भारताचा इतका उदो-उदो नको करायला!

अनुवादः सुधीर काळे, जकार्ता

या इंग्रजीत लिहिलेल्या मूळ लेखाचे लेखक आहेत (पाकिस्तानी) पंजाबच्या विधानसभेचे आमदार अयाज अमीर. या लेखात त्यांनी असे काही विचार मांडले आहेत, की अशा राजकारण्यांनी जर लष्कराला काबूत ठेवले तर आज ना उद्या भारत-पाकिस्तानातील तेढ पूर्ण नाहीशी झाली नाही, तरी नक्कीच कमी होईल असा विश्वास वाटू लागतो. आपल्या दोन राष्ट्रांत अविश्वासाची भावना खोलवर आहे याची अमीरसाहेबांना जाणीव आहे. पण आपले प्रश्न वाटाघाटीच्याच मार्गानी सोडवायला हवेत हेही ते ठासून मांडतात. आधी माजी पंतप्रधानांचे असेच वक्तव्य माझ्या वाचनात आले होतेच. त्याच्या पाठोपाठ हा सकारात्मक लेख आज वाचनात आला. म्हणून मी त्या लेखाचा अनुवाद करून त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.

भोळेपणाला बळी न पडता दोन्ही बाजूंनी डोळसपणे वाटाघाटी केल्यास, आपल्यातले जुने तंटे सुटण्याच्या मार्गाला लागतील असे वाटू लागते. मागे मी एका लेखात लिहिले होते, की पाकिस्तानशी हस्तांदोलन करून झाल्यावर आपल्या हाताची पाची बोटे जागेवर आहेत ना? एक-दोन बोटे कमी झालेली नाहीत ना? याची खात्री जरूर करून घ्यावी. पण हस्तांदोलन करताना कच खाऊ नये! अयाज अमीर यांचा मूळ लेख http://tinyurl.com/6vvmoh5 इथे वाचता येईल.

===================================
(खालील लेखातील सर्व प्रथमपुरुषी उल्लेख -मी, माझा, माझ्या, आम्ही, आपण, आपल्या वगैरे-मूळ लेखक श्री आयाज अमीर यांना उद्देशून आहेत. चारही टिपा मात्र पूर्णपणे माझ्या आहेत.)

पाकिस्तानच्या सूर्यमालेचे केंद्रस्थान सूर्य आहे, असे काही भाबड्या लोकांना वाटेल पण तो समज चुकीचा आहे. आपल्या पूर्वेला वसलेला हत्तीसारखा विशाल शेजारी भारत हे आपले केंद्रस्थान आहे! या भारताच्या पोटीच आपला जन्म झाला. आज जरी आपण आपल्या पश्चिम सीमेवरील युद्धात गुंतलेले असलो किंवा कर्मठ धर्मवेड्या उग्रवाद्यांकडून होणार्‍या हल्ल्यांना उत्तर देण्यात गुंतलेलो असलो, तरी आपली संपूर्ण युद्धनीती पूर्वेकडून येणार्‍या (भारताकडून येणार्‍या) खर्‍या किंवा काल्पनिक धोक्याला तोंड देण्याच्या उद्देशाने आखलेली आहे. (पाकिस्तानच्या दुर्दैवी संस्थापकांच्या स्वप्नांना सर्वात जबरदस्त धोका या उग्रवाद्यांकडूनच आहे आणि या 'भस्मासुरा'ची सध्याच्या स्वरूपातली निर्मिती ही आपल्या लष्कराचे एकुलते एक महत्कृत्य आहे!).

अशा तर्‍हेने बाकीचे जग प्रगती करत असताना आपण कालचक्राच्या मायाजालात अडकून पडलो आहोत, आपल्यासाठी जणू वेळ थांबलाच आहे, आपण भूतकाळातील युद्धे लढत आहोत, त्यांच्याकडूनच्या धोक्याच्या जाणीवेने एक तर्‍हेने झपाटले गेलेलो आहोत व परिणामतः अण्वस्त्रांच्या शर्यतील उतरलो आहोत, जिला कसलीही तर्कसंगती नाही.

माणसाला जमीन लागते तरी किती? या लियो टॉल्स्टॉयने विचारलेल्या सुप्रसिद्ध प्रश्नावरून तसाच एक प्रश्न माझ्या मनात येतो. एकाद्या देशाला आपल्या सुरक्षेसाठी अणुबाँब लागतात तरी किती? साधारणपणे एकाद्या व्यवहारी, समंजस जगात 'शत्रूच्या (खर्‍या किंवा काल्पनिक) हल्ल्याला परतवून लावण्यासाठी पाच-एक अणूबाँब पुरेत' असेच असेल. एक जरी अणुबाँब ’अल कायदा’च्या हातात पडला आहे हे समजल्यावर या धोक्याचे निवारण कसे करायचे, हा पेच अमेरिकेला पडेल इतके महत्व एक अणुबाँबला आहे. आपण एक भिकारी देश असू पण आपल्याकडे सार्‍या भारतीय उपखंडाला बेचिराख करायला आणि तिथे मृत्यूचे थैमान घालावयला पुरेसे अणूबाँब आणि क्षेपणास्त्रे आहेत.

तरीही आपल्या राष्ट्रीय हितांचे सर्वोच्च अभिरक्षक, आपल्या वैचारिक आणि भौगिलिक सीमांचे स्वनियुक्त संरक्षक (म्हणजेच लष्कर) आजच्या युगाला न मिळता-जुळता, कालबाह्य 'राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांत' राबवत आहेत. कारण शंभर-एक अणूबाँब असूनही त्यांचे समाधान झाले नाही!

पाकिस्तानच्या शस्त्रागारात असलेले अणुबाँब आणि पाच लाखांची सशस्त्र उभी फौज असूनही, जर या तथाकथित 'इस्लामच्या बालेकिल्ल्या'ला (हा सुद्धा एक कपोलपल्पित समज) सुरक्षिततेबद्दल खात्री वाटत नसेल, तर साक्षात् भवानी किंवा दुर्गा [२] जरी स्वर्गातून अवतरली तरीसुद्धा ती वाटणार नाही.

पाकिस्तानचे भारताबरोबर तंटे आहेत हे खरेच आहे आणि ते चालूच रहातील. पण आपण हे तंटे युद्धाच्या मार्गाने सोडवू, या भ्रामक कल्पनेत नक्कीच नाही आहोत. काश्मीरबाबत आपण आपल्या मुद्द्याला धरून राहिले पाहिजे हे खरेच आणि या बाबतीत काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार आपण चालले पाहिजे. पाणीवाटपाचा तंटा असल्यास तो आपण वाटाघाटीच्या मार्गाने सोडवला पाहिजे. जगातल्या सर्वात निरर्थक युद्धांच्या पवित्र्यात जर दोन तुल्यबल राष्ट्रे समोरासमोर उभी असतील आणि त्यात भोवळ आणणार्‍या उंचीवरील सियाचेन हिमनगही आला, तर वाटाघाटींशिवाय दुसरा कुठलाच व्यवहारी मार्ग दिसत नाही.

१९४७-४८ चे पहिले काश्मीरवरून पेटलेले युद्ध सोडले (ज्यातून आपल्या ताब्यात असलेला काश्मीरचा मुलूख मिळाला) तर भारताबरोबर झालेली बाकी सर्व युद्धे म्हणजे निःसंशयपणे आपण केलेल्या चुकांचा परिणाम होती. राष्ट्रीय हितांच्या नावाखाली आणि झियांच्या कारकीर्दीपासून, तर जिहाद म्हणून राष्ट्रीय ज्योत प्रज्वलित ठेवणार्‍या आपल्या ’सर्वोच्च रक्षकां’ना त्यांनी केलेल्या सर्व गुन्ह्यांबद्दल इतर कुठल्याही देशात चक्क बंदूकधारी तुकडीसमोर (firing squad) उभे करून ठार केले गेले असते.

आपण आधीच खूप सोसले आहे, तरीसुद्धा आपण त्यातून काहीच शिकणार नाही काय? पाकिस्तान-भारत सीमेवर ज्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलेले आहे तितके जगात इतर कुठेही केले गेले नसेल, हे खरेच आहे. या सीमारेषेवर भारतीय बाजूला एकाला लागून एक अशी लष्करी छावणीसदृश शहरे (cantonments) सलगपणे वसविली गेलेली आहेत आणि तशीच ती काश्मीरच्या पर्वतराजीपासून ते थेट अरबी समुद्रापर्यंत पाकिस्तानी बाजूलाही आहेत हेही खरेच. पण दोन्ही देशांनी हे तणाव आणखी तीव्र करण्याऐवजी ते कमी कसे करता येतील इकडे लक्ष दिले पाहिजे.

आपण नेहमीच डोळ्यात तेल घालून सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे यात शंकाच नाही. (अशा तर्‍हेच्या लेखात असे गुळमुळीत विधान करणे अनिवार्यच आहे, नाही का?) पण अशी जागरुकतेसाठी लागणारीच नव्हे तर पुरून उरणारी साधने आपल्याकडे आहेत. पाकिस्तानबद्दल शत्रुत्वाची भावना बाळगणारे काही लोक भारतीय जनमानसात असतील. पण त्यामुळे आपली झोप उडण्याचे कारण नाही. पाकिस्तान्यांनासुद्धा भारताबद्दलच्या न आवडणार्‍या गोष्टी आहेतच. त्यातही भारतीय लोक जेव्हा त्यांच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलतात तेव्हा त्यांना आपण (पाकिस्तानी) कसे मागे राहून गेलो हे सांगायचा गर्भितार्थ असतो, असे आपल्याला वाटते. या मंत्राचा जप वारंवार केला गेला, की ते अगदीच कंटाळवाणे होऊन जाते.

पूर्वग्रह संपूर्णपणे नाहीसा करणे शक्यच नाही. पण पूर्वग्रहाच्या भावनेला काबूत ठेवणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे. तसे पाहिल्यास पूर्वग्रह आणि संताप या भावनांशिवाय हे जग अगदीच नीरस आणि कंटाळवाणे होऊन जाईल. आपल्या कल्पनाविलासात रमून जायला हरकत नाही पण ते खासगीत. पण हे कल्पनाविलास आणि ही दिवास्वप्ने सरकारी धोरणें ठरविताना जेव्हा आपल्या बुद्धिमत्तेची आणि शहाणपणाची जागा घेतात, तेव्हा मात्र ते संकटांना एक तर्‍हेचे निमंत्रणच ठरते.

पाकिस्तान हा काही एक चावून चावून गिळण्याजोगा घास नाही. पाकिस्तान हे एकाद्या हुकूमशहाच्या इशार्‍यावर चालणारे अस्थिर राष्ट्र [३] आहे, हा गप्पा-टप्पांत येणारा संदर्भही चुकीचा आहे. अमेरिका पाकिस्तानवर राज्य करत नाही, करूही शकत नाही. कारण जिहाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली पाकिस्तानने केलेली काही ढळढळीटत मूर्खपणाची कृत्ये, ही पूर्णपणे 'स्वदेशी' असून ही मूर्खपणाची 'रसायने' इतर कुठल्याही 'प्रयोगशाळे'त बनू शकणार नाहीत.

CIA या संघटनेला कमी लेखायचा माझा उद्देश नाही. पण या संघटनेला त्यांच्या जन्मात तरी ’लष्कर-ए-झांगवी’ किंवा ’लष्कर-ए-तोयबा’सारख्या संघटना उभारता आल्या असत्या काय? कारगिलसारखे दुस्साहस करायला कल्पना आपल्या सैन्यातल्या सर्वोत्तम आणि उज्ज्वल सेनाधिकार्‍यांच्या सुपीक मेंदूतूनच निघू शकते! पाकिस्तान 'इस्लामचा बालेकिल्ला' असल्याची गाथा ही कल्पनासुद्धा केवळ पाकिस्तानातच मूळ धरू शकते. धर्माच्या नावाखाली स्वतःचा गाढवपणा जगाला दाखवायची क्लृप्तीसुद्धा पाकिस्तानशिवाय इतर कुठे होणे अशक्य!

थोडक्यात काय? तर आपण आपलीच निर्भत्सना करणे आणि भारताला एकाद्या देव्हार्‍यासारख्या जागेवर बसविणे थांबवू या! भारत आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहचवू शकत नाही. भारत आपली हानी करू शकतो हा धोकादायक मूर्खपणा आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. भारत पाकिस्तानवर हल्ला करायला टपून बसलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय नेते आपल्याहून जास्त जर मूर्ख असतील, तरच ते पाकिस्तानवर हल्ला करायच्या योजना आखतील. भारताने आपल्यावर फक्त एकदाच १९७१ मध्ये आक्रमण केले होते पण तेव्हाही असे करायला भारताला आपणच भाग पाडले होते. पूर्व पाकिस्तानात आपण इतका प्रचंड विचका करून ठेवला, की त्यामुळे आपण जणू भारताला हस्तक्षेप करायला आमंत्रणच दिले. इतर सर्व युद्धात आपणच भारतावर हल्ला केला होता, पण त्याचा परिणाम म्हणून आपण फक्त प्रलयंकारी विनाशच जगाला दाखवू शकलो. ही जी आपल्यात आणि भारतात युद्धांची देवाण-घेवाण झाली त्याचा जमा-खर्च आपण नीट समजून घेतला पाहिजे.

पाकिस्तानला सगळ्यात जास्त धोका स्वतःपासूनच आहे, आपल्या खर्‍या-खुर्‍या समस्यांकडे स्पष्टपणे पाहण्याच्या आणि आपल्या अपयशातून निर्माण झालेल्या समस्यांना समोरा-समोर तोंड देण्याच्या आपल्या असमर्थतेत आहे! धर्मवेडावर आधारित या उग्रवादाचा उगम, खास करून ’तालिबान’ आणि ’अल् कायदा’ प्रकारच्या उग्रवादाचा उगम, तीस-एक वर्षांपूर्वीच्या विकृतीतून झाला. झियांच्या कारकीर्दीत (किंवा त्याच्याही आधी १९७७ मध्ये भुत्तोसाहेबांविरुद्धच्या परंपरावादी चळवळीत) या दहशतवादाचा उगम झाला आणि त्यातून आजच्या अनेक दुर्घटनांना मंच मिळाला. या दहशतवादाची लाट परतवून लावणे हा FATA मध्ये किंवा तशाच इतर कुठल्याही भागामध्ये केलेल्या एकाद्या लष्करी कारवाईचा प्रश्न उरला नसून, पाकिस्तानचे राष्ट्रीय पातळीवर पुनरुत्थान करण्याचा आणि त्याला धर्मसत्ताक राज्यपद्धतीपासून वाचविण्याचा प्रश्न झाला आहे.

या पुनरुत्थानात पाकिस्तानच्या सर्वात बलिष्ठ, प्रबळ अशा संस्थेचा-लष्कराचाही समावेश केला गेला पाहिजे. पाकिस्तानच्या दुर्दैवाने ही संस्था पाकिस्तानवर सुधारणावादी किंवा पुरोगामी विचारांचा प्रभाव पाडण्याऐवजी काही जगावेगळ्या आणि विचित्र कल्पनांचा आणि सिद्धांतांचा पाठपुरावा करण्यात गुंतली आहे.

आणि हे पुनरुत्थान यशस्वी करण्यासाठी उपलब्ध असलेला वेळ फारच छोटा आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य परतवणार आहे आणि त्यासाठी जरूर ती पावले टाकणेही सुरू झाले आहे. या कारवाईबरोबर गेली अनेक वर्षें युद्धात गुंतलेल्या अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण होईल. त्या दृष्टीने आतापासून सैन्यपरती पूर्ण होण्याच्या आत आपण हे पुनरुत्थान संपविले पाहिजे.

दुर्दैवाने इस्लामाबादमधील कुठलीच प्रमुख व्यक्ती या बाबतीत फारसा आत्मविश्वास निर्माण करत नाही. कुणाचेही थेट नाव घेणे म्हणजे स्वतःची मनःस्थितीच खराब करण्यासारखे आहे. पण पाकिस्तानमध्ये जे जे पवित्र आहे त्याच्या स्वनियुक्त संरक्षकांच्या वरिष्ठ (लष्करी) सेनानींनी तरी काळाची पावले ओळखून आपली दिशा आणि गती बदलली पाहिजे आणि भारताबाबत कुरकुर करण्यात वेळ न घालवता धर्मवेड्या दहशतवादाची व्याप्ती जाणण्यात आणि त्याला काबूत आणण्यात त्या वेळेचा विनियोग केला पाहिजे. कारण अमेरिकी सैनिक गेल्यावर हा उपद्रव वाढणारच आहे.

गेली अनेक वर्षे व्यूहात्मक कारणासाठी लागणारी जागा, अफगाणिस्तानमधील आपले रास्त हितसंबंध आणि भारताकडून होणार्‍या हल्ल्याचा धोका, या सर्वांतून आपण खूप कष्टाने आणि अंगमेहनतीने निपजलेल्या मूर्खपणामुळे आपण एका सुंदर राष्ट्राचे रूपांतर एका अस्वाभाविक आणि विकृत राष्ट्रात केले आहे. एरवी पाकिस्तान पूर्व-पश्चिमेला जोडणारा चौरस्ता, एका बाजूला भारताचे तर दुसर्‍या बाजूला मध्य आशियाचे प्रवेशद्वार झाला असता.

थोडक्यात अण्वस्त्रांच्या आणि प्रक्षेपणास्त्रांच्या निर्मितीच्या मागे न लागता आपल्या, देशात सामान्य स्थिती आणणे आणि शिक्षण [४] आणि सुसंस्कृतता या दोन बाबींचा ध्यास घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर मध्यवर्ती कार्यक्रम म्हणून स्वीकारणे हे एक राष्ट्र म्हणून आपल्यापुढील सर्वात उच्च अग्रक्रमाचे कार्य आहे .

टिपा -

[१] अयाज अमीर पाकिस्तानी लष्करात कॅप्टनच्या हुद्द्यावर होते व राजीनामा देऊन बाहेर पडले. सध्या ते (पाकिस्तानी) पंजाब विधानसभेत चकवाल या मतदारसंघाचे आमदार आहेत.

[२] मूळ लेखात (ग्रीक पुराणानुसार युद्धाचा देव समजला जाणारा) 'एरीस जरी ऑलिंपसवरून अवतरला तरी' असा उल्लेख आहे.

[३] मूळ लेखात Banana Republic असा उल्लेख अमीरसाहेबांनी केलेला आहे.

[४] या लेखातले हे शेवटचे वाक्य खरोखर कळीचा मुद्दाच आहे! पण नुसतेच 'शिक्षण' नव्हे तर 'स्त्रीशिक्षण'! मराठीत लोकप्रिय असलेली 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी' ही म्हण १०० टक्के खरी आहे. माझे याबद्द्लचे पत्र 'डॉन'ने प्रसिद्धही केलेले आहे. त्यात मी लिहिले होते, की 'There is a saying in my mother tongue, Marathi, that the hands that rock the cradle contribute to the progress of mankind.' (पत्र इथे वाचू शकता! http://www.dawn.com/2011/03/25/importance-of-womens-education.html)

लेखनविषय: दुवे:

Comments

सापडला....

चला, हुसैन निसार, नजम सेठी ह्या पत्रकारांसारखाच अजून एक पाकिस्तानातला शहाणा माणूस सापडला.
बरे वाटले वाचून.

--मनोबा

कळलं पण वळेल का?

पाकिस्तान बाबत हे नेहमी होते. भारत पाकिस्तानवर कधीच हल्ला करु शकत नाही् हे पाकिस्तानात सर्वांना माहीत आहे. पण आज अयाज अमीर यांना समजले.सगळ्यांना समजले पाहिजे!

सुरेख लेखन आणि अनुवाद

फारच सुरेख लेखन.
श्री काळे असे वेगळे विचार आमच्यापर्यंत तशाच चांगल्या अनुवादा द्वारे पोचवलेत त्याबद्दल आभार.
दुसरे असे की त्यासाठि पुर्वपरवानगी घेणे हे उचीत आणि अनुकरणीय

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

 
^ वर