श्रद्धांजली: क्रिस्तोफर हिचन्स

एथिइस्ट, ऍग्नॉस्टीक वगैरे शब्दांशी परिचीत असणार्‍या कुणालाही क्रिस्तोफर हिचन्स हे नाव माहित नसणे अशक्य आहे. अतिशय वादग्रस्त भूमिका पण अत्यंत तीव्रतेने, तर्क सुसंगत आणि प्रामाणिकपणे मांडणारे तसेच पत्रकारीतेत गेले काही दशके दबदबा असणारे हिचन्स ह्यांचे काल वयाच्या ६२व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.अतिशय मुद्देसुद आणि पॉलिटीकली इनकरेक्ट असण्यासाठी प्रसिद्ध होते. 'गॉड इज नॉट ग्रेट' ह्या त्यांच्या पुस्तकाच्या नावावरुनच ह्याची कल्पना यावी. हिचन्स एका शो मधे म्हणाले होते की मी ऍथेइस्टच नसून अँटीथेइस्ट आहे. बहुतेक ऍथेइस्ट लोकांचा देव ह्या संकल्पनेवर विश्वास नसला तरी जगात अशी व्यवस्था असावी असा विचार असतो. अँटी थेइस्ट म्हणजे देव हया संकल्पनेवर विश्वास नाहीच पण अशी व्यवस्थ जगाला मारक ठरेल असा होता. हिचन्स ह्यांच्या मते २४तास आपल्या सर्वांवर सर्वंकश नियंत्रण ठेवणारी 'देव' ही संकल्पना हिताची नाही. अश्या व्यवस्थेत राहणे म्हणजे उ.कोरीया सारख्या देशात राहणे असे त्यांचे मत होते

धर्म/देव इ. विषयांखेरीज इतिहास, राजकारण अश्या विषयांचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता आणि त्यांची मते तितकीच टोकदार आणि तर्कदृष्ट होती.

मूळचे ब्रिटिश असणारे हिचन्स अमेरिकन नागरिक आणि वॅनिटी फेयर ह्या नियतकालिकाचे स्तंभलेखक होते. वॅनिटी फेयर मधील कारकिर्दीत मदर टेरेसावर केलेल्या टिकेमुळे नियतकालिकच संकटात सापडले होते पण हिचन्स कधीही त्यांच्या भूमिकेपासून हटले नाहीत. अश्या ह्या लढवय्यास श्रद्धांजली!

Comments

श्रद्धांजली :-(

अहो, नास्तिकांनाही (किंवा अँटी ऍथेइस्टांनाही) "श्रद्धां"जलीच का शेवटी? ;-) आदरांजली असे अधिक सयुक्तिक ठरले असते.

असो. विडिओ बघून उर्वरित मत प्रकट करेन.

श्रद्धांजली

नास्तिकही 'ओह माय् गॉड/ अरे देवा' वगैरे प्रचलित शब्दप्रयोग म्हणत असावेत. त्याचा अर्थ ते देवाला शरण गेले आहेत असा नसावा. श्रद्धांजलीचा मी अर्थ 'pay last respect' असा घेतो, त्यासाठी अधिक चपखल मराठी शब्द असल्यास सुचवा; संपादकांना तसा बदल करण्यास जरुर विनंती करेन. असो इथे त्यावर अधिक खल नको.

हिचेन्स ह्यांचे दु:खद निधन

गेल्या वर्षी टोरांटोमध्ये हिचेन्स आणि (अलीकडेच कॅथॉलिसिझमचा स्वीकार केलेले) टोनी ब्लेअर ह्यांच्यामध्ये Is Religion A Force For Good In The World? ह्या विषयावर श्रोत्यांसमोर खुला वाद झाला होता. त्याचा १ तास ४८ मिनिटांचा पूर्ण विडीओ येथे बघता येईल. वादाच्या शेवटी झालेल्या मतदानात ६८% मते विरुद्ध आणि ३२% बाजूने पडली.

हिचेन्स आणि रब्बाय् बोटीऍक ह्यांच्यामधील ईश्वराच्या अस्तित्वाविषयीची खुली चर्चा (१ तास ३४ मिनिटे) येथे पहाता येईल.

वॉटरबोर्डिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन हिचेन्स ह्यांनी वॅनिटी फेअर मध्ये लिहिलेला लेखहि मी वाचला होता.

आदरांजली

'गॉड इज़ नॉट ग्रेट'वाला हिचिन्ज़ टर्मिनल कॅन्सरने आजारी होता हे माहीत असूनही त्याचे निधन झाले आहे ह्यावर विश्वास बसत नाही. पुन्हा एकदा हिचिन्जचे यूट्यूबवरील काही विडियो बघितले. . एखाद्याचा (बहुधा आस्तिकांचा) थंडपणे उत्तम अपमान, तेजोभंग कसा करायचा हे कुणी (बहुधा नास्तिकांनी) त्याच्याकडून शिकावे. त्याला आदरांजली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

निरर्थक युद्धाचा समर्थक

एखाद्याचा (बहुधा आस्तिकांचा) थंडपणे उत्तम अपमान, तेजोभंग कसा करायचा हे कुणी (बहुधा नास्तिकांनी) त्याच्याकडून शिकावे.

हो. पण एखाद्या निरर्थक, निंद्य आणि घातकी युद्धाचे शेवटपर्यंत समर्थन कसे करावे हे ही हिचन्स कडूनच शिकावे. किसिंजरच्या वॉर-क्राइम्स वर लिहीणारा, आणि जॉर्ज ऑरवेल सारख्या विचारवंताला गुरु मानणारा हिचन्स पुढे जॉर्ज बुश-चेनी-रम्सफेल्ड सारख्यांचा अनुयायी होऊन अबु घ्रैब पासून इराकमध्ये झालेल्या सामान्य जनतेच्या हत्येचा "जागतिक शांतीच्या" नावाखाली समर्थक कसा झाला हा प्रवास पाहून मन थक्क होते. त्याने आस्तिकांचा कितीही तेजोभंग केला तरी "इल्सामोफॅशिसम" विरुद्ध लढणार्‍या बुशवर, त्याने रचलेल्या युद्धधोरणावर, आणि अमेरिकी उजव्या राष्ट्रभावनेवर त्याची स्वतःची श्रद्धा मात्र उत्तम आस्तिकासारखीच अटळ राहिली, उलट वाढतच गेली असे वाटल्यावाचून राहत नाही.

*********
धागे दोरे
*********

हिचिन्ज़चा प्रवास

धावतपळत भिरभिरता प्रतिसाद देतो आहे.

हिचिन्ज़ हा सुरवातील कट्टर लेफ्टिस्ट होता. पण अमेरिकत गेल्यावर त्याच्यात बदल झाले. तो ब्रिटनमध्ये राहिला असता तर त्याला तेवढा भाव मिळाला नसता हेही तितकेच खरे.

काही दिवसांपूर्वी जेरेमी पॅक्समनने बीबीसीच्या न्यूजनाइट ह्या कार्यक्रमासाठी घेतलेल्या खास मुलाखतीत त्याने मी अजूनही लेफ्टिस्ट आहे असेच म्हटले आहे. मुलाखत, बघितली नसल्यास, जरूर बघावी.

हिचिन्ज़ने इराक युद्धाचे समर्थन केलेले असले तरी तो जॉर्ज बुश-चेनी-रम्सफेल्डचा अनुयायी झाला असे म्हणता येणार नाही. त्याने बुशचे केलेले कौतुक वाचावे:

"[George W Bush] is lucky to be governor of Texas. He is unusually incurious, abnormally unintelligent, amazingly inarticulate, fantastically uncultured, extraordinarily uneducated, and apparently quite proud of all these things."

वरील क्लिपमधील नंतरच्या भागात त्याने क्लिंटन ह्यांच्यांवरही जी स्तुतिसुमने उधळली आहेत ती केवळ ऐकत राहावी अशीच.

सगळ्या धर्मांत इस्लाम हा सगळ्यात खतरनाक, ईविल धर्म आहे असे सॅम हॅरिससारख्यांचे जे मत आहे ते पूर्णपणे पटण्यासारखे नाही. पण त्यावर आणि इस्लामोफॅसिझमबद्दल सविस्तर चर्चा व्हायला हवी.

तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

युद्धाचे समर्थन

हिचन्स ह्यांनी युद्धाचे समर्थन केले म्हणून त्यांना जॉर्ज बुश-चेनी-रम्सफेल्ड सारख्यांचा अनुयायी म्हणणे ही टोकाची प्रतिक्रिया आहे.
त्यांनी केलेले युद्धाचे समर्थन ह्याविषयी असहमत असण्यास हरकत नाही पण त्यांच्या समर्थनामागची भूमिका त्यांनी २२ वैचारिक निबंध लिहून मांडली होती.

युद्धाचे समर्थन लहरीतुन आले होते किंवा श्रद्धेपोटी होते असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

टोकाची प्रतिक्रिया

मला ही टोकाची प्रतिक्रिया नाही वाटत. हिचन्स ने बुश ची अगदी आलंकृत वैयक्तिक टीका केली असली, तरी त्याच्या युद्धधोरणाचे (आणि एकूण नियो-कॉन दृष्टीकोनाला) इतके बोलके आणि ठाम समर्थन बुशच्याच सरकारत कदाचित कोणी केले असेल - वर उल्लेखित २२ निबंधांचा संचच त्याचे उत्तम उदाहरण आहे. वर, हिचन्स ने स्वतः बुश ला मूर्ख लेखले असले, तरी त्याच्या धोरणांच्या टीकाकारांवर तो चांगलाच घसरत असे - डिक्सी चिक्स या गायिकांना बुशची टीका केल्याबद्दल "फकिंग फॅट स्लॅग्स" म्हटले होते.

असो. कुठलेही धाडसी विधान करण्याचा माझा उद्देश्य नाही, आणि नास्तिकवादावरच्या त्याच्या विचारांबद्दल माझे कुठलेही ठाम मत नाही. त्याचे आधीचे साम्राज्यवादविरोधी लेखन, आणि ऑरवेल वरचे मार्मिक लेखन आवडले होते, ते अत्यंत प्रेरणादायी ही होते. पण अलिकडचे त्याचे लेखन पाहता त्याने स्वत:ला डाव्या पंथाचे म्हटले तरी हे पटण्यासारखे नाही. उलट डाव्यांविरुद्धच त्याचे कणखर लेखन वाढतच गेले. त्याच्या विचारांमधला बदल, आणि त्याचा तिखट हजरजबाबीपणा अशा राजकीय धोरणास उपयोगी पडणे, मला खिन्न करणारा होता, एवढेच.
*********
धागे दोरे
*********

सहमत

त्याचा तिखट हजरजबाबीपणा अशा राजकीय धोरणास उपयोगी पडणे, मला खिन्न करणारा होता
11 सप्टेंबरच्या घटनेसाठी अमेरिकेच्या नैतिक अधःपतनाला कारणीभूत मानणाऱ्या जेरी फॉलवेलसारख्यांचा एकीकडे खुर्दा करणारा हिचिन्स दुसरीकडे निओकॉन बुशच्या युद्धखोरपणाचे समर्थन करत होता हे खरेच खिन्न करणारे आहे. जॉर्ज गॅलवे हे त्याचे दुसरे टोक.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अरेरे

अरेरे! मृत्यूची बातमी माहित नव्हती
वाईट वाटले! प्रो-थेईस्ट (इश्वर एकच सत्य) ते ऍंटीथेईस्ट(इश्वरविरोधी) या वर्णपटलातील ईन्फ्ररेड रंग हरवल्यासारखे वाटावे इतका खंदा लढवैय्या गेला!

ऋषिकेश
------------------
एक प्रसिद्ध हायकू:
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ

मृत्यूविषयक भाषणे ऐकण्यासारखी

कॅन्सर घातक आहे, हे निश्चित कळल्यानंतर "आफ्टरलाइफ"बाबत केलेली भाषणे ऐकण्यासारखी आहेत. त्याची थोडी झलक वरच्या चित्रफितीतही दिसते.

दु:ख

जगबुडीच्या चार घोडेस्वारांमध्ये मला ते सर्वाधिक बोचरे वाटत.

बोचरे

Four Horsemen of the Apocalypse मधले ते सगळ्यात उद्धट आणि सडेतोड होते असे मत डॅन डॅनेट ह्यांनीही ह्या लेखात व्यक्त केले आहे. पण त्यांचा उद्धटपणा हा जिथे उद्धटपणाचीच गरज आहे अशा ठिकाणीच असायचा.

वरती कोल्हटकरांनी दिलेल्या दुव्यावर टोनी ब्लेअरसोबतच्या गंभिर वाद-विवादात कुठेही उद्धटपणा केलेला दिसत नाही. डॅन डेनेट ह्यांच्या लेखातही हेच अधोरेखित केले आहे.

आंदोलनाची हानी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
क्रिस्तोफर हिचेन्स हे प्रभावी वाक्पटु होते.त्यांचे शब्दसामर्थ्य अफाट होते.विषयाला समर्पक असे अनेक वाङ्मयीन संदर्भ त्यांच्या जिव्हाग्रावर असत.प्रतिपक्षाच्या मुद्द्यांचे खंडण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.त्यांच्याशी वादविवाद करताना प्रतिपक्षी हतप्रभ होत असे वाचले आहे.हिचेन्स यांच्या निधनाने जागतिक नास्तिकवादी आंदोलनाची मोठी हानी झाली आहे.
..
क्रिस्तोफर हिचेन्स यांचे कांही विचार:
*मदर तेरेसांना गरीब माणसे आवडत नसत. त्यांना गरिबी आवडत असे."दु:खभोग ही देवाची देणगी असते." असे त्या म्हणत.स्त्रियांना सक्षम आणि सबल करणे, सक्तीच्या प्रजोत्पत्तीसाठी स्त्रियांची सध्या जी पाळीव जनावरासारखी स्थिती आहे त्यातून त्यांची मुक्तता करणे,हा त्यांची गरिबी दूर करण्याचा जो खरा उपाय आहे त्याला मदर तेरेसा यांनी आयुष्यभर विरोध केला.
..
*"टेक्सास राज्याचे गव्हर्नरपद मिळाले म्हणून जॉर्ज डब्ल्यु बुश भाग्यवान आहेत असे म्हणायचे. अभूतपूर्व अजिज्ञासू वृत्ती, असामान्य निर्बुद्धपणा, आश्चर्यकारक वक्तृत्वहीनता, विस्मयकारक असंस्कृतपणा,अतिविलक्षण अशिक्षितता अशा गुणांनी युक्त असलेल्या जॉर्ज बुश यांना आपल्या या "गुणांचा" अभिमान वाटतो !"
.
*श्रद्धा म्हणजे मनाची शरणागती.बुद्धीची शरणागती.ज्या गोष्टीमुळे आपण जनावरांहून भिन्न आहोत त्या गोष्टींची शरणागती.कुणावरतरी अथवा कशावरतरी पूर्ण श्रद्धा ठेवून त्याच्या पायाशी आपल्या बुद्धीसह आपली शंका विचारण्याची स्वाभाविक वृत्ती गहाण ठेवणे हे मला अत्यंत मानहानीकारक वाटते.धार्मिकांनी श्रद्धेला गुण मानून तिचे अवास्तव स्तोम माजवून ठेवले आहे.
.
*श्वानधनींना हे समजलेच असेल की जर तुम्ही कुत्र्यांना आश्रय दिला, चांगले खाणे-पिणे दिले,प्रेम दिले तर तुम्ही देव आहात असे त्या कुत्र्यांना वाटते.तसेच मार्जारस्वामींना हे अपरिहार्यपणे कळून चुकले असेल की तुम्ही जर मांजरांना आश्रय दिला,चांगले खायला-प्यायला दिले,प्रेम दिले तर आपणच देव आहोत असा निष्कर्ष ती मांजरे काढतात.
[क्रिस्तोफर यांनी हे कोणत्या संदर्भात म्हटले आहे ते मात्र ठाऊक नाही....यनावाला]

ह्या अभ्युपगमात

*श्वानधनींना हे समजलेच असेल की जर तुम्ही कुत्र्यांना आश्रय दिला, चांगले खाणे-पिणे दिले,प्रेम दिले तर तुम्ही देव आहात असे त्या कुत्र्यांना वाटते.तसेच मार्जारस्वामींना हे अपरिहार्यपणे कळून चुकले असेल की तुम्ही जर मांजरांना आश्रय दिला,चांगले खायला-प्यायला दिले,प्रेम दिले तर आपणच देव आहोत असा निष्कर्ष ती मांजरे काढतात.
[क्रिस्तोफर यांनी हे कोणत्या संदर्भात म्हटले आहे ते मात्र ठाऊक नाही....यनावाला]

ह्या अभ्युपगमात पालकाच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केलेली दिसत नाहिये, बहुदा मार्जार आणि श्वान ह्यांच्या कृतज्ञते/कृतघ्नतेबद्दल ते भाष्य आहे.

 
^ वर