ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.

टीपः: ट्रोजन् युद्धाच्या सत्यासत्यतेबद्दल चर्चा शेवटच्या लेखात केली जाणारच आहे, सध्या ग्रीक पुराणे व इतिहासकार काय म्हणतात, त्याच्या अनुषंगाने साधारण चर्चा करतोय.

बर्‍याच दिवसांपासून ही ट्रोजन युद्धाची काय भानगड आहे ते बघावे असा बेत होता. त्याआधी कम्प्युटर मध्ये एकदा ट्रोजन नामक व्हायरस घुसला असल्याने ट्रोजन हॉर्सशी चांगलाच परिचय होता. शिवाय आपले महाभारत तसे ग्रीकांचे ट्रोजन युद्ध हे माहिती होते, आणि मेगास्थेनीस सारख्या लोकांनी इलियड व महाभारत यांमधील साम्यामुळे "The Indians have their wn Iliad of 100,000 verses" असे म्हटले होते. २००५ साली आलेला ट्रॉय हा सिनेमा पहिला आणि त्याच्या प्रेमात पडलो-विशेषत: ब्रॅड पिटने साकारलेल्या अकीलीसच्या प्रेमात पडलो आणि उत्सुकता अजूनच वाढली आणि शेवटी नेटवर शोध घेता घेता हाताला लागले ते हे:

http://classics.mit.edu/Homer/iliad.html

http://classics.mit.edu/Homer/odyssey.html

कोणी सॅम्युअल बटलर नामक क्लासिसीस्टने वरिजिनल ग्रीकमधून इंग्रजीमध्ये भाषांतर केलेय. तेच वाचले आणि इतक्या गोष्टी नव्याने कळल्या काय सांगू. माहितीचा एक अपूर्व खजिना डोळ्यांसमोर आल्याचा आनंद झाला. सोबत अनेक विकी लिंक्स देखील मदतीला असल्याने काहीच अडचण आली नाही. ब्राँझयुगीन ग्रीक विश्वाचे पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहण्यासाठी या सर्व दुव्यांची खूप मदत झाली. आता स्टेप बाय स्टेप बघू कि हे युद्ध कसे झाले-म्हणजे इलियड , ओडिसी वगैरे साधनांत त्याचे वर्णन कसे आहे ते आणि त्याची थोडी कारणमीमांसा.

तर त्यावेळच्या ग्रीसची कल्पना यावी म्हणून हा नकाशा बघा खाली. सगळे मिळून वट्टात पश्चिम महाराष्ट्राएवढाच-(कदाचित अजून थोडासाच जास्त) हा भूभाग आहे-अगदी टीचभर.पण या टीचभर भागात राहणाऱ्या ग्रीक लोकांनी अशा काही खतरनाक काड्या केल्या की त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले.

मोठा नकाशा येथे पहावा.

काळ आहे साधारण १२०० -१३०० ख्रिस्तपूर्व. अक्ख्या ग्रीस मध्ये ग्रीक भाषिक लोकांची संस्कृती दृढमूल झालेली असून त्यांची खंडीभर नगरराज्ये तयार झालेली होती. काही राज्ये सध्याच्या तुर्कीच्या पश्चिम किनाऱ्यावरदेखील होती. महाभारतकालीन भारताप्रमाणेच एका संस्कृतीची परंतु एका राजाच्या अमलाखाली नसलेली ही अनेक राज्ये पाहता त्यांमध्ये सत्तासंघर्ष होणार हे तर अपरिहार्य होतेच. त्यात मायसिनीचे राज्य सगळ्यात शक्तिशाली होते-त्याच्या राजाचे नाव अ‍ॅगॅमेम्नॉन. त्याचा सख्खा भाऊ मेनेलॉस हा स्पार्टाचा राजा होता. बाकीची सर्व राज्ये मायसिनीचे स्वामित्व मान्य करीत. जो दर्जा पश्चिमेकडे ग्रीस मध्ये मायसिनीला होता, तोच दर्जा पूर्वेकडे ट्रॉयला होता-त्याच्या राजाचे नाव प्रिआम. आता स्पार्टा व ट्रॉय यांच्या वाटाघाटी सुरु असताना ट्रॉयचा धाकटा राजपुत्र पॅरिस आणि स्पार्टाची राणी हेलेन हे दोघे ट्रॉयला पळाले. आपल्या बायकोला परत आणावे आणि पॅरिसला ठार मारावे म्हणून मेनेलॉस अडून बसला होता, तर वहिनीच्या मिषाने ट्रॉयवर कब्जा करत येईल म्हणून अ‍ॅगॅमेम्नॉनने सर्व ग्रीसमधील फौजा जमवून ट्रॉयवर स्वारी केली आणि ट्रोजन युद्ध सुरु झाले जे तब्बल १० वर्षे चालले.

उपलब्ध माहितीच्या आधारे विश्वसनीय वाटण्यासारखी ट्रोजन युद्धाची ही कारणमीमांसा आहे. पण ग्रीक पुराणे याबद्दल असे बोलत नाहीत. आपल्याकडेदेखील पुराणे असोत व रामायण-महाभारत, सगळीकडे कुठल्यातरी देवाचा कसातरी हस्तक्षेप असतोच. त्याचप्रमाणे ग्रीक पुराणांत देखील "झ्युसचा कोप" असेच कारण दिले आहे. शिवाय प्रसंगवशात अनेक देविदेवता काड्या करायला मध्ये येतात ते वेगळेच. आता इलियडची मजा अशी आहे की युद्धाच्या पार्श्वभूमीबद्दल आणि पहिल्या ९ वर्षांबद्दल त्यात काहीच उल्लेख नाही. सर्व साधने शेवटच्या १० व्या वर्षावारच फोकस करतात. त्यामुळे आधीची माहिती विखुरलेली आणि त्रोटक आहे. पण विकिवर जी माहिती दिलीय तीदेखील एकदम रोचक आहे.

महाभारतात प्रत्येक व्यक्तीची एक जन्मकथा आहे आणि प्रत्येक घटनेमागे प्रचंड मोठी कार्यकारणसाखळी आहे. तसेच इथेही. आता होमर म्हणजे ग्रीकांचा व्यास म्हटला जातो, त्यामुळे त्यांच्यासारखेच लांबड त्यानेपण नको का लावायला? मग त्यानेपण मस्त लांबड लावले. पॅरिस हेलेनला घेऊन पळाला. पण का पळाला? तर त्यामागे देवीने दिलेले वरदान आहे. ट्रॉयच्या विनाशाला पॅरिस कारणीभूत होईल, अशी भविष्यवाणी वर्तविल्यामुळे पॅरिस राजकुटुंबापासून दूरवर एक मेंढपाळ म्हणून जगत होता. इकडे अकीलीसच्या आई-वडिलांचा विवाहसमारंभ ऐन रंगात आला होता. त्याची आई थेतिस ही एक अप्सरा होती तर बाप पेलीअस हा मर्त्य मानव होता. या अप्सरेने हा मर्त्य मानवच का निवडला, याची कहाणीपण मजेशीर आहे. या थेतीसवर सर्व देव लाईन मारत असत. पण एक भविष्यवाणी अशी होती, की थेतीस पासून जो मुलगा होईल, तो त्याच्या बापापेक्षा शक्तिशाली होईल. आता ग्रीक देवांत बाप आणि मुलाचे कधीच पटत नसे-मुलगा बहुतेक वेळेस बापाला ठार मारत असे किंवा त्याचा पराभव तरी करत असे. त्यामुळे इतकी हॉट अप्सरा असूनदेखील तिचा कुणाला उपयोग नव्हता-मग झ्यूस वगैरे देवांनी मिळून तिला कोणी मर्त्य मानवांपैकी नवरा मिळवून देण्याचे जुगाड केले आणि तिचे पेलीअस बरोबर लग्न लावून दिले. तर या लग्नाला सर्व देव हजर होते-फक्त एक भांडणाचा देव "एरिस" सोडून. म्हणजे त्याला तिकडे प्रवेश नव्हता-दारावरच त्याला "हर्मेस" नामक दुसऱ्या देवाने अडवले. त्यामुळे एरिस चिडला, आणि त्याने त्याच्या हातातले एक सोन्याचे सफरचंद बाहेरूनच आत फेकले. त्यावर लिहिले होते की "हे सफरचंद सर्वांत सुंदर स्त्रीसाठी आहे". आता ते सफरचंद पाहिल्याबरोबर तीन मुख्य ग्रीक देवी- हेरा(स्त्रियांची मुख्य देवी), अथीना(कायदा, राजकारण, बुद्धी, इ.इ. सर्व गोष्टींची देवी) आणि आफ्रोडायटी(प्रेमाची देवी) यांच्यात झगडा सुरु झाला- तू भारी की मी भारी? आता आधीच हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा,, त्यातून त्या स्त्रिया देवी, मग या झगड्याचा निकाल लागणे अवघडच होते. पण (सुदैवाने)शेवटी असे ठरले, की पॅरिसच याचा निवडा करेल. मग त्या दैवी सुंदऱ्या गेल्या, इडा नामक झऱ्यात आंघोळ केली आणि पॅरिससमोर नग्न उभ्या राहिल्या. त्याची बिचाऱ्याची ततपप झाली नसती तरच नवल. साधासुधा मेंढपाळ तो, जास्तीतजास्त एखादी गांव की गोरी बघण्याची त्याला सवय. इथे तर प्रत्यक्ष देवी-(त्यापण १ नाही, ३)-त्यासमोर उभ्या होत्या. त्यांनी त्याला विचारले, "बोल , आमच्यापैकी सर्वांत सुंदर कोण आहे?" नुसता बघतच राहिला असेल तो, निर्णय कसला घेतोय? त्याची ती अवस्था बघून प्रत्येक देवीने त्याला आमिषे दाखवली. हेरा म्हणाली, "मी तुला सर्व युरोप आणि आशियाचे राज्य देते", अथीनाने त्याला लढाईतील कौशल्य आणि इतर गोष्टी ऑफर केल्या, तर कामदेवी आफ्रोडायटीने त्याला आमिष दाखवले, "तू मला मत दिलेस तर जगातील सर्वांत सुंदर स्त्री तुझ्यावर प्रेम करेल". भाई पाघळले आणि आफ्रोडायटीला मत दिले. त्यामुळे हेलेनचे पॅरिसवर प्रेम बसले. ही झाली पौराणिक मीमांसा. अगदी महाभारत साच्यातील आहे की नाही?

आता युद्ध करायचे निश्चित झाले म्हटल्यावर मायसिनिहून फतवा निघाला आर्मीसाठी. ट्रॉयसारखा प्रबळ शत्रू असता कोण लढावे उगीच म्हणून बरेच लोक लढण्यास नाखूष होते. त्यात ओडीसिअस हा मुख्य होता. त्याला पक्के माहिती होते, की साली ही मोहीम लै वेळखाऊ असणारे. त्यामुळे जेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनचे लोक आले, तेव्हा त्याने वेड्याचे सोंग घेतले, शेतात धान्याऐवजी मीठ पेरू लागला. पण त्याचा हा कावा पालामिदेस नावाच्या एका सरदाराने ओळखला आणि ओडीसिअस चा नवजात मुलगा तेलेमॅखोसला त्याने बैलांच्या पुढे टाकले. जर ओडीसिअस खराखुरा वेडा झाला असता तर त्याने त्या बाळावरदेखील बैल नेले असते-पण तो थांबला आणि तेव्हा कळले की तो नाटक करतोय ते. तेव्हा त्याला बरोबर घेतले गेले. अकिलीसची रिक्रूटमेंटदेखील अशीच इंटरेस्टिंग आहे. ओडीसिअस हा बाकीच्या लोकांबरोबर अकीलीसाच्या शोधार्थ हिंडत होता. तेव्हा कळले की तो स्कीरोस नामक एका बेटात आहे. त्याची आई थेतीसने त्याला तिथे लपवून ठेवले होते. असामान्य योद्धा म्हणून अकिलीसची ख्याती सर्वांना माहिती होती आणि आज न उद्या अ‍ॅगॅमेम्नॉनचे बोलावणे त्याला येणार हे थेतीस जाणून होती, (स्टिक्स नामक नदीत तिने त्याचे शरीर बुडविले अशी दंतकथादेखील आहेच) त्यामुळे तिने त्याला स्कीरोस बेटात लपवून ठेवले होते. तिथल्या राजकन्येपासून(तिचे नाव= देईदिमिया ) त्याला निओटॉलेमस नावाचा पुत्रदेखील झाला होता. तर यथावकाश ओडीसिअस आणि बाकीचे लोक त्या दरबारात आले. आता अकिलीस तिथेच वेषांतर करून बसला होता, मग त्याला ओळखावे कसे? तर २ कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे राजकन्येसाठी काही डाग-दागिन्यांचे प्रदर्शन भरविले गेले आणि ओडीसिअसने मुद्दाम त्यात एके ठिकाणी ढाल-तलवार ठेवली होती. स्त्रीवेशातील अकिलीस तिथे आला आणि बाकीच्या बायका दागिने पाहत होत्या त्याऐवजी शस्त्रांकडे एकटक पाहत बसला, त्यावरून तो अकिलीस हे लक्षात आले. दुसऱ्या कथेनुसार हल्लेखोर आल्याची सूचना देणारे शिंग वाजवले गेले, तेव्हा सगळीकडे पळापळ सुरु झाली, पण अकिलीसने मात्र जवळचा भाला घेतला, तेव्हा तो अकिलीस हे लक्षात आले. अशाप्रकारे अकिलीसपण आपल्या सिलेक्ट सेनेसहित जॉईन झाला.

आता ग्रीक सेनेचा आकार बघू. इलियड च्या दुसऱ्या "बुकात" दिल्याप्रमाणे टोटल ११८६ जहाजे होती. आणि १४२,३२० लोक होते. यांमधील मुख्य लोक कोण कोण होते ते जरा संक्षेपाने बघू:

१. मायसिनीचा अ‍ॅगॅमेम्नॉन- १०० जहाजे. हा पूर्ण मोहिमेचा नेता होता, भालाफेकीत कुशल. हेकेखोर आणि निश्चयी. (त्याच्या नावाची व्युत्पत्तिदेखील तशीच आहे असे म्हणतात)
२. स्पार्टाचा मेनेलॉस- ६० जहाजे. अ‍ॅगॅमेम्नॉनचा सख्खा भाऊ.
३. पायलॉसचा नेस्टॉर- ९० जहाजे. हा सर्वांत ज्येष्ठ योद्धा होता, "सेव्हन व्हर्सेस थिब्स" या लढाईमध्ये त्याने मोठे नाव गाजवले होते. समतोल आणि उपयुक्त सल्ले देण्यासाठी फेमस.
४.अर्गोलीस चा डायोमीड- ८० जहाजे. हा एक तरणाबांड, पराक्रमी गडी होता.
५. सलामीस चा अजॅक्स(ग्रेटर/थोरला अजॅक्स)- १२ जहाजे,अकीलीसचा सख्खा चुलत भाऊ, एकदम सांड, एकंदर वर्णन महाभारतातील भीमाप्रमाणे. अजून एक अजॅक्स होता, कन्फ्युजन नको म्हणून अजॅक्स द ग्रेटर आणि अजॅक्स द लेसर असा शब्दप्रयोग केला जातो. हा लेसर/धाकटा अजॅक्स पण अतिशय चपळ होता.
६. क्रीटचा इडोमेनिअस- ८० जहाजे, लाकडी घोड्यात जे लोक बसले आणि ट्रॉयवर स्वारी केली, त्यांतील मुख्य लोकांपैकी एक.
७. इथाकाचा ओडीसिअस- १२ जहाजे. कुशल योद्धा आणि अतिशय बेरकी. कुठल्याही स्थितीतून मार्ग काढावा तर यानेच. लाकडी घोड्याची आयडिया याचीच. कृष्णाच्या जवळपास जाणारे वर्णन. आधीपासून त्याची जायची इच्छाच नव्हती. त्याचा खोटा वेडेपणा ज्याने उघडकीस आणला, त्या पालामिदेसला नंतर त्याने कपटाने ठार मारले. ओडिसी हे होमरचे दुसरे महाकाव्य त्याच्यावरच आधारित आहे.
८.अकिलीस-५० जहाजे. ग्रीसमधील सर्वश्रेष्ठ योद्धा, अतिशय चपळ. तो आणि त्याचे "मोर्मिडन" नावाचे खुंखार सैनिक अख्ख्या ग्रीस मध्ये फेमस होते. ते मुंग्यांपासून जन्मले अशी आख्यायिका आहे. अकीलीसचा आजा एईकसच्या वेळी एकदा लै मोठा दुष्काळ पडला होता, इतका की प्रजाच नष्ट झाली होती जवळपास, मग त्याने झ्यूसची प्रार्थना केली, आणि झ्युसने मग वारुळातील मुंग्यांपासून या लोकांची उत्पत्ती केली अशी ती कथा आहे.

या तुलनेत ट्रोजन लोकांकडे हेक्टर व सार्पेडन हे भारीतला दोनच योद्धे होते. अर्थात ट्रॉयच्या भुईकोटावर सर्व ट्रोजनांची खूप भिस्त होती.असो.

तर असे हे खासे सरदार आणि सैनिक घेऊन अ‍ॅगॅमेम्नॉन निघाला. नकाशात दाखविलेल्या आव्लीस नामक बंदरात थांबला, अपोलो देवाला बैल व बकऱ्यांचा बळी अर्पण करून जहाजे ट्रॉयच्या वाटेने निघाली. पण वाटेत पुन्हा अनेक वादळे आली आणि बरेच लोक भरकटले- तब्बल ८ वर्षे!!! नंतर परत ८ वर्षांनी सर्वजण आव्लीस बंदरात जमले. आणि इथे एक घटना घडली जिचा पुढे दूरगामी परिणाम होणार होता. अ‍ॅगॅमेम्नॉनला प्रिय हरिणाची शिकार केल्याबद्दल हर्मिस देवतेने कठोर शिक्षा दिली आणि त्यामुळे असे वादळ आले, असे ग्रीकांचा मुख्य भटजी काल्खस म्हणाला. मग यावर उपाय म्हणून चक्क अ‍ॅगॅमेम्नॉनच्या मुलीचा बळी द्यावा अशी मागणी आली!! स्वाभाविकच अ‍ॅगॅमेम्नॉनने नकार दिला. पण इतरांनी मोहीम सोडून देण्याची धमकी दिली, तेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनपुढे दुसरा मार्ग उरला नाही. त्याची मुलगी इफिजेनिया तेव्हा वयाने फार काही नव्हतीच. पण तिला आव्लीसला बोलवावे तरी कोणत्या मिषाने? शेवटी तिला सांगण्यात आले, की तिचे अकीलीसबरोबर लग्न लावण्यात येणार आहे. ती बिचारी हुरळून गेली आणि तिला शेवटी ठार मारण्यात आले. त्यामुळे अ‍ॅगॅमेम्नॉनची बायको क्लितिमेस्त्रा हिचा प्रचंड तळतळाट झाला आणि तिने ट्रोजन युद्ध झाल्यावर अ‍ॅगॅमेम्नॉनला ठार मारले- त्या पूर्ण घटनाक्रमावर आधारित orestesiya म्हणून एक नाटकत्रयी Aeschylus या प्रसिद्ध नाटककाराने लिहिलेली खूप प्रसिद्ध आहे.

तर शेवटी एकदाचे ग्रीक सैन्य ट्रॉयला पोचले- त्यांनी त्याला तब्बल ९ वर्षे वेढा घातला. इथेपण भविष्यवाणी होती, की ट्रॉयच्या किनाऱ्यावर पाय ठेवणारा पहिला ग्रीक माणूस जिवंत परत जाऊ शकणार नाही. त्यामुळे लोक तिथे उतरायला घाबरत होते. पण भाई ओडीसिअसने त्यातून परत शक्कल काढली-त्याने जहाजातून ढाल फेकली आणि तिच्यावरच उडी मारली-आहे की नाही आयडिया? ते बघून काही ग्रीकांनी आंधळेपणाने उड्या मारल्या, त्यातला पहिला मग यथावकाश मेला

तर सर्वांना एकत्र करून निघाल्यापासून ८+ युद्धाची ९= तब्बल १७ वर्षे झाली होती. या ९ वर्षांत अकिलीस आणि "थोरल्या" अजॅक्सने लै युद्धे केली. अकिलीसने तर ११ बेटे आणि १२ शहरे ग्रीकांच्या ताब्यात आणली. आणि निर्णायक युद्ध करण्यासाठीची मोठी आर्मी युद्धाच्या १०व्या वर्षातच एकत्र केली गेली. घरी जायच्या इच्छेने कंटाळलेल्या आणि उठाव करू पाहणाऱ्या ग्रीकांना त्यानेच ताब्यात ठेवले होते. प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या(Thucydies ) मते इतका वेळ लागण्याचे कारण म्हणजे पैसा व इतर गोष्टींचा अभाव. ते काही असो, इतकी वर्षे लागली, हे तर नक्कीच.

युद्धाच्या १०व्या वर्षी ग्रीक सैन्यात मोठा प्लेग आला. आणि तिथून अशा काही वेगाने घडामोडी घडल्या की ज्याचे नाव ते. होमरचे प्रसिद्ध इलियड हे महाकाव्य त्या १०व्य वर्षातील घटनांभोवतीच फिरते. त्याचे नाव इलियड आहे , कारण होमर ट्रॉयला ट्रॉय न म्हणता इलीयम म्हणतो, त्यामुळे इलीयमवरचे काव्य ते इलियड असा त्या नावाचा इतिहास आहे. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे ग्रीक लोकांना ग्रीक असे म्हटलेच नाही कधीही. हेलेन्स, एखीअन्स, आर्गाइव्हज इ.इ. अनेक नावानी होमर ग्रीकांना संबोधतो. ज्याप्रमाणे महाभारतात भारतीय वगैरे न म्हणता गांधार, कुरु, पांचाल, यादव, इ. म्हटले आहे तसेच.

(क्रमश:)

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली सुरुवात

चांगला विषय लेखासाठी निवडला आहे. उपक्रमावर लिखाणासाठी धन्यवाद. लेख वाचायला सुरुवात केली आहे, काही सुधारणा दाखवून देते.

मेगास्थेनीस सारख्या लोकांनी इलियड व महाभारत यांमधील साम्यामुळे "The Indians have their wn Iliad of 100,000 verses" असे म्हटले होते.

The Indians possess an Iliad of 100000 verses हे वाक्य नक्की मेगॅस्थेनीसचे नाही. असे म्हणणारा ग्रीक तत्वज्ञानी कोणी वेगळा असून मेगॅस्थेनिसच्या नंतरचा आहे. असो. सदर व्यक्तीबद्दल मला फारशी माहित नाही परंतु वाक्य मेगॅस्थेनिसचे नव्हे हे नक्की माहित होते म्हणून शोध घेतला.

अद्याप वाचते आहे.

गडबडीत संदर्भ पाहणे राहून गेले.

आळसाबद्दल दिलगिरी आणि चूक दाखविल्याबद्दल आभार :)

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

प्लेग आणि सायप्रिया - अशीच एक माहितीची देवाणघेवाण

सायप्रिया (प्रिआ असे न म्हणता मुद्दाम प्रिया म्हणते ;-)) हे आणखी एक ग्रीक महाकाव्य. हे काव्य इलिअडचे "प्रीक्वेल" (मराठी?) मानले जाते, तरीही त्याची रचना ही इलियडनंतर; इलियडला पूरक म्हणून झाली असावी असेही म्हटले जाते. (वाक्य अधोरेखित करण्याचे कारण या वाक्याचा उपयोग या लेखाबाहेर नंतर कोठेतरी मला करायचा आहे. तूर्तास अधोरेखनाचा संबंध या लेखाशी नाही.)

युद्धाच्या १०व्या वर्षी ग्रीक सैन्यात मोठा प्लेग आला. आणि तिथून अशा काही वेगाने घडामोडी घडल्या की ज्याचे नाव ते.

या प्लेगने सायप्रियाचा अंत होतो आणि बहुधा इलियडची सुरुवात. या प्लेगचे कारण असे होते -

ऍगमेम्नॉने क्रायसिइस या मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने आपली दासी बनवले होते. या मुलीचे वडिल अपोलो या देवाचे पुजारी होते. हा देव वैद्यकशास्त्राचा देव असला तरी तो कोपिष्ट झाल्यावर वेगवेगळे प्लेगही आणतो असे मानले जाते. त्यांनी आपल्या मुलीची मागणी ऍगमेम्नॉनकडे केली आणि अर्थातच त्याने ती नाकारली. याचा बदला म्हणून ग्रीक सैन्यावर प्लेग धाडण्यात आला आणि ऍगमेम्नॉनला ही मुलगी ओडायसिसच्या ताब्यात देऊन परत करण्यावाचून गत्यंतर उरले नाही पण त्याची हाव सुटली नव्हती.

अशीच एक मुलगी ब्राइसिस ही अकिलिजच्या ताब्यात होती. तिच्यावर ऍगमेम्नॉनचाही डोळा होता. क्रायसिइस हातातून गेल्यावर त्याने ते नुकसान ब्रायसिसला आपल्याकडे धाडून दिल्याने भरून निघेल असे अकिलिजला सुचवले आणि अकिलिजचा जो संताप झाला की त्याने युद्धातून आपले अंग काढून घेतले.*

मला वाटतं इलियडची सुरुवात या प्लेग आणि अकिलिजच्या संतापानेच होते. चू. भू. द्या. घ्या.

* आहे ना आणखी एक साम्य महाभारताशी. महाभारतातही कर्णाने रागवून बहुधा पहिले १०-११ दिवस युद्धात भाग घेतला नव्हता.

पुढे हे येणारच आहे :)

सायप्रियाबद्दल नाही वाचले, माहितीकरिता धन्यवाद.

>>मला वाटतं इलियडची सुरुवात या प्लेग आणि अकिलिजच्या संतापानेच होते. चू. भू. द्या. घ्या.

बरोबर. त्यानेच इलियडची सुरुवात होते, पुढच्या भागात ते येणारच आहे :) बाकी कर्णाशी साम्य आहे ते मुख्यत्वेकरून घटोत्कच प्रकरणापुरते.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

झक्कास.

पुढल्या भागांच्या प्रतिक्षेत.
अजिबात न पकवता लिहिल्यानं एकूणातच अगदि सह्हि लिहिलय म्हणूनच अगदि क्लिक झालं. ;)

एलियडची तुलना महाभारताशी नाही तर रामायणाशी केलेली मी ऐकली आहे.

एका राजाची पत्नी दुसर्‍या कुणासोबत तरी पळून् जाते, ज्याच्यासोबत जाते तो एका बेटावरचा राजा वगैरे अशी काहिशी तुलना होती.
मागे आंतरजालावरच एकदा चंद्रशेखर ह्यांचा एक लेख होता, ट्रॉय् जिथेझोते असे मानले तिथे निष्काळजीपणानं केलेल्या खोदकामातून इतिहासाच्या ठेव्याचं
कसं कायमचं वाट्टोळं झालं ते त्यात् लिहिलं होतं.
एकावर एक असे सात थर असणारी ती जागा तुर्कस्थानच्या जवळच होती.
अत्यंत रोचक असा "ट्रॉय - सा रम्या नगरी आणि तिची कहाणी - " ही लेखमालिकाच जालावर http://diwali.upakram.org/node/147
http://diwali.upakram.org/node/148
http://diwali.upakram.org/node/149
इथे पहायला मिळेल.

--मनोबा
--मनोबा

रामायण-इलियड हे वाचा

आमच्या शरदकाकांचा जुना लेख (आणि जुन्या मारामार्‍या) आठवला.

कर्ण आणि अकिलीज साम्य

कर्ण आणि अकिलीज यांच्यात तंतोतंत साम्य नाही हे बरोबर पण महाकाव्यांत साम्याचे मुद्दे यायचेच इतकी इलियड, महाभारत आणि रामायणाची व्याप्ती इतकी आहे त्यामुळे माणूस कळत-नकळत साम्य शोधतो आणि सहज साम्य मिळूनही जाते.

कर्ण आणि अकिलीज यांतील साम्यांचे मुद्दे असे -

१. दोघांचा जन्म मानवी आणि अमानवी पालकांकडून झाला आहे. (अमानवी= देव, अप्सरा, इ.)
२. दोघांकडे मृत्यूपासून वाचण्यासाठी काही साधने/ शक्ती आहेत.
३. दोघांनाही ऐनवेळेस या शक्ती कामास येत नाहीत.
४. दोघांचा मृत्यू हा बाणाने (धनुष्यबाण) होतो.
५. दोघे रागाने युद्धापासून दूर बसण्याचा निर्णय घेतात.
६. दुर्योधन आणि कर्ण तसेच अकिलीज आणि पेट्रॉक्लस यांची मैत्री अबाध्य असते.

अर्थातच, यातून या दोन्ही व्यक्ती सारख्याच असे अजिबात म्हणायचे नाही. काढायचे झाल्यास अकिलीज आणि अर्जुन अशी साम्येही काढता येतीलच.

घटोत्कचाच्या कथेतील साम्य कोणते?

हां हे मान्य :)

कर्ण-अकिलीस साम्याचे मुद्दे एकदम मान्य, घटोत्कचाचा मुद्दा इथे लागू होत नाही असे मला ता परत विचार केल्यावर आढळले. सुरुवातीला अर्जुन-अकिलीस अशी जोडी लावणार होतो, पण पुरेशी साम्यस्थळे तेव्हा तरी आढळली नाहीत.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

छान आणि भरपूर

लेख छान आहे. माहिती भरपूर आहे. सुबत्ता आणि संपन्नता असणारे देश सहसा काड्या करणारे (आक्रमण करणारे) नसतात. ह्याउलट स्पार्टासारखे देश. लगेच स्पार्टन लाइफस्टाइल आठवली. असो. तूर्तास घाईत एवढेच. उपक्रमावर स्वागत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मजा येणार आहे

लेखमालिका वाचताना मजा येणार आहे. धन्यवाद.

संपादकांना विनंती : नकाशाचे चित्र लहान केले, तर लेखाची रुंदी पटलावर मावेल. वाचायला सोपे होईल. वाटल्यास मोठ्या नकाशाचा दुवा देता येईल.

अरे वा

होमर नामक आंधळ्या कवीच्या इलियड आणि ओडिसी या महाकाव्यांची नावे ऐकलेली होती आणि ट्रॉय नावाचा सिनेमा बर्‍याचदा पाहिला होता. पण त्यामागे असलेला हा इतका इतिहास(?) माहित नव्हता. हे सारे खरोखरीच घडले आहे काय? हाच प्रश्न सतावतो आहे. (शेवटच्या लेखाच्या प्रतीक्षेत...)
आणि पुढे - वाल्मिकीच्या रामायणाबद्दल या अनुषंगाने काय म्हणता येईल? (याचे उत्तर इतर सदस्यांनी आणि वेगळ्या लेखाच्या रूपाने दिले तरी स्वागत.)

 
^ वर