यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?

मानवाची प्रगती साधारणतः चाकाच्या शोधापासून सुरु झाली. माणसाने दगडी हत्यारे बनवली, आग निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली, तो शेती करू लागला, घरे बांधून राहू लागला. ओबडधोबड औजारे, साधी आयुधे, प्राथमिक स्वरुपाची यंत्रे, अत्याधुनिक अजस्त्र यंत्रे, संगणक, महाजाल अशी विस्मयकारक प्रगती मानवाने केली. मानव प्रगत बनलाय आणि वरचेवर अधिकाधिक प्रगत बनत चाललाय!

मानवाने केवळ यंत्र-तंत्र-उपयोजन यांच क्षेत्रांत प्रगती केली आहे असे नव्हे. कला, साहित्य, संस्कृती, भाषा, गणित, सामाजिक शास्त्रे, कायदे, नीतीतत्व, धर्म, अर्थ, तत्वज्ञान याही क्षेत्रांत मानवाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. महाभारतकालीन मानवाच्या तुलनेत आजचा मानव अधिक बुद्धिमान (नीतिमान नव्हे?) झालेला नाही का?

तथापि; यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?

उकडण्यापासून बचाव करण्यासाठी आपण हातपंखा, विद्युतपंखा, कूलर, एसी अशी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांची कातडी, पांघरून, उबदार कपडे, रूमहीटर (मराठी?) अशी प्रगती केली आहे; पण बदलत्या तापमानाशी जुळवून घेण्याची क्षमता (वाढविणे तर दूरच उलट) गमावली आहे. (महाराष्ट्रात मे-जून महिन्यांत दुपारी दोन वाजता भारनियमनाचा अनुभव घेऊन बघा!)
३०-४० वर्षांपूर्वी माणसे पाच-दहा किमी सहज पायी जायची, आज अर्धा-एक किमी जाण्यासाठी वाहन लागतं!

स्मरणशक्ती वगळता मानवाची मानसिक क्षमता खूपच प्रगत झाली आहे पण शारीरिक क्षमता मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे.

यंत्राचा उपयोग न करता, माणूस- ५० किलोऐवजी १००० किलो ओझे उचलू लागला, ताशी सहा किमी ऐवजी १२ किंवा १२० किमी चालू/ धावू लागला, हाकेच्या अंतराच्याऐवजी शे-दोनशे किमी वरचे आवाज ऐकू लागला किंवा तिथपर्यंत पोहचवू लागला, दूरवर असलेल्या आप्त-संबंधीयांशी (उदा. टेलीपथीद्वारे) संपर्क साधू लागला, तिथले पाहू लागला, गहू-तांदुळाऐवजी लाकूड-प्लायवूड पचवू लागला! तर प्रगती म्हणता येईल. थोडक्यात, मानवाच्या नैसर्गिक शारीरिक-मानसिक क्षमतांचा परीघ वाढला तरच ती खरी प्रगती म्हणावी. अन्यथा यंत्रे अधिकाधिक प्रगत होत आहेत, आणि मानव मात्र अधिकाधिक मागास होत चाललाय असेच म्हणावे लागेल!

यंत्रांची प्रगती म्हणजे मानवाची प्रगती नव्हे, खरंतर ती अधोगतीच होय हे यावरून लक्षात येईल.

या पार्श्वभूमीवर मला:

  1. यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?
  2. "मानवाची प्रगती झाली आहे/ होत आहे" असे खऱ्या अर्थाने केंव्हा म्हणता येईल?
  3. यंत्र-तंत्र-उपयोजन यांची प्रगती म्हणजेच मानवी क्षमतांची प्रगती
  4. उदा. अधिकाधिक मेगपिक्सेलचा कॅमेरा, टीवी, विद्युत प्रकाशदिवे म्हणजे डोळ्यांची प्रगती
  5. प्रगत दूरध्वनी म्हणजे कानांची/ तोंडाची प्रगती
  6. अती प्रगत सेन्सर्स संवेदक (sensors) म्हणजे मानवी ज्ञानेंद्रियांची प्रगती
  7. अत्याधुनिक संगणक म्हणजे मानवी प्रज्ञेची प्रगती
  8. वरील ३ ते ७ मुद्दे मानवी प्रगतीबद्धलचे गैरसमज नव्हेत का?:
  9. मानवाच्या खऱ्या प्रगतीकडे आपल्याला वाटचाल सुरु करता येईल का?
  10. अशी प्रगती आवश्यक आहे का?
  11. या वाटचालीचा मार्ग कोणता? उदा. शारीरिक-मानसिक क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविणे
  12. हे कसे सध्या करता येईल?
  13. यातून होणारे फायदे-तोटे

या आणि इतर अनुषांगिक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

नारायण धारपांचे साठे फायकस आणि फ्रेड हॉईल यांचे ब्लॅक क्लाउड ही पुस्तके वाचून ही कल्पना माझ्या मनात उत्पन्न झाली.

उपक्रमवर लिहिण्यात मी पाहिलटकरीण (पुल्लिंगी?) आहे. लिखाणात चुका असतील तरीही अर्थ समजून घ्यावा ही विनंती. भाषा अधिक अर्थवाही होण्यासाठी संपादकीय संस्कारांना माझी हरकत नाही.

Comments

आधी समस्या/ गरज त्यानंतर शोध, त्यानंतर सोयी सुविधा

प्रश्न 1. यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?
उत्तर 1. : तसे नसते तर तुम्ही टंकलेला हा लेख, व त्यातून तुमच्या व्यक्त झालेल्या विचारांशी आमची भेट देखील झाली नसती.


प्रश्न 2. "मानवाची प्रगती झाली आहे/ होत आहे" असे खऱ्या अर्थाने केंव्हा म्हणता येईल?

उत्तर 2: मानव जात ज्या दिवशी पूर्णत्वास जाईल त्या दिवशी ती नश्ट होईल, व कोणतातरी नवा जीव, नव्या गुण-दोशांसह जन्माला येईल.


प्रश्न 3: यंत्र-तंत्र-उपयोजन यांची प्रगती म्हणजेच मानवी क्षमतांची प्रगती अशी प्रगती आवश्यक आहे का?

उत्तर 3: सुख वा दु:ख केवळ माणसालाच बोचत असते. प्राण्यांना/ जनावरांना दूरचे ऐकायला येते, दूरवरचा वास घेता येतो त्याबाबत ते सुखी वा दु:खी आहेत कां? त्यांना त्यांच्या भाशेत विचारता आले तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

प्रश्न 4 : या वाटचालीचा मार्ग कोणता? उदा. शारीरिक-मानसिक क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविणे हे कसे सध्या करता येईल? यातून होणारे फायदे-तोटे

उत्तर 4 : शारिरीक वा मानसिक क्शमता वाढवायची पण कशासाठी?
'समस्या आधी जन्म घेते, त्यावरील उपाय, तोडगे त्यानंतर उत्पन्न होतात. ते उत्पन्न होत असताना ते काहीतरी त्रूटी घेवून जन्म घेतात. त्या त्रूटी नव्या समस्यांना जन्म देतात.... इथूनच विकास, प्रगती होते.
मागे पाहता येत नसते, पहायचे नसते. पहायचे असेलच तर समस्येवर तोडगा शोधण्यासाठी. रडण्यासाठी, हळहळण्यासाठी मागे वळून पाहू नये, कोणाचा तरी द्वेश मनात रुजवण्यासाठी तर नक्कीच नाही.

व्यक्ती व समुह हे दोन वेगवेगळ्या व परस्पर भिन्न गोश्टी आहेत. दोनही स्तरावरील भौतिक प्रगती व आध्यात्मिक उन्नती एकसाथ व्हाव्यात अशी अपेक्शा धरली तर भविश्यातील समस्या त्याहूनही गंभीर व भयानक असतील.

आपल्याला नेहमी नाण्याची एक बाजू कल्पिता येते, दुसरी बाजू त्याच्या नेमकी विपरीत असू शकते, म्हणजे अकल्पनीय असू शकते.

भाषा अधिक अर्थवाही होण्यासाठी संपादकीय संस्कारांना माझी हरकत नाही.
- हे लाड केवळ मनोगतवर, तेथील एकाच कंसातल्या दोन्ही सरांकडून पूरवले जातात.

यंत्राधीन

मला चर्चा आवडली. वेगळ्या विषयावर आहे आणि मला चर्चाविषय थोडाफार पटला आहे. पराधीन यंत्राधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे आजच्या जगात सत्य असले तरीही यंत्रांची प्रगती ही माणसाची प्रगती नाही असे सर्वसाधारण विधान मी करू शकत नाही. परंतु यंत्राधीन झाल्याने मनुष्य आपले अंगीभूत गुण गमावून बसेल ही भीती थोडीफार सत्य आहे.

३०-४० वर्षांपूर्वी माणसे पाच-दहा किमी सहज पायी जायची, आज अर्धा-एक किमी जाण्यासाठी वाहन लागतं!

नाही हं! अर्धा एक किमी जाण्यासाठी वाहन लागतं आणि पाच-दहा किमी चालायचं असेल तर ट्रेडमिल लागतं. :-)

1.यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?

अर्थात, प्रगती आहेच.

2."मानवाची प्रगती झाली आहे/ होत आहे" असे खऱ्या अर्थाने केंव्हा म्हणता येईल?

यंत्र मानवनिर्मित असल्याने, त्यांच्या निर्मितीने मनुष्याचे जीवन सुखावह झाल्याने, जीवनमान वाढल्याने मानवाची प्रगती झाली असे म्हणता येईल.

3. यंत्र-तंत्र-उपयोजन यांची प्रगती म्हणजेच मानवी क्षमतांची प्रगती

असे म्हणता येत नाही. मला घरच्यांचे फोन नंबर माहित नाहीत. म्हणजे ते माझ्या लक्षात नाहीत. स्मार्टफोनमुळे लक्षात ठेवावे लागत नाही.

4.उदा. अधिकाधिक मेगपिक्सेलचा कॅमेरा, टीवी, विद्युत प्रकाशदिवे म्हणजे डोळ्यांची प्रगती
5.प्रगत दूरध्वनी म्हणजे कानांची/ तोंडाची प्रगती
6.अती प्रगत सेन्सर्स संवेदक (sensors) म्हणजे मानवी ज्ञानेंद्रियांची प्रगती
7.अत्याधुनिक संगणक म्हणजे मानवी प्रज्ञेची प्रगती
8.वरील ३ ते ७ मुद्दे मानवी प्रगतीबद्धलचे गैरसमज नव्हेत का?:

असणे शक्य आहे आणि नसणेही.

9.मानवाच्या खऱ्या प्रगतीकडे आपल्याला वाटचाल सुरु करता येईल का?
10.अशी प्रगती आवश्यक आहे का?
11.या वाटचालीचा मार्ग कोणता? उदा. शारीरिक-मानसिक क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविणे
12.हे कसे सध्या करता येईल?
13.यातून होणारे फायदे-तोटे

यंत्राधीन न होता किंवा यंत्राधीन नसलेल्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढवणे/ वाढलेल्या असणे शक्य आहे परंतु तसे केल्याने फायदा होईलच असे सांगता येत नाही. किंबहुना, अशी क्षमता वाढवून नेमके काय साधायचे आहे हे ही सांगता येत नाही. तरीही, ज्या वेगाने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील प्रगती गेल्या १५-२० वर्षांत झाली आहे ते पाहता मनुष्य यंत्राधीन झाला आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये.

माणसाची क्षपता

11.या वाटचालीचा मार्ग कोणता? उदा. शारीरिक-मानसिक क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविणे
12.हे कसे सध्या करता येईल?
तर भावांनो
वरील मुद्द्यांना अनुसरुन तुम्हाला सांगण्यासारखं काही आहे
मी शेती करतो(स्वत:कसतो)गेली 11वर्षे मी नित्यनेमाने सकाळी उठल्यावर 1 ते दिड लिटर पाणी पितो.9 वर्षे झाली मी साधी डोकेदुखी वरची गोळी घेतलेली नाही. बाकीचे आजार तर दुरच रोज 6ते7 कि.मी.चालतो.अर्धा कि.मी अनवाणी चालतो.

असहमत

मानवाच्या शारीरिक/बौद्धिक क्षमता विकसित झाल्या नाहीत याबाबत असहमत.

- मी वयाच्या दहाव्या वर्षापासून चष्मा लावतो. कोट्यवधी लोक लावतात. जेव्हा चष्म्यांचा शोध लागला नव्हता तेव्हा माझ्यासारखे लोक अधू डोळ्याने कसेबसे जगायचे. मी चष्माधीन आयुष्य जगतो असं म्हणाल की माझी शारीरिक कमतरता तंत्रज्ञानाने भरून निघाली असं म्हणाल?
- एकोणिसाव्या शतकापूर्वी काही अब्ज मानव जन्माला आले. त्याकाळी विविध रोगांच्या लशी नसल्यामुळे त्यातले सत्तर टक्के पंचविशीच्या आतच मेले. कित्येक पोलिओग्रस्त होते. कित्येकांना देवीच्या रोगाने ग्रासलं. आता हे रोग पूर्णपणे कह्यात आले आहेत. आणि मनुष्यप्राण्याचं अपेक्षित आयुर्मान सत्तरीच्या आसपास गेलेलं आहे. आयुष्य दुप्पट होणं - खरं तर जाणतं आयुष्य चौपट होणं याला तुम्ही विकास नाही म्हणणार का?
- ऑलिम्पिकचे रेकॉर्ड्स बघितले तर सर्वच क्षेत्रात मनुष्याच्या शारीरिक क्षमता वाढलेल्या दिसतात. हा विकासच झाला की.
- पंधराव्या/सोळाव्या शतकात सर्वच समाजांत खुनांचं प्रमाण आजच्या सुमारे पंधरापट होतं. आज आपण तितके रक्तपिपासू राहिलेलो नाही. हा बौद्धिक विकास नाही का?

अरेरे, तंत्रज्ञानाच्या अधीन झालो! वगैरे म्हणायला छान वाटतं. पण इथे लेखन करणाऱ्या प्रत्येकाला जंगलात रहायला जाऊन आदीम आयुष्य जगत आपल्या मुलांनाही त्या तंत्रज्ञानाच्या जोखडातून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किती लोक तयार होतील असं वाटतं? का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अं?

आपण यंत्राधीन होतो आहोत असे मान्य करणे म्हणजे त्यावर उपाय म्हणून आपल्या मुलांसकट जंगलात जाऊन आदीम आयुष्य जगणे का? काही परस्परसंबंध लागत नाही. वादासाठी टोक गाठायचे इतकाच अर्थ लागतो. किंबहुना, यंत्राधीनता टाळता येण्यासाठी उलटे जगणे सुरू करावे असा पोरकट सूर कोणीच लावल्याचे दिसले नाही या चर्चेत! तर मग ते टोक कशाला गाठायचे? ते न गाठताही चर्चा करता येईल की.

अन्यथा, आपल्या मुलांनी यंत्राधीन (म्हणजे चष्म्यासारखी उपयुक्त यंत्रे नाहीत किंवा इतर वैद्यकीय यंत्रेही नाहीत) होऊ नये म्हणून त्यांचे टीव्ही पाहणे, विडिओ गेम्सच्या मागे जाणारा त्यांचा वेळ कमी करवणारे, विविध गॅजेट्स त्यांच्या हाती न देता त्यांना इतर कामांत, खेळांत रमवणारे अनेक पालक असावेत.

मध्यंतरी काही लेख येथे वाचले होते. त्या लेखांशीही माझी सरसकट सहमती नाही, या लेखाशीही नाही आणि जंगलात जाण्याशीही नाही.

र्‍हेटॉरिकल

जंगलात जाण्याबाबतचा प्रश्न ऱ्हेटॉरिकल होता. बहुतेक लोक जंगलात जाण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या सुविधा स्वीकारतात कारण त्यांचा फायदा होतो, हेच ठळक करायचं होतं. 'जंगलात जाणं' हे टोक आवडत नसेल तर त्या जागी 'तंत्रज्ञानाच्या कमी सुविधा वापरून जगण्याऐवजी' असं वाचावं, मथितार्थात काहीही फरक पडत नाही. मला जे सांगायचं आहे ते कोल्हटकरांनी अधिक चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे.

आपल्या मुलांनी यंत्राधीन (म्हणजे चष्म्यासारखी उपयुक्त यंत्रे नाहीत किंवा इतर वैद्यकीय यंत्रेही नाहीत) होऊ नये म्हणून त्यांचे टीव्ही पाहणे, विडिओ गेम्सच्या मागे जाणारा त्यांचा वेळ कमी करवणारे, विविध गॅजेट्स त्यांच्या हाती न देता त्यांना इतर कामांत, खेळांत रमवणारे अनेक पालक असावेत.

याचा तंत्रज्ञानाशी काय संबंध? जेव्हा टीव्ही वगैरे नव्हते त्यावेळीही गोट्या खेळणे, पत्ते खेळणे यात जाणारा मुलांचा वेळ कमी करवणारे, विविध टाइमपासचे उद्योग त्यांच्या हाती न देता त्यांना इतर कामांत, मैदानी खेळांत रमवणारे अनेक पालक असावेत.

अरे हो, आणि आजकाल जवळपास सगळी मुलं शाळेत जातात हे सांगायचं राहिलंच. भारतात पन्नास वर्षांपूर्वी ती गुरं राखायला जायची, शेतात राबायची किंवा उंडारायची. आधुनिक शिक्षणव्यवस्था ही नवीन तंत्रज्ञानातून बांधलेली एक क्लिष्ट यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या आपण आधीन असतो की तिचा आपल्याला फायदा होतो?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

फरक

याचा तंत्रज्ञानाशी काय संबंध? जेव्हा टीव्ही वगैरे नव्हते त्यावेळीही गोट्या खेळणे, पत्ते खेळणे यात जाणारा मुलांचा वेळ कमी करवणारे, विविध टाइमपासचे उद्योग त्यांच्या हाती न देता त्यांना इतर कामांत, मैदानी खेळांत रमवणारे अनेक पालक असावेत.

फरक असा की गोट्या आणि पत्ते खेळणे ही बहुधा एक फेज असे. अनेकांबाबत ती ओसरते. तसेच त्यासाठी संवगड्यांची गरज लागे. मुलगा गोट्या खेळतो आणि बाबाही गोट्या खेळतात असे चित्र दिसत नाही पण मुलगा आयपॅड घेऊन एका कोपर्‍यात आणि बाबा आयपॅड घेऊन दुसर्‍या कोपर्‍यात असे चित्र दिसत असावे. टीव्हीपासून आयपॅडपर्यंत गोष्टींच्या अधीन झालेल्या मुलांचा एकलकोंडेपणा वाढत आहे ही बाब नाकरता येण्याजोगी नाही. तंत्रज्ञानाच्या नवनवीन उपकरणांमध्ये लहान-मोठे गुंतत चालल्याचे चित्र दिसते.

अरे हो, आणि आजकाल जवळपास सगळी मुलं शाळेत जातात हे सांगायचं राहिलंच. भारतात पन्नास वर्षांपूर्वी ती गुरं राखायला जायची, शेतात राबायची किंवा उंडारायची. आधुनिक शिक्षणव्यवस्था ही नवीन तंत्रज्ञानातून बांधलेली एक क्लिष्ट यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या आपण आधीन असतो की तिचा आपल्याला फायदा होतो?

अरेच्चा! शेतात राबणे किंवा गुरे राखणे यासाठी तंत्र नसते असे म्हणायचे आहे का? चर्चा तंत्रज्ञानाच्या अधीन झाल्याने काही नुकसान होते का यावर आहे असे वाटते. सरसकट तंत्रज्ञान वाईट आहे यावर नसावी. असो.

प्रगती कुणाची

येथे स्वागत.

चर्चा विषयात थोडी गल्लत जाणवली.

यंत्रांमुळे मानवी शरीराच्या क्षमतेचा र्‍हास होतो असे काहीसे प्रतिपादन लेखात आहे. काही बाबतीत हे खरे असणार. मात्र मांडणी अशी केली आहे की "यंत्रांमुळे रुंदावलेली ज्ञान, विज्ञान आणि कलांची कक्षा ही खरी प्रगती नाही तर अधोगती आहे" असे म्हटल्यासारखे वाटते.

जिवंत आणि मृत व्यक्तिंची तुलना सहज शक्य नाही. पूर्वकाळातील भीम, तानाजी, हर्क्युलिस इत्यादी बलदंड सत्य/मिथ्य व्यक्ति आजच्या टायसन इत्यादिकांपेक्षा जास्त बलदंड आहेत का? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. अगदी क्रिकेट मधील ब्रॅ़डमन, सचिन तुलना (आणि तत्सम तुलना) उजव्या डाव्यापर्यंत पोचणे कठीण. तेव्हा मानवी क्षमतांचा र्‍हास होत आहे हे म्हणणे चुकीचे ठरू शकेल. मानववंश शास्त्राप्रमाणे मानवाची शारिरीक क्षमता वाढली आहे.

यंत्राच्या सोयींमुळे क्षमतांचा र्‍हास होऊ शकतो. मात्र क्षमता वाढवणार्‍या यंत्रांमुळे फायदाही होतो. (ट्रेडमिलचे उदाहरण आले आहेच.) व्यायामशाळेतील आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने योग, मल्लखांब, जोर बैठकांच्या पेक्षा जास्त क्षमता येऊ शकते. असेच बुद्धिमत्ता विकास, कलागुण विकास अशा बाबतीत घडू शकते.

प्रमोद

शरीराची व्याख्या

व्याख्येशिवाय चर्चा निरर्थक असते. एक्स्टेंडेड फीनोटाईप (विस्तारित शरीर?) या (येथेही डॉकिन्सच!) संकल्पनेनुसार सुगरणीचा खोपा, गोगलगाईचा शंख, हे शरीराचेच फुटवे असतात. त्याचप्रमाणे चष्मा, वाहने, दूरसंपर्क (याला दूरसंचार का म्हणतात?) साधने हेही अवयवच मानावे.
ऑलिंपिकमधील विक्रम, मानववंशशास्त्राचा अभ्यास, यांच्या आधारे वरील प्रतिसादांमध्ये असे दाखविण्यात आलेले आहे की मानवाची शारिरीक प्रगतीसुद्धा झालेली आहे. अजून एक शक्य उदाहरण म्हणजे, मेंदूचा आकार मोठा असल्यास बाळ जन्मताना दगावण्याची शक्यता अधिक असते; सिझरियन शस्त्रक्रियेच्या उपलब्धतेमुळे कदाचित मेंदूच्या वाढीवरील बंधन सुटून मानवाच्या बुद्धिमत्तेत पुन्हा वाढ होऊ शकेल.

प्रगती

भौतिक प्रगती बरीच झाली आहे. मानवाचा डावा मेंदू प्रगत झाला आहे. उजवा मेंदू वापरण्याची क्षमता कमी होत चालली आहे. ( मेंदूचे खरेच असे उजवे डावे आहे का, हा वेगळा विषय आहे पण एकंदरीत तर्कावर आधारीत हुशारीचा विकास झाला आहे, तर कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, निर्माणकौशल्य इ इ. कमी होत चालले आहे)
शारिरीक प्रगतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. म्हणजे पूर्वी सगळ्यांचीच शारिरिक क्षमता जास्त होती, आता काही कमी लोकांची आहे, बर्‍याच लोकांची नाही.
भावनिक आणि सामाजिक प्रगती तर खुंटलेली आहे. आजकालचा माणूस यंत्रामध्ये, कामामध्ये इतका गुरफटला आहे कि त्याच्या कुटुंबाला वेळ द्यायलाही त्याला सवड नाही, समाजासाठी तर दूरच. माणूस माणसांपेक्षा भौतिक गोष्टींवर जास्त प्रेम करू लागला आहे.

हीच खरी प्रगती का?
काही थोड्या गोष्टीत हो, बर्‍याच बाबतीत नाही.

उपाय काय?
व्यक्तीसापेक्ष-
साधी राहणी, यंत्रांचा कमीत कमी वापर, वेळेचा योग्य वापर
मानसिकतेत बदल- स्वतःच्या सर्व क्षमतांचा विकास घडवून आणण्याची इच्छा.
पैसाधिष्टीत आणि स्वकेंद्रीत जीवनपध्दतीचा त्याग
समाजसापेक्ष-
शिक्षण पध्दतीमध्ये बदल
सर्वांच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा सहज भागल्या पाहिजेत, इथपर्यंत तरी विकास
समाजाने खेळ, कला यांनाही महत्व द्यावे
कुटुंब व्यवस्था बळकट करणे, पुन्हा एकत्र कुटुंबपध्दतीकडे वळणे

-१

पुढील विधानावर् असहमती.
एकंदरीत तर्कावर आधारीत हुशारीचा विकास झाला आहे, तर कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, निर्माणकौशल्य इ इ. कमी होत चालले आहे
कह्रच असं होतय्? मागील् कित्येक दशके,शतकेच नव्हे तर सहस्त्रके मानव प्रबोधनपूर्व काळात फक्त फतेच ते बायबल्,महाभारत, रामायण् अ व् इतर स्थानिक कथा पुन्हा पुन्हा घोटून त्यात आपली कला सादर करी.
चित्रकला काय अन् इतर उपाख्याने काय सर्वच काही धार्मिक ग्रंथांच्या आहारी गेले होते.
मात्र मागील काही शतकात कुठलाही धार्मिक पगडा नसलेले असे खूप काही साहित्य प्रसवले गेले. अगदिअ डॉन क्विझोट,गलिव्हर ट्रॅव्हल्स पासून ते हॉलीवूडमधील उत्तमोतम,तरल चित्रपट व काही मोजके भारतीय चित्रपट.

अगदि कुठलाही ऍनिमेशनपट पहा(finding nimo,ice age व इतर बरेच) . कधीही न पाहिलेल्या दुनियेबद्दल्ची कल्पना, रचना,सृजन थक्क करुन सोडते.
शतकभराहून थोडेसेच जुने असलेले ऍलिस इन वंडरलँड तर भारतीय संस्कृतीचे पश्चिमेत पोचलेले समर्थक स्वामी विवेकानंद ह्यांनाही भुरळ पाडून् गेले.

हे सर्व झाले कलाकृतींबद्दल्,कल्पनाशक्तीबद्दल . मनात येइल तसे उतरवले आहे. यादी करायचीच झाली तर अगणित् लांब होइल.

दुसरी गोष्ट म्हणजे निर्माणकौशल्य. जगभरात उलट मी म्हणतो की नको तेवढे वास्तू निर्माण होते आहे. दुबई,क्वालालंपूर,ऑस्ट्रेलियाचे ऑपेरा हाउस , न्यू यॉर्क व इतर समृद्ध ठिकाणी गगनचुंबी इमारती, अफाट वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स ह्याचे डोळे दिपावेत इतके प्रदर्शन् सुरु आहे. म्हणजे निर्मानकौशल्य आहेच.

आता शेवटचा मुद्दा स्मरणशक्ती. ह्यावर मी वाद घालू इच्छितो. आशा आहे वाद सकारात्मक होइल.
पूर्वीच्या लोकांची चांगली स्मरणशक्ती होती व आता ती कमी होते आहे ह्या अर्थाने आपले विधान् घेत आहे.
माझी शंका:- पूर्वी किती टक्के लोक शिकायचे? त्यातल्या किती जणांची कामचलाउ स्मरणशक्ती असे व किती जण खरोखरीचे अभ्यस्त, दीर्घ स्मरणशक्ती असणारे असत? पूर्वी फा॑रशा तांत्रिक युगात न राहिलेल्या सर्वच व्यक्ती टिळक्,विवेकानंद, ह्यांच्याइतक्या अभ्यस्त व अफाट स्मरनशक्तीअलंकृत होत्या काय? त्यांची टक्केवारी आता कमी होते आहे काय?

--मनोबा

अभिव्यक्तीसाठी बाह्यसाधनांची गरज

पूर्वीच्या लोकांची चांगली स्मरणशक्ती होती व आता ती कमी होते आहे ह्या अर्थाने आपले विधान घेत आहे.

(बहुधा स्मरणशक्ती नसावी पण) पूर्वीच्या लोकांच्या तुलनेत आताच्या लोकांची आकलनशक्ती, विचारशक्ती, स्वज्ञान, नवनिर्माण करण्याची क्षमता खचितच वाढलीय, परंतु या सगळ्या क्षमतांच्या अभिव्यक्तीसाठी बाह्यसाधनांची अधिकाधिक गरज भासू लागलीय असे वाटते.

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

काही मुद्दे

१) आधुनिक काळात जे सगळे निर्माण झाले त्यात यंत्रांचा सहभाग जास्त आहे आणि माणसाचा कमी (नगण्य म्हटले तरी चालेल). आजकालच्या आणि पूर्वीच्या कुठल्याही संगीतकाराला, दिग्दर्शकाला विचारले तर तो हेच म्हणेल. म्हणजे यंत्रांच्या वापरण्यामुळे माणसाच्या निर्माणकौशल्याचा कस तर लागत नाहीच, शिवाय निर्मितीचा आनंदसुध्दा मिळत नाही.

२) अभिजात कलाकृती प्रत्येक काळात होत्या आणि असणारच. (अगदी कालिदासापासून ते ताजमहाल, सिनेमे, वंडरलैंड पर्यंत) आजच्या काळातली अभिजात कलाकृती घेतली तरी असे दिसून येईल की ती तशी झाली याचे कारण त्यातला माणसांचा सहभाग जास्त आणि यंत्रांचा सहभाग कमी होता म्हणून तशी झाली.

३) रोजच्या आयुष्यात जास्तीत जास्त सर्वसामान्य लोक जे गुण वापरतात (निर्माणकौशल्य आणि कल्पनाशक्ती इ.) ते लक्षात घेतले पाहिजेत, फक्त काही लोकांनी निर्माण केलेल्या गोष्टी नव्हे.
रोज बहुसंख्य लोक जे कौशल्य वापरतात तेच पुढच्या पिढीकडे सुपूर्त होत असते.

४) स्मरणशक्ती- पूर्वी ज्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हते त्यांच्याकडे सुध्दा हा गुण जास्त होता. लोकांना अनेक भाषा अवगत होत्या. कित्येक मोठे साहित्य मुखोद्गत होते. सध्याच्या काळात लिहीता वाचता येत असूनही लोकांना एकही भाषा धड येत नाही, पाठांतर करायची गरज नाही असे वाटते, त्यामुळे विचार यंत्रांमध्येच राहतात, माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीयेत.

५) पूर्वीच्या काळी लोकांची शारिरिक क्षमता जास्त होती कारण ते तिचा वापर करायचे. आता वापरच कमी झालाय, त्यामुळे अजूनच आजार वाढत चालले आहेत. (पूर्वी जास्त करून लोक विषाणूजन्य आजाराने मरायचे, आता विषाणूंच्या लसी आहेत, पण लोक डायबेटीस आणि ब्लडप्रेशर, ह्र्दयविकार इ. ने आजारी आहेत... हेच ते यंत्रांचे दुष्परिणाम.

"प्र"गती म्हणजे "इच्छित दिशेने गती" असे आहे काय?

"प्र"गती म्हणजे "इच्छित दिशेने गती" असे आहे काय?

जरी ही व्याख्या असली, तरी तिथेसुद्धा "कोणाची इच्छा?" हा प्रश्न उद्भवतो.

साधारणपणे वयाची ३५-४० वर्षे झालेल्या व्यक्तींच्या इच्छेपेक्षा वेगळ्या दिशेला समाज बदलत असतो. २०-३५ वर्षांच्या व्यक्तींच्या इच्छेच्या साधारण दिशेने समाज बदलत असतो.

असो. वरील लेखनात "प्रगती झाली की नाही" हा विचार करण्याची कालमर्यादा काय आहे? १००० वर्षे किंवा अधिक अशी असेल, तर राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद पूर्णपणे लागू आहे. जर १० वर्षे ही कालमर्यादा असेल, तर प्रश्नांची उत्तरे मोघमच असू शकतील. काही तंत्रे मानवाला त्रासदायक - आयुष्यमान आणि शारिरिक-मानसिक समाधान कमी करणारी - अशी असतील. काही तंत्रे त्याउलट असतील.

- - -
मागे कुठल्याशा सायन्स फिक्शन रम्यकथेत एक गमतीदार प्रसंग वाचला होता. त्यातील नायक लढाईत शूर, शक्तिशाली वगैरे असल्याचे वर्णन होते. पण एका यंत्र-मागास ग्रहावर पोचल्यावर त्याची तारांबळ उडाली : एक मोठा जिन्याच्या पायथ्याशी तो उभा राहिला, तर जिना अपोआप वरती जाईचना! मग पायांच्या स्नायूंच्या बळाने वर चढता-चढता त्याची दमछाक झाली. त्याने स्नायू कमावून बळकट केले होते खरे : पण हे स्नायू कधीच वापरले नव्हते!
- - -
क्रोकोडाइल डंडी या चित्रपटात असाच काहीसा प्रश्न लालित्याने हाताळला आहे. न्यू यॉर्क मध्ये वाढलेली शहरी नायिका ऑस्ट्रेलियामधील निर्जन प्रदेशात जाते, तर तिच्या जिवावर बेतते. त्या ठिकाणचा तिचा गाईड न्यू यॉर्कला येतो, तर सुरुवातीला बावचळतो, पण त्याचे फारसे काही बिघडत नाही. मला वाटते, की यापैकी पहिला भाग खराच आहे, पण दुसरा भाग थोडासा कल्पनारम्य आहे. शहरात आल्यावर आयुष्याचे मातेरे झालेल्या, मृत्यू पावलेल्या, ग्रामीण लोकांच्या खर्‍या कथा आपण सर्वांनी ऐकल्याच आहेत.
- - -

किंचित फरक

डंडी हा तिथेही "सामान्य" नसतोच. मगरींशी कुस्ती खेळणारा डंडी त्या रानटी भागातही प्रसिद्धच असतो. न्यु यॉर्क मध्ये आल्यावरही तो अचाट गोष्टीच करतो. (मगरींशी कुस्ती खेळणार्‍याला चाकूचा धाक दाखवून लूटणार्‍याची काय् भिती वगैरे.)

-Nile

;)

मी सकाळी 'टुथब्रश', 'रेझर' आदींच्या मदतीने शुचिर्भूत होऊन ऑफीसला जायला तयार होतो.
'वाटी-ताट-चमचा' आदी उपकरणे वापरून मी 'प्रेशर कुकर' मधे शिजलेले चवदार अन्न खातो व सोबर 'रेडीयो' वर आवडती गीते आनंदाने ऐकतो
कपडे, बुट वगैरेंमुळे माझे थंडी-उन वगैरेंपासून संरक्षण तर होतेच, त्यातील प्रगतीमुळे मी आदीमानवापेक्षा सध्याच्या समाजातील इतर मानवांसारखा-इतपत नीटनेटका दिसू लागतो. 'बस' मधून ऑफीसला येतो, 'लिफ्ट'ने कितीतरी मजले काहि सेकंदात वर जातो, संगणकासमोर बसतो आणि चर्चाविषय वाचतो "यंत्र-तंत्र-उपयोजन इ मधील प्रगती ही खरंच प्रगती आहे का?"
त्याला कीबोर्डने टाईपतो "अगदी बरोबर आहे.. नुसते यंत्रच प्रगती करताहेत अशाने माणूस आदीमानवापेक्षा मागासलेला होईल"

;)

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

यंत्रांवरचे अवलंबित्व कमी कमी करत

यंत्रांवरचे अवलंबित्व कमी कमी करत प्रगत होता येईल का असे मला विचारायचे आहे. म्हणजे वाहनांशिवाय प्रवास, संगणकाशिवाय माहितीची साठवणूक आणि तिच्यावर प्रक्रिया किंवा फोनशिवाय दूरसम्भाषण (टेलीपथी?) इ.

पण असे करत गेल्यावर शेवटी माणसाला काम काय उरेल असाही प्रश्न आहेच. कारण आज बहुधा ९०% माणसांची कामे ही कुठल्या ना कुठल्या यंत्रांच्या निर्मिती, maintenance(मराठी?), सुधारणा इ. अशीच आहेत.

म्हणजे, जर जगातले सगळेच लोक सद्गुणी झाले तर पोलीस, वकील, न्यायाधीश, पत्रकार! अशा लोकांची पोटे कशी भरतील?

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

गरज ही शोधाची जननी आहे

यंत्राचा उपयोग न करता, माणूस- ५० किलोऐवजी १००० किलो ओझे उचलू लागला, ताशी सहा किमी ऐवजी १२ किंवा १२० किमी चालू/ धावू लागला, हाकेच्या अंतराच्याऐवजी शे-दोनशे किमी वरचे आवाज ऐकू लागला किंवा तिथपर्यंत पोहचवू लागला, दूरवर असलेल्या आप्त-संबंधीयांशी (उदा. टेलीपथीद्वारे) संपर्क साधू लागला, तिथले पाहू लागला, गहू-तांदुळाऐवजी लाकूड-प्लायवूड पचवू लागला! तर प्रगती म्हणता येईल. थोडक्यात, मानवाच्या नैसर्गिक शारीरिक-मानसिक क्षमतांचा परीघ वाढला तरच ती खरी प्रगती म्हणावी. अन्यथा यंत्रे अधिकाधिक प्रगत होत आहेत, आणि मानव मात्र अधिकाधिक मागास होत चाललाय असेच म्हणावे लागेल!

वरील उतार्‍यात 'प्रगती' हा शब्द 'उत्क्रांती' ऐवजी/सारखा वापरला गेलेला दिसतो.

गरज ही उत्क्रांतीचीही जननी आहे.

कुत्र्याचे कान अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सी ऐकण्यास सक्षम असे विकसित झालेत. ते का? कुत्रीदेखिल वटवाघुळांप्रमाणे अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीचा आवाज काढून रडार सारखे काम का करू शकत नाहीत? त्यांची वास घेण्याची व त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता प्रचंड असते. पण दृष्टी तितकी प्रगत नसते. ती का? माणसाइतके रंग ओळखण्याची क्षमता का नसते? इ. इ.

तोंडातून आवाज काढताच झडप घालून फन्ना उडवील असा शत्रू मानव जातीस कदाचित उत्पन्न झाला असता, तर एकादेवेळी टेलिपथीने बोलणे उत्क्रांत झाले असते. देहबोली वाचण्याचा प्रयत्नच आपण सोडून दिलेला आहे. पण गरज म्हणून मूकबधीर 'साईन लँग्वेज' वापरतात. अन् देहबोलीतून आपण अजाणता अनेक गोष्टी 'कम्युनिकेट' करीतच असतो.

यंत्रांच्या मदतीने, उत्क्रांत होण्यास लागणारे हजारो पिढ्यांचे अंतर 'शॉर्ट कट' मारून माणूस पार करतो आहे. प्रत्येक कानाला मोबाईल आहे. कालांतराने कदाचित नॅनो-मायक्रोफोन्स गळ्यात नॅनोस्पीकर्स् कानात येतील, जणु शरीराची 'एक्स्टेन्शन्स्' म्हणून. एक प्रकारची दूरवाणीच होऊ शकेल ती. किंवा आज टाईप करण्याचा कंटाळा म्हणून व्हॉइस कमांड्स येत आहेत, तसे डायरेक्ट् मेंदूतून विचारांचा पॅटर्न् घेऊन तो ट्रान्समिट करण्याची सुविधा येईल्? जणू टेलिपथीच?

शरीराचे अवयवच 'सुपरमॅन' सारखे बलदंड व्हावेत, व एक्सरे व्हिजन असावी असा हट्ट् का? आहेत ते अवयव आज दुरुस्त / रिप्लेस करण्यास सुरुवात झालेली आहेच. उदा. खराब झालेले नेत्रभिंग बदलून कृत्रीम बसविणे. उद्या कदाचित ते बसवतांना 'टेलिस्कोपिक' किंवा 'फोटोसन'चेही येईल? would that not be enhancement of vision itself??

कदाचित एक काळ असा येईल, की संपूर्ण शरीरच 'रिप्लेस' केले जाऊ शकेल? हा विज्ञानकथेचा कल्पनाविलास असो, किंवा सत्यस्थिती. आजच्या घडीला शरीरातील बरेच अवयव रिपेअर (कृत्रीम स्पेअरपार्ट् वापरून : जसे अँजिओप्लास्टी स्टेन्ट्,)वा पूर्णतः रिप्लेस (धातूचे सांधे इ.) होत आहेत, हे सत्य आहे. क्लोनिंगने बायोलॉजिकल स्पेअर्स् बनविणे शक्य आहे. कदाचित ते पार्ट्स् जनुकिय बदलांनी अधिक सक्षम करून वापरले जातील? : उदा. नॉन्-स्टिक तव्यासारख्या नो-प्लाक् करोनरी आर्टेरिज् असलेले हृदय!

तर एकंदर विचार करता, अधिकाधिक सक्षम व उत्तम यंत्रे बनविण्याची, व ती यंत्रे वापरण्याची क्षमता ही मानवाची प्रगतीच आहे असे मला वाटते.

कथा आणि लेखमाला आठवली

देशमुखसाहेब, आपण प्रस्तावित केलेली असलेली इथली पहिलीच चर्चा वेधक आहे. मागे घासकडवी यांनी येथेच लिहीलेल्या जनुकीय उत्क्रांतीवरील लेखमालेप्रमाणे -
"डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीवादात याच गुणधर्म बदलण्याच्या प्रक्रियेची परिणती प्राण्यांच्या शरीर रचनेच्या बदलात कशी व्यक्त होते व त्यापासून नवीन जाती कशा निर्माण होतात याचं वर्णन आहे. डार्विन नंतर उत्क्रांतीवादाची क्षितिजं खूप विस्तारली - नकाशा अधिक स्पष्ट झाला, गाडीची रचना काय असावी हे जास्त स्पष्ट झालं तरी मूळ गाभा तोच आहे, इंजिन तेच आहे, प्रक्रिया तीच आहे. पुनरुत्पादन करणारा समुदाय आपल्या अंगचे गुणधर्म पुढच्या पिढीत देतो. काही ना काही कारणाने या गुणधर्मात मर्यादित स्वरूपात बदल नैसर्गिक रीत्या होतात. यातले जे बदल तत्कालीन परिस्थितीत अधिक प्रमाणात पुढची पिढी निपजवायला, जोपासायला कारणीभूत ठरतात/मदत करतात ते बदल अधिकाधिक स्वरूपात पुढच्या पिढीत दिसतात. ही प्रक्रिया चालू राहिली की या बदलांची बेरीज होते. कालांतराने समुदाय इतका भिन्न होतो की त्याला नवीन जात (specie) म्हणता येते. आज आपल्याला जे वैविध्य दिसतं त्याचं कारण म्हणजे अब्जावधी वर्ष चालू असलेली ही प्रक्रिया. छोट्या छोट्या बदलांची बेरीज करून अंती मोठा बदल होण्याची. उंच उडी न मारता हत्तीमार्गावरून हळू हळू पण निश्चित मार्गक्रमणा करण्याची. "

'ट्वायलाईट' ही बरीच जुनी (१९३४ सालची) विज्ञान(?) कथा आठवली. या कथेत काही दशलक्ष वर्षांनी मानवाची काय परिस्थिती असेल त्याचे (अर्थातच काल्पनिक) वर्णन आहे.
या कथेच्या संकल्पनेप्रमाणे - शरीराला लागणारी सर्व द्रव्ये योग्य त्या प्रमाणात गोळ्यांमधून मिळत असल्याने पचवणारे पोट रहाणार नाही, सर्व कामे स्वयंचलित यंत्रे करत असल्याने केवळ मेंदू मोठा होत जाईल आणि बाकीचे शरीर लहान होत जाईल. डोके एकूण शरीराच्या अर्ध्याएवढे असेल, एकाच्या मेंदूतील विचार थेट दुसर्‍याच्या मेंदूत पोचण्याची सोय झाल्याने भाषा शिल्लक रहाणार नाही,गरज नसलेले शेपुट जसे नाहीसे झाले तसेच टेस्ट ट्यूब बेबी - क्लोनिंग यांमुळे मानवात हळूहळू उत्क्रांती होऊन एकच युनिसेक्स मानव निर्माण होईल /(केला जाईल). इ.इ. थोडक्यात 'कालांतराने मानव समुदाय इतका भिन्न होईल की त्याला नवीन जात (specie) म्हणता येईल'. (घासकडवींच्या शब्दांत.)

किंवा असे होण्याआधीच निसर्गाचे चक्र अकस्मात फिरेल आणि परत नवी जीवसृष्टी हळूहळू उत्क्रांत होईल.

या सार्‍याला खूप म्हणजे खूपच वेळ लागेल, हे नि:संशय. पण ते सारे 'नैसर्गिक' असेल.
आणि जोवर विश्वाची एन्ट्रॉपी वाढत आहे (कालप्रवाहाची दिशा भूत ते भविष्य अशी एकच आहे) तोवर जे जे होत आहे ती प्रगतीच आहे.

मोठा मेंदू-लहान शरीर

परग्रहवासीयांचे जे चित्र लोकांसमोर उभे केले जाते ते मोठे डोके आणि लहान शरीराचेच असते नै का! :-)

असेच नव्हे

प्रगती ही कोणाच्यातरी पोटावर पाय देऊनच होते हे एन्ट्रॉपीचे तत्त्व सत्य असले तरी त्याचा व्यत्यास - प्रगती म्हणजे उधळपट्टी हा नेहमीच खरा असतो असे नव्हे. बाँब फुटताना एन्ट्रॉपी भरपूर वाढते.
(अर्थात, 'सुंदर', 'प्रगत', 'विकसित', प्राणी उधळे असतात म्हणजे तो व्यत्यास बहुतेकदा खरा आहेच. मोराचा पिसारा, हमर/फरारी, इ.
अन्नसेवनास हत्ती इतके श्रम करतो की जागेपणीचा बराच काळ त्याला खाण्यात घालवावा लागतो, मुंगी स्वतःच्या वजनाच्या अनेकपट वजन घेऊन जाते.)

आय्ला!

स्मरणशक्ती वगळता मानवाची मानसिक क्षमता खूपच प्रगत झाली आहे पण शारीरिक क्षमता मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे.

हे या चर्चेचे प्रस्तावक म्हटले. अन् नाना! तुम्हास्नी साष्टाङ्ग दण्डवत हो! जेमतेम ३ उत्तरे आलेली, दोन् हज्जार दहा सालच्या जानेवारीत लिहिलेली.. क्किती वर्षे जुनी?.. कहाणीच तुम्ही कोट (quote) केलीत की!! टोपी काढण्यात आलेली आहे.(हॅट्स ऑफ्!)

अहो देशमुख साहेब!
जरा बघा आमच्या विसूनाणांकडे! हिम्मत कशी होते 'स्मरणशक्ती' वगळण्याची??

हॅहॅहॅ

माझ्या स्मरणशक्तीसाठी टोपी काढण्याची गरज नाही.(जेवढे महत्त्वाचे तेवढेच माझ्या लक्षात रहाते.)
आणि शब्दशः क्वोट करण्याची स्मरणशक्ती म्हणाल तर ती उपक्रमाच्या/विकीच्या सर्व्हर्सची उत्तम आहे.
प्वाईंट लक्षात राहिले की झाले. ;)

बरोबर आहे

मी बालपणी गुणाकार न करता "अंकलिपी/पाढे" नावाच्या उपकरणाचा वापर केला. त्यामुळे छोट्या संख्यांचे गुणाकार तोंडी करण्याचे स्किल विकसित करू शकलो नाही. परंतु पावकी निमकीचा वापर न केल्याने काही भागाकार करण्याचे स्किल उत्तम विकसित झाले.

नितिन थत्ते

दाढेखाली सुपारीचं खांड फोडणारे आमचे आजोबा...

वामन देशमुखांचे मूळ लिखाण 'दाढेखाली सुपारीचं खांड फोडणारे आमचे आजोबा' अशा प्रकारच्या (खर्‍याखोटया) गतस्मृति गोंजारण्याचा प्रकार वाटतो. अशाच गतस्मृतींमध्ये 'जुन्या काळात शुद्ध दुधातुपावर वाढलेली माणसं अधिक बळकट असत', 'जुन्या चाळ/वाडा संस्कृतीमध्ये शेजार्‍यांबद्दल जिव्हाळा असे' अशा प्रकारच्या आठवणी मोडतात.

सुपारीचे खांड फोडणारे आजोबा होते का नव्हते हे ठाऊक नाही पण ५० वर्षांपूर्वी बहुतेक आजोबांचे दात ५०-५५व्या वयापर्यंत किडलेले तरी असत किंवा पडून तरी गेलेले असत, दुधातुपावर वाढलेली बळकट माणसे प्लेग/फ्लूच्या साथींमध्ये वा क्षय/देवी/मलेरिया/मधुमेह/उच्च रक्तदाब ह्या आणि अशा अन्य अनेक कारणांनी सरसकट मरत असत हे मात्र चांगले आठवते.

पूर्वीचा काळ चांगला होता, आज मात्र सुधारणेच्या नावाखाली आपण बरेच काही गमावतो आहे असा सूर वारंवार ऐकायला मिळतो पण आजच्या काळातील किती जण त्या सुधारणेचे सुख सोडून पूर्वीच्या 'रम्य' काळात जायला तयार होतील?

वस्तुस्थिति अशी आहे की गेल्या ५०-१०० वर्षात - किंवा गेल्या ५०००-१०००० वर्षात माणसाच्या शारीरिक क्षमतेमध्ये ना वाढ झाली आहे ना घट. ५०-१०० वर्षांपूर्वी माणसे (सगळेच? मला जरा शंका आहे, ज्यांच्यात ही क्षमता नव्हती ते घरीच बसून राहात असणार.) १०-१५ कि.मी. सहज चालत होती असे क्षणभर मान्य केले तरी असेहि दिसते की आजचा माणूसहि अगदी वेळच आली तर तेव्हढे अंतर सहज चालू शकतो. फरक इतकाच की पूर्वी १०-१५ कि.मी.चे अंतर पार करायला चालण्यापलीकडे पर्याय नव्ह्ता, आज बस/र्रिक्षापासून खाजगी चारचाकीपर्यंत अनेक पर्याय - choices - उपलब्ध असल्याने १०-१५ कि.मी. चालण्यात २-३ तास खर्च करण्यापेक्षा आजचा माणूस तो वेळ वाचवून स्वतःला आनंद देणारे दुसरे काहीतरी त्या वेळात करू शकतो. ह्याला वेळेचा सदुपयोग म्हणायचे का दुरुपयोग? Persuit of Happiness हे जीवन व्यतीत करण्याचे मार्गदर्शक तत्त्व असे मान्य झाल्यामुळे अशा आनंद निर्माण करणार्‍या बाबींविषयी जो एक नापसंतीदर्शक सूर एकेकाळी ऐकू येई त्याची धार कमी झाली आहे.

आदिम मानव ज्या दिवशी झाडावरून उतरून मैदानात आला आणि दोन पायावर उभा राहू लागला त्या दिवसापासून निसर्गाच्या लहरींपासून मुक्त होणे आणि नवनवीन साधने उत्पन्न करून आयुष्य अधिक सुखकर बनविणे ही क्रिया सुरू झाली, ती अजूनहि चालू आहे आणि पुढेहि चालू राहणार. हिची गति linear ऐवजी exponential असल्याने नंतरनंतरच्या काळात ती वाढल्यासारखे वाटते. पण ह्या क्रियेमुळे माणसाच्या मूलभूत शारीरिक क्षमतेमध्ये काही बदल घडून यायला पुरेसा काळ लोटला आहे असे वाटत नाही.

असा मूलभूत बदल घडून येणारच नाही असेहि नाही. उत्क्रान्तीच्या फूटपट्टीने मोजण्याइतका पुरेसा काळ लोटल्यावर शारीरिक क्षमताहि बदलेल. वापर होत नसलेले अवयव झिजतील आणि वापरात असलेले आणखी बळकट होतील. पण सध्या चिंतेचे कारण नाही कारण असे होण्यासाठी काही लाख पिढ्या जाव्या लागतील, येत्या हजार-दोन हजार वर्षांत तर निश्चितच चिंतेचे कारण नाही.

असे मूलभूत बदल पूर्वी घडून आले आहेत. माणूस झाडावरून मैदानावर आल्यानंतर त्याचे शेपूट झडले, मांडया जाड झाल्या आणि मेंदू/डोके मोठे झाले. आता एका जागेकडून दुसरीकडे जाण्यासाठी झाडांच्या फांद्यांवरून शेपटाचा उपयोग करून उडया मारत जाण्याऐवजी माणूस जमिनीवरून पळत जाणे पसंत करू लागला. त्याकाळच्या 'उपक्रम' मध्ये 'अरेरे! पहा काय हा अधःपात? पूर्वी कसे आपण छान झाडांवरून लोंबकाळत जात होतो!' असा धागा लिहिला गेला असता काय?

+१

प्रतिसाद आवडला आणि पटला.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

+२

असेच म्हणतो.

--मनोबा

गतस्मृती गोंजारणे

प्रतिसाद भयंकर आवडला. गतकाळाला गोंजारण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे थोडी महागाई वाढली की 'आमच्या लहानपणी किती स्वस्ताई होती' असे सांगत फिरणे. त्या काळातले पगार आणि पगाराच्या तुलनेत वस्तूंच्या किमती ह्यांचा अभ्यास करायला हवा.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

वॉल-ई

ह्यावरून वॉल-ई नावाच्या चित्रपटाचे स्मरण झाले.

निसर्गायण

कोणी "निसर्गायण" पुस्तक वाचले आहे का ? दिलिप कुलकर्णी राजहंस प्रकाशन

निसर्गायण

हे पुस्तक मी वाचलंय आणि माझ्याकडे आहेही. पुण्यात आप्पा बळवंत चौकात उज्वल ग्रंथ भांडार येथे मिळेल किंवा राजहंसच्या कार्यालयातही मिळेल.
वरील विषयाबाबत त्यात चांगला उहापोह केलेला आहे.
-स्वधर्म

 
^ वर