1143 वर्षे जुने छापील पुस्तक- वज्र सूत्र

एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले. हा रेशीम मार्ग किमान 3000 वर्षे तरी वापरात होता. चीनमधल्या शियान या गावापासून सुरू होणारा मार्ग चीन, कझागस्तान, इराण, इराक या मार्गे रोमन साम्राज्याच्या सीमेपर्यंत पोचत असे तर दुसरा फाटा इराण, अफगाणिस्तान या मार्गाने भारतापर्यंत पोचत असे. या मार्गाने प्रवास करणारे व्यापारी वगैरेंच्या सोईसाठी ठिकठिकाणी सराया, पाणपोई वगैरे गोष्टी निर्माण केल्या गेल्या होत्या.
1900-01, 1906-08 आणि 1913-16 या वर्षांमधे त्या काळचा सर्वात नावाजलेला व प्रसिद्ध पुराण वस्तू संशोधक (Archaeological explorer) सर ऑरेल स्टाइन याच्या नेतृत्वाखाली तीन प्रमुख उत्खनन मोहिमा या रेशीम मार्गावर पर पाडल्या गेल्या. या तिन्ही मोहिमा मिळून ऑरेलने 25000 मैलांची पायी भ्रमंती केली. काश्मिर, अफगाणिस्तानमधल्या हिमालयांच्या रांगा किंवा Takalamakan’, ‘Lop-Nor’ आणि ‘Gobi’ यासारखी भयानक वाळवंटे त्याने व त्याच्या टीमने अनेक वेळा ओलांडली. अनेक जीवघेण्या प्रसंगातून तो पार पडला. या सगळ्यातून अनेक कलाकुसर केलेल्या वस्तु, रेशमी फलक, पुस्तके आणि रंगवलेली लाकडी पॅनेल्स त्याने शोधून काढली. ऑरेलचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे ‘मोगाओ‘ किंवा 1000 बुद्धांच्या गुहा! चीमधल्या गान्सू प्रांतातले दुनहुआंग हे शहर जुन्या रेशीम मार्गावर आहे. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहांची माहिती ऑरेल स्टाइनला मिळाली. त्यावेळी वांग युआन्लू नावाचा एक भिक्खू या ठिकाणाची देखभाल करत असे. ऑरेलने या भिक्खूला आपलेसे केले व केवळ 220 ब्रिटिश पौंडांना या ठिकाणी असलेले अनेक दस्ताऐवज, चित्रे, रेशमी फलक खरेदी केले.
या ठिकाणी मिळालेल्या दस्ताऐवजात, या सर्व कागदपत्रांचा मेरूमणी शोभेल असा एक ग्रंथ स्टाइनला मिळाला. 11 मे 868 या दिवशी (1143 वर्षांपूर्वी), जाड कागदावर छपाई केलेला हा ग्रंथ कागदाच्या सलग गुंडाळीवर लाकडी ब्लॉक्स छपाई करून छापलेला आहे. ही कागदाची गुंडाळी तब्बल 16 फूट लांब आहे. हा ग्रंथ आहे, महायान बुद्धपंथीय ज्याला अतिशय पवित्र ग्रंथ असे मानतात ते 'वज्र सूत्र' किंवा डायमंड सूत्र. इ.स 520 मध्ये चिनी भिख्खू शुएन झांग हा मुख्यत: हे वज्र सूत्र मूळ स्वरूपातून मिळवण्यासाठी चीनहून भारतात खुष्कीच्या मार्गाने आला होता. अर्थात मोगाओ गुंफात मिळालेला हा ग्रंथ, शुएन झांगने भारतातून नेलेल्या मूळ ग्रंथाबरहुकूम आहे किंवा नाही हे सांगणे कठिण आहे. या ग्रंथाच्या सुरूवातीला भगवान बुद्ध, सुभूती या एका व्यक्तीला इतर भिख्खूंच्या उपस्थितीत मार्गदर्शन करत असल्याचे चित्र देखील आहे.

या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते. बौद्ध सूत्रे ही मुखोद्गत करून धार्मिक भक्तीभावाने उच्चारण करावयाची असल्याने, ती उच्चारणार्‍याने आपले मुख व शरीर सर्वात प्रथम पवित्र कसे करून घ्यावे या बद्दलच्या सूचना या सूत्रात दिलेल्या आढळतात.

हे सूत्र म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. उत्तर हिंदुस्थानातील एका वाटिकेत, एक सह्स्त्र बौद्ध भिख्खू ज्याचा भाग होते अशा एका मोठ्या जनसमुहासमोर बुद्धांनी हे प्रवचन केलेले आहे. या समुहामध्ये असलेली 'सुभूती' या नावाची एक व्यक्ती, बुद्धांना त्यांनी या जनसमुहाला निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) कशी करून घ्यावी? या बद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. व त्याच्या विनंतीला मान देऊन, बुद्धांनी हे वज्र सूत्र सांगितलेले आहे.
या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही. बुद्धांना अशी विचारणा होते की गंगा नदीत किती वाळूचे कण असतील? बुद्ध यावर उत्तर देतात की जेवढे वाळूचे कण आहेत तेवढ्याच गंगा नद्या जगात आहेत असेही म्हणता येईल. पण प्रत्यक्षात वाळूचे कणही नाहीत आणि गंगा नदीही नाही. सर्व जगच एक भ्रम आहे आणि हा प्रश्न विचारणारी व्यक्ती सुभूती, ही सुद्धा एक भ्रमच आहे.

भगवान बुद्ध आपल्या आख्यानात पुढे म्हणतात की बौद्ध धर्मात प्रचलित असलेली व हे लौकिक जग एक भ्रम व मिथ्य आहे हे सांगणारी अनेक सूत्रे आहेत. भ्रम किंवा मिथ्य यांच्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक अशा निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र हे केवळ एक चिन्ह असल्यामुळे, या सूत्रात वर्णिलेल्या विचारविनिमयाला, 'निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र सूत्र' (Perfection of Wisdom Diamond Sutra) या नावाने पुढे ओळखले जावे. अर्थात या सूत्राला दिलेले वज्र सूत्र हे नाव सुद्धा तसे बघायला गेले तर मिथ्याच आहे. हे सर्व आणि बुद्धांचे विचार ऐकल्यावर सुभूतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असे हे 'वज्र सूत्र' पुढे म्हणते.
स्टाइनने हा 'वज्र सूत्र' ग्रंथ, परत भारतात आल्यावर ब्रिटिश म्युझियमला देऊन टाकला. व गेली 100 वर्षे तो तेथेच आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश लायब्ररीने त्यांच्याकडील असे काही महत्वाचे ग्रंथ जालावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यात 'वज्र सूत्र' हा ग्रंथ देखील आहे. मूळ ग्रंथ गुंडाळीवर छापलेला असून तो गुंडाळी उलगडत डावीकडून उजवीकडे वाचत जायची आहे. आंतरजालावर हा ग्रंथ 5 चित्रपृष्ठे या स्वरूपात आहे. या पुस्तकात शेवटी " वांग जि याने आपल्या माता-पित्यांच्या वतीने शियान्टॉन्ग च्या 9व्या वर्षातील 4थ्या पंधरवड्यातील पोर्णिमेला हे पुस्तक अत्यंत भक्तीभावाने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे" असा उल्लेख आहे. ही तारीख 11 मे 868 अशी येते. त्यामुळे संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे आज मानले जाते.
या ग्रंथातील पृष्ठांची छायाचित्रे या दुव्यावर बघता येतील.

( या दुव्यावरून छायाचित्रे आता जोडण्यात आली आहेत. -- संपादक मंडळ )

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

लेख आवडला. सिल्क रुटवरून प्रवास करणार्‍यांप्रमाणेच अलेक्झांडरच्या मार्गावरून मॅसेडोनिया ते भारत असा प्रवास करणार्‍या एका लेखकाचे पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आठवत नाही पण त्यातील अतिशय सुरेख फोटो आठवतात.

असो.

अवांतरः भूती या शब्दाचा नेमका अर्थ काय? "जाणीव" का? बौद्ध नावे सुरेख असतात. त्यावर मागे एक चर्चाही झाली होती. ती मिळाली नाही. :-( सुभूती हे नाव आवडले.

(अवांतर प्रतिसाद)

भूति म्हणजे अस्तित्व
सु-भूति म्हणजे चांगली स्थिती, सुस्थिती. या अर्थाने हा शब्द स्त्रीलिंगी वापरतात.
मात्र मोनिएर विल्यम्स् कोशाप्रमाणे सुभूति नाव बौद्धांपैकी काही प्रसिद्ध पुरुषांचे होते. उदाहरण वरच्या लेखात आहे.

भूती म्हणजे...

भूति या संस्कृत शब्दाचे अर्थः अस्तित्व; जन्म, उत्पत्ती; कल्याण; यश; समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती; वैभव; महिमा; भस्म; अणिमा आदी अष्ट सिद्धी; हत्तीचा मद; हत्तीचा अलंकार; लक्ष्मी; एक मांसाहारी खाद्य पदार्थ; जात; रोहिस (रोहिष) नावाचे सुगंधी गवत(या गवताला बंगालीत रामकर्पूर म्हणतात.) इ.इ.---'वाचक्नवी

धन्यवाद

शब्दार्थाबद्दल धन्यवाद. धनंजय यांचेही धन्यवाद.

एका शब्दाचे एवढे अर्थ. :-)

यांना--यांचे

यांना आशीर्वाद आणि यांचे आशीर्वाद. तोच फरक आशीर्वादऐवजी धन्यवाद वापरताना.... वाचक्नवी

दुरुस्ती

धनंजय यांना धन्यवाद देते असे वाचावे. :-)

"यांचे"सुद्धा आहेतच!

वेगवेगळ्या लेखनाकरिता प्रियाली यांना धनंजय याचे धन्यवादही आहेतच म्हणा.

माहितीपूर्ण लेख

माहितीपूर्ण लेख. आवडला.

थोडीशी गंमत :

उत्तर हिंदुस्थानातील एका वाटिकेत, एक सह्स्त्र बौद्ध भिख्खू ज्याचा भाग होते अशा एका मोठ्या जनसमुहासमोर...

आकडा १२६० असा आहे. मला चिनीमधले आकडे तितकेच वाचता येतात, आणि चित्र असलेल्या पानाशेजारच्या मजकुरात "१२६०" असा आकडा वाचला. ही भिक्खू श्रोत्यांची संख्या होती असे गूगल-शोध करून कळले.

लेख् आवडला...

लेख् आवडला.
ह्याहून जुन्या काळात छपाई कला चिन्यांकडे असल्याचा चीनचा दावा आहे असे डिस्कवरीवरील एका माहितीपटात पाहण्यात् आले होते.

--मनोबा

लेख

लेख आवडला.

उत्तम !

लेख आणि माहिती उपयुक्त वाटली.

या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही.

यावर इथे चांगली चर्चा घडू शकते असे वाटते. :)

हम्म

लेख आवडला.

>या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही.

सूत्राचा काळ हा बराच नंतरचा असल्याने हे भगवान बुद्धाचे मूळ म्हणणे असेल असे वाटत नाही.
अर्थात काही विचारांचा कालांतराने विपर्यास होताना दिसतो त्यापैकीच हे एक उदाहरण असावे.

सूत्राचा काल

तुम्ही म्हणता तसे असण्याची शक्यता आहे. माझा या बाबतीत काहीच अभ्यास नसल्याने वज्र सूत्र मुळात बुद्धांनी सांगितले की नंतर ते दुसर्‍या कोणी तयार केले हे मला सांगणे कठिण आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गैरसमज नसावा

कृपया गैरसमज नसावा. लेख वज्रसूत्रांच्या पुस्तकाबद्दल आहे, वज्रसूत्राबद्दल नाही याची मला जाणीव आहे.
मी लिहीले ते अनुषंगाने लिहीले एवढेच. बुद्धाने सांगितलेल्या गोष्टी सूत्रांमध्ये आहेत असा सार्वत्रिक समज आहे.
वरील सूत्र हे महायानांच्या काळातील म्हणजे बुद्धाच्या बरेच नंतरचे असावे.
वरील वर्णन हे "माये"चे आहे असे वाटते.

छापील

लेख अतिशय रोचक आहे.
तुमच्या लेखातील निष्कर्षां चा अर्थ छापण्याची कला मूलतः भारतात उगम पावली असावी असा होतो का?

त्यामुळे संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे आज मानले जाते.

विकीवरचा लेख "first printing of books started in China and was during the Tang Dynasty (618–907)"
असे म्हणतो.
असे असेल तर विकिपिडियावरचे लेखन बदलायला हवे.

-निनाद

गोंधळ

छापण्याची कला मूलत: भारतात उगम पावली असा निष्कर्ष मी काढलेला नाही. ती चीन मधेच उगम पावली.
हा ग्रंथ चीन मधेच छापलेला आहे आणि तो सर्वात जुना छापील ग्रंथ वगैरे नाही. या ग्रंथाच्या आधीच्या कालात छापलेले ग्रंथ पूर्ण स्वरूपात मिळालेले नसल्याने संपूर्ण पुस्तक या स्वरूपात मिळालेला हा सर्वात जुना ग्रंथ आहे एवढेच मी म्हणतो आहे. विकीवरची महिती बरोबरच असावी.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

छपाईची कला

छपाईची कला चीनमध्ये निर्माण झाली का भारतात ह्या चर्चेसाठी आधी 'छपाईची कला' (अधिक योग्य शब्द 'तंत्र) म्हणजे काय हे ठरवायला हवे.

ह्या धाग्यातील लिखाण लाकडाचे संपूर्ण लिखाण प्रथम लाकडावर कोरून केलेले ठसे वापरून 'छापलेल्या' लिखाणाबाबत आहे असे दिसते. असे 'made for it' ठसे वापरून 'एका वेळेस एक' अशा प्रकारच्या निर्मितीस 'छपाईचे तंत्र' म्हटले तर जगभर अनेक संस्कृतीमध्ये punch-marked नाणी पाडत असत त्यालाहि 'छपाई' म्हणावे लागेल.

गुटेनबर्गने ह्यात क्रान्तिकारी बदल घडवून आणले. मळसूत्रांचा उपयोग करून दाब निर्माण करणारे यन्त्र त्याने बांधले आणि 'made for it' ठशांच्या ऐवजी movable type निर्माण करून तेच ठसे पुनःपुन: वापरणे त्याने शक्य केले आणि पुस्तकनिर्मिति यान्त्रिक पातळीवर आणून पुस्तके शेकडो-हजारोंनी निर्माण करता येतील असे तन्त्र उत्पन्न केले. मला वाटते ह्यालाच खरी छपाईची सुरुवात म्हणता येईल. भारत-चीन बद्दल केले जाणारे सर्व दावे अतिरिक्त राष्ट्राभिमानाचे दर्शक आहेत असे मला वाटते.

गुटेनबर्ग प्रेस
गुटेनबर्ग प्रेस

अशाप्रकारची यन्त्रे जगभर - भारतासहित - १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत आणि २०व्याच्या सुरुवातीपर्यंत वापरात होती. आमच्या वडिलोपार्जित छपाई व्यवसायात सातारा गावात असे एक मशीन होते. त्याचा फोटो सोबत जोडला आहे.

'Printing Press' हे नाव छपाई व्यवसायाला चिकटण्याचे कारणहि हेच आहे. गुटेनबर्ग आणि नंतरची ट्रेडल मशीन, सिलिंडर मशीन ह्या सर्व technologies 'दाब निर्माण करून ठसा उठविणे' हेच कार्य करतात.

 
^ वर