चोरी झालेले दुसर्‍या शतकातले अमूल्य शिल्प परत मिळवण्यात काबूल संग्रहालयास यश

पांढर्‍या लाईमस्टोन प्रकारच्या प्रस्तरावर कोरीव काम करून निर्माण केलेले एक शिल्प, जर्मन राजदूतांनी नुकतेच काबूल संग्रहालयाला परत दिले आहे.साधारण 12 इंच ऊंच व 10 इंच रूंद असलेले हे शिल्प, अफगाण यादवी युद्धाच्या वेळी या संग्रहालयातून चोरीला गेलेले होते. या शिल्पात 8 व्यक्ती कोरलेल्या असून या व्यक्ती प्रत्येक ओळीत 4, याप्रमाणे दोन ओळीत उभ्या असलेल्या , कोरलेल्या आहेत. एका व्यक्तीच्या शरीराचा भाग तुटून गेला आहे तर बाकीच्या व्यक्तींची नाके बहुतांशी विद्रूप केलेली आहेत. सर्व व्यक्ती डावीकडे बघताना दाखवल्या आहेत. असे समजले जाते की डाव्या बाजूला असलेल्या आसनावर बसलेल्या भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकताना या व्यक्ती दाखवलेल्या आहेत. हे शिल्प पहिल्या किंवा दुसर्‍या शतकातले (इ.स. 100 ते 200) असावे असा अंदाज आहे व गांधार देशातील शिल्पकलेचा हे शिल्प म्हणजे एक उत्तम नमुना असल्याचे समजले जाते.
हिंदुकुश व हिमालय पर्वतराजी ज्या स्थानावर एकत्र येऊन मिळतात त्याच्या दक्षिणेपासून ते थेट सिंधु नदी पर्यंत गांधार देश पसरला होता असे मानले जाते. भारतीय उपखंड, मध्य एशिया व पश्चिम एशिया यांच्या मध्ये असलेल्या या देशाचा बराचसा भाग अतिशय डोंगराळ आहे आणि पाण्याची विपुलता असल्याने घनदाट जंगले या डोंगराळ दर्‍याखोर्‍यांत पसरलेली आहेत. भारत व एशिया खंड या मधील सांस्कृतिक संबंध जोपासले जाण्यासाठी आवश्यक असलेली सांस्कृतिक देवाण घेवाण, गांधारच्या भौगोलिक स्थानामुळे सहज शक्य होती व म्हणूनच गांधारमधील कला ही अतिशय महत्वाची मानली जाते.
प्रसिद्ध चिनी भिख्खू व यात्रेकरू शुआन झांग इ.स. 629 ते 647 मध्ये भारत देशाच्या यात्रेवर आला होता. त्याच्या वर्णनाप्रमाणे, सिंधु नदीच्या पश्चिम किनार्‍यपासून ते पेशावर जवळचा सखल भाग आणि पाकिस्तानचे सध्याचे स्वत, बुणेर व बजौर हे भाग त्या काळच्या गांधार देशामध्ये मोडत होते.

शुएन झांग आपल्या वर्णनात लिहितो की (बील याचे भाषांतर)
" गांधार राज्य पूर्व- पश्चिम साधारण 1000 ली व उत्तर-दक्षिण साधारण 800 ली पसरलेले आहे. पूर्वेला त्याची सीमा सिन (सिंधु) नदीपर्यंत आहे. या देशात अनेक प्रकारची फुले व फळे यांची विपुलता आहे. या शिवाय येथे विपुल प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे. या उसाच्या रसापासून घन स्वरूपातील साखर येथे बनवली जाते. गांधार राज्याची राजधानी पुरुषपुर (पेशावर) ही असून तिचा परिघ 40 ली एवढा आहे.”
इ.स.पूर्व 305 मध्ये गांधार राज्यावर सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सत्ता होती. इ.स.पूर्व 255 मध्ये सम्राट अशोक गादीवर आला. त्याने गांधार मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा म्हणून विशेष प्रयत्न केले होते. पहिल्या व दुसर्‍या शतकात पहिला कनिष्क- 1, सुविष्क, कनिष्क- 2 वगैरे कुषाण राजांची गांधारवर सता होती.
गांधारमधील कला ही संपूर्णपणे बौद्ध धर्माला वाहिलेली होती. गांधारमध्ये भगवान बुद्धांचे शरीर अवशेष जतन करून ठेवण्यासाठी विशाल स्तूप उभारलेले होते. हे स्तूप अतिशय सुंदर कलाकुसरीची कोरीव कामे केलेल्या पॅनेल्सनी सजवलेली होते. या रिलिफ पॅनेल्सवर, भगवान बुद्धांच्या आकृती, त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, पुर्वायुष्यातील प्रसंग (जातक कथा) आणि वेलबुट्या व नक्षी वगैरेचे अप्रतिम कोरीव काम केलेले होते.
गांधार कला ही अनेक प्रदेशांतील कलावैशिष्ट्ये व परंपरा आत्मसात करून विकसित झालेली होती. ग्रीक, रोमन, बायझेंटाईन, पर्शियन, मध्य एशियन, चिनी व भारतीय परंपरा व कला वैशिष्ट्ये या ठिकाणच्या कलेत बघायला मिळतात.
काबूल संग्रहालयाने परत मिळवलेले शिल्प गांधार कलेचा उत्तम नमुना आहे असे मानले जाते. या शिल्पात दाखवलेली चेहेरेपट्ट्यांची वैशिष्ट्ये, अंगावरचे कपडे किंवा वस्त्रे, केशभूषा हे सर्व मोठ्या बारकाईने दर्शवलेले आहे.

असे समजले जाते की काबूल संग्रहालयात असलेल्या मूळ वस्तुंपैकी सुमारे 70% किंवा 70000 वस्तु यादवी युद्धात चोरील्या गेल्या आहेत. संग्रहालय या पैकी शक्य तेवढ्या वस्तु जगभरातून परत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे
या शिल्पाची छायाचित्रे माझ्या अनुदिनीवर या दुव्यावर उपलब्ध आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान माहिती

छान माहिती मिळाली. संग्रहालयला गोष्टी परत मिळणे म्हणजे हरवलेला इतिहास सापडणे.

चांगली माहिती.

धन्यवाद.

(अवांतर- 'ली' हे अंतर मोजण्याचे प्रमाण असावे असे दिसते. एक ली म्हणजे नक्की किती?)

थांग साम्राज्याच्या काळात ३२३ मीटर

शुआनझांगच्या काळात (थांग [Tang] साम्राज्याच्या प्रमाण मोजमोपांत) ३२३ मीटर = १ ली.

(अन्य काळात लांबी कमी-अधिक होती - पुष्कळ कमी-अधिक, दुवा; आजकाल मेट्रिक जमान्यात ५०० मीटर= १ ली)

अच्छा !

या माहितीबद्दल आभारी आहे.

छान माहिती

छान माहिती, शिल्पाची बांधणी पण छान आणि प्रमाणबद्ध.

चांगली माहिती

चांगली माहिती! आभार!

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

+१

असेच म्हणते.

इतर लेखांप्रमाणेच

इतर लेखांप्रमाणेच् हाही लेख् आवडला.

असे समजले जाते की काबूल संग्रहालयात असलेल्या मूळ वस्तुंपैकी सुमारे 70% किंवा 70000 वस्तु यादवी युद्धात चोरील्या गेल्या आहेत.

माझ्यामाहितीप्रमाणे १८९०च्या दशकापर्यंत अफगाणिस्तानच्या एका भागात(बहुतेक इशान्य अफगाणिस्तान) इस्लामपूर्व संस्कृती नांदत होती, कशीबशी का असेना तग धरुन होती. त्यांच्याकडे असे बरेचसे दस्तावेज वगैरे होते, स्वतःच्या अशा काही विशिष्ट उपचार पद्धती, कलाकुसरीचे कौशल्य व खाद्यसंस्कृती होती. जिथे ह्यांचे प्राबल्य होते त्याला आजही काफिरिस्तान म्हटले जाते.

१८९० ला एकाएकी त्या भागात अफगाणिस्तानच्या मुख्य भूमिवरील सैन्याचे आधी हल्ले व मग् स्थलांतर सुरु झाले. जबरदस्तीने नवीन धर्माचा स्वीकार वगैरे स्थानिकांना करायला लावण्यात आला. ह्या धामधूमित पूर्वीचा बहुतांश अमूल्य ठेवा नष्ट झाला. शिल्लक राहिलेला थोडाबहुत ब्रिटिशांच्या कानावर गेल्याने त्यांनी पठाणी शहाला तो काबूल संग्रहालयात हलवण्यास भाग पाडले.

त्यामुळे यादवी युद्धाच्या वेळेस जो काही शिल्लक होता, तोच मुळी मूळ रुपापेक्षा नष्ट-भ्रष्ट अवस्थेत, दुर्लक्षित राहिलेला होता. याअदवीदरम्यान त्यातीलही ७०% गोष्टी नष्ट झाल्या.

हिंदुत्ववादी मित्राकडून ऐकण्यात आले की १२व्या शतकात काश्मीर दरबाराचा राजकवी कल्हाण ह्याने "राजतरंगिणी" ह्या काव्यात जे काश्मीरचे मनोहारी वर्णन ग्रंथबद्ध केले आहे , तो मूळ ग्रंथही १८९० पर्यंत काफिरिस्थानातच होता.

नवीन हापिसातून नीट जालोपलब्धी व आसनव्यवस्था नसल्याने अधिक भर घालता येत नाही. मागील दोनेक लेखांवरही पिंक टाकायची राहिली आहे.

--मनोबा

नुरीस्तान्

इशान्य अफगाणिस्तान मधील नुरीस्तान् या भागाविषयी मन यांनी दिलेली माहिती जरा उदात्तीकरण करून लिहिलेली आहे असे वाटते. पंजशीर नदीचे खोरे व पाकिस्तान मधील चित्रल किंवा चेत्रार या भागामध्ये असलेल्या डोंगराळ भागाला, तिथले रहिवासी इस्लामिक धर्माचे नसल्याने काफिरीस्तान असे नाव होते. येथले रहिवासी अदिवासी असून बौद्ध किंवा हिंदू कधीच नव्हते. त्यांचा स्वत:चा असा धर्म होता. भिल्ल लोकांसारखी यांची जमात होती. अफगाणिस्तानच्या इतर भागावर हल्ले, दरोडे करण्यामागे हे लोक असत. तैमूरलंगाकडे या लोकांविषयी तक्रार केली गेल्याने त्याने काफिरीस्तानवर स्वारी केली होती पण बंडखोरांना काबूत आणणे त्याला जमले नव्हते. 1890 मध्ये अफगाणिस्तान अमिराने मोठे सैन्य पाठवून या भागाचे इस्लामीकरण केले होते. अतिशय दुर्गम अशा प्रदेशात हे लोक रहात असल्याने त्यांचे कायदेकानू, नियम हे भिन्न असणे साहजिक आहे. या भागात असलेले लोक युरोपियन वंशासारखे दिसत असल्याने ते ग्रीक वंशज असल्याचे अंदाज बांधले गेले आहेत.
ओब्झर्व्हर वृत्तपत्राचा पर्यटन संपादक एरिक न्यूबी याने 1956 मध्ये या नुरीस्तान मधे अगदी अचरटपणा म्हणता ये ईल अशी एक मोहिम केली होती. या मोहिमेवर त्याने लिहिलेले 'ए शॉर्ट वॉक इन हिन्दुकुश' हे प्रवासवर्णनामध्ये क्लासिक असे मानले जाते. पुस्तक अतिशय वाचनीय आहे. या पुस्तकाचे मी केलेले परिक्षण या दुव्यावर बघता येईल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर