ही मराठी ब्लॉगर्सची मानसिकता ? का अजून काही?

मराठी ब्लॉगिंग मध्ये अगदी थोडीफार लुडबुड करायला लागल्या पासून बऱ्याच मराठी ब्लॉग्जला भेट द्यायचा योग आला.काहींचे लिखाण हे खूप आवडले ,तर काहींचे तितकेसे नाही.ह्यातील सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एखाद्या ब्लॉगरचे एखादे पोस्ट आपल्याला अगदी वाचल्या वाचल्या त्या क्षणी आवडले म्हणून आपण अतिशय उत्साहाने त्यावर काही कॉमेंट दिली तर जवळपास ९० टक्क्याहून ब्लॉग वर "आपली टिप्पणी मंजुरी मिळाल्यानंतर दृश्यमान होईल" हि पाटी त्वरित आपल्या समोर येते नि आपण खट्टू होऊन जातो.साल म्हणजे होत कस कि आपण एखाद्याच्या मुलाचे तो परीक्षेत चांगल्या मार्काने पास झाला म्हणून अगदी कौतुकाने बाजारातून अगदी चांगले पेन विकत घेऊन त्याला प्रेझेंट द्यायला वेळात वेळ काढून त्याच्या घरी जावे तर त्याच्या बापाने.......... "तो स्कॉलरशिपच्या अभ्यासाची तयारी करतोय तुम्ही नंतर भेटा"... असे सांगितल्या सारखे होते.आता हातातले आणलेले पेन त्याच्या बापाने आता बघितलेलेच असल्याने ते त्याला देण्या शिवाय पर्यायच राहिला नसल्याने पेन त्याच्या बापाकडे सोपवून "बरंय येतो" म्हणत आपण काढता पाय घेतो,अन तो हि ते पेन (निर्लज्जपणे)हातात घेत "पुन्हा या" म्हणायला मोकळा.आपण तिथून बाहेर पडता पडता मनात ठरवलेलेच असते कि “सालं, कौतुकानं म्हणून आलो तर तू हि ट्रीटमेंट देतोयेस,मुलाला दोन मिनिट भेटू द्यायला काय झाल होत? ”

"झक मारली नि तुझ्या कडे आलो.पुन्हा कोण कशाला मरायला तुझ्या दारात येतंय?”

ब्लॉगिंग क्षेत्रात सुद्धा काही अगदी सगळेच पु.ल. किंवा कुसुमाग्रज नाहीयेत.तर मित्रांनो.... माझ्या सारखा हाच अनुभव आपल्या पैकी बऱ्याच जणांना येऊन गेला असणार यात शंका नाही.पण आपण कुठेच बोलू शकत नाही. माझ्या सारखे कुत्र्याच्या छत्री सारखे मौसमी उगवणारे ब्लॉगर संख्येने जरी बरेच असले तरी दर्जेदार लिखाण,अभ्यासपूर्ण लेखाची मांडणी ह्याची मराठी मध्ये काही अगदीच वानवा नाही.

तथापि ह्या पद्धतीचे comment moderation(म्हणजे ब्लॉगरची मंजुरी असा ह्या पुढे अर्थ अभिप्रेत धरण्यात यावा ) असंख्य ब्लॉगवर पहाता डोक्यात असा किडा येऊन गेला कि ... सालं मराठी ब्लॉगरची हि मानसिकताच आहे का,कि मराठी माणूस बुळचटच होत चाललाय ? राकट देशा,कणखर देशा,दगडांच्या देशा गोविंदाग्रजांच्या बरोबरच अनंतात विलीन झाला कि काय? अरे जरा बिनधास्त व्हा कि,रहा कि….. समजा तुम्ही तुमचं ते moderation च (म्हणजेच "तुमच्या" मंजुरीचे )ऑप्शन काढून टाकलं तर काय होईल? अगदी जास्तीत जास्त काय होऊ शकेल तर तुमच्या एखाद्या पोस्ट वर एखादे वेळी एखादा वाचक त्याला ते पोस्ट किंवा त्यातील मुद्दा ,विचार अगदी नाहीच पटला तर काही वेड वाकड तुमच्या अपरोक्ष तुमच्या ब्लॉग वर कॉमेंट देईल किंवा देऊ शकेल.ह्या पलीकडे काय होऊ शकणार आहे? ती कॉमेंट सभ्यतेच्या “अगदी सर्व” मर्यादा सोडून असेल तर वगळण्याचे शस्त्र पण तुमच्या हातात आहेच ना? नि त्या उपर जर तुम्हाला काही कृती करावयाची असल्यासच आता सायबर क्राईम कायद्या नुसार आपण त्या कॉमेंट धारकाचा तो अगदी कुठेही असला तरी त्याचा आय.पी.एड्रेस सहज मिळवू शकतो.अगदी त्याच्या लोकेशन सह.मग आपल्याला इतके असुरक्षित वाटायचं कारणच काय? अरे दोन घेणारा नि चार देणारा असा मराठी माणसाचा खाक्या आहे तो हे ब्लॉगर विसरले कि काय ? नि त्या मुळे जरा वाजवी पेक्षा जास्तच डिफेन्सिव्ह झालेत ? नि समजा ती टीका सभ्यतेच्या मर्यादेत असेल तर तुमची काय हरकत आहे? नि आपले सर्व लिखाण हे लोकांना अगदी आवडलेच पाहिजे किंवा कोणी त्यावर ब्र सुद्धा काढता नये असा आग्रह सुद्धा का? अहो नाही आवडत कधी कधी.....

अपवादात्मक म्हणून आमच्या महिला भगिनींनी हि दक्षता त्यांच्या ब्लॉग वर घेतल्यास ... नव्हे त्यांनी ती घ्यावीच ... किंवा ज्यांनी आपला ब्लॉग त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनातून सुरु ठेवला आहे अशा मित्रांनी सुद्धा ती सुरु ठेवल्यास वाचकांना सुद्धा ते खटकू नये किंवा खटकणार नाही.तथापि मी जे म्हणत आहे ते बाकी ९५ टक्के ब्लॉग बद्दल…….

आणि म्हणूनच मला हेरंब ओकचा "वटवट सत्यवान",विद्याधर भिसेचा " बाबाची भिंत ",नि सुहास यादवांचा "ऑप्शन मेकर" ह्या सारखे ब्लॉग नि अजून ही काही ब्लॉग हे त्याच्यातील उत्कृष्ट लिखाणाच्या पलीकडे जाऊन जास्त आवडतात. कुठल्याही प्रकारचे कोणतेही अडथळे नाहीत.त्या मुळे त्यांच्या सारख्याचे वाचकां बरोबर जुळलेले नाते जास्त प्रेमाचे नि आपलेपणाचे आहे. ह्या सारखे ब्लॉगर्स हे खरे मराठी शोभतात.हे इतके सविस्ताराने सांगायचे कारण म्हणजे बऱ्याच मराठी ब्लॉग वर बऱ्याच वेळा खूप चांगले लिखाण असून हि नि ते बऱ्याच वाचकांच्या नजरे खालून जाऊन हि तो लेख,ते लिखाण आवडल्याचे न आवडल्याचे कोणतेही प्रतिसाद तेथे दिसत नाहीत.कारणे काही हि असतील पण मला भासलेले कारण म्हणजे जरा स्पष्टच बोलायचे तर लोक ,म्हणजेच वाचक ,जेथे कॉमेंटला मॉडरेशन असेल किंवा असते तेथे कॉमेंटच्या बाबतीत एकदा ,दोनदा किंवा जास्तीत जास्त तीनदा विषाची परीक्षा घेऊन बघतात.नंतर मनातल्या मनात का होईना म्हणतातच कि "जा खड्ड्यात " ह्याचा.......ह्या वाचकांच्या मानसिकतेच्या मराठी ब्लॉगर्स नि जरूर विचार करावा. आपली कॉमेंट जर लगेच प्रकाशित झाली तर त्याने त्या वाचकाला कितीही नाही म्हटले तरी मनातून अगदी कणभर का होईना थोडासा आनंद हा होतोच ..जसा लहानग्या बाळाला त्याच्या आईने बाजारातून आणलेला खाऊ आधी तिला त्याने एक गोड पापा दिल्यावर मग तो खाऊ त्याच्या हातात ठेवल्या वर होतो तसा... नि सर्वात महत्वाचे म्हणजे कॉमेंट मॉडरेशन(मंजुरी) म्हणजे तुमच्या लेखी तुम्ही फक्त अति शहाणे नि तुमच्या येथे येणारे सगळे बिनडोक नि मूर्ख असे सुद्धा वाचकाला वाटू शकले तर वाचकांचा त्यात काय दोष? बरे प्रथम भेट देणाऱ्या बिचाऱ्याला वाचकाला ह्याचा काहीच अंदाज नसतो .तो हमखास फसतो .त्यावर आमचे काही मित्रांनी नामी युक्ती शोधलीये.ते कोणत्याही ब्लॉग वर पहिल्या वेळी कॉमेंट देते वेळी नुसता झेड, टी,किंवा जी असा कोणताही अल्फा बेट टाईप करतात. तो जर लगेच प्रसिद्ध झाला तर तो डिलीट करून कॉमेंट देतात नाही तर नुसता एखादा अल्फाबेट हा कोणी ब्लॉगर काही प्रसिद्ध करत नाही. त्या मुळे त्यांचे श्रम वाचतात. असे त्यांना वाटते.नि सर्वात महत्वाचे आपल्यावर विनाकारण कोणी अविश्वास दाखवतोय ह्या भावनेचा त्यांना त्रास होत नाही.

हा लेख वाचल्या वर कदाचित काही मराठी ब्लॉगर्सचे "च्यायला हा कोण दीड शहाणा आलायरे आम्हाला अक्कल शिकवायला? कोण .... कोण आहे रे हा? असे मत होण्याची शक्यता सुद्धा मी बिलकुल नाकारत नाहीये.तसेच बऱ्याच ब्लॉगर्सला वाचकांच्या कॉमेंटच्या बाबतीत may be ,कदाचित काही वेडे वाकडे अनुभव सुद्धा आले असतील.त्या मुळे सुद्धा ते इतके कोशात गेले असतील पण तरी इतके डिफेन्सिव्ह होऊ नका हो .. आम्हा वाचकां वर इतका अविश्वास दाखवू नका हो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उगाच अगदी फार मोठ्या संस्कृती रक्षकाच्या भूमिकेत शिरून आमचे एखाद्या कॉमेंट मधील एखादे ओघवते मराठी संबोधन,जे क्वचित प्रसंगी अगदी फार खोलात गेल्यावर अगदी कदाचित थोडेफार अश्लील सुद्धा वाटू शकेल असे सुद्धा असू शकेल पण ती त्या कॉमेंटची गरज असेल, नि सर्वात महत्वाचे ,म्हणजे ते तेथे शोभून दिसत असेल तर उगाच ते वगळू नका... तर ,हे आम्हा वाचकांचे आपल्याला आवाहन आहे,विनंती आहे.

खरे तर माझा हा कॉमन सेन्सिबल विचार ह्या आधी सुद्धा बऱ्याच वाचकांच्या डोक्यात येऊन गेला असणार,त्यांनी त्या विषयी माझ्या सारखेच त्या त्या लेखकांना आय मीन ब्लॉगरला ह्याच्या विनंत्या सुद्धा केल्या असायची शक्यता नाकारता येत नाही तथापि म्हणावी अशी फार काही सुधारणा नाही.असो.

मी स्वतः शेयर बाजाराशी संबंधित अनेक इंग्रजी ब्लॉग्जला भेटी देत असतो,दिल्या आहेत.खरे तर ते क्षेत्र ते इतके बिन भरवशाचे,अनिश्चित नि धोकादायक आहे कि तेथे तुमच्या कोणत्याही चुकीला माफी नाही नि शिक्षा हि रोख स्वरूपात ...लगेच त्वरित.तेथे दया माया नाही..... तर सांगायची गोष्ट म्हणजे मी तेथे सुद्धा असे बरेच फ्री ब्लॉग.... नव्हे, जवळपास सर्वच ब्लॉग असे पाहतो कि जेथे खरे तर लोकांनी तुमचा एखादा अंदाज एखादे दिवशी जरी अगदी चुकला तरी मार मार शाब्दिक जोडे मारायची प्रचंड शक्यता असते.वेळ प्रसंगी अगदी खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा... कारण "त्याला"आर्थिक फटका बसलेला असतो ना? त्या मुळे त्याचे मुळातच डोके फिरलेले असते.पण मुळात खरे तर त्यांना त्या ब्लॉग धारकाने माझ्या कडे या नि पहा, बघा,मी सांगतोना ? असं कोणतही गूळ खोबर देऊन सांगितलं नसत,पण तरी हि ते ब्लॉगर्स साले इतके जबरदस्त आहेत/असतात कि ते त्यांच्या ह्या अनाहूत वाचकांच्या नुकसानीस कोणत्याही प्रकारे जबाबदार नसताना सुद्धा हि टीका अशी काही झेलतात पचवतात कि यंव रे यंव.अगदी अश्लाघ्य,अश्लील भाषेतील टीका तेवढीच फक्त ते नंतर नाईलाजास्तव वगळून टाकतात. अन्यथा ती टीका हि स्वीकारायची त्यांची जबरदस्त मानसिकता असते..........ह्यातील सर्वात मला (उगीचच) खटकणारी गोष्ट म्हणजे अहो हे सर्व ब्लॉगधारक इतर प्रांतीय आहेत.खास करून दक्षिणेतील.ह्या लोकांचे खास करून धाडस म्हणजे ह्यातील बरेचजण तर चालू मार्केट आवर्स मध्ये त्यांच्या ब्लॉग चे नियमित अपडेटेशन करणारे असतात.अहो म्हणजे तर केवढी रिस्क ... पण नाही तो क्लासच काही वेगळा आहे.... कारण रोजच्या साधारण १ लाख कोटी रुपयाहून अधिक उलाढाल असणाऱ्या भारतीय शेयर बाजारातील मुंबई सहित महाराष्ट्राचा रोजचा वाटा सिंहाचा म्हणजेच ७० टक्क्याहून जरी अधिक असला तरी,नि भले मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी म्हणून जरी अजून ओळखली जात असली तरी महाराष्ट्रीयन ... हो महाराष्ट्रीयनच ....मराठी नाही ... माणसाचे त्या विषयाला वाहून घेतलेले ब्लॉग तर दूर राहून द्यात अगदी इतर विषया वरील त्याच्या ब्लॉग वरील लिखाणा वरील टीका झेलायची सुद्धा त्याची मानसिकता कमीच आहे कि काय अशी शंका घ्यायला जागा आहे.

मॉडरेशन शिवाय जर एखादा ब्लॉग प्रसिद्ध होत असेल नि तो दर्जेदार असेल तर त्याचा अवघ्या २ ते ३ वर्षात वाचक वर्ग किती असू शकतो ह्या साठी मी श्री. Ilango ह्या "जस्ट निफ्टी" वाल्या तमिळ ब्लॉगर चे उदाहरण देऊ इच्छितो, अधिकृत पाठीराखे फक्त जेमतेम ५६१ पण आज पर्यंतचे वाचक ६७,९३,३४५ आणि प्रत्येक दिवशी सरासरी १७,०३७ वाचक तेथे नियमित भेट देत असतात असे त्याचा साईट मीटर सांगतो. मुळात इंग्रजी जाणणारा देशातला वर्ग हाच फक्त अजून इंटरनेटशी निगडीत आहे हे जरी आपण मान्य केले नि शेयर बाजार हा जुगारी मानसिकतेच्या लोकांचे क्षेत्र असल्याचे जरी आपण उघड उघड मान्य केले तरी, सर्व वाचकांच्या पसंतीस तो ब्लॉग उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील दर्जेदार लिखाण.,योग्य भाषेतील अगदी कटू,जहरी टीका,अगदी क्वचित प्रसंगी वैयक्तिक टीका सुद्धा झेलण्याची सदरहू ब्लॉगर ची कणखर मानसिकता,नि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यास संयमित भाषेत उत्तर देण्याची त्याची ताकद

मराठी ब्लॉग्ज मध्ये सुद्धा दर्जेदार लिखाणाची अगदीच काही वानवा नाहीये.तथापि मला येथे खेदाने असे नमूद करावेसे वाटते कि मला माझ्या गेल्या एक दीड वर्षाच्या मराठी ब्लॉगच्या सफरीत "मराठी मध्ये"फक्त "वटवट सत्यवान" म्हणजेच हेरंब ओक हा एकच ब्लॉगर वरील ब्लॉगरच्या ताकदीचा नव्हे कणभर सरस असा आढळला.अर्थात दोघांचे क्षेत्र,लिखाणाची पद्धत,शैली हि पूर्णतया भिन्न आहे ..मी जे बोलतोय ते फक्त ब्लॉगरच्या मानसिकते विषयी.

तरी आपले मराठी मधील ब्लॉगर ह्याचा म्हणजेच प्रामुख्याने त्यांच्या नि नंतर वाचकांच्या मानसिकतेचा विचार करतील काय ?

का शेयर बाजाराशी छोटेसे ट्रेडर म्हणून का होईना ते लोक निगडीत असल्याने,नि सदैव बाजारा कडून रट्टे बसून बसून कदाचित कोडगे झाले असल्याने सुद्धा त्यांना त्याचे म्हणजेच टीका,अपयश ह्याचे तितकेसे सोयर सुतक नसल्याने सुद्धा त्यांची मानसिकता जरा जास्तच बिनधास्त किंवा प्रगल्भ झाली असावी ? कि त्या मुळे समजा एखाद्याने जर त्यांच्या एखाद्या लिखाणावर जर चुकून माकून अगदी काही टीका केलीच तर त्याचे त्यांना फारसे कौतुक नसावे असे वाटते तसेच त्यांना त्यांचे लिखाण म्हणजे अगदी काळ्या दगडावरील पांढरी रेघ हा सुद्धा अभिनिवेश नसल्याने,नि त्यांचे प्रत्येक लिखाण ,विचार,मत हे प्रत्येकाला पटलेच पाहिजे किंवा बरोबरच असते असा सुद्धा भ्रम किंवा समज नसल्याने ह्याचे काहीच वाटत नाही ?..कि त्यांचे वडील काही महाराष्ट्राचे कोणी गव्हर्नर वगैरे नसल्याने किंवा ह्या पुढेही ते व्हायची बिलकुल शक्यता नसल्याने,क्वचित प्रसंगी अगदी एखाद्याची एखादी चुकून माकून काही बरी वाईट प्रतिक्रिया समजा अगदी आलीच तरी त्या एखाद्या बऱ्या वाईट प्रतिक्रिये मुळे त्यांचे काय किंवा,अगदी त्यांच्या घराण्याचे नाव काय त्या मुळे धुळीला मिळणार असल्याची बिलकुल शक्यता नसल्याने सुद्धा भिती अशी नसावी ,जी कदाचित इतरांना........ न जाणो कदाचित असू शकेल...., नक्की काय ते कळू शकेल काय?

हे आपले माझे comment moderation च्या बद्दल सगळे निव्वळ बिनकामाचे,नि कदाचित काहींच्या मते बिनडोक्याचे अंदाज हि असू शकतील.कॉमेंटला मॉडरेशन ठेवण्या साठी दुसरी ह्या पलीकडे जाऊन हि काही कारणे असायची शक्यता सुद्धा मी नाकारत नाहीये... ती जिवंतच आहे नि राहील...पण तरी डोक्यात बऱ्याच दिवसा पासून वळवळत असलेला हा किडा ह्या आजच्या दिवशी आपल्या पुढे म्हणजे ब्लॉगर्स नि वाचकां समोर पोस्टमार्टेम साठी ठेवला आहे. आपल्याला त्या वर काय वाटते?

वरील लेख मी माझ्या मराठी ब्लॉगवर साधारण आठ एक महिन्यां पूर्वी प्रसिद्ध केला होता तथापि तो त्या तुलनेत जास्त लोकां पर्यंत पोहोचला नव्हता.त्या मुळे ह्या विषयी ब्लॉगर्स पेक्षा असलीच तर वाचकांची नक्की काय मतभिन्नता आहे ते समजू शकले नव्हते."उपक्रम" च्या सर्वदूर पसरलेल्या माध्यमातून ते लक्षात येईल असा विश्वास वाटतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वांतसुखाय?

मायनॅक या आधीही तुम्ही उपक्रमावर लेख टाकलात पण तेव्हा तुमचे स्वागत करण्यास विसरले होते. असो. आता करते.

माझ्यामते बरेचसे मराठी ब्लॉगर्स हे स्वांतसुखाय लिहितात. या विषयावर अशीच नाही परंतु थोडी चर्चा या आधी झाली आहे. स्मरणरंजन, वैयक्तिक आठवणी वगैरेंवर आधारित ब्लॉग्जना कमेंट मॉडरेशन असल्यास मला त्याबाबत काही गैर वाटत नाही परंतु वैचारिक किंवा विज्ञान, इतिहास, भूगोल, भाषा वगैरे विषयांना वाहिलेल्या ब्लॉग्जना काटेकोर कमेंट मॉडरेशन ठेवण्याची सहसा गरज नसावी हे माझे वैयक्तिक मत. प्रत्यक्ष अनुभव यापेक्षा वेगळा असू शकेल.

एखाद्या पोस्ट वर एखादे वेळी एखादा वाचक त्याला ते पोस्ट किंवा त्यातील मुद्दा ,विचार अगदी नाहीच पटला तर काही वेड वाकड तुमच्या अपरोक्ष तुमच्या ब्लॉग वर कॉमेंट देईल किंवा देऊ शकेल.ह्या पलीकडे काय होऊ शकणार आहे? ती कॉमेंट सभ्यतेच्या “अगदी सर्व” मर्यादा सोडून असेल तर वगळण्याचे शस्त्र पण तुमच्या हातात आहेच ना? नि त्या उपर जर तुम्हाला काही कृती करावयाची असल्यासच आता सायबर क्राईम कायद्या नुसार आपण त्या कॉमेंट धारकाचा तो अगदी कुठेही असला तरी त्याचा आय.पी.एड्रेस सहज मिळवू शकतो.अगदी त्याच्या लोकेशन सह.मग आपल्याला इतके असुरक्षित वाटायचं कारणच काय?

हे असे करण्यास लागणारा वेळ, सहनशक्ती वगैरे लक्षात घेता मॉडरेशन लावणे अनेकांना अधिक सोईस्कर वाटण्याची शक्यता आहे.

असो.

हे सर्व सोडून माझा अनुभव सांगायचा झाल्यास काही बायकांना उगीच टारगेट केल्यासारखे प्रतिसाद देण्याची विकृती लोकांत असते. हे लक्षात आल्यावर मी माझ्या एका ब्लॉगला मॉडरेशन लावले. दुसर्‍याला लावले नाही कारण तेथे काही वैयक्तिक किंवा ललित लेखन होत नाही. परंतु तेथे जुन्या पोस्टवर येणार्‍या कमेंट्सना मॉडरेशन आहे त्याचे कारण याप्रमाणे -

कमेंट मॉडरेशनसाठी खालील ऑप्शन्स आहेत -

१. ऑलवेज
२. मॉडरेशन फॉर पोस्टस् ओल्डर दॅन १४ डेज
३. नेवर

यापैकी "नेवर" असा पर्याय नोंदवला तर कोणतीही कमेंट आल्याची खबर तुम्हाला इमेल मार्फत मिळत नाही. नवीन पोस्ट असेल तर ब्लॉगर ब्लॉगवर जाऊन पुन्हा पुन्हा कमेंट आली का हे तपासू शकतो परंतु दोन-तीन वर्षे जुन्या पोस्टवर कमेंट आल्यास त्याला "नोटिफिकेशन" कसे मिळणार? यासाठी मला दुसरा पर्याय आवडतो.

याहूनही एक वेगळा ताप असतो तो स्पॅम्सचा किंवा ऑटोमेटेड प्रतिसादांचा. तोही माझ्या ब्लॉगवर मध्यंतरी झाला होता. इतकेच काय उपक्रमावरही असे होऊन अनेक डमी यूजर्स तयार झाले होते.

स्वांतसुखाय? प्रतिसाद

प्रियाली,
आपण म्हणता त्या प्रमाणे बरेचसे मराठी ब्लॉगर्स हे स्वांतसुखाय लिहितात.
आपले म्हणणे जरी मान्य केले तरी जेव्हा त्यांनी त्यांचा ब्लॉग हा ब्लॉगर्स साठीच्या साईटस् वर त्यांना "गरजेच्या वाटणाऱ्या प्रसिद्धीसाठी" जोडलेला असतो ,तेव्हा हे विधान म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवल्या सारखे वाटते.
महिला ब्लॉगर्सच्या ब्लॉग वरील कॉमेंटस् बद्दल
महिला ब्लॉगर्स ह्या त्यांच्या ब्लॉग वरील "त्या" पद्धतीचे हल्ले परतवण्याची क्षमता जरी बाळगून असल्या तरी,अजून एकूणच समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा आपल्या देशातील दृष्टीकोन हा निकोप नाही.त्या मुळे त्यांनी हे सव्य-अपसव्य करत बसण्या पेक्षा सरळ सरळ मॉडरेशन ठेवले तरी हरकत नाही.अर्थात हे वैयक्तिक मत आहे.
आपण म्हणता त्या प्रमाणे "यापैकी "नेवर" असा पर्याय नोंदवला तर कोणतीही कमेंट आल्याची खबर तुम्हाला इमेल मार्फत मिळत नाही." हे चूक का बरोबर ते मला माहित नाही पण माझ्या ब्लॉग वर हे नेव्हरचेच ऑप्शन कायम केलेले आहे आणि माझ्या मेल आय डी वर अगदी ६-८ महिन्या पूर्वीच्या पोस्ट वर आलेली कॉमेंट सुद्धा मेल बॉक्स मध्ये येते असा अनुभव आहे.
"याहूनही एक वेगळा ताप असतो तो स्पॅम्सचा किंवा ऑटोमेटेड प्रतिसादांचा". ह्या विषयी, ह्या पोस्टच्या प्रतिसादात एका वाचकाने ह्याचा उल्लेख केला होता तथापि मी मात्र अद्याप तो अनुभवला नाही.अर्थात ब्लॉगिंग विषयात मी तसा एल् अँड टी म्हणजे लिंबू टिंबू किंवा नवखा आहे त्या मुळे कदाचित तिथ पर्यंत पोहोच नाही.
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

मॉडरेशन कसे काढायचे?

मी काही मुद्दाम मॉडरेशन ठेवलेले नाही. पण ते आपोआप आलेले आहे. माझा ब्लॉग ब्लॉगरवर आहे. त्याचे मॉडरेशन कसे काढायचे? याबद्दल कृपया मार्गदर्शन द्यावे.

सेटिंग्ज

तुमच्या ब्लॉगची सेटिंग्ज तपासा. त्यात तुम्हाला कमेंट्स किंवा प्रतिसादांसाठी असणारी सेटिंग्ज दिसतील ती बदला.

आता प्रतिसाद येऊद्यात

धन्यवाद. थोडी खटपट केल्यानंतर जमलं. आता प्रतिसाद येऊद्यात, मी त्यांचीच वाट पहात होतो.

जिव्हाळ्याचा विषय

मराठी ब्लॉग आणि ब्लॉगर आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यानिमित्तानेएक ऐतिहासिक चर्चा आठवली. असो. आलोच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पूर्वी झालेली एक चर्चा

या विषयाशी निगडित पूर्वी झालेल्या एका चर्चेचा दुवा येथे देत आहे.

तुच्छता बाळगू नये

'ब्लॉगर्सची मानसिकता' म्हणणं हे साधारणीकरण वाटलं. एखाद्या लेखकाचा ब्लॉग ही त्याची व्यक्तिगत जागा असते. अर्थातच ती सार्वजनिक वाचनासाठी असते हे खरं आहे. पण तिथे काय लेखन व्हावं हे प्रत्येक जण आपापल्या मताने ठरवतो. प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. मराठी संस्थळांवरदेखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका दिसतात. लेखनच काय पण प्रतिसाद देखील संपादकीय अनुमतीने प्रसिद्ध व्हावेत हे एक टोक झालं. काही ठिकाणी प्रतिसाद आपोआप प्रसिद्ध होतात, मात्र लेखन प्रसिद्ध करायला संपादकीय अनुमती लागते. तर काही ठिकाणी कोणीही काहीही लिहा अशी मोकळीक दिसते. पण प्रत्येकच ठिकाणी संपादकांना न पटणारं, संस्थळाच्या धोरणांत न बसणारं लेखन काढून टाकलं जातं. ही धोरणंही वेगवेगळ्या ठिकाणी शिथिल अथवा जाचक असतात. काही ठिकाणी ही धोरणं लिहिलेली असतात, तर काही ठिकाणी अलिखित असतात.

तुम्ही उद्धृत केलेलं धोरण हे सर्वात जाचक वाटतं हे मान्य. पण विशिष्ट दर्जा राखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या मर्जीनुसार धोरण अवलंबत असावा. ब्लॉगच्या वाचकाला काही विशिष्ट अपेक्षा ठेवल्यामुळे कदाचित ती धोरणं विचित्र वाटू शकतील. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी इतर वाचकांवर टीका करणारं लेखन टिकून राहू शकेल, पण संपादकांवर अगदी मामूली टीका करणारं लेखनही सहज उडू शकतं हा अनुभव अनेकांना आहे.

कदाचित या वेगवेगळ्या धोरणांच्या उपयुक्ततेबद्दल चर्चा करता येईल, पण वरील लेखात जो तुच्छतादर्शक दृष्टीकोन घेतलेला आहे तो पटला नाही.

ऐसी अक्षरे या संस्थळावर संपादकांनी अधिकाधिक मुक्तता देता यावी, कमीतकमी संपादनाची गरज निर्माण व्हावी म्हणून लेखनाला तारका देण्याची व प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा शंभरेक सदस्यांना दिलेली आहे. आपल्या लेखनावर, प्रतिसादांवर टीका होऊ शकेल याची जाणीव लेखकांना धोरणांतच करून दिलेली आहे. काहींना अत्यंत मर्यादित टीकाही सहन होत नाही हे दिसून आलं असलं तरी बहुतांश लेखकांना व प्रतिसादकांना त्यांचं लिखाण उडण्यापेक्षा टीकेसहित का होईना, शिल्लक राहिलेलं आवडतं असा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे. पण म्हणून टीका सहन न होणाऱ्यांना तुच्छ लेखणं बरोबर नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शेवटचा परिच्छेद

शेवटचा परिच्छेद अनावश्यक वाटला.आपल्या संकेतस्थळाची पुरेशी प्रसिद्धी झालेली आहे. अशा वादांच्या ठिकाणी उदाहरण म्हणूनही तो दुवा देण्याची गरज नाही. एखाद्या पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये एखाद्या सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात दिसावी तसे वाटले.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

शेवटचा परिच्छेद, पहिली दोन वाक्ये

शेवटचा परिच्छेद, पहिली दोन वाक्ये कळीची. ब्लॉग आणि सामाजिक संवादस्थळ यांतला फरक ठळक करणारी वाक्ये आहेत.

असहमत

श्री. मायनॅक यांनी त्यांच्या लेखात उपस्थित केलेल्या मुद्याशी मी पूर्णपणे असहमत आहे.
माझ्या मताने श्री. मायनॅक यांना उपक्रम सारखी संकेतस्थळे व वैयक्तिक ब्लॉग यांच्यामधील फरक लक्षात येत नसावा.
ब्लॉगर म्हणून माझी पात्रता काय आहे ते आधी सांगतो. यात आत्मस्तुतीचा कोणताही प्रयत्न नाही. माझे 3 ब्लॉग असून तीन्ही ब्लॉगची मिळून सरासरीने 900 ते 1000 पृष्ठे रोज वाचली जातात. रोज 4 ते 5 प्रतिसाद मला येत असतात. हे आकडे अशासाठी दिले की मी मांडत असलेले विचार अनुभवावर आधारित आहेत व नुसतेच विचार नाहीत.
येणारे 99% प्रतिसाद खरोखरच विचारपूर्वक लिहिलेले असतात. परंतु एखादा प्रतिसाद असा येतो जो मुद्दाम ब्लॉगरची किंवा त्याला प्रतिसाद देणार्‍याची निंदा नालस्ती करणे किंवा स्वत:चा सुप्त अजेंडा पुढे ढकलण्याच्या उद्देशाने लिहिलेला असतो. यात शिव्या देण्यापासून ते ब्राम्हणांवर किंवा अन्य धर्मियांवर टीका करणे, पॉर्नॉग्राफी, या सारखे अनेक प्रकार असू शकतात. ब्लॉगर किंवा वर्डप्रेस यातले अनेक प्रतिसाद स्पॅम म्हणून काढून टाकतात. पण मराठीतील प्रतिसाद बहुदा काढले जात नाहीत. हे असे प्रतिसाद प्रसिद्ध झाले तर ब्लॉगरची प्रतिमा मलीन होऊ शकते.
या सर्व संभाव्य धोक्यांची शक्यता लक्षात घेतली तर प्रतिसादांवर पूर्व प्रकाशन संपादनाची गरज किती आहे हे लक्षात येईल. मायनॅक ज्या शेअर मार्केट संबंधी ब्लॉगचे उदाहरण देतात तो ब्लॉग वाचून आपला फायदा होईल या उद्देशाने त्याला भेट दिली जात असल्याने बाकी ब्लॉगशी त्याची तुलना अप्रस्तुत आहे असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असहमती मान्य.

चंद्रशेखर साहेब,
आपला ह्या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे.प्रतिसादांवर पूर्व प्रकाशन संपादनाची गरज नाहीच असे माझे हि मत नाही.तथापि सर्व सामान्य वाचकाला काय वाटू शकते हे त्या लेखका पर्यंत पोहोचावे हा सुद्धा हेतू आहे.ते चूक का बरोबर हे व्यक्ती सापेक्ष असू शकते.आणि त्या मुळेच हे आपले माझे comment moderation च्या बद्दल सगळे निव्वळ बिनकामाचे,नि कदाचित काहींच्या मते बिनडोक्याचे अंदाज हि असू शकतील.कॉमेंटला मॉडरेशन ठेवण्या साठी दुसरी ह्या पलीकडे जाऊन हि काही कारणे असायची शक्यता सुद्धा मी नाकारत नाहीये... ती जिवंतच आहे नि राहील... हे मी सुद्धा सांगतच आहे.
आणि आपण म्हणता त्या प्रमाणे " एखादा प्रतिसाद असा येतो जो मुद्दाम ब्लॉगरची किंवा त्याला प्रतिसाद देणार्‍याची निंदा नालस्ती करणे किंवा स्वत:चा सुप्त अजेंडा पुढे ढकलण्याच्या उद्देशाने लिहिलेला असतो." हि वास्तवता सुद्धा मी नाकारत नाही.

तुच्छता बाळगत नाही

प्रती राजेशघासकडवी,
अहो तुच्छता बाळगत नाहीये आणि काही कारण हि नाही.
पेट्रोल पंपावर तिथल्या पोऱ्याशी भांडण झाले म्हणून आपण काय पेट्रोल भरायचे सोडतो का ? नाही ना ? तसंच आहे.पंपाचे मालक तर चांगले आहेत ना ?
म्हणणं इतकंच आहे कि खरे तर अशा काही ब्लॉग वरील तेथील विचार लेख हे अतिशय दर्जेदार असून हि फक्त त्या तुलनेत त्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद त्या तुलनेत फार कमी असतात.अर्थात चंद्रशेखर साहेब किंवा अजूनही ह्या विषयातील जुने जाणते ब्लॉगर ह्यांची भूमिका त्यांना आलेल्या अनुभवां वरून मला हि मान्य आहे.

मॉडरेशन आहे म्हणून प्रतिसाद नाही?

"मॉडरेशन आहे म्हणून प्रतिसाद देणार नाही ." असे म्हणणार्‍यांची संख्या खरोखरच मोठी आहे का याबद्दल मला शंका आहे. माझा ब्लॉग श्री चंद्रशेखर यांच्या इतका लोकप्रिय नसला तरी त्याला भेट देणार्‍यांची (त्यावर टिचकी मारणार्‍यांची) संख्या माझ्यासाठी समाधानकारक आहे, पण प्रतिसादांची संख्या नगण्य एवढी असते. त्याला इतर कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे अमूक एक गोष्ट करण्यासाठी पुरेशी कारणे असावी लागतात, ती न करण्यासाठी कारणाची गरज नसते.

थोडं कळलं, थोडं नाही

पंपाचा मालक आणि भरून देणारा पोऱ्या ही रूपकं कळली नाहीत. ब्लॉग्जवरती हे दोन्ही स्वतः ब्लॉगलेखकच असतो. संस्थळांवर नक्की कशी विभागणी होते हे सांगता येत नाही. कारण लेखक वेगवेगळे असतात, संपादक असतात व मालक असतात.

पण एकंदरीत तुमचं म्हणणं असं दिसतं की प्रतिसाद ताबडतोब प्रसिद्ध न होण्याच्या अडथळ्यामुळे काही चांगल्या दर्जाच्या लेखनालाही योग्य तितके प्रतिसाद मिळत नाहीत. (लेखातली तुच्छतेची भूमिका ही ब्लॉगलेखकांबाबत नसून या अडथळ्यामुळे प्रतिसाद द्यायला कसं नकोसं वाटतं, याचं वर्णन करण्यासाठी आहे हे आता लक्षात येतं.) तत्वतः हे पटतं. तरीही आनंद घारेंनी म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद मिळणं वा न मिळणं याचं दर्जाशी वीक कोरिलेशन असतं. इतरही अनेक कारणं असतात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रतिसाद

मी वर दिलेला प्रतिसादांच्या आकड्यात स्पॅम म्हणून काढलेले प्रतिसाद धरलेले नाहीत. ते साधारण 25 ते 35 प्रति दिन असतात. म्हणजेच प्रत्येक खर्‍या प्रतिसादाबरोबर 5 ते 6 स्पॅम प्रतिसाद येतात. पूर्व प्रकाशन संपादन किती महत्वाचे आहे हे यावरून पूर्ण लक्षात ये ईल
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सुविधा

माझे मराठी संकेतस्थळ आहे पुर्वी मी येथे प्रतिक्रीया देणे व प्रश्न विचारणे (मी स्वत: उत्तरे देत असे) इ. सुविधा दिल्या होत्या मात्र त्याचा गैर वापर होऊ लागला, अश्लील लिखाण, संबंध नसलेले अर्थहीन लिखाण वगैरेमुळे त्रासच होऊ लागला त्यामुळे हि सुविधा नाईलाजाने काढून टाकावी लागली, यासाठी तुमची काही सुचना असल्यास जरुर कळवा.

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundmarathi.com

एक शंका

मॉडरेशन करण्यासाठी का होईना, ब्लॉगरला हा प्रतिसाद वाचावाच लागतो ना?
म्हणजे एकादा विखारी प्रतिसाद जर लिहिलेला असेल तर तो वाचला जातोच आहे. मग अशा प्रतिक्रिया डायरेक्ट् पब्लिश होऊन आल्या अन् नंतर काढल्या तर काय प्रॉब्लेम आहे?

मलाही शंका

समजा तुम्हाला कोणी आय-मायवरून शिव्या घालत असेल किंवा त्याहूनही खालच्या दर्जाचं लिहित असेल तर त्या इतरांना वाचण्यात किंवा वाचायला देण्यात कोणता आनंद* मिळत असावा? त्या आनंदाची व्याख्या कळली की मग डायरेक्ट पब्लिश होऊन आल्या आणि नंतर काढल्या यातील प्रॉब्लेम सांगता येईल.

मध्यंतरी, उपक्रमावरील एका सदस्यांनी एका ब्लॉगवरील प्रसिद्ध केलेली वाक्ये एका चर्चेसंदर्भात उपक्रमावर चिकटवल्यानंतर ज्या प्रकारे त्या व्यक्तीने येऊन येथे प्रतिसाद लिहिले होते आणि शिवीगाळ केली होती ते वाचून अशा विकृतीला समाजात कोणतेही स्थान असू नये असे मला वाटते.

* चर्चा केल्याचे समाधान, ब्लॉग वाचन कारणी लागल्याचे समाधान वगैरे.

शिव्या!

अनुभव हे सांगतो, की प्रेमाने डार्लिंग अन् रागाने **** फक्त तुमच्या ओळखीचेच लोक म्हणतात. (समजून घ्या 'रिऍक्शनरी' कोण आहेत ते ~विंक्~)

बाकी विनाकारण आई बहिणीवरून फक्त रस्त्यावरचे वेडे शिव्या घालू शकतात. त्यांच्या बोलण्याचा काय बाऊ करायचा? (वैधानिक इशारा: वेड्यांशी शक्यतो भांडण/मारामारी करू नये. हातात किमान् एक भरीव बांबूची काठी हवी. अन्यथा वेडे ताकतीत भारी पडतात.)

मध्यंतरी, उपक्रमावरील एका सदस्यांनी एका ब्लॉगवरील प्रसिद्ध केलेली वाक्ये एका चर्चेसंदर्भात उपक्रमावर चिकटवल्यानंतर ज्या प्रकारे त्या व्यक्तीने येऊन येथे प्रतिसाद लिहिले होते आणि शिवीगाळ केली होती ते वाचून अशा विकृतीला समाजात कोणतेही स्थान असू नये असे मला वाटते.

हे वाचनात आलेले नाही. सबब प्रतिसाद अशक्य.

असा हि एक अनुभव

ब्लॉगरने ते प्रतिसाद वाचावे किंवा त्या प्रतिक्रियांना उत्तर द्यावे न द्यावे किंवा कुणी अगदी शिव्याच घालेल न घालेल हा प्रश्न कदाचित दुय्यम असू शकेल.पूर्व परीक्षण ठेवणे न ठेवणे हा सुद्धा ज्याचा त्याचा अनुभव आणि वैयक्तिक दृष्टीकोन आहे/असू शकतो हे सुद्धा मान्य.

खालील स्वानुभव सांगताना ब्लॉगवाचक आणि ग्राहक ह्यात नक्कीच जमीन अस्मानाचा फरक आहे तो गृहीत धरलेला आहे व मान्य हि आहे.तथापि फक्त सर्वसाधारण माणसाची (ह्या अनुभव कथनासाठी येथे ग्राहकाची)एकंदरीतच सर्वसाधारण मानसिकता काय असते किंवा कदाचित असू शकते,किंवा तो किती भिडस्त असतो वा असू शकतो त्याचे हे एक अति सर्वसाधारण उदाहरण.

आजपासून सुमारे २५-२८ वर्षापूर्वी जेव्हा वाडीलाल आईसक्रीम हे अतिशय लोकप्रिय होते व त्याची टी व्ही वर नियमित जाहिरात व्हायची त्या काळी आम्ही किरकोळ विक्री साठी त्याची एजन्सी घेतली होती. आईसक्रीम पार्लर /फॅमिली पॅक वगैरे संकल्पना त्या काळी आजच्या सारख्या रूढ झालेल्या नव्हत्या.आईसक्रीम म्हणले कि ते फक्त जणू उन्हाळ्यातच खायचे अन ते हि गावातल्या एखाद्या आईसक्रीम दुकानात जाऊन, असा जणू अलिखित संकेत असायचा.यंदा आपल्या ह्या नवीन एजन्सीचा धंदा वाजवी दर आणि वाडीलालच्या त्या तुफान लोकप्रिय जाहिराती मुळे बऱ्या पैकी होईल अशी आम्हाला आशा होती….झाले…... मेनरोडवर म्हणजेच पुण्यातील टिळक रोडवर दुकान तर उघडून बसलो.लोकांच्याही ते त्वरित लक्षात आले पण दुकानाच्या आत मध्ये गिऱ्हाईक शिरायला मात्र मागत नव्हते.खरे तर त्याच्या छोट्या कपची किंमत सुद्धा पारंपारिक आईसक्रीम दुकानातल्या प्रमाणेच किंबहुना कदाचित त्याच्या पेक्षा किंचित कमीच होती.त्या मुळे वाढीव दर,महाग असणे वगैरे हे खरे तर प्रश्नच नव्हते.मग घोडे पेंड कुठे खातंय हे लक्षात येत नव्हते.
आई-बाबां बरोबर फिरायला बाहेर पडलेली अगदी लहान मुले सुद्धा दुकानं जवळ आल्यावर "बाबा वाडीलाल-वाडीलाल" म्हणून दुकान कडे बोट दाखवायची,त्याचे जिंगल गुणगुणायची पण त्यांचे आई-बाबां मात्र त्यांना थोड्या बळजबरीनेच पुढे ढकलायची."अं,नाक कुणाच वाहतय ? घसा कुणाचा दुखतो वगैरे कारणे कानावर अस्पष्टपणे पडायची.ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्या वर थोडा विचार करून,आम्ही फार काही केले नाही तर फक्त साधारण दीड फुट व्यासाचे जाड पुट्ठ्याचे गोल कापून,ते थोडे सजवून, त्या वर फक्त वॅनिला छोटा कप रु.१.७५,आंबा सव्वा दोन रुपये, चॉकलेट २ रु. असे लिहून ते फक्त दुकाना बाहेर लोकांना लांबूनच दिसेल अशा पद्धतीने टांगले.आणि महाराज आश्चर्य झाले.लोक आता अगदी निधड्या छातीने दुकानात यायला लागले,नि त्या वर्षी धंदा अर्थातच चांगला झाला.
धंदा चांगला व्हायला फक्त एकच कारण होते,कि लोकांना लांबूनच ह्या पाट्या दिसायच्या,आणि त्यांच्या लक्षात यायचे कि आर,आपण समजतोय तसे हे फार महाग-बिहाग दिसत नाहीये व बहुदा ते सर्वसाधारणपणे मनातल्या मनात हे गणित करायचे कि मी,बायको,नि दोन मुले म्हणजे झाले ४ आणि प्रत्येकी एक एक कप घेतला तर त्याचे ७,८ किंवा जास्तीत जास्त ९ रुपये होणार आणि माझ्या खिशात रग्गड १५-२० रुपये आहेत म्हणजे काही अडचण नाही आणि मध्यमवर्गीय मानसिकता नि त्या वेळची पैशाची किंमत लक्षात घेता हा विचार १०० % बरोबरच होता.
वरील अनुभव कदाचित काही लोकांना "अति" वाटेल पण सर्वसाधारण माणसाचा भिडस्तपणा किंवा निदान काय आहे ते बघायचा कंटाळा किंवा कदाचित त्याची एकंदरीतच मानसिकता काय असू शकते ह्याचा मी त्या काळी घेतलेला हा अनुभव मला पुढील आयुष्यात बरेच काही शिकवून गेला.एखादा विषय जास्तीत जास्त सोपा करून पुढ्यात ठेवला तर,ती लोकांची सोय होण्याबरोबरच,तुम्हाला हि समाधान देऊन जाऊ शकते.अर्थात यावर सुद्धा मतभिन्नता असू शकते... नाही का?

 
^ वर