मराठी वर्णमाला व अंकलिपी आणि सचित्र शब्दकोश
लहान मुलांसाठी काही लेखन सुरू केलं, तेव्हा बर्याच गोष्टी सुचत गेल्या. यातले काही प्रकल्प 'सेमि क्रिएटिव्ह' होते. त्यामागे काही कारणं होती. पुस्तकांच्या दुकानांमध्ये ( मराठी व इंग्रजी ) गेलं तर ( माझ्या भाचरांसाठी मराठी पुस्तकं घ्यायला गेले होते. ज्यातली काही महाराष्ट्राबाहेर व परदेशात आहेत, इंग्रजी माध्यमात शिकतात. ) मुलांसाठी काय-काय मिळतं हे पाहिल्यावर काही गोष्टी ध्यानात आल्या.
१. वयोगटानुसार मराठीत बालसाहित्य पुरेसं उपलब्ध नाही.
२. वर्णमाला आणि अंकलिपीची पुस्तकं आणि चार्ट पाहिले, तर ते अत्यंत जुनाट आहेत. ( प्रचलित नसलेले शब्द, जुन्या तर्हांची साधी चित्रं वा दर्जा नसलेली सुमार छायाचित्रं, जुने ठोकळेबाज फॉन्ट. ) खेरीज कल्पनाशून्य आहेत. ( एकूणच कल्पनादारिद्र्याच्या रेषेखाली...)
३. साधे मुलांना हाताळता येतील असे लहान शब्दकोश ( पॉकेट डिक्शनरीज्) उपलब्ध नाहीत. आणि सचित्र शब्दकोशांची तर वानवाच आहे.
४. नवनीत सारख्या प्रकाशकांनी जी शालेय उपयोगाची पुस्तकं प्रकाशित केली आहेत, त्यांचा दर्जा साधारण असला तरी, तीही आपल्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये व पुस्तकप्रदर्शनांमध्ये उपलब्ध नसतात.
५. ज्योत्स्ना प्रकाशनाने सातत्याने मुलांसाठी चांगली पुस्तके ( व रंगीतही ) प्रकाशित केली आहेत, हे समजल्याने प्रकाशकांना भेटून पुस्तकं पाहून ( काही विकत घेऊन ) आले. तर बरीचशी पुस्तकं अनुवादित आहेत. मजकूर कमी व चित्रं अधिक असलेली ही सुंदर पुस्तकं चित्रांचे हक्क घेऊन प्रकाशित केल्याने आर्थिक गणित जुळले आहे. इथे चित्रकारांकडून नव्याने चित्रं काढून घ्यायची म्हटली तर ते आवाक्याच्या बाहेर जाते. त्यामुळे स्थानिक व नवे संदर्भ असलेला मजकूर दर्जेदार असला तरी रंगीत पुस्तकं प्रकाशित करणं प्रकाशकांना परवडत नाही. परिणामी "मराठी" वातावरणातील पुस्तकं आढळत नाहीत.
Comments
सूचना व सल्ले
यानंतर एका प्रकल्पाची मी आखणी केली आहे. त्यात वर्णमाला व अंकलिपी नव्याने डिझाईन करत आहे. त्यात गोष्टीरूप काही आणता येईल का आणि अक्षरांची कॅरिकेचर्स इत्यादी काय गमती करता येतील याचा विचार करतेय. इंग्रजीतल्या उत्तम पुस्तकांना ( मजकूर, चित्रं आणि एकूण निर्मिती अशा अंगांनी ) चटावलेली मुलं न्यूजप्रिंट वर छापलेली मराठी पुस्तकं हातात धरत नाहीत. त्यामुळे ही पुस्तकं रोचक व दर्जेदार कशी बनवता येतील, याचा विचार करते आहे. काही सचित्र शब्दकोशही तयार करते आहे. नमुन्याची डिझाइन्स तयार केली आहेत. आपण आपल्या काही सूचना व सल्ले दिलेत, तर प्रकल्प नेटका होण्यास मदत होईल. म्हणून ही चर्चा.
आजी आजोबांच्या वस्तू
मागे उपक्रमावर अश्याच प्रकारचे विचारमंथन झाले होते. याच विचारांनी लहान मुलांसाठी आजी आजोबांच्या वस्तू ही लेखमाला मी इथे लिहिली होती. काहि जालीय सदस्यांनी ही आपापल्या घरातील लहानग्यांना वाचायला दिली असता त्यांना ती आवडल्याचे अभिप्राय मला आले होते. या लेखमालेसारखे/ लेखमालेतील लिखाणाने मदत होणार असेल तर सांगावे. (अर्थातच येथील लेखनावर संपादकीय संस्कार नाहीत पण ते गरज पडल्यास करता यावे)
या लेखमालेसारखेच इतर काही सदस्यांनी लहानग्यांसाठी / लहानग्यांविषयीचे लेखन व्हावे म्हणून उपक्रमवर बालसाहित्य हा समुदाय चालु केला आहे.
या व्यतिरिक्त ऐसीअक्षरे.कॉम वरही छोट्यांसाठी हा विभाग आहे.
जालीय सदस्यांच्या लिखाणातील काहि हवे असल्यास त्या लेखकास व्य्नी/खरड आदी माध्यमांतून थेट संपर्क साधु शकालच
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
कळवावे.
मालिका वाचली. ती कुठे प्रकाशित केली आहेत का? पुस्तकरूपात? कळवावे.
ऐसी अक्षरे पाहिले. छोट्यांसाठीच्या विभागात केवळ कविता दिसल्या. असो.
कुठेही नाही
ही मालिका केवळ उपक्रम.कॉम वरच प्रसिद्ध केली आहे. अन्यत्र नाही. पुस्तक किंवा अन्यत्र छपाई कुठेही नाही.
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
डिजिटल मिडियामध्ये हवीत
लहान मुलांसाठी पुस्तके डिजिटल मिडियामध्ये हवीत. विशेषतः अमेरिकेत डोरा द एक्स्प्लोरर* सारखे जे एज्युकेशनल गेम्स मिळतात तसे काहीसे हवे.
माझ्या मुलीला थोडंफार मराठी वाचता येतं. तिच्यासाठी मी अंकलिपी वगैरे पुस्तके आणली होती पण ती पाहून ती प्रचंड कंटाळली. कविता यांनी म्हटल्याप्रमाणे त्यातील शब्द वगैरे इतके जुनाट आहेत (उदा. इरलं) की शब्द, शब्दार्थ वगैरे समजवूनसुद्धा रोजच्या पाहण्यातील वस्तू नसल्याने समजावून घेणे कठीण होत होते. माझा अनुभव असा की ती आठवड्याभरात बाराखडी शिकली आणि मग मोठी पुस्तकं घेऊन र..ट..फ.. करत का होईना अर्ध पान वाचू लागली पण त्या अंकलिपी वगैरेच्या भानगडीत पुन्हा पडली नाही.
* वर दिलेल्या दुव्यात नक्की कोणते गेम्स आहेत ते पाहिलेले नाही पण डोरा आणि तत्सम कॅरेक्टर्सचे एज्युकेशनल गेम्स मुलांना आवडतात.
इ बुक्स
लहान मुलांसाठी पुस्तके डिजिटल मिडियामध्ये हवीत.
हे खरं आहे. मात्र अद्याप त्यात रस घेणारं मला आपल्या प्रकाशकांपैकी कुणी भेटलेलं नाही. नवं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे इत्यादी सगळेच बोलतात. ( म्हणजे ते त्यांना वैचारिक दृष्ट्या पटतं आणि त्यासाठी त्यांचा 'मॉरल सपोर्ट' असतो! :-). ) पण प्रत्यक्ष कृतीसाठी सगळेच कचरताहेत अजून. त्यातले गणित त्यांना कळत नाही, नवे करण्याची जोखीम उचलण्याची तयारी नाही, आहे तेच पुष्कळ आहे असं वाटतं इत्यादी कारणं.( त्यामुळे तर 'कुहू' ही मल्टीमीडिया कादंबरी मला स्वतःला कर्ज काढून प्रकाशित करावी लागली.)
आता शक्य इतकंच की अशा पुस्तकांच्या कल्पना असतील तर आर्टवर्क स्वतः करून चित्रकाराचा मोठा खर्च वाचवणे आणि इ बुक्स करून प्रिंटींगचाही खर्च वाचवणे.
एज्युकेशनल गेम्सच्या तर असंख्य गमती करता येण्याजोग्या आहेत मराठीत. निव्वळ भाषिक खेळ पाहिले, तरी ते अमाप आहेत. इतर विषयांची बात अजून निराळी.
बुकगंगा
काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील जनमानस कार्यक्रमात बुकगंगाचे प्रकाशक (संजय पेठे?) नव्या तंत्रज्ञानाबद्दल खूप बोलले. ते लेखकांना घसघशीत रॉयल्टीही देतात असे म्हणाले.प्रयत्न करायला हरकत नसावी.
मुलांसाठी
लहान मुलांसाठीची पुस्तके डिजिटल माध्यमातही (माध्यमातही मधील ही ही माझी पुस्ती) हवीत आणि ती घरच्याघरी छापण्याची (प्रिन्टेबल) सोयही हवी.
अमेरिकेतील टिवीवर इतर भाषांमधील शब्द मुलांना शिकवण्यासाठीच्या कार्यक्रमांमधील जाणवलेली चांगली गोष्ट म्हणजे कार्यक्रमांमधील कार्टून्स एकमेकांशी इंग्रजीत बोलतात आणि अमक्या (इंग्रजी) शब्दाला स्पॅनिश/चायनीजमध्ये अमूक म्हणतात, तुम्हीही माझ्या मागे म्हणा अमुक... अशाप्रकारचे संवाद करतात. त्याउलट जालावर काही मराठी आणि तेलुगु संकेतस्थळांवर असलेल्या छोट्या कार्यक्रमांमध्ये त्यातील पात्रे संपूर्ण संवाद मराठी/तेलुगुत करतात. असे कार्यक्रम पाहताना मुले कंटाळतात कारण त्यांना काही समजत नाही. डोरा आणि काय्लान मात्र आवडीने पाहतात आणि पाहताना स्पॅनिश आणि चायनीज शब्दही शिकतात.
तेव्हा मुलांसाठीची पुस्तके वा कार्यक्रम सुरुवातीला इंग्रजीतून संवाद आणि त्यातील एखाद-दुसरा शब्द मराठीत असे हवेत. पुस्तक/कार्यक्रममाला काढून हळूहळू पुढील पुस्तके/कार्यक्रमांमधील संवादांतील मराठी शब्दांची संख्या वाढवत नेऊन शेवटी संपूर्ण पुस्तक/कार्यक्रम मराठीतून वाचता/पाहता समजावा अशा प्रकारे रचना हवी असे वाटते.
अर्थात अमेरिकेतील मुलांना घरी वगळता मातृ/पितृभाषा इतरत्र कानांवर पडत नाही. त्यात आमच्या घराप्रमाणे मातृ आणि पितृभाषा वेगवेगळी असल्यास आई-वडील एकमेकांशी प्रामुख्याने इंग्रजी/हिंदीत संवाद साधत असल्याने मुलांच्या कानावर तेवढेही अधिक शब्द पडत नाहीत. मात्र भारतातल्या मुलांच्या बाबतीत हे होत नसल्याने प्रामुख्याने भारतातील मराठी मुलांचा विचार केल्यास माझी सुचवणी तेवढी योग्य ठरेलच असे नाही.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान
द्वैभाषिक
या बाबतीत एक प्रकार आपल्याकडे केला गेला आहे. पुस्तक द्वैभाषिक करणे. एका पानावर जो मजकूर इंग्रजीत असेल तोच समोरच्या पानावर मराठीत ( वाया उलट ). तुम्ही सुचवलेला पर्यायही चांगला आहे. मात्र आधी स्थानिक, बहुसंख्य मुलांचा विचार व्हावा आणि मग परदेशस्थांकडे वळावे, असे सध्या वाटते आहे. ( हे वाटणे बदलूही शकते. :-). फक्त तसे ठोस काही सुचले पाहिजे. )
किंचित फरक
वाटणे बदलू शकते असे म्हणताय तर किंचित बदलाचा एक विचार सुचवते.
आधीस्थानिक, बहुसंख्य मुलांचा विचार व्हावा आणिमगसोबत परदेशस्थांकडेही वळावे.:-).
सहमत आहे. :-).
बहुभाषिक परिवार
भारतातही हे होतं. आणि अनेकदा असं ही होतं की मुलांच्या आई किंवा वडिलांचे आई-वडीलही वेगळ्या प्रांतातले असतात; मग दोन नाही तर तीन भाषा मुलांच्या कानावर कमी अधिक पडतात. पण सगळ्या भाषा त्यांना व्यवस्थित बोलायला, किंवा वाचायला शिकवणे कठीण जाते. अनेक पालक या त्रासात न पडता मुलांसाठी फक्त इंग्रजी पुस्तकं निवडतात (माझ्या वैयक्तिक अनुभवावरुन, मित्र-परिवारात पाहिलेले) पण ज्यांना मुलांना इंग्रजी सोडून बाकीच्या भाषांवर भर द्यायचा असतो, त्यांना जास्त कठीण जाते.
अशा मुलांसाठी भारतीय भाषांचे बहुभाषिक कार्यक्रम, किंवा पुस्तके उपलब्ध असती (फक्त हिंदी + १ नव्हे, पण मराठी-कानडी, मराठी-बंगाली, तेलुगु-तमिळ, इ) तर काय मज्जा! पर प्रांतात वाढणार्या मुलांना त्यांच्या मातृ-पितृ भाषेबरोबरच स्थानिक, किंवा आजोळची भाषेची ही सवय होऊ शकते. पण कदाचित असली पुस्तके, किंवा सी-डी-कंप्यूटर वापरणार्य वर्गामध्ये इंग्रजीचा प्रचंड प्रभाव आणि पोच असल्याने असल्या पुस्तकांना आज तेवढी गरज भासेल का, माहित नाही.
*********
धागे दोरे
*********
इ / ई , उ / ऊ
या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द, -जे चित्रातून, वर्णमाला शिकण्यास तयार असलेल्या वयोगटातील बालकाच्या मनःचक्षूंसमोर काही साकार वस्तू निर्माण करू शकतील असे - कृपया सुचवावे हे.वि.
(ता.क. इरले अजुनही खेड्यापाड्यांत् वापरले जाते. पूर्वी ज्यूटच्या/तागाच्या कापडाचे बनलेले असे. आजकाल् प्लॅस्टिक धाग्याने बनलेल्ल्या खताच्या गोण्या इरले म्हणून वापरात येतात. तरीही इरले म्हटल्यावर ५-६ पावसाळे पाहिलेल्या लहानग्यांस् नक्की काय ते समजु शकते.)
इस्त्री-ईमेल-उप्पीट-ऊस
इस्त्री-ईमेल-उप्पीट-ऊस
इ / ई , उ / ऊ
इ - इमारत (मला हा उपयोगी पडला कारण हिंदी-मराठी दोन्हींत चालतो). असेच इनाम या शब्दाबाबत.
ई - ईद (याचेही हिंदी-मराठीमुळे बरे पडले)
उ- उपमा (तेच उप्पीट), उघडाबंब (हा मोठा शब्द असला आणि मजेशीर वाटला तरी वापरातला वाटतो.), उजवा (उजवा हात वर केलेली व्यक्ती दाखवता येते चित्रात)
ऊ - ऊदबत्ती
हे ही पाहा
बालकथा
मागे मितान यांनी बालकथांचा स्वैर अनुवाद अशी अप्रतिम मालिका चालवली होती. ती मायबोलीवर आहे. शक्य झाल्यास त्यांना या प्रकल्पात नक्की सहभागी करून घ्यावे. (त्यांचे साहित्य जालावर चोरले गेल्या नंतर त्यांचा आंतरजालिय लेखन रसभंग झाला असावा. कारण सध्या मला त्या जालावर दिसत नाहीत.)
डोरा
वर डोराचा उल्लेख आला आहे. डोराच्या निर्मितीमागे निकेलोडेन् (माध्यम कंपनी) ने प्रचंड गुंतवणूक केली आहे. बाल मानसशास्त्रज्ञ, मार्केटिंगची फौज, प्रचंड मोठे बजेट आणि बहुराष्ट्रिय कंपन्यांशी हातमिळवणी अशी अनेक स्तरांवर केलेली आखणी आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून जागतिक पटलावर पुढे येणार्या भाषांना स्थान दिले गेले आहे असे दिसते.
लहानांच्या मानसिकतेचा उपयोग करून - एखादी गोष्ट पुनःपुन्हा घटववून घेण्याकडे डोरा चा कल असतो. सगळी प्रमुख वाक्ये वारंवार उचारली जातात. लहानांनाही पुनःपुन्हा येणारे उच्चार आवडतात. (बहुदा म्हणून ओल्ड मॅक्डोनल्डचे गाणे मुलांना आवडत असावे - परत परत येणारे इय्या इय्या ओ!)
यातले संगीत (जवळपास एकसूरी) आणि तेच ते असते. त्याचीही एकप्रकारे सवय होत असावी. (वैयक्तिक रित्या मला डोरा या पात्राचा आवाज (क्रिस्टिना ऍन्ब्री) इतका आवडत नाही.)
कुणी ऍनिमेशन स्वरूपात काही करणार असेल तर निकेलोडेन् नी केलेला अभ्यास आणि वापरलेले 'तंत्र' मराठीसाठी उचलायला काहीच हरकत नाही, कारण तसे ते प्रुव्हन टेस्टेड आहे :)
(तंत्र उचलण्यात प्रताधिकार भंग होत नसावा अशी आशा आहे - कारण एखादा कार्यक्रम मराठी भाषेत कसा सादर करायचा किंवा लहानांसाठी मराठी भाषा कशी असावी, यावर कुणाचा प्रताधिकार नसावा असे वाटते.)
प्ले स्कूल
ऑस्ट्रेलियन एबीसी या चॅनलवर प्ले स्कूल नावाच एक अतिशय सुंदर कार्यक्रम असतो. (मुळ कार्यक्रम बीबीसीचा पण हा त्यावर आधारीत आहे.) हा कार्यक्रम नक्की पाहा. यामागेही बाल मानसशास्त्रज्ञांची एक समिती आहे. त्यांनी परवानगी दिल्या नंतरच हा प्रसारित होतो. यातील प्रत्त्येक शब्द आणि कृती लहान मुलांसाठी योग्य आहे अशी पारखून घेतलेली असते. कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग - शाळेत जाण्या आधीची मुले ४ वर्षांच्या च्या आसपासची.
स्वरूप - गाणी, ऍक्टिव्हिटी आणि खेळ यातून मूलभूत शिक्षण असे आहे.
यात कोणत्याही बहुराष्ट्रिय संस्थेशी हातमिळवणी नसल्याने कोणताही छुपा अजेंडा किंवा जाहिरातबाजी असे काहीही नाही. लहानमुलांसाठी अतिशय सोपा आणि सहज असा हा कार्यक्रम आहे.
ऍनिमेशन्स
जिंगल टून ने मराठीमध्ये तशी ऍनिमेशन्स आणली आहेत पण त्यात 'ससा चिरुट पितांना दाखवणे', किंवा भयंकर संगीत असणे, सश्याने (जेम्स बाँड सारखे) पिस्तुल चालवणे रक्ताचे ओघळ येणे वगैरे दृष्ये दाखवली आहेत. असे प्रकार टाळले तर उत्तम!
तूर्तास इतकेच -
जमेल तसे तुमच्या प्रकल्पात सहभागी व्हायला आवडेल.
-निनाद
धन्यवाद.
या सर्वच मुद्यांचा नक्की विचार करेन. आवश्यकतेनुसार संपर्क साधेन. धन्यवाद.
ईपुस्तके काढा
येत्या काळात मुलामुलींच्या हाती आकाशसारखा टॅबलेट असणार आहे. त्यामुळे ईपुस्तके काढाच. अँड्रोइड, आयोएस आणि विंडोज स्मार्टफोनांसाठी आणि टॅबलेटांसाठी ऍप्लिकेशनेही बनवावीत. ह्या ऍप्लिकेशनांची किंमतही फारशी नसते. राज्यातली पाठ्यपुस्तक मंडळे, एनसीईआरटी आणि तत्सम संस्था येत्या काळात कदाचित अशी ऍप्लिकेशने बनवतीलही. किंवा तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडून बनवून घेतील. असो. कपिल सिब्बल ह्यांना विचारायला हवे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
किंमत आणि खर्च
ह्या ऍप्लिकेशनांची किंमतही फारशी नसते.
: किंमत फारशी नसणे निराळे आणि खर्च किती होतो हे निराळे. हे गणित जमले तरच बाकी सारे खरे.
उत्तम प्रकल्प
उत्तम प्रकल्प, मी देखील ज्योत्स्ना प्रकाशनापाशीच येउन थांबलो पण त्यांच्याकडेही फार पुस्तके नाहीत.
उत्तम चार्ट आणि उत्तम पॉकेट पुस्तक बरेच उपयोगी पडू शकेल.
>>इंग्रजीतल्या उत्तम पुस्तकांना ( मजकूर, चित्रं आणि एकूण निर्मिती अशा अंगांनी ) चटावलेली मुलं न्यूजप्रिंट वर छापलेली मराठी पुस्तकं हातात धरत नाहीत
हे जरी खरे असले तरी त्याचे नाविन्य २च दिवस असते त्यामुळे त्यावर फार खर्च करणे अयोग्य वाटते, अर्थात त्यासाठी पालकही जबाबदार आहेत, तरीदेखील फक्त उत्तम प्रिंटचीच पुस्तके आणणे कधी कधी अनाठायी खर्च वाटतो.
आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा.
:-(
अनाठायी खर्च वाटतो.
जी सुरुवात असते ती तरी अनाठायी वाटू नये. इतर खर्चाचे प्रमाण पाहिले तर वास्तव ध्यानात येते सहज. उदा. खेळणी व खाऊ.
प्रकल्प फलद्रूप व्हावा हि शुभेच्छा!
संकल्पित प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा!
काहि प्रश्न आहेत.
> ह्या प्रकल्पाचे आर्थिक गणीत तुम्ही कसे काय सोडवायचे ठरवले आहे?
> 'कुहु' च्या निमित्ताने तुम्ही प्रसिद्ध झालाच आहात. ह्या प्रकल्पातील निर्मितीजन्य काम देखिल तुम्ही केवळ तुमच्याकडून व्हावे, अशी तुमची प्रबळ इच्छा आहे कां?
> ''कुहू' ही मल्टीमीडिया कादंबरी कर्ज काढून प्रकाशित करावी लागली.' हे वाक्य वाचून मनात शंका आली कि
'तुम्हाला त्याची सल आहे?' की
'कायद्याच्या चौकटीत एखादी कंपनी स्थापित करून त्या योगे आर्थिक पाठबळ उभे करून छंदातून व्यवसाय कसा उभा करावा? इतरांकडून काम करवून घेत तो व्याप कसा सांभाळावा? या बाबत तुम्ही अजाण होता म्हणून तसे घडले. असे तुम्हाला म्हणायचे होते कां?
कंसातील ते वरील वाक्य लिहीण्याचे नेमके कारण काय?
> महाराश्ट्रात मराठी शाळा बंद पडताहेत, इंग्रजी माध्यमिक शाळांमध्येच पालक आपल्या पाल्यांना आवर्जून घालत आहेत. तरुण मुलं-मुली हिंदी-इंग्रजी मिसळलेली भाशा बोलत/ वाचत/ लिहीत असतात.
नव-नवीन संपर्काची उपकरणे, नवनव्या तंत्रद्न्यानाने लिप्त होवून भारतात आदळत आहेत. अशात टंकण्यास कठिण असणार्या, किचकट देवनागरी लिपीतील मराठी पुढच्या काळात टिकेल कां? ह्याच भीतीने अनेक व्यवसायिक ह्यात आर्थिक गुंतवणुक करण्याचे धाडस करीत नाहीत. (उदा. युनिकोड साठी अनेकांनी मराठी साठीचे फॉट डिझाइन व विक्रि केले होते. युनिकोड आल्यानंतर सगळे बाराच्या भावात गेले.)असे असताना असे प्रकल्प सुसाध्य (फिसीबल) होवू शकतात कां?
> मराठी भाशेतील पॉकेट शब्दकोश काय कामाचे? मराठीत असे कोणते द्न्यान विकसित होते? जुनी वाक्यरचना वा एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भातून वापरणं ह्या व इतर गोश्टी आपण अजूनही सोडू शकत नाहीत. मग इंग्रजीत लहान मुलांसाठी वेगवेगळी पुस्तके, दुचिवावर वा टॅबलेट वर दाखवता येतील असे खेळ, कहाण्या, गाणी आहेत म्हणून आपल्याकडे देखील असं हवं हा अट्टहास कशासाठी? इंग्रजीच कां नको? आपल्या सगळ्यांना विकास फक्त छान-छान दिसण्यापुरताच हवा आहे कां? पण मग ह्याला विकास तरी कां म्हणायचा?
उत्तरं १
ह्या प्रकल्पाचे आर्थिक गणीत तुम्ही कसे काय सोडवायचे ठरवले आहे?
< अर्थातच स्वतः छापिल पुस्तके प्रकाशित करणार नाही. वेळ आलीच तर नुसती इ-बुक्स करेन. कारण 'कुहू'चे कर्ज अद्याप फिटायचे आहे.
कुहु' च्या निमित्ताने तुम्ही प्रसिद्ध झालाच आहात. ह्या प्रकल्पातील निर्मितीजन्य काम देखिल तुम्ही केवळ तुमच्याकडून व्हावे, अशी तुमची प्रबळ इच्छा आहे कां?
< प्रसिद्ध मी 'ब्र'च्या वेळीच झाले होते. पण प्रसिद्धीचा व्यवहारात उपयोग करून घेण्यास माझ्यासारखे लोक सुदैवाने नालायक असतात. त्यामुळे प्रसिद्धीत न अडकता पुढची कामं सुरू होतात, हा फायदा.
या प्रकल्पाचे काम केवळ माझ्याकडून व्हावे, असा अट्टहास नक्कीच नाही. दोन प्रकाशकांनी रस दाखवला आहे. अजून काहींना मी विचारणार आहे. कारण प्रकल्प अधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी वितरणादी उत्तम व्यवस्थेची गरज असते. ते ज्यांच्याकडे खात्रीचे वाटेन त्यांच्यासोबत काम करेन. 'कुहू'चे कामही मी एकटीने केले नव्हते. पन्नासेक लोकांची मोठी टीम होती. बहुतेक उत्स्फुर्तपणे जमलेले. काही व्यावसायिक.
उत्तरं २
सल आहे?
> हो आहे. उत्तम व्यावसायिक होण्याचे स्वप्न, ध्येय इत्यादी नाही. (ते असते तर हरकत नव्हती.त्यात चुकीचे काही नाही.) प्रकाशक या प्रकल्पाबाबत साशंक होते, म्हणून स्वतः करावे लागले. लेखन, चित्रं आणि इतर कलाकार, तंत्रज्ञांची टीम सांभाळणे व आर्थिक व्यवहार सांभाळणे या दोन पूर्ण वेगळ्या मानसिकतांमध्ये वावरणे त्रासाचे होते. इतक्या वेळात माझ्या पुढच्या दोन कादंबर्या लिहून झाल्या असत्या, ज्या मनात आहेत. मराठी प्रकाशकांना नवीन काही करण्याची उत्सुकता नसणे, याचा सल आहे.
तुमचा पुढचा मुद्दा : शहरांमधल्या मराठी शाळा बंद पडत असल्या तरी खेड्यापाड्यांमधले वास्तव खूपच निराळे आहे. ज्यांना दुर्दैवाने आपण गृहित धरत नाही. / प्रत्येक लिपीचे वेगळे वैशिष्ट्य व वेगळे प्रश्न असतात. रोमन लिपीत स्पेलिंग्जच्या गोंधळामुळे किती विद्यार्थी मागे आहेत, याच्या बातम्या सध्या वृत्तपत्रांमधून येताहेत. / असे प्रकल्प नक्कीच सुसाध्य होऊ शकतात. त्यात काळाशी सुसंगत साहित्य आले आणि मार्केटिंग नीट जमले तर. अनेक उदाहरणे अनुकूल आहेत.
उत्तरं ३
पॉकेट शब्दकोश अर्थातच विद्यार्थ्यांच्या कामाचे आहेत. ज्ञान विकसित होते आहे की नाही यापेक्षा ज्ञान विकसित व्हावे यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरतील. जुने शब्द, वाक्यरचना सोडणे म्हणजे आधुनिक होणे नव्हे. जुन्यासह नव्याचा स्वीकार, निर्माण महत्त्वाचे. इंग्रजीत वा अजून कोणत्याही भाषेत जर काही चांगले असेल तर ते वेगवेगळ्या वाटांनी आपल्या भाषेत आले पाहिजे. जसे आपल्या भाषेतले चांगले ते व वेगळे ते इतर भाषा स्वीकारतात. मी 'भारतीय लेखिका' नावाची ४० पुस्तकांची मालिका मराठीत याचसाठी करते आहे. दुचिवा वर वा टॅबलेटवर दाखवता येणे, हे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे होय. इतरांचे अनुकरण नव्हे. विकास फक्त छान छान दिसण्यापुरता नक्कीच नकोय. हे केवळ दिसण्या-दाखवण्यासाठी करणे एन.जी.ओ.वाले करतात. काम करायचे आहे, ते सर्वार्थाने चांगले करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते निश्चित घटकांपर्यंत पोचवायचेही आहे, तर त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करणे म्हणजे दिखावा नक्कीच नसतो. चांगला मजकूर, चांगले संपादन, चांगला कागद, चांगली छपाई, चांगली प्रसिद्धी व चांगले वितरण... हे प्रत्येक भाषेत घडले पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करावी, हे मला योग्य वाटते... म्हणून मराठीत.
शुभेच्छा
संकल्पित प्रकल्प आवडला. त्याला माझ्याकडून शुभेच्छा!
सचित्र पॉकेट डिक्शनरी ही संकल्पना म्हणून आवडली. त्यातील शब्दनिधीची व्याप्ती किती असेल असा एक प्रश्न पडला.
राधिका
शब्दनिधीची व्याप्ती
राधिका,
शब्दनिधीची व्याप्ती अर्थातच मर्यादित असेल. कारण चित्रं काढता येतील ( तीही सहज समजण्याजोगी, अमुर्त नव्हे!) असे शब्द निवडावे लागले आहेत. ( शब्द निवडून झाले आहेत.) पण त्यासोबत एक बाळबोध चित्र आणि शब्दाचा अर्थ इतकेच देणे मला पुरेसे वाटत नाही. त्यासोबत अर्थविस्तार करणारे असे अजून काही हवे ज्यात मुलांना गंमत व रस वाटेल. ते काय असेल, हे शोधते आहे. काही सुचले तर सांगावे.
एकच कोश न करता लहान-लहान कोशांची मालिका करते आहे, ज्यामुळे शब्दसंख्या वाढू शकेल. पहिला जोडाक्षर विरहित, दुसरा जोडाक्षरसहित... मग पर्यायी, समान-विरुद्ध अर्थाचे इत्यादी बरेच करता येते. मग विशिष्ट विषयांच्या चौकटी घेऊन करता येते.
तुमच्या व्य.नि. ला उत्तर दिले आहे. संपर्कात राहूच. :-).
क्रियापदे आणि नामे
मध्यंतरी लोकसत्तामध्ये चतुरंग पुरवणीत दोन/तीन लेख वाचले (लेखिका लता काटदरे? नक्की आठवत नाही) जे मुलांसाठी चालवलेल्या कार्यशाळांमधील अनुभवांवर आधारित होते. जरा शोधाशोध करून दुवे सापडले तर देईन. त्यात मुलांचे भाषाज्ञान वाढविण्यासाठी केलेल्या उपक्रमांबद्दल होते. उदाहरणार्थ काही क्रियापदे आणि नामे आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. तेव्हा मुलांना प्रत्येक अर्थच्छटेचा वाक्यात उपयोग करण्यास सांगितले होते आणि मुलांकडून कसा उत्तम प्रतिसाद मिळाला असे लेखांचे स्वरूप होते. मुलांनी लिहिलेल्या उत्तरांचे नमुनेही लेखात होते. उदाहरणार्थ, पडणे. मुलांनी लिहिलेली उदाहरणे, पाय घसरून पडण्यातले पडणे, दुपारी जेवण झाल्यावर आजी म्हणाली मी जरा पडते ते पडणे, जीव भांड्यात पडण्यातले पडणे, वगैरे.
शिवाय चतुरंग पुरवणीतच एका बाईंनी त्यांना एका तमिळभाषक मुलीला मराठी शिकवताना स्वत:लाच मराठी भाषेतल्या गमतीजमती सुचत गेल्या त्याबद्दल एक लेख वाचला होता. त्यात "लावणे" हे क्रियापद आपण किती विविध अर्थांनी वापरतो ह्याची उदाहरणे दिली होती. उदाहरणार्थ दार लावणे, वरणभाताचा कुकर लावणे, घाईत असल्याने एखाद्या व्यक्तीला लावून देणे, नोकरीला लावणे, लावालावी करणे, काय कटकट लावली आहे ते लावणे वगैरे. छान लेख होता तो.
सचित्र शब्दकोश करताना निवडलेल्या शब्द आणि क्रियापदांच्या अशा अर्थच्छटांचा वापर करून मुलांना मजा वाटेल अशी चित्रे काढता येतील (एका शब्दासाठी अनेक चित्रे) आणि त्यातून अर्थच्छटाही शिकवता येतील.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान
खूपच छान
सचित्र शब्दकोश करताना निवडलेल्या शब्द आणि क्रियापदांच्या अशा अर्थच्छटांचा वापर करून मुलांना मजा वाटेल अशी चित्रे काढता येतील (एका शब्दासाठी अनेक चित्रे) आणि त्यातून अर्थच्छटाही शिकवता येतील.
ही कल्पना खूपच छान आहे. :-). आवडली. काय करता येईल पाहू.
डिजिटल मीडिया
डिजिटल मीडिया म्हणजे ऑडिओ व्हिडिओ असे असेल तर तसे (विशिष्ट वयोगटाच्या वरच्या मुलांसाठी) करू नये असे वाटते.
कथा तयार स्वरूपात ऐकण्याची/पाहण्याची सवय होऊन वाचनाची नावड निर्माण होत असावी असे निरीक्षण आहे.
नितिन थत्ते
अरेच्चा!
शक्य आहे. परंतु,
वरील सर्व मुद्द्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट मागे पडते आहे याची जाणीव असूनही प्रश्नांची उत्तरे "नाही" अशी द्यावी लागतील. तेच डिजिटल मिडियाचे आहे. तंत्रज्ञानाला अटकाव करता येत नाही. आपल्या मुलांना काय द्यावे आणि काय नाही यावर अंकुश मात्र ठेवता येईल.
वाचन ही व्हिज्युअल प्रॉसेस आहे. लहान मुलांना वाचताना चित्रे दाखवली, किंवा एकाच प्रकारचे शब्द दाखवले तर ते लवकर शिकतात. त्या वया वरच्या मुलांसाठी ऑडिओ-विडिओ म्हणजेच सरळसोट चित्रपट निघतात. :-)
बंदी
थत्तेंशी सहमत आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणांत नवीन तंत्रज्ञानांवर "बंदी" आणावी असे जरी नाही म्हटले, तरी त्यातले तोटे लक्षात घेऊन, जुन्याच पद्धतीला पसंत करणारे पुष्कळ आहेत. यात नवीन तंत्रज्ञानाची भीती किंवा तिरस्कार नाही, तर मागे पडत जाण्यार्या गोष्टींबद्दल "टाकाऊ आहे" असे मत नाही. त्यामुळे "नाही" असेच उत्तर जगात सगळ्यांना द्यावेच लागेल असे वाटत नाही. फोन-तारांमधला फरक, किंवा ई-मेल-पत्रांतला फरक मला तेवढा महत्त्वाचा वाटत नाही, पण बाकीच्या दोन उदाहरणांमध्ये मेंदूचे फंक्षन बदलते; वाचत/पाहत/ऐकत/गणित सोडवत असलेल्या गोष्टीचे आकलन वेगळ्या पद्धतीने होते. त्यामुळे हा तांत्रिकच फरक नसून कॉग्निटिव फरकही आहे. आणि म्हणून मुलांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरतो. कादंबरी वाचणे ज्यांना भानगड वाटते त्यांना सोडून द्या, पण पुस्तक वाचणे आणि त्याच कथानकावर सिनेमा पाहणे यात कथेच्या वरवरच्या साम्यापलिकडे खूप फरक आहे - दोन्ही त्याच प्रकारचे "विज्युअल" प्रकार नाहीत. कॅल्क्युलेटरच्या जास्त वापरामुळे तोंडी, किंवा मनात गणित सोडवण्याचा वेग किंवा क्षमता कमी होते, त्यामुळे अनेक पालक/शाळा मुलांना खूप लहानपासून कॅल्क्युलेटरवर अवलंबून राहू देत नाहीत.
तंत्रज्ञानाला अटकाव कदाचित करता येत नसावा, पण विचारपूर्वक निवड करण्याला, तांत्रिक बदलांच्या तोट्यांच्या परीक्षणाला ही नसावा. त्यामुळे या प्रश्नांना इतके सोपे तांत्रिक उत्तर मान्य होत नाही.
*********
धागे दोरे
*********
डिजिटल मिडिया
तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहेच पण प्रश्न टाकाऊ आहे किंवा नाही हा नसून, तंत्रज्ञानात अग्रेसर राहण्याची जी रॅट रेस आहे त्यात सहभागी होण्यास आपण लायक आहोत की नाही हा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने मारलेली भरारी प्रचंड आहे. मनात असेल किंवा नसेल तरीही त्या वेगात पुढे जाणे क्रमप्राप्त आहे.
यातील आशय आपल्या म्हणण्याप्रमाणेच आहे. ":-)
कॅलक्युलेटर यत्ता २री, तिसरीत वापरायला नको. तेव्हा तोंडी आकडेमोड शक्य असते. (पुढली काही वर्षे कागदावर मांडून शक्य असते. ८वी- ९वीत ती शक्य असेल असे नाही. तेव्हा कॅलक्युलेटर वापरायची परवानगी असेल आणि आवश्यकता असेल तर तो अवश्य वापरावा. शेवटी पेपर तीन तासांत सोडवून होणे महत्त्वाचे असते आणि प्रॅक्टिकल असते.
नक्कीच. :-) मी लहान मुलांच्या अंकलिपी आणि वर्णमालेला विज्युअल प्रोसेस म्हणत होते. (बुलेटेड पॉइंट्स मुद्दे ठळक करण्यासाठी आहेत त्यांचा लहान मुलांनी कॅलक्युलेटर वापरावा असा एकास एक संबंध नाही.) त्यांना वाचन शिकवताना चित्रे किंवा डिजिटल मिडियाने ते शिकवणे उपयोगी पडते असा अनेकांचा अनुभव आहे. माझ्या अनुभवानुसार डिजिटल मिडियामध्ये पुस्तके आल्याने वाचन प्रक्रिया मंदावते याला पुरेसा आधार नाही. कारण जेथे डिजिटल मिडियाने बेसिक रिडींग शिकवले जाते तेथे पुढे मुले वाचनाला कंटाळतात असा डेटा मिळत नाही. परंतु, टिव्ही, विडिओ गेम्स, वी, एक्स बॉक्स आणि अशा अनेक कारणांनी वाचनाची प्रक्रिया मंदावू शकते याबाबत असहमतीही नाही. तेव्हा ही साधने नको असा सूर असण्यापेक्षा त्यांचा बॅलन्स साधणे जमायला हवे एवढेच म्हणत होते.
विरोध नाही
तंत्रज्ञानाला विरोध वगैरे नाहीच.
कंटेण्ट आयता मिळाल्यामुळे वाचून आत्मसात करणे कष्टदायक वाटून वाचन टाळण्याकडे कल होतो. तरीही हॅरी पॉटर किंवा अलिबाबाच्या गोष्टी नंतरही व्हिज्युअल स्वरूपात मिळू शकतात पण अभ्यासाची पुस्तके नाही. वाचनाची नावड झाली की अभ्यास करणे कष्टदायक वाटू शकते.
म्हणून मूळ प्रतिसादात विशिष्ट वयापेक्षा जास्त मुलांसाठी डिजिटल मीडिया कमी असावा असे म्हटले होते.
अवांतर : कॅलक्युलेटरचे म्हणावे तर ज्यासाठी कॅलक्युलेटर लागेल अशी आकडेमोड असलेली गणिते परीक्षेत घालूच नयेत असे वैयक्तिक मत आहे. परीक्षेत संकल्पना समजली आहे का हे पाहणे महत्त्वाचे. मोठी आकडेमोड ठराविक वेळात करता येते का हे पाहणे मुळीच हेतु नसावा.
नितिन थत्ते
उपाय
हे खरे असले तरी आयते कन्टेण्ट मिळणे आपण थोपवू शकत नाही. तिच तंत्रज्ञानाची झेप आहे तेव्हा तिच्यासोबत आपल्याला बदलणे भाग आहे.
बरोबर म्हणूनच या काळात वाचनाची आवड उत्पन्न होण्यासाठी किंवा ती सवय लागण्यासाठी वेगळे प्रयत्न करणे भाग आहे. भारतात काय चालते या विषयी मी अनिभिज्ञ आहे पण अमेरिकेत जिथे डिजिटल मिडिया बोकाळला आहे तेथे शाळांमध्ये प्रत्येक वर्षी काही पुस्तके वाचायला लागतात. त्या पुस्तकांवर प्रोजेक्ट्स करावी लागतात किंवा परीक्षा द्यावी लागते. सोबत अर्थातच पाठ्यपुस्तक असते.
एक उदाहरण म्हणून, इयत्ता आठवीला अमेरिकन सिविल वॉरवरील एक कादंबरी, शेक्सपिअरचे रोमिओ ज्युलिएट आणि हॉलोकॉस्टवर एक कादंबरी अशी तीन पुस्तके वाचनास आहेत. मुलं न वाचून सांगतील कोणाला?
एकंदरीत माझा अनुभव आहे की मुले वाचन करतात. हं! आपण लहान असताना जसे पुस्तकांना चिकटून दिसणारी मुले दिसत तशी आता दिसत नसतील कारण त्यांच्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत, तेव्हा एखादी गोष्ट जी येणे अपरिहार्य आहे तिला नको म्हणण्यापेक्षा नवीन मार्गानी चांगल्या सवयी राबवणे उत्तम.
माहिती
तुम्ही कदाचित पाहिलं असेलच पण माधुरी पुरंदरेंच्या लिहावे नेटके पुस्तकाचा परिचय दिला आहे, हे पुस्तकही ज्योत्स्ना प्रकाशनाचे आहे.
लिहावे नेटके
हे पुस्तक चांगले आहेच. आता त्याची दुसरी आवृत्तीही बाजारात आलीय. मात्र मुळात इतके मोठे काम, इतका वेळ देऊन करणे माधुरी पुरंदरे यांना व्यवहारात शक्य झाले, कारण त्यांना टाटांच्या ट्रस्टची मोठी फेलोशिप मिळाली होती. एरवी अनेक कामे आर्थिक अडचणींमुळे रखडतात. आमचे राजहंस प्रकाशनही गेल्या काही वर्षांपासून काही चांगल्या प्रकल्पांसाठी लेखकांचा संशोधनाचा खर्च उचलते किंवा खर्च उचलेल अशा दुसर्या एखाद्या संस्थेसोबत काम केले जाते. काही कोश त्यांनी असे सिद्ध केले आहेत. अशा न्यासांची संख्या पुरस्कारांपेक्षा वाढली तर पुष्कळ चांगली कामे मार्गी लागतील.