ऍपल बिझिनेस मॉडेल देशाला उपयोगी आहे का?

माझे व्यावसायिक आयुष्य मी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात व्यतीत केलेले असल्यामुळे, माहिती तंत्रज्ञान उद्योग हा माझ्या मनात नेहमीच एक यक्षप्रश्न म्हणून राहिलेला आहे. संगणक मी वापरतो. या तंत्रज्ञानाने मिळालेल्या सुविधा सुद्धा एक उपभोक्ता म्हणून मला अतिशय आवडतात. तरीही या सुविधा देणार्‍या आंतरजालावरच्या फेसबूक, ट्विटर किंवा गुगल सारख्या कंपन्या, उत्पन्न कोठून व कसे मिळवतात? हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतो. यापैकी गुगलच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत जाहिराती हा आहे हे मला माहिती आहे परंतु फेसबूक व ट्विटर आपल्या कर्मचार्‍यांचे पगार कोठून करतात? किंवा इमारतीचे भाडे, वीज खर्च कोठून करतात? असे मूलभूत प्रश्न मला वारंवार पडत असतात. अजुन तरी मला या प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही.
म्हणूनच काल ऍपल या कंपनीने मागच्या तीन महिन्याचा आपला ताळेबंद सादर केल्याची बातमी मी जरा काळजीपूर्वक वाचली. मला थोडेफार समजत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रातील ही एक विशाल कंपनी या आंतरजालावरील कंपन्यांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात उत्पादनाचा व्यवसाय करून फायदा मिळवते आहे हे वाचून मला नाही म्हटले तरी आनंद वाटला. या मागच्या 3 महिन्यात ऍपल कंपनीने 3.7 कोटी आयफोन विकून एक उच्चांकच प्रस्थापित केला आहे. या कंपनीकडे आता 100 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम रोख किंवा गुंतवणूक या स्वरूपात जमली आहे.

मात्र ऍपल कंपनीच्या या अद्भुत म्हणता येईल अशा कामगिरीचा खरा फायदा अमेरिकेतील उद्योग जगताला न होता सॅमसुंग, क्वॉलकॉम, टोशिबा यांच्यासारख्या घटक मालाचा पुरवठा करणार्‍या कंपन्या व ऍपलच्या उत्पादनांची प्रत्यक्ष जुळणी करणार्‍या फॉक्सकॉन सारख्या कंपन्यांना होतो आहे ही अमेरिकेच्या दृष्टीने खरी शोकांतिका आहे असे मला वाटते. या बाबतीत टिप्पणी करताना इकॉनॉमिस्ट पाक्षिक फॉक्सकॉन कंपनीबद्दल म्हणते की
“The facility has 230,000 employees, many working six days a week, often spending up to 12 hours a day at the plant. Over a quarter of Foxconn’s work force lives in company barracks and many workers earn less than $17 a day. When one Apple executive arrived during a shift change, his car was stuck in a river of employees streaming past. “The scale is unimaginable,” he said. Foxconn employs nearly 300 guards to direct foot traffic so workers are not crushed in doorway bottlenecks. The facility’s central kitchen cooks an average of three tons of pork and 13 tons of rice a day. While factories are spotless, the air inside nearby tea houses is hazy with the smoke and stench of cigarettes. Foxconn Technology has dozens of facilities in Asia and Eastern Europe, and in Mexico and Brazil, and it assembles an estimated 40 percent of the world’s consumer electronics for customers like Amazon, Dell, Hewlett-Packard, Motorola, Nintendo, Nokia, Samsung and Sony.“They could hire 3,000 people overnight,” said Jennifer Rigoni, who was Apple’s worldwide supply demand manager until 2010, but declined to discuss specifics of her work. “What U.S. plant can find 3,000 people overnight and convince them to live in dorms?”
ऍपल फोनमध्ये वापरल्या गेलेल्या घटकांपैकी एक घटक म्हणजे मुखपृष्टावर वापरलेली कठिण काच हा आहे. हा घटक, कॉर्निंग ही अमेरिकन कंपनी बनवत असली तरी तो बनवला जातो चीन, कोरिया सारख्या देशातच. त्यामुळे अमेरिकन उद्योग जगताला त्याचा फायदा कमीच होतो.
ऍपल कंपनी, तिचे शेअर होल्डर यांचा या उलाढालीत खूप फायदा होतो आहे हे सत्य आहे परंतु ही कंपनी जिथे व्यवसाय करते आहे तिथल्या म्हणजे अमेरिकेतील लोकांना या कंपनीच्या व्यवसायाचा काहीच फायदा होत नाही हे तितकेच खरे आहे.
टाटा मोटर्स किंवा बजाज ऑटो या उत्पादन करणार्‍या मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे मोठे कारखाने महाराष्ट्रात आहेत. उत्पादनास लागणारे मनुष्यबळ किंवा माल पुरवठादार हे भारतातले आहेत. म्हणजेच या कंपन्या करत असलेल्या उत्पादनाचा उपयोग या कंपन्यांत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे जीवनमान वाढण्यासाठी तर होतोच आहे पण या शिवाय हे कारखाने आहेत त्या शहरांचे जीवनमान सुधारण्यासाठीही होतो आहे. या कंपन्यांचे स्थानिक पुरवठादार भारतीय कंपन्या असल्याने त्यांचाही फायदा होतो आहे. उद्या टाटा मोटर्सनी नॅनो गाडी श्री लंकेत किंवा बांगला देश मध्ये बनवून भारतात आयात करण्यास सुरूवात केली तर भारताच्या दृष्टीने त्याचा काहीच फायदा होणार नाही. फक्त कंपनी व शेअर होल्डर तेवढे गब्बर होतील.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची गोष्ट थोडी निराळी आहे असे मला वाटते. या कंपन्यांपैकी काही कंपन्या एका विशिष्ट ग्राहकासाठी (उदा. संरक्षण, बॅंका) प्रणाली बनवतात तर काही आंतरजालावर उपयुक्त अशा प्रणाली बनवत असतात. इन्फोसिस सारखी कंपनी जेंव्हा दुसर्‍या देशात एखादे केंद्र सुरू करते तेंव्हा या कंपनीचा प्रभाव तिथे काम करणार्‍या हजार पाचशे लोकांपुरताच मर्यादित रहात असतो. देशावर, समाजावर होणारा या कंपन्यांचा प्रभाव फारच मर्यादित असतो.
माहिती तंत्रज्ञान उद्योग व इतर उद्योग या मधला मुख्य फरक हाच आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग भारतात राहिले किंवा बाहेर गेले तरी त्याचा येथील समाजावर, देशावर फारसा परिणाम होणार नाही मात्र इतर उत्पादन करणारे उद्योग देशातच असणे महत्वाचे आहे. सेवा किंवा माहिती उद्योगांचे Outsourcing हे पुष्कळदा फायदेशीर ठरू शकते. मात्र उत्पादन उद्योग देशाबाहेर घालवणे ही फार मोठी चूक असू शकते. जर्मन किंवा जपान मधील मोठ्या उत्पादकांचे काही कारखाने बाहेरील देशात असले तरी बरेचसे उत्पादन हे देशांतर्गत होत असते.
कदाचित माझे विचार जुन्या पठडीतील असल्याचे काही जणांना वाटेल पण हे ऍपल मॉडेल भारतासारख्या देशाला उपयुक्त तर नाहीच पण येथील उद्योगधंद्यांना हानीकारकच आहे असे मला खात्रीकारकपणे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

एकंदर विचार आवडला.

उत्पादनास लागणारे मनुष्यबळ किंवा माल पुरवठादार हे भारतातले आहेत.

पण हे पटलं नाही. टाटा नॅनो ची पार्ट लीस्ट आणि सप्लायर्स बघितले तर ९०% पेक्षा जास्त परकीय आहेत. त्यातही ईसीयु, इंस्ट्रूमेंट क्लस्टर्स, ब्रेक सिस्टीम, इंटेरीअर्स हे सगळे महत्वाचे घटक आयात केलेली आहेत. आणि बेअरींग, व्हील बॅक प्लेट वगैरे किरकोळ घटक स्वदेशी आहेत.
बजाजचं म्हणाल तर भारतात फक्त असेंब्ली होते बाकी सगळे पार्ट्स आयात केले जातात. त्या मानानी टीव्हीएस् बरी आहे.

आंतरराष्ट्रीय कंपंन्यांचं बिझिनेस मॉडेलमध्ये अंतीम ध्येय निश्चित असतं आणि ते एकच असावं लागतं. तुम्हाला नफा कमावयचा आहे ना, दॅट्स इट. तुम्ही एक पाय नफा, दुसरा स्वदेशी किंवा चॅरीटी वर ठेउन उभे राहू शकत नाही.

उचित

उत्पादन उद्योग देशाबाहेर घालवणे ही फार मोठी चूक असू शकते.

अतिशय योग्य विचार आहेत. इथल्या उद्योगधंद्यांच्या हानीच्या गोष्टी करताय ते तर खरे आहेच; पण अजूनही जितके उद्योगधंदे व्हायला हवेत, तेच मुळात इथे उभे राहिलेले नाहीत त्याचे काय! शेतीवर अवलंबून असलेला मोठा वर्ग मध्य आणि पूर्व भारतात प्रामुख्याने आहे. तिथे उत्पादनाचे सेकंडरी सेक्टर प्रयत्नपूर्वक जोपासावे लागेल, आणि शेतीवर 'जगणे' हा प्रकार इतिहासजमा करावा लागेल तेंव्हाच दारिद्र्याचा ससेमिरा सुटेल. आणि त्यासोबतच अनेक अवघड वाटणारे प्रश्नही सोपे होत जातील.

कदाचित माझे विचार जुन्या पठडीतील असल्याचे काही जणांना वाटेल

असे म्हणता म्हणजे असे मत असलेले काही विद्वान आपल्या परिचयाचे असावेत. मुळीच जुन्या वगैरे पठडीतील नाहीत. एकदम रिलेव्हंट आहेत, आणि सध्याच्या काळातच नव्हे, तर येणार्‍या किमान पन्नासेक वर्षांसाठी तरी आवश्यक आहेत.

+१

मूळ लेखाशी सहमत.
आणि वरील प्रतिसादाशी तर प्रचंड सहमत.

--मनोबा

ऍपल बिझनेस मॉडेल

ऍपल बिझनेस मॉडेल उपयोगी असते तर अमेरिकेत मंदी आली असती काय? हे फारच टोकाचे वाक्य असेल ;-) तरीही...

चांगली चर्चा

आयटी मधील नोकर्‍या बाहेरदेशी गेले तर त्यावर आधारित अशी जी एक अर्थव्यवस्था तयार झाली आहे तिला धक्का लागू शकतो. आणि अशाने जी काही सामाजिक उलथापालथ होऊ शकते ती होते. ऍपल किंवा इतर कंपन्या फार पूर्वीपासून इतर देशांकडून कामे करवून घेत होत्या. गेली निदान पंधरा ते वीस वर्षे तयार कपड्यांसारख्या वस्तू बाहेर देशांमधून अमेरिकेत येत आहेत. पण जेव्हा आयटीवर आधारित जॉब (जसे कस्टमर सर्विसेस) परदेशी गेले तेव्हा अमेरिकनांना जाग आली. आयटी कंपन्यांचा एकंदर भारतीय अर्थव्यवस्थेत किती सहभाग आहे याबद्दलचे माझे वाचन नाही.

मुळात सध्याच्या अर्थव्यवस्थेत तगून राहायचे तर ज्या मालाला सध्या उठाव आहे त्या व्यवसायात असले पाहिजे. काही खास कारागिरीत प्राविण्य असणार्‍या व्यावसायिकांनाच भाव आहे असे प्रत्येक काळासाठी दिसेल. पुण्यातील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला ९०च्या दशकात अचानक मंदी आली होते असे आठवते. तेव्हाही अनेकांना आपले जॉब बदलावे लागले होते. उत्पादने आणि सर्विसेस बदलत राहावी लागतात. देशाबाहेर असो वा देशाअंतर्गत. माझे मत व्यवसाय बाहेर जातात आणि जाणार ही शक्यता मान्य केल्यास त्यात जुळवून घेणे सोपे असते.

एक वेगळा विचार मांडायचा असला तरः देश किंवा देशाची सीमा या कल्पना बदलत्या आहेत असे दिसते. आज जो भाग आपण भारत म्हणून म्हणतो त्या देशाकडे आहे तो उद्या नसूही शकतो. जो भाग उद्या आपल्या जवळ असू शकणार आहे त्याकडे आज माणुसकीच्या, सहकाराच्या दृष्टीने बघितले तर उद्या फायदा होऊ शकतो. माणसे आपल्या वैयक्तिक जीवनात अशी वागतात, मोठ्या कंपन्या आणि समाजोपयोगी काम करणार्‍या काही संस्थाही अशा पद्धतीने विचार करताना दिसतात.

उत्पादन उद्योग देशाबाहेर घालवणे ही फार मोठी चूक

चान्गला विचार व चान्गला लेख. सहमत आहे. स्थानिक लोकाना नोकरी मिळणे हे सुद्धा महत्वाचे असावे व आहेच.

देशाच्या सुबत्ते साठी तेथील लोकान्ची आर्थिक स्थिती चान्गली असणे व ती उत्पादना सारख्या व्यवसायातून असणे हे चान्गले.

पूर्ण पटले नाही

लेख पूर्णपणे पटला नाही.

औद्योगिक क्षेत्रात अधिक रोजगार (कुशल आणि अकुशल) उपलब्ध होतात आणि म्हणून असे उद्योग देशाबाहेर जाऊ नयेत इथवर ठीक. परंतु, जगातील विकसित देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नांचा विचार केला तर असे दिसते की, ह्या सर्व देशांत सेवाधारीत उद्योगातून अधिक संपत्ती (GDP च्या ७०% पेक्षा जास्ती) जमा होते. औद्योगिक क्षेत्रातून २५% च्या आसपास तर कृषी क्षेत्रातून १०% पेक्षा कमी.

भारतात हे प्रमाण अनुक्रमे ५५.२%, २६.३% आणि १८.५% असे आहे.

तेव्हा देश जसा जसा अधिकाधिक विकसीत होत जातो (सरासरी माणशी उत्पन्न वाढत जाते) तसे त्यादेशातील मनुष्यबळाची किंमत (आणि पर्यायाने उत्पादनाची किंमत) वाढत जाते. आणि ते उत्पादन करणे हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. म्हणूनच अशा वेळी उत्पादन स्वस्त मनुष्यबळाच्या देशात स्थलांतरीत होते. शिवाय अशा देशांत अकुशल कामगारांपेक्षा कुशल कामगारांची (सुशिक्षित) जास्त असते. म्हणून हे देश अधिकाधिक सेवाधारीत उद्योगांमध्ये असतात. भारताची वाटचालदेखिल हळूहळू त्याच दिशेने होत आहे, होत रहावी.

दुवा - http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_GDP_sector_composition

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भारतीय उत्पादन उद्योग आहेत कुठे?

भारतातील बहुतेक उत्पादन उद्योग परदेशातल्या मालावर अवलंबून आहेत.
माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये उत्पादन उद्योग तर भारतात अस्तित्वातच नाही. अशा कंपन्या नगण्य आहेत. पूर्ण भारतीय उत्पादन उद्योग असलेल्या कंपन्या इतक्या लहान आहेत की त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा काही परिणाम होत नाही. त्यामुळे भारतीय उत्पादन उद्योग देशाबाहेर गेला काय आणि इथे राह्यला काय काही फरक पडणार नाही.

पण देशाबाहेर उत्पादन करण्याचे कारण याबाबतची शासनाची उदासीनता आणि योग्य सोयीसुविधांचा अभाव हेच असावे.

चांगला विषय आहे

भारतातले औद्योगीक क्षेत्र पहायला गेले तर बरेच क्लिष्ट आहेत. अनेक कंपन्या सुट्यामालाचे उत्पादन भारतात करुन निर्यात करतात तर पुर्ण उत्पादनाचे सुद्धा. ह्युंदाई भारतातुन निर्यात करते. पण त्या उत्पादनाला भारतीय म्हणायचे का? भारतात तयार झालेले म्हणू शकतो. भारतीयांचा नवी उत्पादने तयार करण्याचा आळस म्हणा, अथवा स्वदेशी उत्पादनांना तुच्छ समजण्याची मानसिकता म्हणा अथवा सरकारच्या धोरणांचा अभाव म्हणा, भारतातले उत्पादन क्षेत्र हे पुर्णपणे भारताने नियंत्रीत केलेले असे नाही. जी काही भारतीय उत्पादने आहेत त्या बद्दल अभिमान नाही.
एक गमतीचा किस्सा, टाटा नॅनोला आग लागली तर ती खरेदी करणार नाहीत (नक्की किती नॅनोमध्ये हा प्रकार झाला या बद्दल न खरेदी करणार्‍याकडे पुर्ण माहिती नसते.) पण जगभर आग लागण्याच्यी भितीने अथवा घडलेल्या काही प्रसंगामुळे बी एम डब्ल्यु मिनी कुपर ज्या २३५००० इतक्या आहेत आणि ज्याची किंमत २२००००० रु असणार आहे ती घेण्या बद्दल चढाओढ असेल.

छोटी छोटी चिनी उत्पादने पाहिली कि वाटते, आम्हा भारतीयांच्या गरजांना लागणारी अशी उत्पादने आम्ही तयार करावीत असे कोणालाही का नाही वाटले? बाहेरचे ते चांगले आणि आमचे ते टुकार ही मानसिकता का झाली असवी?

वर लिहिल्या प्रमाणे आपण सुद्धा त्याच दिशेने जाणार आहोत, जातो आहोत, पण त्याचे भारतावर दुरगामी आणि अत्यंत वाईट परिणाम होतील असे वाटते. मुळात भारत हि जगातली मोठी बाजारपेठ आहे हे जगाने सुद्धा ओळखले आहे. पण त्याचा फायदा भारतीय लोकं भारतीय उत्पादने तयार करुन आणि विकत घेऊन मिळवतील असे वाटत नाही.






चांगला विषय आहे

सहमत्. उत्तम प्रकारे विषय मान्डलात. या बाबत् भारतीय मानसिकता बदलण्याची गरज आहे.

भारतात नक्की काय बनते?

भारतात तयार होणार्‍या प्रत्येक आधुनिक वस्तूत परकीय तंत्रज्ञान अथवा परकीय सुटे भाग अंतर्भूत असतात. १००% स्वदेशी असे अंतिम उत्पादन काय आहे?
मला वाटते फारतर 'हस्तकला' अथवा 'कुटिरोद्योग' सदराखाली मोडणारी बोटांवर मोजता येऊ शकणारी उत्पादने, कपडे आणि भांडी.
त्यातही कापड बनवण्याची यंत्रे परकी आहेत. इतर परकीय उत्पादनांचे आक्रमण आहे. पतंग, फटाके, चपला, देवदेवतांच्या रंगीत मूर्ती, फर्नीचर हे सारेच आयात होत आहे.
भारतातील बहुतांशी सर्व मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या तर आपल्या नावाचे स्टिकरतरी भारतातच बनवतात की नाही कुणास ठाऊक.
तथाकथित स्वकीय आयटी इंडस्ट्रीत वापरली जाणारी सर्व सॉफ्टवेअर्स परकी आहेत. (उदा. डेटाबेस, ओ.एस.,आय.डी.ई., कंपायलर्स इ.)
भारताच्या तंत्रज्ञानाला एकच नाव द्यावेसे वाटते - जे.ओ.टी. ऊर्फ 'जॉट' = जुगाड ओरिएंटेड टेक्नॉलॉजी.

जॉट - सहमत

तसे सर्वच ठिकाणी आता जॉट आहे. पण आपल्या अर्थव्यवस्थेला पुरक जॉट जास्त महत्वाचा. भारतीयांची मानसिकता, त्यांनी निवडुन दिलेली सरकारे आणि त्यांचातलेच राजकिय कार्यकर्ते यांना फक्त स्वतःचे खिसे माहित आहेत. भारताची लोकसंख्या, काळ्या पैश्याची हाव, प्रत्येक गोष्ट करण्याचा अनैतिक मार्ग शोधण्याची मानसीकता आणि त्यात धन्यता मानण्याचे मन यांच्या समोर सध्या तरी आपण हात टेकले आहेत.

जाता जात गमतीशीर निरिक्षण - येथे उत्पादन संशोधन असा एक समुदाय आहे. त्यात झालेले लेखन खरच नगण्य आहे. पण धर्म, अंधश्रद्धा अश्या चावून चावून चोथा झालेल्या विषयांवरच्या चर्चा मात्र भरपुर आहेत. असो, कोणा बद्दल वैयक्तिक आकस नाही. कदाचित उपक्रमींना त्यात जास्त रस आहे. :)





हा हा...

सहमत आहे.
ह्याउप्पर म्हणजे, सो कॉल्ड स्वकीय कंपन्यात सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर्स खणखणीत पैसे मोजून वापरता तरी येतात, पण डिआरडिओ, (अगदी इस्त्रो सुद्धा) वगैरेंना खूपशा अमेरिकन कंपन्यांनी आणि सगळ्या जपानी कंपन्यांनी काळ्या यादीत टाकलेलं आहे, त्यामूळे चोरून काम करावं लागतं आणि बहूतेक वेळा तेही जमत नाही म्हणून (भरमसाठ सोई सुविधा आणि पगार देवून ठेवलेले इंजिनिअर्स असूनही) काम आउटसोर्स केलं जातं. अगदी छोट्या छोट्या मोड्यूल साठी कोट्ट्यावधींचं टेंडर पास् केलं जातं.

विषय भरकटतोय, पण हे सगळं अगदी जवळून बघितल्यामूळे रहावलं नाही म्हणून प्रतिसाद दिला. :)

विषय भरकटणे

माझ्या लेखात मी एक मूलभूत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. ऍपलचे बिझिनेस मॉडेल भारतासारख्या देशाला फायदेशीर आहे की नाही? परंतु बहुतेक प्रतिसाद भारतातील कंपन्या कशा नालायक आहेत हे सांगणारे आढळले आहेत.
मी गेली ४० वर्षे तरी उत्पादन क्षेत्राशी निगडित असल्याने ४० वर्षापूर्वीच्या कल्पना आता लागू पडत नाहीत याची मला चांगलीच कल्पना आहे. जागतिकीकरणाच्या हवेत माझ्या उत्पादनातील सर्व घटक मीच बनवणार असा आग्रह धरणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. टाटा नॅनो मध्ये आयात केलेले अनेक घटक आहेत म्हणजे काहीतरी चुकते आहे हे मला मान्य नाही. उत्पादन म्हणजे फक्त पार्टस किंवा घटक उत्पादन नव्हे. एखादी कल्पना घेऊन ती प्रत्यक्षात आणणे व तो प्रॉडक्ट सतत बनवणे म्हणजे उत्पादन आहे. त्यातले काही घटक जर स्वस्तात मिळत असले आणि ते आयात केले म्हणजे नॅनो कारचे उत्पादन भारतात होत नाही हे म्हणणे मला पटत नाही.भारतासारख्या देशाला कच्चा माल, घटक आराखडे जिथे मिळेल तिथून आणून जागतिक दर्जाचा एखादा प्रॉडक्ट भारतातल्या कारखान्यातून बनवणे हे महत्वाचे आहे मग ती हुन्डाईची गाडी असो किंवा नोकियाचा फोन असो. हे काम जर बाहेर गेले तर मात्र काळ कठिण आहे. अमेरिकेला हे परवडू शकते भारताला परवडणार नाही.
सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत

आपल्या सर्व वाक्यांशी मी सहमत आहे. विषय भरकटला हे पण मान्य आहे. मुळात तुम्ही प्रतिसादामध्ये जो मुद्दा मांडला आहे तोच भारतीयांच्या पचनी पडताना दिसत नाही.
उत्पादब भारतीय असले पाहिजे म्हणजे नक्की काय याच्या संकल्पना कोण ठरवणार? माझी स्वतःची संकल्पना तुमच्या मता प्रमाणे आहे. उप्तादन त्याच्या मुळ संकल्पने पासुन ते त्याची पुढची आवृत्ती निघुन ते उत्पादन काळानुरुप बदलणे अथवा बंद पडणे या सर्वाचा भारातातल्या बाजारपेठेला फायदा होत असेल तर ते होणे गरजेचे आहे.
नॅनो भारतात बनण्याने फायदा कोणाला झाला पाहिजे? कारखाना चालविणारे चालक/मालक, पुरवठादार, विक्रेत्यांची साखळी, अंतिम ग्राहक, आणि अनेल अप्रत्यक्ष लोकं जे या धंद्यामुळे जोड धंदा मिळवून आपला चरितार्थ चालवतात.






आर्थिक उन्नती आणि कठिण काळ

भारतात ज्या वेगाने अकुशल कामगार आणि अर्धशिक्षित इंजिनियर्स यांच्या पगाराच्या अपेक्षा वाढत आहेत, ज्या गतीने महागाई वाढत आहे, ज्या गतीने चलनफुगवटा होत आहे, (थोडक्यात भारताची अमेरिका* (आर्थिक) होऊ पहात आहे) त्या वेगाने पाहता नजीकच्या काळात बर्‍याच कंपन्यांना भारतात अंतिम उत्पादन (असेंब्ली) करणेही अशक्य होणार आहे. नॅनो कारची किंमत वाढवणे टाटाला भाग पडले याचे कारण चलनवाढ/महागाई आणि मानवी संसाधनांची मूल्यवृद्धी (ओव्हरहेडस् ) हेच आहे.
यापुढे अशा उत्पादनाचे देश म्हणून आफ्रिका खंडातील देश हळूहळू पुढे येतील. चीन, तैवान सारख्या देशांमध्ये मुळात नव्या तंत्रज्ञानाने तयार होणारे अनेक पार्ट मोठ्या प्रमाणावर बनत आल्याने (अशा पार्टमध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असतो) त्यांची किंमत देशातल्या देशात कमी राखता येते. (उदा. सेन्सर्स)
त्यामुळे आर्थिक उन्नतीचे दुष्परिणाम त्या देशांमध्ये अंतिम उत्पादनाच्या किंमतींवर (बॉम) फारसा परिणाम करणार नाहीत.

भारतात जर तंत्रज्ञानावर आधारित स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर आणि कमी किंमतीला उत्पादीत होऊ लागले तरच आपल्यावर गुदरणारा कठिण काळ आपण टाळू शकू.
दुसरा उपाय म्हणजे मानेवर दगड ठेऊन सर्वच कंपन्यांनी नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या मागे लागले पाहिजे.
नाहीतर आपली (आर्थिक) अमेरिकाही होणार नाही किंवा चीनही! येत्या दहा वर्षात आपण जिथे आहोत तिथेच असू आणि आफ्रिकन देश आपली जागा बळकावू लागतील.

*स्पष्टीकरण - अमेरिकेचे दुखणे नक्की काय आहे? माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला तर असे वाटते की अमेरिकन नागरीकांच्या नोकरीकडून असलेल्या अपेक्षा. भरपूर पगार, कमी तासांचे काम, भरपगारी सुट्टी हे सारे तेथल्या कायद्यानेच त्यांना मिळाले आहे. असे ऐकून आहे की भारतातून गेलेले एच वन् लोक मूळ अमेरिकन माणसाच्या निम्म्या पगारावर तेथे दुप्पट काम करतात. अमेरिकेने आपले सुटलेले पोट जरा घट्ट आवळले तर अमेरिकेतील उद्योग पुन्हा मार्गी लागण्यात काहीच बाध नाही. कारण तंत्रज्ञान तर त्यांच्याकडे आहेच.

 
^ वर