागला तेव्हा रामायणातून राम दैवी होण्यास सुरुवात झाली.

९ व्या दहाव्या शतकात रामाची देवळे असणे शक्य आहे. इथे एक गंमत मला जाणवली ती अशी की सुमारे याच काळात राम आग्नेयआशियात पोहोचला. तेथेही रामकथेच्या अनेक आवृत्ती तयार झाल्या. राम हा त्या संस्कृतींचे दैवत बनला. त्यामानाने तेथे कृष्ण प्रस्थापित झालेला दिसत नाही पण ९-१० व्या शतकात राम प्रस्थापित दैवत असावा हे खरेच.

राम

वसिष्ठीपुत्र पुळुमावीच्या/गोतमीच्या शिलालेखामध्ये "राम केशवाजुन भीमसेन तुल परकमस" असे उल्लेख आहेत. त्याचबरोबर नाभाग, नहुष, जनमेजय, ययाति, राम यांप्रमाणे तेजस्वी असेही उल्लेख आहेत. यातील राम परशुराम असावा असे काहींचे म्हणणे आहे, पण मला वाटते की नहुष, जनमेजय यांच्या यादीतला राम हा रामकथेतील राम असावा.

हे शिलालेख साधारण इ. स. २ र्‍या शतकाच्या सुरुवातीचे असावेत असे वाटते. याचा अर्थ यावेळेपर्यंत रामकथा प्रचलित असावी, नाभाग आदी राजेही माहिती होते असे दिसते.

अवांतर -
माझा आणि सदस्य विसुनाना यांचा मिपावर यासंबंधाने काही खरडव्यवहार झाला होता. तेव्हा यामधील राम हे विसुनाना यांच्याकडील पुस्तकाप्रमाणे त्याआधीच्या सातव्या ओळीत आले आहे (जे त्या पुस्तकात एकब्राह्मणाशी जोडलेले आहे). पुढे या पुस्तकातील आठवी ओळ ही केशवाजुन भीमसेन अशी आहे. भांडारकरांनी मात्र राम सातव्या ओळीतल्या एकब्राह्मणाशी न जोडता आठव्या ओळीत पराक्रमी पुरुषांच्या यादीत पहिल्या क्रमांकाने घेतला आहे असे दिसते. भांडारकरांचे भाषांतर येथे पाहता येईल.

शक्य आहे

गोतमीच्या शिलालेखातील राम हा परशुराम नसून दाशरथी राम आहे असे मानले तरी वरील चर्चा आणि प्रतिसादांना बाधा येत नाही त्यामुळे हा संदर्भ योग्य आहे असे मानू. तसे मानल्यास इ.स. दुसर्‍या शतकात राम हळूहळू दैवी स्वरूप घेऊ लागला असावा असे वाटते.

वाल्मिकी रामायणाचा काळ वर एके ठिकाणी इ.स.पूर्व ३०० ते २०० मधील म्हटला आहे. हे खरे मानले तर रामाचा प्रचार आणि प्रसार होऊन दैवी स्वरूप कदाचित इ.स. २०० पूर्वीच येणे शक्य आहे.

वसिष्ठीपुत्र पुळुमावीच्या/गोतमीच्या शिलालेखातील् रामाचा उल्लेख्

वसिष्ठीपुत्र पुळुमावीच्या/गोतमीच्या शिलालेखामधील् रामाचा उल्लेख् एक वीर पुरुष या अर्थाने केलेला आहे. देव म्हणून् केलेला नसावा

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

रोचक व पोषक

रोचक व पोषक चर्चा. आधी रामायण की महाभारत याचा निर्णय ह्या चर्चेने काही अंशी तरी नक्की होईल, अशी आशा व्यक्त करतो. दुवे इ.इ. वाचतोय् सध्या.

(अभ्यास नाही तर प्रतिसाद काय देणार डोंबल ;))

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

श्रीराम आणि दैवत्व

रामायणाच्या विषयावर मी या आधीही उपक्रमवर लिहिलेले आहे. या विषयावरचे माझे विचार आता बर्‍यापैकी ठाम झालेले आहेत.
1. रामकथा इ.स.पूर्व 3000ते 4000 या काळात कधीतरी घडली असावी.
2. मूलत: ( गंगेची उपनदी असलेल्या) शरयू नदीकाठी वसलेल्या एका नागरी राज्याचा (सिटी स्टेट) राजकुमार व या नागरी राज्याच्या परिसीमेवर असलेल्या एका अदिवासी (ट्रायबल) राज्याचा राजा यामधील संघर्षाची ही कहाणी आहे.
3. या कथेमधे असलेल्या व मानवी मनाला आकर्षित करू शकणार्‍या कथाबीजामुळे राम लोकनायक झाला व परंपरागत लोकगीतांच्या स्वरूपात त्याचा वारसा पुढची तीन किंवा चार सहस्त्रके चालूच नाही तर वर्धितही होत गेला.
4. इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या मध्यावर आणि महाभारताचे काव्य रचले जाण्याआधी, वाल्मिकी या कवीने परंपरागत चालत आलेल्या या रामकथेवर एक महाकाव्य लिहिले. या काव्यात त्या कालात रूढ झालेल्या अश्वमेध या सारख्या वैदिक संस्कृतीतील कर्मकांडांचा त्याने समावेश केला तसेच काही ऋषींसारख्या व्यक्तिरेखाही त्यात आणल्या (वशिष्ठ,विश्वामित्र).
5.बौद्ध धर्माच्या भारतातील र्‍हासानंतर जेंव्हा सनातन किंवा वैदिक धर्माचे हिंदू धर्म म्हणून पुनरागमन झाले तेंव्हा रामाला दैवत्व प्राप्त झाले असावे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

बाकी सर्व ठीक. पण इसपू ३०००-४०००?

हा काळ जरा अडचणीचा नाही का वाटत? त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे बघायला आवडतील.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

इ.स.पूर्व ३०००-४०००

रामकथा या कालखंडात घडली असावी असे मी म्हणतो आहे खालील आधारांवरून-
1.सीतेच्या पायातील सुवर्ण पैंजण तिला रावण पळवून नेत असताना गळून पडल्याचा उल्लेख आहे. यावरून रामकथेच्या काली सुवर्णाचा उपयोग अलंकारांसाठी केला जात होता. हा काल साधारण् Chalcolithic कालाच्या सुरूवातीचा काल् असावा.
२. राम-रावण् युद्धात् वापरलेली शस्त्रात्रे- दगड-धोंडे,उन्मळून पडलेले वृक्ष आणि धनुष्य बाण हीच आहेत.Chalcolithic काल असल्याने कदाचित बाणाची अग्रे तांबे किंवा ब्रॉन्झची असण्याची शक्यता आहे. तसा स्पष्ट उल्लेख कोठेही नाही.
3. स्वायत्त नागरी राज्ये व त्यांच्या आजूबाजूला अदिवासी राज्ये या प्रकारची राजकीय परिस्थिती Chalcolithic कालात अस्तित्वात होती हे पाकिस्तानमधील मेहरगढ संस्कृतीवरून सिद्ध झाले आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पुष्टी हवी

रामायणात उल्लेखिलेली शस्त्रे, दागिने यापैकी किती खरोखर रामकालात असतील आणि किती रामायण लिहिले त्या काळात?
म्हणजे जर रामायण लिहिले तेव्हा सोने असेल तर ते काव्यात आले असेल. त्यामुळे केवळ काव्यावरून तेव्हा सोने होते या तर्काला अधिक पुष्टी हवी असे वाटते.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

रामायण लिहिलेल्या काळातील् शस्त्रे

माझ्या विचाराप्रमाणे रामायण लिहिण्याचा काळ इ.स.पूर्व सहस्त्रकाचा मध्य आहे. या वेळेपर्यंत लोह धातूचा वापर होऊ लागला होता. वाल्मिकीने लोह शस्त्रात्रांचा उल्लेख् केलेला नसल्याने त्याने पारंपारिक चालत आलेल्या रामकथेत फारसे बदल केले नसावेत असे मला वाटते. ( वशिष्ठ्, विश्वामित्र् या सारखी काही पात्रे सोडून) त्यामुळे सुवर्ण पैंजणांचा उल्लेख पारंपारिक कथेतून आला असावा असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ओके

रामायण लिहिण्याचा काळ इसपू ४००-५०० असावा हे बर्‍यापैकी सर्वमान्य मत वाटते. वाल्मिकीने लोखंडाचा उल्लेख केला नसेल तर मग ती कथा इसपू १५०० च्या आधी घडलेली असू शकेल.ते ठीक, पण मग घोडे वगैरे? रामायणात घोड्यांचा उल्लेख आहे आणि इसपू ३०००-४००० च्या सुमारास भारतीय उपखंडात घोडे असल्याचे पुरावे नाही मिळाले अजूनतरी. तेव्हा तो एक अडचणीचा मुद्दा आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

रामकथा, यूपी, बिहार, वगैरे...

तुमच्या दुसर्‍या प्रतिसादाला खाली एक उपप्रतिसाद दिला आहे, त्यात काही मुद्दे आहेत. घोड्यांचा मुद्दा तर आहेच, शिवाय सप्तसिंधूच्या पूर्वेस संस्कृतीचे पुरावे चाल्कोलिथिक काळात सापडले आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे पेंटेड् ग्रे वेअरची संस्कृती ही सिंधू संस्कृतीच्या नंतरची आहे. मेहेरगढ वगैरे ठिकाणी तुम्ही म्हणता तसे असेलही, पण रामकथा पश्चिमेला घडली नसून पूर्वेस घडली आहे. हे मिस् मॅच् आहेच, नाही का?

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

माहितीबद्दल आभारी आहे.

'हिंदू व भारतीय' म्हणून मेंदूच्या स्मरणकोशात असलेल्या भूतकाळाच्या मोठ्या कॅनव्हासवर धार्मिक वा ऐतिहासिक विशयांच्या बॅकड्रॉपकरीता ठेवण्यासाठी व जूने अडगळ झालेले कटआउट्स काढून टाकण्यासाठी श्री. चंद्रशेखर यांनी दिलेली उत्तरे पुरेशी तर्कसुसंगत (इं.:रॅशनल) आहेत असे वाटते. तसेच हि संक्शिप्त-व-गाळीव-माहिती अनावश्यक-व-भरमसाठ-माहितीच्या-साठवणींपेक्शा जास्त सुसह्य आहे, 'एक मानव' म्हणून जगण्यास पुरेशी आहे.

ठाम मत धोक्याचे ;-)

माझ्या मते विज्ञान, इतिहास, मानववंशशास्त्र आणि इतर अनेक विषयांत ठाम मत धोक्याचे असते. अर्थात, ते तसे अनेकप्रसंगी ठेवावे लागते याची पुरेपुर कल्पना आहे.

विशेषतः मुद्दा १ बद्दल अनेक विद्वानांनी अनेक मते मांडली आहेत. त्यात दागिने, वस्त्रे यांचे संदर्भ किंवा ग्रहांची स्थिती वगैरे देऊन रामाचा काळ इ.स.पूर्व साडेसात हजार वगैरे पासून सुरु होतो पण खरेतर चर्चेचा हा मुद्दा नव्हे. राम हा महाभारत लिहिण्यापूर्वी जन्माला आला होता यात वाद नाही. तिसरा मुद्दा आणि पाचवा मुद्दाही माझ्या चर्चेलाच पुष्टी देणारा वाटला.

जर दुसरा मुद्दा खरा मानला तर रामायणात वाल्मिकीने फेरफार केले नाहीत असे म्हणता येत नाही. (तसे ते लंका प्रकरण रामायणात आल्याने हिन्दी सिरिअलसारखी रामकथा कुठेतरी भरकटत गेली असे मी नुकतेच खरडाखरडीत लिहिले होते.)

मुद्दा चार साठी मात्र मला थोडे पुरावे हवेत. इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या मध्यावर म्हणजे समजा इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास वाल्मिकी रामायण रचले असते तर ते बालकांड आणि उत्तरकांडासहित होते का? असल्यास त्यामुळेच रामाला देवत्व प्राप्त झाले असा माझा दावा आहे आणि हे देवत्व प्राप्त होण्यासाठी बौद्ध काळापर्यंत थांबणे हा फार मोठा कालखंड वाटतो.

उदा. गांधीजी महात्मा आहेत असे लोकांनी ठरवल्यावर त्यांच्या तस्विरी लगोलग सर्वत्र दिसतात. शिवाजी महाराजांची पूजा होण्यासाठी २-३०० वर्षांचा काळ पुरेसा आहे आणि तेही हे दोघे मर्त्य मानव असताना. अर्थात, या उदाहरणांचा रामाशी एकास एक चपखल संबंध लागतो असे म्हणत नाही पण दैवीकरण होण्यासाठी इतका मोठा कालखंड जावा लागत नाही.

तेव्हा वाल्मिकींनी रामायण इ.स. पूर्व ५०० मध्ये लिहिले असेल तर सहस्त्रकाच्या अंतापर्यंत त्याचा प्रसार झाला नव्हता असे म्हणावे लागेल.

रामायण्

तेव्हा वाल्मिकींनी रामायण इ.स. पूर्व ५०० मध्ये लिहिले असेल तर सहस्त्रकाच्या अंतापर्यंत त्याचा प्रसार झाला नव्हता असे म्हणावे लागेल.

अगदी बरोबर्. तो काल बौद्ध धर्माचा भारतातील सुवर्ण काल होता. त्याचप्रमाणे रामायणातली मुख्य स्टोरी सीताहरण व रामरावण युद्ध हीच आहे. बाकीच्या गोष्टी नंतर जोडलेल्या असाव्यात. माझ्या मताने उत्तरकांड तर सरळ सरळ नंतर जोडलेले दिसते. तुम्ही म्हणता तसे बालकांडही नंतरचे असू शकते.
रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असेल तेंव्हा असो. रामकथेची गोडी अवीट आहे. भारतीय मनाला भावणारा हा देव असल्याने त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्ती केली जाते.रामकथेच्या गोडीबद्दल गदिमा यांच्या गीतरामायणाची लोकप्रियता हे अगदी ताजे उदाहरण आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गडबड वाटते

तो काल बौद्ध धर्माचा भारतातील सुवर्ण काल होता. त्याचप्रमाणे रामायणातली मुख्य स्टोरी सीताहरण व रामरावण युद्ध हीच आहे. बाकीच्या गोष्टी नंतर जोडलेल्या असाव्यात. माझ्या मताने उत्तरकांड तर सरळ सरळ नंतर जोडलेले दिसते. तुम्ही म्हणता तसे बालकांडही नंतरचे असू शकते.

हा तर्क योग्य वाटत नाही. बुद्धाचा मृत्यू इ.स.पूर्व चौथ्या पाचव्या शतकात मानला तर तोपर्यंत बौद्ध धर्म प्रस्थापित नव्हता. तो प्रस्थापित झाला अशोकाच्या काळात. म्हणजे काळ पुढे सरकून इ.स.पूर्व २५० च्या सुमारास गेला. बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ हा म्हणता यावा. जर इ.स.पूर्व ५ व्या शतकात वाल्मिकींनी रामायण लिहिले असते तर ते प्रसिद्धी पावण्यासाठी २५० वर्षांचा कालावधी फार मोठा वाटतो परंतु ऐतिहासिक दाखल्यांनुसार राम ही प्रचलित देवता दिसत नाही.

चांगली चर्चा

माझे रामायणाच्या इतिहासाविषयीचे वाचन मर्यादित आहे.

अयोध्या विवादाविषयी प्रा. शेखर सोनाळकर यांचे एक पुस्तक वाचले आहे. त्यात त्यांनी इसवीसनाच्या दुसर्‍या सहस्रकाच्या मध्यापर्यंत रामाचे दैवतीकरण पूर्ण झाले असावे असे प्रतिपादन केले आहे.

रामायणाची रचना अर्वाचीन असण्याविषयी इरावती कर्वे यांनी आपल्या संस्कृती या पुस्तकात रामायण आणि महाभारत यांच्या तुलनेतून मांडले आहे.

नितिन थत्ते

तुलसीदास?

त्यांनी इसवीसनाच्या दुसर्‍या सहस्रकाच्या मध्यापर्यंत रामाचे दैवतीकरण पूर्ण झाले असावे असे प्रतिपादन केले आहे.

इसवी सनाच्या दुसर्‍या सहस्त्रकाचा मध्य म्हणजे इ.स.१५०० का? म्हणजे रामचरितमानस तुलसीदासाने प्रसिद्ध केल्यावर रामाचे दैवतीकरण पूर्ण झाले असे ते म्हणत असतील तर योग्यच आहे. रामाला आणि हनुमानाला लार्जर दॅन लाइफ बनवण्याचे सर्व श्रेय तुलसीदासाने घ्यावे. :-)

रामायणाची रचना अर्वाचीन असण्याविषयी इरावती कर्वे यांनी आपल्या संस्कृती या पुस्तकात रामायण आणि महाभारत यांच्या तुलनेतून मांडले आहे.

थत्ते, अहो गेली किती वर्षे मी तुम्हाला त्या संस्कृती पुस्तकातून थोडे उतारे द्या म्हणून सांगते आहे? ;-) असो. रामायणाची रचना (किंवा भाषा) अर्वाचीन असण्याबाबत मी आणखीही एक-दोन तज्ज्ञांचे मत वाचले होते पण ते विस्तृत नसल्याने नावे लक्षात नाहीत. संदर्भ मिळाले तर शोधते पण अर्वाचीन म्हणजे कसे हे सांगणारे मुद्दे हवेत. तुम्ही काही अधिक लिहू शकाल का?

वाल्मिकी रामायण इ.स.पूर्व ३००(?)

इरावती कर्वे संस्कृती या पुस्तकात म्हणतात त्यापैकी काही भाग माझ्या शब्दांत खाली देते.

ज्याप्रमाणे कृष्णकथा जैनांच्या धार्मिक ग्रंथाचा भाग समजली जाते, त्याप्रमाणे रामचरित्र समजले जात नाही. रामचरित्रावर जैनांनी पुष्कळ वाङ्मय लिहिलेले आहे. जैन महाराष्ट्री भाषेत विमलसूरी नावाच्या कवीचे 'पउमचरिय' नावाचे चरित्र लिहिलेले आहे. हा ग्रंथ सुमारे ख्रिस्त शतक दुसरे या काळात लिहिला असावा. विमलसूरी कथेच्या आरंभी असे सांगतो की, ही कथा आपल्याला गुरु परंपरेने प्राप्त झाली आहे. माझ्यापुढे गुरुकडून आलेली एक नामावली आहे. अशा नामावलीवरून विमलसूरीने रामचरित्र रचले असे त्याचे म्हणणे आहे. डॉ. कुलकर्ण्यांच्या* म्हणण्याप्रमाणे विमलसुरीच्या पुढे ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात रचलेले मूळ वाल्मिकी रामायण होते.

* नितिन थत्ते यांनी या काही पानांची मला ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद. डॉ. कुलकर्णी म्हणजे नेमके कोण हे कळले नाही तरी ते विषयातील तज्ज्ञ असावे असे दिसते. वाल्मिकी रामायण इ.स.पूर्व ३०० मधील कसे यावर अधिक माहिती मला येथे मिळत नाही पण असा अंदाज असावा हे या पुस्तकातून दिसून येते.

उत्तम चर्चा

हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल प्रस्तावकर्तीला धन्यवाद.
असा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यातून ठोस काहीतरी निघेल ही अपेक्षा.
माझ्या वेरूळच्या लेण्यांबद्दलच्या वरच्या प्रतिसादाला पूरक प्रकाशचित्रे -
(जालावरून साभार- अर्थात् माझ्याकडे स्वतः काढलेली आहेत. पण शोधत बसावी लगतील.)
रामायण-

शंकरगर्वहरण -

अभ्यासपूर्ण "संशयसिद्धान्त"

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हा चर्चा-लेख अभ्यासपूर्ण आहे.मांडणी यथायोग्य आहे.आवश्यक ते संदर्भही दिले आहेत. प्रतिसाद लेखाला पूरक असे आहेत.हे सर्व वाचून पुष्कळ नवी
माहिती मिळाली.ज्ञानात भर पडली."संशयसिद्धान्त" हा शब्दप्रयोग प्रथमच वाचनात आला.साजेसा प्रतिसाद देण्याइतके माझे या विषयावरील वाचन सखोल नाही.

इंग्रजी अर्थ कृपया कंसात देत जावे.

प्रस्तुत लेखात प्रियाली बाईंनी जो 'संशयकल्लोळ' माफ करा, जो 'संशयसिद्धांत' मांडलेला आहे त्याच वाचन व आकलन करण्यात आम्ही आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे. व वरील एका प्रतिसादावर आम्ही आमचा उपप्रतिसाद देवून ह्या चर्चेत सहभागी देखील झालेलो आहोत. पण श्री. यनावाला यांनी 'संशयसिद्धांत' शब्दाचा अर्थ काय? अशी विचारणा (आडवळणाने) करताच आमचे देखील कुतुहल त्याबाबत जागृत झालेले आहे. आम्ही त्या संशयित शब्दाचा अर्थ हायपोथेसिस हा इंग्रजी शब्द असा घेतला आहे. ह्या इंग्रजी शब्दासाठी मराठीत कोणीतरी च्युइंगम चघळत असताना 'अभ्युपगम' असा एक चिकट शब्द देखील सुचवलेला आहे. कृपया तुम्ही त्या शब्दाचा इंग्रजी अर्थ आम्हास सांगावे अशी विनंती आम्ही आपणांस करीत आहोत.

काळ

उपरोक्त लेख व त्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद यातून नविनमाहिती मिळाली.

5.बौद्ध धर्माच्या भारतातील र्‍हासानंतर जेंव्हा सनातन किंवा वैदिक धर्माचे हिंदू धर्म म्हणून पुनरागमन झाले तेंव्हा रामाला दैवत्व प्राप्त झाले असावे.
चन्द्रशेखर

हा मुद्दा पटण्या सारखा आहे

वाचत

वाचत आहे.
सवडीने भरही घालिन.सध्या
महाभारत हे गंगेच्या पश्चिमेकडील खोर्‍यात घडते. ह्याबद्दलः
१.आज बिहारातील राजगीर(राजगृह) हे अतिबलाढ, प्रमुख पात्र असणार्‍या जरासंधाची राजधानी म्हणून येते. त्याचे उल्लेख बघता तो भाग प्रक्षिप्त म्हणता येत नाही. त्याचा पराभव हा राजसूय यज्ञासाठी महत्वाचा मानला गेलेला आहे.राजगृह ही मदघाची राजधानी बराच काळ होती. नंद कींआ शिशुनाग घराण्ञाच्या काळात पाटालीपुत्र/पटना वसवले गेले.

२.रुक्मिणी विदर्भाची राजकन्या आहे म्हणतात.
३.द्वारका गुजरातेत आहे.
४.कर्ण दिग्विजय करुन परत् अ येतो तेव्हा मध्य भरतातील अनेक राज्ये त्याने जिंकल्याचा उल्ल्लेख् ऐकलाय्. ही राज्ये आजच्या एम् पी, छत्तीसगढ इथे येतात.

--मनोबा

जरासंध

क्षमस्व!पण प्रतिसादाचा अर्थ लागला नाही.

जरासंध वध ही महाभारतातील मोठी घटना आहे हे मान्य. त्यामुळे कोणाला जरासंधाचा अपवाद मानायचा असेल तर हरकत नाही पण जरासंधाने महाभारत घडवलेले नाही.

विदर्भ किंवा द्वारका हे दोन्ही अयोध्येच्या मानाने पश्चिमेला आहेत तसेच महाभारतातील कर्मभूमी नाहीत.

कर्ण दिग्विजय करून परत येत असता त्याने राज्ये वगैरे जिंकलीचा संदर्भ लागला नाही. तो महाभारताचा मेन प्लॉट आहे काय?

असो.

महाभारताचा विचार करता हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही दोन महत्त्वाची शहरे आहेत. कथा तेथे आकार घेते. युद्ध कुरुक्षेत्रावर घडते, ते मुख्य ठिकाण आहे. महाभारतातील प्रमुख पात्रे आहेत त्यांचा विवाह होण्यासाठी ज्या राजकन्या निवडल्या आहेत त्या वृष्णी कुळातील (कुंती), मद्र, गांधार, विदर्भ देशांतील आहेत. उलट, जेथे संबंध जोडायचे नाहीत त्या काशीवरून राजकन्या पळवून आणलेल्या आहेत कारण या राज्यांची भीती नाही. उलुपी वगैरे सारख्या स्त्रियांना तर काहीच महत्त्व नाही. यावरून पूर्वेकडे बलाढ्य नगरराज्ये त्या काळी नव्हती असे म्हणता येते असे वाटते.

अनेक मुद्दे कळले, चर्चा आवडीने वाचत आहे

अनेक मुद्दे कळले. चर्चा आवडीने वाचत आहे.

यार्दी

भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या श्री. यार्दी यांनी लिहिलेल्या ' द रामायणा : इट्स ओरिजिन ऍन्ड ग्रोथ : अ स्टॅटिस्टिकल स्टडी' पुस्तकातील माहितीवरून या चर्चेतील अनेक बाबींवर नव्याने उहापोह होऊ शकेल असे वाटते.

धन्यवाद

पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावक प्रश्न विचारतो "वाल्मिकींनी रामायण लिहिले नसते तर रामाला दैवत्व प्राप्त झाले असते का?" आणि उत्तर अर्थातच "नाही" असे देतो. वाल्मिकींच्या आधीही रामकथा एकापेक्षा अधिक आवृत्तींमध्ये प्रसिद्ध असावी परंतु चमत्कारांचे धनी, दुष्टांचा विनाशकर्ता वगैरेस सुरुवात वाल्मिकी रामायणानंतरच झाली असावी.

तुम्हालाही या पुस्तकात काही माहिती आढळल्यास या चर्चेत भर टाकावी ही विनंती.

हाण् तेच्या!!!

द रामायणा : इट्स ओरिजिन ऍन्ड ग्रोथ : अ स्टॅटिस्टिकल स्टडी'?

नक्की काय स्टॅटिस्टिकल आहे त्यात? वाचायला आवडेल.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

पुस्तक येथे मिळेल

यार्दींचे पुस्तक येथून उतरवून घेता येईल.

संख्याशास्त्रीय संकल्पना वापरून आणि रामायणाच्या लिखाणाचे तदनुसार संकलन करून यार्दी ह्यांनी असा विचार मांडला आहे की उपलब्ध रामायण पाच निरनिराळ्या लेखकांनी निरनिराळ्या काळात लिहून काढले आहे.

अवान्तर - एम.आर.यार्दी हे आयसीएस अधिकारी भारत सरकारच्या वित्तसचिवाच्या पदावरून माझ्या आठवणीप्रमाणे १९७२च्या सुमारास निवृत्त झाले आणि तदनंतर पुण्यात राहण्यास आले. निवृत्तीनंतरच्या काळातील त्यांचे हे कार्य आहे. ह्याखेरीज महाभारत आणि ज्ञानेश्वरीवरहि त्यांचे लिखाण आहे.

प्रताधिकार मुक्त नसावे

त्या पुस्तकाकडे पाहता ते प्रताधिकार मुक्त नसावे असे वाटते त्यामुळे उतरवलेले नाही.

धन्यवाद!

वाचतो आणि सांगतो. दुव्याबद्दल आभार :)

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

रामायण-महाभारत थोडेफार वाचन आहे.

नमस्कार.चर्चा आवडली,पण काही मत व्यक्त करणे धाडसाचे ठरेल,म्हणून फक्त वाचणार आहे.

वाचन आहे तर लिव्हा की वाईच

नमस्कार!
धाडस न करता कोणी कधी स्वतःचा बचाव करू शकतो का? काहि वेगळे मत असेल तर ते मांडताना धाडस करावेच लागते. तुम्ही आपले मत जरूर मांडावे, हा आग्रह मी आपणांस करीत आहे.

समारोप

चर्चत भाग घेणार्‍या आणि आपापल्या परिने चर्चेला हातभार लावणार्‍या सर्वांचे आभार मानते.

या चर्चेतून काही मुद्दे पुढे आले

१. रामाला दैवत्व बौद्ध सुवर्णकाळानंतर प्राप्त झाले असावे यावर बहुतेकांचे एकमत दिसले.
२. वाल्मिकी रामायणाच्या निर्मितीनंतर रामाचे दैवीकरण सुरु झाले असावे.
३. वाल्मिकी रामायणाचा काळ इ.स.पूर्व ५०० ते २०० दरम्यान असावा. (या मुद्द्यावर एकमत दिसले नाही म्हणून ३०० वर्षांचा मोठा काळ मांडला आहे)
४. रामाचे दैवीकरण १६ व्या शतकात पूर्णत्वाला पोहचले असावे.
५. विष्णूचे दहा अवतार ही संकल्पनाही बौद्ध काळातून उसनी घेतलेली असावी.
६. कृष्ण ऐतिहासिक काळानुसार रामापेक्षा प्राचीन देव असावा.

मतभेदाचा मुद्दा

३. वाल्मिकी रामायणाचा काळ इ.स.पूर्व ५०० ते २०० दरम्यान असावा. (या मुद्द्यावर एकमत दिसले नाही म्हणून ३०० वर्षांचा मोठा काळ मांडला आहे)

-
१. गौतम बुद्धाच्या 'दशरथ जातकात' आलेल्या रामकथेमुळे राम गोतम बुद्धाच्या आधी होऊन गेला असावा या मताला पुष्टी मिळते.(इ.स्.पू. ५०० च्या आधी.) (महाभारतापेक्षा स्वतंत्र पुरावा.)

२. प्रक्षिप्त भाग वजा केले तर मूळ वाल्मिकी रामायणात घोड्याचे उल्लेख घोड्याचा उल्लेख आढळतो का?
:: बालकांड आणि उत्तर रामायणातील अश्वमेधाची कथा नंतर चिकटवलेली आहे.

३. वाल्मिकी रामायणात लोखंड सापडते का?
::वाल्मिकी रामायणात लोहाचा उल्लेखही फार कमी वेळा येतो (आयसः).

४. रामाची कथा खूप पूर्वीपासून लोककथेने चालत आली असावी आणि वाल्मिकीने तिचे संस्कृतकरण केले असावे काय?
:: वाल्मिकी रामायणाचा काळही मुळात लोहयुगाच्या अगदी सुरुवातीचा असावा असे अनेक तज्ञांचे मत आहे. (~इ.स्.पू. १०००) अन्यथा त्याला त्यानंतरच्या सर्व संस्कृत कवींनी 'आदिकवि' म्हटले नसते.

बाकी सर्व मुद्द्यांवर सहमती आहे.

वादाचा मुद्दा ;-)

राम आणि रामायण यांची गफलत आपण अनेकदा करतो. राम बुद्धाच्या आणि कृष्णाच्या आधी होऊन गेला असे म्हटले तर गैर नाही पण म्हणून रामायणही त्याकाळी होते असा अर्थ होत नाही.

मुद्दा २ आणि ३ विषयीच चर्चेत संशयसिद्धांत आहे की उत्कृष्ट लेखकाला सद्यकाळाच्या मागे जाऊन लेखन करणे अशक्य नाही. माझ्यासारख्या सामान्य (कोणी टुकार म्हटल्यास हरकत नाही) लेखिकेलाही १९७० च्या दशकातील भारतातील कथा लिहायची झाल्यास त्यात मोबाईल फोन, कलर टिव्ही आणि होन्डासिटीचा उल्लेख नसेल. ;-) अर्थातच, हे दोन्ही मुद्दे बाद झाले असे म्हणता येत नाही.

वाल्मिकी रामायणाचा काळही मुळात लोहयुगाच्या अगदी सुरुवातीचा असावा असे अनेक तज्ञांचे मत आहे. (~इ.स्.पू. १०००) अन्यथा त्याला त्यानंतरच्या सर्व संस्कृत कवींनी 'आदिकवि' म्हटले नसते.

हा मुद्दा मात्र महत्त्वाचा वाटतो. म्हणजे वाल्मिकीला आदिकवी म्हणणे आणि आता त्या अनुषंगाने पुरावे शोधणे आले कारण वाल्मिकी रामायण इ.स.पू. १००० असेल तर त्याचा प्रसार आणि प्रचार होऊन पुढील शे दोनशे वर्षांत राम दैवत्वाला का पोहोचला नाही असा प्रश्न पडतो. :-( पण अर्थातच त्यासाठी स्वतंत्र विषय मांडावा लागेल.

शक्य आहे.

::म्हणूनच संशयसिद्धांत असे म्हटले आहे हे मी समजतो.

अर्थात् ज्याकाळी रामायण रचले गेले त्याकाळी त्यापूर्वीच्या (समजा ५०० वर्षेपूर्वी) खोल भूतकाळात नक्की काय घडले होते त्याचा संदर्भ (पुराव्यासह) स्थळ-काळ-घटना स्वरूपात मिळणे कठिण होते. आजही १८५० साली भारतात घडलेल्या घटनांबाबत एखादी कथा लिहायची तर संदर्भग्रंथ उघडून बसावे लागते. ते संदर्भ मिळाले नसते तर त्या कथेत कोळशाचे इंजिन किंवा टेलिग्राम यांचा उल्लेख (चुकीने होणे) शक्य आहे.(किंवा १९९० सालात घडलेल्या घटनेबाबत २०५० साली लिहिलेल्या एखाद्या मराठी कथेत चुकून मोबाईल टेलिफोनचा उल्लेख होणे शक्य आहे.)

त्यामुळे :

उत्कृष्ट लेखकाला सद्यकाळाच्या मागे जाऊन लेखन करणे अशक्य नाही.

हे रामायणाचा काल पाहता (आणि राम व रामायण यांच्यात गेलेला काल पाहता) कदाचित ते थोडे जास्त अवघड असेल आणि त्यावेळच्या सद्य कालाचा थोडा अंश त्यात उतरला असणे शक्य आहे.
इतकेच. इत्यलम्!

आणखी एक माहिती

पूर्ण प्रतिसाद इथे पुन्हा टंकत नाही. थोडक्यात इतकेच की 'जनमेजयाचे दानपत्र' जर खरे असेल आणि त्याचा काळ इ.स्.पू. ४५० च्याही मागचा ठरवता येत असेल तर रामाचे दैवतीकरण निदान इ.स्.पू. ४५० पर्यंत पूर्ण झाले होते असे म्हणता येईल. (पर्यायाने वाल्मिकी रामायणाला इ.स्.पू. १००० पेक्षाही मागे नेता येईल?)

थोडक्यात राम आणि कृष्ण दोन वेगवेगळ्या दिशांनी पण एकाच वेळी विष्णूरूप झाले असे काहीसे वाटते. इथे रामाला मानणार्‍या एका सम्राटाला (जनमेजयाला) कृष्णाचेही महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न सौती करत आहे असे चित्र उभे रहात आहे. राम भारताच्या दक्षिणेतला विष्णूअवतार होता आणि कृष्ण उत्तरेतला विष्णू अवतार होता असे मानता येईल काय?

असे मानता येत नाही

संपूर्ण प्रतिसाद नंतर वाचते.

राम भारताच्या दक्षिणेतला विष्णूअवतार होता आणि कृष्ण उत्तरेतला विष्णू अवतार होता असे मानता येईल काय?

असे मानण्याचे फारसे कारण दिसत नाही. उलट, कृष्णभक्ती दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे आणि रामभक्ती उत्तर भारतात असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

अयोध्या

मग अयोध्येचे काय? ती दक्षिणेतुन उत्तरेत आली असावी काय?

राम शेवाळकर

नुकतेच राम शेवाळकरांचे श्रीकृष्णावरचे व्याख्यान ऐकतोय, शेवाळकरांच्या मते श्रीराम हा श्रीकृष्णाआधी ३५ पिढ्या होता, त्यांचा श्रीराम ह्या विषयावरील अभ्यास आणि प्रेम बरेच असल्याचे दिसते, पण इथे कोणाकडे लिखित व्याख्यान असल्यास संदर्भ बघण्यास हरकत नाही.

वंशावळ

मी राम शेवाळकरांचे रामावरील व्याख्यान काही वर्षांपूर्वी इप्रसारणावर ऐकले होते. आता ते आठवणीत नाही पण राम हा संपूर्णतः मानवी होता. त्यात दैवी काही नव्हते असे मत त्यांनी मांडले होते परंतु ते व्याख्यान रामायणावर होते.

राम हा कृष्णाच्या आधी ३५ पिढ्या होता की नाही माहित नाही पण कृष्णाच्या आधी असावा यावर सध्यातरी दुमत नाही. सहज शोध घेताना ही यादी सापडली. ती स्क्रिनवर मावत नसल्याने सध्या तपासणे त्रासदायक वाटत आहे. एंजॉय!!

http://upload.wikimedia.org/wikipedia/en/b/bc/The_Genealogy_of_Bharata.png

सदर चार्टप्रमाणे रामानंतर तिसाव्या पिढीतील राजा महाभारताच्या लढाईत कौरवांकडून लढला आणि अभिमन्यूकडून मारला गेला. ३०-३५ मध्ये फारसा फरक नाही. विविध स्रोतांवरून बनवलेली मते पडताळाली तर इतका फरक तर पडायचाच. चू. भू. द्या. घ्या.

 
^ वर