संकेतस्थळे आणि मराठीची प्रगती
द्वारकानाथ यांनी इथे दिलेल्या प्रतिसादावरून हा चर्चाप्रस्ताव सुरु करा असे वाटले.
आमच्यासारखे जे सदस्य ज्यांची स्वतःची संकेतस्थळे किंवा अनुदिन्या आहेत आणि ते आपला/परका असा भेदभाव (म्हणजे नक्की काय बॉ?) न करता खुल्या मनाने संकेतस्थळांवर टाकत असतात त्याबाबत थोडा काथ्याकूट आवश्यक आहे.
तत्पूर्वी आमच्यासारख्या संकेतस्थळांच्या प्रवर्तकांचे मानलेले आभार मी त्यांच्या वतीने स्वीकारतो.
माझ्या माहितीप्रमाणे इथल्या बहुसंख्य सदस्यांचे स्वतःचे संकेतस्थळ किंवा एक वा एकापेक्षा अधिक अनुदिन्या आहेत.
१. तरीही त्यांना इतर संकेतस्थळांवर जाऊन लेखन करावेसे का वाटते.
२. असे केल्यामुळे मराठीची प्रगती होते का? असे असल्यास ती का व कशी? व नसल्यास ती का?
३. असे करणारे सदस्य हे मोठ्या मनाचे की प्रसिद्धीचा हव्यास असलेले?*
४. अधिकाधिक लोकांनी आपले लेखन वाचावे म्हणून तुम्ही लिहिता की स्वान्तसुखाय (म्हणजे काय बॉ) लिहिता?
अशा प्रश्नांवर कोणावरही वैयक्तिक टीका न करता मोकळ्या मनाने चर्चा अपेक्षित आहे. तुम्हाला या संदर्भात पडणारे नवे प्रश्नही खाली द्यावेत ही विनंती.
* कृपया हे कोणीही वैयक्तिक घेऊ नये. मला स्वतःला "रेषेवरची अक्षरे" बाबत विचारले असता मी फार खूष झालो आणि 'चला अजून काही लोकांना मी माहीत होईल. पक्षी मला प्रसिद्धी मिळेल' असे मला वाटले. आपण कीर्तीवंत असावे ही मानवी सहजभावना आहे त्यात वावगे असे काहीही नाही.
Comments
स्वान्तसुखाय
आम्ही जे काही खरडतो ते दोन्ही उद्देशाने खरडातो बॉ! (अधिकाधिक लोकांनी वाचायची इच्छा नसती तर लिहिलेले वर्ड डॉक्युमेंट मध्ये सेव्ह करुन घरच्या संगणकावर कुलुपबंद करुन ठेवले नसते का?)तेव्हा आम्ही तरी अधिकाधिक (शक्यतो समविचारी) लोकांनी वाचावे अशी अपेक्षा ठेवुन स्वान्तसुखाय लेखन करतो.
तेच म्हणतो
सर्व प्रथम माझी काही अनुदिनी नाही.
पण उपक्रम अथवा मिपा (या दोनच ठिकाणी) जे काही लिहीतो ते स्वांतसुखाय म्हणूनच लिहीतो. अर्थात माझे स्वांतसुखाय कधी कुणाला डोकेदुखी होऊ शकत असेल तर माहीत नाही :-)
धन्यवाद
कोलबेरपंत
आमचेही विचार तुमच्यासारखेच आहेत. मात्र तुम्ही केवळ येथे लेखन करण्याऐवजी संकेतस्थळांवरही लेखन का करता? यामागे काही विशेष कारण असल्यास सांगावे.
जे वाचक इथे वाचू शकतात तेच तिथेही वाचू शकतात. मग इतर संकेतस्थळांवरही लिहिण्यामागे काही उद्देश आहे का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लेखन
अर्थातच आपला/परका असा भेदभाव न करता मराठी पुढे जाण्यासाठी ..हा हा हा
असो जोक्स अपार्ट..मलातरी स्वतःचे लेख लिहिण्या पेक्षा इकडे तिकडे एखाद दोन फुटकळ प्रतिसाद खरडणे जास्त आवडते (उपलब्ध वेळेत आणि कमी श्रमात ते साध्य होते) आणि ते इतर स्थळांवरच शक्य असल्याने मी तरी इतर स्थळांवर लेखन करतो... कधी तरी हुक्की आली आणि एखादा लेख लिहावासा वाटला तर तो देखिल इतर स्थळांवरच लिहितो हे ही खरे पण 'विदागार अपघात' ह्या नैसर्गिक संकटापासुन बचाव योजना म्हणुन माझ्या अनुदिनीवर टाकतो.
थोडेसे विषयांतरः तसेही मी मराठीत पाहिलेल्या बर्याच (माझ्या सकट) अनुदिन्या ह्या लेखांनी भरलेल्या असतात, पण इतरत्र 'ब्लॉग' वरती (विशेषतः इंग्रजी) ज्या प्रकारचे नियमीत लिखाण/चालू स्थितीवर टिप्पणी/ इ.इ. दिसते तसे मराठी ब्लॉग्ज माझ्यातरी पहाण्यात नाहीत
चालू विषयावर
अगदी अगदी. पण याचे महत्त्वाचे कारण हे असावे की मराठीत चांगल्या मानल्या गेलेल्या अनुदिन्या (ज्या खरंच चांगल्या आहेत) या प्रामुख्याने साहित्य, चित्रपट (शक्यतो जुने आणि क्लासिक वगैरे) आणि काहीतरी ऍब्स्ट्रॅक्ट (ग्रेस, एलकुंचवार वगैरे धर्तीचे) असे लिहितात. अर्थात त्यांचे लेखन मुळातच चांगले असल्याने अनेकांना ते आवडते आणि त्यांना प्रतिसाद वगैरे मिळतात.
मात्र त्याचा तोटा असा होतो की 'प्रतिसाद हाच प्रतिभेचा पुरावा आहे' किंवा 'लोकप्रियता म्हणजेच श्रेष्ठत्त्व' , हे बहुसंख्यांच्या मनावर ठसले जाते आणि या लोकप्रिय आणि चांगल्या अनुदिन्यांचे भ्रष्ट अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरु होतो.
मात्र तरीही नंदनचा दुसरा ब्लॉग, अजित यांसारखे अनेकजण चालू स्थितीवर किंवा फुटकळ विषयांवरही मते व्यक्त करतात जे मला वाचायला अधिक इन्फॉर्मल आणि आनंदाचे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हम्म
सर्वप्रथम ज्या प्रतिसादावरून ही चर्चा सुरू झाली तो प्रतिसाद आमच्या अल्पमतीला कळला नाही हे इथे नमूद करतो. जर त्या लेखाने मराठीचे पाऊल पुढे गेले तर त्या लेखाच्या प्रस्तावनेने किंवा ह्या चर्चेने ते मागे गेले किंवा कसे असे गहन प्रश्न आम्हाला पडले.
प्रश्नांची उत्तरे. ही अर्थातच वैयक्तिक मते आहेत त्यामुळे यावर एकमत होईल अशी अजिबात अपेक्षा नाही.
१. तरीही त्यांना इतर संकेतस्थळांवर जाऊन लेखन करावेसे का वाटते.
माझा वावर इथे आणि मनोगतावर असतो. सुरूवातीला प्रत्येक लेख अनुदिनीवर आणि यातल्या एका संकेतस्थळावर प्रसिद्ध करत असे. नंतर नंतर तोच लेख दोन ठिकाणी बघायचा माझा मलाच कंटाळा यायला लागला आणि वाटले माझाच लेख असून मलाच असे वाटते आहे तर बाकीच्यांचे काय? संकेतस्थळावर लेख प्रसिद्ध केला तर प्रतिसाद जास्त मिळतात हे खरे. पण याची दुसरी बाजू म्हणजे संकेस्थळांवर काही मंडळींचा वावर विष्णुसुद्धा लाजेल इतक्या अवतारांमध्ये चालू असतो. त्यामुळे तुम्ही अशा दशावतारी मंडळींच्या चांगल्या पुस्तकात (गुडबुक्समध्ये हो!) नसाल तर तुमच्या लेखाला अशा अवतारांकडून नाखुषी, कैच्यकैय टीका किंवा चर्चेला भलतेच वळण देणे असे प्रतिसाद यायला लागतात. हे अर्थातच अनुदिनीवरही होऊ शकते पण तिथे मी सर्वशक्तिमान परमेश्वर असल्याने अशा प्रतिसादाची मनाला येईल त्याप्रमाणे वासलात लावू शकतो. संकेतस्थळांवर नेमके काय होईल हे आपल्या हातात नसते. या कारणांमुळे मला फक्त अनुदिनीवरच लिखाण करावे असा निर्णय घ्यावासा वाटला. तिथे (परत द्यावा का दुवा? ;)) प्रतिसाद कमी आले तरी मनापासून असतात त्यामुळे विशेष खेद होत नाही. (याचा अर्थ संकेतस्थळांवरील प्रतिसाद मनापासून नसतात असा अजिबात नाही.)
२. असे केल्यामुळे मराठीची प्रगती होते का? असे असल्यास ती का व कशी? व नसल्यास ती का?
असे प्रश्न नेहेमीच आमची दांडी उडवतात कारण यात नेमकी मराठीची प्रगती कशी होते हे आमच्या मूढमतीला कळलेले नाही. मग फक्त अनुदिनीवर लिहीले तर मराठीची अधोगती होते का? आणि स्वतःच्याच लेखाला एकोणीस नावांनी मस्त, छान, आणखी येऊ द्या असे प्रतिसाद दिले तर मराठीचे काय होते? असो. तेव्हा हा प्रश्न पास.
३. असे करणारे सदस्य हे मोठ्या मनाचे की प्रसिद्धीचा हव्यास असलेले?*
मनाचा मोठेपणा? आमची मनाच्या मोठेपणाची व्याख्या जरा वेगळी आहे. त्यामुळे आमच्या मते उत्तर नंबर दोन.
४. अधिकाधिक लोकांनी आपले लेखन वाचावे म्हणून तुम्ही लिहिता की स्वान्तसुखाय (म्हणजे काय बॉ) लिहिता?
स्वान्तसुखाय. पण लोकांनी वाचावे असेही अर्थातच वाटते. आमच्या लक्षात आले आहे की लोकांना गंभीर वाचायला जरा कमीच आवडते. त्याऐवजी हलकेफुलके, विनोदी लिहीले तर प्रतिसाद जास्त मिळतात. :)
----
बरोबर
हे अनुदिन्यांच्याच बाबत खरे नसून पुस्तकांबाबतही खरे आहे. किंबहुना लोकप्रियता आणि दर्जा यांचे गुणोत्तर व्यस्त असते असे जीए म्हणत. जे बर्याच अंशी पटण्यासारखे आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
किंचित वेगळे मत
लोकांना गंभीर वाचायला जरा कमीच आवडते. त्याऐवजी हलकेफुलके, विनोदी लिहीले तर प्रतिसाद जास्त मिळतात. :)
मला वाटते, हलक्याफुलक्या लिखाणाला जास्त प्रतिसाद कदाचित् मिळत असतील; पण त्यापेक्षा संवेदनक्षम विषयांवरील चर्चांमधे जास्त प्रतिसाद मिळतात असे मला वाटते. राजकीय विचारसरणी, सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाययोजना , आणि इतर असे अनेकानेक मुद्दे आहेत ज्यामधे आपल्याला आपला समाज खोलवर दुभंगलेला दिसतो. (दुभंगलेला हा चुकीचा शब्द. प्रसंगी शतखंडित. जितका मुद्दा जटिल तितकी अधिक मते-मतांतरे) आणि याचेच प्रतिबिंब संस्थळांवर पडते. लोक आपापल्या मुद्द्यांवरून कडकडून विवाद करतात.
सहमत
सहमत आहे. साधारणपणे आरक्षण, परप्रांतिय किंवा हिंदू-मुस्लिम असे विषय असले तर चर्चा कडाडूनच होतात. आणि साहजिकच प्रतिसादही जास्त मिळतात. विषय गंभीर असेल, जसे की तत्वज्ञान किंवा व्याकरण, तर प्रतिसाद/चर्चा मुख्यतः त्या विषयात रस असणार्यांकडून होते. संकेतस्थळ आणि अनुदिनी यातील आणखी एक फरक म्हणजे संकेतस्थळावर चर्चा सुलभपणे होते. अनुदिनीवरही होऊ शकते तांत्रिकदृष्ट्या वाचायला आणि लिहायला अधिक कठीण.
----
चांगला विषय.
विषय चांगलाच आहे. अनुदिनीला एक मर्यादा आहे. त्यामूळे तेथे येणार्या आणि संवादाची भुक असणार्यांना तेथे फारसे रमावे असे वाटणार नाही ( असा माझा कयास आहे.)
आता राहिली मराठीतील नामंवत संकेतस्थळे, मनोगत ( वेलणकर), उपक्रम ( शशांक), मिपा ( तात्या अभ्यंकर). येथे होऊ शकणार्या सदस्याची संख्या आणि संवादाच्या संख्येमुळे अनेक सभासद आहेत आणि लक्षणीय असे वाचक असतात.
वेलणकर आणि शशांक इतरत्र लिहित आहेत का याची मला माहिती नाही. तात्या मात्र उपक्रमवर लिहित असतात.
शेवटी माझ्या मते हा एक सदाचार ( जेस्टर) आहे आणि यामुळे एकमेकांबद्दल सदिच्छेची वाढ होईल असे मला वाटते.
मी सुद्धा सध्या एक संकेतस्थळ निर्माण केले आहे. त्याचा आणि वरील संकेतस्थळाच्या धाटणी मध्ये भेद असल्यामुळे माझा वावर सर्वच ठिकाणी असणे कोणाला आक्षेपार्ह वाटत नसेल अशी मला आशा आहे.
इतरत्र
वेलणकर आणि शशांक हे अनुक्रमे मनोगत आणि उपक्रम मालक आहेत ह्याची माहिती कुठे मिळाली/मिळेल ?
संवादाची भूक
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुक्तसुनीत यांनी खाली म्हटल्याप्रमाणे परदेशस्थांना मराठीमध्ये बोलण्याची/व्यक्त होण्याची संधी मिळणे अनेकदा अवघड जाते. त्यांची संवादाची भूक संकेतस्थळांवर भागू शकते.
मात्र महाराष्ट्रात राहणार्यांना संवादाची भूक संकेतस्थळांवर भागवावी लागावी हे थोडे काळजी करण्यासारखे वाटत नाही का?
बाकी सदाचाराबाबत सहमत आहे. वेलणकर हे देखील उपक्रमाचे सदस्य आहेत. शशांक मिसळपाव आणि मनोगताचा सदस्य आहे. तात्या उपक्रमाचे सदस्य आहेत. अजय गल्लेवाले (मायबोलीकार) हे मनोगताचे सदस्य आहेत. त्यामुळे सदाचार आहेच.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लक्षणीय मुद्दा
मात्र महाराष्ट्रात राहणार्यांना संवादाची भूक संकेतस्थळांवर भागवावी लागावी हे थोडे काळजी करण्यासारखे वाटत नाही का?
हा मुद्दा माझ्या मते लक्षणीय आहे. जर का केवळ परदेशस्थ मराठी बांधवांनाच संवादाची गरज असती / किंवा ती भूक संकेतस्थळांवर भागवावीशी वाटत असती तर महाराष्ट्रात रहाणारे जालसदस्य या स्थळांवर आले नसते. मिसळपाव वर अधून मधून घडणार्या चर्चा/कौलांवरून असे दिसते की जितके महाराष्ट्राबाहेरचे लोक येथे येतात तितकेच महाराष्ट्रात रहाणारेही.
माझा असा कयास आहे की समानधर्मी लोकांशी जोडण्याकरता शेवटी लोकांना वास्तव आयुष्यातल्या संपर्कांपलिकडे पहावे लागते. कदाचित परदेशस्थांना अधिक ; पण सगळ्यांनाच तसे करावेसे वाटते. पर्यायाने अशा शोधात अनेक लोक संस्थळांवर येतात. देवाणघेवाण करतात. जे पूर्वी प्रायः अशक्य होते.
उपक्रमावर
उपक्रमावर भेट देणार्या लोकांची संख्या ही अनुदिनी ला भेट देणार्या लोकांपेक्षा किती तरी अधिक असते . आपले लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव अस लेखकाला नेहमी वाटत.
अनुदिनी हे आपल घर असेल तर उपक्रम वा तत्सम संकेतस्थळ हा अड्डा आहेत.
प्रसिद्धी असेल तरच लोकांपर्यंत लेखन पोचणार.
हव्यास ही गोष्ट सापेक्ष आहे. पण प्रसिद्धी परांङमुख माणसाला प्रसिद्धी हा दोष वाटतो.
प्रकाश घाटपांडे
मराठी संस्थळांचे फायदे/उपयोग
अनेक लोकांनी चांगले मुद्दे इथे मांडले आहेतच. मी जे लिहीन त्यात नवे काही नसण्याचीच शक्यता जास्त.
१. प्रबोधन : संस्थळांमुळे प्रबोधन होते यावर माझा विश्वास आहे. माझ्यापुरते सांगायचे तर "स्वाध्याय" परिवाराचा धागा हे याचे सर्वोत्तम उदाहरण होय. या संस्थेकरता मला काही मदत किंवा कार्य करायचे असेल तर मी दहादा विचार करेन. मूळ लेखकाच्या केवळ ब्लॉगमुळे किंवा वर्तमानपत्रीय जाहिरातीमुळे किंवा लेखामुळे किंवा केवळ फॉर्वर्डेड् इमेल मुळे हे साध्य झाले नसते.
२. जोडले जाण्याच्या भावनेचा परिपोष : आता ही जी गरज आहे त्याबद्दल दुमत होऊ शकते. (म्हणजे तुम्हाला अशी गरज वाटायलाच पाहिजे का ? वगैरे वगैरे) महाराष्ट्रापासून , मी जिथे वाढलो तिथपासून मी दूर आहे पण तिथल्याबद्दल जिव्हाळा वाटतो. जोडलेले असावेसे वाटते. या गरजेची पूर्ती मराठी संस्थळे जितकी करतात तितके वास्तव आयुष्यातले कुठलेही घटक करू शकत नाहीत. नियमित भेटणारे मराठी भाषक, फोनवर भेटणारे मित्र नातेवाईक या कुणालाही भाषा-संस्कृती-कला-क्रीडा यात इतका रस नसतो किंवा इतका समग्र पट ते पुरवू शकत नाहीत.
३. अशी काही उदाहरणे देता येतील की, संस्थळांवर मिळालेल्या माहितीवरून तेथील सदस्यांनी एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली ; एखाद्या सामाजिक/सांस्कृतिक कार्यात सहभाग घेतला, कुठल्या चळवळीला पाठिंबा दिला/मदत केली. व्यक्तिगत डिटेल्स् न देता एक मुद्दा म्हणून हे मान्य होण्यासारखे असावे.
४. व्यासंग : संस्थळांवर होत असणार्या चर्चांमुळे , एकमेकांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे , विचारलेल्या प्रश्नांमुळे (क्वचित् दिलेल्या आव्हानांमुळे) पुस्तके वाचली जातात , खरेदी केली जातात, त्यावर चर्चा घडत रहाते. एकूण वाचक संस्कृती, साहित्य व्यवहाराला बळ मिळते. समाजाच्या एकंदर "भाना"ला समृद्धता मिळते. (जे पुस्तकांच्या बाबतीत तेच संगीत/नाट्य/कला/क्रीडा यांच्या बाबतीत).
चांगले मुद्दे
प्रबोधनः
मनोगतावर पूर्वी आलेल श्यामची आई आता आऊटडेटेड झाली आहे का, खैरलांजी ही बातमी तुम्ही कशी वाचलीत, हिंदी नको इंग्रजी हवी वगैरे चर्चा अतिशय उत्तम होत्या. तिथे राजकीय विषयांवर अतिशय उत्तम व अभ्यासपूर्ण प्रतिसाद देणारे लोक होते त्या चर्चांमुळे माझेही बरेच प्रबोधन झाले आहे. उपक्रमावर होणारे लेखनही असेच अतिशय माहितीपूर्ण असते. नेमाडे जसे म्हणतात की 'वसंत पळशीकरांबरोबर थोडा वेळ नुसत्या गप्पा मारल्या तरी वेळ सत्कारणी लागतो' तसेच उपक्रमावर काही सदस्यांनी प्रतिसाद दिले की वेळ सत्कारणी लागतो.
जोडले जाणे व समाजभावना:
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबाबत विस्ताराने वाचायला आवडेल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच वाटले.
मराठीतल्या सगळ्याच संकेतस्थळांवरच्या चर्चा वाचून बर्याच विषयांवर आपले मत निश्चित करायला मला तरी खूप उपयोग होतो.
शिवाय जोडले जाणे आणि समाजभावना यांचा मुद्दा देखील आहेच.
प्रत्येकच व्यक्ती समाजाकडून मान्यता मिळणे आणि त्यासाठी आवश्यक अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. मानसशास्त्रातली ही महत्त्वाची संकल्पना आहे.
-सौरभ.
मनोरंजक..
हम्म! सदर चर्चा आणि प्रतिसाद आम्हाला मनोरंजक व माहितीपूर्ण वाटत आहेत..
आपला,
(एका मराठी संकेतस्थळाचा मालक) तात्या अभ्यंकर.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
तफावत..
उदाहरण १)
मेघना भुस्कुटे यांचा उपक्रमावरील रेषेवरची अक्षरे २००८ हा धागा अन्यही एका संकेतस्थळावर वाचला. तिथे उपप्रतिसाद वगळता १२ ते १३ प्रतिसाद आल्याचे दिसले. ह्याच धाग्याला उपक्रमावर अवघा एखादाच प्रतिसाद आल्याचे दिसले. मेघना यांनी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हा लेख प्रसिद्ध केला आहे.
उदाहरण २)
स्वाती दिनेश यांची ही सुंदर पाककृती अन्यही एका संकेतस्थळावर एकाच वेळी प्रसिद्ध झाली होती असे आठवते. तिथेही सदर पाककृतीस केवळ एकच प्रतिसाद मिळाला, न मिळाल्याचे दिसते..!
आता एवीतेवी संकेतस्थळे आणि मराठीची प्रगती हा विषय निघालाच आहे, त्या निमित्ताने एकाच लेखाच्या बाबतीत दोन संकेतस्थळांवरील प्रतिसादांची प्रचंड तफावत हा मुद्दा सहजच लक्षात आला!
एका संस्थळावरचे प्रतिनिधी दुसर्या संस्थळांवर येऊन आपल्या दिवाळी अंकाकरता लेख वगैरे मागतांना आढळतात, त्यामुळे दोन मराठी संकेतस्थळांमधील आपापसातील हा भाईचाराही बाकी खरंच वाखाणण्याजोगा आहे.
असो,
आपला,
(एका मराठी संकेतस्थळाचा मालक) तात्या.
--
तात्या म्हणे आता, उरलो शब्दकोड्यापुरता..!
भुस्कुटेबाईंचा लेख
अहो, भुस्कुटेंनी लेख कुठला टाकला? त्यांची तर फक्त अंकाचा दुवा दिला आहे. त्या अंकात जाऊन पाहिलं तर जुनेच लेख आहेत. त्यातील काहीतर उपक्रमावर आधीच आलेले आहेत. म्हणजे लेखच लेख चहुकडे त्याला काय प्रतिसाद देत बसायचं असं वाटत असेल सदस्यांना. अशी प्रत्येक चार डोकी एकत्र येऊन अंक संकलीत करतील. भुस्कुटे बाईंना काही म्हणायचा उद्देश नाही. त्या त्यांना हवं ते करण्यास मोकळ्या आहेत आणि उगीच टवाळी करण्यापेक्षा चांगलं काम करत आहेत पण त्यांना अभिनंदन, अभिनंदन!!!, अभिनंदन!!!!!!!!! असे प्रतिसाद न देत बसता अंकांतील लेखांवर कोणी प्रतिक्रिया दिल्यातर बरे ना!
लोक वाचतील अंक देतील प्रतिक्रिया अंक वाचून.
बरं एक सांगा, त्या अंकात विसोबा खेचर म्हणून एकांचा लेख आहे तो तुम्ही वाटत नाही हो. क्लोनिंगसारखं काही आहे का?
मी फारसं काही लिहित नाही पण ही चर्चा बघून लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा असं वाटतंय.
- राजीव.
सहमत आहे.
हो. मात्र असा अंक तयार करणे हे खरेच फार चिकाटीचे काम असते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नाही,
बरं एक सांगा, त्या अंकात विसोबा खेचर म्हणून एकांचा लेख आहे तो तुम्ही वाटत नाही हो.
नाही, ते आम्ही नाही. आमचे लेख कुणी मुद्दाम सिलेक्ट वगैरे करावेत या लायकीचे नसतात! आम्ही तितके थोर लेखक नाही! :)
आपला,
(एका मराठी संकेतस्थळाचा मालक) तात्या.
--
तात्या म्हणे आता, उरलो शब्दकोड्यापुरता..!
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
गल्लाभरू
हे म्हणजे आमच्या गल्लीतल्या ऑर्केस्ट्रात एका तासात २५, २५ ओळींची १० गाणी म्हटली आणि त्या कुठल्याश्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चारच ओळींचे एकच गाणे कोणी पंडित तासभर दळत होता असे म्हणण्यासारखे झाले. वाचून कळवतो, छान, आवडला, फार्फार आवडला छापाचे प्रतिसाद पायलीला पसाभर गोळा व्हायला काही हरकत नाही. प्रतिसादांच्या संख्येवरून 'तफावत' शोधणे गल्लाभरू मानसिकतेचे लक्षण वाटते.
हा हा
मस्त.
:)
यालाच आमचे मित्र कोलबेर यांनी लेख प्रकाशित झाल्यावर अर्ध्या मिनिटाच्या आत लेंड्यासारखे वा!वा! प्रतिसाद देणे असे म्हटल्याचे आठवते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रत्येकाची मतं..!
प्रतिसादांच्या संख्येवरून 'तफावत' शोधणे गल्लाभरू मानसिकतेचे लक्षण वाटते.
नवीनराव, मी आपल्या म्हणण्याशी थोडाफार असहमत आहे..
असो, प्रत्येकाची मतं!
आपला,
(एका मराठीचा संकेतस्थळाचा मालक) तात्या.
--
तात्या म्हणे आता, उरलो शब्दकोड्यापुरता..!
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
सहमत
प्रतिसादांच्या संख्येवरून 'तफावत' शोधणे आणि एसमेस संख्येवरुन गुणवत्ता ठरवणे* हे दोन्ही आम्ही एकच समजतो.
---
उदा. झी मराठी वरील सारेगम
:)
उदा. झी मराठी वरील सारेगम
वरील उदाहरण पटण्याजोगे आहे! :)
आपला,
(एका मराठी संकेतस्थळाचा मालक) तात्या.
-- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता..!
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
झी मराठी वरील सारेगम
झी मराठी वरील सारेगमप मध्ये एसेमेस वरुन गुणवत्ता ठरवली जात नाही.
हा लेखही पाहावा ही विनंती.
पुस्ती: हा देखील पाहावा.
दिखावे पे ना जाओ... अपनी अकल लगाओ.
हम्म
माझ्या माहितीप्रमाणे इथल्या बहुसंख्य सदस्यांचे स्वतःचे संकेतस्थळ किंवा एक वा एकापेक्षा अधिक अनुदिन्या आहेत.
१. तरीही त्यांना इतर संकेतस्थळांवर जाऊन लेखन करावेसे का वाटते.
माझी अनुदिनी आहे, पण ती कोणी वाचतं का हे त्यावरील मोजक्या प्रतिसादांवरून कळत नाही. म्हणून "गल्ला भरण्यासाठी" संकेतस्थळे. तरीही, उपक्रमावर मला लिहायला अधिक आवडते कारण मला माझ्या आवडीचे विषय जे पूर्वी कोणी वाचत नव्हते ते इतरांच्या बोकांडी मारता येतात. ;-)
२. असे केल्यामुळे मराठीची प्रगती होते का? असे असल्यास ती का व कशी? व नसल्यास ती का?
मराठीची नाही पण माझी प्रगती झाली आहे. माझी भाषा जरा सुधारली आहे. शुद्धलेखनही जरा-जरा वधारलं आहे. शुद्धलेखनाचे नियम शून्य वगैरे ठेवून मराठीची प्रगती कशी होईल बरे? मध्यंतरी नव्याने काढलेल्या एका संकेतस्थळावरील ढीगभर अशुद्धलेखन पाहून त्याच्या संचालकांना सांगता त्यांनी आधी संकेतस्थळ होऊ दे, लोक येऊ दे मग बघू शुद्धलेखनाचं असा प्रतिसाद उपक्रमावर दिला होता. तेव्हा मराठीची प्रगती होईल की अधोगती यावर अधिक काय बोला.
अशुध लेकन....... विराम चिनांचा सुकाल!!!!!!!.......आनि आपन लेखक असल्याचा आव यानं मराथीची परगती कशी होनार!
३. असे करणारे सदस्य हे मोठ्या मनाचे की प्रसिद्धीचा हव्यास असलेले?*
माझं मन मोठं बिठं नाही. प्रसिद्धीचा हव्यास आहे बर्यापैकी. ;-) मी जशी इतरांपेक्षा वेगळी नाही तसे इतरही माझ्यापेक्षा वेगळे नसावेत.
४. अधिकाधिक लोकांनी आपले लेखन वाचावे म्हणून तुम्ही लिहिता की स्वान्तसुखाय (म्हणजे काय बॉ) लिहिता?
स्वान्तसुखाय म्हणजे आपल्याला लिहिता येत नसलं की "मी फक्त स्वान्तसुखाय लिहितो आणि माझा मी आनंद मिळवतो" अशी बातावणी. तर मी तरी स्वान्तसुखाय लिहिते पण इतरांनी ते वाचावं अशी हळूच अपेक्षाही ठेवते.
वा वा वा वा
हे आवडले!!!
"लेखणात, वीरामचीण्हांचा. पूरेपूर!! वाफर?? करनारा "" '
आजाणुकर्न ~!@#$%":
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
असेच म्हणतो.
काही उत्तरे/काही प्रश्न
१. तरीही त्यांना इतर संकेतस्थळांवर जाऊन लेखन करावेसे का वाटते.
प्रश्नात "तरीही" असल्याने मला लागू नाही -स्वत:ची अनुदिनी नसल्यामुळे.
२. असे केल्यामुळे मराठीची प्रगती होते का? असे असल्यास ती का व कशी? व नसल्यास ती का?
कोणा एकाच्या किंवा काहींच्या लिहीण्याने मराठीची प्रगती सातत्याने होणार नाही, त्यासाठी सातत्याने अनेकांनी लेखन करावे लागेल. अर्थातच प्रत्येकाची शैली वेगळी असेल, आणि त्यांच्या साधकबाधक लिहीण्याने मराठीत विचारांची देवाणघेवाण वाढेल म्हणजे अनुषंगाने मराठीचीही वाढच होईल. त्यामुळे प्रगती होईल असे वाटते.
दुसरे म्हणजे मराठीची प्रगती संकेतस्थळांवरच होते असे नाही, पण संकेतस्थळे वाढत असली तर त्यांना तेवढी मागणी आहे म्हणून हे नाकारण्याचे कारण नाही. किंवा काही एक सेवा उपलब्ध करून देत आहेत म्हणून त्यांची वाढ होत असावी. कधीकधी मात्र कोलबेर ज्यापासून जपण्यासाठी त्यांचे लेख जपून ठेवतात तसे विदागारांचे चुकून अपघात होण्याची शक्यता असते. ही शक्यता जितकी कमी होत जाईल, तितके संकेतस्थळांवर चाललेली विचारांची देवाणघेवाण वाढतच राहील आणि तितकी मराठीची किंवा संकेतस्थळांची प्रगती होतच राहील असे वाटते.
३. असे करणारे सदस्य हे मोठ्या मनाचे की प्रसिद्धीचा हव्यास असलेले?*
कदाचित दोन्ही. मोठ्या मनाच्या लोकांना प्रसिद्धीचा हव्यास नसतो म्हणून कोण म्हणाले?!! किंबहुना जे मोठ्या मनाचे आहेत त्यांनीच थोडाफार प्रसिद्धीचा हव्यास बाळगला पाहिजे असे माझे मत आहे. पण ते असो.
४. अधिकाधिक लोकांनी आपले लेखन वाचावे म्हणून तुम्ही लिहिता की स्वान्तसुखाय (म्हणजे काय बॉ) लिहिता?
अर्थातच लोकांनी वाचावे म्हणून, तसेच स्वान्तसुखायही.. यातले काही दुसर्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? आणि तसे असल्यास ते का? :-)
आजानुकर्णांचे प्रश्न ३ आणि ४ वाचून नक्की विचारमग्न झाले एवढे खरे.
काही मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाच्या संवादासाठी कृपया खरडवही किंवा व्य. नि. यांचा वापर करावा.
मी का लिहीतो!
मी लिहीतो ते स्वान्तसुखाय. कारण असे लिहीताना माझे अस्थिर मन शांत होते. पण त्याच वेळी ते लेखन कुणी तरी वाचावे,त्यावर चांगल्या/वाईट प्रतिक्रिया द्याव्यात ही देखिल प्रामाणिक अपेक्षा असते.
मी आधी मनोगतावर लिहायला सुरुवात केली. बरेच लिहील्यानंतर मग मी माझी जालनिशी बनवली आणि त्यावर माझे मनोगतावरचे सर्व लेख चिकटवले...कारण विदागाराचा अपघात झाल्यास माझे लेखन हरवू नये म्हणून. त्यानंतर मी सर्वप्रथम जालनिशीवरच लिहायला लागलो आणि तोच लेख मनोगतावर चिकटवायला लागलो. त्यानंतर काही लेख उपक्रमावर आणि आता नियमितपणे मिसळपाववर आणि कधीमधी मायबोलीवरही चिकटवतो.
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वाचक असल्यामुळे प्रतिक्रियाही वेगवेगळ्या मिळतात.
माझ्या जालनिशीवर बरेच जण येऊन वाचून जातात हे त्यावर लावलेल्या साईटमीटरवरून कळते पण गंमत म्हणजे कुणीही प्रतिक्रिया मात्र नोंदवत नाही. त्यामुळे वाचकांनी वाचूनही त्यावर प्रतिक्रिया का दिली नाही हा प्रश्न पडतो. त्यामानाने इतर ठिकाणी म्हणजेच संकेतस्थळांवर ज्या काही पाच/सहा प्रतिक्रिया मिळतात त्यातून निदान इतके तरी कळते की माझे लेखन काय दर्जाचे आहे ते. माझ्या दृष्टीने मी कितीही चांगले लिहीले असे मला जरी वाटले तरी त्यावर रसिक वाचकांची पसंतीची/नापसंतीची मोहोर उठावी ही प्रामाणिक अपेक्षा जरूर असते. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवण्यात काय अर्थ आहे?
अहो फुकटात प्रसिद्धी कुणाला नको असते? :)
ह्यातून मराठीची प्रगती होते का?
मला नाही तसे वाटत. पण माझी प्रगती होते आणि झालेय हे मात्र नक्की.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मस्त चर्चाविषय
१. तरीही त्यांना इतर संकेतस्थळांवर जाऊन लेखन करावेसे का वाटते.
-- प्रश्न गैरलागू. माझे स्वतःचे संकेतस्थळ अथवा मराठी अनुदिनी नाहि.
२. असे केल्यामुळे मराठीची प्रगती होते का? असे असल्यास ती का व कशी? व नसल्यास ती का?
मराठीची प्रगती होते आहे का हे दाखवण्याजोगा विदा माझ्यापाशी नाहि. मात्र् माझी वैयक्तिक भाषिक + ज्ञानात प्रगती होत आहे. वर अनेकांने म्हटले आहे की त्यांचीही प्रगती होत आहे. तेव्हा जर बर्याच जणांची एकेक्ट्याने प्रगती होते आहे तर कलेक्टीवली मराठीची प्रगती होत आहे म्हणण्यास प्रत्यवाय(!) नसावा
३. असे करणारे सदस्य हे मोठ्या मनाचे की प्रसिद्धीचा हव्यास असलेले?*
इतरांचे माहित नाहि. मला माझ्या लेखनावर इतरांची मते, विचार, प्रतिक्रिया सगळे वाचायला आवडते नव्हे गरजेचे वाटते. हे जर "प्रसिद्धीचा हव्यास" या सदरात येत असेल तर हो मला असा हव्यास आहे :)
४. अधिकाधिक लोकांनी आपले लेखन वाचावे म्हणून तुम्ही लिहिता की स्वान्तसुखाय (म्हणजे काय बॉ) लिहिता?
माझी आंतरजालावर लिहिण्याची सुरवात 'अमेरिकायण!' मधून झाली. माझ्या आईला मी इथे काय करतो.. इथे कसे आहे वगैरे गोष्टीची उत्सुकता होतीच पण ते सतत ऐकायला आवडायचे.. मी दरवेळी तेच तेच काय सांगणार, म्हणून मी ते सांङण्याऐवजी लिहायला घेतले.
माझ्यापुढे एक ब्लॉग काढून लिहायचा ऑप्शन होता पण त्याच दरम्यान मनोगतची लिंक मित्राने दिली. ते स्थळ आवडले म्हणून तिथे लिहू लागलो. हळू हळू प्रतिक्रियांची चटक लागु लागली ;) म्हणजे सुरवात जरी स्वान्तसुखाय असली तरी आता त्याहे स्वरूप "प्रसिद्धीचा हव्यास" झालं आहे की काय कळत नाहि बॉ! ;)
(हावरट) ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
चर्चा विषय चांगला आहे.
चर्चा विषय चांगला आहे.
माझी अनुदिनी अथवा संकेतस्थळ नाही.
मी जे काही थोडेफार लिहिले आहे त्यामुळे मला आनंद मिळाला आणि आलेल्या प्रतिसादांमुळे तो वृद्धींगत झाला. प्रतिसाद किती आले या पेक्षा ते कोणी दिले आणि त्यात काय लिहिले याला मी जास्त महत्व देतो.
भाषा, लेखन, विचार, माहिती या बाबतीतसंकेतस्थळांवरील वावरामुळे मला फायदा झाला आहे.
भाषेची प्रगती होते म्हणजे काय होते ते मला अजून समजले नाही. पण अनेक जण लिहिते होणे, भाषा साहित्यासाठी वापरली जाणे (साहित्यनिर्मिती होणे), भाषेतून त्यातून उत्तमोत्तम विचार प्रकट होणे, नवे शब्द प्रचलित होणे, हा फायदा संकेतस्थळांमुळे झालेला दिसतो.
वरील अनेकांची मते पटली.
--लिखाळ.
धन्यवाद
धन्यवाद मंडळी. सुरेख चर्चा चालू आहे.
कर्ण म्हणे आता, उरलो कट्ट्यांपुरता. ;)
ना घर का ना घाट का
तरीही येथे प्रतिसाद देता येईल असे वाटते.
आमची अनुदिनी नाही आणि संस्थळावरील लिखाणच काय पण वावरही कमी झाला आहे. पण लिहायची उर्मी आहे... वेगळे काहीतरी वाचायची हुरहुरही असतेच.
टेक्निकलि एक दोन वेळा ब्लॉगचे घर बांधले खरे... पण दुसर्याच दिवशी पासवर्ड आठवण्यापासून बोंबाबोंब! परत नव्याने बांधायचा मुहूर्त सापडायला वेळ लागेल (तसाच अनेकांनाही लागत असावा) पण सहजपणे उपलब्ध असलेल्या संस्थळांच्या व्यासपीठावर लिहिणे आधी होण्याची शक्यता अधिक.
eकलव्य
ह्म्म्म्
१. तरीही त्यांना इतर संकेतस्थळांवर जाऊन लेखन करावेसे का वाटततो
माझ्या अनुदिनीचा वाचकवर्ग व उपक्रमाचा वाचकवर्ग वेगवेगळा आहे, हे एक कारण. दुसरे म्हणजे उपक्रम आदि संकेतस्थळांवर जो वाद-संवाद होतो तो आवडतो. अशा संकेतस्थळांवरून विचारांची 'देवाणघेवाण' होते, अनुदिनीवरून फक्त 'देवाण' होते, 'आवडला' या छापाचे प्रतिसाद वाचल्यावर संवाद एकतर्फी चालतो की काय अशी शंका येते, परंतू नवा लेख लिहिला की ज्या संख्येने माझी अनुदिनी वाचली बघितली जाते, ते पाहिल्यावर संवाद अगदीच एकतर्फी नाही असा दिलासा मिळतो. तिसरे म्हणजे माझी अनुदिनी सोडता इतर ठिकाणी मी वेगळ्याच नावाने लिखाण करायचे / करते, अनुदिनीवर मात्र खरे नाव असल्याने तिचा वेगळ्या प्रकारे उपयोग करता येतो.
२. असे केल्यामुळे मराठीची प्रगती होते का? असे असल्यास ती का व कशी? व नसल्यास ती का?
माहित नाही. परंतू एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण करण्यापेक्षा, अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक ठिकाणी लिखाण केले, तर अधिक उपयोग होईल असे काहीसे वाटते.
३. असे करणारे सदस्य हे मोठ्या मनाचे की प्रसिद्धीचा हव्यास असलेले?*
उम्म्म् असे जनरलायजेशन करता येणार नाही. उद्या जर माझे वर्णमाला वगैरे लेख कोणी चोरले व इतरत्र टाकले आणि इथे ज्यांनी वाचले त्याहून वेगळ्या लोकांनी ते लेख वाचले, तर मला फारसे वाईट वाटणार नाही. कारण तो लेख लोकांच्या मनात आपल्या वर्णमालेबद्दल जागृती निर्माण व्हावी या हेतूने लिहिला होता, ती झाली तर खूप झाले, तो लेख मी लिहिला काय इतर कोणी लिहिला काय, काय फरक पडतो, असा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. तेच जर माझे अनुदिनीवरचे अनुवाद आणि अनुवादविषयक लेख कोणी चोरले, तर मात्र मी आकाशपाताळ एक करून त्या व्यक्तीला आपली चोरी कबूल करण्यास भाग पाडेन. कारण मी ज्या साहित्याचे अनुवाद करते, त्याचे अनुवाद इतरांनीही केलेले असतात, मी ते अनुवाद करून काही नवे करत नसते, पण तो अनुवाद 'माझा' असतो. हेच अनुवाद वेगवेगळ्या व्यक्ती/ संस्थांकडे पाठवले असल्याने त्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता लक्षात घेऊन तो तसा झाल्यास, मी इतक्या इतक्या तारखेला हा अनुवाद माझ्या अनुदिनीवर प्रसिद्ध केला आहे म्हणजे तो निर्विवादपणे माझा आहे, हे सांगण्याची सोय होते. आता या दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांची गोळाबेरीज करून उत्तर प्रसिद्धीचा हव्यास असे काढायचे की नाही, ते माहित नाही.
४. अधिकाधिक लोकांनी आपले लेखन वाचावे म्हणून तुम्ही लिहिता की स्वान्तसुखाय (म्हणजे काय बॉ) लिहिता?
अनुवाद पूर्णपणे स्वान्तसुखाय. माहितीपूर्ण लेखन हे पूर्णपणे लोकांनी वाचण्यासाठी.
राधिका