सरलतेकडून क्लिष्टतेकडे : रचनेचा प्रश्न

"argument from design" किंवा रचना-दृष्टांत - वापरून ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्याचे जे काही प्रयत्न झाले आहेत त्यांचा प्रातिनिधिक म्हणून मी खालील उतारा वापरलेला आहे. १८०२ साली विलियम पेलीने हे लिहिलं. मी त्याचा सर्वसाधारण गोषवारा - स्वैर अनुवाद लिहिला आहे. (कंस माझे आहेत).

"समजा तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला एखादा दगड दिसला आणि तुम्ही विचार केला की हा इथे कसा काय आला? तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा "झाला" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादं घड्याळ पडलेलं दिसलं तर त्याविषयी तुम्हाला "ते कायमच इथे असलं पाहिजे" असं साधं उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितलं तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल? (प्राणी कसे "झाले" हा महत्त्वाचा, विचाराण्याजोगा प्रश्न आहे, आणि त्याचं एकच उत्तर संभवत - ते म्हणजे एका सर्वोच्च शक्तीने - ईश्वराने ते निर्माण केले. याचा अर्थ प्राण्यांचं अस्तित्व हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.)"

दृष्टांत नक्कीच प्रभावी आहे. "आपण का आहोत?" "या सृष्टीचं कारण काय?" "माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय?" यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांना (काही केल्या, काही केल्या निळा पक्षी जात नाही - विंदा करंदीकर) हे एक सुबक सोपं उत्तर आहे. जे आस्तिक आहेत त्यांच्या मनात "हे सगळं कशासाठी?" हा प्रश्न दडलेला असतोच. आस्तिकांचच का, पण खऱ्याखुर्‍या नास्तिकांचा विचार केला तरी "आस्तिकांच काही तरी चुकतंय याबद्दल शंका नाही, पण या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही खरी" अशी डिफेन्सिव्ह भूमिका असते. ही परिस्थिती गेली हजारो वर्ष आहे. "तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नाही तेव्हा तुम्हाला आमचं म्हणणं मान्य करावंच लागेल" या भूमिकेमुळे चला, निदान काही ना काही उत्तर तर आहे ना, म्हणून निम्म्याहून अधिक जग आस्तिक झालं. ईश्वर साकार आहे की निराकार, दयाळू आहे की कठोर, पुनर्जन्म आहे की स्वर्ग वा नरक एवढाच चॉईस आहे यावर सगळी हस्तिदंती मनोर्‍यामधली चर्चा रेंगाळली.

पण मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. वरवर पटणारा पेलीचा सिद्धांत/दृष्टांत कितपत खरा आहे? पेलीच्या भाष्यात दोन उघड उघड चुका दिसतात. एक - त्या मानाने छोटी चूक - मी कंसात मांडलेली आहे. "कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे."... हे गृहीतक वापरून, आपल्याला पेली ते रचित आहे हे पटवतो. मग तो निसर्गाकडे बघतो आणि त्याला घड्याळापेक्षा सुरचित गोष्टी दिसतात. जर निसर्गात घड्याळापेक्षा जटील वस्तु दिसू शकतात, आणि त्या आपोआप तयार होऊ शकतात असं गृहीत धरलं तर घड्याळाविषयी काहीच विशेष वाटण्याची गरज नाही. पण पेली सफाईदारपणे आपल्या मनातील पाने, डोळे (नैसर्गिक - ओर्गानिक) व घड्याळ (मानवनिर्मित - धातूची, कृत्रिम) या दोन कल्पनांमधलं अंतर वापरतो आणि एखाद्या जादुगाराप्रमाणे दोन्हींना सारख्याच पातळीवर (सुरचित - रचनाकाराची गरज असलेले) नेउन ठेवतो. ही चलाखी फारच तरल, वाखाणण्याजोगी आहे.

पण त्याही पलिकडे पाहता त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे अनुत्ताराचा कळस आहे. "या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो." म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. "आपण का आहोत?" "या सृष्टीचं कारण काय?" "माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय?" "या क्लिष्ट रचना कशा काय झाल्या?" या सर्वाचं एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व रचनेचे प्रश्न फेकून द्यायचे त्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर, तर ती कशी निर्माण झाली? याचं उत्तर "ती आहेच". या उत्तराचा "फायदा" असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरीत राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं "सोपी" होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जं विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचं एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता!) कबूल करण्यासारखं आहे.

पण पेलीच्या प्रश्नाकडे पाठ फिरवूनही चालत नाही. "हे सगळं कसं काय तयार झालं?" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचं उत्तर कितीही चूक वाटलं तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचं उत्तर सुटलं पाहिजे. पक्षी का उडतात? (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का? डोळे कसे निर्माण झाले? (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला?) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली? माणूस म्हातारा का होतो? माणूस मरतो का? आई मुलावर प्रेम का करते? कोंबडी आधी की अंडं आधी? बोला, आहेत उत्तरं? हजारो वर्ष तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंतांनी डोकी खाजवली, चर्चा केल्या. पण बराच काळ त्यांच्या हाताला रिकाम्या शब्दच्छलाशिवाय काही लागलं नाही. इकडे पेली आनंदात होता, कारण त्याच्या सुंदर चपखल अनुत्तरापुढे कुठचच उत्तर टिकाव धरणार नाही याची त्याला खात्री होती. प्रश्न इतका कठीण होता की सगळ्यांना हात झटकून झक मारत "हासडल्या तुज शिव्या तरीही तुझ्याच पायी आलो लोळत" म्हणत यावं लागणार याबद्दल शंका नव्हती.

या प्रश्नाला पेलीच्या उत्तरा इतकच असंभव उत्तर देता येतं. ते उत्तर असं "कोणताही प्राणी हा अणु-रेणू पासून बनलेला असतो. पृथ्वीवर हवे तितके रेणू आहेत. ते पाण्यात, वार्‍यामुळे, एकंदरीत ऊर्जेमुळे एकमेकांवर आपटतात - एकमेकांशी जोडले जातात. असेच जर खूप रेणू अचानक विविक्षित आकारात जोडले गेले की कदाचित माणूस तयार होण्याची शक्यता आहे. आणि एकदा एक पुरुष आणि एक स्त्री तयार झाली की पुढचा सोपं आहे." ही अर्थातच इतकी हास्यास्पद कल्पना आहे की याला जम्बो जेट दृष्टांत असं नाव आहे. माणूस सोडून द्या, आपण जर एखाद्या जम्बो जेट चे स्पेअर पार्ट मोठ्ठ्या पाखडायच्या यंत्रात घातले, भरपूर उर्जा दिली आणि वाट पाहत बसलो, की कधी तरी त्यातून आख्खं जम्बो जेट बाहेर येईल... त्याची शक्यता काय याचाअंदाज बांधता येतो... त्याला इतका वेळ लागेल की आख्या विश्वाचा कालावधी निमिषार्धाप्रमाणे वाटेल. आणि मनुष्य तर विमानाच्या कित्येक पतीने क्लिष्ट असतो. त्यात शिवाय आणखीन एक स्त्री तयार करायची. ती सुद्धा तो पुरुष मारायच्या आत... त्यापेक्षा पेलीचा जादूगार परवडला.

मुळात जम्बो जेट तरी कसं तयार झालं? आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असतं. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवलं? विमानाची कल्पना लेओनारदो दा विन्ची पर्यंत जाते. पण त्याही आधी बलून होते, पतंग होते, आणि उडण्याची "प्रेरणा" नसलेल्या, किंवा त्या इच्छेने न बनवलेले कागदाचे कपटे, पानं हवेवर लाखो वर्षांपासून गिरक्या घेताहेत. हवेवर तरंगणाऱ्या वस्तु ते आधुनिक जम्बो जेट पर्यंत कल्पना/रचना - अवकाशात (कल्पना/रचना - अवकाश ही संकल्पना भौतिकीतल्या hilbert स्पेस प्रमाणे आहे. गरज पडेल तेव्हा मी तिचा अधिक विस्तार करीन. तूर्तास या शब्दांवरून बोध होईल तोच पुरे आहे.) रेष काढली तर त्यावर मधल्या मधल्या टप्प्यांवर त्या त्या काळाच्या तंत्रज्ञानाला शक्य असे अनेक विमानाचे "पूर्वज" सापडतात. किंबहुना विमानांच (किंवा "उडणार्‍या/तरंगणाऱ्या वस्तूंचं - पक्षी वगळता") नीट वर्गीकरण केलं तर त्यांच्यात हवेपेक्षा जड व हवेपेक्षा हलके अशा दोन उघड शाखा तयार झालेल्या दिसतील. "हवेपेक्षा हलके किंवा आपल्या आपण (शक्तीशिवाय) तरंगणारे" मध्ये साबणाचे फुगे, पानं, कागदाचे कपटे, सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय, छत्र्या, पाराशूत, हात-ग्लायडर, ग्लायडर, बलून, मोठे बलून ते हिंडेनबर्ग पर्यंत वाटचाल दिसेल. (इथे या चढत्या क्रमात उडणे या प्रक्रियेची देखील हळूहळू वाटचाल होताना दिसते. [भरकटणे, एका जागी भुरभुरत राहणे, संथपणे खाली येणे, तरंगत थोडे पुढे जाणे, तरंगत बरेच पुढे जाणे पण वार्‍यावर अवलंबून असणे, आणि खऱ्या अर्थाने तरंगत पाहिजे तिथे जाता येणे] हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे - कारण रचनेची वाढ होते त्याबरोबर विशिष्ट क्षमतेतही बदल होत जातो. शब्दांना जीव प्राप्त होतो.)

ही मांडणी करण्यामागे उद्देश काय? तो असा - जम्बो जेट किंवा हिंडेनबर्ग शून्यापासून तयार करणं यासाठी रचना अवकाशात प्रचंड मोठी उडी घ्यावी लागते. अशा उड्या मारणं अशक्यप्राय असतं. म्हणजे मोहेंजोदारो संस्कृतीतल्या अग्रेसर अभियंत्याला अणुबॉम्ब बनवायला सांगण्यासारखं. पण त्यालादेखील काही वस्तू तरंगतात, हे माहीत असतं (उदा सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय). आपल्याला काही पुरावा सापडलेला नाही, पण जर असं सिद्ध झालं की त्या काळात पतंग अस्तित्वात होते तर त्याचं आश्चर्य वाटणार नाही. तरंगणाऱ्या वस्तूंपासून पतंगा पर्यंत फार मोठी उडी नाही. जर रचनाहीनतेपासून ते अत्यंत क्लिष्ट रचनेपर्यंत छोट्या छोट्या पायर्‍यांचा प्रवास आखता आला तर तो शक्य आहे. आणि जर या पायर्या अगदी बारीक केल्या तर तो जिना न राहता वरती जाणारा ramp होईल. मग त्यावरून प्रवास करणं सहज शक्य आहे. गरज आहे ती पाठून लावण्याच्या बलाची. आणि पुरेशा काळाची. पण तीन चार अब्ज वर्षं म्हणजे काही कमी नाही.

रचनेच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाने दिलेलं उत्तर या स्वरूपाचं आहे. टकमक टोकावर जायचं असेल तर खालून वर उडी मारता येत नाही. गडावर चढण्याचा हत्तीमार्ग शोधावा लागतो. उत्क्रांतिवादाचा थोडा उहापोह आपण पुढच्या लेखात करू. (नमनाला आणखी थोडं तेल पडलं, पण ही लेखमालाही एकदम उडी न मारता हत्तीमार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे.) एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे "दुर्दैवाने उत्क्रांतिवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असं सगळ्यांना वाटतं." आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी "माकडापासून माणूस झाला" "माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली" "जिराफाची मान लांब झाली" "सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट" "समूहाच्या भल्यासाठी.." अशा तुकड्यापलिकडे फारसं काही लक्षात नसतं. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलंही नसतं.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख आवडला

वाचकांना विचार करायला लाऊन सतावण्याचा उद्देश सफल झाला आहे ;) अश्या लेखातील तर्कावर उपक्रमी चर्चा करतील ती आणि लेखमालेतील पुढील पुष्प वाचण्यास उत्सुक आहे

विनंती: लेखात एखादा शेर/कवितेची ओळ द्याल तेव्हा पूर्ण द्या. एकच ओळ सांगून का जीव टांगणीला लावता राव :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

पसरट ओळख आवश्यक

श्री घासकडवी, मागच्या भागाप्रमाणेच हा भागही आवडला. उत्क्रांतीत अनेक अपयशे आहेत तसेच आश्चर्यकारकपणे टिकलेले जीवही.
कालपरवाच एनपीआर वर रोटीफरविषयी नवीन संशोधनाची ओळख झाली. खाली चित्रफीत देत आहे.

रोटीफर

चित्रफितीबद्दल धन्यवाद. रोटीफरच्या जीवाणूंवर मात करण्याच्या "युक्ती"प्रमाणे निसर्गात अशा अचंब्यात टाकणार्‍या हजारो adaptations आहेत. ज्या पाहून थक्क व्हायला होतं. पेलीला जे दिसलं, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं ते केवळ हिमनगाचं छोटंसं टोक आहे. या लेखमालेवरच्या चर्चांमधून जीवसृष्टीच्या एकंदरीत क्लिष्टतेची थोडी ओळख व्हावी हाही हेतु आहे.

लैंगिक पुनरुत्पादन हा पुनरुत्पादनाचा एक प्रकार आहे. रचनेच्या क्लिष्टतेच्या चढत्या पायर्‍यांपैकी एक. ती पायरी नक्की कशी चढली गेली याबद्दल अनेक चांगले तर्क असले तरी शेवटचं उत्तर सापडलेलं नाही.

 
^ वर