पुस्तक शिफारसः द क्वेस्ट

पंधरा एक वर्षापूर्वी कुठल्याश्या मराठी वर्तमानपत्रात जगातील सर्व खनिज तेल २०२७ साली खात्रीलायक संपणार आहे असे भाकीत वाचले होते. २०२७ नंतर तेलाचा एकंही थेंब मिळणार नाही त्यामुळे पर्यायी इंधन शोधण्यास पर्याय नाही असे वर्णन दिले होते. २०२७ म्हणजे फारच जवळ अगदी आपल्या हयातीतच तेल संपणार ह्या विचाराने तेव्हा चांगलेच पछाडले होते, तेलसमाप्ती इतकी निकट आली असूनही अजून काहीच पर्याय अस्तित्वात आलेला दिसत नाही, मग २०२७ नंतर गाड्या कशा धावतील? अशी चिंता वाटत होती. तेव्हापासून खनिजतेल, इंधन, ऊर्जा वगैरे विषयांमध्ये रस निर्माण झाला. ह्यावर्षी डॅनीयल युरगन ह्यांचे क्वेस्ट हे ह्याच विषयाला वाहिलेले पुस्तक आलेले समजले आणि उत्सुकता चाळवली गेली. युर्गन ह्यांचे 'द प्राइज' हे तेलाला वाहिलेले पहिले पुस्तक पुलित्झरने सन्मानित झाले होते त्यामुळे क्वेस्ट वाचायची अजूनच उत्सुकता वाटत होती. सुरुवातीला तब्बल ८१६ पानांचे हे जाडजूड पुस्तक बघून वर वर चाळावे किंवा एखाद दुसरा चाप्टर वाचावा असे ठरवून वाचायला घेतले पण युर्गन ह्यांची अभ्यासपूर्ण आणि पकड घेणारी शैली पाहून पूर्ण पुस्तक वाचणे भाग पडले.

'ऊर्जा' हा विषय केंद्रस्थानी ठेवून युर्गन ह्यांनी इतिहास, विज्ञान, भूगोल, राजकारण, पर्यावरण अश्या अनेक विषयांचा अतिशय ओघवत्या शैलीमधे असा परामर्श घेतला आहे की ह्यामध्ये रुची असल्यास ८१६ पानांची अजिबात फिकीर वाटत नाही. सहा भागांमधे विभागलेले एक पुस्तक म्हणजे ६ उत्कृष्ट पुस्तकांचा संच आहे. इतका व्यापक विषय असूनही संपूर्ण पुस्तक अतिशय तटस्थ दृष्टिकोनातून लिहिलेले आहे. डावा, उजवा, अमेरिका धार्जिणा/द्वेषी असा कुठलाही कल न ठेवता अतिशय तटस्थ पद्धतीने विषयाची मांडणी हे मला पुस्तक आवडण्याचे प्रमुख कारण.

पहिल्या भागांमधे खनिज तेल, त्याचा इतिहास, जागतिक राजकारण ह्याला वाहिले आहेत. तेल नावाचं काळं सोनं ज्या ज्या भूभागामध्ये सापडले तिथे तिथे कसे स्थित्यंतर झाले, जगाला वेठीस धरण्याची हिंमत ह्या एका खनिज संपत्तीमुळे कसे आली ह्याचे अगदी वर्णन आहे. अरबस्थान तिथले तेल वगैरे आपण परिचित आहोतच पण अफ्रिकेमधे कुठे कुठे तेल आहे, नायजेरिया मधे तेलाचे राजकारण कसे चालते वगैरे रोचक माहिती आहे. पेट्रोस्टेट म्हणजे नेमके काय आणि मुबलक तेल असल्याचे दुष्परिणामही कसे असतात हे ही दिले आहे. इराक युद्ध नेमके कशामुळे झाले, जीवरासायनिक अस्त्रे नसताना सद्दाम कधीच तसे उघड का बोलला नाही, किंवा युनोच्या इन्सपेक्शनला का टाळत होता हे मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही ह्या पुस्तकात आहेत. आपल्या कडे विघातक अस्त्रे आहेत ही अफवा सद्दामला मुद्दाम हवी होती. इराण वगैरे कट्टर शत्रू जवळ असताना अशी भिती ठेवणे सद्दामला सोयीचे होते. त्याचा एकंच अंदाज चुकला तो म्हणजे, पाश्चिमात्य देश युद्धविरोधी निदर्शनांना घाबरून युद्धात उतरणार नाहीत असा विश्वास वाटणे. अर्थातच सीनियर बुश साहेबांनी हा अंदाज खोटा ठरवला आणि त्यानंतर काय झाले हे आपण सारे जाणतोच. वैश्विक पटलावरच्या अश्या गुंतागुंतीच्या घटना मुद्देसूद पद्धतीने मांडल्या आहेत. ह्याच भागांमधे पुढे परामर्ष घेतला आहे कळीच्या मुद्द्याचा, तो म्हणजे तेल खरंच संपणार आहे का? नक्की आपण तेलाच्या साठ्याबाबतीत कुठे आहोत? तेलाचा जागतिक बाजार कसा चालतो? २००७-०८ मधे नक्की तेलाचे भाव कशामुळे भडकले होते? अश्या अनेक प्रश्नांचा. तेल संपणार आहे किंवा तेल उत्पादनाचे शिखर गाठले असून आता घसरगुंडी सुरू आहे वगैरे भितीदायक भाकिते खोटी ठरत आहेत असे दिसत आहे. युर्गन ह्यांच्या मते तेल नक्कीच इतक्यात संपणार नाही आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तंत्रज्ञानात झालेली क्रांती, जी भाकिते नोंदवताना अस्तित्वात नव्हती. सध्या कॅड/कॅम वगैरे संगणक प्रणाली वापरून अचूकतेने तेलाचा शोध घेतला जातो आणि हॉरीझाँटल ड्रिलिंग वगैरे अतिशय आधुनिक तंत्रज्ञाने पूर्वी पेक्षा कितीतरी अधिक तेल उपसले जाते. त्यामुळे तेलसाठा हा मर्यादित असला तरी त्याच्या मर्यादा दिवसें दिवस वाढत चालल्या आहेत. सध्या तेल संपण्यापेक्षा कितीतरी गंभीर प्रश्न तेलामुळे होणार्‍या ग्लोबल वॉर्मिंग मुळे जगासमोर आहे.

तेलाची कहाणी संपते तो पर्यंत ग्लोबल वार्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, सीओटू इमिशन वगैरेचे प्रकरण सुरू होते. ग्लोबल वार्मिंग नक्की काय आहे, शास्त्रज्ञांचे एकमत कशावर आहेत मतभेद कुठे आहेत वगैरे गोष्टींवर सखोल माहिती पुरवली आहे. पुस्तकाचा हा भाग वाचून झाल्यावर वैश्विक तापवृद्धी, हरितगृह परिणाम इ. गोष्टींबाबत वाचकाच्या मनात काहीही शंका उरणार नाही इतकी शास्त्रीय आणि ऐतिहासिक माहिती पुरवली आहे. क्लायमेट आणि वेदर ह्यातला फरक ह्यापासून ते कॅप अँड ट्रेड आणि क्योटो करारापर्यंत सुंदर माहिती दिली आहे. कुठलेही इंधन जाळले की त्यातून ऊर्जा मिळते आणि सीओटू मुक्त होतो. हा कार्बन डायऑक्साइड एक प्रकारची जाड गोधडी पृथ्वीभोवती विणत आहे आणि अर्थातच गोधडीत शिरले की उबदार वाटू लागते तसे पृथ्वीला उकडायला सुरू होत आहे. आणि सध्या तेलाचा मर्यादित साठा ह्या समस्येपेक्षा हा कार्बन डाय ऑक्साइड कसा कमी करावा ह्याची समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भेडसावते आहे. अनेक देशांची प्रगती ही ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांवर अवलंबून असल्याने सगळ्यांना समान नियम तरी कसे लावायचे. त्यामुळेच अतिशय गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्यानुसार जगातील निरनिराळ्या देशांच्या भूमिका हे वाचणे अतिशय रोचक आहे.

खनिज तेलाला असणारे पर्याय कोणते? कॅनडामधील तेलवाळू की अमेरिकेत मुबलक असणारा केरोजेन? पण जगाची ऊर्जेची गरज ही गाड्या चालवणे इतक्यापुरती मर्यादित नाही, विद्युत निर्मिती हा त्याहून महत्त्वाचा भाग आहे. ज्या विद्युत ऊर्जेशिवाय दैनंदिन कामात आपले पानंही हलू शकत नाही त्याच्या पुरवठ्याचे काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रकरणांमधून येतात. शेल गॅस नक्की काय भानगड आहे? अमेरिकेत वास्तव्यात असणार्‍यांना गेल्या काही वर्षात घरगुती गॅसचे पडणारे भाव जाणवले असतीलच. ह्याचे नेमके कारण काय? तर 'शेल गॅस' म्हणजे ढोबळ मानाने विशिष्ट दगडां मधे अडकलेला नॅचरल गॅस, जो फ्रॅकिंग (फ्हायड्रॉलिक फ्रॅक्चरींग) नावाच्या तंत्रज्ञानाने दगड फोडून बाहेर काढला जातो. ह्या नवीन स्रोतांविषयी अनेक पाने भरून माहिती पुरवली आहे. नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा ह्यांनी युर्गन ह्यांच्या टीमकडून फ्रॅकिंगचे फायदे तोटे ह्याविषयी रिपोर्ट बनवून घेतला ह्यावरून युर्गन ह्यांची ह्या विषयावरील पकड लक्षात यावी.

एकंदरीत पुस्तक माहितीचा खजिना आहे. ज्यांना हा विषय आवडतो अश्यांसाठी अतिशय रोचक पद्धतीने साग्रसंगीत माहिती पुरवली आहे. वरती लिहिले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टींवर पुस्तकात सखोल माहिती पुरवली आहे. सोपी भाषा आणि नेमकी मांडणी ह्यामुळे हा विषय ज्यांच्या फारश्या आवडीचा नसेल त्यांनाही काही पाने चाळून पाहण्यास नक्कीच उद्युक्त करेल त्यामुळे ह्या पुस्तकाची मी सर्वच उपक्रमींना शिफारस करतो.

पुस्तकाविषयी माहिती:

The Quest: Energy, Security, and the Remaking of the Modern World
Hardcover: 816 pages
Publisher: Penguin Press HC, The; 1ST edition (September 20, 2011)
Language: English

Comments

छान.

पुस्तक परिचय आवडला. पुस्तक वाचावेसे वाटते आहे.
'तेल संपल्यावर काय' या प्रश्नाने मलाही वेळोवेळी भंडावले आहे. मी ऐकलेले भाकित २०५० पर्यंतचे होते. ;)

रिचार्जेबल कार्स्

चांगला पुस्तक परिचय आवडला. पुस्तक वाचण्याची इच्छा झाली.

गॅसचे दर साडेतीनच्या वर गेले की मला रोज 'तेल संपले की काय?' असा प्रश्न पडतो. ह. घ्या.

पुढील काही वर्षांत रिचार्जेबल कार्स येऊ घातल्या आहेत असे ऐकले आहे. एकंदरीतच या गाड्यांचा स्मार्ट वापर कसा होईल हे पाहणे रोचक आहे. लांब प्रवास करण्याची सध्या क्षमता नसली तरी रोजच्या प्रवासासाठी कदाचित उपयुक्त ठरतील. अर्थातच, जेथे लोड शेडिंग चालते तेथे काय होईल हा प्रश्न आहेच.

रिचार्जेबल कार्स

पुढील काही वर्षांत रिचार्जेबल कार्स येऊ घातल्या आहेत असे ऐकले आहे.

ह्याची सुरुवात झाली आहे. निसान लीफ ही संपूर्णपणे बॅटरीवर चालणारी कार बाजारत गेल्यावर्षीपासून उपलब्ध आहे. तसेच टेस्ला नावाची महागडी स्पोर्ट्स कारही बाजारात उपलब्ध आहे. पुस्तकात ह्यावरंही बरीच पाने लिहिलेली आहेत. निसान लीफची पूर्ण जन्मकथा सांगीतली आहे.

बॅटरीवर चालणारी कार ही संकल्पना आपल्याला वाटते तितकी नविन नाही. गाड्यांच्या सुरुवातीच्या काळात खुद्द एडीसनने ह्यावर खूप मेहेनत घेतली होती. पण त्याचे बॅटरीवर चालणारे मॉडेल फोर्डच्या गाडीपुढे मागे पडले. शेवटच्या प्रकरणांमधे ह्यासगळ्या विषयी खूप रोचक माहिती पुरवली आहे.

प्रायस

निसान लीफ ही संपूर्णपणे बॅटरीवर चालणारी कार बाजारत गेल्यावर्षीपासून उपलब्ध आहे. तसेच टेस्ला नावाची महागडी स्पोर्ट्स कारही बाजारात उपलब्ध आहे.

बरोबर. मी प्रतिसाद लिहिताना माझ्या डोक्यात टोयोटा प्रायस होती. नंतर आणखी शोधले तेव्हा इतर गाड्या आधीच मार्केटात आल्या आहेत याची जाणीव झाली.

मी पुस्तक नक्की चाळेन परंतु लेखकाचे अशा न्यू जनरेशन कार्सबाबत काय मत आहे हे थोडक्यात सांगावे.

इलेक्ट्रिक कार

प्रियस ही हायब्रीड कार आहे, ज्याच्यात पारंपारीक इंटरनल कंबश्चन इंजीन आहे. निसान लीफ किंवा शेवी व्होल्ट ह्या इलेक्ट्रिक कार्स आहेत. ज्यामधे फक्त बॅटरी हे एकच इंधन असते त्यामुळे 'इंजीन' हा प्रकारच नसतो.

लेखकाचे अशा न्यू जनरेशन कार्सबाबत काय मत आहे हे थोडक्यात सांगावे.

इलेक्ट्रिक कार्सना बॅटरी हा खूप मोठा अडथळा आहे. बॅटरी सतत चार्ज करावी लागते आणि त्यासाठी लागणारा वेळ हे मोठे आव्हान आहे. पेट्रोलची टाकी पूर्ण भरायला त्यामानाने खूपच कमी वेळ लागतो. जपानी तज्ञांनी 'एक चहाचा कप संपवण्यास लागणारा वेळ' हा बेंचमार्क धरला असून इतक्या वेळात संपूर्ण बॅटरी कशी रीचार्ज कशी होइल ह्यावर संशोधन चालले आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे विद्युत ऊर्जा. लोक दिवसा चालवुन रात्री मोटार रिचार्ज करतील ह्या गृहितकावर इलेक्ट्रिक कार्सच्या ऊर्जेचे बिझनेस मॉडेल आधारले आहे. पण समजा लोकांनी दिवसाही रीचार्ज करण्यास सुरूवात केली तर काय होईन? किंवा पीक डिमांडच्या वेळेला (उदा. संध्याकाळी जेव्हा घरातील बहुतांश उपकरणे चालू असताना) अनेकांनी गाड्या चार्जिंगला लावल्या तर ग्रीडला तो भार सोसवेल का? इ. गोष्टींना अजून उत्तरे नाहीत.

सुधारणा

पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे.

शेव्ही व्होल्टला पेट्रोल टँकही आहे. त्यांच्या संस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे वीजेवर चार्ज केलेल्या बॅटरीवर ३५ मैलांपर्यंत आणि पेट्रोलवर ३७५ मैलांपर्यंत जाऊ शकते.

व्होल्ट

व्होल्ट मधे पेट्रोल टँक असला तरी तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरतात, जनरेटर सारखा. शेवटी कार ही बॅटरीवरंच चालते. बॅटरी घरच्या विद्युत जोडणीने चार्ज करता येते किंवा पेट्रोलने. माझ्या माहिती प्रमाणे व्होल्ट मधे पारंपारिक 'इंटर्नल कंबश्चन इंजीन' त्यात नाही, त्यामुळे ती इलेक्ट्रीक मोटार प्रकारात येते हायब्रीड नाही.

चांगला विषय

आणि पुस्तक परिचय देखील.
आयर्न मॅन मधल्यासारखा एखादा पोर्टेबल न्युक्लिअर रिऍक्टरचा शोध लवकरच लागला पाहिजे! :)

उत्सुकता

चांगला परिचय. पुस्तक वाचावेसे वाटत आहे. रोचक परिचयाने तूर्त हे पुस्तक उपलब्ध होईल का, झाल्यास त्याची किंमत आपल्याला परवडेल का (नुकत्याच पाहिलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात मला आवडलेल्या एका संचाची किंमत ११०० डॉलर्स होती!) आणि सलग इतकी पाने वाचणे आपल्याला जमेल का या शंकांवर मात केली आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

 
^ वर