ध्यान: तंत्र आणि मंत्र: ...... लेखांक २

सुट्टीत बाहेरगावी गेल्यावर प्रवासातील दगदग व इतर अडचणी येऊन सुद्धा परत आल्यावर आपण उत्साहितच झालेले असतो. जर आपण एखाद्या कमी लोकवस्तीच्या खेडेगावात गेलो असू तर हा परिणाम अधिकच जाणवतो. याचे कारण म्हणजे गर्दीचा- माणसा माणसातील संपर्काचा – मर्यादितपणा, शांतता, कार्यालयातील आणि शहरातील इतर जाणवणाऱ्या काळज्यांचा अभाव. या सर्वांचा परिणाम म्हणून मानसिक तणाव कमी होतो व मन शांत होते. याचा आपल्या शरीरावर उत्तम परिणाम होतो. परंतु अशाप्रकारे मन:शांतीसाठी प्रत्येक आठवड्याला आपणास असा प्रवास करणे शक्य नसते. मेडीटेशन करून मात्र आपणास मन:शांतीचा अनुभव घेणे सहज शक्य आहे.

प्रत्येक गोष्टीची आपली स्वत:ची अशी काही शिस्त असते. मेडीटेशनहि त्याला अपवाद नाही. मन प्रक्षुब्ध झाले असता मेडीटेशन जमणार नाही. परंतु मेडीटेशनसाठी फार मोठ्या अशा जागेची अथवा साहित्याची आवश्यकता पण नाही. वातावरण मात्र शांत आणि प्रसन्न हवे. मेडीटेशनसाठी एका वेळी १२ ते १५ मिनिटे देणे पुरेसे आहे. त्यासाठी मात्र महत्वाची गरज म्हणजे पायाला अथवा पाठीला राग लागणार नाही असे बैठकीचे योग्य असे आसन घालता येणे आवश्यक आहे. सुखासन, स्वस्तिकासन, अर्ध पद्मासन, अथवा पद्मासन येत असल्यास उत्तम. वज्रासन अथवा पद्मासन ही आसने सरावाशिवाय १५ मिनिटे घालणे तसे अवघडच. सांध्याना अथवा पाठीला रग लागून मेडीटेशन पेक्षा त्याकडेच लक्ष जावयाचे. आडवे पडून मेडीटेशन केल्यास झोप लागण्याची शक्यता म्हणून तेही टाळणे योग्य. योगी मेडीटेशनचा उपयोग भगवंताची प्रार्थना करण्यासाठी करीत म्हणून आधारासनांचा उपयोग करीत असावेत. बैठकीच्या आसनात एवढा वेळ बसता येत नसेल तर आरामखुर्चीत बसूनही मेडीटेशन केल्यास चालते.

अश्या प्रकारे बैठक तयार झाल्यावर डोळे मिटून शरीर शिथील केले जाते. सर्वसाधारणपणे शवासनाच्या विरुद्ध म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत, प्रत्येक अवयवाची दाखल घेउन (त्यांचा विचार करून) जाणीवपूर्वक तो अवयव शिथील केला जातो. या जाणिवेमुळे इतर विचार मनात येण्यास आपोआपच प्रतिबंध होतो आणि मन निर्विकार ठेवणे जरी कठीण असले तरी अश्या प्रकारे गुंतवून ठेवून मन प्रक्षुब्ध करणारे विचार दूर ठेवले जातात. वज्रासनात श्वासावर लक्ष ठेवून अथवा विचारांकडे अलिप्तपणे पाहून साक्षीभावना केली जाते. मेडीटेशनसाठी याही पलीकडे पाहावयाचे आहे. अशाप्रकारे सुमारे १ मिनिट शरीर शिथिल करण्यासाठी दिल्यावर खास मंत्र म्हणून एखादा (खास) अर्थ नसलेला मंत्र (याला बीजमंत्र असेही म्हणतात) मनातल्यामनात म्हणावयास सांगितला जातो. काही पद्धतीत ‘ओम’ या मंत्राचा जप केला जातो अथवा काही विशिष्ट वेळेच्या अंतराने ‘ओम’ चा मंत्र जप केला जातो. हे सर्व मनातल्या मनात करावयाचे असते. ‘ओम’ चा मंत्र सर्वाना लाभात नाही अथवा तशी भीती असल्यामुळे कित्येक जण या मंत्राचे वाटेस जात नाहीत.
योग्य मंत्र न मिळाल्यास अपाय होण्याची भीतीही घातली जाते. यासर्व गोष्टींवर चिकित्सक व्यक्तीचा विश्वास बसणे कठीण आहे. या बद्दलची एक गम्मत आठवते. स्वामी समर्थ परिवाराच्या एका अंकातील खालील गोष्टीमुळे या बीजमंत्राचा सहज उलगडा झाला. ती गोष्ट अशी: एक सद्गृहस्त आपल्या एका गरीब मित्राला सर्पविष उतरविणाऱ्या (!) गुरुजींकडे घेऊन जातात. हेतू इतकाच की सर्पविष उतरविण्याचे रहस्य जाणून आपल्या या मित्राला चरितार्थाचे साधन मिळावे. गुरु व शिष्याचे (त्या सद्गृहाचे) संभाषणातील आपणाकडे पाहून उच्चारलेले ‘बिटटो कुश्मांडकम’ हे वाक्य त्या मित्राच्या लक्षात राहिले. गुरुजी घाईत असल्यामुळे ज्यास्त बोलणे झाले नाही. परत भेटण्याचे ठरवून ती जोडी बाहेर पडली. मध्यंतरीच्या काळात तो मित्र वर सांगितलेला ‘बिटटो कुश्मांडकम’ या मंत्राचा (!) सर्पविष उतरविण्यासाठी उपयोग करू लागला व त्यात त्याला बऱ्यापैकी यश सुद्धा मिळाले! गुरुजी बाहेर गावाहून परत आल्यावर त्यांच्या कानावर या यशाची बातमी आली. त्यांनी या जोडगोळीस भेटण्यास बोलावले. गुरुदक्षिणा घेऊन हे दोघे गुरुजींकडे गेले व वृत्तांत सांगितला. आता आश्चर्यचकीत होण्याची पाळी गुरुजींची होती. ‘बिटटो कुश्मांडकम’ या शब्दांचा त्यांच्या भाषेतील अर्थ ‘हे कसले असले पात्र माझ्याकडे आणलेस’ हा होता. गुरुजींच्याकडेच मंत्र नव्हता. मंत्र असणारच कोठून? असा मंत्राच नसतो.

या गोष्टीतून सहजच काही प्रश्न निर्माण होतात. कुणी (भोळसट व्यक्ती) म्हणेल कि हा श्रद्धेचा प्रकार व यश आहे. अर्थातच हे असे असणे शक्य नाही. सर्प विषारी असल्यास मंत्राचा उपयोग होणे शक्यच नाही व त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू अटळ राहील. सर्प विषयक तज्ञ या प्रकारचे उत्तर सहज देतील: बऱ्यापैकी यश म्हणजे बिन-विषारी सर्प चावल्यास यश अन्यथा अपयश. एकूण सर्पांपैकी थोडेच सर्प विषारी म्हणून बऱ्यापैकी यश असे हे गणित राहील.
बिन-विषारी सर्प चावला तरी भीती मुळे त्या व्यक्तीला जो त्रास होणार त्यांना अश्या प्रकारे मिळणारे मानसिक समाधान एवढाच फायदा. श्रद्धा व अंधश्रद्धा हा विषय येथे नसला तरीही हे जाणणे आवश्यक आहे कि त्या दोहोंना वेगळे करणारी रेषा अत्यंत बारीक वा धूसर आहे. अंधश्रद्धेची फळे कटूच असतात. कुठल्यातरी औषधाने कुठलातरी रोग बरा होतो हे प्रत्यक्षात होत नाही.

आपल्या लेखात पुढे जायचे म्हणजे हा कुठलाही अर्थ नसलेला एक प्रकारचा बीज मंत्रच म्हणावयास हवा. त्याचा मूळ उपयोग बरे करण्याचा नाहीच पण तेवढ्यापुरता दिलासा देणारा इतकेच.

सुज्ञ वाचकांना समजलेच असेल कि मंत्र प्रकाराने विचलीत होणे, नुकसान होणे वा त्यातून सिद्धी मिळेल असे मानणे हि मोठी चूक ठरेल. आपल्याला मेडीटेशनसाठी असाच अर्थ नसलेला मंत्र हा इतर गोष्टी वरील मन उडवण्यासाठीच आहे. त्यामुळे मेडीटेशन सुकर होते इतकेच.

अर्थातच मंत्र म्हणजे एखादा कठीण असा संस्कृतप्रचुर श्लोक नसावा जेणेकरून तो (मनातल्यामनात सुद्धा) म्हणताना त्यातील कठीण शब्द समुच्चयामुळे आठवण्यास त्रास पडेल अथवा ओळींचा क्रम आठवण्याचे श्रम पडतील व त्यामुळे मेडीटेशनचा मूळ गाभाच नष्ट होईल. हाच कदाचित बीजमंत्र (खास अर्थ नसलेला मंत्र) निवडण्यास सांगण्यामागे उद्देश असावा.

योगासने व मेडीटेशन या गोष्टी एकट्याने व शांत वातावरणात करण्याच्या आहेत.परंतू शिकताना मात्र सामूदाईकपणे शिकणे चांगले असते. तेथील गर्दीतही केली जाणारी वातावरण निर्मिती आणि शांतता एक वेगळाच अनुभव देउन जाते आणि नंतर हाच अभ्यास घरी करणे सुलभ जाते.

योगाभ्यासाच्या बाबतीत माझे गुरु, योग तज्ञ श्री सदाशिव निंबाळकर यांनी तीन मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत ती अशी: आवश्यक तंत्र (Essential Technique), सहाय्यक तंत्र (Auxiliary Technique) आणि पारंपारिक तंत्र (Traditional Technique).
या तंत्रांप्रमाणे आपणाला आसनांचे खाली दिल्या प्रमाणे विश्लेषण करता येईल.
१. आवश्यक तंत्र (Essential Technique): प्रत्येक आसनाचे स्वत:चे असे खास उद्दिष्ट असते. ते पाळलेच पाहिजे. उदा. ‘भुजंगासनात पाठीच्या कण्याच्या स्नायूंचा वापर, हातांवर जोर नाही’ हे भुजंगासनाचे आवश्यक तंत्र.
२. सहाय्यक तंत्र (Auxiliary Technique): त्या त्या असनातील मूळ उद्देशाला बाधा न आणता अंतीम स्थिती गाठण्यासाठी सुलभ मार्गाचा अवलंब करणे हे झाले सहाय्यक तंत्र. निरनिराळ्या परंपरात आसनाची अंतीम स्थिती सारखी असली तरी आसनात जाण्याची अथवा त्यातून बाहेर येण्याची पद्धती वेगळी असू शकते याचे कारण म्हणजे (निरनिराळ्या) सहाय्यक तंत्राचा केलेला वापर. व
३. पारंपारिक तंत्र (Traditional Technique): ज्याला काही खास कारण सांगता येत नाही पण आसनात समाविष्ट असते ते झाले पारंपारिक तंत्र.
अशा प्रकारे ध्यानाचे अथवा त्यात लागणाऱ्या तंत्रांचे सुद्धा आपणास विश्लेषण करता येईल. ध्यानाचा संबंध मुख्यत्वेकरून मनाशी आहे. परंतु शवासन स्थितीत मेडीटेशन करावयाचे नसल्याने, पायाला मुंग्या न येता, पायाचे सांधे न दुखता बैठकीचे आसन घालता येणे ही मेडीटेशन उत्तम प्रकारे साधता येण्याची झाली पहिली पायरी व सहाय्यक तंत्राचा केलेला उत्तम वापर.

मन निर्विकार ठेवणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. योगाभ्यासात श्वासावर मन ठेवल्याने अथवा श्वास मोजल्यास आसनावरील लक्ष कमी होते, स्पर्धा बाद होते आणि आसन यथाशक्ती सहज साध्य होते. ज्याप्रमाणे रस्त्यावरून जाताना आपण एखादे भांडण अथवा मारामारी चालू असल्यास त्यात भाग घेत नाही, त्याच प्रकारे वज्रासनात किंवा इतर आधारासानात साक्षीभावना करताना कुठलेही विचार मनात आले तरी त्यात न गुंतता, त्यावर बंधन न घालता त्या विचारांकडे अलिप्त पणे पहाणे हे आवश्यक आहे. मंत्राचा मेडीटेशनमध्ये केलेला उपयोग असाच सहाय्यक तंत्र म्हणून अभिप्रेत असावा असे वाटते.

मेडीटेशनमध्ये केलेला हा मंत्राचा उपयोग पुढील संस्कृत श्लोकाची आठवण करून देतो:
अमन्त्रम अक्षरं नास्ती, नास्ती मूलंअनौशधम् 
अयोग्य: पुरूष: नास्ती, योजक: तत्र दुर्लभ: 
अर्थात: ज्याचा मंत्र होत नाही असे अक्षर नाही, औषध (करता येत) नाही असे झाडाचे मूळ नाही, अयोग्य असा माणूस नाही, (परंतू) या सर्वांचा उपयोग करू शकणारा योजक मात्र दुर्लभ असतो.

साक्षीभावना अथवा शरीरातील अवयावांची जाण (awareness) या व्यतिरिक्त मेडीटेशनमध्ये साध्या सोप्या मंत्राची सहाय्यक तंत्र म्हणून योजना करणाऱ्या योजकाच्या कल्पनाशक्तीला दाद दिलीच पाहिजे.

मेडीटेशन करण्याची पद्धती:
१ शांत, निवांत खोली निवडावी. (सहाय्यक तंत्र)
२ मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य. (सहाय्यक तंत्र)
३ सुखासन वा स्वस्तिकासना सारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत. पद्ममुद्रे प्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी), व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो म्हणून खबरदारी घ्यावी.
४ शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे त्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.
५ सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.
६ आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.
७ साक्षीभावना सुद्धा कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.
८ आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्या सारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.
९ सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.
सातत्य्याने मेडीटेशन केल्यास मन प्रसन्न होते, मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. चित्तवृत्ती प्रसन्न राहिल्याने कामाचे दडपण कमी होते, कामाचा उरक चांगला होतो व सातत्य राहते. याचे सुपरिणाम यशात बदललेले पाहावयास मिळतात.
इंन्ट्यूशन सारख्या सूचकतेने कठीण प्रश्न सोडविण्यास मदत होते हे २०११ सालात संशोधनांते सिद्ध झाले आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा म्हणून हा लेख प्रपंच. शुभम् भवतु 

लेखनविषय: दुवे:

Comments

मेडिटेशन

मेडिटेशन हा मराठी शब्द आहे का?

नसेल तर त्याला मराठित शब्दच नाही का?
तसा शब्द असेल तर तो मराठी शब्द वापरणेअच इष्ट नाही का?
--मनोबा

सहमत आहे

तसा शब्द असेल तर तो मराठी शब्द वापरणेच इष्ट नाही का?

याबाबत् सहमत आहे.

पण मेडिटेशन म्हणजेच ध्यान. :)

नक्की?

त्यासंबंधित ध्यान्, ध्यान धारणा, प्राणायाम,साधना हे व असे अनेक शब्द ऐकलेत.
ध्यान= मेडिटेशन हे नक्की का?

--मनोबा

माझ्यामते नक्की

होय मनोबा,
माझ्यामते तरी मेडिटेशन म्हणजे ध्यान हे नक्की आहे.

धागाकर्त्याचा अधिकार याबाबतीत मोठा आहे, तेव्हा ते ऑनलाईन येतील तेव्हा नक्की उत्तर देतील... :)

तुम्ही दिलेल्या शब्दांपैकी मेडिटेशनसाठी ध्यान् आणि ध्यान-धारणा याचा विचार होऊ शकेल.

प्राणायाम आणि साधना हे दोन्ही पूर्ण भिन्न आहेत.
प्राणायामाला ब्रीदिंग एक्सरसाईज असे ढोबळमानाने म्हटले जाते. तर साधनेला प्रॅक्टीस (सरावाचा भाग्) समजले जाते.

वर् मी म्हटल्याप्रमाणे धागा कर्त्याच्या उत्तराची वाट् पाहूयात् :)

ध्यान चा अर्थ

@ध्यान: ध्यान व प्राणायामाचाही आपला अर्थ बरोबरच आहे. समर्पकपणे दोन्ही अर्थ सांगितल्याबद्दल आभार.

नक्की काय?

@ मनोबा
प्रस्तुत लेखात ध्यान म्हणजे मेडीटेशन हा अर्थ अभिप्रेत आहे. प्राणायाम म्हणजे श्वसना संबद्धीत प्रकार. हा अष्टांग योगातील ४था प्रकार. त्यानंतर येतात प्रत्याहार (Withdrawal of senses, प्रत्याहारांतर्गत पंचेन्द्रीयांवर ताबा: बाह्य गोष्टींची दखल न घेणे), धारणा (Focusing mind, मन एकाग्र करणे), ध्यान (Meditation) व समाधी (ईश्वराशी एकरूप) असे अर्थ सांगितले गेले आहेत.

या सर्वांत सूक्ष्म फरक आहेच पण आपणाला व्यावाहारीक पातळीवर (आपल्या दृष्टीने) सर्व सारखेच वाटते व आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींसाठी तसे ठेवणेच इष्ट वाटते.

मेडीटेशन

@ मनोबा:
मेडीटेशन मराठी शब्द नसून इंग्रजीच शब्द आहे. आपली मराठी शब्द वापरण्याची सुचना योग्यच आहे. मलाही ते आवडते.

इतर भाषेतील काही शब्द सुसंवादासाठी वापरणे सोयीचे पडते तेथे वापरावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. यांत मतभेद असतीलच परंतू इतर भाषेतील कांही शब्द भाषेने घेतल्यास भाषा वृद्धीच होते (जसे इंग्रजी भाषेने केले). ध्यान या शब्दाचे मराठीत भरपूर अर्थ आहेत. भाषा ही इतरांशी संवाद साधण्याचे साधन आहे. स्टेशन म्हणजेच अग्निरथ विश्रामधाम. व तो मराठी शब्द मला आवडतोच. परंतु संवादासाठी रोजच्या वापरातील शब्द वापरणे सोयीचे म्हणून ग्राह्य धरावे असे वाटते.

जग गाढव आहे

आपल्या लेखात पुढे जायचे म्हणजे हा कुठलाही अर्थ नसलेला एक प्रकारचा बीज मंत्रच म्हणावयास हवा. त्याचा मूळ उपयोग बरे करण्याचा नाहीच पण तेवढ्यापुरता दिलासा देणारा इतकेच.

माझे एक ध्यानधारणा करणारे मित्र अशाच प्रकारे सांगत असत. त्यावर मी त्यांना विचारले होते की तुम्ही कोणता मंत्र म्हणता बरे? तेव्हा त्यांनी गंमतीत उत्तर दिले मी "जग गाढव आहे." असे म्हणतो. असे म्हणण्याचे फायदे त्यांनी मला असे सांगितले होते.

१. जग गाढव आहे पण मी शहाणा आहे अशी भावना या मागे आहे. त्यामुळे स्वतःला दिलासा दिलेला आहे. ;-)
२. शिवी हासडल्याचे सुख.
३. शिवी जहाल नसल्याने आपण फार मोठा गुन्हा केला आहे अशी अपराधी भावना नसल्याचे सुख. ;-)

असो. हलकेच घ्यावे.

बाकी, लेख वाचते आहे.

जग गाढव आहे

@ प्रियाली: पहिल्या लेखानंतर आपण दिलेले प्रोत्साहन पर शब्द ( तुम्ही लिहाच) आठवतात. धन्यवाद.

आपल्या अभिप्रायात अध्याहृत असलेला अर्थहीन मंत्राबाद्दलचा उल्लेख सार्थ आहे. खरोखरीच अर्थ नसलेला मंत्र मेडीटेशन का सांगितला असावा हे कोडे मलाही बराच काळ पडले होते. लेखात दिलेल्या गोष्टीमुळेच त्याचा उलगडा झाला.

'उपक्रम' वर लेख लिहिल्याने बऱ्याच सुज्ञ वाचकांपर्यंत दोन दिवसातच पोहोचण्याचे समाधान मिळाले. इथला वाचक वर्ग चोखंदळ आहे. चांगल्या उपक्रमावर आल्याचा आनंद आहेच. आपल्या परिचित ध्यान करण्याऱ्या व्यक्तीने सांगितलेली ‘लोक गाढव आहेत’ हे मेडीटेशन मध्ये म्हणण्याची कल्पना बीजमंत्र म्हणून अगदीच वाईट नाही. पण मन प्रसन्न करताना मिळणारी ऊर्जा घन असावी (positive Strokes) व ऋण नसावी (negative strokes). असे वाटते.

त्यात मध्यंतरी वाचलेल्या एका वाक्याने हे जास्त जाणवले. ते वाक्य असे: दुसऱ्यावर टीका करणे म्हणजे स्वत:ला मोठे करण्याचा एक प्रकारे केलेला अप्रामाणिक प्रयत्न (dishonest) होय. म्हणून योगाभ्यासीनी असे करणे टाळावे हे ठीक राहील असे वाटते. (याचा अर्थ दुसऱ्यावर टीका करू नये असा मात्र नाही. उदा. उच्च पदाधीकार्यांना असलेला/दिलेला आपल्या हाताखालील दोन वा अनेक कर्मचार्यांमधील फरक करण्याचा अधिकार त्यांनी वापरलाच पाहिजे) (Authority to / right to differentiate among fellows working under them is in a way right to discriminate between them, while promoting personnel for organizational benefit).

:-) तसे नसावे

दुसऱ्यावर टीका करणे म्हणजे स्वत:ला मोठे करण्याचा एक प्रकारे केलेला अप्रामाणिक प्रयत्न (dishonest) होय.

हो, नेहमीच नाही पण हे शक्य आहे.

मला वाटते "जग गाढव आहे" असे ते खरेच म्हणत नसावे. गंमतीत त्यांनी मला म्हटले होते. त्यांच्या सांगण्याचा मूळ अर्थ असा होता की बीजमंत्र वगैरे हा देवादिकांच्या जवळ नेणारा किंवा आस्तिकता दाखवणारा प्रकार नाही. मनाशी एकच एक वाक्य घोळवल्याने मन एकाग्र होते इतकेच. तुमच्या त्याच प्रकारच्या वाक्याने मला चटकन आठवण झाली.
अवांतरः

@ प्रियाली: पहिल्या लेखानंतर आपण दिलेले प्रोत्साहन पर शब्द ( तुम्ही लिहाच) आठवतात. धन्यवाद.

तुम्ही लिहाच असे बहुधा स्वधर्म म्हणाले होते पण मी तुम्हाला पुढील लेखनाला शुभेच्छा दिल्या होत्या. दोन्ही प्रोत्साहनपरच आहेत.

असो. तुम्ही सोप्या भाषेत आणि मुद्देसूद लिहिता. तुमच्याकडून इतर विषयांवरही वाचायला मिळेल अशी अपेक्षा करते.

तसे नसावे

@ प्रियाली: परत एकदा धन्यवाद.
मी २८ वर्षांपूर्वी मेडीटेशन शिकलो व त्यावर वाचन केले. या विषयावर २० वर्षापूर्वी प्रथम मते मांडली. अनुभवाने त्यात आणखी भर घालून ‘उपक्रम’ मध्ये लेख लिहिला. दोन ते ३ दिवसात मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. जवळजवळ प्रत्येक प्रतिसादात काही घेण्यासारखे आहे. उदा. आपला अभिप्राय. त्यातला गमतीचा भाग असला तरीही बरेच सांगून जातो. माझ्या मूळ लेखात घन ऊजा व ऋण ऊर्जा हा उल्लेख नाही. ती माझ्या मते लेखातील तृटीच आहे. यापुढे ते एडीट करणे जरूरी आहे.

प्रत्येक प्रतिसादात खेळकर वातावरणच होते, मित्रांत गप्पा मारल्यासारखे. कटुता नव्हतीच. इतर लेखांवरही चर्चा खेळीमेळीतच आहे. (शिक्षणात जसे विद्यार्थ्याकडून, मुलाखतीत जसे उमेदवाराकडून उत्तमच बाहेर येईल असे वातावरण ठेवावे तसे) येथे लेखकांकडून उत्तम साहित्य यावे असाच सूर दिसला. असे वातावरण सध्याच्या जगात स्पर्धात्मक युगात क्वचित आढळते. घरची मंडळीच असे आपुलकीने बोलू शकतात.

म्हणूनच आपल्या हलक्या फुलक्या पण महत्वाचे सार सांगणाऱ्या प्रतिसादाला मी महत्व देतो. त्यातून मला लेखातील महत्वाच्या दोन ओळीत सुधारणा करणे जरूरी वाटले.

ध्यान

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. या लेखात ध्यान कसे केले जाते त्याची माहिती आहेच.

घरबसल्या जर एखादी चांगली गोष्ट करता येत असेल तर ती जरूर करावी व समाजास सांगावी हा हेतू आहे. चांगला गुरु मिळण्यास भाग्य लागते. मी स्वत: चांगल्या गुरुंकडे योगाभ्यास शिकलो. संशोधक म्हणून २७ वर्षे काम केल्यामुळे व मुख्य म्हणजे ती वृत्ती कायम जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने राखल्यामुळे चिकित्सक राहिलो.

कुठल्यातरी क्लास मध्ये जावून शिकण्याने फसले जाऊ नये म्हणून मेडीटेशनची मूलभूत माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. अन्यथा गुरुचा गंडा बांधून सहसा मेडीटेशन शिकले जाते. गंडा याचेही इतर अर्थही आहेत. त्या बद्दल आपण येथे बोलत नसून कुठेही शिकताना कुठल्या कसोट्या ठेवाव्यात हे माहीत असावे हा हेतू.

शंका

काही विशिष्ट काळापर्यंत मेडिटेशन चालू ठेवले (समजा रोज १५-२० मिनीटे) तर पुढे त्यातली प्रगती कशी वाढवावी? कालावधी वाढवणे शक्य नाही. म्हणजे १५-२० मिनीटांचे पुढे अर्धा तास करावे किंवा १ तास २ तास करावे वगैरे करणे आजच्या काळात शक्य नाही. त्यामुळे त्याच १५-२० मिनीटामध्ये आपले मेडिटेशन व्यवस्थित झाले किंवा नाही तसेच पुढे ते कसे निर्दोष किंवा प्रगत करावे याचा अनुभव कृपया सांगावा. या अभ्यासात असे काही टप्पे आहेत का की जे सर्वांना गाठता येतात?

उत्तम प्रश्न

माझा अनुभव असा आहे की ध्यान जमू लागले की पुढच्या प्रक्रिया आपोआप घडत जातात.
वेळेचे भान उरत नाही, झोप कमी होते व झोपण्यापेक्षा ध्यानात माणूस जास्त रमू लागतो.

उल्हासजींना विनंती आहे की या प्रश्नावर थोडे सविस्तर लिहू शकलात तर आनंद होईल.

ध्यान् किति वेळ करावे

ध्यान १२ ते १५ मिनिटेच करावे. थोडे कमी ज्यास्त वेळ चालते.

आपण म्हटल्या प्रमाणे संसारी माणसाला वेळेची अडचण वेळ वाढविण्यात आहेच. पण वेळ वाढविणे योग्य सुद्धा नाही. त्यातून पलायनवाद (एस्केपिझम) सुद्धा वाढू शकतो. व आपल्या समोरील अडचणी या त्यापासून अशा प्रकारे दूर पळाल्याने जात नाहीत तर त्यांचा सामना करावाच लागतो.

नेटकी आणि अभिनिवेशरहित

नेटकी आणि अभिनिवेशरहित माहिती.
योगाभ्यास अक्रणाराच फक्त ग्रेट बाकी सारे तुच्छ् असे अनेक लेख वर्तमान पत्रात येत असतात. त्या पार्श्वभुमीवर असे लेखन उठुन दिसते.
चांगले लेखन आहे. अजून येऊ द्या

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

नेटकी आणि अभिनिवेशरहित

‘समतोल लिखाण’ ‘वेगळेपण’ या आपल्या अभिप्रायातील गोष्टी मनास खूप भावल्या. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

योगाभ्यासाबद्दलही माझी अशीच मते आहेत. त्यावरही माझे असेच समतोल लिखाणही आहे. व्यायामाचे प्रकार बरेच आहेत. त्यासर्वांत चांगला किंवा वाईट असे काहीच नाही. त्यांची जरूर तेवढी तौलनीक माहिती, आपल्याला त्यांतून काय हवे आहे व आपल्याला प्रकृतीमानाप्रमाणे जे झेपेल ते करावे हाच संदेश आहे. योगाभ्यासामागील शास्त्रीय दृष्टीकोन (मला उमजलेला) लिहिण्याचा आनंद ही मला त्यात मिळाला होता.

निगेटिव आणि पॉझिटिव स्र्ट्रोक्स

लेख छान आहे. ध्यान कसे धरावे हे अध्यात्माकडे (स्पिरिच्युऍलिटी) न वळते अतिशय सोपे करून, डीमिस्टिफाय करून सांगितले आहे.

वर प्रियाली ह्यांना दिलेल्या उपप्रतिसादात तुम्ही घन आणि ऋण ऊर्जांचा उल्लेख केला आहेपण 'पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी या संकल्पना पूर्णपणे निराधार असून, त्याला कोणताही शास्त्रीय आधार आणि अर्थ नाही. उर्जा शब्दाची योग्य व्याख्या फक्त विज्ञानानेच केली आहे,' असे वैज्ञानिक म्हणतात. तुम्ही म्हणता ते negative आणि positive strokes विज्ञानातल्या ऊर्जेपेक्षा वेगळे आहेत काय?त्याबाबत शक्य झाल्यास थोडे सविस्तर सांगावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

अध्यात्म वगैरेपेक्षा व्यवहारिक उपयुक्ततेवर असलेला भर आवडला. उर्जेविषयीही वरील मताशी सहमत आहे.

ध्यान

दोन्ही लेख वाचले. भुसावळला जाण्याच्या उद्दिष्टाने निघालेल्या प्रवाशास नागपूरला नेण्यास प्रवृत्त करावे, असे काहीसे लेखांचे स्वरूप आहे.

लेखाचा प्रतिवाद करण्यापूर्वी

महेश योगी हा एक वल्गना करणारा आणि जाहिरातबाज माणूस होता. लोकांना तरंगायला शिकवण्यासाठी त्याने शिकवणी वर्ग सुरू केले होते. या वर्गात पद्मासन घालून उडी मारणे हा प्रकार शिकायला ठेवला होता. प्रत्येक देशातील् लोकसंख्येच्या वर्गमूळाएवढे साधक दिल्यास त्या देशात शांती नांदेल अशा मोठमोठ्या जाहिराती त्याने वृत्तपत्रातून दिल्या होत्या. हल्ली जबलपूरला जगातील सर्वात उंच इमारत बांधतो असे सांगितले होते.

ध्यानाचे फायदे: लेखकाचे असे म्हणणे दिसते.
सातत्य्याने मेडीटेशन केल्यास मन प्रसन्न होते, मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. चित्तवृत्ती प्रसन्न राहिल्याने कामाचे दडपण कमी होते, कामाचा उरक चांगला होतो व सातत्य राहते. याचे सुपरिणाम यशात बदललेले पाहावयास मिळतात.

उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते.

मेडीटेशनचा अभ्यास नियमित केल्यास अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम होते व त्यामुळे सिगारेट व दारू या सारख्या व्यसनापासून मुक्ती मिळण्यास मदत होते अथवा या व्यसनांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे मनोकायिक रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. अस्थमा, अल्सर यासारख्या व्याधींवर मेडीटेशनचा सुपरिणाम पहावयास मिळतो.

विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती सुधारते व त्यामुळे अभ्यासातील गती वाढते. विषयाचे नीट आकलन झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी व्यक्तींच्या नोकरीतील कामाचा दर्जा उंचावतो आणि काम समाधानपूर्वक होते असे पाहण्यात आले आहे. या सर्व गोष्टी तौलनिक दृष्टीने अभ्यास करून गणिती (Statistics) पद्धतीने सिद्ध करण्यात आल्या आहेत.

यादी थोडक्यात अशी:
व्याधींवरील उपचार- रक्तदाब, अस्थमा, अल्सर, व्यसनमुक्ति (व्यसन व्याधी धरल्यास)
इतर फायदे: कार्यक्षमता वाढणे, स्मरणशक्ति वाढणे, आकलनशक्ति वाढणे, वरिष्ठ अधिकार्‍यांची कार्यक्षमता वाढणे (! कनिष्ठाची वाढत नसावी!) यश लाभणे.

हे सर्व फायदे तपासण्याजोगे आहेत. यात एक रायडर आहे तो म्हणजे 'सातत्याने' ध्यान केल्यास.
यातील प्रत्येकावर शोधनिबंध कुठे प्रकाशित झाले आहेत त्यांचा संदर्भ देणे गरजेचे आहे. लेखकाने ते केलेले नाही.

लांसेट वगैरेची नावे दिली आहेत पण संदर्भ नाही.

आता हा संदर्भ बघा.

इतर उपचार पद्धती आणि त्यांच्यातील तरतमः मनःशांती मिळवण्यासाठी इतर उपाय लोक वापरतात. दारू, सिगरेट, सिनेमा, खेळणे, धावणे इत्यादी दमछाकीचे व्यायाम इत्यादी अशी मोठी यादी बनवता येईल. या यादीत ध्यानधारणा वरती बसते का तळाशी येते याबद्दल अभ्यास केला आहे का? यातील् कित्येकांनी वर दिलेल्या फायद्यांपर्यंत पोचता येत असावे.

ध्यान धारणेतल्या अडचणी:
मन प्रक्षुब्ध झाले असता मेडीटेशन जमणार नाही.

म्हणजे ध्यान करणे हे मन शांत झाल्यावर करायचे असते. आणि मग मन शांत व्हायला ध्यानाचा मोठा उपयोग असतो असे म्हणणे हे सर्क्युलर होते.

ध्यान कसे करावे:
ध्यान करण्याच्या कृती पूर्वसूरींपासून चालत आलेल्या आहेत. लेखकाने यात बदल केलेला दिसतो. (आसन कसे असावे यावर. मंत्र कुठला असावा)
असे बदल करण्यापूर्वी त्याबद्दल संशोधन करणे आवश्यक आहे. हे संशोधन लेखकाने केले असल्यास त्याबद्दल काहीही लिहिले नाही.
आसनस्थ ध्यानधारणा आणि आरामखूर्चीतील ध्यानधारणा याचा तौलनिक अभ्यास कुठे सापडेल का?

अल्फा बीटा वेवज या फारशा बिनमहत्त्वाच्या प्रकारावर लेखकाने लिहिले नाही. (प्रतिसादात हा मुद्दा आला आहे.) तसेच समाधी अवस्था वगैरेही लिहिले नाही. अध्यात्माचाही उल्लेख नाही. असे करणे निश्चित स्वागतार्ह आहे.

प्रमोद

फरक

इतर उपचार पद्धती आणि त्यांच्यातील तरतमः मनःशांती मिळवण्यासाठी इतर उपाय लोक वापरतात. दारू, सिगरेट, सिनेमा, खेळणे, धावणे इत्यादी दमछाकीचे व्यायाम इत्यादी अशी मोठी यादी बनवता येईल. या यादीत ध्यानधारणा वरती बसते का तळाशी येते याबद्दल अभ्यास केला आहे का? यातील् कित्येकांनी वर दिलेल्या फायद्यांपर्यंत पोचता येत असावे.

तौलनिक अभ्यास ह्या लेखाचा हेतू का असावा? तुम्हाला तो करावा वाटल्यास तुम्ही स्वतंत्रपणे त्यावर लेख लिहू शकता.

मन प्रक्षुब्ध झाले असता मेडीटेशन जमणार नाही.

म्हणजे ध्यान करणे हे मन शांत झाल्यावर करायचे असते. आणि मग मन शांत व्हायला ध्यानाचा मोठा उपयोग असतो असे म्हणणे हे सर्क्युलर होते.

लोडेड, ध्यान हे फक्त मन अमुक परिस्थितीत शांत करण्यासाठी करायचे नसून, मनाची चंचलता कमी करून वैचारिक क्षमता वाढविण्यासाठी केले जाते, असे झाल्यास मन प्रक्षुब्ध होणे कमी होते.

तुम्ही दिलेल्या संदर्भ पातळीचा हा आणि हा संदर्भ.

होय

या सर्व गोष्टी तौलनिक दृष्टीने अभ्यास करून गणिती (Statistics) पद्धतीने सिद्ध करण्यात आल्या आहेत.
--
विकिपीडियातील सर्व संदर्भदुवे विश्वासार्ह नसतात, त्यापेक्षा http://www.skepdic.com/tm.html अधिक चांगली माहिती देईल.

होय माहिति देणारे सन्केत स्थल महत्वाचे आहेच

विकिपीडिया मधील संदर्भ केव्हा केव्हा कमी पडतात हे बरोबर.

मेयो इंस्टीट्यूटच्या संकेतस्थळावरील मेडीटेशन ची माहिती वाचण्या सारखी आहे: http://www.mayoclinic.com/health/meditation/HQ01070

(मेयो इंस्टीट्यूटची माहिती) http://www.mayo.edu/mgs/mstp.html

पबमेड: मेडिकल जर्नल्स मधील लेखान्ची सन्क्षिप्त मध्ये अगणीत सन्दर्भ् आहेत. त्यावर् छान् रेव्यु होईल्.

आपल अभिप्राय

तौलनिक अभ्यास हा या लेखांचा हेतू नव्हताच. आपण हे नुसते जाणले नाहीत तर तसे मांडलेत सुद्धा. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

विकिपीडिया मधील संदर्भ केव्हा केव्हा कमी पडतात हे खरे. पण आपण दिलेले संदर्भ चांगले आहेत.
मेयो इंस्टीट्यूटच्या संकेतस्थळावरील मेडीटेशन ची माहिती वाचण्या सारखी आहे. .
http://www.mayoclinic.com/health/meditation/HQ01070

(मेयो इंस्टीट्यूटची माहिती) http://www.mayo.edu/mgs/mstp.html

ध्यानः सन्दर्भ, रायडर्स, व कसे करावे इ.

आपण विचार छानच मांडलेत. अभ्यासू आहातच. या चर्चेतून आणखी मुद्दे स्पष्ट करण्याची संधी पण दिलीत. धन्यवाद. पण आपला सूर थोडा नकारात्मक वाटला. अंधश्रद्धेला विरोध माझाही आहे. त्यातूनच मेडीटेशनला अध्यात्मापासून वेगळे करणे हा मुद्दा आला. हा लेख ‘मेडीटेशन’ हे अध्यात्म समजून समाजाने एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न वळणे वा त्यासाठी कुणाचा ‘गंडा घालणे’ (किंवा एखादी शक्ती मिळविण्याचा प्रयत्न करणे) ह्या गोष्टी टाळण्यासाठी होता. त्यात व्यावहारिक पातळीचाच विचार आहे. ‘कुंडलिनी वा अध्यात्म आपला विषयच नाही’ (नागपूरची गाडी) म्हणून त्यात का बसा पेक्षा आपल्याला 'जे' व 'जेव्हढे' हवे तेव्हढेच घ्या हा सल्ला होता. भुसावळला जाणाऱ्याला नागपूरला नेण्याचा प्रयत्न नव्हताच.

चांगले ते घ्या व नुकसान/फाफटपसारा सोडा हे सूत्रच सांगितले. अगदी खाण्याच्या पदार्थातील राजमा उसळ पहा. ती पचावयास जड. शास्त्रीय कारण: त्यातील Trypsin Inhibitors, अथवा प्रथिने पचवण्यास मदत करणांऱ्या ‘एन्झाइम्स’ चा नाश करणारी द्रव्ये राजम्यात असतात. पण म्हणून आपण राजमा खाणे सोडतो काय? आपण राजमा उत्तम शिजवून खातो. चिकित्सेतून आपण उपयोग झाला पाहिजे हे पाहतो.

@ महेश योगी......
महेश योगी यांचे मेडीटेशन सांगायचेच नव्हते. मंत्र वापराचा फोलपणाच स्पष्ट केला आहे. पण उपयोग आहे/नाही हे सजून वापरा हे महत्वाचे. श्वास मोजणे फुकट आहे, ‘गंडा’ नको हाच सल्ला आहे.
@ मेडिटेशान ला रायडर आहेच......
बहुतांश गोष्टीत सातत्य महत्वाचे असतेच. अगदी लहानपणी पाढे म्हणण्यापासून! आता बहुतांशाना पाढे आठवत नाहीत. लिफ्ट चा सतत वापर म्हणून २ जीने चढल्यावर धाप लागते. जेवणास टेबल खुर्ची ज्यास्त वापरा, मांडी घालणे त्रासदायक होते. याला Disuse atrophy म्हणतात. चांगले कि वाईट हा मुद्दा नाही.
आपण जेवतो रोज पण चांगल्या पोषण मूल्यांचे सातत्य असावे लागते. काही व्हिटामिन्स नियामीतच आहारात असावी लागतात (उदा. बी जीवन सत्वे, क जीवन सत्व, त्यांचे रोज घेण्याचे प्रमाण पण निर्धारित आहे). मग मेडीटेशन च्या फायद्यासाठी सातत्य हवे म्हटले तर यांत गैर ते काय?

@ दारू, सिगरेट, सिनेमा, खेळणे, धावणे इत्यादी दमछाकीचे व्यायाम इत्यादी अशी मोठी यादी बनवता येईल. या यादीत ध्यानधारणा ‘वरती बसते का तळाशी येते’ याबद्दल अभ्यास केला आहे का? यातील् कित्येकांनी वर दिलेल्या फायद्यांपर्यंत पोचता येत असावे......
आपण आधी शास्त्रीय आधाराच्या गोष्टी केल्यात व लेखात संदर्भ दिले नाहीत म्हणता. त्याच प्रतिसादात सिगारेट वा दारूने कुणाला मन:शांती मिळत असेल असेही म्हणता हे थोडे विसंगत वाटते. तसा शास्त्रीय आधार कुठे पाहण्यात आला नाही. आपण समजता वा म्हणता तश्या या पायऱ्या ही नव्हेतच.
व्यायामाचे जरूर खूप फायदे आहेत. आहार, विहार व विश्रांती हे प्रकृती उत्तम राखण्याचे मंत्रच आहेत. आपल्याला जो प्रकार आवडतो व प्रकृतीला झेपेल तो प्रकार करावा. (ह्याला शास्त्रीय आधार नाही, व्यवहार ज्ञानाने योग्य ते करावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा). या पायऱ्या ही नव्हेतच.

रक्त दाबाविषयीचे संशोधन: Am J Hypertens. 2009 Dec;22(12):1326-31. Epub 2009 Oct 1. मधील हा निबंध वाचावा. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19798037 (This is the first RCT to demonstrate that a selected mind-body intervention, the TM program, decreased BP in association with decreased psychological distress, and increased coping in young adults at risk for hypertension. This mind-body program may reduce the risk for future development of hypertension in young adults).
Lancet: Hypertension: http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/49737
Lancet: Hypertension: http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/46021

@ Relaxation: मेयो इंस्टीट्यूटच्या संकेतस्थळावरील मेडीटेशन ची माहिती वाचण्या सारखी आहे.:
http://www.mayoclinic.com/health/meditation/HQ01070
@ memory: Neuropsychol Dev Cogn B Aging Neuropsychol Cogn. 2011 Dec 13
@ Cognitive Performance in older adults: http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/22149237
@ Asthma: Breathing exercises (pranayama), mainly expiratory exercises, improved lung function subjectively and objectively and should be regular part of therapy.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/21234211

@ औषधांबरोबर ध्यान करणे (त्या ऐवजी नव्हे) याला महत्व आहेच. (with medicines & not instead of)
वैद्यकीय भाषेत दोन औषधे एकाच वेळी घेतल्यास तीन प्रकार संभवतात असे दिसते: Synergistic (दोन्हीच्या गुणमात्रा अपेक्षे पेक्षा ज्यास्त गुण), Additive (बेराजीव्हाधा गुण) & Antagonist (बेरजेपेक्षा कमी गुण). अजून एक प्रकार: एकच औषधी असली तर स्वत: गुणकारक नसला तरी औषधाचे गुण वाढवितो. त्याला गुण Potentiate करतो असे म्हणतात.

@ ध्यान कसे करावे:
‘आसनस्थ ध्यान’ किंवा ‘आरामखूर्चीतले ध्यान’ यातला फरक माझ्या मते एखाद्याने डाव्या अथवा उजव्या हाताने बुद्धिबळ खेळल्यास, बस मध्ये पुढची वा मागची सीट यावर बसल्याने काय फरक पडेल असा असावा. सन्शोधनाचा विषय वाटत नाही. व खूप फरक पडेल असे कुणाला वाटत वाटत असल्यास ती व्यक्ती अंधश्रद्ध असेल असे आपण खुशाल मानू शकतो. संपूर्ण लेखात त्याचसाठी मेडीटेशन मागील विचार चिकित्सकपणे विषद केला.

श्री. 'धम्मकलाडू' यांचा: ‘मेडीटेशन’ “डीमिस्टिफाय करून सांगितले आहे” हा अभिप्राय लेखाचा उद्देश साध्य झाला हे सांगतो.

सन्दर्भ आहेतच. वर दिलेच आहेत. सतत संदर्भ देत राहिल्यास लेखाचा ओघ कमी होतो व म्हणून ते टाळणे योग्य वाटले. संदर्भासहित गरज पडल्यास वेगळा लेख होऊ शकेल असे वाटते.

संदर्भ

दिलेले संदर्भ पुरेसे नाहीत.

दिलेले संदर्भ ध्यानधारणा आणि रक्तदाब याबद्दलचे कोरिलेशन सांगतो.

तुम्ही केलेले दावे "विद्यार्थ्याची स्मरणशक्ती सुधारते, दारू आणि सिगरेट सारखी व्यसने सुटतात, अस्थमा अल्सर सारख्यांवर सुपरिणाम होतात, वरिष्ठांची कार्यक्षमता वाढते" असे आहेत. यावरचे संदर्भ मिळाले नाहीत.

तुम्ही दिलेले प्राणायाम आणि अस्थम्याच्या कोरिलेशनचा संदर्भ प्रस्तुत चर्चेस उपयुक्त नाही.

वरिष्ठ नागरिकांची (वय वर्षे ५५ पुढील) (तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वरिष्ठ आधिकार्‍यांची नाही.) कॉग्निटिव परफॉर्मन्सचा मुद्दा विहंगम (?) योगा बद्दल आहे. (विकीच्या म्हणण्यानुसार हा प्रकार ब्रह्मविद्येशी जोडला आहे. माझ्या माहितीनुसार ब्रह्मविद्येत ध्यान हे एक अंग आहे. पण प्राणायाम वा तत्सम श्वसन व्यायामावर मुख्य जोर दिलेला आहे.) या निबंधाचा तुमच्या दाव्यांशी फक्त दूरान्वयाने संबंध आहे. (विद्यार्थ्यांची स्म्ररणशक्ति वाढते)

मेयो क्लिनिक ह्या संस्थेबद्दल मला फारशी माहिती नाही. ती एक मोठी आणि नावाजलेली संस्था दिसते. पण मोठी असल्याने त्यात वैज्ञानिकता सोडणारे थोडेफार असल्यासारखी दिसते. उदा. पण होमिओपॅथीची स्तुती करणारे त्यात आहेत असे दिसते.

रक्तदाब आणि ध्यानधारणा यांच्या कोरिलेशन वरचा संदर्भ २ मि.मि. ने रक्तदाब कमी होतो असे म्हणतो. मी दिलेल्या संदर्भात असे होत नाही असे दुसर्‍या टेस्ट द्वारे दाखवले आहे. तेव्हा हा विषय निर्णायक ठरलेला नसावा.

मेडिटेशनचा पोटेन्शिएट म्हणून उपयोग हा दावा नवीन दिसतो. त्यावर काही संदर्भ?

प्रमोद

सन्दर्भ पुरेसे नाहीत.....

संदर्भांविषयी एक गम्मत असते. 'याविषयावर अजून काम जरूरी आहे' असे सदैव म्हटले. औषधी विज्ञानात तर हे वारंवार पहावयास मिळते. संदर्भ ग्रंथात (उदा: Harrison) येण्यासाठी खूप वेळ जावा लागतो, तो पर्यंत नवीन औषधे येतच असतात. पुढील संशोधन रीइंफोर्समेंट साठी. आता तुमच्या विधानांबद्दल:

@ तुम्ही केलेले दावे ....... "वरिष्ठांची कार्यक्षमता वाढते" असे आहेत. यावरचे संदर्भ मिळाले नाहीत...................
हा संदर्भ जरूर पाहावा: http://www.saycocorporativo.com/saycoUK/BIJ/journal/Vol1No1/article_2.pdf
* या धाग्यात अधिकारी वर्गाच्या स्ट्रेस, बदलांनासामोरे जाण्याची क्षमता, अनुकंपा व नेतृत्वगुण या बाबत झालेले बदल दाखवले आहेत. कंपनीत वरच्या जागेवर काम करणारे असेच हे अभ्यासलेले गट आहेत.
* यांत दिलेले मेडीटेशन वेगळे (पारंपारिक बुद्ध पद्धती) आहे असे वाटेल. पण थोडे सखोल पाहिले की लक्षात येईल की यांत सुद्धा श्वासावर लक्ष ठेवले आहे. (विपसना हा प्रकार थोडा वेगळा आहे.) वेगळे वेगळे पंथ त्यांचे वेगळेपण राखून आहेत. त्यांचे पाठीराखे, फॉलोअर्स वेगळे असतात. त्यात केव्हा केव्हा आर्थिक बाजू पण असते. प्रत्येकाला स्पेस मिळते. आपणास पन्थ वगैरे प्रकारात् अडकावयाचे नाही हे माझे मत म्ह्णून चिकित्सा.
* शास्त्रज्ञ यां सर्व प्रकारांना समान (Similar, Same नव्हे) मानतात. आपण त्या पद्धतींचे विश्लेषण करावे व समान धागा धरावा अन्यथा आपल्यात व एखाद्या अंधश्रद्धाळू माणसात वा गतानुगतिक लोकांमध्ये फारसा फरक राहणार नाही असे वाटते.
लेखाचा मूळ उद्देश हे समजावजावून सांगण्याचाच होता.

@ तुम्ही केलेले दावे "विद्यार्थ्याची स्मरणशक्ती सुधारते, दारू आणि सिगरेट सारखी व्यसने सुटतात, अस्थमा अल्सर सारख्यांवर सुपरिणाम होतात, ......" असे आहेत. यावरचे संदर्भ मिळाले नाहीत.....................
दारू, इतर व्यसने यावरही उत्तम उदाहरण आहे.
*प्रथम यावर माझे वाक्य पाहू. ते (पहिल्या लेखात) असे आहे: अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अधिक सक्षम होते व त्यामुळे सिगारेट व दारू या सारख्या व्यसनापासून मुक्ती मिळण्यास मदत होते अथवा या व्यसनांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. मानसिक तणाव कमी झाल्यामुळे मनोकायिक रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. अस्थमा, अल्सर यासारख्या व्याधींवर मेडीटेशनचा सुपरिणाम पहावयास मिळतो.
शब्दश: बोलावयाचे झाले तर कुठेही पूर्णपणे मेडीटेशन ह्या सर्वांवर जादुई औषध आहे असा दावा नाहीच. तसा अर्थ जर कुणास वाटत असेल तर तो दोष माझा नाही.
*परंतू या विषयावर उत्तम संदर्भ देता येईल.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3057175/pdf/nihms-221333.pdf
यांत केलेले मेडीटेशन सुद्धा थोडे वेगळे आहे. तसे ते सतत असणारच आहे. पण त्यामागची मूळ संकल्पना एकच असते हे आपण वारंवार लक्षात ठेवणे (त्यामागील मुख्य सूत्राचे आकलन) जरूरी आहे.
इथे आपणास मेडिकल विद्यार्थी, त्यांचे वरील मानसिक ताण, दारू आणी तत्सम द्रव्ये घेण्याचे मूळ प्रमाण व मेडीटेशन मुळे त्यात कमी झालेले प्रमाण पहावयास मिळेल.

** खाली भारतातील अग्रेसर संशोधन संस्थेतील संशोधन दिले आहे. इथे आपणास योग, त्याचे मानसिक तणावावरील सुपरिणाम बघावयास मिळतील.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/16850902
फायद्या संदर्भात विचार करण्याची पद्धती व मिळणारे दान (दूरदर्शी मासा वेळीच बाहेर पडतो. दुसरा quick-thinker योग्य संधीची वाट पाहून ती येताच उडी मारून बाहेर पडतो. तिसरा दीर्घसूत्री ह्यापैकी काहीच न केल्याने पकडला जातो) ही ‘अनागतविधाता, प्रत्युत्पन्नमती आणि दीर्घसूत्री ह्या तीन माशांची गोष्ट व त्या संदर्भातला श्री अरविंद कोल्हटकर यांनी सांगितलेला श्लोक (सुभाषित ४) व त्यावरील त्यांचा व धम्मकलाडू यांचा सुंदर साद-प्रतिसाद आठवतो’.
पूर्णपणे फायदा दाखवे/दिसे पर्यन्त् थांबणे वा आतापर्यंत झालेल्या संशोधनावर विश्वास ठेवून सुरूवात करणे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. नुकसान नाहीच. फायदे आहेतच. ते सगळे वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनातून दिसते आहेच. हे लेख १००% सिद्धते पर्यंत थांबणांरांसाठी नाहीतच.

धन्यवाद

अधिक संदर्भांबद्दल धन्यवाद. काही प्रश्नांची उकल होत आहे. पण सर्वांची नाही.

१. पहिला संदर्भ हा वाचनीय आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यात कार्यक्षमता वाढते असा निष्कर्ष आहे. या निबंधातील संदर्भ निबंधाच्या विषयाला पुष्टी दिल्यासारखे वाटले. केलेल्या प्रयोगाची माहिती पारदर्शकतेने दिल्यासारखी वाटली. (पुढील संदर्भ पाहता आले नाही.) हा निबंध बिजिनेस् इंटेलिजन्स जर्नल मधील आहे. हे नियतकालिक अशा प्रकारच्या संशोधनासाठी नाही. लेखकाची इतर संशोधने फारशी प्रसिद्ध नाहीत. हा प्रयोग डबल ब्लाईंड पद्धतीने करता येण्यासारखा होता. (ज्यात गुण देणार्‍यास अमुक मनुष्य ध्यानधारणा करतो की नाही हे माहित नसणे गरजेचे आहे.) प्रत्यक्षात तो तसा केला नसावा असे वाटते.

एकंदरीत हा लेख संदर्भ येथे आणल्याबद्दल धन्यवाद.

२. प्राणायाम हा बहुतांशाने शारिरीक व्यायामाचा प्रकार आहे. या उलट ध्यान हा मानसिक प्रकार आहे. दोघांचे परिणाम वेगवेगळे असल्याने एकास दुसर्‍याच्या पुष्ट्यर्थ वापरू नये. पूर्वी लिहिलेल्या प्रतिसादात मी 'विंहगम योग हा ब्रह्मविद्येचा प्रकार आहे जो प्राणायामाशी जवळचा आहे' असे काहीसे लिहिले होते. या प्रकाराने काही फायदे होत असतील तर त्याची चर्चा स्वतंत्रपणे करता येते. हा ध्यानधारणेचा एक वेगळा प्रकार असता तर त्यावरील संदर्भाला माझी फारशी हरकत नाही. पण तसे तुम्ही म्हणत नाही. तुमच्या दुसर्‍या संदर्भात सर्व प्रकारच्या योगामुळे अमुक परिणाम होतात (ज्यात आसने, प्राणायाम आणि ध्यान येते.) असे त्या संदर्भाचे म्हणणे पडते. या कारणाने हा संदर्भ फारसा उपयोगी नाही.

३ तिसरा संदर्भ हा तणाव आणि त्यामुळे होणारे पेशींचे म्हातारेपण या संदर्भातील दिसतो. तणावामुळे पेशींमधे बदल होतात. ध्यानामुळे तणाव कमी होतो हे गृहितक त्यात धरलेले वाटले. (आणि हा निबंधासाठी गौण मुद्दा आहे.)

४. शेवटचा मुद्दा तुमच्या अभिनिवेशाचा आहे.
कित्येक जण तुमच्या लिखाणामुळे वा अन्य लोकांच्या प्रचारामुळे सिद्धता नसतानाही ध्यानधारणा करण्याच्या मागे लागतील. त्यात मला काहीही गैर् वाटत नाही. धोकादायक तर नसावेच. लोकांनी आपापला अनुभव घेऊन ठरवणे अनुचित नाही.
याच बरोबर हा प्रकार कुठल्या पोथीत लिहिला आहे म्हणून तो करावा असे म्हणणे ही चुकीचे नाही.
ध्यान केल्याने काहींचे तणाव कमी होण्यास मदत होत असावी. केवळ या कारणाने कोणी ध्यान करण्यास स्वयंअनुभवाने तयार असेल तर ते योग्यच आहे.

माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे. पहिली गोष्ट म्हणजे संशोधनाच्या आधारे ध्यानधारणेच्या परिणामांची सिद्धता झाली आहे असे म्हणणे. असे कुणाचे म्हणणे असेल तर त्यावरील संशोधन कुठले हे सांगणे जरुरी आहे. तुमच्या संदर्भांनंतरही तो फारसा मिळत नाही अशी माझी समजूत झाली आहे.

दुसरी ज्यांचे संदर्भ/साक्ष तुम्ही देता त्या व्यक्ति/संस्था यांची गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा बघितला पाहिजे. महेश योगी यांच्या बद्दलचा संशय असताना त्यांची साक्ष काढणे मला गैर वाटते.

प्रमोद.

प्रमोद

धनयवाद्, उकल होत आहे. पण सर्वांची नाही....

@ काही प्रश्नांची उकल होत आहे. पण सर्वांची नाही.... या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

आपले बरेचसे प्रश्न सयुक्तिकच होते. उत्तर देणे हे माझे कर्तव्यच बनत होते.
माझ्या मनात सुद्धा संदर्भासहित एक पूर्ण लेख लिहावयाचा होता. मूळ लेखात संदर्भांची गर्दी केली कि तो खूप मोठा व बरऱ्याचदा किचकट होतो आणि मूळ गाभ्याकडे दुर्लक्ष होत जाते. त्यातील सौंदर्य कमी होते वा जाते व बरेच वाचक असे लेख संपूर्ण वाचणे टाळतात. म्हणून मी ते टाळले. बहुधा सर्वांना तश्या संदर्भांची आवश्यकता पण नसते. हा झाला एक भाग.

महेश योगी यांचा उल्लेख फक्त विधानाबद्दल होता. त्यांचे मार्केटिंग अप्रतीम होते. लोक त्यांच्या मागे लागलेच की. (मंत्र हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते, त्याशिवाय संस्था कशी चालणार?) पण ‘सगळी मेडीटेशन सारखीच, खास असा मंत्र नसतोच’ हे सांगितल्यावर संपूर्ण लेखात आपण त्यात अडवायाचे नाही हेच ज्यास्त विशद केले.

दुसरा भाग म्हणजे आपण म्हणता तसे संशोधन (जसे औषधांच्या बाबतीत क्लिनिकल ट्रायल्स करतात) मेडीटेशन संदर्भात होणे कठीण आहे. क्लिनिकल ट्रायल्सचा खर्च खूप असतो. औषधांच्या बाबतीत यशस्वी झाल्यास पैसे वसूल होतात. येथे तसा कोणासच द्रव्यार्जनाचा फायदा होणार नसतो. योग संस्था अशा ट्रायल्सच्या बाबतीत कमकुवत व कमजोरच असतात, व त्यांचा कल चांगले परिणाम दिसावेत हाच होतो कारण विरुद्ध निर्णय त्यांना नको असतो. कॉर्पोरेटनाही विरुद्ध निर्णय नको असतो पण डी सी जी आय चा (DCGI, Regulatory bodies) अंकुश आहे म्हणून ठीक. हा मोठा दोष सिस्टीम् मध्ये आहेच. त्यातून चान्गले तेच घेणे हे आपले काम बनते व तोच माझा उद्देश असतो.

चार एक वर्षांपूर्वी क्लिनिकल ट्रायल्स संदर्भात एका मुंबईत भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत observer म्हणून गेलो होतो. भारतात Therapy Naïve रुग्ण व तज्ञ डॉक्टर असतात, म्हणून इथे ट्रायल्स आणा या येथील संस्थांच्या सुचनेवर, भाग घेतलेल्या NRI डॉक्टर्स चे उत्तर मार्मिक, विचार करावयास लावणारे होते. जेथे ‘सिग्नल लाल’ असताना चारचाकी गाड्या सुद्धा नियम तोडून तो बेधडक ओलांडून जातात तिथे क्लिनिकल ट्रायल्स आणणे ठीक वाटत नाही (ह्या उत्तरात flouting norms of patient recruitment व data compilation वर अविश्वास होता क्षमतेबद्दल नाही). क्लिनिकल ट्रायल्स बाबत परिस्थिती इतकी वाईट नाही पण accreditation हवे. तरीही थोडा किंतु उरतोच....... Pubmed मध्ये साधारण referenced journals चे abstracts असतात, पण अर्थात उडदामाजी काळे गोरे असतेच.

फायदे आहेतच. कैवल्यधाम, योग विद्या निकेतन या सारख्या संस्थांतून पाठदुखी, मानदुखी, यासारखे त्रास असलेल्यांना आसनांचा झालेला फायदा ही पाहिला आहे. ती वैयक्तिक निरिक्षणे म्हणून उल्लेख टाळला होता. प्राणायामा अंतर्गत अनुलोम विलोम (हा मूळ प्राणायाम नाही) करताना मेडीटेशन सदृश क्रिया होते. उत्तम प्रकारे केलेल्या Randomized, Controlled, Double Blind, Multi-centric अशा क्लिनिकल ट्रायल्स योगाभ्यासावर सापडणे जरा कठीणच आहे. संशोधक या सर्व प्रकारांना सारखेच मानतात याचे कारण या सर्वांत Relaxation अभिप्रेत आहे.

दारू, इतर व्यसने यावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर केलेले संशोधन येथे पहावयास मिळेल. हा संदर्भ गेल्या वेळी द्यावयाचा राहिला. उत्तम आहे.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3195515/pdf/nihms-310817.pdf

अपणाशी चर्चा करणे आवडलेच हे नमूद् करतो.

सायंटिफिक अमेरिकन

सायंटिफिक अमेरिकन म्हणतो ध्यान करणे चांगले असावे.

भंकस.

मला तरी अजूनही ध्यान करणे/लागणे म्हणजे नक्की काय ते अद्याप समजले नाही. अन् फक्त एकाग्र मन होणे यासाठी हे इतके नाटक करावे लागले पाहिजे याच्याशी मी असहमत आहे.
तात्पर्य. 'तंद्री' लागण्यासाठी इतरही गोष्टी असतात.
वरील प्रमोद सहस्त्रबुद्धे यांचेशी सहमत् असून "मेडिटेशन" ही भंकसबाजी आहे असे म्हणतो.

गरज

मला तरी अजूनही ध्यान करणे/लागणे म्हणजे नक्की काय ते अद्याप समजले नाही

गरज नसल्यास ठीक, असल्यास योग्य प्रयत्न केले तर नक्की काय ते समजण्याची शक्यता आहे.

मताचा अधिकार्

प्रत्येकास आपल्या अनुभवाप्रमाणे मताचा अधिकार आहे. आपल्या मताबद्दल आभारी आहे.

 
^ वर